Home Blog Page 547

पहिले रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलन जानेवारीत:पानिपतकार विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड

पुणे : मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचे औचित्य साधत मराठी भाषा वाढावी व मराठीच्या वाचन संस्कृतीचे जतन व्हावे तसेच ती प्रवाहीत रहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे जानेवारीत आयोजन करण्यात आले आहे. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे प्रांतपाल 3131 शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
शनिवार, दि. 4 आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 रोजी आयोजित संमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. नामवंत साहित्यिक, कवी, विचारवंत, अभ्यासक यांच्या उपस्थितीने हे संमेलन लक्षवेधी ठरणार आहे. संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि समारोप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील तसेच सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. जागतिकीकरणाच्या काळात भाषाविषयक आव्हाने, त्यावरील उपाययोजना, कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहित्य विश्वात होणारे फायदे-तोटे अशा विविध कळीच्या मुद्द्यांबद्दल ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक विचारवंतांची मते, ठोस भूमिका चर्चासत्रांच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमासह प्रसिद्ध संगीत नाटकाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारे कविसंमेलन विशेष आकर्षण ठरेल असा विश्वास आहे.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. रोटरी सदस्यांनी समाजकार्यासह आपल्यातील कला-गुणांना वाव देण्याचाही प्रयत्न केला आहे. आजच्या संगणक तंत्रस्नेही काळात मराठी वाचन संस्कृतीची अभिवृद्धी व्हावी या करिता रोटरी क्लबच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमींनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन साहित्याचा जागर करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. संमेलन सर्वांसाठी खुले असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे, असे संमेलनाचे संयोजक, रोटेरियन राजीव बर्वे यांनी कळविले आहे.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवन गौरव पुरस्काराने अंजली कुलकर्णी सन्मानित

मुक्तछंदात शब्दमाधुर्य, आशयाकडे कविंचे दुर्लक्ष : प्रा. मिलिंद जोशी
अंजली कुलकर्णी यांच्या कविता समाजभान जपणाऱ्या शुद्ध प्रतिच्या : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : आजची मराठी कविता इझमच्या जोखडातून मुक्त झाली असली तरी मुक्तछंदाचा वापर करताना भाषा, शब्दमाधुर्य, लय, आशय आणि भावोत्कटता याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केली. जागतिकीकरणाच्या रेट्यात अडकलेली समाजव्यवस्थेतील नाती, भावना, बदलती मूल्ये यांचे मार्मिक चित्रण टिपणारी कवयित्री म्हणून अंजली कुलकर्णी यांची ओळख असून त्यांनी निर्हेतूक मनाने लिहिलेल्या कविता संवेदनशील, समाजभान जपणाऱ्या, शुद्ध प्रतिच्या आहेत, असे त्यांनी गौरवोद्गार नमूद केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा काव्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अंजली कुलकर्णी यांची कविता अंत:स्वर जपणारी आहे, असे नमूद करून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, कवितेला स्वतःचे म्हणून रूप असते. परंतु परिच्छेदामागून परिच्छेद उतरवून काढले की, कविता तयार झाली असे आज अनेक कवींना वाटते. गद्य आणि पद्य यातील भेद कवींनी लक्षात घ्यायला हवा, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
आडकर दाम्पत्याचे काम सामाजिक गुणवत्तेचा शोध घेणारे आहे, अशा शब्दांत प्रा. मिलिंद जोशी यांनी रंगत-संगत प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक केले.
ॲड. प्रमोद आडकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात संस्थांच्या उपक्रमांची माहिती देऊन पुरस्कारामागील भूमिका विशद केली.
सत्काराला उत्तर देताना अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ज्ञानलालसा लाभलेल्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे मी अभ्यास, वाचन, शिक्षण या संस्कारातच वाढले. त्यातूनच कविता करण्याची आवड निर्माण झाली. शाळा व महाविद्यालयीन काळात पोषक वातावरण मिळाल्यामुळे चांगली कविता लिहिली जावी हा ध्यास लागला. याच काळात स्त्रीवादी चळवळीशी जोडले गेल्याने जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करत माझ्याकडून स्त्रीसंवादी काव्याची निर्मिती झाली. कवितेने मला समाजात ओळख निर्माण करून दिली तसेच स्वत्वाची आत्मशोधी प्रक्रियाही शिकविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी तर मानपत्राचे वाचन ऋचा कर्वे यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कविसंमेलनात विजय सातपुते, सुजित कदम, स्वप्नील पोरे, मिलिंद शेंडे, राजश्री सोले, राजश्री महाजनी, स्वाती दाढे, मीना सातपुते, स्वाती यादव, माया मुळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, आशा ठिपसे, डॉ. रेखा देशमुख, वैजयंती विझें-आपटे यांचा सहभाग होता. ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. केतकी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

धनुर्विद्या स्पर्धेत निरवा पटेल ने लक्ष्य गाठून पहिला क्रमांक पटकावला, अंडर-१४ मध्ये मलंक मिश्रा ला सुवर्णपदक

पुणे, १० डिसेंबरः जिल्हा परिषदेच्या वतिने दौंड येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा धनुर्विद्या स्पर्धा अतिशय रोमांचकारी झाली. या स्पर्धेत अंडर-१९ मुलींमधे ध्रुव ग्लोबल स्कूलची निरवा पटेल हिने निशाण्यावर अचूक बाण सोडत २५६ पॉइंट मिळवून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर त्रिशा सावंत हिला रौप्य पदक वर समाधान मानावे लागले.  
अंडर-१४ मुलांमध्ये मलंक मिश्रा याने २६५ पॉइंट मिळवून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर ध्रुव लांडगे यांला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
येथे झालेल्या स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने पालकच नव्हे तर हितचिंतकही खूश आहेत. या खेळाडूंना सुरूवातीपासूनच तिरंदाजीची आवड होती. खेळात त्यांनी आपले कौशल्य दाखवून शाळेला बहुमान मिळवून दिला.
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक केले. प्रशिक्षक मयंक गोडसे यांनी मार्गदर्शन केले.

निवडणूक आयोग गरजले ..288 मतदारसंघांमध्ये मतदारसंघांमध्ये व्हीव्हीपॅट स्लीप्सची मोजणी पूर्ण, कोणतीही तफावत नाही….

0

288 मतदारसंघांमध्ये सर्व नियमांचे काटेकोर पालनसंपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरणही

पुणे- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीत सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1440 व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी दि. 23.11.2024 रोजी पूर्ण, ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही.असा ठाम विश्वास आणि दावा निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आयोगाने ,म्हटले आहे कि ,

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पध्दतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा ह्या प्रक्रियेचा उद्देश आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1,440 व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 5 मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली. या प्रक्रियेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील 5 मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असे अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत.
ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली असल्याने, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरही या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्हीव्हीपॅट स्लीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता, आणि या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केले गेले आहे.
मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या 5 मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लीपची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही. राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे.

माता न तू वैरिणी ..नवजात बाळाला फेकलं रस्त्यावर..बिघडलेलं पुणं

पुणे :एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याची घटना घडली. वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमध्ये हा प्रकार घडला. रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी या बाळाचा जीव वाचवला आहे. जन्मदात्या आईने पोटच्या मुलाला चक्क रस्त्यावर सोडून दिल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड रोड पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला. या नवजात शिशुचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून चिमुकल्या बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. त्यानंतर, सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची तब्बेत स्थिर आहे. मात्र, बाळाला सोडून पसार होणाऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र संतापाची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी, अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड पोलीस घेत आहेत.

संस्कारानेच व्यक्तिमत्व विकास होतो- डॉ. चंद्रकात दळवी

‘एमआयटी’तर्फे सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे, १० डिसेंबर : ” वाचन, सामान्य ज्ञान, उत्तम संवाद कौशल्य, एैकण्यची कला आणि आपला दैनदिन व्यवहार हे जीवनात महत्वाचे असून त्यातूनच उत्तम संस्कारयुक्त व्यक्तिमत्वची ओळख होत असते.,” असे विचार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास प्रमाणपत्र परीक्षा-२०२४’मधील सुवर्णपदक विजेत्या, सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेेशर सभागृहात आयोजित सोहळ्यात त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बालभारती चे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील हे विशेष सन्माननीय पाहुणे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमुख समन्वयक डॉ. एस. एन. पठाण हे होते.
डॉ. चंद्रकांत दळवी म्हणाले,” लहान वयातच मूल्ये रुजवणे महत्वाचे आहे. मूल्ये माणासाला कधीच गोंधळात पडू देत नाहीत. संस्कार माणसाला आंतरिक दृष्ट्या मजबूत बनवतो. चांगले संस्कार ही चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. स्वामी विवेकांनंदांची प्रेरणा घेऊन एमआयटी शिक्षण संस्थचे डॉ. विश्वनाथ दा. कराड हे वैश्विक मूल्याधारित शिक्षण देण्याचे अद्वितीय कार्य करीत आहेत. स्वतःचे व्यक्तिमत्व सुधरायचे असेल तर सर्वात प्रथम शारीरिक आरोग्य सुधारणे आद्य कर्तव्य आहे.”
कृष्णकुमार पाटील म्हणाले, ” मूल्य हे पुस्तकातून वाचून येत नाही तर त्याला जीवनात उतरवावे लागते. बालभारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सतत मूल्य शिक्षण देण्यास आम्ही कटीबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात खेळ आणि कोणताही छंद जोपासावा. तसेच एक जवाबदार नागरिक म्हणून कार्य करावे. देशातील सर्व संस्कृतीचा आदर सन्मान करून भविष्यात मानव विधायक कार्य करावे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” चारित्र्यसंवर्धन आणि जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी या वैश्विक मूल्यांचा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र, आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि नैतिकदृष्ट्या चारित्र्यसंपन्न आणि शिस्तप्रिय असावे. असे युवक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून जगभर ओळखले जातील. नैतिक मूल्यांची शिकवण देऊन भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान भावी पिढीला समजावून सांगावे लागणार आहे.”
डॉ. एस. एन. पठाण यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच प्रस्तावनेत सांगितले की नैतिक मूल्ये मुलांच्या मनात रूजविणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत बदल होतो. उत्तम चारित्र्य हीच जीवनाची खरी संपत्ती आहे.
यावेळी विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात प्रज्ञा कराड, स्वामिनी, श्रदधा हिने विचार मांडले.
सौ. देवयानी पालवे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
राज्यस्तरीय विजेतेपदाबरोबरच पश्चिम विभाग, मराठवाडा विभाग व विदर्भ विभाग अशा तीन विभागांतून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे :
राज्यस्तरीय : संस्कृती राधाकृष्ण कराड (प्रथम), महेक सत्तार शेख (विभागून द्वितीय), प्रज्ञा गोपाळ कराड(विभागून तृतीय).
पश्चिम विभाग :  प्रज्ञा गोपाळ कराड (प्रथम), कृतिका सचिन फत्तेपुरे (द्वितीय), आदर्श मनोहर सातपुते (तृतीय).
मराठवाडा विभाग :  संस्कृती राधाकृष्ण कराड(प्रथम), महेक सत्तार शेख (द्वितीय), उज्वल तात्यासाहेब पवार (तृतीय).
विदर्भ विभाग :  खुशी राजेश महींगे (प्रथम), जान्हवी नितीन बुरंगे (द्वितीय), पयोष्णी विजय पार्शिवकर (तृतीय).

‘सफर लंडनची’ पुस्तक प्रकाशन व ‘सफर ऑस्ट्रेलियाची’ इंग्रजी अनुवादित पुस्तक प्रकाशन सोहळा

पुणे : दुर्दैवाने ब्रिटीशांच्या साॅरी, थॅंक्यू अशा अनेक गोष्टी आपण स्विकारल्या. परंतु त्यांच्या उत्तम गोष्टी स्विकारल्या नाहीत. एखादी गोष्ट जतन कशी करायची, त्याची संपूर्ण माहिती  संकलित कशी करायची, ते कायम स्वरूपी टिकवण्यासाठीचे प्रयत्न, हे मात्र आपण स्विकारले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ कागदपत्र हे आजही ब्रिटिश लायब्ररीमध्ये जतन करून ठेवले आहे. आपल्याकडे लिहिलेला इतिहास हा तेथील कागदपत्रांच्या आधारे लिहिला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

सुहास जोशी लिखित ‘सफर लंडनची’ पुस्तकाचा आणि ‘सफर ऑस्ट्रेलियाची’ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जंगली महाराज रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया देशाच्या पर्यटन विभागाच्या ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया’ चे भारत व गल्फ या देशांचे व्यवस्थापक निशांत काशीकर, सीमास ट्रॅव्हल्सचे डॉ. विश्वास केळकर, भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे विवेक गोळे, प्रमोद धर्माधिकारी उपस्थित होते.

सुहास जोशी म्हणाले, मी केलेल्या प्रवास वर्णनांची पुस्तके लिहिण्याची प्रेरणा मला माझे मित्र आणि स्नेहीजनांकडून  मिळाली. ती प्रत्यक्ष उतरण्यासाठी अनेकांची साथ लाभली असेही. 

निशांत काशीकर म्हणाले, ऑस्ट्रेलियामध्ये पाच ते दहा वर्षांपूर्वी जगातील सर्वोत्तम देशात भारत दहाव्या स्थानावर होता परंतु आज तो पाचव्या स्थानावर आहे. तर पूर्वी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी डायरेक्ट विमानसेवा नसल्याने ऑस्ट्रेलियाला जाण्याची संख्या कमी होती. आज मुंबईमधून ऑस्ट्रेलियाला जाण्याची सेवा असल्यामुळे तिथे जाण्याची भारतीयांची संख्या तिपटीने वाढली आहे, असे सांगत भारताचे ऑस्ट्रेलियातील आजचे स्थान याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.

अराऊंड अनफरगेटेबल ऑस्ट्रेलिया या पुस्तकाचे अनुवादक प्रमोद धर्माधिकारी, डॉ. विश्वास केळकर, विवेक गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुग्धा देशपांडे  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उदय धर्माधिकारी यांनी आभार मानले.

आमदार टिळेकर यांच्या मामाचा अपहरणानंतर सापडला मृतदेह

पुणे-आज सकाळी अपहरण करण्यात आलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला असून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

सतीश वाघ(वय ५८) यांचे सोमवारी(ता.9) अपहरण करण्यात आले होते. सतीश वाघ हे चौकात उभे असताना चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसून अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पण अपहरण करण्यात आलेल्या वाघ यांचा खून करण्यात आल्याची समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात खुनाच्या 6 घटना पुण्यामध्ये घडल्या आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले असताना चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यांनी जबरदस्तीने सतीश वाघ यांना गाडीत बसवून पोबारा केला. ही गाडी सोलापूरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.दरम्यान, याबाबत सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत असून गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले की, सतीश वाघ हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचा शेती व्यवसाय आहे. त्यांचे अपहरण झाल्याच्या घटनेनंतर कोणत्याही प्रकारे अपहरणकर्त्यांनी संपर्क साधलेले नाही़. त्यांचे कोणाची वाद भांडणे आहेत का या बाजूनेही तपास करण्यात येत आहे. तसे कोणतेही वाद अथवा आर्थिक संबंधाचे काही अद्याप आढळून आले नाही.दरम्यान, सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना कळविण्यात आली होती. यवत येथे सायंकाळी एक मृतदेह आढळून आला. याची माहिती ग्रामीण पोलिसांनी शहर पोलिसांना कळविली. हडपसर पोलीस पथकाने तेथे जाऊन मृतदेहाची पाहणी केल्यावर तो सतीश वाघ यांचा असल्याची खात्री पटवली. वाघ यांचा खुन कोणत्या कारणावरुन केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही

कोण आहेत सतीश वाघ ?

सतीश वाघ हे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत.. याशिवाय सतीश वाघ शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांचा व्यवसाय देखील आहे.. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत.. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेतायत.. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झालं होतं.पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचा अपहरण झाले.. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला.. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हाही दाखल झालाय.. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे.. अपहरण झालेली व्यक्ती विद्यमान आमदाराचे मामा असल्याने पोलिसांनी खास पथक तयार केली आहे..

संजय मल्होत्रा RBI चे नवे गव्हर्नर:11 डिसेंबर रोजी स्वीकारतील पदभार

मल्होत्रा ​​यांची गणना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.अर्थविषयक बाबींमध्ये मल्होत्रा ​​यांची गणना सुधारक आणि मजबूत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांना राजस्थानातील जवळपास सर्वच विभागात काम करण्याचा अनुभव आहे. केंद्रातील अर्थ मंत्रालयात काम केले आहे. ते मूळचे राजस्थानचेच आहेत. मल्होत्रा ​​यांची गणना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.


नवी दिल्ली-सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. ते RBI चे 26 वे गव्हर्नर असतील आणि सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील.दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. मल्होत्रा ​​11 डिसेंबरपासून गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मंत्रिमंडळाने आज 9 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा ​​यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

12 डिसेंबर 2018 रोजी शक्तिकांत दास यांना गव्हर्नर बनवण्यात आले. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला. त्यांनी उर्जित पटेल यांची जागा घेतली होती.मध्यवर्ती बँक कठीण परिस्थितीत असताना नवीन गव्हर्नर पदभार स्वीकारत आहेत. जुलै-सप्टेंबर या कालावधीत विकास दर 5.4% च्या सात-तिमाहीतील नीचांकी पातळीवर गेल्याने RBI वर व्याजदरात कपात करण्याचा दबाव वाढत आहे. दास यांच्या नेतृत्वाखाली, RBI ने महागाईच्या जोखमीचा हवाला देत जवळजवळ दोन वर्षे व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत.

संजय मल्होत्रा ​​हे फायनान्स आणि टॅक्सेशन मधील तज्ञ आहेत.संजय मल्होत्रा, 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) राजस्थान केडरचे अधिकारी आहेत, त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी आणि यूएसएच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान आणि खाणी यासह विविध क्षेत्रात काम केले आहे. त्यांना 33 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.वित्त मंत्रालयात सचिव (महसूल) म्हणून काम करण्यापूर्वी, त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिव पदावर काम केले. मल्होत्रा ​​यांच्याकडे राज्य आणि केंद्र सरकार या दोन्ही स्तरांवर वित्त आणि करप्रणालीत कौशल्य आहे.

लोकअदालतीमध्ये ‘पीडी’ थकबाकीदारांचे ४० हजार तर वीजचोरीचे १२२ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल

पुणे, दि. ०९ डिसेंबर २०२४: जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १४) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणकडून पुणे परिमंडलअंतर्गत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदारांची ४० हजारांवर तर कलम १३५ व १३८ अन्वये आलेली वीजचोरीची १२२ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आलेली आहेत.

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांसाठी ‘महावितरण अभय योजना’ सुरु आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लघु व उच्चदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून) ही योजना आहे. पुणे परिमंडलातील सुमारे ४० हजारांवर वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली आहेत. या योजनेनुसार एकूण थकीत रकमेतील व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १०० टक्के रक्कम माफ होणार आहे व केवळ मूळ थकबाकीचाच भरणा करावा लागणार आहे.

अभय योजनेनुसार मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सवलत मिळणार आहे. सोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. यासह मागणीनुसार नवीन वीजजोडणीचा पर्याय उपलब्ध आहे.

तसेच महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत भारतीय वीज कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अन्वये दाखल करण्यात आलेले १२२ प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. यात संबंधित ग्राहकाने तडजोड केल्यास वीजचोरीच्या बिलांमध्ये १० ते १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वीजचोरीच्या प्रकरणात मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले नाही अशाही प्रकरणात संबंधित ग्राहक वीजचोरी (दाखलपूर्व) प्रकरणात लोकअदालतीमध्ये तडजोड करू शकतात.

शनिवारी (दि. १४) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार आणि वीजचोरीच्या प्रकरणातील वीजग्राहकांनी सहभाग नोंदवावा. वीजबिलांची थकबाकी असलेल्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन मालक किंवा ताबेदार यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेली जागा थकबाकीमुक्त करण्यासाठी लाभ घ्यावा. तसेच वीजचोरी प्रकरणात तडजोड करून फौजदारी प्रकरणे निकाली काढण्याची या लोकअदालतीद्वारे संधी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले

पुणे, दि. 9 : मातृभूमीची सेवा बजावतांना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन -२०२४ निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतेश हंगे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करतात. पुणे जिल्हा प्रशासनाने ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य समजून आपले योगदान देवून त्यांच्या व कुटुंबियांना पाठीशी खंबीरपणे उभे राहुया. पुणे जिल्हाकरीता ध्वजदिन निधी संकलनाबाबत देण्यात आलेले उद्दिष्टपुर्तीकरीता जिल्हा प्रशासनाचे पुढाकार घ्यावा, येत्या 31 मार्च अखेर 5 कोटीहून अधिक रक्कमेचे ध्वजदिन निधी संकलन होईल, याकामी पुणे जिल्हा राज्यात क्रमांक एकवर राहील, यादृष्टीने काम करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, माझा देश व नागरिक सुरक्षित राहावे, याभावनेने देशाचे सैनिक देशाच्या सुरक्षितेकरीता आपल्या कुटुंबाला सोडून सीमेवर देशाचे रक्षण करीत असतात. राष्ट्राप्रती असलेले त्यांचे अत्युच्च बलिदान व असिम त्याग यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे कार्य नाही. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात माजी सैनिक व त्यांचे पाल्यांकरीता जिल्ह्यात कार्यालये, माजी सैनिक वसतीगृहे आहेत. माजी सैनिकांच्या पाल्यांना राज्य सरकाच्यावतीने शिष्यवृती देण्यात येते. माजी सैनिकांना सेवानिवृत्तीवेतन अदा करण्यात येते, वीर पत्नींना जमिनी दिल्या जातात, अशा विविध सोई-सुविधा त्यांना उपलब्ध करुन त्यांचे पुढील जीवन सुखकर होईल, याकरीता जिल्हा प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही, डॉ. दिवसे यांनी दिली.

सैनिकांचा आदर करने आपले कर्तव्य समजले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या सेवेतून आपण आदर्श घेतला पाहिजे, त्यामुळे सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले कर्तव्य समजून ध्वजनिधीत उत्सर्फूतपणे योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले.

प्रास्ताविकात ले. कर्नल हंगे म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी २०२३ करीता २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपये इतके उद्दिष्ट देण्यात होते. त्यापैकी २ कोटी १६ लाख ८५ हजार इतके ध्वजदिन निधीचे संकलन करण्यात आले असून एकूण ८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा, पाल्य, यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. ध्वजदिन निधी माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठीच खर्च होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनीदेखील निधी संकलन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात ध्वजदिन निधी संकलन करणाऱ्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या गुणवंत पाल्याचा विशेष करुन त्यांना धनादेश वितरण करण्यात आले.

कोथरूडमध्ये धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांनी दोन मिशनऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले…

पुणे- बंधमुक्त सेवा कार्य प्रभू भोजन कार्यक्रमामध्ये विविध आजार हे आशीर्वाद तेल (ब्लेसिंग ऑईल), प्रभूची गाणी व डान्स करुन बरे होतात, असे सांगून अनिष्ट व अघोरी प्रथांची जाहिरात प्रचार केल्याबद्दल पोलिसांनी पास्टर व सिस्टर यांच्यावर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पास्टर गोपाळ रणदिवे आणि सिस्टर आशा रणदिवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैभव विठ्ठल भिकोले (वय २६, रा. कंधारे अपार्टमेंट, गुजरात कॉलनी, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना काही दिवसांपासून आर्थिक तसेच मानसिक त्रास होता. पास्टर गोपाळ रणदिवे व सिस्टर आशा रणदिवे यांच्या बंधमुक्त सेवा कार्य नावाने लोकांच्या अडचणीच्या अनुषाने माहिती घेतात व त्या संदर्भात प्रभू येशू सदर अडचणी दूर करती, असे लोकांना भाषणातून सांगत असतात. त्या कार्यक्रमाला गेले होते.

त्यांचा दुसरा कार्यक्रम कर्वेनगर येथील गोसावी वस्तीत रविवारी सायंकाळी होता. या कार्यक्रमात सिस्टर आशा रणदिवे यांनी उपस्थितीपैकी काही लोकांना आलेले अनुभव सांगितले. आशीर्वाद तेले (ब्लेसिंग ऑईल) लावल्याने मुलांचे आजार बरे झाल्याचे अनुभव सांगितले. एका लहान मुलाला नायट्यासारखा आजार झाला होता. तो संपूर्ण शरीरावर पसरला होता़ तो केवळ प्रभूच्या ब्लेसिंग ऑईलमुळे बरे झाले,असे सांगितले गेले. त्यानंतर ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही त्यांचा बाप्तिस्मा करुन घेऊ, असे सांगितले होते. पास्टर गोपाळ रणदिवे व आशा रणदिवे यांनी बाप्तिस्मा म्हणजे पवित्र पाण्यात बुडवून काढून तो आता प्रभू येशुचा झाल्याचे जाहीर करायचा कार्यक्रम असतो, असे सांगितले. विविध आजार हे ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी व डान्स करुन बरे होतात, असे सांगून अनिष्ठ व अघोरी प्रथाची जाहिरात, प्रचार केला. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धीपुरस्पर उद्देशाने शब्द उच्चारले म्हणून पास्टर गोपाळ रणदिवे व सिस्टर आशा रणदिवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जैन साधकाच्या वेषात जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करणारा जेरबंद

स्वारगेट पोलीसांची कारवाई

पुणे-साधकाच्या वेशात जैन मंदिरात जाऊन तेथील दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे.नरेश जैन असे याप्रकरणी अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असे ४२००००/-रू.कि.चे दागिणे जप्त करण्यात आले आहेत.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि. १५/११/२०२४ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत भा.न्या. सं २०२३ चे कलम ३०५ अ) अन्वये गु.र.नं ४८८/२०२४ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता. घरातील जैन मंदिरात चोरी झालेबाबत जय परेश पारेख रा- फ्लॅट नं ९०१ सिटीवुड सोसा. पुनावाला गार्डनसमोर यांनी त्यांच्या घरातील जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असे चोरून नेलेबाबत फिर्याद दिली होती. तसेच त्याच दिवशी स्वारगेट पो.स्टे. हद्दीमध्ये व शहरातील ३ ते ४ जैन मंदिरांमधील देवाचे दागिणे चोरीचा प्रयत्न झाला होता. सदर दिवशी कार्तिक पोर्णिमेनिमित्ताने जैन बांधव जैन मंदीरांमध्ये समारंभपूर्वक पूजाअर्चा करून समारंभ साजरा करीत असतात त्याच दिवशी या यो-या झाल्याने, लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरिक्षक युवराज नांद्रे यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली विशेष तपासपथकाची निर्मिती करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार तांत्रिक विश्लेषन करून, सीसीटीव्ही फुटेज पाहून, तसेच पुणे ते मुंबई पर्यंत खबऱ्यांकडुन पोलीसांनी माहीती काढत असताना, स्वारगेट पोलीस स्टेशन कडील पो. हवा. सागर केकाण यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहीती मिळाली की, अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई, डोंबिवली व इतर परिसरात घडले असुन त्यातील आरोपी सध्या मुंबईतील गिरगाव भागात राहण्यास आहे. खबऱ्यांकडुन प्राप्त खात्रीशीर बातमी वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीसांनी ताबोडतोब गिरगाव मुंबई या ठिकाणी जाऊन संशयीत आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव नरेश आगरचंद जैन रा बोग्बे चाळ रुम १९ दुसरा मजला सुतार गल्ली सी.पी. टैंक गिरगाव व्ही.पी. रोड मुंबई-४ असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन नमुद गुन्ड्याबाबत कौशल्यपूर्व विचारपुस करता त्याने नमुद गुन्हा पैशांच्या अडचणी मुळे केल्याचे कबुल केले. त्यास नगुद गुन्ह्यात दि. ०४/१२/२०२४ रोजी अटक करण्यात येवून त्याचेकडून गुन्हयातील चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असे ४२००००/-रू.कि.चे दागिणे जप्त करण्यात येवून स्वारगेट पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.


आरोपी हा सराइत असून महाराष्ट्रातील ब-याच पो.स्टे.च्या रेकॉर्डवर आहे नमुद आरोपीबाबत अधिक चौकशी करता त्याने यापुर्वीही घाटकोपर वाई, चिखली, डोंबिवली इत्यादी भागात सुमारे ८ ते १० ठिकाणी अशाच पध्दतीने मंदीरांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा मंदिरात जाताना जैन साधकांच्या वैशात जाऊन देवाचेच दागिने चोरी करत असल्याचे तपासात पुढे आले असुन यापुर्वी अशा काही चोऱ्या घडल्या असल्यास स्वारगेट पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उप-निरिक्षक तानवडे स्वारगेट पो.स्टे. करित आहेत.
सदरची उत्तम कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा ,अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपआयुक्त परि- ०२ स्मार्तना पाटील , सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोलीस निरिक्षक युवराज नांद्रे ,पोलीस उप-निरिक्षक तानवडे, पो. अं दिनेश भांदुर्गे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सतीश कुंभार व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केलेली आहे.

सनी देओलने ‘जाट’ सिनेमातून केले दमदार पुनरागमन!

टीझर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता

अभिनेता सनी देओलच्या आगामी ऍक्शन सिनेमा “जाट”चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याने चाहत्यांना अक्षरशः थक्क करून टाकले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ऍक्शन सुपरस्टार परत आला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर “पुष्पा 2” च्या विशेष प्रीमियर दरम्यान “जाट” चा टीझर प्रदर्शित झाला. 12,500 स्क्रीनवर हा टीझर दाखवण्यात आला आणि ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी बाब आहे.

जेव्हा या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा या प्रेक्षकांची एनर्जी अफलातून होती. सनी देओलच्या दमदार अभिनयाने आणि थरारक ऍक्शन सीन्सला प्रेक्षकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद दाखवला. टीझरने चाहत्यांना खुर्चीला खिळवून ठेवले, यावरुन हे पुन्हा सिद्ध झाले की सनी देओल भारतीय सिनेसृष्टीतील खरा ऍक्शन हिरो आहे.

दूरदृष्टी असलेल्या गोपीचंद मालिनेनी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आणि मायथ्री मूवी मेकर्स व पीपल मीडिया फॅक्टरी या दोन दमदार निर्मात्यांनी निर्मिती केलेला ‘जाट’ हा सिनेमा ऍक्शन जॉनरला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार हे नक्की. रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कैसंड्रा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांच्या जबरदस्त अभिनयासोबतच हा सिनेमा प्रेक्षकांना एका दमदार आणि रोमांचक कथानकाचा अनुभव देणार आहे.

‘जाट’ या सिनेमाची संगीताची जबाबदारी थमन एस यांनी घेतली आहे, तर सिनेमॅटोग्राफी ऋषी पंजाबी यांनी सांभाळली आहे. नवीन नूली यांनी एडिटींगचे काम अतिशय चोख केले असून, अविनाश कोला यांनी प्रोडक्शन डिझाइनची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. ऍक्शन सीनसाठी अनल अरासु, राम-लक्ष्मण आणि वेंकट यांच्या टीमने उत्कृष्ट स्टंट आणि रोमांचक ऍक्शन सिक्वेन्स तयार केले आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील.

टीझर म्हणजे ‘जाट’ या सिनेमातील भव्य दृश्यांची केवळ एक झलक आहे. सिनेमाच्या रिलीजसाठी काउंटडाउन सुरू झाल्यामुळे, चाहते आता एप्रिल 2025 मध्ये सिनेमागृहात हा रोमांचक प्रवास अनुभवण्याची प्रतिक्षा नक्कीच करत असतील, असा विश्वास वाटतो.

तेजज्ञान फाउंडेशनची चळवळ ही समाजहिताची – अभिनेता सोनू सूद

ध्यानामुळे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या व्यक्ती सशक्त होते – अभिनेता सोनू सूद

तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य जयंती महोत्सव उत्साहात साजरा

पुणे – गेल्या २५ वर्षांपासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार  (हॅपी थॉट्स) रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सव सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद यांच्या हस्ते पार पडले. मनन आश्रम येथील परिसरात सोनू सूद यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. त्याच बरोबर सुद यांनी सर्व साधकांबरोबर ध्यानह हि केले. त्याच बरोबर आश्रमाच्या विविध ठिकाणी सुद यांनी भेटी दिल्या.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी तेजज्ञान फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या, प्रेरक वक्ता आणि लेखक भूपेंद्रसिंग राठोड असे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना तेजगुरू सरश्री यांनी केली असून त्यांनी आपले जीवन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य आश्रमात आणि ऑनलाईन सहभागी झाले होते.

सोनू सूद म्हणाले की ध्यानामुळे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या व्यक्ती सशक्त होते आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाला तयार केल्यास आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. त्यासाठी ध्यान निश्चितच महत्वाचे आहे. तेजज्ञान फाउंडेशनची चळवळ ही समाजहिताची आहे. यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. स्वतःची मूठ आपण उघडून बघीतली पाहिजे काय माहीत आपल्या हातावरील रेषेमध्ये कोणाचा तरी जीव वाचवण्याची रेष लिहिली असेल. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते त्यावेळी ठरवावे लागते पुस्तकाचे पान पलटी करायचे की पुस्तक बंद करायचे. पण आपण सर्वांनी जीवनाच्या पुस्तकाचे पान पलटी केल्यास इतिहास घडतो.

तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, म्हणाल्या की बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांनी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांचा परिचय आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव केला. ध्यानाचे महत्व पटवून देताना त्या म्हणाल्या ध्यान हे सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. म्हणून प्रत्येकाने रोज ध्यान करणे गरजेचे आहे.

राठोड म्हणाले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी सकारात्मक विचार ( हॅपी थॉट्स ) करणे फार महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर ध्यान करण्याने प्रत्येकाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडतात. माझे आयुष्य फक्त आणि फक्त सकारात्मक विचार आणि ध्यानामुळे घडले. प्रत्येकाच्या जीवनात गुरू असणे गरजेचे आहे. गुरुमुळे जीवनाला अर्थ आहे. गुरूविना जीवन व्यर्थ आहे.

जीवनात स्वतःच्या अस्तित्वाला मान्य करा – सरश्री

सदरील कार्यक्रमात सरश्री यांनी ध्यानावर मार्गदर्शन केले. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला.