पुणे- “सोमवारपर्यंत हिंजवडी मेट्रोचे अडथळे दूर न केल्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (PMRDA) 10 कोटी रुपयांची दंडाची नोटीस पाठवली जाईल,” असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला आहे.
मुसळधार पाऊस, सकल भागात साठणारे पाणी अशातच मेट्रोचे रखडलेली काम अन् या सर्वांमुळे होणारी वाहतुक कोंडी.. या सर्व समस्यांमुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. अनेक तक्रारी करुनही महापालिकेकडून गंभीर दखल घेतली जात नाही. अशातच, पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांच्या या समस्येची गंभीर दखल घेतली असून मेट्रो अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. वाहतूक विभागाच्या बैठकीत पवारांनी शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडींचे खापर पवारांनी मेट्रोवर फोडले आहे.
झालेल्या या बैठकीमध्ये पवार यांनी हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या अडथळ्यांचा विशेष उल्लेख केला. यावेळी त्यांनी या परिसरातील परिसरातील राडारोडा हटवला नाही, तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. “सोमवारपर्यंत हिंजवडी मेट्रोचे अडथळे दूर न केल्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (PMRDA) 10 कोटी रुपयांची दंडाची नोटीस पाठवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी पुणे मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. मात्र, याच कामामुळं पुणेकरांनी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला आहे. अशातच पाऊस सुरु झाल्यामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. मेट्रोचा राडारोडा चिखलात मिसळल्यामुळं रस्ते अधिकच खराब झाले आहेत. त्यामुळं वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अशातच आषाढी वारीसाठी पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दाखल होणार आहेत. त्यामुळे पालखी मार्गावरील भाविकांना आणि दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना तासंतास रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पवारांनी कडक सूचना दिल्या आहेत.
पुण्यात पालखी आली की वारकरी मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडत असतात. त्यामुळे पालखी मार्गावरील भाविकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने राडारोडा हटवा असे आदेश त्यांनी दिले आहे. तसेच, दिवे घाटात सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे यंदा दिवे घाट चढताना वारकऱ्यांना अडचण येणार आहे. त्यामुळे फ्लेक्स जाहिरात फलक पालखी मार्गावरुन काढायला सांगितले आहे. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
“शासकीय अनुदान न घेता सेवाकार्य करणाऱ्यांना दानशूरांनी मदत करावी” – संदीप खर्डेकर.
पुणे-बाळासाहेब दाभेकर हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र आणणारे व त्यांच्यात स्नेहभाव निर्माण करणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच नव्हे तर रोजच त्यांच्याकडे येऊन बसणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एक वेगळे आणि अनुकरणीय उदाहरण प्रस्तुत केले आहे असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी काढले. ह्या दाभेकर पॅटर्न चे सर्वांनी अनुकरण करावे आणि विशेषतः राज्यातील नेत्यांना तर हे करणे गरजेचेच आहे असेही ते म्हणाले. यावेळी बाळासाहेब दाभेकर यांचा पगडी, वीणा व तुळशीमाळाने सत्कार करण्यात आला.या सत्कारामागची कल्पना ही बाळासाहेब दाभेकर यांच्या निस्पृह सामाजिक कार्याचा गौरव व्हावा या हेतूने असल्याचे दत्ताभाऊ सागरे आणि संदीप खर्डेकर म्हणाले. कोणतीही प्रसिद्धी न करता किंबहुना बहुतांश वेळा फोटोत सुद्धा न येता समाजसेवा करण्याचे बाळासाहेबांचे दातृत्व आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने याप्रसंगी वडगाव बुद्रुक च्या नवरत्न वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर भेट देण्यात आले. नावाजलेल्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळते मात्र अनेक संस्था ह्या शासकीय अनुदानाविना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अनाथ मुलं व वंचितांसाठी काम करतात, समाजातील दानशूरांनी अश्या संस्थांना मदत करण्याची गरज असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. नवरत्न वृद्धाश्रम च्या अनिता रोकडे, शांतिबन वृद्धाश्रम च्या अनिता देवकर,स्वामी आंगण डोणजे च्या अंजली जोशी, सेवाव्रत फाउंडेशन चे प्रदीप देवकुळे, उमेद फाउंडेशन चे राकेश सणस यासह अनेक सेवाभावी कार्यकर्ते आपापल्या परीने सेवाकार्य करत आहेत मात्र त्यांना पुरेशी मदत मिळत नाही व अनेकवेळा दैनंदिन खर्चाचा मेळ बसविताना तारांबळ होते असे संदीप खर्डेकर म्हणाले. अश्या संस्थांना मदत मिळवून देण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन तत्पर असून येथे किराणा सामान, डायपर व इतर वस्तुरूपाने मदतीसाठी 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले. बाळासाहेब दाभेकर यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने,भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, काँग्रेस चे नेते अभय छाजेड,भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,निरंजन दाभेकर, दाभेकर मित्र परिवाराचे मार्गदर्शक आणि सत्कार सोहोळ्याचे संयोजक दत्ता सागरे,प्रमोद घाडगे, राजाभाऊ पंडित, महेश वाघ,अनिल येनपुरे राजेश येनपुरे, योगेश समेळ, अर्चना पाटील,ऍड. मंदार जोशी,तुषार पाटील व अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहोळ्यानंतर “हा माझ्यासाठी भावनिक क्षण असून उर्वरित आयुष्य मी समाजसेवेसाठी वाहून घेणार असल्याचे बाळासाहेब दाभेकर म्हणाले. सत्कार समारंभनिमित्त भरलेल्या सर्वपक्षीय स्नेह मेळाव्यात अंकुश काकडे, दीपक मानकर, अरविंद शिंदे,रुपाली पाटील, परशुरामजी वाडेकर, अजित दरेकर व इतर अनेकांनी गप्पांचा फड रंगवत, हास्य कल्लोळात एकमेकांची खेचाखेची करत कोट्या करत पुण्याच्या राजकीय “सु” संस्कृती चे दर्शन घडविले.
पुणे दि. १४: आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त डॉ.योगेश म्हसे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे.
उंडवडी कडेपठार येथील बारामतीकडे जाणाऱ्या जुन्या तुकाराम महाराज पालखी मार्गावरील राडारोडा दूर करावा, रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, काम वेगाने पूर्ण करावे. इंदापूरकडे जाणाऱ्या पालखी महामार्गाचे कामाला वेग द्यावा. इंदापूर ते पंढरपूर दरम्यान पालखी महामार्गाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असून पालखी जाईपर्यंत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात. पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले बांधकाम साहित्य त्वरित बाजूला करावे.
महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपली अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. आवश्यकता असल्यास जनरेटरसाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
वादळात रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरात फलक खाली कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून अनधिकृत फलक तातडीने काढावे. त्यासाठी संपूर्ण मार्गावर महसूल, पोलीस अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त पाहणी करावी. अधिकृत जाहिरात फलकांचे संरचनात्मक स्थीरता परीक्षण (स्ट्रॅक्चरल स्टॅबिलीटी ऑडिट) करून घ्यावे, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.
कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख, दिंडीप्रमुखांशी संवाद साधून सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या वारकऱ्यांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करावे. असे आजार असलेल्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक ते तपासणीची व्यवस्था, औषधे पालखीमार्गावरील आरोग्य पथकांकडे ठेवावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विनय कुमार चौबे यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली. इतर उपस्थित जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना तसेच केलेल्या तयारीची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. पालखीचे रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी पालखी ट्रॅकिंग ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांची संख्या मोजण्यात येणार असल्यामुळे भविष्यात अचूक नियोजनासाठी उपयोग होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे, दि. १४: पुणे शहरात प्रवास करणारे नागरिक आणि वाहतूक विभागात समन्वयासाठी, परिस्थितीनुसार दुहेरी संवाद राहण्यासाठी आणि नागरिकांना वाहन चालवताना संबंधित परिसरातील वाहतूकीची माहिती तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने तयार केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे (PTP TRAFFICCOP APP) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
विधान भवन येथे आयोजित एका बैठकीत झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ॲप तयार करून घेण्यात आले आहे. यावेळी पुणे शहरच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या ॲपबाबत माहितीचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण केले.
पुणेकरांना उद्भवणाऱ्या नागरी समस्यांमध्ये मुख्यतः वाहतूक कोंडी, त्यातून घडणारे अपघात आणि वाहतूकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण आदी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यास प्रामुख्याने वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर प्रभावी कारवाई न होणे, हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरीकांना सक्षम करण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री. पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी संगणक अभियंत्यांकडून हे ॲप तयार करून घेण्यात आले आहे.
या ॲपमध्ये फुटपाथवर वाहन पार्किंग करणे, पदपथावरून वाहन चालविणे, जड वाहनांचे निर्बंधांचा भंग करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, काळ्या फिल्मचा वापर, फॅन्सी नंबर प्लेट, विरूद्ध दिशेने नो एंन्ट्रीतुन वाहन चालविणे आदी प्रकारचे धोकादायक नियमभंग करणान्या वाहन चालकांची छायाचित्रे नागरीक या ॲपवर अपलोड करू शकतील.
या व्यतिरिक्त रिपोर्ट इन्सीडेन्टअंतर्गत वाहतूक कोंडीस कारणीभूत असणाऱ्या अपघात, वाहनात बिघाड, रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी, रस्त्यात तेल गळती, रस्त्यावर पाणी साचणे, रस्त्यावर झाड पडणे, रस्त्यात बेवारस असणारे वाहन आदी अडथळ्यांची माहिती नागरीक या ॲपद्वारे वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षास कळवू शकतात. वाहतूक नियमभंगाचा फोटो पाठविणाऱ्या किंवा तक्रार करणाऱ्या नागरिकांची गोपनीयता राखली जाणार आहे. गोपनीयता भंग होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येईल.
अशी देता येईल माहिती: वाहतूक नियमभंगाची माहिती अपलोड करताना नियमभंग करणाऱ्या वाहनाचे छायाचित्र किंवा चित्रफीत पोस्ट करावे. संबंधित वाहनाची नंबरप्लेट सुस्पष्ट दिसणे आवश्यक आहे. वाहतूक अडथळ्यांची माहिती अपलोड करताना वाहतूक अडथळयाचे छायाचित्र किंवा चित्रफीत पोस्ट करावे. अडथळ्याचे वर्णन या टॅबमध्ये सविस्तर व अचूक माहिती देणे आवश्यक आहे.
या ॲपच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारीची पुढील ४८ तासांमध्ये पडताळणी करून वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर ऑनलाईन चलन तयार करतील.
अडथळ्यांबाबतची माहिती मिळाल्यावर वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकारी त्याची तात्काळ दखल घेवून, तक्रारीचे निरसन करण्यासाठी संबंधित वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी यांना किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस कळवून प्राप्त तक्रारींची पूर्तता प्राधान्याने करून घेतील. जेणेकरून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींवर तातडीने उपाययोजना होवून शहरातील वाहतूक सुरळीत राहील. या प्रणालीद्वारे माहिती मिळाल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेकडून करण्यात आले. 0000
शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण
पुणे, दि.१४: बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याची गरज आहे, शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडविण्याकरीता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करावे. राज्यात विविध प्रयोगशील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवित असून त्यांच्या उपक्रमाचे इतर शिक्षकांनीही अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने श्री गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरीता राज्य शासनाचा पुढाकार श्री. पवार म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने अंगणवाडी पासून पदव्युत्तर शिक्षणाकरीता १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या खोल्या उभारण्याकरीता अग्रक्रम देण्यात येत आहे. जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हजारो वर्षापासून मराठी भाषेचे असलेले अस्तित्व टिकविण्यासाठी इंग्रजी शाळेत पहिलीपासून मराठी भाषा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सुविधांनीयुक्त उत्कृष्ट ‘शालेय शिक्षण भवन’ उभारण्यात येत असून लवकर त्याचे उद्धघाटन करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्यावतीने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत मोठया प्रमाणात निधी मिळण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे, याकरीता विविध सामाजिक संस्था, विविध कंपन्या प्रतिसाद देत आहेत.
सरपंच आणि ग्रामपंचायतीने गावातील शिक्षणाची जबाबदारी घ्यावी शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारी ओळखून गावातील शिक्षणाची जबाबदारी घेऊन शिक्षण लोकचळवळ झाली पाहिजे. ग्रामसभेत शाळा कामकाजाचा आढावा घ्यावा, प्रत्येक गावात शैक्षणिक मेळावे घ्यावेत. शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. उच्च् पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी विद्यार्थी या नात्याने शाळेला मदत केली पाहिजे. शाळेचा दर्जा सुधारण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता, गुणवत्ता, दर्जा वाढीसोबतच आवश्यकतेप्रमाणे बदल केले पाहिजे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत असून याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात वापर करण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.
शिक्षणामुळे जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्याचे कार्य नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सुशिक्षित नागरिक देशाच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीत अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे आचार, विचार, उच्चार हे विकसित होत असतात. शिक्षणामुळे पुरोगामी सत्यशोधक पद्धतीने विचार करण्याची सवय लागते, सुसंस्कृत समाज घडतो, शिक्षण मानवाला विचार करण्याची ताकद देते, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते तसेच जीवनातील आव्हाने पेलण्याकरीता स्वत:ला सक्षम आणि संयमी बनविण्यासोबतच आपले हक्क व कर्तव्य व जबाबदारीची जाणीवही होते. आपला देश, समाज सुखी, समृद्ध, सुसंस्कृत घडविण्यासाठी शिक्षण हाच उत्तम पर्याय आहे म्हणून शिक्षणाकडे भविष्यातील गुंतवणूक म्हणून बघितले पाहिजे, यासर्व गोष्टींचा विचार करता राज्यशासनाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शिक्षणाची चळवळ उभी केली असून ही चळचळ अधिक मजबूत करण्याकरीता समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.
शैक्षणिक क्षेत्रात आधुनिकतेची जोड देण्याकरीता पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने 3 हजार 456 शाळांमध्ये ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमामुळे आरोग्य सेवेला डिजीटल, स्वयंपूर्ण, सर्वसमावेशक करण्यासोबतच सर्व सुविधांनीयुक्त ग्रामीण आरोग्य सेवेचा नवा चेहरा ठरतील. आगामी काळात पुणे मॉडेल शाळा, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्ही उपक्रमामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुणात्मक बदल घडविण्यास उपयोगी ठरतील, त्यामुळे हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व संबंधित अधिकारी, शिक्षक, सामजिक संस्था, नागरिकांनी योग्य समन्वय राखून काम करावे. याकामी शिक्षकांना प्रशिक्षित करुन त्यांना सक्षम करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आपली जबाबदारी आहे. आगामी काळात राज्यशासनाच्यावतीने ‘पुणे मॉडेल शाळा’ आणि ‘मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रम राज्यभर राबविण्याबाबत विचार करण्यात येईल, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या कार्याला राज्यशासन नेहमी सहकार्य करेल, असेही श्री. पवार म्हणाले.
राज्यातील विविध भागात आदर्श शिक्षक पवित्र भावनेतून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे पवित्र कार्य करीत असून अशा आदर्श शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे काम करण्यात येत आहे. आगामी काळात शिक्षकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासन सहकार्य करेल.
पहिलीच्या मराठी माध्यमांसाठी सीबीएससी पटर्नच्या शाळेत जे चांगले उपक्रम राबविण्यात येतात ते उपक्रम मराठी शाळेमध्ये राबविण्यात येतील. पालकांच्या मनामध्ये सीबीएससी पॅटर्नबद्दल कुतूहल आहे. त्यामुळे या शाळेंच्या चांगल्या गोष्टी स्वीकारून विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान देण्याचे कार्य शिक्षण विभाग करणार आहे. मराठी माध्यमांच्या शाळांसाठी पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी संख्येची मर्यादा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात इतर विभागांचे सहकार्य घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची संख्या वाढण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे.
यापुढे शाळांच्या शैक्षणिक सहली शेतकऱ्यांच्या शेतावर, गड किल्ले, मोठ्या बँका, प्रकल्प या ठिकाणी नेण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे आरोग्य पत्रिका तयार करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक क्षेत्रात बदल घडविण्याकरीता करण्यात आलेल्या सामजस्य करारामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून लाभ मिळणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताकरीता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी शाळेत उपस्थित राहणार असून नागरिक, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी यावेळी केले.
शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हे
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, विविध शाळा आधुनिक होत असतांना शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याचे आपल्यासमोर आव्हाने असून याकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक विचार, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबत विकसीत भारताकडे वाटचाल करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत विचार करावा.
असर संस्थेच्या अहवालानुसार पुणे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने सुट्टीच्या काळात विद्यार्थ्याचे उन्हाळी वर्ग घेतले आहेत, याबद्दल जिल्हा परिषद आणि पालकांचे अभिनंदन केले. राज्यातील शाळेत ‘सखी सावित्री समिती’ शाळेत स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि मुलींची सुरक्षितता होण्यास मदत झाली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये शाश्वत विकासाची ध्येय आणि दुर्ग किल्ल्याच्या विकासाच्याकरीता विशेष लक्ष दिले आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
श्री. पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात 3 हजार 546 शाळांपैकी 303 शाळा या पुणे मॉडेल स्कूल व 108 पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्याकरीता जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे केवळ आधुनिकीकरण करण्यासोबतच त्या माध्यमातून दर्जेदार आणि सर्वसमावेशक सेवा देणे हा मुख्य उद्देश आहे, असे श्री.पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पुणे मॉडेल स्कुल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; मॉडेल स्कुल लोगो तर श्री. भुसे यांच्या हस्ते ‘पुणे निपुण’ डॅशबोर्डचे अनावरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत पुणे मॉडेल स्कुल उभारणीकरीता सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या एकूण 7 संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसचे ‘ज्ञानदर्शन’ कृतीपुस्तिका संचाचे अनावरण तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा’ टप्पा क्र.२ जिल्ह्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी श्री. पवार यांच्या हस्ते हुंडई मोटर इंडिया फाउंडेशनच्यावतीने मावळ तालुक्यातील टाकवे आणि येळसे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दोन अत्याधुनिक अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच शाळा, ग्रामीण आणि दुर्गम भागात कौशल्य शिक्षणाचा प्रसार, शिक्षक व प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देणाऱ्या प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कर्जाचे व्याजदर ०.५०% ने कमी केले आहेत. या कपातीनंतर, SBI कडून सर्व प्रकारचे कर्ज घेणे स्वस्त झाले आहे. आता SBI गृहकर्जाचा व्याजदर वार्षिक ७.५०% पासून सुरू होईल.
आरबीआयने अलीकडेच रेपो दर ६.००% वरून ५.५०% पर्यंत कमी केला आहे. त्यानंतर बँकांनीही एफडी आणि कर्जांवरील व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेनेही कर्जांवरील व्याजदर कमी केले आहेत. या व्याजदर कपातीचा फायदा त्या सर्व लोकांना होईल ज्यांचे कर्ज रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) शी जोडलेले आहे…
नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी: जर तुम्ही नवीन गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल. उदाहरणार्थ, एसबीआयच्या नवीन गृहकर्जाचा व्याजदर पूर्वी ८% पासून सुरू होत होता, आता तो सुमारे ७.५०% पर्यंत कमी होईल. जुन्या कर्जधारकांसाठी: ज्यांनी आधीच RLLR शी जोडलेले फ्लोटिंग रेट होम लोन घेतले आहे, त्यांचा व्याजदर पुढील रीसेट कालावधीत कमी होईल. यामुळे त्यांचा EMI कमी होईल किंवा कर्जाचा कालावधी कमी होईल. जर कर्ज निश्चित दराशी जोडलेले असेल तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. जर रेपो दर कमी झाला तर RLLR देखील कमी होतो-बँका त्यांच्या कर्जाचा व्याजदर RLLR च्या आधारावर ठरवतात. जर रेपो दर कमी झाला तर RLLR देखील कमी होतो आणि कर्जाचे व्याजदर देखील कमी होतात. RLLR मध्ये, बँक रेपो दरावर मार्जिन जोडते, जेणेकरून त्यांचे खर्च आणि नफा कव्हर करता येईल.
उदाहरण:
समजा आरबीआय रेपो रेट ५.५०% आहे आणि बँक २.६५% मार्जिन जोडते, तर आरएलएलआर ८.१५% होईल. क्रेडिट प्रोफाइलवर आधारित व्याजदर निश्चित करण्यासाठी क्रेडिट रिस्क प्रीमियम RLLR मध्ये जोडला जातो. जर RLLR ८% असेल आणि तुमचा क्रेडिट रिस्क प्रीमियम ०.५% असेल, तर तुमचा गृहकर्जाचा व्याजदर ८.५% असेल. आता, दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे…
१. प्रश्न: जुन्या आणि नवीन कर्जांवर समान फायदे उपलब्ध असतील का?
उत्तर: आरबीआयच्या नियमांनुसार, फ्लोटिंग रेट कर्जे वेळोवेळी रेपो रेटनुसार रीसेट करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की ज्यांनी आधीच कर्ज घेतले आहे त्यांचा व्याजदर आपोआप कमी होईल, कारण रेपो रेटमधील कपातीचा फायदा बँकेला द्यावा लागतो. परंतु, नवीन कर्ज घेणाऱ्यांना पूर्ण लाभ मिळू शकत नाही. कारण बँका त्यांच्या नफ्याचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त मार्जिन म्हणजेच रेपो रेटवर जोडणारा स्प्रेड वाढवू शकतात.
२. प्रश्न: जुने कर्जधारक स्थिर कर्जावरून फ्लोटिंग कर्जात बदलू शकतात का?
उत्तर: जर तुमचे कर्ज MCLR किंवा निश्चित दराशी जोडलेले असेल, तर तुम्ही बँकेशी बोलून ते RLLR वर स्विच करू शकता. तथापि, यासाठी काही शुल्क भरावे लागू शकते. जर तुमचे कर्ज अजूनही सुरुवातीच्या काळात असेल, तर स्विच केल्याने दीर्घकाळात व्याज वाचू शकते.
या वर्षी रेपो रेट ३ वेळा कमी करण्यात आला आहे, १% ने कपात करण्यात आली आहे
फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयने व्याजदर ६.५% वरून ६.२५% पर्यंत कमी केले होते. ही कपात सुमारे ५ वर्षांनी चलनविषयक धोरण समितीने केली. एप्रिलमध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत व्याजदरात ०.२५% कपात करण्यात आली. आता तिसऱ्यांदा दर कमी करण्यात आले आहेत. म्हणजेच, चलनविषयक धोरण समितीने तीन वेळा व्याजदरात १% कपात केली आहे.
गृहकर्ज घेताना या ३ गोष्टी लक्षात ठेवा
१. प्री-पेमेंट पेनल्टीबद्दल खात्री करा अनेक बँका वेळेपूर्वी कर्ज फेडल्यास दंड आकारतात. अशा परिस्थितीत बँकांकडून याबद्दल संपूर्ण माहिती घ्या, कारण वेळेपूर्वी कर्ज फेडल्यास बँकांना अपेक्षेपेक्षा कमी व्याज मिळते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून काही अटी आणि शर्ती लादल्या जातात. म्हणून गृहकर्ज घेताना याची संपूर्ण माहिती घ्या.
२. तुमच्या CIBIL स्कोअरची काळजी घ्या CIBIL स्कोअर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास उघड करतो. वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत, बँका निश्चितपणे अर्जदाराचा CIBIL स्कोअर पाहतात. क्रेडिट स्कोअर अनेक विशेष क्रेडिट प्रोफाइलिंग कंपन्यांद्वारे ठरवला जातो.
यामध्ये, तुम्ही आधी कर्ज घेतले आहे का किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड कसे वापरले आहे इत्यादी पाहिले जाते. कोणत्याही व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर परतफेडीचा इतिहास, क्रेडिट वापर प्रमाण, विद्यमान कर्जे आणि वेळेवर बिल भरणे यावरून ठरवला जातो. हा स्कोअर ३००-९०० च्या श्रेणीत असतो, परंतु कर्ज देणारे ७०० किंवा त्याहून अधिक स्कोअर चांगला मानतात.
३. ऑफर्सवर लक्ष ठेवा बँका वेळोवेळी कर्ज घेणाऱ्यांना चांगल्या ऑफर्स देत राहतात. अशा परिस्थितीत कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही सर्व बँकांच्या ऑफर्स जाणून घेतल्या पाहिजेत. कारण घाईघाईत कर्ज घेणे तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकते. कर्ज घेण्यापूर्वी योग्य संशोधन करा.
पुणे दि. १४: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कंदेवाड यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सादरीकरण केले. सद्यस्थितीत तपासणीमध्ये ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ7-9 हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा दुखणे असे सौम्य आजार होतात. फक्त रक्तशर्करा, कर्करोग आदी सहव्याधी कमी असलेले, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेले नागरीक आदींना थोडा धोका जास्त आहे. अशांनी गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. श्वसनदाह वाढल्यास त्वरीत जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी व इलाज करावा, असे यावेळी सांगण्यात आले.
सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, विभागातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यावेळी होते. त्यांना कोविड व वारीबाबत काळजी घेण्याच्या सूचना व सर्व रुग्णालये कोविडच्या संभाव्य साथीसाठी सज्ज ठेवण्याच्या व सतत माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘बीएआय’तर्फे ‘बांधकाम क्षेत्राचा विकास व स्वयं-पुनर्विकास’ यावर चर्चासत्र
पुणे: “बांधकाम क्षेत्रातील पारदर्शी व्यवहार, ग्राहकांच्या व विकासकांच्या हितासाठी ‘महारेरा’ ही नियामक संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. दोन्ही बाजूने सारासार विचार करून सातत्याने नियमांत बदल व प्रणालीमध्ये सुसूत्रीकरण आणण्यावर भर दिला जात आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राचा विकास व जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळत आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे (महारेरा) माजी अध्यक्ष व गृहार्मोनी रिडेव्हल्पमेंट स्टेकहोल्डर्स फेडरेशनचे संस्थापक गौतम चॅटर्जी यांनी केले. विकासकांनी ‘महारेरा’कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पुणे सेंटरच्या वतीने ‘बांधकाम क्षेत्राचा विकास व स्वयं-पुनर्विकास’ यावर आयोजित चर्चासत्रात चॅटर्जी बोलत होते. शनिवार पेठेतील विष्णुकृपा सभागृहात आयोजित चर्चासत्रामध्ये ‘महारेरा’चे सचिव प्रकाश साबळे, तक्रार निवारण संचालक सुधाकर देशमुख, ‘बीएआय’ महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव सी. एच. रतलानी, खजिनदार महेश राठी, आनंद गुप्ता, पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे, चर्चासत्राच्या समन्वयिका व बीएआय महाराष्ट्र गृहनिर्माण व रेरा समितीच्या अध्यक्षा आर्कि. ज्योती चौगुले आदी उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिक, विकासक, स्थापत्य अभियंते, एमईपी सल्लागार, सरकारी कंत्राटदार, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, कर सल्लागार यांच्यासह ४०० पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. ‘बीएआय’च्या वतीने ‘ओपन हाऊस ट्रेनिंग’ उपक्रम सुरू करण्यासह इतर काही मागण्यांचे निवेदन साबळे यांच्याकडे दिले. त्याला साबळे यांनी मान्यता देत ‘ओपन हाऊस ट्रेनिंग’ सुरू करण्याची घोषणा केली.
स्वयं-पुनर्विकास प्रक्रियेवर आणि महाराष्ट्रातील गृह पुनर्विकास भागीदार मंडळाच्या भूमिकेवर विचार मांडताना गौतम चॅटर्जी म्हणाले, “जुन्या इमारतींचा पुनर्विकास ही काळाची गरज असून, मुंबईपाठोपाठ पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प होत आहेत. सोसायट्यांनी स्वतः एकत्रित येऊन पुनर्विकास करण्यासाठी चालना दिली जात आहे. पुनर्विकास करताना पारदर्शकता, विश्वास आणि वेळेचे बंधन या तीन गोष्टीना खूप महत्व आहे. प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी घरमालक आणि विकासक यांच्यातील समंजसपणा व समन्वय गरजेचा असतो.”
प्रकाश साबळे म्हणाले, “घर खरेदीदारांची फसवणूक होऊ नये, त्यांना योग्य वेळेत घराचा ताबा मिळावा, यासाठी विकासकावर नियमनासाठी काम करणारी ‘महारेरा’ ही संस्था आहे. विकासकांच्या सोयीसाठी ‘महारेरा’ पोर्टल सुलभ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ‘ओपन हाऊस ट्रेनिंग’ पुण्यातही सुरु होणार आहे. ‘महारेरा’कडे देशात दीड लाख प्रकल्पांची नोंद झाली असून, त्यातील ५० हजार प्रकल्प महाराष्ट्रातील, तर एकट्या पुण्यातील १२७८० प्रकल्पांची नोंद झालेली आहे. पुण्यातील विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
सुधाकर देशमुख यांनी ‘क्यूपीआर’ अनुपालन, प्रकल्प विस्तार, दुरुस्ती, कालबाह्यता आणि स्थगित प्रकरणांवरील महत्त्वपूर्ण अद्ययावत माहिती दिली. ते म्हणाले, “तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘महारेरा’ सातत्याने पुढाकार घेत आहे. परंतु, अनेकदा विकासकाकडून चुकीची वा अर्धवट माहिती दिली जाते. त्यात सुधारणा करण्याच्या सूचना देऊनही दुरुस्ती झाली नाही, तर दंड आकारावा लागतो. ग्राहक प्रतिनिधींचे सहकार्यही अपेक्षित असते. तक्रारी निकाली काढण्यासह त्यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यावर भर दिला जातो.
रमेश प्रभू यांनी स्वयंपुनर्विकास करण्याला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राच्या सहकार आयुक्तालयानेही स्वयंपुनर्विकासासाठी निधी व कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना नागरी बँकांना केल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. सीए एस. लक्ष्मीनारायणन म्हणाले, “पुनर्विकास प्रकल्पात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची भूमिका महत्त्वाची आहे. भावनिक बंध, फिजिबिलिटी रिपोर्ट, दस्तावेज, कायदेशीर बाबींची पूर्तता, टेंडरिंग आदी गोष्टी त्याला पहाव्या लागतात.”
आर्कि. ज्योती चौगुले यांनी गौतम चॅटर्जी, प्रकाश साबळे आणि सुधाकर देशमुख यांच्याशी मुक्त संवाद केला. जगन्नाथ जाधव यांनी विकासक, कंत्राटदार यांच्या अडचणी मांडल्या. तसेच महाराष्ट्रातील कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेली ९० हजार कोटींची थकबाकी देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. अजय गुजर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एन. रतलानी यांनी आभार मानले.
‘महारेरा’चे चेअरमन मनोज सौनिक यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, तसेच ‘महारेरा’मधील कोर्ट केसेस जलद गतीने निकाली लागून, ग्राहकांना न्याय मिळत असल्याबद्दल बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने सौनिक यांचा सन्मान केला. सौनिक यांच्या वतीने प्रकाश साबळे यांनी हा सत्कार स्वीकारला. चर्चासत्रातील प्रमुख गोष्टी – पुण्यात ओपन हाऊस ट्रेनिंग सुरू करण्यासाठी ‘बीएआय’च्या प्रस्तावाला मान्यता – ‘क्यूपीआर’मध्ये अकाउंट रिओपन करण्याची प्रक्रिया सुलभ व जलद व्हावी – डेव्हलपर्स आणि प्राधिकरण यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे – प्लॉटिंग लेआऊटमधील डी-३ बाबतची समस्या अधोरेखित झाली. – या विषयात संबंधित प्लॅनिंग ऍथॉरिटीसोबत पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन – अनेक तांत्रिक आणि प्रस्थापित प्रक्रियांबाबत डेव्हलपर्सच्या शंकांचे निरसन – बिल्डर आणि डेव्हलपर यांची भूमिका अधिक स्पष्ट झाली – महारेरा आणि डेव्हलपर्स यांच्यातील संवादाचा सेतू निर्माण झाला
पुणे-संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजन करण्यात आलेले आहे. भाविक नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक १६/०६/२०२५ पासून दिनांक २०/०६/२०२५ पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण १४६ बसेस संचलनात राहणार आहेत. श्री क्षेत्र आळंदी करिता दिनांक १९/०६/२०२५ रोजी रात्रौ १२:०० वा. पर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय दिनांक १६/०६/२०२५ पासून दिनांक २०/०६/२०२५ पर्यंत देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून नियमितपणे संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकूण ३७ बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा २३ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिनांक २०/०६/२०२५ रोजी आळंदी येथून पालखी प्रस्थान होत असल्यामुळे पहाटे ०३:०० वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा १६ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी ०५:३० वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३ बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल. तसेच पुण्याहून दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक २२/०६/२०२५ रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२:०० ते ०१:०० दरम्यान थांबणार असल्याने त्या वेळेत महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तदनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळी कांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक सुरू ठेवण्यात येईल. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी, गंगाधाम चौकामध्ये नुकतेच ट्रकने उडवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा मु्द्दा चर्चेत असतानाच चांदणी चौकात भीषण अपघाताची घटना काल रात्री घडली . या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे भयावह दृश्य समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने करकचून ब्रेक दाबला यामुळं मागील कंटनेरमधील सळ्या थेट केबिनमध्ये घुसल्या. यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. . ट्रक हे लांब लोखंडी रॉड्स घेऊन ते चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होता.
मुंबईकडून बंगळूरूकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलिकडे महामार्गाच्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला होता. इतक्यात एक अर्टिगा कार ट्रकच्या आडवी आली. अर्टिगा चालकाने या ट्रेलरसमोर येऊन आपलं वाहन विरुद्ध दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी कार चालकाला वाचवण्यासाठी ट्रक चालकाने जोरात ब्रेक लावला. अन् पुढे होत्याच नव्हतं झाले. हा ट्रक मूळचा राजस्थानचा असून चालक हाच याचा मालक असल्याची माहिती आहे. ज्या अर्टिगा चालकामुळे हा अपघात झाला तो जागेवरून निघून गेला. याबाबत हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना घडली आहे. कार्बन मोनॉक्साईडच्या गळतीमुळे कंपनीतील तब्बल 25 महिला कामगार बेशुद्ध झाल्या असून, एकूण 27 जणांवर या विषारी वायूचा परिणाम झाला आहे. सर्व बाधितांना तात्काळ उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना तुर्भे एमआयडीसी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळील डी-326 क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये घडली. सकाळच्या सुमारास काम सुरु असतानाच महिला कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तर काहींना डोकेदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागली. पाहता पाहता अनेक महिला बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु करत सर्वांना बाहेर काढले.
कंपनीतील 27 कामगारांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये बहुसंख्य महिला कामगार असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने सर्व रुग्णांवर आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली असून, पुढील उपचार सुरु आहेत.
प्राथमिक तपासणीतून समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीतील रासायनिक प्रक्रियेमधून कार्बन मोनॉक्साईड (CO) वायूची गळती झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कार्बन मोनॉक्साईड हा रंगहीन, वासहीन व अत्यंत विषारी वायू असून, याचा थोडाही संपर्क शरीरावर गंभीर परिणाम करू शकतो.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून औद्योगिक क्षेत्रांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना वाढत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आणि अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
सकाळी इस्रायलने 200 फायटर जेटने इराणची 6 अणू-सैन्य ठिकाणे उध्वस्त केली… शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला ज्यामध्ये २० वरिष्ठ कमांडर ठार झाले. यामध्ये लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांचाही समावेश आहे. सकाळी इस्रायलने २०० लढाऊ विमानांनी ६ ठिकाणी हल्ला केला. यामध्ये अनेक अणु लक्ष्ये आणि लष्करी स्थळांना लक्ष्य करण्यात आले.यानंतर, दुपारी इराणने इस्रायलवर प्रत्युत्तर देत १०० हून अधिक ड्रोन उडवले. इस्रायली सैन्याने (आयडीएफ) दावा केला आहे की त्यांनी सर्व ड्रोन पाडले आहेत. आतापर्यंत एकही ड्रोन इस्रायलच्या सीमेवर पोहोचलेला नाही.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की इराणने अणु करारावर स्वाक्षरी करावी अन्यथा त्याला मोठ्या हल्ल्याला सामोरे जावे लागेल. ट्रम्प म्हणाले की हे करार सर्व काही संपण्यापूर्वीच करावे. आज सकाळी इस्रायलने २०० लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने तेहरानभोवती असलेल्या किमान ६ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या ६ पैकी ४ ठिकाणी अणु तळ देखील आहेत.
इराणचा आयआरजीसी कमांडर मारला गेला-इराणच्या सरकारी माध्यमांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर हुसेन सलामी इस्रायली हल्ल्यात मारले गेल्याची पुष्टी केली आहे.अल-जझीराच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात इराणचे दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ, मोहम्मद मेहदी तेहरानची आणि फरदून अब्बासी यांचाही मृत्यू झाला.या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी, इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि काही वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी म्हणाले की, आमचे सैन्य इस्रायलला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही.
नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधला. यादरम्यान त्यांनी मोदींना परिस्थितीची माहिती दिली.इराणवरील हल्ल्यानंतर नेतान्याहू यांनी ३ देशांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त यामध्ये जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्ट्झ आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा समावेश आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी संवाद साधतील. नेतन्याहू म्हणाले, येत्या काही दिवसांत ते या नेत्यांशीही संवाद साधतील.
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते आकुर्डीतील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
प्राधिकरणाच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, धावणे अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त खराडे, अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, प्रमोद कुदळे, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पुणे, दि. १३: अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पुणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला.
कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या प्रकरणांत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करुन सदर कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास उपलब्ध करुन द्यावेत. ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच पोलीस विभागाने त्याबाबत तातडीने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे व नागरी हक्क संरक्षण शाखा यांना अहवाल सादर करावा आणि पिडीत व्यक्तींचे जातीचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी पोलीस विभागाने संबंधित पिडीत व्यक्तींकडे पाठपुरावा करावा. सामाजिक न्याय दिना निमित्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम जनजागृती करीता कार्यशाळा आयोजित करावी, अशा सूचना समितीद्वारे देण्यात आल्या.
सदरचा आढावा अध्यक्षांच्या परवानगी ने सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी घेतला. बैठकीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पुणे ग्रामीणचे पोलिस उप अधीक्षक दिलीप शिंदे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य साधू बल्लाळ, संतोष कांबळे उपस्थित होते.
प्लेन क्रॅश- पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी अहमदाबादमधील विमान अपघातातील एकमेव वाचलेले रमेश विश्वास कुमार यांची भेट घेतली. रमेश अपघातात जखमी झाले आहेत आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.रमेश यांनी डीडी न्यूजला सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि अपघात कसा झाला याची विचारपूस केली. रमेश विमानाच्या सीट क्रमांक ११ अ वर बसले होते. अपघातानंतर ते स्वतः अपघातस्थळावरून बाहेर आले.रमेश म्हणाले, ‘मला विश्वासच बसत नाहीये की मी जिवंत कसा बाहेर आलो.’ त्यांनी सांगितले की विमान कोसळताच त्यांच्या बाजूचा दरवाजा तुटला. मग त्यांनी त्याचा सीटबेल्ट काढला आणि बाहेर पळून गेले.
विश्वास कुमारची कहाणी, म्हणाले- मला विश्वासच बसत नाहीये, मी कसा वाचलो
प्रश्न: अपघात कसा झाला? उत्तर: सगळं माझ्या समोर घडलं. ते कसं घडलं ते मला माहित नाही. मी जिवंत कसा बाहेर आलो यावर माझा विश्वासच बसत नाही. काही क्षण मला वाटलं की मी मरणार आहे. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला वाटलं की मी जिवंत आहे. मला वाटलं की मी इथून बाहेर पडू शकेन आणि मी बाहेर पडलो. प्रश्न: विमानाने उड्डाण करताच काय झाले? उत्तर: ते उडताच, पाच ते दहा सेकंदात ते थांबल्यासारखे वाटले. नंतर हिरवे आणि पांढरे दिवे चालू झाले. नंतर वेग वाढवताच, ते त्याच वेळी पडले आणि एक स्फोट झाला. प्रश्न: विमान हॉस्टेलवर कोसळले तेव्हाच तुम्ही बाहेर आलात? उत्तर: विमानाच्या ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, बरेच लोक तिथेच अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर काही रिकामी जागा दिसली, म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकत नव्हते. दोन एअर होस्टेस, एक काका-काकी आणि माझ्या डोळ्यासमोर सर्वकाही जळत होते. प्रश्न: तुम्ही तिथून पायी आलात. उत्तर: होय. विमानात २४२ लोक होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला
एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-१७१ (बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान) अहमदाबादहून लंडनला जात होते. गुरुवारी दुपारी १.४० वाजता ते कोसळले. विमानात एकूण २३० प्रवासी होते, ज्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. उर्वरित १२ क्रू मेंबर्स होते. एक प्रवासी बचावला. २४० लोकांचा मृत्यू झाला आहे.ज्या इमारतीत विमान आदळले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी इमारतीत ५० ते ६० डॉक्टर उपस्थित होते, त्यापैकी १५ हून अधिक जखमी झाले आहेत. अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह पूर्णपणे जळालेले होते.