Home Blog Page 496

‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी

0

दुसऱ्या आठवड्यात विकेण्डला जमवला १.६५ कोटींचा गल्ला!

(SHARAD LONKAR)

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.

वर्ड ऑफ माऊथ, दमदार अभिनय, वास्तवाशी नाते सांगणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘जारण’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने या कथेला भावनिक उंची मिळाली असून, त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर दोघींच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीमुळे चित्रपटगृहात शोज वाढवले जात आहेत आणि प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. कथानकातील सत्यता, भावनांची खोली, आणि उत्तम सादरीकरण यामुळे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ सारखा संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर सादर केला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचा खूप आनंद होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांनी कथा आणि सादरीकरणाचं कौतुक केलं, हे एखाद्या दिग्दर्शकासाठी अत्यंत समाधानकारक आहे. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शाबासकी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देते.”

निर्माता अमोल भगत म्हणाला , “ चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहून मन भरून येते. थिएटर्समध्ये वाढणारे शो, बॉक्स ऑफिसवर वाढती आकडेवारी, आणि सोशल मीडियावरचा सकारात्मक प्रतिसाद हे सर्व पाहाता खरच खूप आनंद होतो. हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे आहे.“

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’चे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.

ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर – महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत आहे. ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही त्यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढणे तसेच त्यांच्या आरोग्य समस्या, बालविवाह, महिला अत्याचार याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा. समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बीडसह मराठवाडयातील अनेक जिल्हयात ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात, त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमा अंतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलेसाठी त्याच समुहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे, आरोग्य मित्र ऊसतोड महिलेला येणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबात गावातील आशासेविका तसेच अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल. यातून ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना आरोग्याच्या सेवा तत्परतेने देणे शक्य होणार आहे, ही अभिनव संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी व्यक्त केला.

ऊसतोड महिलांनी गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबतही श्रीमती चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना सहकार विभागाने आरोग्यासह त्यांना आवश्यक सोईसुविधा देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यंत्रणेला दिले.

आरोग्याच्या उपसचिव डॉ. बैनाडे म्हणाल्या, महिलांना आरोग्यासह सर्व सुविधा मिळतात की नाही, याबाबत महिनानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित होण्याची गरज असून बीड जिल्हयातील गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबत त्यांनी सबंधित यंत्रणेकडून माहिती जाणून घेतली. स्वंयसेवी संस्थांना सोबत घेत चांगले काम करूया, असे त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, जनजागृती, प्रशिक्षण व तपासणी या तीनही बाबीवर आपले काम सुरू आहे. सर्व विभागांनी महिलांच्या अडचणीवर समन्वयाने काम केले तर निश्चित महिलांच्या अडचणी मार्गी लागतात, असे ते म्हणाले.

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ऊसतोड महिलांसाठी नव्याने सुरू केलेल्या आरोग्य मित्र या उपक्रमाबाबत माहिती दिली. महिलांना ‘आरोग्य मित्र’ उपक्रमातून निश्चितपणे मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

विभागीय महिला व बालविकास उपायुक्त रेश्मा चिमंद्रे यांनी विभागातील महिला विषयक उपक्रमाबाबत माहिती दिली.

यावेळी सामाजिक चर्चेत सामजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिला, सामजिक संस्थांच्या प्रतिनिधी महिला तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वरंधा घाट मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद


पुणे – पुण्याहून भोरमार्गे कोकणात, विशेषतः महाडकडे जाणाऱ्या वरंधा घाट मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी वरंधा घाट मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर, मुसळधार पावसाच्या दिवसांत हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूकही बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पावसाळ्यात वरंधा घाटात दरवर्षी दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, रस्ते खचणे आणि माती वाहून जाणे अशा घटना घडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघातांची शक्यता वाढते. यंदा घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला असून, वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘सजना’.. निरागस प्रेमकथा…जी क्षणात विश्वासघाताच्या ठिणगीने सुडाच्या आगीत भडकते

‘सजना’ हा मराठी चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे ‘सजना’ चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील मनोरंजनशी संबंधित विविध चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.
या ट्रेलरच्या माध्यमातून सजना चित्रपटाची एक खास झलक समोर येते. सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येणारे संघर्ष, मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सारं काही संपलं आहे, तेव्हाच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते जी प्रेक्षकांचे मन सुन्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.
‘सजना’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत धोत्रे यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही धोत्रे यांचेच आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनली आहेत.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या भली मोठी

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

भद्रावती नगरपरिषदेच्या ११ माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश

मुंबई, ता. १७ जून २०२५

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आज पुणे जिल्हा काँग्रेस प्रदेश सचिव सोनाली मारणे, नगरसेवक राहुल तुपेरे, काँग्रेस शहर सरचिटणीस किरण मारणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल पवार, गिऱीष जैवळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगर परिषदेतील माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता गेडाम, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभा पारखी, शीतल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निबांळकर आणि प्रदीप वडाळकर या ११ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. धाराशीवमधील सोमनाथ गुट्टे, आप्पासाहेब बिराजदार, शंकर चव्हाण, नागनाथ कदम, इलाई शेख, शहाजी हाके यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्याचे उबाठा उपजिल्हाप्रमुख शंकर दर्जी, नगरसेवक गणेश वडनेरे, मनोज बोरसे, राहुल टीभे, गोविंद मोरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

वरोरा नगरपरिषदेचे दिनेश यादव, प्रणाली मेश्राम, सुषमा भोयर आणि किशोर टिकले या ४ माजी नगरसेवकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातील सरपंच गोविंद कुळमेथे, सुचिता ठाकरे, उमेश दातारकर, माजी सरपंच विठ्ठल जोगी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वरोरा तालुका उबाठा शहरप्रमुख संदीप मेश्राम, उबाठा विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, उपाध्यक्ष धरमसिंह ठाकूर, राष्ट्रीय संघटक ठाकूर नेमसिंह सिसोदिया, मेवाड एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन सिंघवी यांनी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्यामसिंह ठाकूर यांची राजस्थान राज्य मुख्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

मध्यप्रदेशातील जबलपूरचे उबाठा उपराज्यप्रमुख शैलेंद्र बारी, विदिशा जिल्हा प्रमुख विजेंद्र लोधी, जबलपूर जिल्हा प्रमुख सुजित पटेल, नगर प्रमुख मुकेश सारठे, इंदोरमधील जावेद खान, अभिषेक कालरा, सुरेश गुर्जर, राजीव चतुर्वेदी यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन पुढे घेऊन चाललोय. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या दिशेनं नेण्याचे काम केले. त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या. या राज्यातील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. त्यामुळे ८० जागा लढवून ६० जागांवर विजय मिळवला. महायुतीने २३२ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत येत आहेत कारण दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करते, असे ते म्हणाले. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, त्यामुळे दररोज विविध पक्षाचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, जनतेचे आशीर्वाद आणि वाढलेल्या बळाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन यावेळी केले.

काँग्रेसला जोर का झटका :वसंतदादा पाटलांच्या नातसून जयश्री पाटील यांचा आज भाजप प्रवेश

सांगली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वसंतदादा पाटील यांच्या नातसून तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि प्रभावी नेत्या जयश्री पाटील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. सांगलीच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या विजयाच्या गणितात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

जयश्री पाटील या दिवंगत मंत्री मदन पाटील यांची पत्नी आहेत. मदन पाटील हे काँग्रेसचे प्रभावशाली नेते होते. तसेच त्या वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील आहेत. पाटील घराण्याचा महाराष्ट्रात साठ‑सत्तरच्या दशकात मोठा राजकीय दबदबा होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी यशस्वी काम केले आहे. ज्यामुळे त्या स्थानिक स्तरावर सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यांचे माहेर ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना सांगलीसाठी उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि बंडखोरी केली. या बंडासाठी काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे मन वळवता आले नाही. किंवा काँग्रेसने त्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, आता हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जयश्री पाटील या गेली दोन दशके काँग्रेसमध्ये सक्रीय होत्या. महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात बळकट संपर्क साधला होता. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस पक्षासाठी त्या प्रभावशाली वक्त्या, संघटक आणि महिला मतदारांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून जयश्री पाटील या काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज होत्या. अनेक वेळा त्यांनी पक्षश्रेष्ठींना कार्य पद्धतीतील त्रुटींविषयी सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या मतांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. त्यामुळे देखील त्या नाराज होत्या. त्याच वेळी, भाजपकडून त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आला होता. भाजपकडून सांगली जिल्ह्यात महिला नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांचा प्रवेश भाजपसाठी मोठी संधी आहे.गेल्या काही वर्षांपासून भाजपने महिला मतदारांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणे, स्थानिक महिला नेतृत्वाला संधी देणे आणि सामाजिक योजनांच्या माध्यमातून संवाद वाढवणे याचा समावेश आहे. जयश्री पाटील यांचा प्रवेश या धोरणाला बळकटी देणारा आहे.

बुधवार पेठेत कात्रजच्या अक्काकडून वेश्या व्यवसायाच्या आडुन मॅफेड्रॉन (एम.डी.) तस्करी

पुणे-बुधवार पेठेत कात्रजच्या अक्काकडून वेश्या व्यवसायाच्या आडुन मॅफेड्रॉन (एम.डी.) तस्करी होत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’दि.१७/०६/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, म. पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड व स्टाफ असे फरासखाना पोस्टे गु.र.नं.११८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) २९ या गुन्हयाचा तपास करीत असताना गुन्हयातील अटक आरोपी शरणप्पा नागाप्पा कटिमणी, वय ३४ वर्षे, रा. आप्पा दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे. मुळ रा. मु.पो. भापर गल्ली, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक याने गुन्हयातील मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ त्याची बहिण ज्योती सुनिल यादव ऊर्फ कटटीमनी वय ५० वर्षे रा. कात्रज, पुणे हिच्याकडुन विक्री करीता पुरवल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. तसेच सदर महिला आरोपी ही नमुद गुन्हयातील मुख्य सुत्रधार असुन तीच मागील दोन वर्षा पासुन बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व येणाऱ्या गि-हाईकांना मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करते. सदर महिला आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्तअमितेश कुमार, पोलीस सह. आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, म.पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड व पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदिप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे, यांनी केली आहे.

कॉंग्रेसच्या सोनाली मारणेंसह पुण्यातील विविध पक्षातील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

पुणे- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, तसेच माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या

या भव्य प्रवेशाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व इतर संघटनांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच घडवून आणले. यामध्ये विशेषतः पिंपरी-चिंचवड, धानोरी-लोहगाव, कोथरूड व खडकवासला परिसरातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे या वेळी म्हणाले की, “एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णायक, विकासाभिमुख नेतृत्वामुळे पुणेकरांचा शिवसेनेवरचा विश्वास वाढत आहे. पुणे शहरातील विविध पक्षांच्या संघटनांतून पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रवेशाचा निश्चितच मोठा राजकीय फायदा होईल.”

यावेळी सोनाली मारणे – प्रदेश सचिव, काँग्रेस,गिरीश जैवळ – अध्यक्ष, धानोरी-लोहगाव रेसिडेन्शियल सोसायटी,प्रसन्न पाटील – उपाध्यक्ष धानोरी-लोहगाव रेसिडेन्शियल सोसायटी,आप्पा साठे – वरिष्ठ उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), पिंपरी-चिंचवड,राहुल तुपेरे – माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),किरण मारणे – शहर सरचिटणीस, काँग्रेस,प्रमोद बारहाते – अर्बन सेल, राष्ट्रवादी शरद पवार गट,भक्ती गाऱ्हे – अध्यक्ष, सांस्कृतिक सेल, राष्ट्रवादी शरद पवार गट,ओंकार जाधव, मंगलताई पवार, मीनलताई धनवटे, आकाश कुसाळकर, हुसेन चांद्रपहेली – राष्ट्रवादी शरद पवार गट,सारिका जगताप, रेणुका कामन्ना मदार, प्रियंका स्वप्निल चव्हाण, सारिका चोरघडे – महिला विभाग उपाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट,लक्ष्मीकांत गोनेकर – उपाध्यक्ष, राष्ट्रवादी,संदीप मुरारीलाल शर्मा – सचिव, काँग्रेस पुणे शहर,अनिरुद्ध मुरमट्टी – सरचिटणीस, राष्ट्रवादी,शिल्पा तिकोने – काँग्रेस, खडकवासला,अक्षय साठे, प्रथमेश धुमाळ, मंदार मारणे, मनोज पांडे, राजीव सिंग, संतोष पाटोळे, धनराज मुलमे, निलेश धनवटे आदींचा यामध्ये समावेश आहे.

या प्रवेशामुळे पुणे शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीत अधिक आक्रमक आणि प्रभावी ताकदीनिशी उतरू शकेल असेही त्यांनी सांगितले.

मंत्री आशिष शेलार यांनी उद्घाटन केलेला गोरेगाव चित्रनगरीतील स्टुडिओ देखील लागला गळायला … !

चित्रनगरीच्या उप अभियंता विजय बापट यांची चौकशीची मागणी..

मुंबई दि. १७ :

मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओना भर पावसात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे स्टुडिओच्या मालमतेचे नुकसान झाले आहे. स्टुडिओच्या बांधकाम आणि नूतनीकरण कामात गैरकारभार झाल्याच्या आरोप करीत या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रॅटीक ) चे मुंबई प्रदेश सरचिटणीस विशाल नावकर यांनी केली आहे. येत्या २ जुलै रोजी चित्रनगरीवर मोर्चाही काढण्यात येईल, असा इशारा नावकर यांनी दिला आहे.

गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरीत स्टुडिओ क्रमांक ८,९,१०,११ आणि १२ या स्टुडिओच्या देखभाल दुरुस्ती व नुतणीकरण कामे ठेकेदार कंपनीकडून करून घेण्याची जबाबदारी विजय बापट उप अभियंता (स्थापत्य) यांची होती. परंतु, त्यांनी दुरुस्तीचे कामे त्यांच्या मर्जीतील ठेकेदार कंपनीला देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतली. ही कामे शासनाच्या मापदंडप्रमाणे झालेली नसून अंदाज पत्रकातील तरतुदीना डावलण्यात आले आहे. त्यामुळेच या कामात गलथानपणा झाला असून काही महिन्यातच गळती सुरू झाल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रॅटीक )चे मुंबई प्रदेश सरचिटणीस विशाल नावकर यांनी माध्यमांना सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मंगळवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत केली.

स्टुडिओच्या छतावर नवीन पत्रे बसवण्याची तरतूद अंदाज पत्रकात असतानाही छतावर पत्रे न बसवता छतावरचे जुने पत्रे काढून त्याच पत्रांना रंग देऊन छतावर बसवून काम पूर्ण झाले असे दाखवून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच स्टुडिओचे २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आले. या नवीन स्टुडिओत भर पावसात पाणी घुसल्यामुळे स्टुडिओचे काम निकृष्ट दर्जाचे झाले हे सिध्द होते. या गळतीमुळे येथील सामुग्रीचे नुकसान झाले आहे.

तसेच चित्रनगरीत हॉस्पिटल बिल्डींगच्या दुरुस्तीच्या कामाचे टेंडर महामंडळाकडून काढण्यात आले होते. या कामाची ई-निविदा प्रसिध्द झाल्यानंतर पात्र ठेकेदार कंपन्यांनी कामाचे टेंडर अंदाजपत्रकिय किंमतीच्या तरतुदीपेक्षा कमी दराने भरलेली असताना पात्र ठेकेदार कंपन्याना डावलुन विजय बापट उप अभियंता यांनी प्रिंटेरिअर कंपनीला हॉस्पिटल बिल्डिंगचे काम संगनमताने मिळवून दिले. यांची चौकशी होणे गरजेचे असलयाचे सांगत येत्या २ जुलै रोजी चित्रनगरीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा परिषदेत देण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते इम्रान मनसुरी, अवल शहा, भीमराव वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वारकरी संख्येचा अंदाज घेऊन चोख नियोजन करा’-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

  • ⁠मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसह घेतला तयारीचा आढावा

    पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या वारकरी, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा शतकानुशतके अविभाज्य भाग असणारे पालखी सोहळे येत्या शुक्रवारी शहरात दाखल होत असून परंपरेनुसार पालख्यांचा दोन दिवस मुक्काम पुण्यात असणार आहे. यावेळी वारकऱ्यांची संख्या आणि पावसाची शक्यता गृहित धरूनच सर्व चोख नियोजन प्रशासनाने करावे. तसेच पावसाबाबत हवामान खात्याशी समन्वय ठेवावा, अशा सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालखी मार्गांची पाहणीदरम्यान प्रशासनाला दिल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी चौकातून पालखी मार्गांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करत फुलेनगर विसावा, संगमवाडी चौक, पाटील ईस्टेट चौक, सीओईपी परिसर, श्री निवडुंगा विठोबा मंदिर आणि भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भेट देत पाहणी केली. प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या सोयी सुविधा, सुरक्षेसाठीचा बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार, वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्यासह पालखी मार्गावर असेलेले स्थानिक नगरसेवक, भाजपासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पाहणीदरम्यान वारकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा आढावा घेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच स्वच्छतेची व्यवस्था चोख ठेवावी. शिवाय आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेबाबतही काही महत्वाच्या मुद्द्यांवर सूचना केल्या’.

‘शुक्रवार आणि शनिवारी शहरातील पार्किंगची व्यवस्था, वाहतूक करण्यात येणारे बदल, पालखी मार्गांची आणि रविवारी प्रस्थान मार्गावरील वाहतूक व्यवस्था, याबाबत सखोल माहिती घेतली. कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यंदाच्या वारीच्या नियोजनाच्या केंद्रस्थानी संभाव्य पाऊस ठेवा असे सूचित केले. तसेच पावसाबाबत हवामान खात्याशीही संपर्क ठेवा’, अशीही सूचना केली.

दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का ?: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. १७ जून २०२५
भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने पक्षप्रवेश दिला. आता भाजपा दाऊदला पक्षात प्रवेश देणार का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोणाला पक्षप्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपाला राहिले नाही. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती असा गंभीर आरोप केला. पार्टीत नाचतानाचे त्याचे फोटो विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली होती आणि आता मात्र त्यांनी हिंदुत्व मान्य केले, त्यांचे स्वागतच आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ उद्या दाऊदला पक्षप्रवेश देऊन त्याने हिंदुत्व मान्य केले असेच म्हणणार का? भाजपा हा ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणवतो पण आज या पक्षात गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा भरणा झाला आहे. मुंबईतील ११९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी व दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी भाजपा सत्तेत भागिदारी करतो. प्रफुल्ल पटेलांना वॅाशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ करतो. भाजपाचे हिंदुत्व बेगडी आहे, हे आम्ही सातत्याने सांगतो तेच आजही दिसले असेही सपकाळ म्हणाले.
सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांनाही दुपार पर्यंत माहित नव्हते. पण पक्ष प्रवेशाला यावे लागले यावरून भाजपा पक्ष नक्की कोण चालवतो, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

आधी लिंग भेद आता धर्म भेद म्हणत शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विरोधात तृप्ती देसाई आक्रमक

पुणे : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून हटवल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आवाज उठवला असून, याला थेट धर्मभेद ठरवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानने आधी लिंगभेद आणि आता धर्मभेद केला असे म्हणत तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. ही केवळ धार्मिक भावना दुखावणारी कृती नाही, तर संविधानाच्या मूल्यांनाही काळिमा फासणारी असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही निशाणा साधला.अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये एकून 114 मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यांच्याविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, अशी मागणी भाजप आध्यत्मिक आघाडी सह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे आघाडीवर होते. हे कर्मचारी जर देवस्थान ट्रस्टने काढून टाकले नाही तर त्यांच्या विरोधात मोठ आंदोलन उभारण्याचा इशारा या संघटनेने दिला होता.या आंदोलनाचा धसका घेत देवस्थान ट्रस्ट 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह इतर 167 कर्मचाऱ्यांना कामात अनियमितता असल्याचं कारण देत रात्रीत नारळ दिलं. सुरुवातीला शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथ्यावर महिलांना बंदी असल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. लिंगभेद करणाऱ्या या देवस्थान ट्रस्टच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मोठ आंदोलन उभारलं होतं. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनानंतर देवस्थाने आपला निर्णय मागे घेत चौथर्‍यावर महिलांना पूजा करण्यास परवानगी दिली याची इतिहासात नोंद झाली .

नेमक्या काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने आधी लिंगभेद केला. आम्हाला त्या विरोधात आंदोलन कराव लागले. स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार आहेत, या दोघांनाही शनिशिंगणापूर देवस्थानाच्या चौथऱ्यावर पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी आम्हाला आंदोलन कराव लागले आणि ते आंदोलन यशस्वी झाले. आधी लिंगभेद केला आणि आता धर्मभेद केला जात आहे. जे मुस्लिम कर्मचारी आहेत, त्यांनी हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये साफसफाई केली नाही पाहिजे, अशी मागणी काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांची होती. त्यांना घाबरून विश्वस्त मंडळाने 167 कर्मचारी कामावरून काढले. त्यापैकी 114 कर्मचारी हे मुस्लिम आहेत. या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.

ट्रस्टने दिलेले अनियमिततेचे कारण धादांत खोटे आहे. जर मुस्लिम धर्मातील काही लोक शनिशिंगणापूर या ठिकाणी सेवा करत असतील, तर हे खूप मोठे चांगले उदाहरण आहे. हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. उद्या मुस्लिम दर्ग्यामध्ये हिंदू धर्माचे लोक घेतले जात नाहीत, हे म्हणण्यापेक्षा आमच्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये सगळ्या धर्माच्या कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते, अशा पद्धतीचा स्टॅंड घेणे गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

अजितदादा संग्राम जगतापला आवर घाला

तृप्ती देसाई यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावरही आगपखाड केली. संग्राम जगताप हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अजितदादा वारंवार सांगतात मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे. जर अजित पवारांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे असतील, तर त्यांचा एक आमदार वारंवार व्हिडिओ टाकत आहे, धमक्या देत आहेत. वारंवार सांगतात की, आम्ही मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकू आता शिर्डीत जाऊन सुद्धा हेच करू. अजितदादा तुम्ही या संग्राम जगतापला आवर घाला. तुमची जी विचारसरणी आहे त्याचाच अपमान करण्याचे काम हे संग्राम जगताप करत आहेत, असे देसाई म्हणाल्या.

धर्मादाय आयुक्त, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

कुठल्याही जाती धर्माचे कर्मचारी असतात. त्यांना बेरोजगार करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. यापेक्षा संग्राम जगताप यांनी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये जे बनावट ऍप प्रकरण झाले, ते उचलून धरावे, असा सल्ला तृप्ती देसाई यांनी संग्राम जगतापांना दिला.तसेच यासंदर्भात देवस्थान ट्रस्टची तक्रार मी धर्मादाय आयुक्तांकडे करणार आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालण्याचे सांगून जे कर्मचारी काढून टाकले आहेत त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे देसाई यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये एकून 114 मुस्लिम कर्मचारी नोकरीला होते. त्यांच्याविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, अशी मागणी भाजप आध्यत्मिक आघाडी सह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे आघाडीवर होते. हे कर्मचारी जर देवस्थान ट्रस्टने काढून टाकले नाही तर त्यांच्या विरोधात मोठ आंदोलन उभारण्याचा इशारा या संघटनेने दिला होता. या दबावामुळेच देवस्थान ट्रस्टने कामात अनियमितता असल्याचे कारण दाखवत 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह इतर 167 कर्मचाऱ्यांना रात्रीतून कामावरून काढले.

कात्रज घाट परिसरातून तिघांना अटक:देशी बनावटीची तीन पिस्तुले, नऊ जिवंत काडतुसांसह दोन सराईत व एक अल्पवयीन ताब्यात

पुणे-बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सराईत दाेन आराेपींना पोलिसांनी कात्रज घाट परिसरात अटक केली असून त्यांचा एक अल्पवयीन साथीदार ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित आराेपी यांच्याकडून देशी बनावटीचे तीन पिस्तुले, दोन रिकाम्या मॅगझीन, नऊ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अनिकेत संजय मालपोटे (वय -२२, रा. सुतारदरा, कोथरूड,पुणे), निखील मुकेश तुसाम (वय -१९, रा. केळेवाडी, कोथरूड,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन अाराेपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अाराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज घाट परिसरात जगजीत इंजिनिअरिंग श्री लक्ष्मी गॅरेजजवळ दुचाकीस्वार मालपोटे, तुसाम आणि अल्पवयीन साथीदार संशयितरित्या थांबलेले असून, ते गंभीर गु्न्हा करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा देखील असल्याची माहिती पाेलीस तपास पथकाला मिळाली हाेती. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस शिपाई कृष्णा म्हस्के, सौरभ साळवे यांनी ही कामगिरी केली.

मालपोटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विराेधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहे. त्याने पिस्तूल नेमके कोठून आणले, तसेच त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने पाेलीसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली अाहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश माेकाशी याबाबत पुढील तपास करत आहेत.

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असल्यास संबंधितांवर कारवाई

भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची ग्वाही
संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी
मुंबई, १७ जून २०२५
: मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी व्यक्तींसोबत महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ,अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल,अशी ग्वाहीही श्री.चव्हाण यांनी दिली
श्री. चव्हाण यांनी सांगितले की , कुंडमळा नदीवरील जोडरस्त्यासह नवीन पूलाच्या बांधकामासाठी जुलै, २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ८ कोटी रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर २०२४ विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. दरम्यानच्या काळात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता व पूलाचे डिझाईन अंतिम करण्यात आले. मावळ तालुक्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर शेतकरी व लोकहितासाठी आपण तात्काळ ८ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या नवीन पूलास प्रशासकीय मंजूरी दिल्याचे पत्र ११ जुलै, २०२४ रोजी दिले होते. बांधकाम विभागातर्फे या पुलाच्या दुरुस्तीचा कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, एका वर्षात काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या असे असताना पुढील प्रक्रियेला हेतुपूर्वक विलंब लावला गेला असेल तर त्याची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाईही होईल, असेही श्री.चव्हाण यांनी नमूद केले .

अर्थसंकल्प कसा वाचावा याचे पुस्तक राऊतांना भेट देऊ
अर्थसंकल्प कसा वाचायचा याची ढोबळ माहितीही राज्यसभा खासदार असलेल्या संजय राऊत यांना नसल्याचे त्यांनी केलेल्या टीकेवरून दिसत आहे . या पुलाच्या कामासंदर्भात श्री. राऊत यांनी केलेल्या आरोपांची कीव येते. अर्थसंकल्पात आकडे हजारात असतात . त्या हिशोबानुसार या पुलाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली होती . हे खासदार असलेल्या राऊत यांना कळत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलेले ‘अर्थसंकल्प – सोप्या भाषेत ’ हे पुस्तक श्री. राऊत यांना भाजपा तर्फे भेट देऊ अशी मिश्किल पुस्तीही त्यांनी जोडली.

फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी केली जात असताना, दुसरीकडे राजकीय वर्तुळात देखील धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी झालेल्या सत्ताधारी भाजपमधील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका वर्तुळात मुरलेला पैलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या एका व्हॉट्सॲप स्टेट्समुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

“पुणेकरांचं नेतृत्व दमदार, गणेश बिडकर विकासाचे शिलेदार” असा आशय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बिडकर यांचा फोटो असणारे हे पोस्टर खुद्द गणेश बिडकर यांनीच आपल्या स्टेटसला ठेवले आहे. कार्यकर्त्यांनी देखील लागलीच सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास बिडकर यांच्याकडे प्रमुख पद येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. नुकतेच शहराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर पक्ष नेतृत्वाने त्यांना महापालिकेच्या सत्तेतील महत्त्वाचे पद देण्याची कमिटमेंट केल्याची चर्चा आहे.मध्यंतरी एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश बिडकर यांच्याकडे महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. याबद्दल भाजपकडून अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सध्या पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या घडामोडींमध्ये बिडकर यांची महत्त्वाची भूमिका दिसत आहे. महापालिका निवडणुकांमध्ये काम करण्याचा अनुभव, मतदार याद्यांपासून ते प्रभाग रचनेपर्यंत असणारा अभ्यास, ग्राउंड मॅनेजमेंटमध्ये तगडी पकड या बिडकर यांच्या जमेच्या बाजू आहेत.

2017 साली महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील भाजपने बिडकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली होती. यानंतर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत सदस्याला सभागृह नेते पद मिळाले ते बिडकर यांना. आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतील पक्ष रणनीतीमध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका दिसत आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा सत्ता मिळाल्यास बिडकर हे महत्त्वाच्या पदावर असतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. आजचे त्यांचे स्टेट्स हे याचेच द्योतक असल्याचं दिसत आहे.