पुणे : वारजे पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते (वय २४, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी), सोहम अनंत सातव (वय १९, रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मनोज पवार व विकास पोकळे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की आकाशनगरकडे जाणार्या रोडवर दोघे जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी रोजरी स्कुलचे विरुद्ध दिशेला आकाशनगरकडे जाणार्या रोडला दोघांना पकडले. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल,तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक मोपेड असा ६५ हजार ३०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.ओंकार ऊर्फ टेड्या सातपुते याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, राईट, जबरी चोरी, घरफोडी, अग्नीशस्त्रे बाळगणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे गुन्हे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, मनोज पवार, विजय भुरुक, दक्ष पाटील, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, विकास पोकळे, सत्यजित लोंढे यांनी ही कामगिरी केली आहे.