योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे, – ओजस जोशीला पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुटाची संधी आहे. ओजसने स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले असून, त्याने आणखी दोन गटांत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पीवायसी येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत चौथ्या मानांकित ओजसने अग्रमानांकित सुदीप खोराटेला १९-२१, २१-१७, २५-२३ असा पराभवाचा धक्का दिला. ही लढत ५३ मिनिटे रंगली. प्रत्येक गुणासाठी दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस होती. पहिली गेम जिंकून सुदीपने सकारात्मक सुरुवात केली. मात्र, दुसरी गेम जिंकून ओजसने बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मोक्याच्या क्षणी खेळ उंचावून ओजसने बाजी मारली. यानंतर ओजसने स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्य फेरीत अर्हम रेदासानीला २२-२०, २१-१९ असे नमविले. ओजसने १७ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात शरयू रांजणेसह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ओजस-शरयूने सयाजी शेलार-सोयरा शेलार जोडीवर २१-१७, २१-१८ असा विजय मिळवला. आता ओजस-शरयूची अंतिम लढत देवांश सकपाळ – सफा शेख या अग्रमानांकित जोडीविरुद्ध होईल. देवांश-सफा या जोडीने ईशान लागू – आयुषी काळे जोडीचे आव्हान २१-२३, २१-१९, २१-१५ असे परतवून लावले.
शरयूने १७ वर्षांखालील मुलींच्या गटातूनही अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्य फेरीत ख्याती कत्रेवर २१-१७, २१-९ असा विजय मिळवला. तिची अंतिम लढत सोयरा शेलारविरुद्ध होईल. सोयराने मनीषा विष्णूकुमारवर २१-१८, २१-१२ असा विजय मिळवला. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत विहान मूर्तीने कपिल जगदाळेला २१-१७, २१-१८ असे पराभूत केले. विहानची विजेतेपदासाठी तिस-या मानांकित ओजस जोशी लढत होईल. ओजसने अर्हम रेदासानीला २२-२०, २१-१९ असे नमविले.
युतिकाला विजेतेपद
स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित युतिका चव्हाणने विजेतेपद मिळवले. तिने चौथ्या मानांकित सफा शेखला २१-१७, २१-१४ असे पराभूत केले. महिला एकेरीत संपदा सहस्त्रबुद्धे हिने अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने नुपूर सहस्त्रबुद्धेवर २२-२०, २१-१६ असा विजय मिळवला.
निकाल – ४० वर्षांखालील पुरुष एकेरी – उपांत्य फेरीत – हर्षद भागवत वि. वि. सत्यजित तरदालकर २१-१२, २१-५. आदित्य काळे पुढे चाल वि. अपूर्व जावडेकर.
४५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – उपांत्य फेरी – अमित देवधर – तन्मय आगाशे वि. वि. अजित गोरे – राजीव लुंड २१-१५, २१-१७, अमित तारे – विवेक कांचन वि. वि. अभिजित राजवाडे – मंगेश दाते २१-११, १६-२१, २१-११.
३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – उपांत्य फेरी – नवीनकुमार वि. वि. चैतन्य डोने २१-१२, १५-७ (जखमी होऊन निवृत्त). हर्षद भागवत पुढे चाल वि. अपूर्व जावडेकर.
१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी – उपांत्य फेरी – देवांश सकपाळ – सफा शेख वि. वि. ईशान लागू – आयुषी काळे २१-२३, २१-१९, २१-१५, ओजस जोशी – शरयू रांजणे वि. वि. सयाजी शेलार – सोयरा शेलार २१-१७, २१-१८.
३० वर्षांवरील मिश्र दुहेरी – उपांत्य फेरीत – अदिती रोडे – नचिकेत धायगुडे वि. वि. आकाश भालेकर – अर्ची भालेकर २१-१२, २१-९.
३० वर्षांखालील पुरुष एकेरी – नचिकेत धायगुडे वि. वि. आलोक देशपांडे २१-१५, २१-१५. गणेश सकपाळ वि. वि. आकाश भालेकर २१-१४, २१-१०.
१७ वर्षांखालील मुले दुहेरी – उपांत्य फेरी – कृष्णनील गोरे – श्रेयस मासळेकर वि. वि. आरुष अरोरा – पार्थ सहस्त्रबुद्धे २१-१२, २१-११, अभिक शर्मा – स्वरित सातपुते वि. वि. अर्हम रेदासानी – कपिल जगदाळे २१-१४, २१-१९.