पुणे- बंधमुक्त सेवा कार्य प्रभू भोजन कार्यक्रमामध्ये विविध आजार हे आशीर्वाद तेल (ब्लेसिंग ऑईल), प्रभूची गाणी व डान्स करुन बरे होतात, असे सांगून अनिष्ट व अघोरी प्रथांची जाहिरात प्रचार केल्याबद्दल पोलिसांनी पास्टर व सिस्टर यांच्यावर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पास्टर गोपाळ रणदिवे आणि सिस्टर आशा रणदिवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैभव विठ्ठल भिकोले (वय २६, रा. कंधारे अपार्टमेंट, गुजरात कॉलनी, कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना काही दिवसांपासून आर्थिक तसेच मानसिक त्रास होता. पास्टर गोपाळ रणदिवे व सिस्टर आशा रणदिवे यांच्या बंधमुक्त सेवा कार्य नावाने लोकांच्या अडचणीच्या अनुषाने माहिती घेतात व त्या संदर्भात प्रभू येशू सदर अडचणी दूर करती, असे लोकांना भाषणातून सांगत असतात. त्या कार्यक्रमाला गेले होते.
त्यांचा दुसरा कार्यक्रम कर्वेनगर येथील गोसावी वस्तीत रविवारी सायंकाळी होता. या कार्यक्रमात सिस्टर आशा रणदिवे यांनी उपस्थितीपैकी काही लोकांना आलेले अनुभव सांगितले. आशीर्वाद तेले (ब्लेसिंग ऑईल) लावल्याने मुलांचे आजार बरे झाल्याचे अनुभव सांगितले. एका लहान मुलाला नायट्यासारखा आजार झाला होता. तो संपूर्ण शरीरावर पसरला होता़ तो केवळ प्रभूच्या ब्लेसिंग ऑईलमुळे बरे झाले,असे सांगितले गेले. त्यानंतर ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही त्यांचा बाप्तिस्मा करुन घेऊ, असे सांगितले होते. पास्टर गोपाळ रणदिवे व आशा रणदिवे यांनी बाप्तिस्मा म्हणजे पवित्र पाण्यात बुडवून काढून तो आता प्रभू येशुचा झाल्याचे जाहीर करायचा कार्यक्रम असतो, असे सांगितले. विविध आजार हे ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी व डान्स करुन बरे होतात, असे सांगून अनिष्ठ व अघोरी प्रथाची जाहिरात, प्रचार केला. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धीपुरस्पर उद्देशाने शब्द उच्चारले म्हणून पास्टर गोपाळ रणदिवे व सिस्टर आशा रणदिवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.