Home Blog Page 562

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

‘यशदा’ येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, उत्तम प्रशासनासाठी मनुष्यबळाचा विकास महत्वाचा आहे. त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा. आज उत्तम प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असून ते समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा. इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुसरण करावे. कार्यशाळेत शिकायला मिळणाऱ्या बाबी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या ठरतील. अनुभवी अधिकाऱ्यांचे विविध प्रयोग इतरांना मार्गदर्शक आहेत, ते संकलित झाले आणि समजून घेतले तर प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यास मदत होते.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनाच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल असा विश्वासाही त्यांनी व्यक्त केला.

शंभर दिवस कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी पुरस्कृत करणार
राज्य शासनाने १०० दिवसाचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. या कार्यक्रमाच्या अवलोकनानंतर राज्यासाठी उत्तम कार्यपद्धतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन होणार आहे. क्वालिटी कौन्सील ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील, त्यांच्या कामांची नोंद घेण्यात येईल. यातून चांगले काम करण्याची प्रेरणा सर्वांना मिळेल. साडेबारा हजार कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे.

जलजीवन योजनेतील त्रुटी बाजूला करून ती योजना प्रभावीपणे राबवावी. योजना पूर्ण झाल्यानंतर ती चालविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा विचार करावा. कार्यशाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कामासाठी काय करता येईल याचा विचार करावा, त्यासाठी क्षमतावाढ आणि प्रशिक्षणावर भर द्यावा. बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांचे प्रशिक्षण घ्यावे.

येत्या पाच वर्षात आरोग्य सुविधांच्या सुधारणेवर भर
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली असून तिला आकार देणे गरजेचे आहे. येत्या पाच वर्षात नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक पाच किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सुधारणा घडवून आणल्यास सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील.

सर्वांगीण प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे
शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. अंगणवाडीपासून या सुधारणांना सुरुवात करावी. सेवाभावी संस्थांच्या सहभागातून चांगल्या सुविधा करता येतील. जलसंधारण, उद्योगाला प्रोत्साहन, विविध योजनांचे अभिसरण आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर द्यावा. नदी-नाल्यात प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ‘लखपती दीदी’ सारख्या योजनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरे
मंत्री गोरे म्हणाले, पहिल्या बैठकीत साडे तेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली आणि १० लाख घरांना पहिला हप्ता देण्यात आला, त्यातील ४६ हजार घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ३० लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून या गावांमध्ये शासनाच्या योजनाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट राहील. या योजनेच्या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. योजनेअंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेवरील जनतेचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव डवले यांनी प्रस्ताविकात कार्यशाळेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. १०० दिवसाच्या कार्यक्रमातील २१ पैकी २० मुद्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. उमेद अभियान, आरोग्य, आरोग्य विमा योजना, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदी विविध विषयांवर पहिल्या दिवशी चर्चा करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

ग्रामविकास विभागाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले सिंगल युनिफाईड पोर्टल, संचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेल्या आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, आयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या पीएमएवाय आणि नरेगा डॅशबोर्डचे उद्घाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत बनविलेल्या चित्रफितीचे अनावरण श्री. फडणवीस यांच्या हस्ते कारण्यात आले.

राज्यातील २० जिल्हा परिषदांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमावर आधारित पुस्तिकेचे तसेच महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयातील उत्तम कल्पना आणि कामकाजातील सुधारणांशी संबंधित दस्तावेज तयार करण्यासाठी सहा गटात चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते.
0000

दहशतवादाच्या निषेधार्थ पुण्यात महिला काँग्रेसचा’कॅंडल मार्च’

पुणे – पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात कॅंप भागात प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने ‘कॅंडल मार्च’ काढण्यात आला.

कॅंडल मार्च कॅंप भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सायंकाळी काढण्यात आला. कॅंडल मार्चचे नेतृत्व प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस स्वाती शिंदे,अनिता मकवाना यांनी केले.या कॅंडल मार्च मध्ये संगीता अशोक पवार,प्रियांका,रणपिसे,
ॲड.राजश्री अडसुळ,ज्योती चंदेलवाल,अंजली सोलापुरे,शिवानी माने,ॲड.रेश्मा शिकिलगार,रेखा जैन,व अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यांना महिला काँग्रेसच्यावतीने आम्ही श्रद्धांजली वहात आहोत आणि या संकटाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व देश एकजुटीने उभा राहील,असे स्वाती शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आपल्या भाषणात म्हणाले की लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगामला जावून जखमींची भेट घेतली. तसेच दिल्लीतील सर्व पक्षीय बैठकीत राहुल गांधींनी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच्या ऐक्याला महत्त्व दिले. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे,

अमरावती विमानतळास भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे नाव द्यावे – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे जागतिक पातळीवर भारताचे आणि देशपातळीवर अमरावतीची ओळख निर्माण करणाऱ्याभारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटीलयांचे नाव अमरावती विमानतळास द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, अमरावतीकरांची विमानतळाची स्वप्नपूर्ती झाली आणि पहिल्या विमानाने मुंबईहून अमरावतीकडे प्रवास केला, त्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून खूप खूप आभार. अमरावतीची ओळख ही थोर स्वातंत्र्यसंग्राम सेनानी देशभक्त दादासाहेब खापर्डे, स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देणारे क्रांतिकारी वीर वामनराव जोशी, देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या नावाने कायम आहे. मात्र यामध्ये आणखी एक नाव आवर्जून जोडले जाते ते म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देविसिंह पाटील यांचे. आपला देश कायमच नेतृत्वाच्या बाबतीत भाग्यवान ठरला. स्वातंत्र्यानंतर भारताचा संपूर्ण कारभार नेहमीच योग्य नेतृत्वानी सांभाळल्याने आज जगात भारताचे नाव हे विकसनशील देशांमध्ये सर्वात पुढे आहे. त्यात प्रामुख्याने आपल्या देशाला अनेक हुशार कर्तृत्वान महिलांचे देखील नेतृत्व लाभले. या महिलांच्या नेतृत्वानेदेखील त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत देशाला पुढे नेण्याचे मोठे काम केले. प्रत्येक महत्वाच्या पदावर महिलांनी काम करत देशाची सेवा केली. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती या पदावर काम करत देशाची शान वाढवली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभा पाटील या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या होत्या. कायदेतज्ज्ञ असलेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या जळगाव विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यावेळी एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर सलग वीस वर्षे त्यांनी विविध खात्याची मंत्रीपदे सांभाळून महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले. महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, सांस्कृतिक, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री असे मंत्रीपदे भुषवीत महाराष्ट्र विधान सभेवर तसेच महाराष्ट्र विधान मंडळ नेतेपदी त्यांची निवड झाली. श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी महिला बँकांची स्थापना केली, आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. पुढे अंध व्यक्तींसाठी सामाजिक संस्था काढून मोठे कार्य त्यांनी उभे केले. सन १९९१ साली अमरावतीतून श्रीमती प्रतिभाताई पाटील लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल झाल्या. देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती पद त्यांनी भुषविले आणि जागतिक नकाशावर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने अमरावतीची नवी ओळख निर्माण झाली आहे. श्रीमती प्रतिभाताईंनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा महिलांसाठी कोणत्याच प्रकारचे आरक्षण अस्तित्वात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी राजकारणात दिलेले योगदान हे महिलांकरीता आजही आदर्श ठरत आहे. चुल आणि मुल एवढ्यापुरते मर्यादित न राहता समाजकारणात-राजकारणात महिलांचे योगदान हे किती महत्वाचे आहे याची प्रचिती त्यांच्या राजकारणातील योगदानावरून येते. त्यामुळेच राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू’ राष्ट्रपती ठरल्या.राजकारणात आणि समाजकारणात पाऊल ठेवणाऱ्या महिलेपुढे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श आहे. जागतिक पातळीवर भारताचे आणि देशपातळीवर अमरावतीची ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभाताईच्या यशस्वी राजकीय जीवनातील कार्यकाळाचा अभ्यास करावा, असे मोठे नेतृत्व अमरावतीकरांना लाभले आहे. राजकीय जीवनात महिलांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला तर “ती” देशाला आणि पर्यायाने मूळ गावाला विकासाच्यादृष्टीने उंच शिखरावर नेऊन ठेवते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती प्रतिभाताई पाटील. त्यांचे नाव अमरावती विमानतळास देण्यात यावे अशी संपूर्ण अमरावतीकरांची इच्छा असून तशी त्यांनी मागणीसुद्धा केलेली आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे ‘बदला घ्या आंदोलन’-

पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुणे महानगरचे आंदोलन

पुणे : ‘उठ हिंदू जागा हो,  हिंदुत्वाचा धागा हो’… पश्चिम बंगाल की दंगाईओ से हम लढेंगे हम लढेंगे..पुरा भारत क्या चाहता है, बदला..बदला.. बदला अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुणे महानगर यांच्यावतीने ‘बदला घ्या आंदोलन’ करण्यात आले. डेक्कन गुडलक चौक येथे  काश्मीरध्ये हिंदूंवर झालेल्या क्रूर हल्ल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री दादा वेदक, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, प्रांत संयोजक नितीन महाजन, प्रांत संयोजिका प्रिया रसाळ, सोनाली नाथ, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, केतन घोडके, जिल्हा मंत्री शुभम मुळूक, विजय कांबळे, साईनाथ कदम, नाना क्षीरसागर, शार्दुल ठाकूर, दीपक पटेलिया, महेंद्रसिंह चौहान, जिल्हा संयोजक विक्रम घुंगरूवाले, दत्ता तोंडे, राजू कुडले, विनायक देसाई, आकाश दुबे, आशिष दुसाणे, आशा टेकवडे, ईशानी खिरे, सुरेखा कवडे, शोभा श्रीगोंदेकर, आरती भारती, मुस्कान वर्मा, समृद्धी सराफ यावेळी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले,  आपल्या देशाला पाकिस्तान बरोबरच देशाच्या आतील गद्दारांकडून सुद्धा धोका आहे. सीमेवरील शत्रूंशी भारतीय जवान लढतील आणि देशाच्या आतील शत्रूंशी बजरंग दलाचे कार्यकर्ते सामना करतील. त्याचबरोबर कोंढवा भागात वास्तव्य असणारे बांगलादेशी नागरिक अनधिकृत व्यवसाय याविषयी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल या संदर्भात मोठे आंदोलन करेल. तसेच फर्ग्युसन कॉलेज रस्ता या परिसरात रात्री नऊ नंतर चालणारे अनधिकृत व्यवसाय पोलीस प्रशासनाने त्वरित बंद करावेत, अशी मागणी यावेळी  करण्यात आली.

महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी बेपत्ता: 48 शहरांत 5023 पाकिस्तानी:नागपुरात सर्वाधिक 2458

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना यासंबंधीचे दिशानिर्देश दिलेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारही यासंबंधीची पाऊले उचलत असताना राज्यातील 48 शहरांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळल्याचा दावा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे.

अमित शहा यांच्या आदेशानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्यात राज्यातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरीक आढळलेत. यापैकी 107 जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागपूर शहरात आढळलेत. त्यानंतर ठाण्यात 1106, तर मुंबईत 14 पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ 51 पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळलेत.

योगेश कदम म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रात 5 हजार 23 पाक नागरीक आहेत. यातील एक कॉलम अनट्रेसेबल पाक नागरिकांचा आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवायचे आहे. पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. तूर्त सार्क व्हिसा व शॉर्ट टाईम व्हिसावर आलेल्या पाक नागरिकांना 2 दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले.

जे पाकिस्तानी वैद्यकीय उपचारांसाठी येथे आलेत. त्यांना 2 दिवस वाढवून देण्यात आलेत. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणे अजून सुरू असल्यामु्ळे या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असेही योगेश कदम यांनी याविषयी बोलताना सांगितले.

खाली वाचा कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?

अकोला 22
अहिल्यानगर 14
अमरावती 118
छत्रपती संभाजीनगर 59
भंडारा 0
बीड 0
बुलढाणा 7
चंद्रपूर 0
धुळे 6
धाराशिव 0
गडचिरोली 0
गोंदिया 5
हिंगोली 0
जळगाव 393
जालना 5
कोल्हापूर 58
लातूर 8
मुंबई 28
नाशिक 10
नागपूर 2458
नांदेड 4
नंदुरबार 10
नवी मुंबई 239
परभणी 3
पालघर 1
पिंपरी चिंचवड 290
पुणे 114
रायगड 17
रत्नागिरी 4
सातारा 1
सांगली 6
कोल्हापूर ग्रामीण 17
सोलापूर 0
सिंधुदुर्ग 0
ठाणे 1106
वर्धा 0
वाशिम 6
यवतमाळ 14
एकूण 5023

आर्ट मॅजिक चित्रकला प्रदर्शन मंगळवारपासून

आर्ट मॅजिकच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे आयोजन : विनामूल्य प्रवेश

पुणे : ‘आर्ट मॅजिक’ १८  वे चित्रकला प्रदर्शन दिनांक २९ आणि ३० एप्रिल रोजी बालगंधर्व कलादालन येथे होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजता होणार असून उद्घाटनाला ज्येष्ठ  चित्रकार अल्हाद नाईक, सायली दामले उपस्थित राहणार आहेत.

आर्ट मॅजिकच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार, अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.  यावर्षी या कला प्रदर्शनात अ‍ॅक्रिलिक पेंटिंग, पोर्ट्रेट, वॉटर कलर पेंटिंग, पेंन्सिल स्केचिंग अशा विविध माध्यमातून कलाकारांनी त्यांच्या प्रतिभेला मुक्तपणे मांडले आहे. वय ५ वर्षे ते ६५ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात तब्बल ७५ कलाकार सहभागी झाले आहेत.

प्रदर्शनाचे संयोजन संयोजन अनुजा जोशी, ऋचा पोतदार, सार्थक चव्हाण, सिया पांडे, श्लोका धुमाळ, निल पायगुडे यांनी केले आहे. महालक्ष्मी पवार या मुलांना कला शिकवण्यासोबतच त्यांना नॅशनल व इंटरनॅशनल पातळीवर काम करायला शिकवतात व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करतात. 

द मॅस्ट्रो पेंटर व्हि.एस. गायतोंडे इंटरनॅशनल अॅवाॅर्ड ने महालक्ष्मी पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे. आर्ट मॅजिक संस्थेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. दिनांक २९ आणि  ३० एप्रिल रोजी सकाळी ११  ते रात्री ८ या वेळेत पुणेकरांना विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे. तरी कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 92 युवकांना नियुक्ती पत्रे प्रदान


केंद्रीय मंत्री जयप्रकाश नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती

पुणे, 26 एप्रिल 2025

आज 15व्या रोजगार मेळाव्यामध्ये देशातील 51 हजाराहून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून नियुक्ती पत्र देण्यात आली. पुण्यात ‘यशदा’ येथे केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालय, पुणे- 1 यांच्यातर्फे या रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायने व खते मंत्री जयप्रकाश नड्डा, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी उपस्थित होते.

तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालय, पुणे- 1 चे प्रमुख आयुक्त मयंक कुमार व प्रधान आयुक्त मिहीर कुमार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी सर्वांना संबोधित केले. “जेव्हा युवा राष्ट्र उभारणीत सहभागी होतात तेव्हा राष्ट्राचा विकास वेगाने होतो, जगातही तो आपला ठसा उमटवतो. आज, भारतातील तरुण आपल्या कठोर परिश्रम, नवोपक्रमाद्वारे जगाला आपली क्षमता दाखवत आहेत.”, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काढले.

“सरकारने विविध मंत्रालय, विभागांना कालबद्ध रीतीने कार्यालयातील रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे सातत्याने पदे भरली जात आहेत.”, असे केंद्रीय मंत्री नड्डा यांनी नमूद केले. पुढे बोलताना नवनियुक्त कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “सरकारी नोकरीकडे नागरिकांची सेवा करण्याची जबाबदारी या दृष्टीकोनातून पहा.”

“युवकांना केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या ज्यातून तरुणांना सक्षम केले जात आहे. 10 वर्षात देशामध्ये विविध क्षेत्रात सुमारे 17 कोटी 19 लाख नोकरीच्या संधी तयार झाल्या.”, अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यानिमित्ताने दिली.

आज वस्तू व सेवा कर आयुक्तालय, भारतीय रेल्वे, बँका, आरोग्य मंत्रालय, आयकर विभाग, विविध बँका, CRPF, EPFO, BRO, Defense Estate, FCI, CGHS अशा विविध विभागातील सुमारे दोनशे नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 92 नव नियुक्त कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

ज्यामध्ये दृष्टी बाधित महिला कर्मचारी व्हॅलेंटिना विनायक कांडलकर व दिव्यांग श्रेयांश शर्मा यांचा देखील समावेश होता.

याप्रसंगी पहलगाम येथील दुःखद घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा,उत्तराखंड व सिक्किम मार्गे 750 भारतीय जातील

चीनने परवानगी दिली
कैलास मानसरोवर यात्रा 30 जून ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाने अर्ज प्रक्रियेसाठी वेबसाइट उघडली. यात्रेकरू http://kmy.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२५ आहे.यावर्षी, यात्रेकरूंचे १५ गट उत्तराखंड आणि सिक्कीम मार्गे कैलास मानसरोवरला जातील. उत्तराखंडहून लिपुलेख खिंड ओलांडून ५ गटात ५०-५० प्रवासी मानसरोवरला जातील. त्याच वेळी, १० बॅचमध्ये प्रत्येकी ५० प्रवाशांचे गट सिक्कीमहून नाथुला मार्गे प्रवास करतील.

कैलास मानसरोवर चीनव्याप्त तिबेटमध्ये आहे. परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी या सहलीचे आयोजन करते. तथापि, गेल्या पाच वर्षांपासून चीन भारतीयांना कैलास मानसरोवरला जाऊ देत नव्हता. दोन्ही देशांमधील सीमा वाद आणि कोविड लाट हे याचे कारण होते.आता ५ वर्षांनंतर प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याचा हा एक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देशांनी डेमचोक आणि डेपसांग येथून आपले सैन्य मागे घेतले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान शहरात पाच वर्षांनी भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी परस्पर संबंधांच्या स्थितीवर चर्चा केली आणि संबंध सुधारण्यासाठी काही पावले उचलण्याचे मान्य केले.तेव्हापासून, गेल्या ३ महिन्यांत, चीन-भारत सीमेवरील डेमचोक आणि देपसांग या वादग्रस्त भागातून दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर, ५ वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा आणि विमान सेवा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.

२०२० पासून भारत आणि चीनमधील विमान सेवा देखील बंद होती

परराष्ट्र मंत्रालयाने २७ जानेवारी रोजी माहिती दिली होती की भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा देखील सुरू होईल. २०२० पासून दोन्ही देशांमधील विमान सेवा बंद होती. जून २०२० मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलाम वाद झाला आणि मार्च २०१९ मध्ये कोविडची पहिली लाट आली.कोरोना साथीपूर्वी दोन्ही देशांमध्ये दरमहा ५३९ थेट उड्डाणे होत असत. त्याची क्षमता १.२५ लाखांपेक्षा जास्त जागांची होती. या विमानांमध्ये एअर इंडिया, चायना सदर्न एअरलाइन्स, चायना ईस्टर्न एअरलाइन्स सारख्या कंपन्यांचा समावेश होता.विमान उड्डाण बंद झाल्यानंतर, दोन्ही देशांतील प्रवासी बांगलादेश, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर सारख्या कनेक्टिंग हबमधून प्रवास करत असत. तथापि, हा प्रवास महागडा होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान, १.७३ लाख लोकांनी हाँगकाँग मार्गे, ९८ हजारांनी सिंगापूर मार्गे, ९३ हजारांनी थायलंड मार्गे आणि ३० हजार लोकांनी बांगलादेश मार्गे दोन्ही देशांमध्ये प्रवास केला.

कैलास मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. या भागात ल्हा चू आणि झोंग चू नावाच्या दोन ठिकाणांमध्ये एक पर्वत आहे. या पर्वताला येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते.

या शिखराचा आकार एका विशाल शिवलिंगासारखा आहे. हे ठिकाण उत्तराखंडमधील लिपुलेखपासून फक्त ६५ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कैलाश मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे.

श्रद्धा – भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात-हिंदू धर्मात असे मानले जाते की भगवान शिव त्यांच्या पत्नी पार्वतीसह कैलास पर्वतावर राहतात. म्हणूनच हे हिंदूंसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. जैन धर्मात असे मानले जाते की पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांना येथून मोक्ष मिळाला होता. २०२० पूर्वी, दरवर्षी सुमारे ५० हजार हिंदू भारत आणि नेपाळ मार्गे धार्मिक तीर्थयात्रेसाठी येथे येत असत.

कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारत आणि चीनमध्ये दोन करार झाले

कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारत आणि चीनमध्ये दोन मोठे करार झाले आहेत-

पहिला करार: लिपुलेख खिंडीतून कैलास मानसरोवरला जाण्यासाठी भारत आणि चीनमध्ये २० मे २०१३ रोजी हा करार झाला होता. हा करार तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झाला होता. यामुळे लिपुलेख खिंडीचा मार्ग प्रवासासाठी खुला झाला.

दुसरा करार : नाथुला मार्गे कैलास मानसरोवरला जाण्याच्या मार्गाबाबत भारत आणि चीनमध्ये १८ सप्टेंबर २०१४ रोजी हा करार झाला होता. परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी केली होती.

दोन्ही करारांची भाषा जवळजवळ सारखीच आहे. हे करार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून लागू होतील. करारात असे लिहिले आहे की त्याची कालमर्यादा दर ५ वर्षांनी आपोआप वाढवली जाईल.

उत्तराखंडच्या व्यास खोऱ्यातून भाविक कैलासाला भेट देत होते

कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून, उत्तराखंडमधील व्यास खोऱ्यातून भाविक कैलास पर्वतावर येत होते. गेल्या वर्षी, उत्तराखंड पर्यटन विभाग, सीमा रस्ते संघटना (BRO) आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिस (ITBP) च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कैलास पर्वताचे स्पष्टपणे दृश्यमान स्थान शोधून काढले होते. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी, पहिल्यांदाच, जुन्या लिपुलेख खिंडीतून भारतीय हद्दीतून पवित्र कैलास पर्वत दिसला. हे उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील व्यास खोऱ्यात वसलेले आहे.

कैलास पर्वताची उंची एव्हरेस्टपेक्षा कमी आहे पण आतापर्यंत कोणीही त्यावर चढाई करू शकलेले नाही

आतापर्यंत ७००० लोकांनी जगातील सर्वात उंच पर्वत, एव्हरेस्ट चढले आहे. त्याची उंची ८८४८ मीटर आहे, तर कैलास पर्वताची उंची एव्हरेस्टपेक्षा सुमारे २००० मीटर कमी आहे. तरीही, आजपर्यंत कोणीही त्यावर चढू शकलेले नाही. काही लोकांना ५२ किमी पर्यंत प्रदक्षिणा घालण्यात निश्चितच यश आले आहे.खरंतर, कैलास पर्वताची चढाई खूप तीव्र आहे. डोंगराचा कोन ६५ अंशांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, माउंट एव्हरेस्टचा कोन ४०-५० अंश आहे, म्हणून कैलास चढणे कठीण आहे. त्यावर चढाई करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. शेवटचा प्रयत्न २००१ मध्ये करण्यात आला होता. तथापि, आता कैलास चढाई पूर्णपणे प्रतिबंधित आहे.

कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक

कुलगाम पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफसोबत संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी साथीदारांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.

कायमोह येथील मतलहामा चौक ठोकरपोरा येथे स्थापन केलेल्या चौकीवर तपासणी दरम्यान, कायमोह येथील ठोकरपोरा येथील रहिवासी अब्दुल सलाम भटचा मुलगा बिलाल अहमद भट आणि गुलाम मोहम्मद भटचा मुलगा मोहम्मद इस्माईल भट अशी ओळख पटवण्यात आलेल्या दोन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली. झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून ०२ पिस्तूल, २५ पिस्तूल राउंड, ⁠०२ पिस्तूल मॅगझिनसह शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.

घटनेबाबत, पीएस कैमोह येथे कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन

पुणे, दि.२६: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना धीर दिला.

यावेळी गणबोटे यांच्या गंगानगर कोंढवा येथील घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा तुषार, कुणाल, स्नुषा कोमल गणबोटे उपस्थित होते. जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी गणबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.

पानशेत व वरसगाव धरणाची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पाहणी

धरणातील गाळ काढण्याच्या दृष्टीने गाळाचे सर्वेक्षण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

पुणे, दि.२६: गाळ साचल्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.

पानशेत व वरसगाव धरणांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपअभियंता मोहन भदाणे, पानशेत प्रकल्पाचे शाखाधिकारी अनुराग मारके आदी उपस्थित होते.

पानशेत व वरसगाव धरणासाठी संपादित जमिनीचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त संपादित जमिनीचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देऊन मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, पानशेत व वरसगाव येथील महानिर्मिती कंपनीमार्फत कार्यान्वित असलेले जलविद्युत निर्मिती प्रकल्पाबाबत नव्याने अभ्यास करून अतिरिक्त क्षमता वाढविण्यात येईल किंवा कसे याबाबत पाहणी करावी. वरसगाव धरणाची गळती कमी करण्याच्या उपाययोजनेबाबत सविस्तर अंदाजपत्रक करून कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. विखे- पाटील यांनी वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे, परिसराचा सुशोभीकरणाचा आराखडा करून त्याचे उत्कृष्ट काम करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

श्री. कपोले, श्री. गुणाले यांनी या धरण प्रकल्पांच्या बाबत त्यांचे बांधकामाचे वर्ष, बांधकामाचा प्रकार, साठवण क्षमता, जलविद्युत निर्मिती प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता आदींच्या अनुषंगाने माहिती दिली. तसेच पानशेत मधील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगितले. दोन लाख घन मीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0000

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ममता बॅनर्जी यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

श्रीनगर – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ममता बॅनर्जी यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल.

मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की, त्यांनी शहीद बिटन अधिकारी यांच्या पालकांशी फोनवरून संवाद साधला. आरोग्य सुविधेअंतर्गत त्यांच्यासाठी स्वास्थ्य साथी कार्ड बनवण्यात आले आहे आणि त्यांना दरमहा १०,००० रुपये पेन्शन दिले जाईल. बिटनच्या पालकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल आणि त्याच्या पत्नीलाही ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

याशिवाय, बेहला आणि पुरुलिया येथील इतर दोन पीडितांच्या कुटुंबियांनाही प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई दिली जाईल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नोकरी करायची असेल, तर सरकार नोकरी देखील देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उधमपूरमध्ये शहीद झालेल्या निमलष्करी दलाच्या जवानाच्या पत्नीशीही त्या बोलल्या. सरकारने त्यांना १० लाख रुपये भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेतला आहे. मी लवकरच मुर्शिदाबादला जाऊन तीन बाधित कुटुंबांना भेटेन आणि त्यांना भरपाई देईन. या दुःखाच्या वेळी राज्य सरकार पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

कुलगामच्या गिद्दर गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ७२ तासांत पाचवी चकमक,१४ दहशतवाद्यांची यादी जाहीर

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील गिद्दर गावात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल परिसरात शोध घेत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.यानंतर, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले. शोध मोहीम सुरू आहे. गेल्या ७२ तासांत खोऱ्यात झालेली ही पाचवी चकमक आहे.
सेदोरी नाल्याच्या जंगलात दहशतवाद्यांचे अड्डे सैन्याने उद्ध्वस्त केले.
माछिल सेक्टरमधील मुश्ताकाबाद भागातील सेदोरी नाल्याच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांना एका संशयास्पद ठिकाणी लपवून ठेवलेले शस्त्रसाठा आढळला. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ५ एके-४७ रायफल, ८ एके-४७ मॅगझिन, ६६० राउंड एके-४७ गोळ्या, एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, एक पिस्तूल गोळी आणि ५० राउंड एम४ रायफल गोळ्यांचा समावेश आहे. हे लपण्याचे ठिकाण कधी तयार केले गेले आणि कोणत्या दहशतवादी संघटनेने ते तयार केले याचा शोध सुरक्षा संस्था घेत आहेत.

१४ दहशतवाद्यांची यादी जाहीर
झाकीर अहमद गनी (Let), कुलगाम
हारून रशीद गनी (HM), अनंतनाग
झुबेर अहमद वाणी (HM), अनंतनाग (देहरुणा)
अदनान शफी (Let), अनंतनाग (देहरुना)
आमिर अहमद दार (Let), शोपियां
शाहिद अहमद कुटे (Let), शोपियान
नसीर अहमद वानी (Let), शोपियान
आसिफ अहमद खांडे (JeM), शोपियान
यावर अहमद भट (JeM), पुलवामा
आमिर नजीर वानी (Let), पुलवामा
हरीस नझीर (Let), पुलवामा
एहसान अहमद शेख मुर्रन (Let), सोपोर
आसिफ अहमद शेख ((JeM)), त्राल
आदिल अहमद (Let), सोपोर
Let- लष्कर-ए-तोयबा
JeM- जैश-ए-मोहम्मद
HM – हिजबुल मुजाहिदीन

महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचे पुण्यात 

उत्तम संघटन, आर्थिक शिस्त आणि त्याचे नियोजन यावर मार्गदर्शन ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पुणे : महाराष्ट्रातील सर्व ढोल ताशा पथकांचे एकत्रीकरण करण्यासोबतच तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार काही प्रश्न आहेत ते सोडवता येतील का, याचा विचार करण्याकरिता आणि पथकांवरील टीकेवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र च्या वतीने पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ४ मे २०२५  रोजी सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बीएमसीसी कॉलेज आॅफ कॉमर्स येथील टाटा हॉल मध्ये हे अधिवेशन होणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अनुप साठ्ये, विलास शिगवण, अ‍ॅड. शिरीष थिटे, ओंकार कलढोणकर, अमर भालेराव, अक्षय बलकवडे, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.

अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे. तसेच समारोप केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांचे उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात पुणे शहरातील अनेक गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशा वादनाचा प्रचार-प्रसार उत्तमपणे कसा होईल, यावर विचार विनिमय यावेळी करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव, शिवजयंती, गुढी पाडवा या सण उत्सवांमध्ये पथके शिस्तबद्ध आणि जल्लोषपूर्ण वादन करीत असतात. या शिस्तबद्ध वादनातून सर्व सण उत्सव पवित्रपणे आणि शिस्तीत साजरा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, त्यामुळे बहुतांशी युवक युवती यामध्ये सहभागी होतात. या अधिवेशनावाच्या निमित्ताने या युवक युवतींना संस्कारक्षम काही देऊ शकतो का, याचे विचार मंथन देखील यावेळी होणार आहे. पथकांवरील होणारी टीका यावरही काय उपाययोजना करता येतील याबाबतही चर्चा होणार आहे. यापूर्वी दोन वेळा ढोल ताशा वादनास राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत, ही मागणी देखील केंद्र सरकार कडे पूर्ण ताकदीने मांडण्यात येणार आहे.

दिमडी, संबळ, नगारा, ताशा, जेंबे या  वाद्यांचा तालचक्र हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच ढोल ताशा पथकातील वादकांचे छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा देखील या वेळी आयोजित केले आहे. अशी विविध सत्रांची मांडणी या अधिवेशनात केली आहे. पथकांवरील टीकेवर चर्चा करण्यासाठी आप की अदालत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागपूर, नाशिक, मुंबई , ठाणे , पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसह अनेक ठिकाणच्या पथकातील दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बरोबरच गोवा, बंगळुरू , इंदूर येथील पथके देखील सहभागी होतील.

रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे जगातील पहिली दंतशस्त्रक्रिया भारती हॉस्पिटलमध्ये पार पडली.

दंतचिकित्सा क्षेत्रात भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाने केली आधुनिक क्रांती

पुणे, – दात हा आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे. तर दातातदुखले तर ते सरळ मेंदूशी निगडीत असते. त्यामुळे दाताची शस्त्रक्रिया फार सावध पद्धतीने करावी लागते. मात्र आता दंतशस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाने फ्रान्समधील लुपिन डेंटलच्या सहकार्याने रोबोटिक हातांचा वापर करून व्हीनियर्सवरील क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. हा एक अभूतपूर्व प्रकल्प दंतचिकित्सा क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा असून जगातील पहिली दंतशस्त्रक्रिया भारती हॉस्पिटलमध्ये पार पडली असल्याची माहिती भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी दिली.दातांच्या रुग्णांची काळजी आणि उपचारांचे परिणाम वाढविण्यात रोबोटिक तंत्रज्ञानाची क्षमता या तंत्रज्ञामुळे वाढली गेली आहे. यानिमित्ताने आज दंतशास्त्राने मोठी झेप घेतली आहे. लेसरपासून मायक्रोस्कोप, कॅड कॅम, स्कॅनर अशी अत्याधुनिक साधने, उपचार उपलब्ध आहेत. दात काढणे, बसवणे इतकेच नाही, तर वेडेवाकडे दात सरळ करणे, हिरड्यांचे विविध आजार बरे करणे, जीभ, पडजीभ, ओठ, गाल यांच्या आरोग्याबाबत भारती हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत यातच या तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्य रुग्णाला होणार असल्याचे भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. राजेश क्षीरसागर म्हणाले. डॉ. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले की, “हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. फ्रान्समधील लुपिन डेंटलसोबतच्या सहकार्याने केवळ दंत रोबोटिक्समधील आमची तज्ज्ञता वाढवली नाही तर आमच्या संस्थेला नाविन्यपूर्ण दंत शिक्षण आणि संशोधनात आघाडीवर स्थान दिले आहे.”संचालक, डॉ. संजय लोंढे म्हणाले की, “ही कामगिरी आमच्या प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. आम्ही दंत रोबोटिक्समध्ये पुढील संधी शोधण्यास आणि दंत काळजीच्या प्रगतीत योगदान देण्यास उत्सुक आहोत.”प्रमुख निरीक्षक, डॉ. विजयसिंह मोरे म्हणाले की, “रोबोटिक हातांचा वापर करून व्हेनियरवरील क्लिनिकल चाचणीला प्रचंड यश मिळाले आहे. या प्रयत्नात भागीदारी आणि पाठिंब्याबद्दल आम्ही फ्रान्समधील ल्युपिन डेंटलचे आभारी आहोत.”भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान कार्यालयाच्या संचालिका डॉ. अरुंधती पवार, सह-संशोधक डॉ. संतोष जाधव, डॉ. पंकज कदम, डॉ. योगेश खडतरे आणि डॉ. सारा मरियम (क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर), डॉ. विक्रांत साने आणि डॉ. आमोद पाटणकर (सुविधा व्यवस्थापन), लक्ष्मीकांत खानोलकर, सीईओ (इंडिकल), डॉ. मनीषा जाधव (इंडिकल) या सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला.लुपिन डेंटल, फ्रान्सचे डॉ. गॅलिप गुरेल म्हणाले की, “या नाविन्यपूर्ण प्रकल्पावर पुणे येथील भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) दंत महाविद्यालयासोबत सहयोग केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. क्लिनिकल चाचणीच्या यशस्वी पूर्ततेमुळे दंतचिकित्सा क्षेत्रातील रोबोटिक तंत्रज्ञानाची क्षमता दिसून येते आणि भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा झाला.”लुपिन डेंटल, फ्रान्सचे सह-संस्थापक डॉ. स्टीफन कौबी म्हणाले की, “हा प्रकल्प एक उल्लेखनीय प्रवास आहे आणि आम्ही भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय, पुणे येथील टीमच्या कौशल्याने आणि उत्साहाने प्रभावित 

झालो आहोत. दंत रोबोटिक्सच्या क्षेत्रात सतत सहकार्य आणि नवोपक्रमाची आम्हाला अपेक्षा आहे.”

————————————————————————————–

भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) दंत महाविद्यालय, पुणे बद्दल –

भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) दंत महाविद्यालय, पुणे ही दंत शिक्षण आणि संशोधनातील एक आघाडीची संस्था आहे. हे महाविद्यालय दंत व्यावसायिकांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि दंत काळजी आणि उपचारांसाठी त्याच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांसाठी ओळखले जाते.

लुपिन डेंटल, फ्रान्स बद्दल
लुपिन डेंटल, फ्रान्स ही दंत तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात विशेषज्ञता असलेली एक प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनी दंत काळजी आणि उपचारांसाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यासाठी समर्पित आहे आणि पुणे येथील भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) दंत महाविद्यालयासोबतचे त्यांचे सहकार्य दंतचिकित्सा क्षेत्राला पुढे नेण्याच्या त्यांच्या 

वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते.