सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने विठ्ठल काटे यांचा सन्मान
समाजाला हास्ययोगाद्वारे निरोगी ठेवणाऱ्या विठ्ठल काटे यांच्या कार्याचा गौरव
पुणे : आजच्या धकाधकीच्या काळात बहुतेकजण चिंताग्रस्त आविर्भावात वावरताना दिसतात. अशा वेळी लोकांना एकत्रित करून त्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची कला शिकवत, हास्य आणि व्यायामाद्वारे निरोगी ठेवण्यात विठ्ठल काटे यांचा मोलाचा वाटा आहे; असे प्रतिपादन ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांनी केले. आपण यंत्रयुगात असलो तरी यंत्राच्या नादी लागून त्याच्या अधीन होणे अयोग्य आहे. आज समाजाला हसविण्याची आज गरज आहे. याकरिता यंत्राचा वापर मर्यादित करा, एकत्र या, संवाद साधा, एकमेकांना समजावून घ्या आणि हास्ययोगाच्या माध्यमातून जगण्याचा आनंद लुटा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सृजन फाऊंडेशन आयोजित सृजन महोत्सवातील अखेरच्या दिवशी (दि. 15) सृजन फाऊंडेशन आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पवार बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अधीश प्रकाश पायगुडे, उपाध्यक्ष पोपटलाल शिंगवी, सुमन काटे मंचावर होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
समाजाला हसवीण्यासाठी विठ्ठल काटे करीत असलेल्या कार्याचा उल्हास पवार यांनी गौरव केला. जगात काहीही घडले तरी पुण्याचा माणूस चिंताग्रस्त असतो, जगाचा भार जणू आपल्यावर येऊन पडला आहे अशा आविर्भावात समाजात वावरत असतो, असा पुणेरी टोमणा पवार यांनी मारल्यानंतर सभागृहात हास्य फुलले.
अवजड खुर्ची आणि दिल्लीत पवार..
राजकारणात खुर्चीची नेहमीच ओढाओढ होत असते, पण मंचावर मान्यवरांसाठीच्या खुर्च्या अवजड असल्याने दुसऱ्याने ओढल्या शिवाय त्या हलत नाहीत अशी मिश्लिक टिप्पणी करून पवार म्हणाले, दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन समारोहाला स्वागताध्यक्ष या नात्याने शरद पवार उपस्थित असणार आहेत तर अखेरच्या दिवशी अजित पवार हजेरी लावणार आहेत हा योगायोग पाहून महाराष्ट्रातील जनतेच्या मुखावर नक्कीच हास्य उमटेल.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृष्णकुमार गोयल म्हणाले, गेली 27 वर्षे विठ्ठल काटे हास्ययोग परिवाराच्या माध्यमातून देश-परदेशातील नागरिकांना हसवत आहेत. ज्या वयात नवीन मैत्र करणे अवघड जाते त्या वयातील ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे नवचैतन्य हास्ययोगाद्वारे अनेकांचे स्नेह जुळले आहेत. काटे यांचे कार्य पाहून त्यांना पद्म पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
स्वच्छ पुणे आणि हसरे पुणे हेच ध्येय : विठ्ठल काटे
सत्काराला उत्तर देताना विठ्ठल काटे म्हणाले, हा सत्कार माझा वैयक्तिक नसून नवचैतन्य हास्य परिवाराच्या कामाला, हसणाऱ्यांना मिळालेला पुरस्कार आहे. स्वच्छ पुणे आणि हसरे पुणे हे आपले ध्येय असून हास्ययोगातून नागरिक आनंदी आणि सशक्त करण्याचा मानस आहे. हास्ययोग परिवार हा स्थलांतरित पालक, निवृत्त नागरिक यांचा आधार असून त्यांना मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीही देत आहे. प्रत्येक घर, उंबरा आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हसरी करायची इच्छा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अधीश पायगुडे यांनी प्रास्ताविकात सृजन फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचिती गुर्जर यांनी केले तर आभार पोपटलाल शिंगवी यांनी मानले. डॉ. अनघा जोशी यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.