Home Blog Page 497

मोटार सायकल भाड्याने देण्याबाबत निर्बंध मागे

0

पुणे दि.17 :- महाराष्ट्र राज्यात रेंट ए मोटार सायकल स्किम 1997 अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठीचे अनुज्ञाप्ती देण्याबाबत घालण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

मोटार वाहन अधिनियम आणि रेंट ए मोटार सायकल स्किमअंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी अनुज्ञाप्ती देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. तथापि राज्य शासनाने 12 एप्रिल 2016 रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात रेंट ए मोटार सायकल स्किमअंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यात येणाऱ्या अनुज्ञाप्तीवर निर्बंध घालण्यात आले होते.

पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा-जिल्हाधिकारी

पुणे, दि. १७: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेली दुर्घटना आणि त्यात झालेले ४ पर्यटकांचा मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण संदीप गिल्ल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, आपत्ती व्यवस्थानाच्यादृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक तसेच अतिधोकादायक जुने पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके, रेल्वे पुलाचे येत्या 7 दिवसात बांधकाम तपासणी (स्ट्रॅक्चरल ऑडिट) करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा, परिक्षणात धोकादायक असलेले पुल, साकव, इमारती, वाडे, जाहिरात फलके काढून घ्यावेत, कार्यवाही करतांना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी,

जिल्ह्यातील धोकदायक ठिकाणांची पाहणी करुन जागा निश्चिती करावी. त्याची विविध माध्यमांद्वारे व्यापकस्वरुपात जनजागृती करावी. पावसाळ्यात धोकादायक नसलेल्या तथापि पाणी साचणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट करावे. पर्यटकांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने त्यांना धोकादायक पयर्टनस्थळी जाण्यास प्रतिबंधित करावे तसेच पर्यटनस्थळी व रस्त्यावर दिशादर्शक फलके लावावीत, याठिकाणी वन व्यवस्थापन समितीची मदत घ्यावी, आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्त करावी. धोकादायक ठिकाणी मॉकड्रील आयोजित करावे. तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवावेत.

मान्सून काळात संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेता पूरबाधित गावांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नदी पात्रातील पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. आपदा मित्रांना आवश्यतेप्रमाणे पायाभूत सूविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची कार्यशाळा आयोजित करावी. चांगले काम करणाऱ्या आपदा मित्रांना सन्मानित करावे.

आरोग्य विभागाने रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. गावातील रेनगेज स्टेशनची सद्यस्थिती पडताळून कार्यान्वित असल्याची खात्री करावी. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व जीवरक्षक पथकाची नियुक्ती करावी. महावितरणने वीजेचे खाब, रोहित्र, तारांची तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दरडप्रवण क्षेत्रातील गावातील नागरिकांना पूर्वसंकेत ओळखण्यासोबतच खबरदारीच्या उपाययोजनांबाबत स्थानिक प्रशासनाने माहिती द्यावी. संबंधित विभागाने जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी. आपत्तीच्या काळात नागरिकांना सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती द्यावी. जिल्ह्यात मागील काळात घडलेल्या घटनेच्यावेळी झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करावी, त्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात समावेश करावा.

येत्या काळात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे, यापार्श्वभूमीवर रत्याच्याकडेला असलेली अनाधिकृत जाहिरात फलके तसेच धोकदायक वृक्षे काढून घ्यावीत, सर्व रस्त्यांना बाजुला पट्टे भरुन घ्यावेत. रस्त्यावर वाहतूकीस होणाऱ्या अडथळा लवकरात लवकर करण्याची कार्यवाही करावी,असे निर्देश श्री. डुडी यांनी दिले.

श्री. पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यासोबत आपत्ती व्यवस्थापनाचेही नियोजन करावे. जिल्ह्यातील पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके आदींची संख्या विचार घेता स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्याकरीता पॅनेल तयार करुन त्यांच्याकडून स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्याबाबत विचार करावा. पावसाळ्यात अहिल्यानगर ते कल्याण महामार्गावर जिल्ह्यात अपघाताची संख्या तसेच नाणेघाट, जीवधन किल्ला, भीमाशंकर येणाऱ्या पर्यटकांची संख्या विचारात घेता उपाययोजना कराव्यात, असेही श्री.पाटील म्हणाले.

श्री. गिल्ल म्हणाले, जिल्ह्यातील धोकदायक ठिकाणांची पोलीस प्रशासनाच्यावतीने पाहणी करण्यात करुन जिल्हा प्रशासनासमवेत आवश्यतेप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहे. आवश्यतेनुसार आपदा मित्रांची संख्येत वाढ करण्यात यावी. स्थानिकांशी समन्वय साधण्याकरीता दर 15 दिवसांनी बैठकांचे आयोजन करावे, असेही श्री. गिल्ल म्हणाले.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, नगर परिषद, पुणे प पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महावितरण, वन विभाग, वन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भारतीय हवामान विभागासह सर्व संबंधित विभागांचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.

समाज सुधारण्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही महत्वाचे- जान्हवी धारीवाल बालन

पुणे- रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन द्वारा आयोजीत शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी , ५०१ मोतीबिंदूं रुग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रिया , वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, रक्तदान शिबीर व आर एम डी इंग्रजी शाळा कोंढवा, लोणीधामणी गाव , कासारी गाव , नवलेवाडी पिंपरी पेंढार या गावांमध्ये वृक्षारोपण असे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते .
कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभाताई आर धारीवाल उपाध्यक्षा,जान्हवी धारीवाल बालन अध्यक्षा आर एम डी फाऊंडेशन , नितीनभाई देसाई विश्वस्त एच व्ही देसाई आय हॉस्पिटल , इंद्राणी बालन फाऊंडेशन व बालन ग्रुप चे अध्यक्ष पुनीतदादा बालन , परवेझ बिलिमोरिया कार्यकारी संचालक तसेच रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग व शिकावू विध्यार्थी ,विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी , उपस्थित होते .
या प्रसंगी जान्हवी धारीवाल बालन यांनी श्री रसिकशेठ धारीवाल यांनी आर एम डी फाऊंडेशनची स्थापना करून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना यामध्ये मोफत गुजरात राज्यातील कॅन्सर हॉस्पिटल, ससून पुणे येथील सर्व सोयीयुक्त अपघात रुग्णालय , नाशिक येथील आर एम डी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , पूना हॉस्पिटल येथे कार्डीयाक कक्ष , तसेच शिक्षण क्षेत्रात फार्मसी , व्यवस्थापन , अभियांत्रिकी महाविद्यालय सोबतच इंग्रजी शाळांची स्थापना , हुशार व गरजू विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती , पर्यावरण क्षेत्रात खडवासला धरणाचा गाळ काढून पाण्याचा स्तर वाढविणे , शेकऱ्यांसाठी बंधारे बांधणे इत्यादी समाजपयोगी कामं केलीत . हे सर्व प्रकल्प आखतांना आई शोभाताई यांचा सिंहाचा वाटा असे अशी माहिती दिली . मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले . श्री पुनीत बालन यांनी समाजाचे ऋण फेडतांना कमाईतील वाटा समाजासाठी खर्च करणे हि सामाजिक जबाबदारी असून आज शोभाताईच्या जन्मदिनानिमित्त नक्कीच हॉस्पिटल च्या कार्यात आमचाही सहभाग असेल असे आश्वासन दिले.
त्यानंतर फाऊंडेशनद्वारा प्रायोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा धनादेश व शिष्यवृत्तीच्या विध्यार्थ्यांचे धनादेश वाटप करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .

भटक्या विमुक्तांनी आरक्षण व शासनाच्या योजना यांचा लाभ घेऊन स्वत:चे, कुटुंबाचे व समाजाचे सक्षमीकरण करावे…. डॉ.नीलम गोऱ्हे

भटके विमुक्त आदिवासी संयुक्त समितीच्या 65 अतिथिंची विधान भवनास सदिच्छा भेट

मुंबई दि. 17 जून, 2025 :- विधानभवन, मुंबई येथे भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या 65 सदस्यीय शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन विधीमंडळ कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती मुमताज शेख यांनी केले. त्यांचे संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्रातील सहभागी प्रतिनिधींचा सत्कार डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे हस्ते यावेळी करण्यात आला.याप्रसंगी बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सन 1992-1993 पासून भटक्या विमुक्तांसाठी केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. भटक्या विमुक्तांनी संविधानातून मिळालेले सर्व हक्क, मुलभूत सुविधा, आरक्षण, शिष्यवृत्ती व शासनाच्या लाडकी बहिणसारख्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चे, कुटुंबाचे व समाजाचे सक्षमीकरण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.निलेश मदाने, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी केले. कार्यक्रमास मुमताज शेख, श्रीमती ललीता धनवरे, ॲड.अरुन जाधव, शरद बराथे, उमा जाधव, विनोद पवार, भावना वाघमारे, स्वाती खंडागळे, पपिता माळवे, प्रिर्यदर्शनी जाधव, हजरत अली सोनीकर, रजनी पवार, बाबुसिंग पवार, अप्पाराव राठोड आदींची उपस्थिती लाभली.

कुंडमळा दुर्घटनेतील जखमींची अजित पवारांनी घेतली भेट:प्रकृतीची चौकशी करत डॉक्टरांशी साधला संवाद, 33 जणांना डिस्चार्ज

पुणे-मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दोन दिवसांपूर्वी धोकादायक पूल कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील जखमी रुग्णाची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पवना हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार सुनील शेळके व अधिकारी उपस्थित होते.


पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 40 ते 45 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यांना वाचवण्यात यश आले. सुमारे 38 जण जखमी झाले होते. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.जखमींची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा हलवण्यात आल्या आणि तिथे लोकांना कशा प्रकारे वाचवता येईल, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला. आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह इतर विभागांच्या टीमने यामध्ये जलद गतीने सगळ्या गोष्टी केल्यामुळे अनेकांना या संकटातून बाहेर काढू शकलो. अनेकांचा जीव वाचवू शकलो. परंतु, दुर्दैवाने चार जणांना प्राण गमवावे लागले, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी जखमींवरील उपचाराबाबत माहिती दिली. आयसीयूमध्ये 8 वेगवेगळ्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत. जनरल वॉर्डात 8 जणांवर उपचार सुरू आहेत. जवळपास 33 जणांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या 4 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. सध्या रुग्ण्यालया उपचार सुरू असलेल्या जखमींशी आम्ही बोललो. राज्य सरकारच्या वतीने ज्या काही गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या आहेत, त्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कुंडमळा येथील घटनेची आजच्या मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली. राज्यातील धोक्याचे पूल, लोकांना वापरण्यायोग्य नसलेल्या पुलांवर बोर्ड लावण्यापेक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली. बोर्ड लावल्यानंतरही काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर कुणी लक्ष देत नाहीत. बोर्ड बाजूला फेकून देतात. प्रशासनाचे कुणी ऐकत नाहीत. त्यामुळे धोकादायक पूल काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, कुंडमळा येथील दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांना जोडणारे लहान पूल तोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. तसेच यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेने केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिले आहेत.

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के  

पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बावधन येथील सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा (एसआयआयसीएस) निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे. नेहा लड्ढा हिने ८४.०४ टक्के मिळवून प्रथम, रितू चौधरी हिने ८३.५ टक्के मिळवत द्वितीय, तर परेश कुलकर्णी याने ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात सक्षम व्यावसायिक घडवण्यासाठी प्रात्यक्षिक ज्ञान आणि उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘सूर्यदत्त’मध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्यास कटिबद्ध आहोत. ही सातत्यपूर्ण कामगिरी सायबर आणि डिजिटल सायन्स या क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती व भविष्यकालीन शिक्षणप्रणालीप्रती ‘एसआयआयसीएस’च्या दृढ वचनबद्धतेची साक्ष आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात स्थापनेपासूनच ‘एसआयआयसीएस’ सायबर सुरक्षेच्या शिक्षणात अग्रेसर राहिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली सायबर आणि डिजिटल सायन्समध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या पहिल्या संस्थांपैकी एक आहे.”

संस्थेच्या यशाचे श्रेय तिच्या नवोन्मेषपूर्ण शैक्षणिक मॉडेलला जाते. जे वर्गखोलीतील शिक्षणासोबतच वास्तव जगातील अनुभवही विद्यार्थ्यांना प्रदान करते. या मॉडेलमध्ये जागतिक मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन प्रशिक्षण, नियमित औद्योगिक भेटी, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक व उद्योगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन आदी गोष्टींचा समावेश आहे. विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करून त्यांचा शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळेच यशाची ही शिखरे गाठता येत आहेत, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

‘एसआयआयसीएस’मध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ‘सायबर आणि डिजिटल सायन्स’ या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सध्या उद्योगक्षेत्रात विशेष कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची वाढती गरज लक्षात घेता, याच शैक्षणिक वर्षापासून ‘एसआयआयसीएस’मध्ये सायबर सिक्युरिटी या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू होणार आहे.

लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी अनुकूल शहर घडवण्याचा संकल्प.

पुणे: लहान मुलं आणि त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या पुणे महानगरपालिकेने Urban95 अंतर्गत Nurturing Neighbourhoods 2.0 या उपक्रमांतर्गत बहु-क्षेत्रीय समविचार बैठकीचे आयोजन केले. यावेळी पुणे शहराला लहान मुलं व पालकांसाठी अनुकूल शहर बनवण्याच्या दृष्टीकोनाचे अनावरण करण्यात आले आणि कुटुंब-मित्र सार्वजनिक जागांसाठी डिझाईन मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन करण्यात आले.

हा उपक्रम गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटी मिशन आणि वॅन लियर फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि WRI इंडिया यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. यामध्ये बाल्यावस्थेच्या आरोग्यपूर्ण विकासाला आणि पालकांच्या कल्याणाला चालना देणाऱ्या समावेशक आणि लहान मुलांसाठी अनुकूल शहरी जागा निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे.

पुणे शहरात प्रत्येक झोनमध्ये सुरक्षित, समावेशक आणि आकर्षक सार्वजनिक जागा व बालविकास केंद्रांमध्ये प्रवेश सुधारणे आणि वापरात नसलेल्या जागांचा पुनर्वापर करणे यावर भर देण्यात येत आहे. लहान मुलांचं आरोग्य त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि पालकांशी होणाऱ्या संवादावर अवलंबून असते हे लक्षात घेऊन, शहर लहान मुलांकरिता केंद्रित सार्वजनिक जागा तयार करत आहे आणि त्याचबरोबर पालकांच्या देखील गरजा पूर्ण करणाऱ्या सेवा सक्षम करत आहे.

पुढे जाऊन, पुणे शहरात लहान मुलं आणि पालकांच्या कल्याणाला संस्थात्मक रूप देण्याचा उद्देश असून, त्यासाठी सकारात्मक पालकत्व पद्धती प्रोत्साहित करणे, सामाजिक व वर्तनात्मक बदल घडवणे आणि सार्वजनिक जागा समावेशक व सुरक्षित बनवणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी डेटा-आधारित नियोजन, अधिकाऱ्यांचे व फील्ड वर्कर्सचे प्रशिक्षण आणि समुदाय, NGO आणि नागरी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. कार्यशाळेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या डिझाईन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे सार्वजनिक जागांचे डिझाईन आणि अंमलबजावणीसाठी तांत्रिक आधार मिळणार आहे.

शहराचे बाल विकास अधिकारी विविध विभागीय समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. या समविचार बैठकीत विविध भागधारकांनी एकत्र येऊन रणनीती ठरवल्या व शहराच्या एकत्रित दृष्टीकोनासाठी रोडमॅप तयार केला. ४० हून अधिक सहभागी सदस्यांनी सहभागी उपक्रमांतून पुणेला ‘कुटुंब-मित्र’ शहर बनवण्यासाठी स्वतःची भूमिका जाणून घेतली.

पृथ्वीराज बी.पी.आयएएस, अतिरिक्त महापालिका आयुक्त,(इ) पुणे महानगरपालिका म्हणाले, “पुणे हे लहान मुलं आणि पालकांना केंद्रस्थानी ठेवून शहरी विकासाकडे पाहणाऱ्या भारतातील अगदी मोजक्या शहरांपैकी एक आहे. पुणे किड्स फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांनी आम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि आता Nurturing Neighbourhoods 2.0 अंतर्गत हे उपक्रम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि संस्था पातळीवर रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही कार्यशाळा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याचे आणि मार्ग ठरवण्याचे एक उत्तम व्यासपीठ ठरली आहे.”

अनुष्री पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक, सस्टेनेबल सिटीज आणि ट्रान्सपोर्ट, WRI इंडिया म्हणाल्या, “ही कार्यशाळा पुण्यातील भागधारकांना सामाजिक व वर्तनात्मक बदलांसारख्या विविध उपाययोजनांची समज देण्यात उपयुक्त ठरली. सार्वजनिक जागांचा वापर लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबासाठी कसा वाढवता येईल हे ठरवण्यात मदत झाली. WRI इंडिया म्हणून आम्ही पुणे शहराला इतर शहरांसाठी आदर्श (Lighthouse) बनवण्यास पाठिंबा देत राहू. शहरांची रचना बाल्यावस्थेतील अनुभवांवर परिणाम करते यावर आमचा विश्वास आहे.”

आमिर पटेल, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, इंडिया, Urban95, Van Leer Foundation म्हणाले, “जीवनाची चांगली सुरुवात ही प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. त्यासाठी लहान मुलं व त्यांच्या पालकांचे आरोग्य व कल्याण महत्त्वाचे आहे. शहरांमध्ये अशी सेवा व कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत जे पालकांसाठी आधारभूत वातावरण तयार करतील. भारतात Urban95 व Nurturing Neighbourhoods 2.0 अंतर्गत आम्ही शहर प्रशासन, नेते व चॅम्पियन्सना स्थानिक गरजांनुसार उपाययोजना विकसित करण्यासाठी पाठिंबा देत आहोत. पुणे या दृष्टिकोनाला मुख्य प्रवाहात आणील आणि NN 2.0 च्या माध्यमातून इतर शहरांसाठी उदाहरण बनेल अशी मला आशा आहे.”

ही समविचार बैठक पुणे शहराच्या ‘कुटुंब-मित्र’ शहर बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शासकीय विभाग, नागरी संस्था आणि WRI इंडिया यासारख्या तांत्रिक भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुणे शहरात लहान मुलांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या उन्नतीसाठी उपयुक्त अशा जागा निश्चितपणे विकसित होतील.

सह्याद्रि रुग्णालयाच्या डेक्कन जिमखाना शाखेला इनॉक्सपा इंडियाकडून सीएसआर अनुदान

पुणे: पुण्यातील डेक्कन जिमखाना स्थित सह्याद्रि सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा
आता आणखी मजबूत झाल्या आहेत. इनॉक्सपा इंडिया या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत
(सीएसआर) रुग्णालयाला महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे भेट दिली आहेत. या योगदानामध्ये पल्स ऑक्सिमीटर, ईसीजी
मशीन, मॉनिटर २, सिरिंज पंप, एक्स-रे मशीन आणि एसीटी मशीन आदींचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे रुग्णांच्या
आजारांचे अचूक निदान करण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. रुग्णांची योग्य तपासणी करुन त्यांना आपातकालीन
परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठीही ती उपयुक्त ठरतील. या सहकार्यामुळे रुग्णालयाची सेवा अधिक प्रभावी व
आधुनिक होणार आहे.
डेक्कन जिमखाना परिसरातील सह्याद्रि सुपरस्पेशालिटी रुग्णालयात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला
इनॉक्सपा इंडिया कंपनीचे संचालक अरविंद मूडी, मुख्य वित्तीय अधिकारी अनिकेत कुंजीर, मानव संसाधन व
औद्योगिक संबंधाचे वरिष्ठ व्यवस्थापक हितेश परमार आदी मान्यवर उपस्थित होते. सह्याद्रि रुग्णालयाचे चीफ
लीगल अँड कॉम्प्लायन्स ऑफिसर, डॉ. अमितकुमार खातू आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टचे ट्रस्टी महेश
कुलकर्णी यांचीही या कार्यक्रमला उपस्थिती लाभली.
सीएसआर अंतर्गत मिळालेल्या उपकरणांच्या अनावरणाप्रसंगी इनॉक्सपा इंडियाचे संचालक अरविंद मूडी यांनी
सांगितले, ‘‘डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि रुग्णालयाच्या उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा मिशनमध्ये सीएसआर
उपक्रमांतर्गत आम्हांला सहभागी होता आले आहे. या सहभागाबद्दल आम्हांला खरंच अभिमान वाटतो. या सीएसआर
उपक्रमाद्वारे डॉक्टर आणि परिचारिकांना अधिक वेगाने प्रतिसाद देण्यासाठी, अचूक निदान करण्यासाठी आणि अधिक
समर्पित सेवा देण्यासाठी आवश्यक साधने उपल्ब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. डेक्कन जिमखाना येथील
सह्याद्रि रुग्णालय हे रुग्णांना आधुनिक आणि सहानुभूतीपूर्वक आरोग्यसेवा देण्याचे अतिशय प्रशंसनीय कार्य करत
आहेत. इनॉक्सपा कंपनीचा विश्वास आहे की, आरोग्य व्यवस्था बळकट करणे हे समाजाच्या सेवेसाठी केलेले सर्वात
महत्त्वाचे योगदान आहे.’’
डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि रुग्णालयाचे युनिट प्रमुख अभिनव जोशी यांनी आभार व्यक्त करताना सांगितले,
“इनॉक्सपा इंडियाकडून मिळालेली ही मदत अतिशय उपयुक्त आहे. ही प्रगत यंत्रसामग्री आमच्या कार्यक्षमतेत वाढ तर
करेलच, पण वेळेवर रुग्णांचे उपचार व त्यांच्या तब्येतीत सुधारणा करण्यासही मदत करेल.”
सह्याद्रि रुग्णालय इनॉक्सपा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल तसेच सुलभ, प्रगत आणि
सहानुभूतीपूर्ण आरोग्यसेवेच्या सामायिक दृष्टिकोनाबद्दल मनापासून आभार मानते.

इंटेरिओतर्फे कार्यालयांसाठी लवचिक कॅफे फर्निचर सोल्युशन्स

आर्थिक वर्ष 26 मध्ये इन्स्टिट्युशनल फर्निचर रेंजमध्ये 45 नवीन SKUs सादर करण्याची योजना ~

~ पुढील 2 वर्षांत 19% वार्षिक वाढीचे लक्ष्य ~

मुंबई: गोदरेज एन्टरप्राईजेस समूहाअंतर्गत भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँड्सपैकी एक असलेल्या इंटेरिओने आधुनिक कार्यालयांसाठी वर्कस्पेस फर्निचर मध्ये पेप अप कॅफे टेबल रेंज ही एक अभिनव गोष्ट सादर केली आहे. ही नवीन फर्निचर श्रेणी कार्यक्षमता, स्टाईल आणि एर्गोनॉमिक आराम यांचे एकत्रित मिश्रण असून आधुनिक कार्यालयांमध्ये छान, अनौपचारिक सहयोग जागा तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत आहे.

भारतातील विविधतेने भरलेल्या कार्यस्थळांच्या सतत बदलत्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेले पेप अप हे ब्रेकआऊट झोन्स, ऑफिस कॅफेज, लाऊंज एरियाज आणि मीटिंग कॉर्नर्ससाठी आदर्श ठरणारे विविध फॉर्म्स, रंग आणि फिनिशेसचे आकर्षक मिश्रण सादर करते. पॉड, रॉड आणि 4 लेग टेबल्स या तीन आधुनिक अंडरस्ट्रक्चर डिझाइन्समध्ये उपलब्ध असलेली ही रेंज आजच्या गतिशील आणि सहयोगात्मक कार्यसंस्कृतीस पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

या अभिनव संकल्पनेबद्दल बोलताना इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बीटूबी व्यवसाय प्रमुख  समीर जोशी म्हणाले, “इंटेरिओ मध्ये आम्ही मानवकेंद्री दृष्टिकोनातून उत्पादने तयार करतो आणि कार्यस्थळांसाठी लवचिक, सहजसुलभ उपाय सादर करतो. पेप-अप हे केवळ टेबल नाही. माणसांना एकत्र जोडणारे साधन आहे. हे कर्मचाऱ्यांना एकत्र आणते, सर्जनशील संवादास प्रोत्साहन देते आणि जिथे कल्पना फुलतात अशा उत्साही कोपऱ्यांची निर्मिती करते. या नवीन सादरीकरणासह लवचिक, टिकाऊ आणि उत्कट, अभिव्यक्त फर्निचर सादर करून आम्ही काम आणि विश्रांतीच्या जागांमधील सीमा मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. गोदरेज इंटेरिओचा संस्थात्मक फर्निचर व्यवसाय आर्थिक वर्ष 27 पर्यंत 19% ने वाढण्याची अपेक्षा आहे आणि पुढील दोन वर्षांत आम्ही इन्स्टिट्युशनल फर्निचर विभागामध्ये 45 पेक्षा अधिक नवीन SKUs सादर करण्याची योजना आखली आहे.”

तंत्रज्ञानातील प्रगती, आधुनिक वर्कस्पेस डिझाइन आणि नव्या कार्यालय सेटअप्समुळे आधुनिक भारतीय कार्यस्थळामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. कॉर्पोरेट कॅफेटेरियाज आता केवळ सोयीसाठी असलेल्या सुविधा न राहता कर्मचाऱ्यांचे समाधान होईल आणि त्यांची उत्पादकता वाढेल यादृष्टीने महत्त्वाचे साधन बनले आहेत. आता त्या केवळ झटपट जेवणासाठीच्या जागा न राहता, कर्मचाऱ्यांमध्ये समुदायभावना आणि कल्याण वृद्धिंगत करणारे केंद्रबिंदू ठरल्या आहेत. या जागा नेटवर्किंग आणि सहयोगाला प्रोत्साहन देतात. या अशा जागा आहेत जिथे कॉफीच्या कपासोबत  किंवा सामायिक जेवणाच्या वेळी मोकळेपणाने कल्पनांची देवाणघेवाण होते. कॅफेटेरियामधील  अनौपचारिक आणि आरामदायी वातावरण अर्थपूर्ण संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करते. त्यातून शेवटी सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.

पेप-अप रेंज पॉड, रॉड आणि 4-लेग या तीन वैशिष्ट्यपूर्ण अंडरस्ट्रक्चर डिझाइन्सच्या माध्यमातून चौरस, गोलाकार आणि आयताकृती अशा विविध आकारांमध्ये आणि सर्वसाधारण व ऊंच टेबल पर्यायांसह लवचिक इंटीरियर लेआउटसना पाठबळ देते. डायनिंग विभाग, ब्रेकआऊट जागा, वैयक्तिक चर्चा आणि प्रतीक्षा कक्ष अशा वेगवेगळ्या कामांसाठी विविध फ्लोअर प्लॅन आणि कार्यसंस्कृतींमध्ये हे फर्निचर सहजपणे सामावून जाते. वैविध्यपूर्ण रंग आणि साहित्य मिश्रणामध्ये, सॉलिड आणि वूड ग्रेन फिनिशेससह उपलब्ध असलेली ही टेबल्स आधुनिक भारतीय कार्यालयीन सौंदर्यशास्त्रात सहज मिसळतात, उच्च दर्जाची आणि तंत्रज्ञान-सुसंगत लवचिकता प्रदान करतात आणि समकालीन कार्यस्थळ जीवनशैलीला अधिक समृद्ध करतात.

पुण्यातील अप्पर खराडी येथे गोदरेज प्रॉपर्टीजने सुमारे 16 एकर जमीन विकत घेतली

खराडी-वाघोली पट्ट्यात या महिन्यातील कंपनीचे हे दुसरे भूसंपादन आहे. या दोन्ही प्रकल्पांमधून एकत्रितरित्या INR 7,300 कोटींचा महसूल निर्माण होईल असा अंदाज आहे.*

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL), (BSE स्क्रिप आयडी: GODREJPROP) ने पुण्यातील अप्पर खराडी येथे सुमारे 16 एकर जमीन विकसित करणार असल्याची घोषणा आज केली.

या जमिनीवर प्रामुख्याने प्रीमियम ग्रुप हाऊसिंग आणि हाय-स्ट्रीट रिटेल उभारले जाईल. प्रस्तावित प्रकल्पातून सुमारे 2.5 दशलक्ष चौरस फूट भाग विकासासाठी मिळेल, असा अंदाज असून यातून सुमारे 3,100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.*

मार्केटच्या दृष्टीने हा भूखंड अत्यंत मोक्याच्या जागी, खराडी-वाघोलीच्या मायक्रो बाजारपेठेत आहे. यामुळे प्रमुख व्यावसायिक सेंटर्ससोबत चांगली कनेक्टिव्हिटी आहे. तसेच विमान नगर, मगरपट्टा आणि हडपसर अशा आयटी हबच्या अगदी जवळ आहे. याचबरोबर इथे आसपास शाळा, रुग्णालये, मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि प्रीमियम हॉटेल्स अशा सामाजिक सुविधा देखील चिकार आहेत. ज्यामुळे घर खरेदीदारांसाठी या भागाचे आकर्षण जास्त वाढते.

गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, येथील पायाभूत सुविधा आणि मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे अपर खराडी हे पुण्यातील सर्वात विकसित रिअल इस्टेट कॉरिडॉर म्हणून वेगाने विकसित होत आहे. सूक्ष्म बाजारपेठेतील हे आमचे दुसरे भूसंपादन आहेजे या क्षेत्राची वाढती मागणी आणि संपूर्ण भारतातील उच्च-संभाव्य शहरी क्लस्टर्समध्ये विस्तार करण्याची आमची वचनबद्धता दोन्ही प्रतिबिंबित करते. विचारपूर्वक डिझाइन आणि भविष्यासाठी विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवत याला एक दीर्घकालीन मूल्य मिळेल तसेच रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा करेल.

आरआर काबिलच्या रोशनी (RRoshani) उपक्रमातर्फे पुण्यातील 3,000 शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा

पुणे – आरआर काबिल या कंपनीच्या “रोशनी”(RRoshani) या उपक्रमाने अलिकडेच पुणे शहरातील दोन शाळांमध्ये
विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची पावले
उचलली. विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत त्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती
उंचावणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्वच्छ पाण्याला प्राधान्य देऊन, हा प्रकल्प आरोग्यपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण
करत असून विद्यार्थ्यांना अधिक चांगले आरोग्य आणि शैक्षणिक अनुभव मिळावेत यासाठी चालना देत आहे.
निरंजन सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने “रोशनी”(RRoshani) टीमने पुण्यातील नवीन मराठी शाळा आणि मुक्तांगण शाळा
येथे आरओ (RO) पाण्याची शुद्धीकरण यंत्रे बसवली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आता दररोज 3,000 हून अधिक
विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. त्यामुळे शाळांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत सुधारणा झाली आहे.
आरआर काबिलच्या संचालिका किर्ती काबरा म्हणाल्या, “स्वच्छ पाणी ही केवळ मूलभूत गरज नाही, तर तो प्रत्येकाचा हक्क
आहे असे आरआर काबिल मध्ये आम्ही मानतो. “रोशनी”(RRoshani) उपक्रमाद्वारे आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि
स्वास्थ्य यामध्ये हातभार लावता येत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. या उपक्रमामुळे त्यांना सुरक्षित आणि सहायक
शैक्षणिक वातावरणात पुढे जाण्याची संधी मिळते.”

राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत “रोशनी”(RRoshani) चा हा उपक्रम आरोग्य, स्वच्छता व शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये
सुधारणा करतो आहे. जलजन्य आजारांमध्ये घट, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ आणि शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये
सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आरआर काबिल फाऊंडेशनच्या “रोशनी”(RRoshani) उपक्रमामार्फत देशात शिक्षण,
आरोग्य, शाश्वतता आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत प्रभावी प्रकल्प राबवण्यात येत आहेत.

तुषार रंजनकर यांना रोटरी क्लबतर्फे’वोकेशनल एक्सलन्स अवार्ड’ प्रदान

पुणे: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेतर्फे विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांना पहिला ‘वोकेशनल एक्सलन्स अवार्ड’ प्रदान करण्यात आला. प्रसंगी सौ. मीनल रंजनकर, ‘रोटरी’चे नियोजित प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष कमलेश कार्ले, माजी अध्यक्ष दिपक शहा, व्होकेशनल डायरेक्टर संजय अडसूळ, प्रमोद दराडे, समितीचे विश्वस्त, कार्यकर्ते, मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यपालन अधिकारी दुर्गेश पवार, रोटरी क्लबचे सदस्य आदी उपस्थित होते.

तुषार रंजनकर म्हणाले, “रोटरी क्लबतर्फे मिळालेला ‘व्होकेशनल एक्सलन्स’ हा पुरस्कार भारावणारा आहे. माझ्या जडणघडणीत समितीचा मोलाचा वाटा असून, मित्र परिवार, कुटुंबियांचे संपूर्ण सहकार्य मिळाल्यामुळे काही विधायक कामे करू शकलो. समितीच्या कार्याला, सहकाऱ्यांना व समितीशी संबंधित कार्यकर्त्यांना हा पुरस्कार समर्पित करतो. व्यक्तिमत्व विकास साधून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे समितीचे ध्येय आहे. समिती, अल्फाबाईट संस्थेमार्फत होत असलेल्या कार्याची ही पोचपावती आहे.”

संतोष मराठे म्हणाले, “समितीचे संस्थापक अच्युतराव आपटे आणि माझ्या वडिलांचे स्नेहाचे संबंध होते. या ऋणानुबंधांना पुन्हा उजाळा मिळाला. रोटरी क्लब गेल्या १०० वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत आहे. समाजासाठी झटणाऱ्या आदर्श व्यक्तींचा सन्मान करून इतरांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ‘रोटरी’च्या वतीने दिले जाणारे पुरस्कार महत्वपूर्ण ठरतात.”

कमलेश कार्ले म्हणाले, “ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यात तुषार रंजनकर यांनी गेल्या तीस वर्षांपासून स्वत:ला वाहून घेतले आहे. शिक्षण, सामाजिक कार्यात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.” प्रमोद दराडे यांनी आभार मानले.

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्तदोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजनयुवा, ज्येष्ठ कलाकारांना ऐकण्याची संधी

पुणे : ‌‘माझे विद्यार्थी हेच माझा बँक बॅलन्स‌’ असे म्हणणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसीय विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात युवा कलाकारांसह ज्येष्ठ कलाकारांना ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 21 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आणि रविवार, दि. 22 जून रोजी सकाळी 9 आणि सायंकाळी 5:30 या वेळात पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आणि पंडित विनायक तोरवी यांचे शिष्य सिद्धार्थ बेलामनू यांचे गायन होणार आहे. त्यापूर्वी प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफित दाखविली जाणार आहे.
रविवारी सकाळी 9 वाजता सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मभूषण एन. राजम्‌‍ यांची नात रागिणी शंकर यांचे व्हायोलिन वादन तर विख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. सायंकाळी प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
कलाकारांना भरत कामत, प्रणव गुरव, तनय रेगे, आशय कुलकर्णी, अभिजित बारटक्के (तबला), सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी, अविनाश दिघे (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जोशी, सचिव ललिता दातार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई अभिवादन सोहळा

पुणे : कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे बुधवार, दि. 18 जून रोजी रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिरासमोर कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यास सकाळी 9 वाजता पुणे महापालिकेचे आयुक्त, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष गिरीश शेवडे आणि भापचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर पुष्पहार अर्पण करणार आहेत. या प्रसंगी मॉडर्न हायस्कूलमधील 350 विद्यार्थिनींच्या घोषपथकाचे वादन होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष हरी मुणगेकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण, तर उपाध्यक्षपदी ॲड. ज्ञानेश्वर नरवडे यांची निवड झाली आहे. संस्थेच्या ‘ज्ञानमंदिर’ सभागृहात नुकत्याच झालेल्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५-२६ या वर्षाकरिता नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये ॲड. कैलास काशीद, सीएमए नवनाथ नलवडे, उमेश दांगट, ॲड. प्रणव शेठ, सीए योगेश इंगळे, सुभाष घोडके, सीए परीक्षित औरंगाबादकर, मिलिंद हेंद्रे, नेहा नाणेकर यांचा, तर स्वीकृत सदस्य म्हणून अश्विनी बिडकर व विनोद रहाते यांचा समावेश आहे.

यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष ॲड. प्रसाद देशपांडे, माजी अध्यक्ष ॲड. नरेंद्र सोनावणे, सीएमए श्रीपाद बेदरकर, सीएमए बी. एम. शर्मा, प्रकाश पटवर्धन, मनोज चितळीकर, ॲड भारत डिंबले, संतोष शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी ‘एमटीपीए मेरुमणी’ पुरस्काराने सीएमए श्रीपाद बेदरकर यांना, तर ‘एमटीपीए कोहिनुर’ पुरस्काराने सीएमए प्रकाश रिझवानी, अनिल चव्हाण, संतोष सहर्म व अनिल वखारिया यांना सन्मानित करण्यात आले. कृतज्ञता सन्मान सीए मिलिंद काळे यांना प्रदान करण्यात आला.

कर सल्लागार संस्था आपल्या कार्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. दोन हजाराहून अधिक मान्यवर सभासद आहेत. संस्थेकडून सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल आदींना कर रचनेतील विविध बदल याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबत सरकारच्या विविध योजनांचा प्रसार केला जातो. संस्थेचे हे कार्य नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ॲड. अनुरुद्र चव्हाण यांनी नमूद केले.

कर सल्लागार संस्थेने गेल्या वर्षात राबवलेल्या उपक्रमाविषयी, तसेच विविध मान्यवर संस्थांशी झालेल्या सामंजस्य करार, प्राप्तिकर, जीएसटी यावर विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ज्ञान अमृत कुंभ राष्ट्रीय परिषद व अन्य कार्यक्रमाचा आढावा घेतला. सर्व सहकाऱ्यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना ॲड. प्रसाद देशपांडे यांनी व्यक्त केल्या. ॲड. प्रणव शेठ व ॲड. ज्ञानेश्वर नरवडे यांनी सूत्रसंचालन केले.