पुणे-
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात घडला. अनधिकृतपणे भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना पुणे या ठिकाणी नेत असताना 19 पोलिस वाहनांच्या ताफ्यातील काही गाड्यांचा अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल 31 जण जखमी झाले असून, त्यात 19 पोलिस कर्मचारी आणि 12 बांगलादेशी आरोपींचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे येथे घेऊन जाण्यासाठी तब्बल 19 पोलिस वाहनांचा ताफा निघाला होता. विशेष म्हणजे या 19 वाहनांत एकूण तब्बल 160 बांगलादेशी होते. हा ताफा सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भातान बोगद्यात आला असता ही घटना घडली. वाहनांच्या ताफ्यातील एका गाडीने अचानक ब्रेक मारल्याने मागोमाग येणाऱ्या सुमारे 6 ते 7 पोलिसांच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक आरोपींसह पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.अपघातानंतर जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काही जण किरकोळ जखमी आहेत, तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुंबई पोलिस दलाचे कर्मचारी विजय माने हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील अडथळा दूर करत वाहतूक पूर्ववत सुरू केली. दुर्घटनाग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्या आहेत.