Home Blog Page 494

इस्रायलचा इराणच्या अणुभट्टीवर हल्ला

तेहरान:इस्रायलने इराणमधील अरक हेवी वॉटर रिअॅक्टरवर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानीची कोणतीही माहिती नाही. काही तासांपूर्वी इस्रायली आर्मी (IDF) ने अरक आणि खोंडूब शहरांतील लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता.गुरुवारी सकाळी इस्रायलमधील ४ ठिकाणी इराणने क्षेपणास्त्रे डागली. बियरशेबा शहरातील सोरोका रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय इराणने तेल अवीव, रमत गान आणि होलोन येथेही हल्ला केला आहे. नुकसान किती झाले हे अद्याप कळलेले नाही.

अरकमध्ये एक हेवी वॉटर रिअॅक्टर आहे. ही सुविधा इराणच्या अणुकार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच अरकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे तयार केली जातात.

याशिवाय, खोंडूबमध्ये एक IR-40 हेवी वॉटर रिअॅक्टर देखील आहे, जो इराणच्या अणुकार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. ही सुविधा अरकपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. अरकप्रमाणेच, त्यावर आंतरराष्ट्रीय देखरेख देखील ठेवण्यात आली आहे.

इराण आणि इस्रायलमधील युद्ध सातव्या दिवशी पोहोचले आहे. आतापर्यंत इस्रायलमधील 24 लोक मारले गेले आहेत. त्याच वेळी, वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाने दावा केला आहे की इराणमध्ये मृतांची संख्या आता 639 वर पोहोचली आहे आणि 1329 लोक जखमी झाले आहेत.

अफलातून …आता शौचालयांसाठीही ॲप

पुणे, : पालखी 2025 दरम्यान आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने यंदा विशेष इ ‘टॉयलेट सेवा’ नावाचे मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

वारी मार्गावर विविध ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे,
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 1800 शौचालये, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 1200 शौचालये, श्री संत सोपान महाराज पालखी मार्ग 300 शौचालये उभारण्यात आली आहे.

या शौचालयांच्या व्यवस्थापनासाठी विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून, या ॲपमध्ये शौचालयाची उभारणी व स्थिती, स्वच्छतेची माहिती व नियमित वापर, शौचालयाच्या ठिकाणी असलेली पाणी, वीज, रस्ता व साफसफाईची माहिती, शौचालयाचा वापर किती झाला याचा तपशील, नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व सूचना नोंदवण्याची सुविधा सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रत्येक शौचालयावर क्युआर कोड स्कॅनर लावण्यात आले असून गुगल स्कॅनर वापरून हा क्युआर कोड स्कॅन केल्यास संबंधित शौचालयाची माहिती मोबाईलवर तात्काळ मिळू शकते.

ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून, भाविकांनी या ॲपचा वापर करून सुविधा व स्वच्छतेबाबत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत वारकऱ्यांच्या सेवेत एक महत्त्वाची भर घालणार आहे. मोबाईल करिता खालील प्रमाणे लिंक उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

Android मोबाईल करिता लिंक

यूhttps://play.google.com/store/apps/details?id=com.palsak.

ॲपल मोबाईल करिता लिंक

https://apps.apple.com/in/app/toiletseva/id1557438957

वरिल लिंक वापरुन नागरिकांनी मोबाईल ॲपचा वापर करावा, असे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.

धानोरी व उपनगरात पूरस्थिती निर्माण झाल्यास ठेकेदार, प्रशासन व भ्रष्टाचारी अधिकारी जबाबदार – सौ. पुजा धनंजय जाधव

पुणे:धानोरी व उपनगरात पूरस्थिती निर्माण झाल्यास ठेकेदार, प्रशासन व भ्रष्टाचारी अधिकारी जबाबदार असतील असा स्पष्ट दावा करत हलगर्जीपणा करणांरावर तातडीने कारवाई करा आणि अजूनही जागे व्हा असा इशारा सौ. पुजा धनंजय जाधव यांनी दिला आहे.

त्या म्हणाल्या,’गेल्या अनेक दिवसांपासून धानोरी, मुंजाबावस्ती, टिंगरेनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याचे दिसून आले, याबाबत २ दिवसांपुर्वी पुणे मनपा आयुक्तांची भेट घेवून, नालेसफाई करण्याबाबत निवेदन दिले होते.

आज प्रत्यक्षात मनपाचे अधिकारी अक्षय वाडेकर यांच्यासोबत २९ गोल्ड कोस्ट सोसायटी, सुदामानगर, लक्ष्मीनगर सोसायटी, विठ्ठल मंदिर धानोरी येथील भागातून वाहणार्‍या नाल्यास अनेक ठिकाणी भेटी दिल्या, यातून असे निर्दशनास आले की, निर्मल हरिहर या ठेकेदाराच्या माध्यमातून नालेसफाई करण्याचे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात काम झालेच नव्हते. जर हा नाला साफ झाला नाही तर सध्या नाल्यात असलेला राडारोडा व प्लॅस्टिक, कपडे यामुळे पाणी तुंबेल व सर्व परिसर पाण्याखाली जाईल तसेच रहिवासी व व्यापारी बांधवांना मोठा त्रास होणार आहे. यापूर्वी अशी परिस्थिती झाली असताना देखील मनपा अधिकारी फक्त पाहण्याच्या भुमिकेत दिसत आहेत.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, नालेसफाई नावालाच असून केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. आज श्री धनंजय जाधव, सौ. पुजा जाधव, विनोद परांडे, गणेश सोनवणे, अरुण उर्फ बंडुशेठ कानसकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर, प्रशासन जागे झाले व प्रत्यक्षात नालेसफाई ला सुरुवात झाली.

प्रशासनाला सांगू इच्छितो की, नागरी समस्यांचे निराकरण करण्यास तुम्ही सक्षम नसाल तर जाहीर करा पण नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर गाठ आमच्याशी आहे. वर्षानुवर्षे याच विभागात ठान मांडून व बदली झाली तरी अतिरिक्त चार्ज घेऊन अनेकदा बसलेल्या ज्या अधिकाऱ्यांनी या कामात भ्रष्टाचार केला आहे त्यांचे निलंबन व्हावे अन्यथा त्यांना या खात्यातून हाकलून द्यावे. कसे नझाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

या वेळी प्रणय शेंडे, समीर सय्यद, हेमंत दाभाडे, द्वारकेश जाधव, कुणाल शिंदे, विक्रम कदम, लक्ष्मण वडणे, पवन मोरे, अजित बाबळसुरे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी-ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार;

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साळुंखे, पवार यांना ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’

पुणे: “तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉ. आ. ह. साळुंखे व डॉ. जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी भूगांव येथील कार्यक्रमात बोलताना येथे काढले. मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती, असेही पवार यांनी नमूद केले.

सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे व इतिहास संशोधक, विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, मेघडंबरीतील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहु महाराज होते. खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सौ. वसुधा जयसिंगराव पवार, प्रविण गायकवाड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रशांत जगताप, डॉ. श्रीमंत कोकाटे, रविकांत वर्पे, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचा इतिहास मांडला जात असताना काही तथाकथीत विचारवंतांकडून मोडतोड होत होती. अशावेळी काहीजण वास्तव इतिहास मांडण्याचे काम करत होते. त्यामध्ये आजच्या दोन्ही सत्कारमूर्तींचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर ठेवला. त्यांचा सन्मान शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून व तोही स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या मुळशीच्या भूमीत ही फार मोठी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे काम करत असताना मुळशी सत्याग्रहाचे स्मरण ठेवले हे चांगले आहे.”

स्वराज्याच्या धामधुमीत हेच मुळशी खोरे अग्रेसर होते, अगदी सेनापती बापटांच्या मुळशी सत्याग्रहापर्यंत स्वातंत्र्याच्या चळवळीशीही ही भूमी जोडली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपतींचे स्वराज्य हे भोसल्यांचे नव्हते किंवा महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या विविध सुलतानांसारखे एका व्यक्तींचे नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते, असे मत व्यक्त केले. राजे रजवाडे अनेक होऊन गेले, लोक आता त्यांना विसरले. पण हिंदवी स्वराज्य लोकांच्या हृदयावर आजही राज्य करीत आहे, असेही पवार म्हणाले.

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, “हे स्वराज्य फक्त हिंदुंचे आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज कधीही म्हणाले नाहीत. ते सर्वांचे आहे, असेच ते म्हणत. तत्कालीन काळातील जगात सर्वत्र धार्मिकतेवर आधारित राज्य होती हे लक्षात घेतल्यावर शिवाजी महाराजांच्या ‘हे राज्य रयतेचे’ या विचारांचे महत्व लक्षात येते. म्हणूनच शिवाजी महाराजांचे, म्हणजेच राजेशाहीचे नाव आपण लोकशाहीतही घेतो. कारण त्यांनी दाखवलेला सर्वधर्मसमभाव हा आपल्या घटनेचा प्राण आहे.” देशाला सध्या धर्मवादाचा धोका आहे, अशा परिस्थितीत सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला गरजेचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. शाहू महाराजांविषयीच्या चरित्रग्रंथाचा जगभरातील २५ पैकी १२ भाषांत अनुवाद करण्यात यश आले आहे, अशी माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे मोठी जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडू. हा क्षण गौरवाचा आहे.” शिवरायांनी राज्यभिषेकानंतर केलेल्या दक्षिण स्वारीत डच लोकांशी स्थानिक लोकांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री न करण्याच्या केलेल्या कराराची आठवण आपल्या भाषणात करुन देताना साळुंखे यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचे गुणगान केले.

अध्यक्षीय भाषणात शाहु महाराज म्हणाले, “अशा कार्यक्रमांमधून राज्यातील देशातील युवकांना स्फूर्ती मिळेल. शिवरायांपासून स्फूर्ती घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान काम करत आहेत. आजच्या एकूण परिस्थितीला दिशा देण्याचे काम हा कार्यक्रम करेल. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे पुरोगमित्त्व राखण्यासाठी अशा विचारवंतांचा गौरव होणे गरजेचे आहे.” खासदार सुळे नुकत्याच परदेशाचा दौरा करून आल्या. तिथे त्यांनी भारताची बाजू प्रभावीपणे मांडली. त्या आता पक्षाचे नेतृत्व करतील, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशा शब्दांमध्ये शाहु महाराज यांनी खासदार सुळे यांचे कौतुक केले.

शिवविचारांचा जागर करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा चित्रफीतीद्वारे घेण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी केले. महेश मालुसरे यांनी आभार मानले.

भाजपच्या ओमकार कदम आणि सहकाऱ्यांवर अखेर पोलिसात गुन्हा दाखल

पुणे -महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी भाजपच्या कामगार आघाडीचे पदाधिकारी ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी कदम आणि काही साथीदारांना महापालिकेत प्रवेश बंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता . जो बेकायदा आणि आयुक्तांच्या अधिकारा बाहेरील असल्याचा आरोप होऊ लागला होता .जर कोणत्याही अधिकार्याला मारहाण, शिवीगाळ, धक्काबुकी झाली तर त्याबाबत पोलिसात तक्रार करण्याऐवजी त्याला आयुक्तांनी महापालिकेतच प्रवेश बंदी करणे हि कृती घटनाबाह्य असल्याचा आरोप होऊ लागला होता . ईद च्या दुसऱ्या दिवशी बागा अचानक बंद ठेवणे , नागरिकांना अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसात तक्रार न देता , न्यायव्यवस्थेकडे न्याय न मागता परस्पर प्रवेश बंदी ची शिक्षा सुनावणे अशा निर्णयामुळे महापालिका आयुक्त वादात सापडण्याची चिन्हे दिसत असताना अखेरीस कदम आणि साथीदारांच्या विरोधात उशिरा पोलिसात तक्रार नोंदविली गेली. जी ज्या त्या वेळेसच नोंदवली का गेली नाही असा सवाल आता यामुळे उपस्थित होणार आहे.

महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार कदम, अक्षय कांबळे आणि त्यांचे साथीदार यांनी कोणतेही शासकीय काम नसताना आरोग्य विभागाच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयीन सहकारी उपस्थित असताना त्यांनी अवमानस्पद टिप्पणी केली. त्यांनी अश्लील शब्दांचा वापर करून पाठलाग केला.

महिला अधिकाऱ्याने फिर्यादीत नमूद केले की, कदम आणि साथीदारांच्या कृत्यामुळे तिला मानसिक त्रास झाला आहे. आता तिला कार्यालयात जाण्यास भीती वाटत आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी ओंकार कदम आणि त्यांच्या साथीदारांना महापालिका भवन आणि महापालिकेशी संबंधित सर्व मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एक्सप्रेसवेवर पोलिसांच्या ताफ्याचा मोठा अपघात:सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली

पुणे-

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात घडला. अनधिकृतपणे भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना पुणे या ठिकाणी नेत असताना 19 पोलिस वाहनांच्या ताफ्यातील काही गाड्यांचा अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल 31 जण जखमी झाले असून, त्यात 19 पोलिस कर्मचारी आणि 12 बांगलादेशी आरोपींचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे येथे घेऊन जाण्यासाठी तब्बल 19 पोलिस वाहनांचा ताफा निघाला होता. विशेष म्हणजे या 19 वाहनांत एकूण तब्बल 160 बांगलादेशी होते. हा ताफा सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भातान बोगद्यात आला असता ही घटना घडली. वाहनांच्या ताफ्यातील एका गाडीने अचानक ब्रेक मारल्याने मागोमाग येणाऱ्या सुमारे 6 ते 7 पोलिसांच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक आरोपींसह पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.अपघातानंतर जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काही जण किरकोळ जखमी आहेत, तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुंबई पोलिस दलाचे कर्मचारी विजय माने हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील अडथळा दूर करत वाहतूक पूर्ववत सुरू केली. दुर्घटनाग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्या आहेत.

धंगेकर जाताच कमल व्यवहारे यांची घर वापसी.. आबा बागुलांची वापसी कधी ?

पुणे- पुण्याच्या कॉंग्रेस मध्ये नेते वीस अन कार्यकर्ते कासावीस अशी स्थिती कलमाडी यांच्या अस्ता नंतर कायम असली तरी आता ज्या कसबा विधानसभा मतदार संघावरून राजकीय रणकंदन माजले, धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने पहिल्या माजी महिला महापौर म्हणून परिचित असलेल्या जुन्या जाणत्या कॉंग्रेसच्या नेत्या कमल व्यवहारे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला त्या कमल व्यवहारे यांची आज कॉंग्रेस पक्षात घर वापसी झाली आहे . प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ , पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे आज स्वागत केले. पक्षाचे काही निर्णय चुकले असतील तरी त्यामुळे व्यथित झालेल्या खऱ्या निष्ठा असलेल्या कॉंग्रेस जनांनी आता नाराज न राहता पुन्हा कॉंग्रेस मध्ये सक्रीय व्हावे हाच यातून संदेश मिळत असल्याने , माजी उपमहापौर आणि संपूर्ण हयात कॉंग्रेस मध्ये घालविलेले दक्षिण पुण्यातील एकमेव नेते आबा बागुल यांची घर वापसी होणार काय ? होणार असल्यास कधी याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. नेत्यांमधील भांडणे नेत्यांनी आपापल्या पातळीवर जरूर करावीत पण त्याचा पक्षावर किंवा आपापल्या पक्षातील कारकीर्दीवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे मत या मुळे व्यक्त केले जाते आहे. आबा बागुल यांना पर्वती विधान सभा मतदार संघातून कायम डावलण्यात आले त्यांनी ४० वर्षे पक्षात काम केले आणि महापालिकेच्या राजकारणावर पकड मजबूत ठेवली पण प्रत्येक वेळी आघाडीचे कारण देऊन त्यांना आमदारकी पासून आयुष्यभर दूर ठेवले गेले आश्वासने अनेकांनी अनेकदा दिली पण त्यांच्या पदरी निराशाच आली त्यामुळे त्यांनी यावेळी बंडखोरी करून अन्याय झाल्याचे दर्शवून दिले .या मतदार संघात योग्य उमेदवाराच्या अभावी कायमच भाजपचा विजय होत आला आता तरी याची दखल घेऊन आबा बागुलांना पुन्हा कॉंग्रेस मध्ये सन्मानाने बोलाविले जाईल काय याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

आज दादर येथील टिळक भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची रणनीती, मतदार नोंदणी मोहीम, तसेच संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकट करण्यासाठी विविध सूचना आणि उपाययोजना मांडण्यात आल्या. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,माजी आमदार अनंत गाडगीळ,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,कमलताई व्यवहारे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी,विरेंद्र किराड,एन एस यु आय चे माजी प्रदेशाध्यक्ष मीर शेख,प्रदेश सचिव रफिक शेख,अजित दरेकर, अविनाश बागवे व इतर अनेक मान्यवर नेते आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादनविद्यार्थिनींचे चैतन्यपूर्ण वादन : जयघोष, शंख निनादाने दुमदुमला बालगंधर्वचा परिसर

पुणे : ‌‘वंदे मातरम्‌‍‌’, ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘खूब लढी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी‌’ असा जयघोष, शंखांचा निनाद करत रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे आज (दि. 18) अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मॉडर्न हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या घोषपथकाचे चैतन्यपूर्ण वादन झाले.

शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिरासमोर कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या सहकार्याने राणी लक्ष्मीबाई यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे आणि पुणे महापालिकेच्या वतीने राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन करण्यात येते. कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरिभाऊ मुणगेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर, सदस्य डॉ. राजश्री महाजनी, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह, माजी नगरसेविका डॉ. ज्योत्स्ना एकबोटे तर महापालिकेच्या वतीने घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या पुणे केंद्राचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव, सचिन टापरे, प्रवीण पगारे, मकरंद फणसळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मॉडर्न हायस्कूलमधील 350 विद्यार्थिनी या अभिवादन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज घेऊन विद्यार्थिनींनी जोशपूर्ण घोषणा दिल्या. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माया नाईक, उपमुख्याध्यापिका डॉ. उज्ज्वला मोरे, पर्यवेक्षिका वैशाली घोडके, संस्था समन्वयिका अनुप्रिती गाजरे तसेच क्रीडा शिक्षिका शिल्पा ओळकर, भाग्यश्री शिंदे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

त्रिधारा : सांगीतिक संगमाची सुरेल सायंकाळ

पुणे : भावगीत, भक्तीगीत, लोकगीत, लावणी, गौळण, कोळीगीत, बालगीत अशा अनेक प्रकारच्या गीतांनी ‘त्रिधारा’ या सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांची सायंकाळी संस्मरणीय ठरली.
निमित्त होते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित शांता शेळके, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा ‘त्रिधारा’ या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाचे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत भरभरून प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सन्मिता धापटे-शिंदे, श्रुती देवस्थळी आणि राहुल जोशी यांनी लोकप्रिय गीते सादर केली तर राजू जावळकर (तबला), प्रसन्न बाम (संवादिनी), अभय ओक (बासरी), उद्धव कुंभार (तालवाद्य), अमन सय्यद (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली.
माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, वासंती जाधव, हर्षाली माथवड, नवनाथ जाधव, मधुरा वैशंपायन यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यजीत धांडेकर आणि समीर हंपी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्र. के. अत्रे यांच्या ‘देह देवाचे मंदिर’ या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पुलंच्या संगीताने नटलेल्या आणि माणिक वर्मा यांनी अजरामर केलेल्या गदिमा लिखित ‘कौसल्येचा राम’ हे भक्तीगीत सादर करण्यात आले.
राजा बढे यांनी शब्दबद्ध तर पुलंनी संगीतबद्ध केलेले ‘हसले मनी चांदणे’ हे भावगीत रसिकांना भावले पुल, अत्रे आणि शांताबाईंच्या अनेक आठवणींना उजाळा देत स्नेहल दामले यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. संकल्पना, काव्यवाचन आणि अभिवाचन प्रथमेश इनामदार यांचे होते. कार्यक्रमाची सांगता रसिक आणि कलाकार यांच्यातल्या नात्याला समृद्ध करणाऱ्या, पुलंनी संगीतबद्ध केलेल्या ‘माझे जीवन गाणे’ या गाण्याने झाली. रसिकांनी या कार्यक्रमास भरभरून दात देत आनंद लुटला.
मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शांता शेळके, प्र. के. अत्रे आणि पु. ल. देशपांडे या तीनही दिग्गज साहित्यिकांची जन्मतिथी जून महिन्यात असते. या निमित्ताने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
साहित्य, कला आणि अभिनयाचे रोपटे इथे वाढले आहे. कित्येक कलाकारांचा सहवास, कौतुक, रसिकांची दाद या सभागृहाने अनुभवली आहे. आम्हाला अनेक गोष्टी येथे शिकायला मिळाल्या असल्याने या नाट्यगृहाचे आम्ही देणे लागतो या भावनेतूनच रौप्य महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असे आयोजक सत्यजीत धांडेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांनी सत्यजीत धांडेकर यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय जगताप, गणेश भोसले, धनंजय पुरकर, केदार भालशंकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन तर अनुराधा हाटकर यांनी आभार मानले.

ज्ञानेश्वर माऊलींचे मानाचे अश्व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी

पुणे ;
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.
अंकली (कर्नाटक) येथील श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व अंकली येथून पायी येऊन दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत सहभागी होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात या दोन अश्वांना मानाचे स्थान असते. उद्या (दिनांक १९ जून) ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान ठेवण्यात येणार असून या पालखी सोहळ्यात हे दोन्ही अश्व सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत जात असतात. वारकरी संप्रदायात १८३२ पासूनची ही समृद्ध परंपरा आहे. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथापुढे जो अश्व असतो तो माऊलींचा अश्व असतो तर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असतो. असे हे दोन अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे या अश्वांची ही मानाची परंपरा आहे. मंगळवारी या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, भाविक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

पुणे, दि. १८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शनानंतर संस्थानच्यावतीने श्री.पवार यांचा सत्कार करण्यात आला.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि. 18: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानाच्यावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 22 जून 2025 रोजी पुणे ते सासवड दरम्यान सासवड येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी पहाटे 2 वा. पासून ते 24 जून 2025 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे तसेच सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.

24 ते 25 जून 2025 रोजी सासवड- जेजुरी-ते वाल्हे दरम्यान जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्कामी असणार आहे. 24 जून रोजी पहाटे 2 वा. पासून ते 25 जून रोजी रात्री 12 वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा मार्गे वळविण्यात येणार आहे.

26 जून 2025 रोजी लोणंद येथे मुक्कामी असणार असून दरम्यान 26 जून रोजी सकाळी 2 वा. पासून ते 26 जून रोजीचे सायं. 5 वा.पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निराकडून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळविण्यात येणार आहे.

26 जून ते 28 जून या कालावधीत लोणंद येथून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार असून या कालावधीत फलटण लोणंद येथून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:
पालखी 23 जून रोजी लोणीकाळभोर ते यवत दरम्यान यवत येथे मुक्कामी असणार असून दरम्यान 23 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे.

24 जून रोजी यवत ते वरवंड दरम्यान वरवंड येथे मुक्कामी असणार दरम्यान 24 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.

25 जून रोजी वरवंड ते उंडवडी ता. बारामती दरम्यान उंडवडी येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी 25 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. बारामतीहून पाटसकडे जाणारी वाहतूक बारामती-लोणीपाटी-सुपा-चौफुला-पाटस तसेच तसेच पाटसहून बारामतीकडे जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामतीकडे येतील.

26 जून रोजी उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात मुक्कामी असणार असून दरम्यान 26 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील.

27 जून रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी असणार असून दरम्यान 27 जून रोजी सकाळी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टीकडे तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे.

28 जून रोजी सणसर ते अंथुर्णे दरम्यान निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार असून 28 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते 29 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती-भिगवण-इंदापूर तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक इंदापूर-बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण-बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे.

29 जून रोजी निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यान इंदापूर येथे मुक्कामी असून पहाटे 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळस -जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी-देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे.

30 जून रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलुज-बावडा-नातेपूते बारामती तसेच अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. 30 जून रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गान वळविण्यात येणार आहे.

1 जुलै रोजी इंदापूर ते सराटी दरम्यान सराटी येथे मुक्कामी असून पहाटे 2 वाजल्यापासून रात्रौ 12.00 वाजेपर्यंत तसेच 3 जुलै रोजी पहाटे 2 वा पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत इंदापूर अकलूज रोडवरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गे वळविण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे बर्फ, शितपेय, आईस्क्रीम विक्रेत्याकडून ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात

पुणे दि.18:- प्रत्येक नागरिकास सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयामार्फत शितपेये, बर्फ, आईस्क्रीम, आंबा विक्रेता व उत्पादक यांची तपासणी करुन ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.

प्रशासनाने याकरीता एकूण ३० विक्रेत्यांची तपासणी करुन ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. या कालावधीमध्ये वर्षाचे ४ नमुने, आईस्क्रीम व कुल्फीचे २९ नमुने घेण्यात आलेले असून त्यांचे अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच १२ आंब्याचे नमुने घेण्यात आले होते सर्व नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत. शितपेयाचे ५ नमुने घेण्यात आले असून १ नमुना प्रमाणित दर्जाचा व २ नमुने मिध्याछाप घोषित झाल्याने त्याअनुषंगाने पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

प्रत्येक नागरिकास सुरक्षित व निर्मळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठो अन्न व औषध प्रशासन दक्षता घेत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भेसळयुक्त अन्नपदार्याबाबत संशय असल्यास किंवा त्याबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ संपर्क साधण्याचे पत्रकान्वये सह आयुक्त (पुणे विभाग), अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, पुणे सु. ग. अन्नपुरे यांनी कळविले आहे.

पडद्यामागे राबणार्‍या हातांचा   झाला सन्मान !

विजय पटवर्धन फाऊंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

पुणे :

विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या चौथ्या  वर्धापन दिनानिमित्त ध्वनी संयोजन,प्रकाश योजना सहाय्य,नेपथ्य सहाय्य, वस्तू संकेत,निर्माता,निर्मिती सहाय्य, वेशभूषा संबंधी काम करणाऱ्या पडद्यामागील ८ रंगकर्मींना गौरविण्यात आले.दहावी,बारावी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या रंगकर्मींच्या पाल्यांना सन्मानित करण्यात आले.सौ.वृषाली विजय पटवर्धन यांनी लिहिलेल्या नर्मदा परिक्रमे वरील ‘ अनुभूती ‘या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

नाट्यनिर्मात्या सौ.भाग्यश्री देसाई,उमा सरदेशमुख, सुवीर सबनीस , अभिजीत पणशीकर,रवींद्र भिसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

माधव थत्ते,रवी पाटील, शिरीष कुलकर्णी, विनायक कापरे, पुष्कर केळकर, प्रसाद घोटवडेकर, राकेश घोलप, संजय जाधव या पडद्यामागील कलाकारांचा सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम प्रशांत सभागृह(लोकमान्य नगर) येथे १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता  झाला.

अभिनेते विजय पटवर्धन,सौ.वृषाली पटवर्धन,सुरेंद्र गोखले, अथर्व सुदामे,पवन वाघुलकर,धनंजय आमोणकर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  विजय पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. चिन्मय पाटसकर यांनी सूत्रसंचालन केले. 

प्रकाशयोजना स्पॉटचं ग्रुपिंग करणारा रंगकर्मी , घोड्यावर चढून ते ॲडजस्ट करणारा, संपूर्ण प्रयोगभर डिमरवर बसून योग्य वेळी ब्लॅक आऊट करणारा  ऑपरेटर,कलाकारांचे संवाद नीट ऐकू जातील याची काळजी घेऊन योग्य म्युझिक पिस, योग्य वेळेला सोडणारा ध्वनी संयोजक,नेपथ्य उभे करणारा,अनेक फ्लॅट सीन गाडीवरून उतरवून ते रंगमंचावर योग्य पद्धतीने लावून नाटक संपल्यावर योग्य पद्धतीने गाडीत पुन्हा भरणारा मदतनीस, रंगमंच कामगार,कलाकार आणि तंत्रज्ञांना काय हवं नको ते बघणाऱ्या, नाटकाचा संपूर्ण हिशोब बघणाऱ्या निर्मिती प्रमुख अशा  विविध ८ प्रकारातील पडद्यामागील कलाकारांना या कार्यक्रमात गौरविण्यात आल्याने हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. 

यावेळी बोलताना सौ.भाग्यश्री देसाई म्हणाल्या,’रंगकर्मींच्या यशस्वी पाल्यांचा सत्कार त्यांना जबाबदारीची जाणीव देईल, पाठीवर थाप देईल,या शाबासकीतून त्यांनी आवडत्या क्षेत्रात  मोठे होण्याचा प्रयत्न करावा. पडद्यामागे राबणाऱ्या हातांचा सन्मान करण्याचा विजय पटवर्धन फाऊंडेशनचा उपक्रम अनोखा आहे. कृतज्ञतेची ही जाणीव समाजात रुजणे आवश्यक आहे.सांस्कृतिक विश्व फुलायला त्यातून मदत होईल.’ 

सौ. वृषाली पटवर्धन म्हणाल्या,’खडतर शारीरिक व्याधींनंतर केलेली नर्मदा परिक्रमा संस्मरणीय ठरली.तेथे रोज लिहिलेले अनुभव पुस्तक रुपात आले, याचा आनंद आहे. पुस्तक विक्रीतून आलेला निधी परिक्रमेतील आश्रमाला दिली जाणार आहे ‘.

महिला सेवा मंडळ, डॉ. जयश्री तोडकर, स्वाती ओतारी यांना लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार जाहीर

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे घोषणा ; मंदिराच्या १२८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून घोषणा 

पुणे :  श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार निराधार मुली आणि परित्यक्त महिलांसाठी तसेच अनाथ नवजात शिशूंना कायदेशीरपणे दत्तक देण्याचे काम करणा-या ‘महिला सेवा मंडळ’ या संस्थेला तसेच लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रियेसाठी जगद्विख्यात ओबेसिटी तज्ञ डॉ. जयश्री तोडकर आणि विरूपित पाषाण शिल्पांना नवसंजीवनी देणाऱ्या वज्रलेपनकार स्वाती ओतारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. हे पुरस्कार मंदिराच्या गुरुपौर्णिमा उत्सवात प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.

कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे म्हणाल्या, मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांची स्मृती चिरंतन रहावी, यासाठी ट्रस्ट तर्फे प्रतीवर्षी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, कला, क्रिडा, पत्रकारीता तसेच वैयक्तिक निपुणता या विविध क्षेत्रातील एकूण तीन कर्तृत्ववान महिलांचा व संस्थांचा ‘लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते. या वर्षी महिला व बालकल्याण क्षेत्रातील समर्पित कायार्साठी महिला सेवा मंडळ या संस्थेला देण्यात येणार आहे. मंडळ संचलित कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम संस्था कर्वे रस्ता येथे ८४ वषार्पासून कार्यरत आहे.

दुस-या पुरस्कारार्थी डॉ. जयश्री तोडकर या प्रख्यात शल्यविशारद असून लेप्रोस्कोपिक व बॅरिएट्रिक सर्जरी तज्ञ म्हणून १९९५ पासून जगप्रसिद्ध आहेत. लठ्ठपणाविषयी आणि डायबिटीस, ब्लड प्रेशर इत्यादी गंभीर आजारांविषयी सामाजिक जागृती त्या करीत असतात. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शिष्यवृत्ती आणि पुरस्कार देखील मिळाले आहेत.

तिस-या पुरस्कारार्थी स्वाती ओतारी या पुरातन मूर्तींना झळाळी देत त्यांचे मूळ रूप पुन:र्प्राप्त करून देण्याचे काम करतात. महाराष्ट्रातील अनेक मंदिरातील मूर्तींवर तयार झालेले शेंदूर लेपन काढून तसेच विरूपित झालेल्या पाषाण शिल्पांना मूळ स्वरूपात समोर आणण्याचे काम त्यांनी केले आहे. महिला कारागीर म्हणून त्यांचे हे काम वज्रलेपन क्षेत्रात अत्यंत वेगळे असून याकरता त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

मंदिराच्या १२८ व्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी श्री दत्त महाराजांची सालंकृत पूजा करण्यात आली. प्रियांका व अश्विनीकुमार कायस्थ हलवाई यांचे हस्ते लघुरुद्र करण्यात आला. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त संगणकीकृत देणगी पावती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मोबाईलसूत्रा टेक्नॉलॉजीचे संजय आठवले यांनी टेम्पल कीआॅस्क प्रणालीद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेब डिजिटल कंपनीचे भागीदार शुभम जाना यांनी संगणकीकृत अभिषेक व देणगी पावतीसाठी लागणारे लेनोवो कंपनीचे दोन टॅब देणगी दिले. देणगीदार संस्थेचे भागीदार मंगेश व सुवर्णा येरवा, विश्वेश देवधर आणि शुभम राजेंद्र जाना व कुटुंबीय यांचे उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी क्यू आर कोडचे तर कोषाध्यक्ष  महेश सूर्यवंशी यांचे शुभ हस्ते या टॅब्स चा लोकार्पण समारंभ मंदिरात संपन्न झाला. मंदिरात दिवसभर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.