Home Blog Page 495

संत तुकारामांच्या पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुका पूजन, देहूत वारकऱ्यांचा मेळा

नेहले पे देहला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधोर मोहोळ यांच्यासोबत फुगडी खेळली.


पुणे -जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. देहू गावापासून निघालेल्या या पालखीत विठ्ठल-रखुमाईच्या भेटीची ओढ असणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा समावेश आहे.
संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संत तुकारामांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर तुकोबांची पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे,आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, येथील मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर वारकऱ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकोबांचे नामस्मरण केले जात होते. श्री संत तुकाराम महाराज संस्थानने यंदाच्या सोहळ्यासाठी 3 बैलजोड्या खरेदी केल्या आहेत.

पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यातप्रमुख दिंड्याच्या उपस्थित व वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात, गरुड, टक्के यांच्या समवेत सायंकाळी 5 वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी 6.30 वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते पादुका पूजन होत असताना पोलिसांनी वारकऱ्यांच्या दिंड्या काहीवेळ रोखून धरल्या होत्या. यामुळे वारकरी चांगलेच संतप्त झाले. त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या घटनेची पुष्टी करत दिंड्या थांबवण्याचे कारण सांगितले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी ज्या प्रकारे सुव्यवस्था ठेवली पाहिजे, त्याच प्रकारे ठेवली आहे. एकावेळी सर्वांना सोडले तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती. त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. वारकरी हा शिस्तप्रिय आहे. त्यामुळे तो अर्धा तास थांबावे लागले काय किंवा तासभर थांबले काय अशा गोष्टींची चिंता करत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी काही वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याचेही दिसून आले.

मुख्यमंत्र्यांजवळ पडला ड्रोनआजपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करणारा एक ड्रोन मुख्य प्रवेशद्वाराजवळ पडला. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अवघ्या 5-10 फुटांवर पडला. सुदैवाने त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला.

  • 18 जून- देहूतून प्रस्थान
  • 19 जून- आकुर्डी
  • 20 जून- नाना पेठ, पुणे
  • 21 जून- निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे
  • 22 जून- लोनी काळभोर
  • 23 जून- यवत
  • 24 जून- वरवंड
  • 25 जून- उंडवडी गवळ्याची
  • 26 जून- बारामती
  • 27 जून- सणसर
  • 28 जून- निमगाव केतकी
  • 29 जून- इंदापूर
  • 30 जून- सराटी
  • 1 जुलै- अकलूज
  • 2 जुलै बोरगाव श्रीपूर
  • 3 जुलै- पिराची करौली
  • 4 जुलै- वाखरी
  • 5 जुलै- पंढरपूर

पालखीच्या मार्गात कुठे काय

  • बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
  • काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण
  • इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण
  • सराटी येथे पादुकांना नीरास्नान
  • अकलूज येथे तिसरे गोल रिंगण
  • माळीनगर येथे पहिले उभे रिंगण
  • तोंडले बोंडले येथे धावा
  • बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण
  • वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण
  • यंदा पालखी रथाच्या पुढे 27 व मागे 370 दिंड्या सहभागी होणार

चऱ्होलीची नगर रचना योजना रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे, दि. 18: पिंपरी चिंचवड हे वाढते शहर असून त्याचा विकास सुनियोजितरित्या होण्यासाठी शहराचा उत्तम आराखडा करा आणि पुढच्या पिढीचा विचार करून आगामी ५० वर्षाचे नियोजन व्हावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहराचे नियोजन करत असतांना जनतेला विश्वासात घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागणीनुसार चऱ्होलीची नगर रचना योजना रद्द करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या शब्दात भागवत धर्माचे तत्वज्ञान आणि आपला वैश्विक विचार आपल्यापर्यंत पोहोचविला. त्यामुळेच माऊलीच्या पालखीत लाखो वारकरी सहभागी होतात. संत नामदेव महाराजांनी ही परंपरा आपल्यापर्यंत अभंगाच्या माध्यमातून पोहोचविताना भागवत धर्मातील हा विचार पंजाबपर्यंत पोहोचविला. शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेव महाराजांचे विचार समाविष्ट आहेत. ज्यांनी भागवत धर्माला उंची दिली अशा दोन संतश्रेष्ठाच्या भेटीचे शिल्प महानगरपालिकेने उभारले आहे. वारकरी संप्रदायात प्रत्येक जण एकमेकांना माऊली समजतो, ईश्वराचे रूप समजतो, हाच भाव या शिल्पात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपला वैश्विक विचार जगाला साद घालणारा
जगाला साद घालणारा आणि दिशा देणारा असा आपला वैश्विक विचार आहे. एका पिढीने दुसऱ्याला दिल्याने तो टिकून आहे. जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत विचार आहे, आणि सूर्य-चंद्र असेपर्यंत वारी आहे. या विचाराच्या प्रसारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुंदर संतपीठ तयार केले. सीबीएसई अभ्यासक्रमासोबत हा विचार पोहोचविण्याचे कार्य संतपीठाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे संतपिठाच्या विस्तारासाठी आराखडे, नियोजन केल्यास त्याच्यापाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील.

नदीमध्ये जाणाऱ्या १०० टक्के पाण्यावर प्रक्रियेसाठी प्रयत्नशील
इंद्रायणी नदी निर्मळ करण्यासाठी नदीमध्ये जाणारे १०० टक्के पाणी प्रक्रिया केलेले असेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून इंद्रायणीचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अमृत योजनेंतर्गत दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू होत आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले. महापालिकेचे विकास प्रकल्प नागरिकांसाठी उपयुक्त असून खेळाडू तयार करणारी पिढी घडावी यासाठी महापालिकेने उभारलेली क्लायबिंग वॉल उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माणुसकी या धर्मानुसार पोलीसांचे काम
पोलीस आयुक्तालयाने दोन चांगल्या प्रणाली सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात आधाराची गरज असते, कोणीतरी पाठीशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे. अनेकदा ज्येष्ठांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असते. माणुसकी हा खरा धर्म म्हणून पोलीस काम करतात. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाने तयार केलेले ‘ज्येष्ठानुबंध’ हे ॲप ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त ठरेल. पुणे, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी वाहतुकीच्या नियमनासाठी ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून त्यात एआयचा समावेश असलेल्या प्रणाली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस दल सज्ज होत असून नागरिकांसाठी चांगली यंत्रणा उभी रहात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आमदार श्री. लांडगे म्हणाले, राज्य शासनाने सहकार्य केल्याने पिंपरी चिंचवड परिसरात पोलीस आयुक्तालयाची आणि महानगरपालिकेची विकासकामे वेगाने होत आहेत. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या परिसराच्या विकासाला विशेष गती दिल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधता येईल. २२ हजार नागरिकांनी आतापर्यंत हे ॲप डाउनलोड केले असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘ट्रॅफिक बडी’ व्हाट्सअप प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक नियमनात नागरिकांचे सहकार्य होईल. आतापर्यंत ३०० नागरिकांनी ‘ट्रॅफिक बडी’ म्हणून नोंदणी केली आहे. पोलिसांविषयी आदर आणि विश्वास निर्माण करणाऱ्या या दोन प्रणाली असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त श्री. सिंह यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, मुखमंत्री महोदयांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येत आहे. पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी क्लायबिंग वॉल उभारण्यात आली असून हा प्रकल्प देशातील उत्तम केंद्रापैकी एक असेल. विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. तसेच या प्रकल्पांविषयी चित्रफीत दाखविण्यात आली.

विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रभाग क्र. १६ मध्ये मुकाई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्किमपर्यंत एक्सप्रेस हायवे लगतचा १२ मीटर डी.पी. सर्विस रस्ता विकसित करणे (भाग १ व भाग २), बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते एक्सप्रेस हायवेपर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील १८ मीटर डी.पी. रस्ता विकसित करणे, प्रभाग क्र. १६ विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण करून विकसित करणे, गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपिंग पद्धतीने विकसित करण्याच्या कामाचा भुमिपूजन तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संत मदर टेरेसा उड्डाणपूलावरून चिंचवड बाजूकडे उतरण्यास व चढण्यास बांधण्यात आलेल्या लूप, रॅम्प, पवना नदीवर थेरगाव प्र. क्र. ५० मध्ये प्रसुनधाम शेजारी १८ मीटर डी.पी. रस्त्यावरील उभारण्यात आलेल्या थेरगाव-चिंचवड पूल, अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या चिखली (१२ एमएलडी) व पिंपळे निलख (१५ एमएलडी) क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्प, पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी उभारण्यात आलेल्या क्लायबिंग वॉल, प्रभाग क्र. ४ दिघी येथे आरक्षण क्र. २/१२२ येथे बांधलेल्या शाळा इमारत, प्रभाग क्र. ३ चऱ्होली येथील चोविसावाडी येथील अग्निशमन केंद्र इमारत, भोसरी येथील प्रभाग क्र. ७, आरक्षण क्र. ४३० येथील प्राथमिक शाळा इमारत, थेरगाव व भोसरी रुग्णालयाचे मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग, प्रभागाचे लोकार्पण करण्यासह क्र. ५ मधील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

हरित ऊर्जा क्षेत्रात ७ लाखांवर रोजगाराच्या संधीमुळे ‘सौर’ कौशल्य विकास प्रशिक्षणाला वेग देणे गरजेचे-महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र

मुंबई, १८ जून २०२५राज्यात प्रामुख्याने सौर ऊर्जेमुळे पारंपरिक ऊर्जेच्या परिवर्तनाचा वेग वाढला आहे. येत्या पाच वर्षांत वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेत आणखी ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेची राज्यात भर पडणार आहे. यासह सौर ऊर्जेच्या विविध योजनांमुळे हरित ऊर्जेच्या क्षेत्रात सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक तसेच सात लाखांवर रोजगारांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळासाठी बेरोजगार महिला व युवकांना प्रशिक्षण देणे व त्याचा वेग वाढवत नेणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नाशिक येथे बुधवारी (दि. १८) व्यक्त केले.

       महाराष्ट्र सौर कौशल्य कार्यक्रम अंतर्गत महावितरण, आशियाई विकास बँक व मिटकॉन यांच्या संयुक्त सहकार्याने एकलहरे (नाशिक) येथील मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रामध्ये सौर कौशल्य प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे यांची उपस्थिती होती.

महावितरणमध्ये शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) असलेल्या ५७ युवतींना या प्रशिक्षणात प्रथम संधी देण्यात आली आहे. सहा दिवसीय प्रशिक्षणात त्यांना प्रामुख्याने सौर पॅनेल बसवणे, दुरुस्ती करणे, नियमित देखभाल व इतर प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधला. सौर कौशल्य प्रशिक्षणाच्या राज्यातील पहिल्या तुकडीमध्ये सर्वच प्रशिक्षणार्थी म्हणून महिलांना संधी देण्यात आली याचा त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. भविष्यात हरित ऊर्जेची गुंतवणूक व रोजगाराच्या संधी वेगाने वाढत जाणार आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी आशियाई विकास बँक, महावितरण व मिटकॉन यांचा संयुक्त प्रशिक्षणाची योजना अतिशय स्वागतार्ह आहे असे त्यांनी सांगितले.

श्री. लोकेश चंद्र म्हणाले, राज्यात विजेची स्थापित क्षमता सध्या ३६ हजार मेगावॅट आहे. त्यात सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. यात सौर ऊर्जेचा सर्वाधिक वाटा राहणार आहे. जगातील सर्वांत मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून पूर्णत्वास जात आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेद्वारे दिवसा वीजपुरवठा मिळविण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. यासोबतच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप आदीमुळे सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.

संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरणकडून पहिल्या टप्प्यात ४ हजार जणांना सौर कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात किमान ३० टक्के महिला प्रशिक्षणार्थींचे प्रमाण असेल असे नियोजन आहे. सोबतच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना सौर कौशल्य प्रशिक्षण देण्यास वेग देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशियाई बँकेचे सल्लागार श्री. प्रद्योत मुखर्जी यांनी केले. मिटकॉनचे उपाध्यक्ष श्री. अभय कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) श्री. अरविंद भादिकर, मुख्य अभियंता श्री. सुंदर लटपटे, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सौ. शिल्पा फसे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन,पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीमती सुनेत्राताई पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे,आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.
विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली.

महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

संतपीठाचे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील:मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; पंढरपूर, आळंदीच्या संतपीठाला मदत करण्याची ग्वाही

पुणे-आपली संस्कृती, संतांचे विचार, परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र टाळगाव, चिखली येथे वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन व सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे, चिंतन समिती, संतपीठ समितीचे पदाधिकारी तसेच पालक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. संत परंपरा जपण्याचे काम संतपीठात होणार आहे. या ठिकाणाला वैश्विक स्वरुप देण्याचे काम करण्यात आले असून येथे संपूर्ण संतसाहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षणही याठिकाणी देण्यात येणार आहे.

ते म्हणाले, संतपीठाने तयार केलेल्या यापुढील संकल्प आराखड्यानुसार पंढरपूर व आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला महाराष्ट्र शासन पूर्णपणे मदत करेल. सगळ्या ठिकाणचे संतपीठ एकमेकांना पूरक बनविण्यात येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्याचा मार्ग खुला केला असून मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा व अर्थकारणाची भाषा बनविण्याचे दालन खुले केले आहे. हे धोरण महाराष्ट्र शासनाने स्वीकारले असून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. इतर भारतीय भाषेचा तिरस्कार करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

संतपीठाचे संचालक डॉ. मोरे म्हणाले, संत परंपरा जपणारी शाळा स्थापन करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. संतांचे विचार या संतपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम होणार आहे. विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी संतपीठाचा मोलाचा सहभाग असेल. संतपीठ समितीच्या यापुढील संकल्पास शासनाने आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ चिखली येथे संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष, संत सोनबा ठाकूर पखवाज कक्ष, पंडीत अरविंद मुळगावकर तबला कक्ष तसेच आलीजाबहाद्दर ह.भ.प. महादजी शिंदे सभागृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत चालू वर्षात सुमारे १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

राज ठाकरेंचा दोन भाषांचा आग्रह चुकीचा:CM फडणवीस म्हणाले – देशात 3 भाषांचे सूत्र असेल

तिसरी भाषा हिंदी म्हणूनची अनिवार्यता काढली, तिसरी भाषा कोणतीही ऐच्छिक असेल

पुणे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते आज बुधवारी पिंपरी चिंचवड येथील संतपीठाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप जोरकसपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत. तिसरी भाषा असू नये. मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपीमध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशभरात 3 भाषांचे सूत्र असेल, तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी संपूर्ण देशासाठी आहे. तामिळनाडूने 3 भाषांच्या सूत्राला सु्प्रीम कोर्टात आव्हान दिले. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.

ते पुढे म्हणाले, आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे? आपल्या भाषेला डावलण्यात आले असेल तर वेगळी गोष्ट? पण आपली भाषा शिकत असताना आपली मुले दुसरी एखादी भाषा अजून शिकत असतील, तर त्या भाषेतील ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषेचा आग्रह चुकीचा आहे. एनईपी केंद्र सरकारने एकट्याने तयार केली नाही. देशभरातील तज्ज्ञांनी मिळून ती तयार केली. ती करत असताना मुलांचा मेंदू कसा विकसित होतो, आदी बाबींचा सखोल विचार करण्यात आला. हे धोरण तयार करताना 3 वर्षे चर्चा झाली. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यानंतर 3 भाषेचे सूत्र स्वीकारण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी भाषा आपण यापूर्वी अनिवार्य केली होती. पण काल काढलेल्या जीआरद्वारे ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. आता आपण असे म्हटले आहे की, कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. 3 भाषेच्या सूत्राचा नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. त्यात मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याशिवाय दोन भाषा व त्यातील एक भारतीय भाषा असावी असे हे सूत्र आहे. यापैकी एक भाषा म्हणून लोक इंग्रजीला प्राधान्य देतात. त्यानंतर कुठलीही एक भारतीय भाषा म्हणून हिंदी म्हटले होते. कारण, आपल्याकडे हिंदीचे शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्यासाठी 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देता येईल. ऑनलाईन पद्धतीनेही ट्रेनिंग दिले जाईल.

आपण सर्वजण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. भारतीय भाषा इंग्रजीहून चांगल्या आहेत. इंग्रजी ही व्यवहार्य भाषा झाली आहे हे ठीक आहे. पण नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता आपण इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीत शिकवायला लागलो. यापूर्वी असे होत नव्हते. वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षणही मराठीत दिले जात आहे. एमबीएही मराठीत शिकवले जात आहे. म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीला वैश्विक भाषा, ज्ञान भाषा व अर्थकारणाची भाषा बनण्याचे दालन उघडे झाले आहे. महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वाद योग्य नसल्याचे मला वाटते, असे फडणवीस म्हणाले.

​​​​​​​हिंदीच्या सक्तीवर सरकारचे स्पष्टीकरण:पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देणार – शिक्षण मंत्री भुसे

मुंबई-पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या सरकारच्या वादग्रस्त निर्णयाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी एक पाऊल मागे घेतले आहे. या प्रकरणी त्यांनी सद्यस्थितीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणालेत.

राज्यात पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. पण त्यावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर सरकारने तिसरी भाषा ही पूर्णतः पर्यायी म्हणून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे बुधवारी याविषयी बोलताना म्हणाले की, सद्यस्थितीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवनागरी लिपीमुळे व संवाद साधत असताना मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे विद्यार्थी मागणी करतील त्याप्रमाणे त्यांना तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

पण हे करत असताना कोणत्याही वर्गातील एकूण पटसंख्येपैकी 20 विद्यार्थ्यांनी एखाद्या भाषेची मागणी केली, तर त्यांना त्यांच्या पसंतीची भाषा शिकवली जाईल. ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या शाळेला उपलब्ध करून दिली जाईल. काही ठिकाणी पटसंख्या कमी असेल किंवा विद्यार्थी कमी असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्याच्या पसंतीची भाषा शिकवण्याची व्यवस्था केली जाईल अथवा इतर सुविधा निर्माण करून दिल्या जातील, असे भुसे म्हणाले.

राज्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण त्यानंतरही अनेक शाळांत मराठी भाषा शिकवली जात नाही. त्यामुळे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी त्यांना विचारला. त्यावर दादा भुसे म्हणाले, अशी बाब सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर त्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. यासंबंधी एक-दोनदा समज दिली आहे. त्यानंतरही त्यांनी मराठी भाषा शिकवणे सुरू केले नाही, तर त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णयि घेतला जाईल.

गत काही वर्षांत मुंबईतील 132 मराठी शाळा बंद पडल्याची बाब पत्रकारांनी यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर दादा भुसे यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली. ते म्हणाले, ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. पण राज्यातील मराठी शाळा कशा टिकतील, कशा वाढतील याकडे आमचे सरकार लक्ष देत आहे. महापालिका शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रावर का लादत आहात?राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर प्रचंड आक्रमक

मुंबई- आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची सक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

यासंबंधी महाराष्ट्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हिंदी भाषा सक्तीची करणार नाही, याबाबत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे चालू होते. आपण हिंदीची सक्ती करणार नसल्याचे तसेच हा निर्णय मागे घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना आज माझे पत्र जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र देखील राज ठाकरे यांनी वाचून दाखवले.

सरकारला हिंदी भाषा का लागत आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. सरकारच्या या निर्णयामागे IAS लॉबीचा दबाव आहे का? अशी शंका देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केली. गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रावर का लादत आहात? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा असताना गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही. आंध्र प्रदेश मध्ये नाही, तामिळनाडूमध्ये नाही, केरळ, कर्नाटकात नाही. अशा अनेक राज्यात हिंदीची सक्ती नाही. महाराष्ट्रात असे धोरण का लादले जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सर्व भाषा या चांगल्याच असतात. एक भाषा उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात. मात्र लहान लेकरांवर हिंदीची सक्ती लागता येणार नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारला खडसावले आहे. केंद्राच्या धोरणात सक्तीचा कोणताच उल्लेख नाही. मग राज्य सरकार असे निर्णय का घेत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्राच्या निर्णयावर देखील बोट ठेवले. शिक्षणासंबंधीच्या धोरणात तसा उल्लेख असल्याचे खोटे सांगितले जात असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही-आज हा विषय लादला गेला तर ते मराठीचे अस्तित्व संपवून टाकतील, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केली. त्यामुळे या संदर्भात सर्व पत्रकार, संपादक, लेखक, शाळांचे मुख्याध्यापक, राजकीय पक्ष, पालक यांनी या गोष्टीचा विरोधी करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकार शाळांमध्ये हिंदी विषय कसे शिकवतात, हे आम्ही पाहू असा इशारा देखील त्यांनी दिला. राज्य सरकारला हे आव्हान वाटत असेल तर आव्हान म्हणून घ्यावे. मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती करण्याच्या हालचालींविरोधात मनसेने जोरदार भूमिका घेत कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक आणि पुणे परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी काही खासगी शाळांच्या बाहेर हिंदी भाषेची पुस्तके फाडून ती जाळून निषेध व्यक्त केला. मनसे शिक्षण सेनेचे पदाधिकारी म्हणाले की, “मराठी राज्यात मराठीच भाषा प्राथमिक असायला हवी. हिंदी सक्ती हा मराठी भाषेचा अपमान आहे.”

चव्हाणनगर कमानीजवळ दोन मुलांवर कोयत्याने वार करणरे टोळके कोणते ?

पुणे-पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर टोळक्याने धारदार कोयत्याने वार केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर चव्हाणनगर कमानीजवळ घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित टोळक्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव नाईकनवरे (वय 17, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी), कार्तिक गायकवाड (वय 16, रा. संभाजीनगर, धनकवडी) अशी जखमी झालेल्यां व्यक्तींची नावे आहेत. याबाबत शीतल सचिन नाईकनवरे (वय 40) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,आरोपी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकनवरेचा शंकरमहाराज वसाहत परिसरातील काहीजणांशी वाद झाला होता. नाईकनवरे आणि गायकवाड हे 16 जून रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास कामावरुन घरी जात होते. पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानीजवळ टोळक्याने त्यांना जबरदस्तीने अडविले. नाईकनवरे आणि त्याचा मित्र गायकवाड यांच्यावर टोळक्याने जुन्या वादातून थेट त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

टोळक्याने नाईकनवरे याच्या डोक्यात जोरात काेयता मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे सदर परिसरात नागरिकांमध्ये दहशत देखील निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुरेखा चव्हाण पुढील तपास करत आहेत.

देशी गायींच्या रक्षणासाठी दीर्घकालीन जन चळवळ होणे आवश्यक – शेखर मुंदडा

पुणे : राज्यात देशी गायींच्या संख्येत घट होण्याची कारणमिंमासा विचारात घेऊन देशी गायींच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच त्यांची उत्पादनक्षमता व प्रजननक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, त्याच बरोबर देशी गायींच्या संवर्धनाचे महत्व तसेच पशुजन्य उत्पादनाचे महत्व ग्राहकांना पटवून देऊन देशी गाय पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या बाबी विचारातघेऊन राज्यात दरवर्षी २२ जुलै रोजी ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धनदिन’ साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.  

देशी गायीच्या दुधाची उपयुक्तता तसेच शेण आणि गोमुत्र यांचे महत्व विचारात घेऊन गायीस कामधेनू असे संबोधण्यात येते. देशी गायींच्या संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने देशी गायीस ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित केले आहे. अनेक गोरक्षण संस्था, कृषी विद्यापीठे, व गोसेवा केंद्रे २२ जुलैला देशी गायींच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेतात.हा दिवस देशी गायींच्या संवर्धनासाठी, त्यांच्या दुग्ध उत्पादकतेच्या प्रचारासाठी आणि भारतीय गोवंशाच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी पाळला जातो.

शेखर मुंदडा म्हणाले, ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’  हा केवळ एक दिवस साजरा करायचा नसून, तो देशी गायींच्या रक्षणासाठी दीर्घकालीन जन चळवळ होणे आवश्यक आहे. दिनांक २२ जुलै हा दिवसत्या दिशेने एक पाऊल ठरू शकतो.यानिमित्त महाराष्ट्र गोसेवा आयोगाने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे. या उपक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा राहणार आहे. देशी गायींच्या महत्वाची माहिती देणे, जनजागृती घडवणे व गोरक्षणाचे संदेश पोहोचवणे, जैविकशेती, आयुर्वेद, दुग्धव्यवसायात गोवंशाचे महत्त्व समजावणे आदी बाबी या उपक्रमांतून सर्वसामान्यांना समजावून सांगितल्या जातील.   

अनेक गावांमध्ये २२ जुलैच्या आसपास ‘गोपालन सप्ताह’ किंवा ‘गोपूजन’ यांसारखे कार्यक्रम होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला, गायींचे आरोग्य, पोषण आणि संगोपन याबाबत विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे आता २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ साजरा करताना देशी गाय व गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांचे महत्व व आवश्यकता विशद करणारी विविध चर्चासत्रे, प्रदर्शने, शिबीरे, स्पर्धाचे आयोजन आयुक्त पशुसंवर्धन व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांनी संयुक्तरित्या करावे व यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र गोसेवा आयोगाने उपलब्ध निधीतून भागवावा, असे शासनाने निर्देशित केले आहे. 

आळंदी हेच विश्वातील एकमेव शांती केंद्र-ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर

0

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त लोकशिक्षणपर अभिनव कार्यक्रमाचे उद्घाटन

पुणे, : “ज्ञानेश्वरीत विश्वशांती निर्मितीचा मुलभूत विचार समाविष्ट आहे. त्यामुळे आळंदी हेच विश्वातील एकमेव विश्वशांती केंद्र आहे. जो पर्यंत मानवाला अध्यात्माची जाणिव होणार नाही तो पर्यंत शांतीचा विचार ही करता येणार नाही. डॉ. कराड यांनी आळंदीत केवळ घाटच बांधले नाही तर त्यांनी मानव बांधण्याचे कार्य केले आहे.” असे विचार परभणी येथील ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर यांनी व्यक्त केेले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, बाळासाहेब काशिद, भालचंद्र नलावडे, माजी नगरसेवक सुरेश काका वडगावकर, नंदकुमार वडगावकर, हभप तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विठ्ठल काळेखे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर म्हणाले,“ कलियुगाच्या  काळात विकास म्हंटल की बांधकाम येत. परंतू या विकासाबरोबर विश्वशांती केंद्राचा विकास होत आहे. डॉ. कराड यांनी ज्ञानोबा-तुकोबाचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. अद्वैत भक्तीत विश्व मानवाचा विचार सामावलेला आहे. आत्मज्ञान व कर्मयोग सुदृढ करावयाचा असेल तर आध्यात्म महत्वाचा आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ ज्ञान, भक्ती आणि कर्म ही परंपरा वारकरी सांप्रदायाची आहे. सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वर पूजा हे व्रत घेऊन या क्षणापर्यंत कार्य करीत आहे. मी निमित्तमात्र असून माऊली माझ्याकडून आज ही कार्य करून घेत आहेत. भविष्यात वारकरी सांप्रदायच जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. हा मार्ग तीर्थ क्षेत्राकडून ज्ञान तीर्थ क्षेत्राकडे जाण्याचा आहे. आज अक्कांच्या आशीर्वादाने चायना बॉर्डरवर सरस्वती मंदिर उभे राहिले आहे. वारकर्‍यांच्या पाई पाई ने बनलेल्या या घाटाची निर्मिती झाली आहे. त्यांचे ज्या पद्धतीने विद्रुपीकरण होत आहे ते चांगले नाही. परंतू जगाच्या नकाशावर आळंदी आणि देहू आहे. अशावेळेस आळंदी, देहू आणि पंढरपूला डाग लागू नये. ”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,“ जाती-पातीमध्ये विभागलेल्या लोकांना एकत्रित करण्याचे व त्यांच्यात अस्मिता निर्मितीचे कार्य संत ज्ञानेश्वर माऊली यांनी केले आहे. ते देशातील सर्वात मोठे समाज सुधारक आहेत. त्यांनी संपूर्ण समाज सुधारला आहे. वारकरी म्हणजे सज्जनांची मंदियाळी, ज्या गावात वारकरी आहे ते गाव सुखी आहे.
बाळासाहेब काशिद म्हणाले,“ ज्ञानोबा व तुकारामाचे कार्य जगभर पोहोचविण्याचे मोलाचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले. १८ पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन ते शांतीचे कार्य करीत आहेत. तसेच मानव शांतीसाठी डॉ. कराड यांनी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती केली आहे.”
डॉ. विश्वनाथ कराड यांनी वारकर्‍यांसाठी केलेल्या कार्याची माहिती विठ्ठलराव काळोखे व हभप डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी दिली.
हभप महेश महाराज नलावडे यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन हभप शालिकराम खंदारे यांनी केले.

कोथरूड मध्ये सुरू होणार अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज २०० बेडचे “श्री सरस्वती कराड हॉस्पिटल”

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, भारत संचलित
‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’  तत्वांशी बांधिलकी

 
पुणे दि. १८ जून : ‘रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या ब्रीदाला अनुसरून माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच)ची निर्मिती कोथरुड येथील पौड रोड, विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या जवळ करण्यात आली आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज २०० बेडस्च्या या हॉस्पिटलचे उद्घाटन सोमवार,  २३ जून २०२५ रोजी, सकाळी १०.३० वाजता, केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री  मा. श्री. नितिन गडकरीजी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड हे असतील.
केअर (काळजी घेणे), क्युअर (उपचार देणे), हील (बरे करणे) ह्या तत्वांवर बांधलेले हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे बहुमजली रुग्णालय कोथरुड ह्या पुण्याच्या अत्यंत गजबजलेल्या उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी लोकांच्या सेवेत रुजू होत आहे.
सदर रुग्णालयात आपत्कालीन सेवा, सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी, एक्स रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी सारख्या सेवा २४ तास उपलब्ध असतील. तसेच वैद्यकीय, हदयरोग, नवजात शिशु, शस्त्रक्रिया यांकरिता अतिदक्षता विभाग उपलब्ध आहे. मेडिसिन, सर्जरी, प्रसूतीशास्त्र, अस्थिरोग, सांधेरोपण, मणक्याचे विकार, मानसोपचार, त्वचाविकार, नेत्ररोग, कान -नाक-घसा, बालरोग, कॅन्सर चिकित्सा व उपचार, मेंदूविकार व चिकित्सा आणि त्यावरील उपचार इ. विशेष तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असतील.
या रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयीन सेवेत १०% सूट दिली जाणार आहे.
रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन, सर्व सेवा-सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत रुजू होत आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच) चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीष भातलवंडे व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्व प्रस्तावित कामे 31 जुलै च्या आत सुरू करण्याचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता, सर्व कार्यान्वित यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत प्रस्तावित कामांना 25 जून पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन 31 जुलै 2025 चे आत प्रस्तावित कामे सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत श्री डुडी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजाजन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.

श्री.डुडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी आपले प्रस्तावास तात्काळ तांत्रिक मान्यता घ्यावी व 25 जून पूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन सर्व प्रस्तावित कामे 31 जुलै, 2025 च्या आत सुरू करावीत, डिसेंबर 2025 अखेर सर्व कामे पूर्ण करावीत. वरिष्ठ स्तरावरून घ्यावयाच्या मान्यतांसंदर्भात पाठपुराव्याकरिता यंत्रणांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले.
तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ‘नाविन्यपूर्ण योजना ‘यामध्ये नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन शाखेत तात्काळ सादर करावेत. या संदर्भात कृषी, महिला व बालविकास, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्ण विभाग, शिक्षण, पोलीस आदी विभागांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची मागणी नोंदवून प्रस्ताव सादर करावेत. असे त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर राज्य शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून यामध्ये सर्व विभागांनी आपापला सहभाग नोंदवून जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी दिल्या.

यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागांना एक कोटी उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागासाठीच्या उद्दिष्टांचे विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), पुणे यांनी कार्यक्रम नियोजनाचे सादरीकरण केले . बैठकीला सर्व कार्यान्वित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदींनी सहभागी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करुन यशस्वीपणे करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनास दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे सकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. योग कार्यक्रमास विविध मान्यवरांसह वारकरी सहभागी होऊन योग करणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पूर्व तयारी करावी.

शहरातील विविध शाळांमध्येदेखील वारकरी भक्तीयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनासहित स्वयसेवकांना बसण्याच्या जागेसह, ओळखपत्र, एकसारखे टीशर्ट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी उपलब्ध करुन द्यावेत. शाळेत योगाकरीता लागणाऱ्या लागणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्याव्यात.

वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याकरीता क्युआर कोड, फेसबुक लाईव्ह, अधिकाधिक वारकऱ्यांचा सहभागी होतील याकरीता अधिकाधिक जनजागृती करावी. यामध्ये शहरातील विविध भागात विशेषत: दिंडीचा मुक्कामाचे ठिकाण, मार्गावार महानगरपालिकेने जाहिरात फलके लावावीत. एकंदरीत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

यावेळी श्री. राम, श्री. डूडी, डॉ. गोसावी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता नियोजन करुन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजक व संकल्पक राजेश पांडे यांनी ‘वारकरी भक्तीयोग’ नियोजनाबाबत माहिती दिली.
0000

इराणने अधिकृतपणे इस्रायलविरुद्ध युद्धाची केली घोषणा:क्षेपणास्त्र हल्ले सुरू; खामेनी म्हणाले – ज्यू राजवटीवर दया दाखवणार नाही

इराणने इस्रायलविरुद्ध अधिकृतपणे युद्ध घोषित केले आहे. इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी ट्विटरवर लिहिले – युद्ध सुरू होत आहे. आम्ही दहशतवादी ज्यू राजवटीला कडक प्रत्युत्तर देऊ. आम्ही त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही. या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली.

गेल्या ५ दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे, आता खामेनींच्या घोषणेनंतर त्याला युद्ध म्हटले जाईल.

अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिका लवकरच या युद्धात सामील होऊ शकते. कॅनडाहून परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत बैठक घेतली. यानंतर अमेरिकेने मध्य पूर्वेत अधिक लढाऊ विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आज सहाव्या दिवशी युद्धात रूपांतरित झाला आहे. या लढाईत आतापर्यंत २२४ इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १,४८१ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायलमध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.