पुणे : दुर्दैवाने ब्रिटीशांच्या साॅरी, थॅंक्यू अशा अनेक गोष्टी आपण स्विकारल्या. परंतु त्यांच्या उत्तम गोष्टी स्विकारल्या नाहीत. एखादी गोष्ट जतन कशी करायची, त्याची संपूर्ण माहिती संकलित कशी करायची, ते कायम स्वरूपी टिकवण्यासाठीचे प्रयत्न, हे मात्र आपण स्विकारले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ कागदपत्र हे आजही ब्रिटिश लायब्ररीमध्ये जतन करून ठेवले आहे. आपल्याकडे लिहिलेला इतिहास हा तेथील कागदपत्रांच्या आधारे लिहिला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
सुहास जोशी लिखित ‘सफर लंडनची’ पुस्तकाचा आणि ‘सफर ऑस्ट्रेलियाची’ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जंगली महाराज रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया देशाच्या पर्यटन विभागाच्या ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया’ चे भारत व गल्फ या देशांचे व्यवस्थापक निशांत काशीकर, सीमास ट्रॅव्हल्सचे डॉ. विश्वास केळकर, भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे विवेक गोळे, प्रमोद धर्माधिकारी उपस्थित होते.
सुहास जोशी म्हणाले, मी केलेल्या प्रवास वर्णनांची पुस्तके लिहिण्याची प्रेरणा मला माझे मित्र आणि स्नेहीजनांकडून मिळाली. ती प्रत्यक्ष उतरण्यासाठी अनेकांची साथ लाभली असेही.
निशांत काशीकर म्हणाले, ऑस्ट्रेलियामध्ये पाच ते दहा वर्षांपूर्वी जगातील सर्वोत्तम देशात भारत दहाव्या स्थानावर होता परंतु आज तो पाचव्या स्थानावर आहे. तर पूर्वी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी डायरेक्ट विमानसेवा नसल्याने ऑस्ट्रेलियाला जाण्याची संख्या कमी होती. आज मुंबईमधून ऑस्ट्रेलियाला जाण्याची सेवा असल्यामुळे तिथे जाण्याची भारतीयांची संख्या तिपटीने वाढली आहे, असे सांगत भारताचे ऑस्ट्रेलियातील आजचे स्थान याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.
अराऊंड अनफरगेटेबल ऑस्ट्रेलिया या पुस्तकाचे अनुवादक प्रमोद धर्माधिकारी, डॉ. विश्वास केळकर, विवेक गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुग्धा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उदय धर्माधिकारी यांनी आभार मानले.