नागपूर दि. १६ : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली असून अकरावी बारावीच्या त्यावेळी अज्ञान असलेल्या मुलींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार व ब्लॅकमेलिंग केल्याचे समजते. या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर शहर पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.
पोलिसांनी या एका तक्रारीच्या आधारे अजून तीन फिर्यादीं चा शोध घेऊन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. स्वयंप्रेरणेने केलेली ही कार्यवाही दखलपात्र व मानवी अधिकाराबाबत सजगता दाखवून देणारी आहे, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर पोलीस आयुक्तांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मागील नऊ-दहा वर्षापासून आरोपीकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याने याबाबत सबळ पुरावे संकलित करण्यात यावेत व सत्वर चार्जशीट दाखल करण्याची दक्षता घ्यावी.
साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याची कार्यवाही करावी. त्यांच्या नावांबाबत गोपनीयता राखण्यात यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्याचबरोबर आरोपीस कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने अनुभवी व निष्णात सरकारी वकील नियुक्त करण्यात यावेत. समुपदेशनातून देखील अत्याचार होत असल्याने आता महिला समुपदेशक नियुक्त करून त्यांच्यामार्फतच संबंधित महिलांना योग्य समुपदेशन मिळावे यासाठीची तरतूद करावी.
तसेच नियमितपणे समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींकडून निरपेक्ष व स्वतंत्र यंत्रणांकडून समुपदेशन प्रक्रियांचे मूल्यमापन करण्यात यावे. मुलींचे स्वमदत गट करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम विश्वासार्ह महिला संस्थांतर्फे करून घेण्यात यावे. त्याचबरोबर या प्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
पुणे: ‘संजय जगताप यांच्याकडून भाजप प्रवेशाची चाचपणी’ अशा स्वरूपाचे वृत्त गुरुवारी काही माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. हे वृत्त निराधार, बिनबुडाचे, खोडसाळपणाचे आणि जाणूनबुजून माझी बदनामी करणारे आहे. आपण काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असून, भाजपमध्ये जाण्याचा काहीच संबंध येत नाही, असा खुलासा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार संजय जगताप यांनी केला. अशा स्वरूपाचे बदनामीकारक वृत्त देणाऱ्या माध्यमांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. माजी आमदार संजय जगताप म्हणाले, “गुरुवारी काही माध्यमांकडून संजय जगताप भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याबाबत चाचपणी करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले गेले. अशा चुकीच्या बातमीमुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजमध्येही गैरसमज पसरला आहे. यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. ही बातमी प्रसिद्ध करताना माझा कोणताही खुलासा घेतला गेला नाही. यापूर्वी काही माध्यमांकडून जाणीवपूर्वक माझी बदनामी होईल, अशा स्वरूपाचे वृत्त प्रसिद्ध केले गेले आहे. त्यात्या वेळी संबंधित माध्यमांना ताकीद देऊनही असे प्रकार वारंवार घडताहेत, ही खेदाची बाब आहे.” “माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध करताना संबंधित व्यक्तीकडून त्याचा खुलासा घेणे अपेक्षित आहे. मात्र, सनसनाटी निर्माण करण्यासाठी असे खोटे व खोडसाळपणाचे वृत्त प्रसिद्ध केले जाते, ही बाब गंभीर आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. त्यामुळे अशा बातम्यांनी व्यथित झालो आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजातील संभ्रमाचे वातावरण सुरू व्हावे, यासाठी माझी बाजू स्पष्ट करीत आहे. माध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करायला हवे,” असे संजय जगताप यांनी नमूद केले.
मणिपूर साठी एकजुटीची भावना समग्र भारतात निर्माण करणे हे कर्तव्य – प. पू. स्वामी गोविंद देव गिरी
पुणे : ईशान्य भारताशी आपण मनाने जोडले गेलो आहोत. वेदांचा घोष आणि यज्ञाच्या ज्वाला जिथे थांबल्या तो भाग देशापासून तोडला गेला आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी वेदविद्यालय स्थापन करून वेद घोष झाला पाहिजे. त्यामुळेच मणिपूरला वेद विद्यालय स्थापन करण्यात आले आहे. ईशान्य भारताला आपल्यापासून दूर करून चालणार नाही. मणिपूर साठी एकजुटीची भावना समग्र भारतात निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे, आणि हे काम करण्यासाठी गणेशोत्सव मंडळासारखे कोणीही नाही, असे मत प. पू. स्वामी गोविंद देव गिरी यांनी व्यक्त केले.
मणिपूर मधील हिंसाचारामुळे सुमारे साठ हजार नागरिक तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये राहत आहेत. त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून पुण्यातील ५१ पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळे एकत्र येऊन, सामाजिक संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने ५ हजार ब्लँकेट्स आणि जेवणाच्या भांड्यांचे ५ हजार संच देण्यात आले. हे साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम पुणे परिवार संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पुणे परिवारचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी उपस्थित होते. खास मणिपूरहून हे साहित्य स्वीकारण्यासाठी मणिपूरचे पुनर्वसन मंडळाचे प्रमुख आमदार थौनाओजम श्यामकुमार, राजेश साहनी हे उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, या देशाची संपूर्ण भूमी आमची आहे. अयोध्या तो झांकी है काशी मथुरा बाकी है म्हणताना काशी मथुरा तर आपलीच आहे आता पीओके बाकी आहे. या भूमीवर आणि संस्कृतीवर होणारी आक्रमणे आपण कधीपर्यंत बघत राहणार यासाठी कोण उभे राहणार असा प्रश्न असताना पुणे आणि महाराष्ट्रातला कार्यकर्ता यासाठी उभा राहतो.
राजकीय भारत हा बाहेरचा तर सांस्कृतिक भारत हा आतला भारत आहे. शासन मणिपूर साठी काम करत आहेच पण त्यांनी केलेल्या कामाची चव वेगळी आणि समाजाने एकत्र येऊन केलेली कामाची चव ही वेगळीच असते. शासन त्यांच्या स्तरावर काम करेल पण समाजाला एकत्र आणण्याचे सामर्थ्य हे केवळ गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, अनेकवेळा समाज जेव्हा संकटात होता तेव्हा समाजाप्रती असलेल्या जाणिवेतून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला. ही मदत शहर किंवा राज्या पर्यंत मर्यादित होती, पण आज राज्याच्या बाहेर जाऊन आधाराची गरज असणाऱ्या मणिपूरच्या मदतीला धावून गेले. मानवतेचा संदेश पुण्यातून जातो आहे. मंडळे केवळ उत्सवापुरते मर्यादित नाही तर वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, भारत देशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपल्याला एकवाक्यता दिसते. याला कारण आद्य शंकराचार्यांचे भ्रमण या भागात झाले आहे. यामध्ये ईशान्य भाग वगळला गेला. पुण्यातील गणेशोत्सव मंडळे विविध क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनी मंडळाच्या हाकेला साद दिली आहे. मणिपूरच्या नागरिकांशी भावनिक नाते निर्माण करण्याची, नाते जोडण्याची गरज आहे ते काम मंडळे करत आहेत.
टी. एच श्याम कुमार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या जन्म भूमीत येण्याचे भाग्य लाभले. राज्य सरकार मणिपूर सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्राकडून ही मोदी सरकार खूप सहकार्य करीत आहेत परंतु सध्या ६० हजार नागरिक बांधव अडचणीत आहेत. पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळांनी मणिपूर बांधवांसाठी जी मदत केली आहे त्यातून वस्तू नाही तर मन जुळली जाणार आहेत.
विजय कुवळेकर म्हणाले, कोणत्याही मदतीपेक्षा अधिक. मणिपूरच्या या प्रसंगात भारतीयांनी सहभागी होणे भावना त्यांच्यासाठी महत्वाची आहे. आपली राज्य आपली माणसे यांच्यासाठी काम करणे ही राष्ट्रीय गरज आहेत. या कामासाठी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते धावून जातात ही महत्त्वाची गोष्ट आहे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, मणिपूरला मूलभूत गोष्टींची नितांत गरज आहे. राष्ट्रीय एकात्मता वाढावी या हेतू लक्षात ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. हा पहिला टप्पा असून ही मदत पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गरज असेपर्यंत करत राहू.
ॲड. प्रताप परदेशी म्हणाले, कोणतेही संकट आले तरी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता धावून जातो. कोविडच्या काळात दिवस रात्र काम गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले. पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक ऋण फेडायचे काम आम्ही गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून करत आहोत. मणिपूर मधील आपल्या बांधवांना मदत करीत गणेशोत्सव मंडळे सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत.
विनायक घाटे यांनी स्वागत केले. ॲड. प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश पवार यांनी आभार मानले.
अहिल्यानगर येथे होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीपुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने आयोजन
पुणे : अहिल्यानगर येथे होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची पुणे जिल्हा निवड चाचणी दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी कोंढवा बुद्रुक मधील कामठे मळा येथे होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके यांनी दिली.
या निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्यात असणाऱ्या ४५० हून अधिक कुस्तीगीरांमध्ये लढत रंगणार आहे. आमदार योगेश टिळेकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.
मेघराज कटके म्हणाले, बालगटात २५ किलो पासून ते ६० किलो पर्यंत चे १० वजनगट, वरिष्ट गटात गादी आणि माती विभागातील ५७ किलो पासून महाराष्ट्र केसरी किताबासह १०, असे एकूण ३० वजनगटात कुस्तीगीरांचा सहभाग असणार आहे.
पुणे जिल्ह्यात वरिष्ठ कुस्तीगीरांसोबतच बालगटातील कुस्तीला चालना मिळावी यासाठी जिल्हा स्तरापर्यंत बाल कुस्तीगीरांच्या कुस्त्या यावेळी कुस्ती शौकीनांना पाहायला मिळणार आहेत.
मुख्य आयोजक बाळासाहेब धांडेकर म्हणाले, माती आखाडा आणि गादी विभाग अशा पद्धतीने स्पर्धा होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना पदक, चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुणे : शरयू रांजणे हिने पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन सुपर-५०० बॅडमिंटन स्पर्धेत चार गटांत विजेतेपद पटकावले. तिने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी, मुलींच्या दुहेरीचे, मिश्र दुहेरी आणि १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत शरयूने सोयरा शेलारला २१-१६, २१-१३ असे नमविले. यानंतर शरयूने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत ओजस जोशीच्या साथीने अग्रमानांकित देवांस सकपाळ- सफा शेख जोडीला २१-१७, २१-१२ असे पराभूत करून जेतेपद पटकावले. शरयूने १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत सोयरा शेलारला २१-१४, २१-४ असे पराभूत करून तिहेरी यश मिळवले. यानंतर १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत शरयूने सोयरा शेलारच्या साथीने बाजी मारली. या जोडीने अंतिम फेरीत जुई जाधव-सफा शेख जोडीचे आव्हान २१-६, १६-२१, २१-१७ असे परतवून लावले.
चिन्मय, जतिनला दुहेरी मुकुट
चिन्मय फणसेने १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मयने एकेरीच्या अंतिम फेरीत माधव कामतला २१-१४ २१-१२ असे नमविले. यानंतर चिन्मय फणसेने सायजी शेलारच्या साथीने दुहेरीचे जेतेपद पटकावले. चिन्मय-सायजीने हृदान पाडवे- विहान कोल्हाडे जोडीवर २१-१७, २१-१४ अशी मात करून जेतेपद पटकावले. जतिन सराफने १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे आणि १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. दुहेरीच्या अंतिम फेरीत जतिन सराफने कायरा रैनाच्या साथीने सायजी शेलार-तेजस्वी भुतडा जोडीवर २२-२०, २१-१७ असे नमविले. यानंतर जतिनने १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत खुश दीक्षितला २१-९, २१-९ असे सहज पराभूत करून दुहेरी मुकुट मिळवला. कायरानेही दुहेरी यश मिळवले. तिने १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीच्या जेतेपदानंतर १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने गार्गी कामठेकरला २१-९, २१-१२ असे पराभूत केले.
भागवतचे दुहेरी यश
हर्षद भागवतने स्पर्धेत ४० वर्षांखालील पुरुष एकेरी आणि ३५ वर्षांखालील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. भागवतने ४० वर्षांखालील गटात आदित्य काळेला २१-१३, २१-१७ असे, तर ३५ वर्षांखालील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नवीनकुमारला २१-१८, २१-८ असे पराभूत केले.
अंतिम निकाल – ४० वर्षांखालील मिश्र दुहेरी – सचिन मानकर – आरती सिनोजिया वि. वि. तेजस किनंजवाडेकर – राधिका इंगळहळीकर २१-१९, १४-२१, २१-१४,
६० वर्षांखालील पुरुष एकेरी – अनिल भंडारी वि. वि. भरत भोसले २३-२१, १६-७ (जखमी होऊन निवृत्त).
३० वर्षांखालील मिश्र दुहेरी – गणेश सपकाळ – आरति सिनोजिया वि. वि. अदिती रोडे – नचिकेत धायगुडे २१-१६, २१-१२.
३५ वर्षांखालील मिश्र दुहेरी – स्वानंद भागवत – अमरजा पानसे वि. वि. अभिषेक भाकत – दिव्या तेनोझी २१-१५, २१-१९.
४० वर्षांखालील महिला एकेरी – अदिती रोडे वि. वि. विभा धिमान २१-१०, २१-१२.
३० वर्षांखालील पुरुष एकेरी – गणेश सपकाळ वि. वि. नचिकेत धायगुडे १९-२१, २१-१४, २१-११
नववर्ष, संक्रांतीनिमित्त विदुषी सानिया पाटणकर यांचे आयोजन सुप्रसिद्ध गायिका जयश्री रानडे यांचा संगीत मातोश्री पुरस्काराने सन्मान
पुणे : नववर्ष आणि संक्रांतीचे निमित्त साधून प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे ‘नवप्रेरणा’ या अनोख्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिव्यांग, अंध, स्वमग्न कलाकारांनी गायन-वादनातून रसिकांची मने जिंकली. मैफलीची सांगता विदुषी सानिया पाटणकर यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘नवप्रेरणा’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. शारंगधर नातू, ॲड. केशव मगर, उज्ज्वल केसकर, बालकल्याण संस्थेच्या संचालिका अपर्णा पानसे, डॉ. सुचित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मैफलीची सुरुवात गौरी गंगाजळीवाले यांनी सादर केलेल्या राग पुरियाधनश्रीने झाली. त्यांनी विलंबित एकताल आणि द्रुत तीनताल सादर केला. त्यानंतर तिलंग रागातील दीपचंदिमध्ये ठुमरी सादर केली. भूषण तोष्णीवाल यांनी कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध अनवट असा अमृतवर्षिणी राग आणि ‘मृगनयना रसिक मोहिनी’ हे नाट्यगीत प्रभावीपणे सादर केले. दत्तात्रय भावे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या बालकल्याण संस्थेतील दिव्यांगांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. मुलांनी शास्त्रीय संगीतातील अतिशय अवघड रचना एकत्रितरित्या सादर केल्या. ‘तेजो निधी लोहगोल’ या नाट्यगीतानंतर राग जोग आणि तराणा तयारीने सादर केला. कार्यक्रमाची सांगता करताना विदुषी सानिया पाटणकर यांनी जयपूर घराण्याचा जोड राग बसंतीकेदार सादर केला. विलंबित बंदिश ‘अतर सुगंध’, त्याला जोडून पंडिता मोगुबाई कुर्डीकर यांची ‘खेलन आई नवेली नार’ ही बंदिश सादर केली. पाटणकर यांनी मैफलीची सांगता राग बसंतमध्ये अतिद्रुत लयीतील सरगम गीताने केली. कलाकारांना विनायक गुरव (तबला), माधव लिमये (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली.
सुप्रसिद्ध गायिका जयश्री रानडे यांचा सन्मान
याच कार्यक्रमात महाबळेश्वरकर परिवारातर्फे सुप्रसिद्ध गायिका जयश्री रानडे यांना संगीत मातोश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नितीन महाबळेश्वरकर, अनुश्री कुलकर्णी, अनुराधा गोसावी यांच्या वतीने त्यांच्या आई सुजाता दिगंबर महाबळेश्वरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सुचित्रा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुणे:राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन यांनी बारामती येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या 23 व्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे’ चे उद्घाटन आज (१५ जानेवारी रोजी) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन समारंभावेळी, स्पर्धेत सहभागी खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कबड्डी रसिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचे अनुदान वाढवून ते एक कोटी करण्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेमुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेचे क्रीडा जगतातून स्वागत होत आहे. —००००–++
सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने विठ्ठल काटे यांचा सन्मान समाजाला हास्ययोगाद्वारे निरोगी ठेवणाऱ्या विठ्ठल काटे यांच्या कार्याचा गौरव
पुणे : आजच्या धकाधकीच्या काळात बहुतेकजण चिंताग्रस्त आविर्भावात वावरताना दिसतात. अशा वेळी लोकांना एकत्रित करून त्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची कला शिकवत, हास्य आणि व्यायामाद्वारे निरोगी ठेवण्यात विठ्ठल काटे यांचा मोलाचा वाटा आहे; असे प्रतिपादन ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांनी केले. आपण यंत्रयुगात असलो तरी यंत्राच्या नादी लागून त्याच्या अधीन होणे अयोग्य आहे. आज समाजाला हसविण्याची आज गरज आहे. याकरिता यंत्राचा वापर मर्यादित करा, एकत्र या, संवाद साधा, एकमेकांना समजावून घ्या आणि हास्ययोगाच्या माध्यमातून जगण्याचा आनंद लुटा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सृजन फाऊंडेशन आयोजित सृजन महोत्सवातील अखेरच्या दिवशी (दि. 15) सृजन फाऊंडेशन आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पवार बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अधीश प्रकाश पायगुडे, उपाध्यक्ष पोपटलाल शिंगवी, सुमन काटे मंचावर होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
समाजाला हसवीण्यासाठी विठ्ठल काटे करीत असलेल्या कार्याचा उल्हास पवार यांनी गौरव केला. जगात काहीही घडले तरी पुण्याचा माणूस चिंताग्रस्त असतो, जगाचा भार जणू आपल्यावर येऊन पडला आहे अशा आविर्भावात समाजात वावरत असतो, असा पुणेरी टोमणा पवार यांनी मारल्यानंतर सभागृहात हास्य फुलले.
अवजड खुर्ची आणि दिल्लीत पवार.. राजकारणात खुर्चीची नेहमीच ओढाओढ होत असते, पण मंचावर मान्यवरांसाठीच्या खुर्च्या अवजड असल्याने दुसऱ्याने ओढल्या शिवाय त्या हलत नाहीत अशी मिश्लिक टिप्पणी करून पवार म्हणाले, दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन समारोहाला स्वागताध्यक्ष या नात्याने शरद पवार उपस्थित असणार आहेत तर अखेरच्या दिवशी अजित पवार हजेरी लावणार आहेत हा योगायोग पाहून महाराष्ट्रातील जनतेच्या मुखावर नक्कीच हास्य उमटेल.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृष्णकुमार गोयल म्हणाले, गेली 27 वर्षे विठ्ठल काटे हास्ययोग परिवाराच्या माध्यमातून देश-परदेशातील नागरिकांना हसवत आहेत. ज्या वयात नवीन मैत्र करणे अवघड जाते त्या वयातील ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे नवचैतन्य हास्ययोगाद्वारे अनेकांचे स्नेह जुळले आहेत. काटे यांचे कार्य पाहून त्यांना पद्म पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
स्वच्छ पुणे आणि हसरे पुणे हेच ध्येय : विठ्ठल काटे
सत्काराला उत्तर देताना विठ्ठल काटे म्हणाले, हा सत्कार माझा वैयक्तिक नसून नवचैतन्य हास्य परिवाराच्या कामाला, हसणाऱ्यांना मिळालेला पुरस्कार आहे. स्वच्छ पुणे आणि हसरे पुणे हे आपले ध्येय असून हास्ययोगातून नागरिक आनंदी आणि सशक्त करण्याचा मानस आहे. हास्ययोग परिवार हा स्थलांतरित पालक, निवृत्त नागरिक यांचा आधार असून त्यांना मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीही देत आहे. प्रत्येक घर, उंबरा आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हसरी करायची इच्छा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अधीश पायगुडे यांनी प्रास्ताविकात सृजन फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचिती गुर्जर यांनी केले तर आभार पोपटलाल शिंगवी यांनी मानले. डॉ. अनघा जोशी यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे, – ओजस जोशीला पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुटाची संधी आहे. ओजसने स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले असून, त्याने आणखी दोन गटांत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पीवायसी येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत चौथ्या मानांकित ओजसने अग्रमानांकित सुदीप खोराटेला १९-२१, २१-१७, २५-२३ असा पराभवाचा धक्का दिला. ही लढत ५३ मिनिटे रंगली. प्रत्येक गुणासाठी दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस होती. पहिली गेम जिंकून सुदीपने सकारात्मक सुरुवात केली. मात्र, दुसरी गेम जिंकून ओजसने बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मोक्याच्या क्षणी खेळ उंचावून ओजसने बाजी मारली. यानंतर ओजसने स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्य फेरीत अर्हम रेदासानीला २२-२०, २१-१९ असे नमविले. ओजसने १७ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात शरयू रांजणेसह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ओजस-शरयूने सयाजी शेलार-सोयरा शेलार जोडीवर २१-१७, २१-१८ असा विजय मिळवला. आता ओजस-शरयूची अंतिम लढत देवांश सकपाळ – सफा शेख या अग्रमानांकित जोडीविरुद्ध होईल. देवांश-सफा या जोडीने ईशान लागू – आयुषी काळे जोडीचे आव्हान २१-२३, २१-१९, २१-१५ असे परतवून लावले.
शरयूने १७ वर्षांखालील मुलींच्या गटातूनही अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्य फेरीत ख्याती कत्रेवर २१-१७, २१-९ असा विजय मिळवला. तिची अंतिम लढत सोयरा शेलारविरुद्ध होईल. सोयराने मनीषा विष्णूकुमारवर २१-१८, २१-१२ असा विजय मिळवला. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत विहान मूर्तीने कपिल जगदाळेला २१-१७, २१-१८ असे पराभूत केले. विहानची विजेतेपदासाठी तिस-या मानांकित ओजस जोशी लढत होईल. ओजसने अर्हम रेदासानीला २२-२०, २१-१९ असे नमविले.
युतिकाला विजेतेपद
स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित युतिका चव्हाणने विजेतेपद मिळवले. तिने चौथ्या मानांकित सफा शेखला २१-१७, २१-१४ असे पराभूत केले. महिला एकेरीत संपदा सहस्त्रबुद्धे हिने अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने नुपूर सहस्त्रबुद्धेवर २२-२०, २१-१६ असा विजय मिळवला.
निकाल –४० वर्षांखालील पुरुष एकेरी – उपांत्य फेरीत – हर्षद भागवत वि. वि. सत्यजित तरदालकर २१-१२, २१-५. आदित्य काळे पुढे चाल वि. अपूर्व जावडेकर.
४५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – उपांत्य फेरी – अमित देवधर – तन्मय आगाशे वि. वि. अजित गोरे – राजीव लुंड २१-१५, २१-१७, अमित तारे – विवेक कांचन वि. वि. अभिजित राजवाडे – मंगेश दाते २१-११, १६-२१, २१-११.
३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – उपांत्य फेरी – नवीनकुमार वि. वि. चैतन्य डोने २१-१२, १५-७ (जखमी होऊन निवृत्त). हर्षद भागवत पुढे चाल वि. अपूर्व जावडेकर.
१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी – उपांत्य फेरी – देवांश सकपाळ – सफा शेख वि. वि. ईशान लागू – आयुषी काळे २१-२३, २१-१९, २१-१५, ओजस जोशी – शरयू रांजणे वि. वि. सयाजी शेलार – सोयरा शेलार २१-१७, २१-१८.
३० वर्षांवरील मिश्र दुहेरी – उपांत्य फेरीत – अदिती रोडे – नचिकेत धायगुडे वि. वि. आकाश भालेकर – अर्ची भालेकर २१-१२, २१-९.
३० वर्षांखालील पुरुष एकेरी – नचिकेत धायगुडे वि. वि. आलोक देशपांडे २१-१५, २१-१५. गणेश सकपाळ वि. वि. आकाश भालेकर २१-१४, २१-१०.
१७ वर्षांखालील मुले दुहेरी – उपांत्य फेरी – कृष्णनील गोरे – श्रेयस मासळेकर वि. वि. आरुष अरोरा – पार्थ सहस्त्रबुद्धे २१-१२, २१-११, अभिक शर्मा – स्वरित सातपुते वि. वि. अर्हम रेदासानी – कपिल जगदाळे २१-१४, २१-१९.
पुणे-हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ही पुणे जिल्ह्यातील सत्तर वर्षे जुनी प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले.
HA कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा नुकतीच प्राप्त झाल्यानंतर कंपनीत त्यांची भेट आयोजित करण्यात आलेली होती. यादरम्यान व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नीरजा सराफ व अन्य प्रमुखांची बैठक घेऊन कंपनीच्या व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घेण्यात आली व त्यानंतर कर्मचारी वर्गाच्या जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.
मा. केंद्रीय मंत्री श्री जगत् प्रसाद नड्डा जी (रसायन व खते मंत्रालय) यांची भेट घेऊन औषध निर्मिती संबंधीच्या विविध प्रश्नांबाबत तसेच कर्मचाऱ्यांची थकीत बाकी व प्रलंबित पगार वाढ याबाबत चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी मा. केंद्रीय मंत्री जे पी.नड्डा यांच्या समवेत कंपनीच्या MD नीरजा सराफ, कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित घेऊन बैठकीचे आयोजन करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमास भारतीय मजदूर संघाचे श्री. बाळासाहेबजी भुजबळ, सरचिटणीस श्री. विजय पाटील, बाळासाहेब जाधव, धनंजय देशमुख, अनिल ढुमणे, गोपीनाथ शेळके, राजेंद्र जाधव, पंडितराव पवार, उमेश कुलकर्णी, अनिल चांदणे, रवींद्र चव्हाण, सुजाता तांबे, कैलास शिंदे, शिवप्रसाद करमकर, विनायक बोरखडे, दीपक कदम, दिलीप खेडेकर, राजेंद्र सावंत, अनिल गाडे व अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी, पुणे- उद्योग जगतामध्ये यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी परिवर्तनशील असावे, श्रमाला अर्थपूर्ण संधीमध्ये परावर्तित करून, सर्वोत्तम गुणवत्तेची कास धरून यशस्वी होता येते. खुल्या आर्थिक धोरणात या गिग इकॉनॉमीच्या काळात व्यवसायातील पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून, विशेष कौशल्य प्राप्त असणाऱ्या अनेक व्यक्तींना एकत्रित करून, नाविन्यपूर्ण कल्पना राबवून आपल्या उत्पादनाचे, सेवेचे वेगळेपण खुल्या बाजारपेठेत सादर करून ग्राहकांना कमी खर्चात सेवा देता आली पाहिजे तोच व्यवसाय व उद्योजक यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये समारोपाच्या कार्यक्रमात डॉ. आनंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये नावीन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्टार्टअप कंपन्यांना गौरविण्यात आले. यामध्ये विभाग एक : – मिनिमम वायबल प्रॉडक्ट मध्ये प्रथम – एसएनपी इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड, द्वितीय – आबराकाडाबरा सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि तृतीय बायोपॅन सायंटिफिक प्रा. लि.; विभाग दोन अर्ली ट्रॅक्शनमध्ये प्रथम – टीजीपी बायोप्लास्टिक प्रा. लि., द्वितीय – हब बायोमास प्रा. लि. आणि तृतीय – बिजअमिका सॉफ्टवेअर प्रा. लि.; विभाग तीन रेव्हेन्यू स्टेज मध्ये प्रथम – कायरस एनर्जीस प्रा. लि., द्वितीय – इव्हेंटबीप आणि तृतीय – सेरेब्रोसपार्क इनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली. यासाठी परीक्षक म्हणून डॉ. आनंद गोविंदलुरी, कपेल मल्होत्रा, डॉ. सचिन पैठणकर, मिलिंद बाबर, मिलिंद गरूड, राजेश पोखरकर, सनिद पाटील, विनीत लदानिया, सुशील गुजराथी, आणि विजय तळेले यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात स्टार्टअप्स आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी जागतिक गुंतवणुकीचे मार्ग तयार झाले. नवोन्मेष आणि आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी स्टार्टअप्सची महत्त्वपूर्ण भूमिकाही अधोरेखित झाली. या मध्ये एकूण १६ स्टार्टअप्सचे प्रदर्शन करण्यात आले, तर ३० हून अधिक देशांतील १०० हून अधिक उद्योजकांनी उद्योजकता, नवकल्पना आणि जागतिक भागीदारी यावर विचार मांडले. यावेळी डॉ. आनंद देशपांडे यांनी सांगितले की, प्रत्येक व्यवसायाची स्वतःची एक पद्धत असते ती पद्धत बदलणे काही सोपे नसते. त्यासाठी नाविन्यतेचा विचार करायला हवा. तुमचे भांडवल कमी असेल तर तुम्ही अमेरिकेसारख्या देशातील मोठ्या क्षेत्रात स्थान निर्माण करू शकणार नाही. त्यासाठी मोठी तयारी करायला हवी तरच तुम्ही मोठी झेप घेऊ शकता. उत्पादना बरोबरच विपणन व्यवस्था व विक्री पश्चात सेवा देखील प्रत्येक व्यवसायात आवश्यक आहे. लहान मोठ्या स्टार्टअपने स्वतःचे ग्राहक स्वतः शोधले पाहिजे. ग्राहकांच्या नजरेतून आपले उत्पादन आकर्षक बनवा. ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास करून ते करा. तुमचा वैयक्तिक व्यवसाय असेल तर तुमच्या क्षमता पण मर्यादित राहतात. जर तुम्ही एकत्रितपणे काम केले तर तुमच्या क्षमता वाढतात, व्यवसाय वाढतो आणि हेच व्यवसायासाठी फायद्याचे असते. कोणतेही सरकार सगळ्यांसाठी रोजगार निर्मिती तयार करू शकत नाही ते तुम्हालाच करावे लागतील. एकट्या महाराष्ट्राने वन ट्रिलियन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. जग वेगाने बदलत आहे, तुम्ही पण बदला. संधी तुमच्या आजूबाजूला आहेत त्या शोधा आणि प्राप्त करा. प्रत्येक व्यवसायिकाला विपणन कौशल्य प्राप्त करता आले पाहिजे. जो विक्री व विक्री पश्चात सेवा देऊ शकतो तो कधीच अपयशी ठरणार नाही, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावूनकेली रेकी
पुणे- घरफोडी करणा-या अट्टल टोळीस जेरबंद करून त्यांचेकडून ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० हिरे, साडेतीन किलो चांदी, ०२ पिस्तोल, ०५ जिवंत राऊंड, ०१ दुचाकी वाहन, घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकुण रु.८०,०००,००/- रू.चा. मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटक आरोपी पैकी १ आरोपी माजी उपसरपंच असल्याचे पोलिसांनी सांगितले .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१९/१२/२०२४ रोजी स्वारगेट पो.स्टे. पुणे शहर येथे दाखल गुन्हा रजि. नंबर ५२६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१ (३) या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्वारगेट पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार यांनी पुणे शहरातील साधारण १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन त्या मधून मिळालेल्या संशयीत अस्पष्ट छबीच्या अनुषंगाने तपास करताना स्वारगेट पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार रफिक नदाफ, शंकर संपते, सागर केकाण व दिनेश भांदुर्गे यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली की, रेकॉर्ड वरील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार नामे गणेश मारुती काठेवाडे, वय ३७ वर्षे रा. मु.पो. मुखेड, जि. नांदेड याने सदर घरफोडी केली असून तो त्याची ओळख लपवून उंड्री परिसरामध्ये वावरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर मिळलेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांना कळविली असता, त्यांनी बातमीचे गांभीर्य ओळखून कारवाई करण्यास सांगुन त्याप्रमाणे नियोजनबध्दरीत्या उंड्री परिसरामध्ये गणेश काठेवाडे याचा शोध घेवून त्यास चौकशी कामी स्वारगेट पो.स्टे. येथे आण आणून त्याच्याकडे केलेल्या चौकशी मध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्ह्यामध्ये दि. ०१/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपी गणेश काठेवाडे याचेकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकि करुन पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एकूण १४ घरफोड्या केल्या असून स्वारगेट एस.टी. स्टॅण्ड येथे ०७ चो-या केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले दागिणे त्याने मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या तसेच खून व खूनाचा प्रयत्न केलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुरेश बबन पवार, वय ३५ वर्षे रा. संभाजीनगर, बालाजीनगर, पुणे याचेकडे दिले असल्याचे सांगितले. यास्तव दाखल गुन्ह्यामध्ये सुरेश पवार याला अटक करण्यात आलेली आहे. सुरेश पवार याचेकडे, गणेश काठेवाडे याने दिलेले चोरीचे सोने/चांदी दागिणे त्याने पुणे शहरातील विविध सोनार यांचेकडे ठेवून वेगवेगळी कारणे सांगून त्याबदल्यामध्ये त्यांच्याकडून पैसे स्विकारल्याचे सांगितले. सदर व्यवहारामध्ये, ऑर्डर प्रमाणे सोने तयार करुन विक्री करणारा व्यवसायिक नामे भिमसिंग ऊर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) वय ३९ वर्षे याने मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाल्याने भिमसिंग राजपूत यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. अटक मुदतीमध्ये आरोपीकडे केले चौकशीमध्ये आरोपी नामे गणेश काठेवाडे हा मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याचेवर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये ५५ पेक्षा अधिक घरफोडी, चोरी, वाहन चोरी, दरोडा, एटीएम रॉबरी, जबरी चोरी इत्यादी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे पोलीस सीसीटीव्ही चेक करुन आपल्या पर्यंत पोहचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे ४० ते ५० कि.मी. चा प्रवास करुन येवून घरफोडी करुन तसेच जाताना पुन्हा ४० ते ५० कि.मी. चा प्रवास छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. तसेच घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. त्यामधून जरी चुकून सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये त्याची छबी आलीच तर पोलीसांचा तांत्रीक विश्लेषनातून तपास भरकटावा यासाठी मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची अॅक्टींग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्ह्यातील दुसरा अटक आरोपी व गणेश काठेवाडे याचा साथिदार नामे सुरेश बबन पवार हा अंबरवेड, गवळीवाडा, ता. मुळशी, जि. पुणे या गावचा माजी उपसरपंच असून त्याचेवर खून तसेच खूनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असून सध्या तो मोक्का गुन्ह्यातून जामिनावर आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी नामे गणेश काठेवाडे याने केलेल्या घरफोडी मधील दागिण्यांचा तपास करत असताना, त्यासंदर्भात सुरेश पवार याचेकडे तपास करता त्याचेकडे ०२ पिस्टल व ०५ जिवंत राऊंड मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दाखल गुन्ह्यातील तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पो. स्टे. अंतर्गत झालेल्या घरफोड्यातील व चोरीतील एकूण ८६० ग्रॅम सोन्याचे दागिणे, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, १ दुचाकी वाहन, ०२ पिस्तोल, ०५ जिवंत राऊंड, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेले कटावणी, लोखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर इ. मिळून साधारण ८० लाख रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परि.२ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, यांच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहा. पोलीस निरीक्षक, राहुल कोलंबिकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार संजय भापकर, श्रीधर पाटील, नाना गांदुर्गे, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपते, सागर केकाण, सतिश कुंभार, रफिक नदाफ, राहुल तांबे, शरद गोरे, रमेश चव्हाण, विक्रम सावंत, उज्वला थोरात, पोर्णिमा गायकवाड, सुनिता खामगळ, सुरेखा कांबळे व पोलीस मित्र दिनेश परीहार यांनी केली.
माध्यमांशी काळजीपूर्वक वागा -लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे माध्यमांशी वागताना विशेष काळजी घेतली जावी. आपल्या हातून एकही चूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये भाजपकडून सत्ता केंद्र कशा पद्धतीने चालवले जाते याचेही उदाहरण दिल्याची माहिती आहे.
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख करून सत्ताधारी आमदारांना त्यांच्यासारखे अभ्यास दौरे काढण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सकाळी त्यांनी 2 युद्धनौका व एका पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले. त्यानंतर त्यांनी आशिया खंडातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचेही उद्घाटन केले. तत्पूर्वी, महायुतीच्या आमदारांशी साधलेल्या संवादात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख केला. राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातचा अभ्यास दौरा केला होता. तसेच दौरे महायुतीच्या आमदारांनी केले पाहिजे, असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले, आमदारांनी लोकांमध्ये जाऊन मिसळले पाहिजे. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांना आपल्या कामातून प्रत्युत्तर द्यावे. आपल्या कामावर लोकांची मते काय आहेत? हे जाणून घ्यावे. इतर राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली झाली असेल तर त्याविषयी अभ्यास दौरे आयोजित करावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातमध्ये अभ्यास दौरा काढला होता. त्यांच्यासारखे दौरे आयोजित करावेत.
समाजाला वेळ देताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. त्यांनाही वेळ द्या. विशेषतः स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. तसेच आपण ठरवलेली कामे निर्धाराने कशी पूर्ण होतील याचेही काटेकोर नियोजन आमदारांनी करायला हवे.
मोदींनी आमदारांना महायुती म्हणून संघटना वाढवण्यावर भर देण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, आमदारांनी संघटना म्हणून महायुती वाढवण्यावर भर द्यावा. मतदारसंघात घटकपक्षातील आपले जे आमदार व पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना भेटी द्याव्यात. महायुतीचा एकोपा वाढवण्यासाठी गावोगावी डब्बा पार्टीचे आयोजन करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही उपरोधिक टीका केली. यासंबंधी त्यांनी काँग्रेसने अनेक वर्षे आपली सत्ता कशी टिकवली हे समजून सांगितले. काँग्रेस एका पंचवार्षिकमध्ये रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये ती जनतेला रस्त्याचा नकाशा दाखवते. अखेर तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करते. काँग्रेसने या पद्धतीने वर्षानुवर्षे आपली सत्ता सांभाळली, असे ते म्हणाले.
उपायुक्तांनी साधला ‘एमआयटी एडीटी’तील विद्यार्थ्यांशी संवाद लोणी काळभोर- विद्यार्थी व युवा हे आपल्या विकसित राष्ट्राच्या वाटचालीतील मुख्य भागिदार आहेत. इंजिनिअर, संशोधक म्हणून त्यांच्या खांद्यावर भविष्यात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहावे, भरपूर अभ्यास करावा आणि आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून कुठलीही समस्या आल्यास थेट कायदा हातात न घेता, प्रथम ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. कारण, पोलिस हे आपले शत्रु नव्हे मित्र आहेत, असे प्रतिपादन पुणे शहर झोन-५ चे पोलिस उपायुक्त डाॅ.राजकुमार शिंदे यांनी केले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी, पुणे शहर हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी-काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.सुजित धर्मपात्रे, डाॅ.सुदर्शन सानप, डाॅ.सुराज भोयार आदी मान्यवर उपस्थित होते. डाॅ.शिंदे बोलताना पुढे म्हणाले, एमआयटी ही महाराष्ट्रासह देशात अत्यंत नावाजलेली संस्था आहे. या संस्थेने आजवर देशाला अनेक संशोधक, इंजिनिअर, नेव्ही अधिकारी दिलेले आहेत. या शैक्षणिक संकुलात शिकलेले विद्यार्थी जगभरात देशाचे नाव उज्वल करत असताना, आपल्या कुठल्या कृतीने संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोचणार नाही, ही जबाबदारी सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सुसज्ज क्रीडा संकुलाचा वापर करून विविध खेळ खेळावेत व त्यातून स्वतःला शारीरिकरित्या सदृढ ठेवावे. त्यांनी क्षणिक सुखासाठी व्यसनांना जवळ न करता, आपला कॅम्पस ड्रग, रॅगिंग फ्री ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी, लेडी सिंगम म्हणून प्रचलित असणाऱ्या अनुराधा उदमले म्हणाल्या, महाविद्यालयीन काळ हा कुठल्याही विद्यार्थ्याच्या जीवनात अत्यंत मोलाचा असतो. या काळात, विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करावीत. त्यांनी क्षणिक आनंदाच्या नादात काही अक्षम्य चुका होणार नाहीत व ज्यामुळे करिअर उद्वस्त होणार नाही याचे भान ठेवावे, असे आवाहन केले.
…अन्यथा तिसऱ्या गुरूला पाचारण करावे लागते विद्यार्थ्यांच्या जिवनातील विविध पातळ्यांवर प्राप्त होणाऱ्या गुरूंची भूमिका अत्यंत मोलाची असते. आई-वडील हे आद्य गुरू तर शाळा व महाविद्यालयातील शिक्षक हे त्यांचे दुसरे गुरू असतात. परंतु, एखाद्याचे वर्तन खराब असेल व ते पहिल्या दोन गुरूंच्या नियंत्रणाबाहेर असल्यास, तिसरे गुरू अर्थात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. त्यामुळे, या गुरूच्या सानिध्यात आले की, कुठलाही शिष्य नक्कीच सुधारतो, अशी कोटी डाॅ.शिंदे यांनी करताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
लोणी-काळभोर परिसरात वाढलेल्या युवकांच्या हाणामारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही तातडीने ठोस पावले उचलली आहेत. येथील गावकऱ्यांना तथा युवकांना कुठलीही समस्या असल्यास त्यांनी कायदा हातात न घेता तातडीने आमच्याशी संपर्क साधावा. भविष्यात कायदा मोडणाऱ्यांची कुठल्याही परिस्थितीत हयगय केली जाणार नाही. – राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी-काळभोर, पोलिस ठाणे.
एमआयटी एडीटी विद्यापीठ हे विश्वशांतीचा संदेश देणारे विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे कर्मचारी व विद्यार्थी शिस्तप्रिय असून त्याचमुळे कॅम्पसमध्ये आजवर एकही अनुचित प्रकार घडलेला नाही. विद्यापीठाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपसातील मतभेदांवरून काही घटना घडल्यानंतर त्याची प्रशासनाने नोंद घेतली आहे. त्यानुसार वेळोवेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते. भविष्यातही आम्ही विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत सजग राहू. – डाॅ.महेश चोपडे, कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ.
या आघाडीच्या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण एका भक्कम आणि स्वयंपूर्ण संरक्षण क्षेत्राची उभारणी करण्याची भारताची अतूट वचनबद्धता अधोरेखित करते : पंतप्रधान
एकविसाव्या शतकातील भारतीय नौदलाला सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल : पंतप्रधान
आजचा भारत जगातील एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत आहे : पंतप्रधान
आजचा भारत जगभरात विशेषतः ग्लोबल साऊथ मध्ये एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. : पंतप्रधान
संपूर्ण हिंद महासागर क्षेत्रात भारत सर्वात आधी प्रतिसाद देणारा देश म्हणून उदयाला आला आहे : पंतप्रधान
जमीन, जल, हवा , खोल सागर किंवा अनंत अंतराळ असो, भारत सर्वत्र आपल्या हिताचे रक्षण करत आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या शूर वीरांना अभिवादन केले.त्यांनी सर्व शूर सैनिकांचे अभिनंदन केले.
आजचा दिवस भारताचा सागरी वारसा, नौदलाचा समृद्ध गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अतिशय महत्वपूर्ण असून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन सामर्थ्य आणि दृष्टी दिली, असे पंतप्रधान म्हणाले. एकविसाव्या शतकातील भारतीय नौदलाला सक्षम करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने छत्रपती शिवरायांच्या भूमीतच एक मोठे पाऊल टाकले आहे, असे त्यांनी सांगितले. “अशा प्रकारे विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडी यांचे एकाच वेळी राष्ट्रार्पण प्रथमच होत आहे”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या सर्व आघाडीच्या युद्धनौकांची निर्मिती भारतात झाली असून ही अतिशय अभिमानस्पद गोष्ट आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. या कामगिरीबद्दल त्यांनी भारतीय नौदल, या युद्धनौकांच्या बांधणीत सहभाग घेतलेले सर्व संबंधित आणि देशवासीयांचे अभिनंदन केले.
आजच्या कार्यक्रमाने आपला वैभवशाली वारसा आणि भविष्यातील आशा आकांक्षांना जोडले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताला प्रदीर्घ सागरी प्रवास, वाणिज्य, नौदल संरक्षण आणि जहाजबांधणी उद्योगाचा समृद्ध इतिहास आहे. या समृद्ध इतिहासाचा आधार घेत आजचा भारत जगातील एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे, आज राष्ट्रार्पण झालेल्या नौदलाच्या युद्धनौकांमधून याचीच झलक दिसून येते, असे ते म्हणाले.
आज राष्ट्रार्पण करण्यात आलेली चोल साम्राज्याच्या सागरी पराक्रमाला समर्पित असलेली आय एन एस निलगिरी आणि गुजरातच्या बंदरांच्या मार्गे भारताला पश्चिम आशियाशी जोडलेल्या काळाची आठवण करून देणारी आय एन एस सुरत युद्धनौका यांचा उल्लेख त्यांनी केला. काही वर्षांपूर्वी कावेरी या पाणबुडीच्या जलावतरणानंतंर P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी पाणबुडी आयएनएस वाघशीरचे राष्ट्रार्पण झाले असून, या आघाडीच्या पाणबुड्यांमुळे भारताची सुरक्षा आणि प्रगती वाढीला लागेल, असे पंतप्रधान म्हणाले.
आजचा भारत जगभरात विशेषतः ग्लोबल साऊथ मध्ये एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. भारत विस्तारवादाच्या नव्हे तर विकासाच्या भावनेतून कार्य करतो, भारताने नेहमीच एका मुक्त, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्राला समर्थन दिले आहे, असे ते म्हणाले. किनारी भूप्रदेश असलेल्या राष्ट्रांच्या विकासाचा मुद्दा आल्यावर भारताने SAGAR (क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि वाढ) हा मूलमंत्र सादर केला आणि या दृष्टीकोनाने प्रगती केली. भारताने आपल्या जी ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात “एक पृथ्वी, एक भविष्य” या मंत्राचा प्रसार केला असे त्यांनी सांगितले. कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढाईदरम्यान भारताने अंगिकारलेल्या “एक पृथ्वी, एक आरोग्य” या दृष्टीकोनाचा उल्लेख त्यांनी केला . जगाला एक कुटुंब मानण्यावर भारताचा विश्वास आहे आणि यातूनच भारताने सर्वसमावेशक विकासाची आपली वचनबद्धता अधोरेखित केली. संपूर्ण क्षेत्राचे संरक्षण आणि सुरक्षा ही भारत आपली जबाबदारी मानतो,असे त्यांनी सांगितले.
भारतासारख्या सागरी किनारा लाभलेल्या देशांची जागतिक सुरक्षा, अर्थशास्त्र व भूराजकीय बदलांना आकार देण्यात असलेली महत्वाची भूमिका अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सागरी सीमांचे रक्षण, दिशादर्शनातील स्वातंत्र्य,तसेच ऊर्जा सुरक्षा व आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या पुरवठा मार्ग व सागरी मार्गांचे रक्षण करण्याच्या महत्वावर भर दिला. दहशतवाद,अमली पदार्थांची व शस्त्रास्त्रांची तस्करी यांपासून सागरी मार्गांचे रक्षण करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी जोर दिला. जागतिक स्तरावर सर्व देशांनी सागरी मार्ग सुरक्षित व समृद्ध बनवण्यासाठी, दळणवळण अधिक कार्यक्षम करण्याची, तसेच नौवहन उद्योगाला अधिक सशक्त बनवण्याची गरज स्पष्ट केली. दुर्मिळ खनिजे व माशांसारख्या सागरी साठ्याचे प्रमाणाबाहेर किंवा गैरवापर थांबवण्यावर त्यांनी भर दिला. नौवहनाचे व सागरी वाहतुकीचे नवीन मार्ग शोधण्याच्या दृष्टीने भारत सतत प्रयत्नशील असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.हिंदी महासागर क्षेत्रातील त्वरित प्रतिसाद देणारा देश म्हणून भारताचा उदय झाला आहे. गेल्या काही महिन्यात भारतीय नौदलाने शेकडो जीव तर वाचवलेच शिवाय हजारो कोटी रुपये किमतीची आंतरराष्ट्रीय मालमत्ता वाचवली आहे. यामुळे भारताच्या नौदल व तटरक्षक दलांना विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. भारताच्या हिंदी महासागरातील प्रभावामुळे आसियान देश, ऑस्ट्रेलिया, आखाती देश व आफ्रिकन देशांशी भारताचे आर्थिक सहकार्य वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमाचे लष्करी व आर्थिक अशा दोन्ही पैलूंच्या संदर्भात महत्व असल्याचे ते म्हणाले.एकविसाव्या शतकात भारताच्या लष्करी क्षमतांमधील वाढ व आधुनिकीकरण महत्वाचे असल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले, जमीन, आकाश, खोल समुद्र अथवा अनंत अवकाश असो, भारताने सगळीकडे स्वतःचे हितरक्षण केलेच पाहिजे. संरक्षण दलाच्या प्रमुखांचे नवीन पद निर्माण करण्यासह अनेक सुधारणा सतत होत असून सशस्त्र सेनांना अधिकाधिक सक्षम बनवण्याकडे भारताचे प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.
भारतीय सशस्त्र सेनेने गेल्या 10 वर्षांत आत्मनिर्भरतेचा स्वीकार केल्यामुळे संकटकाळात इतर देशांवरील भारताचे अवलंबित्व कमी झाले आहे , याबद्दल पंतप्रधांनी कौतुकोद्गार काढले. सशस्त्र सेनादले सुमारे 5000 उपकरणे व उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर झाली असून आता त्यांच्या आयातीची गरज उरली नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वदेशी उत्पादने व उपकरणे वापरताना सैनिकांना अधिक आत्मविश्वास वाटतो असे ते म्हणाले. कर्नाटकात सशस्त्र सेनादलांसाठी विमाने बनवणारा कारखाना सुरु झाला असून देशातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना देखील कार्यरत असल्याची नोंद त्यांनी घेतली. उत्तर प्रदेश व तामिळनाडूत संरक्षण मार्गिका विकसित झाल्या असून तिथे संरक्षणविषयक उत्पादने मोठ्या प्रमाणात होत आहेत, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली , त्यासोबतच त्यांनी तेजस विमानांच्या उत्पादनाची उपलब्धी अधोरेखित केली. मेक इन इंडिया उपक्रमातील नौदलाच्या व विशेषतः माझगाव गोदीच्या सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या दशकात भारतीय नौदलात सामील झालेल्या 7 पाणबुड्या व 33 जहाजे अशा 40 पैकी 39 जहाजे भारतातील गोदींमध्ये तयार झालेली असल्याचे ते म्हणाले. यामध्ये प्रचंड मोठ्या आय एन एस विक्रांत या विमानवाहू जहाजाचा तसेच आय एन एस अरिहंत व आय एन एस अरिघात या आण्विक पाणबुड्यांचा समावेश आहे. मेक इन इंडिया मोहीम पुढे नेल्याबद्दल पंतप्रधानांनी सशस्त्र सेनांचे अभिनंदन केले. भारताचे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाने रु.1.25 लाख कोटीचा टप्पा ओलांडला असून देश आता 100 हुन अधिक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या संरक्षण क्षेत्रात येत्या काळात अधिक महत्वाचे बदल घडवण्यासाठी सरकार पूर्ण पाठिंबा देईल असे पंतप्रधानांनी सांगितले.
मेक इन इंडिया उपक्रमामुळे सशस्त्र सेनांमध्येच क्षमतावर्धन होत आहेच व त्यासोबत आर्थिक प्रगतीचे नवीन आयाम खुले होत असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी जहाजबांधणी क्षेत्राचे उदाहरण दिले. जहाजबांधणी उद्योगात गुंतवलेल्या प्रत्येक रुपयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुपटीने सकारात्मक परिणाम होतो हे तज्ज्ञांचे मत असल्याचे ते म्हणाले. सध्या देशात 60 मोठ्या जहाजांची बांधणी सुरु असून त्यांची किंमत रु.1.5 लाख कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीमुळे रु 3 लाख कोटींचे आर्थिक अभिसरण अपेक्षित आहे, त्यामुळे रोजगारनिर्मितीला सहा पट अधिक फायदा होईल. यातील बहुतेक सुटे भाग देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून पुरवले जात आहेत. जहाजबांधणीच्या कामात जर 2000 कामगार कार्यरत असतील तर त्यामुळे इतर उद्योगांमध्ये, विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत 12000 रोजगारांची निर्मिती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या अनुषंगाने भारताने जलद प्रगती केली असल्याच्या मुद्द्यावर भर देत उत्पादन आणि निर्यात क्षमतेत सातत्याने वाढ होत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भविष्यात शेकडो नवीन जहाजे आणि कंटेनरची गरज भासणार असल्याचेही नमूद केले. ते पुढे म्हणाले की बंदरांच्या-नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देईल आणि त्याद्वारे हजारो नवीन रोजगारांची निर्मिती केली जाईल. सागरी क्षेत्रातील रोजगारांमध्ये होत असलेल्या वाढीचे उदाहरण देत, भारतातील नाविकांची संख्या 2014 मधील 1,25,000 च्या तुलनेत दुपटीने वाढून आज जवळपास 3,00,000 झाली असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले, नाविकांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा आता जगभरातील पहिल्या पाच देशांमध्ये समावेश झाला असल्याचे त्यांनी सांगितले .आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक महत्त्वाच्या निर्णयांनी झाली असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन धोरणांची आणि नवीन प्रकल्पांची आखणी करण्यात येत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, बंदर प्रदेशांच्या विस्तारासोबतच देशाच्या प्रत्येक कोपऱ्याचा आणि भागाचा विकास होईल याची खबरदारी घेणे हा या उद्देशाचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदराला मंजुरी हा आपल्या तिसऱ्या कार्यकाळात घेतलेला पहिला महत्त्वाचा निर्णय असल्याचेही मोदींनी नमूद केले.,75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या आधुनिक बंदराच्या बांधकामास याआधीच सुरूवात झाली असून त्यामुळे महाराष्ट्रात हजारो नवीन रोजगार निर्माण होत असल्याचे ते पुढे म्हणाले.
सीमेलगतच्या तसेच किनारपट्टीलगतच्या भागात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यासाठी गेल्या दशकात अभूतपूर्व काम केले गेले असल्याचे स्पष्ट करत मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे नुकतेच उद्घाटन झाल्याचा उल्लेख केला, यामुळे कारगिल आणि लडाख सारख्या सीमावर्ती भागात सहजपणे प्रवास करणे शक्य होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या अरुणाचल प्रदेशमधील सेला बोगद्याच्या उद्घाटनाचाही त्यांनी उल्लेख करत या बोगद्यामुळे लष्कराला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात प्रवेश करणे अधिक सोपे झाले असल्याचे म्हटले. शिंकुन ला बोगदा आणि झोजिला बोगदा यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसंदर्भातही जलदगतीने काम करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतमाला प्रकल्पाद्वारे सीमावर्ती भागात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उत्तमरित्या उभे केले जात असून व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सीमावर्ती गावांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या दशकात सरकारने दुर्गम बेटांवर लक्ष केंद्रित केले असून त्यामध्ये निर्जन बेटांवर नियमित देखरेख ठेवण्याच्या आणि त्यांच्या नामकरणाही समावेश असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. हिंद महासागरात पाण्याखाली असलेल्या सागरी पर्वतांनाही नावे देण्यात येत असून, भारताने घेतलेल्या या पुढाकारामुळे एका आंतरराष्ट्रीय संस्थेने गेल्या वर्षी अशा पाच ठिकाणांना नावे दिल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये हिंद महासागरातील अशोक सीमाऊंट, हर्षवर्धन सीमाऊंट, राजा राजा चोला सीमाऊंट, कल्पतरू आणि चंद्रगुप्त रिज यांचा समावेश आहे, यामुळे भारताची शान आणखी वाढली आहे.
भविष्यात बाह्य अवकाश आणि खोल समुद्र या दोन्हींच्या महत्त्वावर भर देत पंतप्रधानांनी या क्षेत्रांमध्ये आपल्या क्षमतेत वाढ करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. समुद्रयान प्रकल्पाचाही त्यांनी उल्लेख केला, शास्त्रज्ञांना समुद्रात 6,000 मीटर खोलीपर्यंत नेण्याची क्षमता विकसित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असून काही मोजक्या देशांनाच अशी कामगिरी करणे शक्य झाले आहे. सरकार या बाबतीत भविष्यातील शक्यता पडताळून पाहण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नसल्याचे ते म्हणाले.
21 व्या शतकात आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी भारताची वसाहतवादी राजवटीच्या प्रतीकांपासून मुक्तता होण्याचे महत्त्व विशद करत मोदींनी, आपल्या ध्वजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेची जोड देण्यासोबतच ऍडमिरल पदाच्या गणवेशावरील पदकांवर कोरण्यात येणाऱ्या चिन्हांची त्यानुसार फेररचना करण्यात भारतीय नौदलाने आघाडी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेक इन इंडिया उपक्रम आणि आत्मनिर्भर अभियान वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यास प्रोत्साहन देतात. भारत यापुढेही अभिमानास्पद कामगिरीची परंपरा सुरू ठेवून विकसित देश बनण्यात योगदान देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्या तरी – विकसित भारत हे एकच ध्येय आहे यावर त्यांनी भर दिला. आज सागरी सीमांच्या रक्षणासाठी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केलेल्या युद्धनौकांमुळे देशाचा संकल्प बळकट होणार असल्याचे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
तीन प्रमुख लढाऊ नौकांचा नौदलात समावेश ही संरक्षण उत्पादनात आणि सागरी सुरक्षेत जागतिक अग्रणी बनण्याचे भारताचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण झेप आहे. INS सूरत ही P15B मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथी आणि शेवटची नौका, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे. यात 75% स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला असून ती आधुनिक शस्त्रास्त्र सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS निलगिरी, P17A स्टेल्थ फ्रिगेट या प्रकल्पातील पहिली नौका, भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने डिझाइन केली असून त्यात टिकून राहण्याची वाढीव क्षमता, सीकीपिंग आणि शत्रूच्या नजरेस पडणार नाही अशी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली असून ती पुढील पिढीच्या स्वदेशी युद्धनौकांची झलक दर्शवितात. INS वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी असून,या पाणबुडीची बांधणी भारताच्या वाढत्या कौशल्याचे द्योतक असून ती फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे.