पुणे : शरयू रांजणे हिने पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन सुपर-५०० बॅडमिंटन स्पर्धेत चार गटांत विजेतेपद पटकावले. तिने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी, मुलींच्या दुहेरीचे, मिश्र दुहेरी आणि १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत शरयूने सोयरा शेलारला २१-१६, २१-१३ असे नमविले. यानंतर शरयूने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत ओजस जोशीच्या साथीने अग्रमानांकित देवांस सकपाळ- सफा शेख जोडीला २१-१७, २१-१२ असे पराभूत करून जेतेपद पटकावले. शरयूने १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत सोयरा शेलारला २१-१४, २१-४ असे पराभूत करून तिहेरी यश मिळवले. यानंतर १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत शरयूने सोयरा शेलारच्या साथीने बाजी मारली. या जोडीने अंतिम फेरीत जुई जाधव-सफा शेख जोडीचे आव्हान २१-६, १६-२१, २१-१७ असे परतवून लावले.
चिन्मय, जतिनला दुहेरी मुकुट
चिन्मय फणसेने १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मयने एकेरीच्या अंतिम फेरीत माधव कामतला २१-१४ २१-१२ असे नमविले. यानंतर चिन्मय फणसेने सायजी शेलारच्या साथीने दुहेरीचे जेतेपद पटकावले. चिन्मय-सायजीने हृदान पाडवे- विहान कोल्हाडे जोडीवर २१-१७, २१-१४ अशी मात करून जेतेपद पटकावले. जतिन सराफने १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे आणि १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. दुहेरीच्या अंतिम फेरीत जतिन सराफने कायरा रैनाच्या साथीने सायजी शेलार-तेजस्वी भुतडा जोडीवर २२-२०, २१-१७ असे नमविले. यानंतर जतिनने १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत खुश दीक्षितला २१-९, २१-९ असे सहज पराभूत करून दुहेरी मुकुट मिळवला. कायरानेही दुहेरी यश मिळवले. तिने १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीच्या जेतेपदानंतर १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने गार्गी कामठेकरला २१-९, २१-१२ असे पराभूत केले.
भागवतचे दुहेरी यश
हर्षद भागवतने स्पर्धेत ४० वर्षांखालील पुरुष एकेरी आणि ३५ वर्षांखालील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. भागवतने ४० वर्षांखालील गटात आदित्य काळेला २१-१३, २१-१७ असे, तर ३५ वर्षांखालील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नवीनकुमारला २१-१८, २१-८ असे पराभूत केले.
अंतिम निकाल – ४० वर्षांखालील मिश्र दुहेरी – सचिन मानकर – आरती सिनोजिया वि. वि. तेजस किनंजवाडेकर – राधिका इंगळहळीकर २१-१९, १४-२१, २१-१४,
६० वर्षांखालील पुरुष एकेरी – अनिल भंडारी वि. वि. भरत भोसले २३-२१, १६-७ (जखमी होऊन निवृत्त).
३० वर्षांखालील मिश्र दुहेरी – गणेश सपकाळ – आरति सिनोजिया वि. वि. अदिती रोडे – नचिकेत धायगुडे २१-१६, २१-१२.
३५ वर्षांखालील मिश्र दुहेरी – स्वानंद भागवत – अमरजा पानसे वि. वि. अभिषेक भाकत – दिव्या तेनोझी २१-१५, २१-१९.
४० वर्षांखालील महिला एकेरी – अदिती रोडे वि. वि. विभा धिमान २१-१०, २१-१२.
३० वर्षांखालील पुरुष एकेरी – गणेश सपकाळ वि. वि. नचिकेत धायगुडे १९-२१, २१-१४, २१-११