Home Blog Page 454

कलापथक प्रमुखांनी 25 फेब्रुवारीला सादरीकरणास उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे, दि. 13: लोककला, पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करावयाची आहे. त्यासाठी पुणे जिल्हयातील कलापथक /पथनाट्य संस्थांकडून कार्यक्रम मिळणेबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत. मागणी अर्जामध्ये एका कार्यक्रमाचे सर्व खर्चासह एकूण मानधनाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
संस्थांनी इतर विभागांच्या योजनांची प्रसिद्धी केलेल्या कार्यक्रमाची 3 ते 5 मिनिटांची ऑडिओ, व्हिडीओ क्लिप पेनड्राईव्हमध्ये सोबत आणणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी कलापथक/ पथनाट्य ग्रुपमध्ये स्त्री-पुरुष, गायक-वादक यांच्यासह एकूण 10 कलावंत असणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठी वाहन व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, संगीत साहित्य, बॅनर, कलाकारांना अल्पोपहार, भोजन इत्यादी पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.
सादरीकरणाद्वारे संस्थांची निवड करण्याकरीता दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, ससून रुग्णालयासमोरील दगडी बिल्डींग (सेंट्रल बिल्डींग) पुणे स्टेशन, पुणे 411001 येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


कोथरूड येथे 20 फेब्रुवारी पासून संत्रा महोत्सवाला सुरुवात

पुणे, दि. 17: पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पनेअंतर्गत गांधी भवन, कोथरूड येथे 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ‘संत्रा महोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

संत्रा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया ही पणन मंडळाच्या अमरावती व नागपूर विभागीय कार्यालयाकडे करण्यात आलेली असुन यावेळी सुमारे 50 संत्रा उत्पादक सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे सुमारे 25 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीकरीता सहाय्यक सरव्यवस्थापक मंगेश कदम 7588022201 यांच्याशी संपर्क साधावा, विदर्भातील उच्च प्रतीच्या नागपूरी संत्रा व इतर उत्पादित पदार्थाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.कदम यांनी केले.

00000

इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेड ची लढाई’ या विषयावर व्याख्यान :

संजीव सोशल फाउंडेशन उद्घाटन समारंभ  
पुणे : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे अजिंक्य योद्धा होते. परंतु त्यांचा पराक्रम आजही अनेकांना माहीत नाही. एक ही लढाई न हरलेले ते सेनापती होते, परंतु आपल्या लोकांचे दुर्दैव आहे की बाजीराव मस्तानी याशिवाय बाजीराव पेशवे आपल्याला फारसे माहिती नाहीत. बाजीराव पेशवे यांचा पराक्रमी इतिहास तरुणांनी वाचायला पाहिजे, असे मत इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केले

माजी लष्कर अधिकारी स्व. संजीव गदादे यांचे सामाजिक कार्य सदैव सुरू ठेवण्यासाठी संजीव सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेचा उद्घाटन समारंभ  टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पेशवा घराण्याचे वंशज पुष्कर सिंह पेशवा, उद्योजक अरुण कुदळे, शिवराजआप्पा घुले , राहुल शेवाळे , श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत, संकेत गदादे, छाया गदादे उपस्थित होते. उद्घाटन समारंभ प्रसंगी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पराक्रम उपस्थितांसमोर उलगडला.

संकेत गदादे म्हणाले, स्वर्गीय संजीव जयवंतराव गदादे हे निवृत्त लष्कर अधिकारी होते. ते स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संस्थापक तसेच सदर्न कमांड बँकेचे माजी संचालक होते. संजीव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, वैद्यकीय, हिंदू धर्म जागरण व संघटन, बालसंगोपन व आरोग्य, निराधार जनसेवा, असंघटित कामगार सेवा, क्रीडा व कला या क्षेत्रात कामे केली जात आहेत. माधुरी विधाटे यांनी सूत्रसंचालन केले.

‘एमआयटी एडीटी’च्या ‘कंजूस’ ने गाजवला भारत रंग महोत्सव

नवी दिल्ली/ पुणे – हशा, व्यंग्य आणि उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण अशी एक अविस्मरणीय संध्याकाळ मेघदूत ३ मध्ये अनुभवायला मिळाली, जेव्हा एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या थिएटर विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित २५ व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम) मध्ये कंजूस चे सादरीकरण केले. हे नाटक प्रसिद्ध फ्रेंच नाटककार मोलिएर यांच्या क्लासिक विनोदी नाटक द मायझर च्या हिंदी रूपांतरावर आधारित असून, थिएटर विभागाचे प्रमुख डॉ. अमोल देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. या प्रयोगाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.

मोलिएर यांचे द मायझर हे १७व्या शतकातील अजरामर व्यंग्यात्मक नाटक असून, कंजूस मध्ये त्याचे कौशल्यपूर्ण रूपांतर करण्यात आले आहे. या नाटकात मूळ हास्यशैली आणि वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यात आली असून, भारतीय प्रेक्षकांसाठी ते सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समर्पक बनवण्यात आले आहे. हे नाटक मिर्झा शेख या पात्राभोवती फिरते, जो आपल्या संपत्तीच्या बाबतीत अतिशय कंजूस आणि हट्टी असतो. त्याच्या या स्वभावामुळे अनेक विनोदी गैरसमज आणि संघर्ष निर्माण होतात.

नाटकाच्या सुरुवातीपासूनच कंजूस प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तरुण कलाकारांनी आपल्या भूमिकांवर ठाम पकड घेतली आणि ती उर्जेने आणि नेमकेपणाने सादर केली. मुख्य भूमिका साकारणाऱ्या मिर्झा शेख यांनी अप्रतिम कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवले. त्यांची शरीर भाषा, चेहऱ्यावरील भाव आणि हावभावांनी कंजूस माणसाच्या मानसिकतेला उत्कृष्ट प्रकारे साकारले.

मात्र, या संध्याकाळी खरी चमक दाखवणाली ती नंबू या पात्राने. एका महिला कलाकाराने साकारलेले हे पात्र आपल्या मिश्कील शैलीने, देहबोलीच्या अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने प्रेक्षकांच्या मनात ठसले. त्यांच्या जिवंत अभिनयशैलीने, योग्य टायमिंगने आणि उत्तम रंगमंचीय उपस्थितीमुळे संपूर्ण नाटक अधिक प्रभावी झाले. मुख्य पात्रांव्यतिरिक्त संपूर्ण कास्टनेही अप्रतिम अभिनय सादर केला. प्रेमकथा, चतुर नोकर आणि मिर्झा शेखच्या भोवतालची पात्रे यांनी नाटकात हास्य आणि मनोरंजनाचा उत्कृष्ट मिलाफ साधला. कलाकारांमध्ये उत्तम समन्वय होता, त्यामुळे संवाद आणि दृश्ये सहज आणि स्वाभाविक वाटली.

एमआयटी एडीटी थिएटर विभागाचे मोठे यश

राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) तर्फे आयोजित भारत रंग महोत्सव हा भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आहे. यात कंजूस ची निवड होणे हे एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या थिएटर विभागासाठी एक मोठे यश आहे. हजारो नाटकांच्या कठोर निवड प्रक्रियेतून या नाटकाची निवड झाली, यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि विभागाच्या सर्जनशील दृष्टिकोनाला मान्यता मिळाली. कंजूस हे केवळ एक मनोरंजक नाटक नसून, हे संस्थेच्या उदयोन्मुख नाट्यकलावंतांना पोषण देण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. बीआरएममध्ये मिळालेल्या उदंड प्रतिसादाने विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हा यशस्वी प्रयोग या युवा कलाकारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

नवीन तंत्रज्ञान आले तरी रेडिओग्राफर्सचे महत्व कमी होणार नाही

रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर सेमिनारमध्ये तज्ञांचे मत ; रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने आयोजन
पुणे : वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर त्यामध्ये अनेक शाखा आहेत. मात्र, एक्सरे विभागाचे महत्व त्यामध्ये मोठे आहे. रुग्णावर अंतिम उपचार काय करायचे, हे एक्सरे सारख्या सर्व तपासण्यांची मदत घेऊन करावे लागते. आता पूर्वीसारखी डार्क रुम ही संकल्पना अतित्वात नाही. मात्र, नवीन तंत्रज्ञान आले असले, तरी देखील अचूक व सुयोग्य निष्कर्षासाठी रेडिओग्राफर्सचे महत्व कमी होणार नाही, असे मत रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर आयोजित सेमिनारमध्ये तज्ञांनी व्यक्त केले.

रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने पूना हॉस्पिटल आॅडिटोरियममध्ये रेडियोलॉजीमधील रेडिएशन सुरक्षा आणि नवीन प्रवाहांवर लक्ष केंद्रित करणा-या ‘रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाह’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. एप्ट मेडिकल सिस्टिम्सचे संचालक केतन आपटे, गीता आपटे, रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश तांबे, माजी अध्यक्ष जगदीश जगताप आदींनी या सेमिनारचे आयोजन केले होते.

सेमिनारमध्ये प्रख्यात ज्येष्ठ रेडियोलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास नाटेकर, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. डी. डी. शेट्टी आणि डॉ. लाखकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याशिवाय,एइआरबी च्या रेडिएशन सुरक्षा आणि नियामक बाबींमध्ये विशेषतज्ञ असलेले वैज्ञानिक अधिकारी हर्ष देसले, अनुभवी रेडियोग्राफर चंद्रकांत शहाणे आणि बायोमेडिकल अभियंते अशोक श्रृंगारपूरे, अनिल जठार, समीर श्रृंगारपूरे आणि मुथुकुमार इत्यादी आपले विचार मांडले. तर, रेडियोलॉजिस्ट, रेडियोग्राफर आणि अभियंता यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. प्रमुख वक्त्यांव्यतिरिक्त सन्मानितांमध्ये सुधाकर रणदिवे , रत्नकांत नाईक, नाडुकरन, तानाजी जगताप, सुभाष बनसोडे, आणि प्रल्हाद कांबळे यांचा समावेश होता.

डॉ. आर.व्ही.परांजपे म्हणाले, एक्सरे साठी रुग्णांशी संवाद ही कला यायला हवी. तसेच ती प्रक्रिया सुरु असताना काही अपघात घडल्यास त्या स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता देखील रेडियोग्राफर्सकडे असणे गरजेचे आहे. आता रेडिओलॉजीमध्ये एआय आले आहे. एक्सरे चे तंत्रज्ञान मोठे होत आहे. हे हाताळण्याचे काम तंत्रज्ञ म्हणजेच रेडियोग्राफर्स करीत असतात, असेही त्यांनी सांगितले.

हर्ष देसले म्हणाले, रेडिएशन ही एक एनर्जी आहे. त्यामुळे ती प्रक्रिया करीत असताना सुरक्षा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कामाचा अनुभव, उपकरणांची काळजी, ज्या ठिकाणी उपकरण बसवू त्या जागेची योग्य निवड अशा अनेक गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. सुरक्षा नियमावलीप्रमाणे सर्व उपकरणे आहेत की नाही, हे तपासणे देखील गरजेचे असते. उपकरणांचा वापर हा माणसांसाठी होत असतो, त्यामुळे त्या उपकरणाची गुणवत्ता तपासणी ही देखील आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

केतन आपटे म्हणाले, सेमिनारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रेडियोलॉजीमध्ये सुरक्षा प्रोटोकॉल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांबद्दल सहभागींना शिक्षित करणे, हा होता. तसेच रेडियोग्राफरच्या दृष्टिकोनातून एक्स-रे तंत्रज्ञानातील बदल, एक्स-रे तंत्रज्ञानाचा विकास, आणि रेडियोलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर सखोल चर्चा झाली. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांतील तज्ञ तसेच  विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. 
डॉ. नाटेकर, महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ प्रॅक्टिसिंग रेडियोलॉजिस्ट, यांनी त्यांच्या ‘गोल्डन लाईफ’ या भाषणात फलदायी, अर्थपूर्ण, निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगावे यावर चर्चा केली आणि सेमिनारची सांगता केली.एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड,  रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि वैरेक्स इमेजिंग इंडिया प्रा. लि. यांनी या उपक्रमाला सहकार्य केले होते.

महापारेषणच्या २२० केव्ही टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग;१.४२ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा ३५ मिनिटे खंडित

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२५:महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-कांदळगाव अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनमध्ये सोमवारी (दि. १७) किरकोळ बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या १४ उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी सकाळी ११.५० ते १२.२५ पर्यंत महावितरणच्या १ लाख ४२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महापारेषणकडून युद्धपातळीवर उपाययोजना करून ३५ मिनिटांमध्ये वीजवाहिनी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीत आज सकाळी ११.५० वाजता किरकोळ बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या मुळशीमधील भरे उपकेंद्र तसेच हिंजवडी परिसरातील १३ उपकेद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे मुळशी, भुगाव, भुकूम, पिरंगुट, पौड, माले, मुठा खोरे, मारूंजी, जांभे, नेरे आदी भागातील सुमारे ९७ हजार वीजग्राहकांचा आणि हिंजवडी परिसरातील २०० उच्चदाब ग्राहकांसह ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महापारेषणकडून अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित केल्यानंतर दुपारी १२.२५ वाजता सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत झाला.

सुजलॉनला 9 महिन्यांत ऑयस्टर रिन्यूएबलकडून दुसऱ्यांदा ऑर्डर

201.6 मेगावॅटच्या या नव्या ऑर्डरसह, सुजलॉनची एकूण ऑर्डर बुकिंग सर्वाधिक 5.7 गिगावॅटपर्यंत पोहोचली.

पुणे: सुजलॉन ग्रुप हा भारतातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा समाधान प्रदाता समूह आहे. कंपनीला ऑयस्टर रिन्यूएबल्सकडून 201.6 मेगावॅटची पुनरावृत्ती ऑर्डर मिळाली आहे, ज्यामुळे भारताच्या वारा ऊर्जाक्षेत्रातील त्यांचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे. या नव्या करारासह सुजलॉन आणि ऑयस्टर रिन्यूएबल्स यांची भागीदारी केवळ नऊ महिन्यांत मध्य प्रदेशात 283.5 मेगावॅटपर्यंत वाढली आहे, ज्यामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील. यासोबतच, भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमण प्रक्रियेत सुजलॉनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पुनरुज्जीवन होते. ही ऑर्डर वाणिज्यिक आणि औद्योगिक (C&I) ग्राहकांमध्ये वारा ऊर्जा उपाययोजनांची वाढती मागणी दर्शविते, जे आता सुजलॉनच्या एकूण ऑर्डर बुकमधील 59% वाटा झाला आहे.

ही ऑर्डर मध्य प्रदेशात पूर्ण केली जाणार आहे. करारांतर्गत, सुजलॉन 64 अत्याधुनिक S144 वारा टर्बाइन जनरेटर (WTGs) हायब्रिड लॅटिस टॉवर्स (HLT) सह पुरवेल, ज्यांची प्रत्येकी स्थापित क्षमता 3.15 मेगावॅट असेल.सुजलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश टांटी म्हणाले: “आमच्यासोबत प्रकल्प कार्यान्वित केल्यानंतर, ऑयस्टरने आता आम्हाला पूर्ण EPC ऑर्डर देऊन विश्वास दाखविला आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सुजलॉनची विश्वासार्हता आणखी मजबूत झाली आहे. अधिकाधिक ग्राहक आमच्याकडे वळत आहेत, कारण आम्ही केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे, तर जमिनीच्या खरेदीपासून प्रकल्पाच्या

अखंड अंमलबजावणीपर्यंत आणि जागतिक दर्जाच्या देखभाल व व्यवस्थापन सेवांपर्यंत संपूर्ण साखळीमध्ये पारंगत आहोत. सुजलॉनमध्ये आम्ही केवळ प्रकल्प निर्माण करत नाही, तर एक स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करतो.”

सुजलॉन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चलासानी म्हणाले, “मध्य प्रदेश हा पवन ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे आणि या राज्याच्या नवीकरणीय ऊर्जा प्रवासात योगदान देताना आम्हाला अभिमान वाटतो. ही यंदाच्या वर्षातील आमची पाचवी पुनरावृत्ती ऑर्डर आहे, जी ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर आमचा भर दर्शविते आणि सातत्यपूर्ण वाढीस मदत करते, तसेच नवोन्मेषी आणि विश्वासार्ह पवन ऊर्जा उपायांद्वारे टिकाऊ भविष्य घडविण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.”

ऑयस्टर रिन्यूएबल्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भाटिया म्हणाले, “आमच्या मागील भागीदारीच्या यशावर आधारित, आम्ही पुन्हा एकदा सुजलॉनसोबत सहयोग करण्यास उत्सुक आहोत, जेणेकरून भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सामूहिक दृष्टिकोनाला गती मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, हा प्रकल्प 24×7 ऊर्जा पुरवठा करण्याच्या आमच्या दृष्टिकोनातील पुढील पाऊल आहे. भारताच्या 2030 पर्यंत 500 GW नवीकरणीय ऊर्जा उद्दिष्टाप्रति योगदान देण्यासाठी, अशा भागीदारी शोधत राहण्याचा आमचा मानस आहे. आपल्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेला पुढे नेऊन, ऑयस्टर रिन्यूएबल्स वाजवी दरात नवीकरणीय ऊर्जा समाधान उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे.”

‘परंपरा‌’ मैफलीत गुरू-शिष्यांचे बहारदार सादरीकरण

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित कार्यक्रमात गुरू-शिष्य परंपरेची महती अधोरेखित
पुणे : पखवाजचे धीरगंभीर बोल आणि बासरीच्या समधुर स्वरांनी ‌‘परंपरा‌’ या विशेष उपक्रमाअंतर्गत आयोजित सांगीतिक मैफलीत गुरू-शिष्यांनी रंग भरले. एकाच मंचावर गुरुंसह शिष्यांच्या वादनातून भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरेची महती अधोरेखित झाली.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘परंपरा‌’ या मालिकेअंतर्गत पखवाज आणि बासरी वादनाची मैफल कोथरूडमधील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या शारदा रंगमंचावर आयोजित करण्यात आली होती.
‌‘परंपरा‌’ या मैफलीची सुरुवात सुखद मुंडे आणि त्यांचे शिष्य कृष्णा नवगिरे, हर्ष पाटील, मंगेश खैरनार आणि प्रदिप दराडे यांनी केली. मत्तताल, आदिताल ऐकवून पखवाज वादनाचे वैशिष्ट्य असलेली ‌‘गदी गण नागे तिट‌’ ही रचना ऐकविताना पखवाज जणू शब्दरूपी संवाद साधत असल्याची अनुभूती रसिकांना आली. पखवाज वादनातून सादर केलेली शिवस्तुती रसिकांना विशेष भावली. पखवाज वादनात प्रसिद्ध असलेले कुदोह सिंग आणि नाना पानसे घराण्यांचे वैशिष्ट्य असलेले विविध प्रकार वादनातून सादर करण्यात आले. मुख्यत्वे करून धृपद गायकीच्या साथीसाठी प्रसिद्ध असलेले पखवाज वादन ऐकविताना आलाप आणि जोड यांसाठी वाजविला जाणारा ‌‘झाला‌’ रसिकांना विशेष भावला. चक्रदार तोडा त्यातील फर्माईशी प्रकार तसेच गिनती प्रकार अत्यंत प्रभावीपणे सादर करून वादकांनी रसिकांना प्रभावित केले. कलाकारांना संतोष घंटे यांनी संवादिनीची सुमधुर साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पंडित रूपक कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य मृगेंद्र मोहडकर, लितेश जेठवा, मेहुल प्रजापती, तनय कामत, रिंगचड ब्रह्मा आणि रेणुका लिखिते यांचे बासरीवादन झाले. त्यांनी सरस्वती रागाची वैशिष्ट्ये उलगडून दाखविताना माधुर्यपूर्ण वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. रागविस्तार दर्शविताना पंडित रूपक कुलकर्णी यांच्या शिष्यांनी सुरेल साथ करत गुरू-शिष्य परंपरेतून मिळालेल्या ज्ञानाचे दर्शन घडविले. मैफलीची सांगता मैहर घराण्यातील बाबा अल्लाउद्दिन खाँ यांनी रचलेला राग ‌‘माज खमाज‌’ ऐकवून केली. महेशराज साळुंके यांनी केलेली तबलासाथ समर्पक ठरली.
‌‘परंपरा‌’ मैफलीच्या सुरुवातीस ऋत्विक फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या संस्थापिका चेतना कडले, संचालक प्रकाश गुरव यांच्यासह कलाकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कलाकारांचा सत्कार प्रकाश गुरव आणि चेतना कडले यांनी केला. सूत्रसंचालन, कलाकारांचा परिचय आणि आभार प्रदर्शन रश्मी वाठारे यांनी केले.

‘अमेरिकन अल्बम‌’च्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगानिमित्त कलाकार-तंत्रज्ञांचा गौरव

रसिकमोहिनीतर्फे रंगभूमी सेवक संघाला आर्थिक मदत
पुणे : रसिकमोहिनी आणि फ्रेंड्स फॉर एव्हर थिएटर ग्रुपची निर्मिती असलेल्या ‌‘अमेरिकन अल्बम‌’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगानिमित्त नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. तसेच पडद्यामागील कलाकारांच्या रंगभूमी सेवक संघाला रसिकमोहिनीतर्फे आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी, माधवी महाजनी, नाटकाचे लेखक राजन मोहाडिकर, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, व्यवस्थापक समीर हंपी, धनंजय गाडगीळ, सुरेंद्र गोखले, सिद्धार्थ देसाई, मोहनदास प्रभू, झरीन ईराणी, डॉ. सतिश देसाई, सुरेश धर्मावत तसेच नाटकाच्या निर्मात्या, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, अभिनेते दीपक करंजीकर, आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, चिन्मय पाटसकर, अमृता पटवर्धन उपस्थित होते. ‌‘अमेरिकन अल्बम‌’ या नाटकाचे अनेक प्रयोग बघणारे मुंबईतील रसिक श्रीकृष्ण कुलकर्णी यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. गश्मीर महाजनी यांनी नाटकाच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‌‘अमेरिकन अल्बम‌’ या नाटकाच्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली. रसिकमोहिनी आर्टस्‌‍ निर्मित ‌‘सूर शोधताना‌’ हा लघुपट या प्रसंगी प्रदर्शित करण्यात आला.
रसिकमोहिनी संस्थेच्या वाटचालीत रंगभूमी सेवक संघाचा मोलाचा वाटा आहे. रसिकमोहिनी संस्थेची निर्मिती असलेल्या प्रत्येक नाटकाची पडद्यामागील बाजू रंगभूमी सेवक संघ उत्तमरित्या सांभाळत आहे. पुण्यातील पडद्यामागील कलाकारांसाठीही रंगभूमी सेवक संघाचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे कार्य बघून संस्थेस मदत देण्यात येत असल्याचे भाग्यश्री देसाई यांनी या प्रसंगी सांगितले. मदतीचा धनादेश सुरेंद्र गोखले, अरुण पोमण, महेंद्र कांबळे यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

दिल्लीत भूकंप

0

नवी दिल्ली- सीएसआयआरचे संचालक प्रा. प्रदीप कुमार रामनचर्ला म्हणाले , “दिल्लीला सकाळी 5.30 च्या सुमारास आलेला भूकंप हा एक सौम्य भूकंप होता. भूकंप क्षेत्रानुसार, दिल्ली झोन ​​4 मध्ये आहे. हा एक सौम्य भूकंप होता. बहुतेक लोकांना तो जाणवला, पण जे मोकळ्या मैदानात होते त्यांना ते जाणवले नसेल.”

दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शांत राहण्याचे व सुरक्षिततेचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की; “दिल्ली व आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सर्वांनी शांत राहण्याचे व सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे, तसेच संभाव्य भूकंपाच्या धक्क्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन मी करतो. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.”

APEDA/अपेडा कडून ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबाची पहिली समुद्रमार्गे वाहतूक सुलभ करण्यात सहकार्य

0

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025

भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत, कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात APEDA, अ‍ॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.

ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबांच्या निर्यातीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यानंतर, फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाला डाळिंबांच्या निर्यातीसाठी एक कार्य योजना व मानक कार्यपद्धती (SOP) वर स्वाक्षरी करण्यात आली. APEDA व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटनेने (NPPO) यशस्वी बाजारपेठ प्रवेश सुविधा दिल्यानंतर, जुलै 2024 मध्ये पहिली हवाई वाहतूक करण्यात आली. हवाई वाहतुकीमुळे बाजारपेठेतील मागणीचे मूल्यांकन करण्यास मदत झाली, जेणेकरून वाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने समुद्री शिपमेंट कशी करता येईल, याचा पाठपुरावा करण्यात आला.

महाराष्ट्रातील सोलापूर भागातून आणलेल्या 5.7 मेट्रिक टन (MT) डाळिंबांसह, पहिली समुद्री मालवाहतूक 6  डिसेंबर 2024 रोजी भारतातून निघाली आणि 13 जानेवारी 2025 रोजी सिडनीला पोहोचली. या डाळिंबाची वाहतूक 1,900 बॉक्समध्ये/डब्यांमध्ये पॅक करण्यात आली होती, प्रत्येक डब्यात 3 किलो उच्च दर्जाची फळे होती. भगवा जातीचे 1872 बॉक्स (6.56 टन) वाहून नेणारी आणखी एक व्यावसायिक समुद्री शिपमेंट 6 जानेवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे पोहोचली.

मोठ्या प्रमाणात समुद्री शिपमेंटच्या वापरामुळे स्पर्धात्मक किंमत खात्रीशीर झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला व शाश्वत व्यापार संधी निर्माण झाल्या. दोन्ही शिपमेंट्स ANARNET मध्ये एकत्रित करण्यात आल्या. ही भारताची ट्रेसेबिलिटी सिस्टम आहे, ज्यामुळे पारदर्शकता खात्रीची झाली व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला.

ही यशस्वी निर्यात केवळ जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता करण्याच्या भारताच्या क्षमतेवर प्रकाश टाकत नाही तर, भारतीय शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले करून लक्षणीय व्यवसाय प्रोत्साहन देते.

डाळिंबाची खेप पोचल्यावर, सिडनी, ब्रिस्बेन व मेलबर्नमध्ये त्यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जोरदार मागणीमुळे आधीच अतिरिक्त शिपमेंटसाठी तात्काळ मागण्या नोंदविण्यात आल्या आहेत. यातून भारत व ऑस्ट्रेलियामधील फायदेशीर तसेच शाश्वत व्यापार संबंधांची वाढती क्षमता दिसून येते आहे. मालवाहतुकीची वेळ ऑस्ट्रेलियाच्या उत्पादन नसलेल्या हंगामाशी धोरणात्मकरित्या जुळवून घेण्यात आली होती, जेणेकरून भारतीय निर्यातदारांसाठी बाजारपेठेतील संधी जास्तीतजास्त असतील याची खात्री झाली.

APEDA चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी, “भारताचा कृषी निर्यातीचा लँडस्केप अभूतपूर्व वेगाने वाढत आहे, ताज्या फळांच्या निर्यातीत वर्षानुवर्षे 29% वाढ होत आहे’’, यावर भर दिला.

केवळ डाळिंबात (निर्यातीत) 20% वाढ झाली आहे, जी या सेगमेन्टची अफाट क्षमता दर्शवते. ऑस्ट्रेलियाला प्रीमियम डाळिंबाची यशस्वी निर्यात ही भारताची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च दर्जाचे ताजे उत्पादन पुरवण्याची क्षमता दर्शवते. ANARNET सारख्या प्रगत ट्रेसेबिलिटी सिस्टीमद्वारे, आम्ही खात्री करतो की, भारतीय कृषी उत्पादने सर्वोच्च जागतिक मानकांची पूर्तता करतात, जेणेकरून जगभरातील ग्राहकांचा विश्वास वाढतो.”

अभिषेक देव यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात व सुलभ करण्यात अपेडाच्या भूमिकेवर भर देत म्हटले की, “आम्ही नवीन व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये विस्तार करून भारतीय शेतकरी तसेच कृषी-उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही यशोगाथा भविष्यात पुढील सहकार्य व निर्यातीचे प्रमाण वाढवण्याचा मार्ग मोकळा करते.”

सप्टेंबरमध्ये पुढील निर्यात हंगाम सुरू होत असल्याने, अ‍ॅग्रोस्टारचे आयएनआय फार्म्स, के. बी. एक्सपोर्ट्स व इतर प्रमुख कंपन्या या यशाला कायम ठेवण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबांचा सतत पुरवठा होईल. या विकासामुळे कृषी निर्यातीत जागतिक स्तरावर भारताचे स्थान अधोरेखित होते व ऑस्ट्रेलियासोबत द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत होतात.

अपेडा ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे जी कृषी व प्रक्रिया केलेले अन्न निर्यात सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ANARNET सारख्या ट्रेसेबिलिटी सिस्टीमद्वारे बाजारपेठ विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार व निर्यात प्रोत्साहन देऊन APEDA भारतीय शेतकरी तसेच कृषी व्यवसायांना पाठिंबा देऊ करते. ताजी फळे, भाज्या, बासमती तांदूळ व प्रक्रिया केलेले अन्न यांचा समावेश असलेल्या भारताची कृषी निर्यात सतत वाढत आहे, ज्यामुळे जागतिक कृषी-व्यापार क्षेत्रात देशाचे स्थान बळकट होत आहे.

शहरी भागातील वसाहतींचे राष्ट्रीय भू-अवकाशीय माहिती-आधारित भूमी सर्वेक्षण कार्यक्रमाचे उद्या उद्‌घाटन 

0

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025

केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्या मध्य प्रदेशमध्ये रायसेन येथे शहरी भागातील वसाहतींचे राष्ट्रीय भू-अवकाशीय माहिती-आधारित भूमी सर्वेक्षण करण्यासंदर्भातील भारतातील 26 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमधील (UTs) 152 शहरी स्थानिक संस्थांमधील (ULBs) प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंसाधन विभागाने हा पथदर्शी कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्रीय ग्रामीण विकास व दळणवळण राज्यमंत्री, डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, डॉ. मोहन यादव, मध्य प्रदेशचे महसूल मंत्री  करण सिंह वर्मा, पंचायती राज व ग्रामीण विकास मंत्री प्रल्हादसिंग पटेल, मत्स्यव्यवसाय व मच्छिमार कल्याण तसेच  रायसेन, मध्य प्रदेशचे प्रभारी मंत्री नारायण सिंह पवार, सांचीचे आमदार प्रभू राम चौधरी, भारत सरकारच्या भूसंपदा विभागाचे सचिव मनोज जोशी, भारत सरकार व मध्य प्रदेश राज्य सरकारचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात ड्रोन उड्डाण, मानक कार्यप्रणाली (SoP) पुस्तिकेचे अनावरण, नक्षा कार्यक्रमावरील व्हिडिओ व फ्लायर, पाणलोट यात्रेला ध्वजवंदन, पाणलोट यात्रा उपक्रमाच्या व्हिडिओचे सादरीकरण व पाणलोट यात्रा गीत वाजवले जाणार आहे.

जमिनीच्या स्वामित्वाविषये अचूक व विश्वासार्ह दस्तऐवज सुनिश्चित करण्यासाठी शहरी भागात जमिनीच्या नोंदी  करणे तसेचअद्ययावत करणे, हे ‘नक्षा’ या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम नागरिकांना सक्षम करेल, राहणीमानात सुधारणा करेल, शहरी भागासाठी अधिक नियोजन केले जाईल व जमिनीशी संबंधित वाद कमी करेल. मालमत्तेची नोंद  झाल्याने माहिती तंत्रज्ञान-आधारित प्रणालीमुळे प्रशासनासाठीही पारदर्शकता, कार्यक्षमता व शाश्वत विकासाला समर्थन मिळेल.

भारतीय सर्वेक्षण विभाग, NAKSHA कार्यक्रमाचा तांत्रिक भागीदार असून आवश्यक हवाई सर्वेक्षण करण्यासाठी व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना तृतीय पक्ष विक्रेत्यांमार्फत भौमितीयदृष्ट्या सुधारित प्रतिमा प्रदान करण्याची जबाबदार या विभागावर आहे. मध्य प्रदेश राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळाद्वारे  (MPSEDC) आरंभापासून  अंतिम टप्प्यापर्यन्तचे वेब-जी आय एस प्लॅटफॉर्म विकसित केले जाणार आहे व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सेवा मंडळाद्वारे (NICSI) साठवणूक सुविधा प्रदान केल्या जातील. राज्ये व केंद्रशासित प्रदेश सरकार भौमितीयदृष्ट्या सुधारित प्रतिमा  वापरून प्रत्यक्ष सर्वेक्षण तसेच या प्रतिमांचे प्रत्यक्ष जमिनीवर असलेल्या गोष्टींशी तुलना करेल; सरते शेवटी शहरी व अर्ध-शहरी जमिनीच्या नोंदींचे अंतिम प्रकाशन केले जाईल.

प्रायोगिक तत्वावर राबवल्या जाणाऱ्या नक्षा या उपक्रमासाठी अंदाजे 194 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी केंद्र सरकार निधी प्रदान कारण आहे.

तर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली जाणार कारवाई – आरोग्य प्रमुखांचा इशारा

पुणे-– जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागांबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. असा इशारा आरोग्य प्रमुख डॉक्टर निना बोराडे यांनी दिला आहे.

जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी कार्यालयाचे कामकाज हे पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाकडील जन्म-मृत्यू विभागाकडून विकेंद्रीकरण पद्धतीने करण्यात येते. तथापि विभागांकडील कामकाजाबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अलीकडच्या काळात काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गैर प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कामकाज हे क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त संगणक ऑपरेटर, अप्रुव्हल क्लार्क व विवाह नोंदणी क्लार्क यांच्यामार्फत करण्यात येते. अप्रुव्हल क्लार्क हे उपनिबंधक यांची मान्यता न घेता परस्पर दुरुस्ती करणे, जन्म-मृत्युच्या नोंदी करणे इ. तसेच काही अप्रुव्हल क्लार्क त्यांना देण्यात आलेला अप्रूव्हल आयडी व ओटीपी हा संगणक ऑपरेटर यांना देत असून त्यांचेकडून जन्म-मृत्यूचे कामकाज करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही संगणक ऑपरेटर कागदपत्रे न तपासता जन्म-मृत्युच्या नोंदी व जन्म-मृत्यू दाखल्यांमध्ये दुरुस्ती व इतर बदल करत असले बाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.

ही बाब अंत्यत गंभीर आहे. जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांची आहे. याबाबत वारंवार सूचना देऊन देखील कामकाजामध्ये सुधारणा झाल्याची दिसून येत नाही. तसेच या कामकाजावर आपले कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

सर्व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे की, आहे की आपले अधिनस्त जन्म- मृत्यू व विवाह नोंदणीचे कामकाज करणाऱ्या संगणक ऑपरेटर, अप्रुव्हल क्लार्क व विवाह नोंदणी क्लार्क यांना जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीचे कामकाज नियमानुसार व विहित वेळेत विनाविलंब करणेबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाचा दैनंदिन आढावा व अहवाल घेण्यात यावा. यापुढे जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागांबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.

पाच देशांच्या राजदूतांकडून त्यांची अधिकारपत्रे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर

0

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात कंबोडिया, मालदीव, सोमालिया, क्युबा आणि नेपाळच्या राजदूत/उच्चायुक्तांकडून त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. अधिकारपत्रे सादर करणाऱ्यांची नावे:

1. कंबोडियाच्या राजदूत रथ मेनी

2. मालदीवच्या उच्चायुक्त ऐशाथ अझीमा

3. सोमालियाचे राजदूत डॉ. अब्दुल्लाही मोहम्मद ओडोवा

4. क्युबा चे राजदूत जुआन कार्लोस मार्सन अगुइलेरा

5. नेपाळचे राजदूत डॉ. शंकर प्रसाद शर्मा

भोर येथील विक्रम गायकवाडची हत्या ऑनरकीलींगची घटना- उद्या भोरमध्ये आंबेडकरी चळवळीकडून निषेध मूक मोर्चाचे आयोजन

पुणे : भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड याची 8 फेब्रुवारी रोजी झालेली हत्या ही आंतरजातीय विवाह केल्यामुळे करण्यात आल्याने सदर प्रकार हा ऑनर किलिंगचा असून त्या दृष्टीने तपास होवुन सर्व संबंधितांना अटक व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. तसेच याच मुद्दावर मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भोर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मूक मोर्चाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहीतीही यावेळी पत्रकार परिषदेद्वारे संबंधित नेत्यांनी दिली.

विक्रम गायकवाड या तरुणाने लगतच्या गावातील सवर्ण समाजाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. सदर आंतरजातीय विवाह मुलीच्या घरच्यांना मान्य नसल्याने विवाह मोडण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटूंबीयांनी केला होता तसेच मुलीला व विक्रमला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. विक्रमचे कुटुंबीयांनी हत्या होण्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडे वियक्त केली होती परंतु त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले व दुसर्याच दिवशी हता करण्यात आल्याने या प्रकरणी पोलिसांची भुमिका संशयास्पद वाटत आहे.

या घटनेला दहा दिवस लोटल्यानंतर सुद्धा पोलीस तपास हा अत्यंत चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे पोलीस उपाधीक्षक भोर यांच्याशी झालेल्या चर्चेतून शिष्टमंडळाला जाणवल्याने निषेध मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात येत असून या मोर्चात हजारो लोक सहभागी होणार आहेत.

धम्मभूमी भोर येथून सुरू होणारा हा मोर्चा संपूर्णतः मूक मोर्चा असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ याची निषेध सभा घेवुन सांगता होणार आहे व यावेळी प्रतिनिधी स्वरूपामध्ये भाषणे होऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार व इतर अधिकार्यांना देण्यात येणार आहे.

विक्रम गायकवाड हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार असून सदर मागणीच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे.

सदर मोर्चा मध्ये संविधान वादी व दलित अत्याचाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात येत असल्याचे अवाहन रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. यावेळी पीडीत कुटूबींयातील फिर्यादी विठ्ठल गायकवाड , मोर्चाचे आयोजक प्रविण ओव्हाळ, विनोद गायकवाड , बाळासाहेब अडसुळ आदि उपस्थित होते.