पुणे-मावळत्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातून तीन आमदार होते. संग्राम थोपटे, संजय जगताप आणि रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या तीनही आमदारांना पराभव पत्करावा लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जिल्ह्यात गेल्यावेळी एकही आमदार नव्हता. यावेळी बाबाजी काळे हे शिवसेनेचे आमदार आहेत. एका अपक्षाबरबरच शिंदे गटाचा देखील पुणे जिल्ह्यात एक आमदार निवडून आला आहे.जिल्ह्यातील सात विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जुन्नरचे अतुल बेनके, खेडचे दिलीप मोहिते, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, काँग्रेसचे भोरमधील संग्राम थोपटे आणि पुरंदर मधील संजय जगताप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे अशोक पवार आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पराभूत झाले आहेत.
जिल्ह्याच्या आमदारांमध्ये चार नवीन चेहरे आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात तीन माजी आमदारांना पुन्हा विधानसभेची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात 21 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.नव्या पाच चेहऱ्यांमध्ये कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने, चिंचवडमध्ये शंकर जगताप, खेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे, शिरूरमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माउली कटके, भोरमध्ये शंकर मांडेकर यांचा समावेश आहे. माजी आमदार असलेले जुन्नरमधून अपक्ष शरद सोनवणे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पुण्यात 21 पैकी नऊ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. यामध्ये चंद्रकांत पाटील (कोथरूड), माधुरी मिसाळ (पर्वती), सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), भीमराव तापकीर (खडकवासला), हेमंत रासने (कसबा पेठ), राहुल कुल (दौंड), शंकर जगताप (चिंचवड )आणि महेश लांडगे (भोसरी) यांचा समावेश आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काॅंग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत.यामध्ये स्वतः अजित पवार (बारामती), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), माउली कटके (शिरूर), अण्णा बनसोडे (पिंपरी), सुनील शेळके (मावळ), शंकर मांडेकर (भोर), चेतन तुपे (हडपसर) आणि दत्तात्रय भरणे (इंदापूर) यांचा समावशे आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला खेडमध्ये बाबाजी काळे यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वडगाव शेरीमध्ये बापूसाहेब पठारे, त्याचबरोबर शिवसेनेचे विजय शिवतारे हे पुरंदरमधून, तर जुन्नरमध्ये शरद सोनवणे हे अपक्ष विजयी झाले आहेत.