संजीव सोशल फाउंडेशन उद्घाटन समारंभ
पुणे : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे अजिंक्य योद्धा होते. परंतु त्यांचा पराक्रम आजही अनेकांना माहीत नाही. एक ही लढाई न हरलेले ते सेनापती होते, परंतु आपल्या लोकांचे दुर्दैव आहे की बाजीराव मस्तानी याशिवाय बाजीराव पेशवे आपल्याला फारसे माहिती नाहीत. बाजीराव पेशवे यांचा पराक्रमी इतिहास तरुणांनी वाचायला पाहिजे, असे मत इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केले
माजी लष्कर अधिकारी स्व. संजीव गदादे यांचे सामाजिक कार्य सदैव सुरू ठेवण्यासाठी संजीव सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेचा उद्घाटन समारंभ टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पेशवा घराण्याचे वंशज पुष्कर सिंह पेशवा, उद्योजक अरुण कुदळे, शिवराजआप्पा घुले , राहुल शेवाळे , श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत, संकेत गदादे, छाया गदादे उपस्थित होते. उद्घाटन समारंभ प्रसंगी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पराक्रम उपस्थितांसमोर उलगडला.
संकेत गदादे म्हणाले, स्वर्गीय संजीव जयवंतराव गदादे हे निवृत्त लष्कर अधिकारी होते. ते स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संस्थापक तसेच सदर्न कमांड बँकेचे माजी संचालक होते. संजीव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, वैद्यकीय, हिंदू धर्म जागरण व संघटन, बालसंगोपन व आरोग्य, निराधार जनसेवा, असंघटित कामगार सेवा, क्रीडा व कला या क्षेत्रात कामे केली जात आहेत. माधुरी विधाटे यांनी सूत्रसंचालन केले.