Home Blog Page 498

‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त,सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिला क्लॅप

महाराष्ट्र राज्यातील विद्यमान सरकारच्या बऱ्याच योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. यापैकी काही योजना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे प्रकाशझोतात राहिल्या आहेत. ‘लाडकी बहिण’ योजना त्यापैकीच एक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली हि योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘लाडकी बहीण’ असे शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला आहे.

निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे हे ओम साई सिने फिल्मच्या बॅनरखाली व शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. गणेश शिंदे यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. ‘लाडकी बहीण’ची पटकथा-संवादलेखन शितल शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी माता-भगिनींच्या मदतीला धावून आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. सातारा येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ‘लाडकी बहीण’ सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष पंकज चव्हाण, राजेंद्र मोहिते, अनंत काळे, महेश देशपांडे आणि तहसीलदार आदी मंडळी उपस्थित होती. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ असंख्य महिलांनी घेतला आहे. गोरगरीब जनतेच्या संसाराला हातभार लावत महाराष्ट्रातील महिला वर्गाचे आर्थिक सबलीकरण करणारी लाडकी बहीण योजना खूप गाजली. यावर चित्रपट तयार होणे हे अतिशय उत्साहवर्धक असल्याचे मत निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. एक महत्त्वपूर्ण विषय अतिशय खेळकर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात येणार असून, ‘लाडकी बहीण’च्या रुपात परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट तयार करण्यात येत असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.

या चित्रपटामध्ये मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, जयश्री सोनवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. गजानन शिंदे या सिनेमाचे छायालेखक असून, संगीत विनीत देशपांडे यांचे लाभले आहे. गायक अवधूत गुप्ते तसेच आनंद शिंदे यांच्या आवाजात ‘लाडकी बहीण’मधील गाणी संगीतबद्ध करण्यात येणार आहेत. पंकज चव्हाण नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कबाडे, शिवाजी सावंत या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

तब्बल सव्वाचार लाख रुपये किंमतीची हातभट्टीची दारू पकडली

पुणे-अवैद्य गावठी हातभट्टी अड्डयावर छापा मारुन तब्बल सव्वाचार लाख रुपये किंमतीची हातभट्टीची दारू पोलिसांनी हस्तगत केली.
शहरात अवैध धंदे वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने काळेपडळ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिग पाटील यांनी तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
वरिष्ठांनी दिलेले आदेशाप्रमाणे दिनांक ११/०६/२०२५ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कंजारभाट वस्ती, संतोषनगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, पुणे येथे बांधकाम चालु असलेल्या बिल्डिग जवळ एक इसम दारुचा साठा करुन लोकांना दारुविक्री करीत आहे. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस स्टाफ यांनी सापळा रचून हातभट्टी दारु अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु विक्री करणारा इसम नामे नवीन दिलीप बिनावत, वय ५४ वर्षे, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे यास ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण ५३ कॅन व एक बैरल मध्ये भरुन ठेवलेली २०६५ लिटर तयार ४,१३,०००/- रु. किंमतीची हातमट्टीची दारु इ. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२५/२०२५ भा.न्या.सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रविण कांबळे, परशुराम पिसे यांचे पथकाने केली आहे.

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न
मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी,अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी,अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हॅंकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, अ‍ॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा.सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी, आयईडी चे रिकार्डो बाल्बो,अधिष्ठाता,विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड, यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया),इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत.याचं परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी,स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारणारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्यिाचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधन साठी ओळखला जाईल.मुंबईची सध्या वित्तीय,औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल.विकसित भारत २०४७ मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अ‍ॅबरडीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्यूटो युरोपियो डी डिझाईन हे मुंबई,नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस आणणार आहेत – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे. अटल सेतू निर्माण झाला आहे.. पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे विद्यापीठाशी निगडित सर्वांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही. सध्या पाच विद्यापीठे आली आहेत. पण भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत.नुकताच वेर्स्टन युनर्व्हसिटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विकसित भारत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण हातभार लागेल: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की,मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे त्याचबरोबर ही आर्थिक राजधानी देखील असून आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षणाचे हब होण्यासाठी परदेशी पाच विद्यापीठांचा खूप महत्त्वाचं योगदान राहील. भारत हा प्राचीन काळापासून शिक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर नावलौकिक राहीला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतची स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांना देखील आपल्या संस्था भारतात सुरू करता येणार आहेत त्याचबरोबर भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येणे शक्य होणार आहे.भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात उपलब्ध होईल. आज भारतातील आयआयटी, आयआयएम, आयएफ, सिम्बॉयसिस यासारख्या संस्था परदेशामध्ये सुरू झाल्या आहेत.परदेशी विद्यापीठ भारतात येवून शिक्षण देणार भारताला विकसित बनवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
यावेळी गुजरात अहमदाबाद विमान दूर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ढवसे यांनी सुत्रसंचालन केले.प्रास्ताविक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.यावेळी केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
जागतिक दर्जाची पाच विद्यापीठे नवी मुंबईत

युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅबरडीन, यूकेमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ असून 200 हून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह अनेक दशकांच्या विद्यापीठ भागीदारी यामध्ये असून आयआयटी – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; एम्स – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस; मणिपाल अकादमी; आयसीएआर – इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च, आयसीएमआर – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे.
जगातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आणि आयव्ही लीग समतुल्य संस्था आणि मुंबईत कॅम्पस स्थापन करणारे ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ग्रुप ऑफ एट (Go8) विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ. भारतीय विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्यात जागतिक कार्यबल आणि अर्थव्यवस्थेच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले विज्ञान,औद्योगिक व इंजिनिअरींग या क्षेत्रात (STEM)व्यवसाय या विषयांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असतील.
यॉर्क विद्यापीठ ही यूकेमधील सर्वात प्रतिष्ठित संशोधन-केंद्रित संस्थांपैकी एक आहे तसेच ते रसेल ग्रुपची सदस्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशील उद्योगांसह संगणक विज्ञानातील अत्याधुनिक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध होतील. उदयोन्मुख क्षेत्रातील कार्यक्रम – एआय, सायबर सुरक्षा, सर्जनशील उद्योग – जागतिक उद्योगांच्या इनपुटसह डिझाइन केले जातील.भारतीय विद्यार्थ्यांसाठी नोकरीचा संधी उपलब्ध होतील.
इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक) हे स्वतंत्ररित्या पदवी देणारे आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ आहे.संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय यासारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदवीधर शिक्षण उपलब्ध होतील. त्यांचा प्रसिद्ध एलिव्हेट प्रोग्राम देखील ते राबवणार आहेत. जो सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन, स्पर्धा उपलब्ध करून देईल.
युरोपमधील प्रीमियम डिझाइन शाळांपैकी एक, इस्टिटुटो युरोपियो डी डिझाइन (IED) फॅशन, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य उपलब्ध करून देईल.

आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारी

पुणे, दि. १४: आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.

यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

मुंबईत भरधाव डंपरने तिघांना चिरडले:चालक पोलिसांच्या ताब्यात, संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड, गोवंडीत तणाव

मुंबई-मुंबईच्या गोवंडी परिसरात रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, डंपरने तीन तरुणांना चिरडले. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही वेळातच मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. लोकांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवर घडली. एका भरधाव डंपरने तिघांना चिरडले. अपघातानंतर जमावाने या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी डंपरच्या काचा फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

जमावाच्या ठिय्या आंदोलनामुळे विक्रोळी व घाटकोपरकडून येणारी वाहने तसेच नवी मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे थांबली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल आहेत. संतप्त जमावाला समजावून ठिय्या आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले. या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहे.

अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बॅरिकेड्स लावून तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये भीषण अपघात घडला. पालघरच्या मेंढवण घाटात रसायन वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला असून मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनासोबत हा अपघात घडला. अपघातामुळे कंटेनरमधील रसायन हवेत पसरल्याने मोठ्या प्रमाणावर महामार्गावर धूर पसरला होता. त्यामुळे, स्थानिक नागरिकांमध्ये, वाहन चालकांमध्ये भीतीच वातावरण पसरले. दरम्यान, सध्यामहामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

दरम्यान, मुंबईत वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन, अवजड वाहनांवरील नियंत्रण आणि चालकांची वैद्यकीय तपासणी या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

पुण्यात कॉँग्रेसला झटक्यावर झटके ; सोनाली मारणे यांचाही काँग्रेस पक्षाला रामराम

पुणे : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते.  सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविल्याचे समजते. मारणे या सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर कार्यरत होत्या.

हर्षवर्धन सपकाळ यांना लिहिलेल्या पत्रात सोनाली मारणे यांनी म्हंटले आहे की,  2011 पासून कॉंग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम पक्षाने करायला हवा त्याप्रमाणे पक्ष काम करताना दिसत नाही याची खंत वाटते. जे काम करू शकतात त्यांना योग्य न्याय दिला जात नाही. तसेच निवडणूक आकडेवारी पेक्षा कार्यकर्त्यांच्या भावनांकडे लक्ष देण्यात पक्षाला अपयश आल्याचे नमूद  करत राष्ट्रीय कार्यकारणी कडून पुण्याला कायमच दुय्यम दर्जा दिला जात आहे, पक्षाकडे पुढील पंचवार्षिकसाठी कोणतीही योजना नाही असेही मारणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते अनंतराव जोशी यांच्या ‘नाटकवाला’ आत्मकथनाचे प्रकाशन

पुणे : रंगकर्मी अनंतराव जोशी यांचे आत्मकथन केवळ वैयक्तिक नाही. त्यांच्या अनुभवांतून त्या काळाचे, त्या काळातील रंगभूमीचे, कलावंतांचे, समाजाचे, रसिकांचे, तेव्हाच्या रंगभूमीच्या इतिहासाचे उत्तम दस्तऐवजीकरण झाले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार व रंगकर्मी अभिराम भडकमकर यांनी शुक्रवारी येथे केले. जोशी यांनी प्रमुख भूमिकाच हवी, असे न मानता जी भूमिका मिळेल, तिचे सोने केले. अभिनयासह मेकअप, नाट्य व्यवस्थापन, निर्मिती या बाजूंवर प्रभुत्व मिळवले. रंगभूमीसोबतच त्यांनी आयुष्यभर केलेले सामाजिक कार्य, पक्षकार्य, शैक्षणिक कार्य आणि त्यांनी जपलेले माणूसपण यांचे योगदान विसरता कामा नये. नाटकवाला हे पुस्तक म्हणजे जोशी यांच्या योगदानाला केलेले अभिवादन आहे, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ रंगकर्मी कै. अनंतराव जोशी यांच्या ‘नाटकवाला’ या शीर्षकाच्या आत्मकथनाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या आत्मकथनाचे प्रकाशन अभिराम भडकमकर आणि अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते झाले. अनंतराव जोशी यांच्या कन्या अभिनेत्री अंजली धारू, रंगकर्मी प्रसाद वनारसे तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संपदा जोशी, शब्दांकन करणारे प्रवीण जोशी, तसेच प्रकाशक शैलेश नांदुरकर यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली होती.

भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ येथे हा सोहळा आज (दि. १३) रसिकांच्या आणि सुहृदुंच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. हे आत्मकथन अनंतराव जोशी यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले आहे. अनंतराव जोशी यांनी लिहून ठेवलेल्या काही आठवणी, नोंदी, टिपणे यांच्या आधारे प्रसिद्ध संहितालेखक प्रवीण जोशी यांनी या आत्मकथेचे पुनर्लेखन एका वेगळ्या शैलीत केले आहे. रसिक आंतरभारतीतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

अनंतरावांच्या कन्या अभिनेत्री अंजली धारू यांनी मनोगतातून आपल्या पित्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. बाबांचे खरे मोठेपण आणि कर्तृत्व फार उशिरा लक्षात आले. लहानपणापासून बाबा नाटक करतात, हे माहिती होते. पण ते नेमके काय करत होते, त्याची लख्ख जाणीव स्वतः रंगभूमीवर काम करताना येत गेली आणि बाबांची नव्याने ओळख झाली. माणसाची किंमत पैसा, पद, प्रतिष्ठेने नसून माणूसपणावर असते, ही शिकवण बाबांनी दिली, असे त्या म्हणाल्या.

अभिराम भडकमकर म्हणाले, या आत्मकथनाच्या निमित्ताने रंगभूमीवर हयात वेचलेल्या रंगकर्मीला साजेसा असा ‘सेट’ उभारून आयोजकांनी कल्पकता दाखवली आहे. अनंतराव जोशी यांच्या या लेखनातून आपल्या पूर्वसुरींनी नेमके काय केले, आपण कुणाच्या खांद्यावर उभे आहोत, याची कल्पना आजच्या पिढीला आणि वाचकांनाही येईल. जोशी यांच्या टिपणांना, आठवणींना प्रवीण जोशी यांनी दिलेला एखाद्या नाटकाच्या संहितेचा आकृतीबंध आगळावेगळा आहे. तीन अंक आणि अनेक प्रवेशांचे हे नाटक, जोशी नामक नाटकवाल्यासोबतच त्यांच्या आयुष्यातील इतर अनेक योगदानाविषयी सांगते. त्यांचे अश्रू, घाम, रक्त यातून व्यक्त झाले आहे. हा अतिशय महत्त्वाचा असा सोहळा आहे.

प्रसाद वनारसे यांनी स्वतःचे आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचे धाडस असणाऱ्या आणि ज्यांच्या शांतपणाचाही दरारा वाटावा, ज्याचे समाजभान विलक्षण होते, अशा रंगकर्मींच्या जीवनप्रवासाचे हे कथन, मराठी संस्कृतीच्या, समाजाच्या, राजकीय-सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाविषयी भाष्य करणारे आहे, असे मत मांडले. त्यांनी जे सोसले, अनुभवले त्याचा परिणाम कलेवर आणि स्वतःमधील माणुसकीवर त्यांनी होऊ दिला नाही, असेही ते म्हणाले.

शब्दांकन करणारे प्रवीण जोशी म्हणाले, अनंतरावांना मी प्रत्यक्ष भेटलो नाही. पण ‘मी’पणा गळून पडलेल्या त्यांच्या आठवणी, नोंदी माझ्यासमोर आल्या. काही आठवणींचे निर्माल्य होत नाही, तशा त्या आठवणी वाटल्या. त्यातून न लिहिलेलेदेखिल दिसू लागले आणि पुस्तकाचा हा नाट्यरूप आकृतीबंध गवसला. त्यांच्या जगण्याच्या संवेदनेने हा फॉर्म दिला आणि मी यथाशक्ती त्या आठवणींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला.

नीलम शिर्के-सामंत म्हणाल्या, रंगभूमी, समाज, शिक्षणक्षेत्र यासाठी अनंतरावांनी जे कार्य उभारले, ते एका पुस्तकात मावणारे नाही. पण या पुस्तकाच्या निमित्ताने ते सर्वांसमोर येत आहे, हे महत्त्वाचे आहे.

डॉ. संपदा जोशी यांनी अनंतराव जोशी यांच्यातील नेतृत्वगुणांचा उल्लेख केला. शैक्षणिक क्षेत्रातील कार्य हा आमच्यातील समान धागा आहे. त्यांनी आयुष्याकडे पाहण्याचा अनुकरणीय दृष्टीकोन दिला, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘नाटकवाला’ या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन प्रवीण जोशी, मंजिरी जोशी, अंजली धारू यांनी सादर केले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश नांदूरकर यांनी आभार मानले.

कलावंतांनी उद्योजकीय मानसिकता घडवावी : चारुहास पंडित

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण विषयात शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकाने सतत शिकत राहून स्वत:ला समृद्ध करण्याची आज गरज आहे, असे सांगून सृजन आर्ट गॅलरीचे संचालक, सुप्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित यांनी आपला कला क्षेत्रातील प्रवास उलगडला.

‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन‌’ या विषयावर बालगंधर्व कलादालनात आज (दि. 13) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चारुहास पंडित बोलत होते. या चर्चासत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविद्याशाखेचे डीन डॉ. संजय तांबट, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील यांचा सहभाग होता.

शिक्षण, संस्कार कधीही वाया जात नाहीत. कलावंतांनी उद्योजकीय मानसिकता घडवावी असे सांगून चारुहास पंडित म्हणाले, प्रयोगशीलता आणि ज्ञानसंपादन यांची सुयोग्य सांगड घातल्यास उद्योजकता क्षेत्रात करिअरच्या संधी शोधत नवनिर्मितीचा आनंद घेत यशस्वी होता येते. वक्तृत्व, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, ध्येयप्राप्ती आणि व्यवस्थापन या क्षेत्रांचाही विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

डॉ. संजय तांबट म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील कृत्रिम भेद नष्ट करून विद्यार्थ्यांना जे आवडेल, रुचेल ते शिक्षण घेता यावे याकरिता नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. आज आपण शैक्षणिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहोत. अशा वेळी नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे कौशल्यविकास तसेच रोजगाराच्या संधींची उपलब्धता होईल.

अध्यक्षपदावरून बोलताना बाळ पाटील यांनी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्याची माहिती देऊन, व्यक्तीने सतत विकासाचा वेध घेत उत्क्रांत होत राहणे आवश्यक आहे, असे सांगितले. कौशल्य विकसित करणे हे पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदुला टोकेकर यांनी केले.

नवीन गोष्टी शिकण्याचे स्वातंत्र्य : डॉ. अरविंद शाळीग्राम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या रिसर्च पार्क फाऊंडेशनतर्फे‌‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि करियरच्या संधी‌’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात रिसर्च पार्क फाऊंडेशनचे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम,भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संचालक शारंगधर साठे यांचा सहभाग होता.
डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासावरच आधारलेले आहे. विद्यार्थ्याला ज्या-ज्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात त्या सर्व गोष्टी शिकण्याचे स्वातंत्र्य यामुळे मिळाले आहे. परिवर्तनशीलता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर आधारित शिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध वाटा दाखविणे शिक्षक व पालकांना सहजसाध्य होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची संरचनाही त्यांनी सांगितली.
शारंगधर साठे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी गुणवंत शिक्षक, पायाभूत सुविधा आणि साहित्य यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरण अद्याप पूर्णपणे अंमलात आलेले नसले तरी आजच्या शिक्षण प्रणालीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय उलगडून दाखविताना कलात्मक पद्धतीने शिकविणे, विषयाचे सखोल ज्ञान देणे आवश्यक आहे. माहितीचे रुपांतर ज्ञानात होण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ यांनी केले.

दिव्यांग, कर्णबधीर, दृष्टीबाधीत, अस्थिव्यंग, स्वमग्नतामोफत तपासणी, मोजणी शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहो़ळ यांचे आयोजन

पुणे – दिव्यांगांच्या गरजा समजून घेऊन, त्यांचं जीवन अधिक सुलभ आणि सशक्त ही समाजाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. दिव्यांगाची तपासणी करून त्यांना गरजेनुसार उपकरणे उपलब्ध करता यावीत यासाठी शिबीराचे आयोजन केले आहे. सोमवारपर्यंत (दि. १६) चालणाऱ्या या शिबिराची संकल्पना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची आहे. शिबिराचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठानने पुणे महानगरपालिका आणि अलिमको यांच्या सहकार्याने केले आहे. हे शिबीर दिव्यांगांबरोबच ज्येष्ठ नागरीकांसाठीही आहे.

या शिबीरात दिव्यांगा बरोबरच दृष्टीबाधित (लो व्हीजन), अस्थिव्यंग, स्वमग्नता आणि कर्णबधीर या सर्वांसाठी हे शिबीर आहे. त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या गरजेनुसार त्यांना उपकरणे तयार करून दिली जाणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी आधारकार्ड आणि युडीआयडी कार्डच्या झेरॉक्स प्रती, बीपीएल किंवा केशरी रेशन कार्ड ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीने गेल्या तीन वर्षात अलिमकाचा लाभ घेतलेला नसावा.

ज्येष्ठ नागरीकांसाठी आधारकार्डची झेरॉक्स. ज्येष्ठ नागरीक कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे. यातील ज्येष्ठ नागरीक कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेलेही ज्येष्ठ नागरीक या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. हे शिबीर सोमवार, दि. १६ जूनपर्यंत श्रीगणेश कला क्रिडा रंगमंदीर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, दिव्यांग, कर्णबधिर, अस्थिव्यंग, ऐकू कमी येणारे किंवा ज्यांना कमी दिसते असे सर्व नागरीक आपल्याच समाजाचाच भाग आहे. या नागरीकांना सुविधां, उपचारांचा आधार देऊन, त्यांचे जीवन सुलभ, सहज करणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळेच आमच्या संस्कृती प्रतिष्ठानने यात पुढाकार घेऊन दिव्यांग सहायता अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत दिव्यांगांची मोफत तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर दिव्यांग, कर्णबधीर, अस्थिव्यंग, स्वमग्न आजाराने पिडीत असलेले सर्व आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी आहे. पुणे महानगरपालिका आणि आलिमका या संस्थांच्या मदतीने दिव्यांगासह सर्वांना विश्वास मिळवून देण्याचा हा आमच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. या शिबिराचा सर्वांना लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो,”

सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली आता सरकार आल्यावर फसवणूक

मुंबई, दि. १४ जून २०२५
राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफीवर बोलताना नाना पटोले यांनी भाजपा युती सरकार व भाजपा नेत्यांचा समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे एक विधान करून शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. कर्जमाफीचे आश्वासन देताना भाजपाने समिती स्थापन करण्याची भाषा केली नव्हती. शेतकरी हा गरजूच आहे, कसलाही भेदभाव न करता त्याला कर्जमाफी दिली पाहिजे. भाजपा युती सरकार अदानीसाठी सर्व नियम बदलते, त्यांना सुविधा दिल्या जातात तर मग शेतकऱ्यांसाठीच नियम व अटी कशाला लावता? भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे, भाजपाच्या धोरणामुळेच शेतकरी पिचला आहे. निवडणुकीवेळी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले पण आता मात्र कर्जमाफी देण्यावरून सत्ताधारी पक्षातील नेते पळ काढत आहेत.

काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह यांनी ऐतिहासिक अशी ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. महाविकास आघाडी सरकारनेही कोणत्याही नियम, अटी न घालता सरसकट कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्याच्या पाठिशी उभे राहण्याची दानत काँग्रेस सरकारने नेहमीच दाखवली आहे परंतु भाजपा मात्र शेतकरीविरोधी आहे. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ३ हजार कोटी रुपयांचे वाढीव कंत्राट देताना सरकारकडे पैसे असतात पण शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र नसतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्याला कर्जाच्या जोखडातून मुक्त करावे, असेही नाना पटोले म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीसाठी समितीचा खेळ करू नका; तातडीने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा.

फडणवीस, शिंदे व अजित पवारांनी शेतकरी, भगिनी व जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, ते महागात पडेल.

मुंबई, दि. १४ जून २०२५
शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता अजित पवारांनी दमदाटी केली, ही दादागिरी चालणार नाही. तुम्ही जनतेचे सवेक आहात मालक नाहीत, याचे भान ठेवा. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा करता, आश्वासन देताना समितीची आठवण आली नाही का? राज्याची आर्थिक परिस्थिती दिसली नाही का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सकारकडे निधी नाही तर अदानी अंबानीसाठी लाखो करोडो रुपयांचा लाभ देण्यासाठी पैसा येतो कोठून? शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हटले की तिजोरीची आठवण येते का?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भाजपा युती सरकार हे फक्त अदानी अंबानीसाठी पायघड्या घालते पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सुरजागडच्या खदानीमधून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तीपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरु आहे. सत्तेतून मलाई खाता आणि शेतकरी व भगिनींना देण्यासाठी पैसे कसे नाहीत..असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे.

राज्य सरकारची तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीत जाऊन मोदी शहांकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, तेवढी तरी हिम्मत दाखवा. समितीचा खेळ करू नका व तातडीने शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या. शेतकरी, भगिनी व जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका ते महागात पडेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

समिती कशाला ? सरसकट कर्जमाफीची घोषणा करा : बाळासाहेब थोरात

मुंबई : बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थोरात म्हणाले, आज सरकारकडे लाखो कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा देखावा केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी समिती नाही, नियत लागते. या आगोदारही विविध आंदोलने दडपण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी केलेली आहे; पुढे त्याचे काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र, आता शेतकरी बांधव सरकारकडे लक्ष ठेऊन आहे, त्यांच्यासोबत धोका झाला, तर मात्र या सरकारची खैर नाही.
थोरात पुढे म्हणाले, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, फळबागा, कापूस, धान आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभरात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. दुसरीकडे बँकांकडून शेतीसाठी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. अशा वेळी, श्री. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. आज हे आंदोलन तत्वता: पुढे ढकललेले आहे. पुढील काही दिवस त्यांनी तब्येत जपावी आणि उपचारही घ्यावेत.
सरकारने फसवाफसवी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. कर्जमाफीशिवाय आता पर्याय नाही, काँग्रेस पक्षाची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे समितीचे सोहळे करण्याऐवजी सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी; अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक रोखणे कठीण होईल, असाही इशारा थोरात यांनी दिला आहे.

पुण्यातील ७४५ शाळांमध्ये मासिक पाळीदरम्यान आरोग्यासाठी उपक्रम सुरु करणार

पुणे, १३ जून २०२५: आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम उजासने आज सरकारसोबत दोन वर्षांचा
सामंजस्य करार (एमओयू) केल्याची घोषणा केली आहे. पुण्यातील शाळांमध्ये मासिक पाळीदरम्यानच्या
आरोग्याविषयी जागरूकता आणि प्रवेश सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे
विद्यार्थ्यांच्या व्यापक कल्याणाला प्रोत्साहन देखील मिळेल. मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्याला प्रोत्साहन
देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या दर्जेदार शिक्षणाच्या व्यापक दृष्टिकोनात योगदान देण्याचे या
भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढचे पाऊल उचलत, उजास मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्याविषयी जागरूकता
निर्माण करण्यासाठी पुणे सरकारच्या सहकार्याने एक उपक्रम सुरू करत आहे. १३ जिल्ह्यांमधील ७४५
शाळांमधील ७३,५९१ हून अधिक किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. शालेय आरोग्य
कार्यक्रमांमध्ये मासिक पाळी आरोग्य शिक्षणाचा समावेश करून आणि कम्युनिटी प्लॅटफॉर्म्सचा वापर करून,
या उपक्रमामध्ये उजासच्या पर्यावरणपूरक “हिरव्या” सॅनिटरी पॅडचे वितरण केले जाईल, गैरसमज दूर
करण्याचे, योग्य माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. शिक्षण आणि पोहोच दोन्ही वाढवण्यासाठी यामध्ये
सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलीला सॅनिटरी पॅडचे चार पॅकेट मिळतील. मासिक पाळीबद्दल माहितीची
देवाणघेवाण करणे सामान्य आहे हे सर्वांना समजावे यासाठी सेन्सिटायजेशन मॉड्यूलमध्ये मुलगे, शिक्षक
आणि समुदायांना सहभागी करून घेतले जाईल.
सरकारसोबतचे सहकार्य हे या भागामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणामध्ये मासिक
पाळीदरम्यानच्या आरोग्याचा समावेश करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उजास उपक्रम स्थानिक
प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs), शिक्षक आणि सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सक्रियपणे सहकार्य करत
आहे जेणेकरून कार्यशाळा, मुले आणि मुलींसाठी सेन्सिटायजेशन कार्यक्रम आणि शिक्षकांच्या नेतृत्वाखालील
उपक्रम राबविले जातील. विद्यार्थ्यांच्या व्यापक कल्याणासाठी नवीन शिक्षण धोरण (NEP) च्या वचनबद्धतेला
अनुसरून वर्तनामध्ये शाश्वत बदलाला प्रोत्साहन देणे हे या प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे.
२०२२ पासून, उजासने एकट्या पुणे जिल्ह्यातच लक्षणीय परिणाम साधला आहे, १,२५४ जागरूकता सत्रे
आयोजित केली आहेत आणि ४९,२९८ लाभार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे, ज्यामध्ये ४४,२९८ मुली, १,९२५
मुले, १९७ शिक्षक आणि २,८७८ महिलांचा समावेश आहे. या कालावधीत, शाळा आणि समुदाय सहभाग
उपक्रमांद्वारे ८ लाखांहून अधिक सॅनिटरी पॅड वितरित करण्यात आले, ज्यामध्ये उजासच्या ७०८ पर्यावरणपूरक
“ग्रीन” पॅडचा समावेश आहे.उजासच्या प्रमुख श्रीमती पूनम पाटकर म्हणाल्या, “मासिक पाळी आरोग्य हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित
एक प्रमुख मुद्दा आहे. मोकळा संवाद आणि सातत्यपूर्ण कृतीद्वारे त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांत, पुण्यातील आमच्या कामामुळे आम्हाला शाळा आणि समुदायांशी सखोलपणे संवाद साधता
आला आहे, स्ट्रक्चर्ड जागरूकता सत्रे आणि पॅड वितरणाद्वारे सुमारे ५०,००० व्यक्तींपर्यंत हा उपक्रम पोहोचला
आहे. या परिणामामुळे पुणे सरकारसोबतच्या आमच्या विस्तारित भागीदारीचा पाया मजबूत झाला आहे. या
सामंजस्य कराराद्वारे, आम्ही वंचित क्षेत्रांमध्ये आमची पोहोच वाढवण्याचे आणि आरोग्य कर्मचारी, शाळा
आणि किशोरवयीन मुलांसोबत काम करून पोहोच वाढवण्याचे आणि दृष्टिकोन बदलण्याचे आमचे उद्दिष्ट
आहे.”
पुण्यातील अलिकडच्या कार्यक्रमांच्या मूल्यांकनातून आढळून आले की उजासच्या हस्तक्षेपापूर्वी माहितीचा खूप
जास्त अभाव होता. उजासच्या अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून येते की केवळ ५७% विद्यार्थ्यांना
मासिक पाळी म्हणजे काय हे बरोबर माहित होते, ३१.४८% मुलींचा समज होता की मासिक पाळीतील रक्त
अशुद्ध असते, १९% पेक्षा कमी मुलींना मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता सामग्री किती वेळा बदलावी हे माहित
होते आणि फक्त ५०% विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता न बाळगल्यास होणाऱ्या आरोग्य
धोक्यांबद्दल माहिती होती. उजासच्या सहभागानंतर, या संख्येत लक्षणीय सुधारणा झाली, काहींमध्ये ५००%
पेक्षा जास्त वाढ झाली, ज्यामुळे मासिक पाळीबद्दलच्या दीर्घकाळापासून असलेल्या गैरसमज दूर करण्यात
सातत्यपूर्ण, स्थानिक शिक्षणाचा खोलवर परिणाम दिसून येतो.
२०२१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या उजासमध्ये मासिक पाळीच्या समस्या कमी करण्यासाठी आणि तरुण मुली
आणि महिलांना माहिती, उपलब्धता आणि आदर देऊन सक्षम करण्याची मोहीम चालवली जाते. हा उपक्रम
आधीच ५.९ लाखांहून अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे, ४.९ दशलक्षांहून अधिक सॅनिटरी पॅड वितरित केले
आहेत आणि १८,००० हून अधिक जागरूकता सत्रे आयोजित केली आहेत. त्यांच्या मेन्स्ट्रुअल हेल्थ एक्सप्रेस या
मोबाईल आउटरीच युनिटने २५ राज्ये आणि १०६ शहरांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी १०,००० किलोमीटरहून
अधिक प्रवास केला आहे.

इलेक्ट्रीकल वाहनांचे गैरसमज दूर होण्याची गरज-सिताराम कंदी

‘एमआयटी एडीटी’त ‘इ-मोबिलिटी’ उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन

  पुणेः इलेक्ट्रीकल वाहने भारतासह जगाचे भविष्य आहेत. परंतू, अद्यापही काही गैरसमज असल्याने लोक अपेक्षितरित्या इलेक्ट्रीकल वाहनांची खरेदी करत नाहीत. इलेक्ट्रीक चारचाकी वाहनांना चालविण्यासाठीचा खर्च इतर इंधनांपेक्षा अतिशय अल्प आहे. केवळ या वाहनांबद्दल आणि त्यांच्या बॅटरी आयुष्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याची गरज असून ते केल्यास भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्रमी विक्री होईल, असे मत टाटा मोटर्सचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सिताराम कंदी यांनी व्यक्त केले. 

एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे येथे यांत्रिक विभाग व इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्स (आयएसआयई) प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ-मोबिलिटी’मधील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, अवजड उद्योग मंत्रालयाचे उत्पादन क्षेत्राचे उपसचिव गौरव जोशी,कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव प्रा.डाॅ.महेश चोपडे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप, यांत्रिक विभाग प्रमुख डाॅ.सचिन पवार, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार, इव्ही कार्यक्रम संचालक प्रा.शशांक गावडे आदी उपस्थित होते.    यावेळी कंदी पुढे म्हणाले, टाटा मोटर्स आणि एमआयटी एडीटी यांच्यात अनेक वर्षांपासून सामंजस्य करार असून त्या अन्वये एमटेक इन ईव्ही टेक्नॉलॉजीची पहिली बॅच यंदा पास होवून बाहेर पडली याचा मनस्वी आनंद आहे. एमआयटी एडीटीच्या सहकार्यामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी असंख्य विद्यार्थ्याची भागीदारी टाटा मोटर्सला मिळत आहे.या प्रसंगी, जोशी यांनी भारत सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठातील हे इव्ही केंद्र सरकारचे उपक्रम तळापर्यंत पोचविण्यात व इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील संशोधनास वाव देण्यात अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले.विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.स्नेहा वाघटकर यांनी केले तर यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.विजयकुमार शेफ, प्रा.सतीश पाटील प्रा.नेहा झोप यांनी मेहनत घेतली.
इलेक्ट्रिक व्हेईकल्स शाखांमध्ये प्रवेश देणारे पहिले विद्यापीठ एमआयटी एडीटी हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे जिथे बी.टेक आणि एम.टेक इलेक्ट्रिक व्हेईकल्स या शाखांमध्ये अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे विद्यापीठ सध्या देशात ई-मोबिलिटी क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर असून, उद्योग व शिक्षण यामधील सेतू म्हणून कार्य करत आहे. सदर सेंटरमुळे विद्यार्थ्यांना इव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल्स), बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि ग्रीन टेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये थेट प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप्ससाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देणारे हे सेंटर, महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक व पर्यावरणीय विकासात मोलाचे योगदान देईल, असा विश्वास यावेळी बोलताना प्रा.डाॅ.सुनिता कराड यांनी व्यक्त केला.

एक्स रे टेक्नीशियनने केल्या घरफोड्या…पोलिसांनी जप्त केले ४८ तोळे सोने अर्धा किलो चांदी

पुणे-सलग २३ दिवस तपास करुन अंदाजे १७० सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक करुन त्याआधारे व तांत्रिक विश्लेषण करुन गोपनिय माहिती काढुन घरफोडी चोरी करणा-या एका एक्स रे टेक्नीशियन ला पकडून त्याच्याकडून ४८ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी व मोटार सायकल असा मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
दिनांक १७/०५/२०२५ रोजी ते दिनांक १८/०५/२०२५ रोजी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, गुन्हा रजि नं ४७७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३) (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार यांना नंबर प्लेट नसलेली एक यामाहा कंपनीची R15 संशयित मोटार सायकल मिळुन आली. सदर मोटार सायकलबाबत संशय आल्याने सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक केले असता सदर सी.सी.टि.व्ही. कॅमे-यामध्ये घरफोडी चोरी करणा-या आरोपीने सदर मोटार सायकलचा वापर केल्याचे समजले त्यानंतर सदर आरोपीचा सोलापुर, बार्शी, धाराशिव, भुम परांडा याठिकाणी शोध घेतला.
त्यानंतर दिनांक ११/०६/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि प्रविण काळुखे व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडील सपोनि सी बी बेरड व पोलीस अंमलदार तसेच घरफोडी/चैन-स्नॅचिंग पथकातील पोलीस अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना अंमलदार यांनी सलग २३ दिवस तपास करुन अंदाजे १७० सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक करुन त्याआधारे व तांत्रिक विश्लेषण करुन गोपनिय माहिती काढुन आरोपीचा शोध घेत असताना पथकास मिळालेल्या बातमीदारामार्फत सदरचा घरफोडी करणारा संशयित आरोपी यास गोडबोले वस्तीजवळ, मांजरी, पुणे येथे सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता रोहित विलास अंधारे, वय २५ वर्षे, धंदा -एक्स रे टेक्नीशियन, रा. मुळगाव भांडगाव, ता. परांडा, जि. धाराशिव, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे, असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने समांतर तपास करता त्याने मगरपट्टा सिटीतील फ्लॅटमध्ये चोरी करुन नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास करुन नमुद आरोपीकडुन एकुण ४३,५५,०००/- रु किं. चा ४८ तोळे वजनाचे सोन्याचे डायमंडचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी व मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे- १ गणेश इंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, सहा. पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड, व पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीपराठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, गणेश ढगे, इरफान पठाण, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, जहांगिर पठाण, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, गणेश लोखंडे, मनोज खरपुडे, गणेश गोसावी, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश खरात, दयानंद तेलंगे, नारायण बनकर, सुरेश जाधव यांनी केली आहे.