Home Blog Page 453

‘ऑनर किलिंग’ घटनांमध्ये फाशीची, ‘मोका’अंतर्गत तपासाची तरतूद करा-डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी;

भोर, पुणे: बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्याकांडाचा तपास दडपणे हे निंदाजनक आहे. ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व गुन्ह्याचा संपूर्ण तपास हा मोका कायद्याअंतर्गत करण्याची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी भोर येथील मूकमोर्चा आंदोलनात व्यक्त केली.
विक्रम गायकवाड यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावे. तसेच या गुन्ह्याचा तपास ऑनर किलिंगअंतर्गत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भोर तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात माजी आमदार जयदेव गायकवाड, जेष्ठ नेते वसंत साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबवंत मनोहर, नागेश भेसले आदी मान्यवर उपस्थित होते.

भोर येथील धम्मभूमी येथून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बिराजदार, पोलीस उपअधीक्षक व माननीय तहसीलदार यांच्याकडे मोर्चेकऱ्यांनी कुटुंबीयांच्या व मान्यवरांच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चेकरांच्या व कुटुंबीयांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार यांनी स्पष्ट केले.

“ग्रामीण भागातील दलित जनता एकटी नसून, त्यांच्यासोबत शहर व राज्यातील आंबेडकरी समाज बांधव आहेत, हा विश्वास देण्यासाठी आजचा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची गंभीर दखल न घेतल्यास आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल व ते राज्यव्यापी राहील,” असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी दिला.

“ऑनरकिलिंगच्या घटना राज्यभर वाढत आहेत. त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असताना सरकार हेतूता दुर्लक्ष करत आहे. तसेच दलित व बौध्दांच्या हत्याकांडांवेळी न्यायासाठी आंबेडकरी समुदायाला आंदोलन करावे लागते, हा कायद्याचा मोठा पराभव आहे. या प्रकरणातील दोषींना अटक करुन त्यांना शिक्षा मिळेपर्यंत हा लढा सुरु राहील,” अशी भुमिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.

फिर्यादी विठ्ठल गायकवाड यांनी कुटुंबाच्या वतीने समाजाकडे न्यायाच्या अपेक्षेची मागणी केली. मोर्चामध्ये उपस्थित पुणे शहर पुणे जिल्हा मुंबई व विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली असून या तात्काळ सुधारणा न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन पुणे व मुंबई येथे घेण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी प्रास्ताविक प्रविण ओव्हाळ यांनी तर सुत्र संचलन रोहीदास जाधव यांनी केले. भोर येथील आंबेडकरी चळवळीतील प्रविण ओव्हाळ, रोहिदास जाधव, बाळासाहेब अडसुळ, नवनाथ गायकवाड यांनी मोर्चाचे आयोजन केले.

महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष

पुणे- महानगरपालिकेत ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती गठीत केली जाणार आहे. तसेच ज्येष्ठ
नागरिक लोकशाही दिन देखील साजरा केला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

पुणे शहरात वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक हे महानगरपालिकेमार्फत प्रदान करत असलेल्या दैनंदिन नागरी सुख सुविधाबाबत उदभवणाऱ्या समस्यांविषयी तक्रारी तसेच नाविन्यपुर्ण उपाय योजना व गाऱ्हाणी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे मांडत असतात. या तक्रारींचे निराकरण करणे, तसचे सुचविलेली कामे यांची दखल घेणेचे अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीचे निवारण करण्याच्या दृष्टीने ‘पुणे महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती व लोकशाही दिन चे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या करिता अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या कामकाजावर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे नियंत्रण राहील.

अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, समितीच्या विहीन कामकाजाच्या वेळेत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना ( अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन करणे, संबंधित विभागाशी तक्रारींच्या अनुषंगाने समन्वय करणे, विभागप्रमुख / खातेप्रमुख यांना अवगत करणे, वर्ग केलेल्या तक्रार अर्जाचे व केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे, तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर संबंधित विभागामार्फत अर्जदारास समपक व समाधानकारक उत्तर देणे इ.) करण्यात याव्यात. किरकोळ स्वरुपाच्या तक्रारींबाबत विभागांशी समन्वय करून शक्यतो सत्वर निराकरण करण्याबाबत भर देण्यात यावा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) हे ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समितिच्या व लोकशाही दिनाचे कामकाजावर नियंत्रण ठेवतील. नियुक्त समितीने या बाबतचा कामकाज वस्तुनिष्ठ अहवाल अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे मार्फत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेकडे दर १५ दिवसांनी अवलोकनार्थ सादर करायचा आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत.

– अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा

मिलींद मधुकर करमरकर, उप अभियंता अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) कार्यालय : अध्यक्ष

असंग रामदास पाटील, उप समाज विकास अधिकारी : सदस्य

अस्मिता कुलकर्णी, प्रशासन अधिकारी : सदस्य सचिव

दिपक एकनाथ फणसे, उप अधिक्षक : सदस्य

तेजस पाटील ठरला देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी

आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजन
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्यावतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तेजस पाटीलने प्रथम क्रमांक पटकावित देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी ठरला आहे. तर यश पाटील यांनी द्वितीय तर चैतन्य कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सभागृहात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेचे उद्घाटनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण समारंभ टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते झाले.  यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात,  सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे उपस्थित होते. या स्पर्धेचे हे तृतीय वर्ष होते.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १११११, द्वितीय क्रमांकाला ७७७७, तृतीय क्रमांकाला ५५५५ आणि  उत्तेजनार्थ क्रमांकाना प्रत्येकी ११११  रोख तसेच करंडक आणि  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या यश पाटील याने द्वितीय तर गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या चैतन्य कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या चैतन्य बावधाने, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या भक्ती धावले, सप महाविद्यालयाच्या रमेश कचरे, बी जे एस महाविद्यालयाच्या गोविंद भांड, स्वराज महाविद्यालयाच्या उत्कर्षा शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.

संजय चाकणे म्हणाले, महाराष्ट्राला वक्तृत्वाची मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळक, केशवराव जेथे यांसारख्या अनेक वक्त्यांनी महाराष्ट्र गाजवला. या वक्तृत्वामुळेच मुंबई सह महाराष्ट्र मिळाला. बोलणे सोपे असते परंतु काय बोलावे हे अवघड आहे. त्यासाठी वाचन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

दिपाली आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमित गोगावले यांनी आभार मानले.

एमपीएफ ‘संविद २०२५’ दोन दिवसीय परिषद पुण्यात

 महेश प्रोफेशनल फोरम तर्फे आयोजन ; देशभरातून मान्यवरांची उपस्थिती ; मेगा एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील १०० स्टॉलचा सहभाग ; विनामूल्य प्रवेश
पुणे : महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या महेश प्रोफेशनल फोरमच्या वतीने न्याती प्रस्तुत संविद २०२५ परिषद आणि मेगा एक्स्पो चे आयोजन दि.२२ व २३ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडी येथील गंगाधाम रस्त्यावरील वर्धमान लॉन्स येथे करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित राहणार असून मेगा एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील १०० स्टॉलचा सहभाग असणार आहे, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा श्रुती करनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला सीए समीर लढ्ढा, कांतीलाल बदले, अतुल नावंदर, आशिष जाजू,  निहार लढ्ढा, रोहित मोहता, प्रिती मालपाणी, प्रितेश मणियार, महेश बागल आदी उपस्थित होते. 
संविद २०२५ परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी न्याती ग्रुपचे नितीन न्याती, भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सामाजिक उद्योजकता आणि महिला सबलीकरण या दोन विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्योजकता आणि नेटवर्किंग बाबत देखील परिसंवाद होतील.
रविवार, दि. २३ रोजी ‘व्यापार सेतू’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ३०० हून अधिक उद्योजक सहभागी होणार आहेत. उद्योजकता विकास याबाबत यामध्ये चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होणार आहे. उद्योजकता विकासातून राष्ट्रप्रगती साधण्याकरिता हे महत्वाचे पाऊल असून मेगा एक्स्पोमध्ये  सेवा, अर्थ, कर्ज, बांधकाम, फर्निचर, किरकोळ विक्री आणि ज्वेलरी सह विविध क्षेत्रातील उद्योगांचा सहभाग असणार आहे. दोन दिवसीय परिषदेला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

एटीएम कार्ड बदलून 21 ज्येष्ठांची फसवणूक:म्हैसूरच्या भामट्याला पकडले,13.90 लाखांचा मुद्देमाल आणि166 एटीएम कार्ड्स सापडली

पुणे-पुणे पोलिसांनी एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथील राजू प्रल्हाद कुलकर्णी (५४) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आणि १६६ एटीएम कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा बहाणा करुन कुलकर्णी त्यांचे एटीएम कार्ड चोरायचा. त्यांच्याकडून पिन नंबर जाणून घ्यायचा. त्यानंतर कुलकर्णी एटीएममधून पैसे निघत नाही, असे सांगून ज्येष्ठांना त्याच्याकडील बाद झालेले एटीएम कार्ड द्यायचा. ज्येष्ठांकडील एटीएम कार्ड चोरुन तो पसार व्हायचा. एटीएम कार्डचा गैरवापर करुन तो पैसे काढून घ्यायचा, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजवे चौकात २ फेब्रुवारी रोजी एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात आरोपी कुलकर्णीने ज्येष्ठाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कुलकर्णी कर्नाटकात पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयु्क्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, संतोष शेरखाने, नितीन बाबर, सागर मोरे यांनी ही कामगिरी केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. निवृ्त्ती वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होत असल्याने कुलकर्णी शहरातील वेगवेगळ्या भागातील एटीएम केंद्रांबाहेर पाळत ठेवायचा. ज्येष्ठ नागरिक एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तो त्यांच्या पाठाेपाठ एटीएममध्ये शिरायचा. हातचलाखी करुन तो त्याच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठांना द्यायचा. ज्येष्ठांकडील कार्ड घेऊन तो त्यांच्या खात्यातून पैसे चोरायचा. गुन्हा केल्यानंतर तो कर्नाटकात पसार व्हायचा.आरोपी राजू कुलकर्णी याने एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली. त्याने विश्रामबाग, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, कोथरुड, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सहकारनगर, तसेच आळंदी परिसरात फसवणुकीचे १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. कुलकर्णी याने फसवणुकीतून मिळालेल्या पैसे मैत्रिणीसाेबत मौजमजा करण्यासाठी खर्च केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.

संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला नाही?:माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचा सवाल

औरंगजेबावर वाद होण्याची शक्यता
मुंबई-माजी क्रिकेटपटू तथा सुप्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी छावा चित्रपट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आम्हाला शाळेत का शिकवला नाही? असा खडा सवाल केला आहे. त्याने यासंबंधीच्या आपल्या पोस्टमध्ये मोगल बादशहा औरंगजेबाचा उल्लेख केल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई व अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. समालोचक आकाश चोप्रा यांनी हा चित्रपट नुकताच पाहिला. त्यानंतर एका पोस्टद्वारे त्यांनी उपरोक्त सवाल केला. त्यावर सोशल मीडियात गरमागरम चर्चा रंगली आहे.

आकाश चोप्रा आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, मी छावा चित्रपट पाहिला. शौर्य व अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य दाखवताना ज्या निस्वार्थी वृत्तीचे दर्शन झाले, त्यावरून मला काही प्रश्न पडलेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का शिकवण्यात आला नाही? त्यांचा इतिहासाच नाही, तर त्यांचा साधा उल्लेखही कुठे नाही. आपल्याला केवळ अकबर कसा मोठा व न्यायप्रिय राजा होता हेच शिकवले गेले. राजधानी दिल्लीतील एका रस्त्याचे नाव औरंगजेब आहे. हे सर्व का व कसे घडले?

छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर:अभिनेता कमाल खानचे वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुख्यमंत्र्यांनी दिल्या मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचनाजिथे अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, तिथे कारवाई होणारच

मुंबई–छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकीपीडियावर वादग्रस्त व चुकीची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींचे मने दुखावली गेली आहेत. तसेच तो वादग्रस्त व चुकीचा मजकूर विकीपीडियावरून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकीपीडियाला माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते, मात्र त्यांनीच अशी चुकीची माहिती दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

यात आणखी भर म्हणजे देशद्रोही फेम अभिनेता कमाल खानने देखील छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा चुकीचा मजकूर शेअर केला आहे. हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा त्याने केला आहे. यामुळे आणखी वाद पेटला आहे. या सर्वांची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सायबर विभागाच्या आयजींना विकीपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विकीपीडियावर अशा प्रकारचे लिखाण राहणे चुकीचे आहे. विकीपीडिया भारतातून चालत नाही. तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. पण ऐतिहासिक घटना, व्यक्तींबद्दल असे लिहिले जाऊ नये यासाठी नियमावली तयार करा, असे विकीपीडियाला सांगण्यात येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. पण त्याला एक सीमा आहे. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्तीवर घाला घालू शकत नाही. जिथे अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, तिथे कारवाई होणारच. यासाठी नियमावली तयार करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारसोबतही चर्चा करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अभिनेता कमाल खान याने अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटावर देखील टीका केली आहे. चित्रपटाचे समीक्षण लिहिताना कमाल खानने दहा पैकी एकच रेटिंग दिले आहे. विकीपीडियावर देखील अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिन करणे असल्याचे बोलले जात आहे. विकिपीडियाने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली नाराजीदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पुसण्यामध्ये, वर्षानुवर्षे बरेच काही लिहिले गेले, चुकीचे मजकूर जोडले गेले आणि त्याचेच प्रतिबिंब म्हणजे आता ही विकिपिडियावर दिसणारी माहिती आहे. सर्व मुद्दे, आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यानंतर बलिदान अधोरेखित करणे हे चालूच आहे आणि तेच पुन्हा अत्यंत दुर्दैवीपणे पाहायला मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने लवकरात लवकर यासंदर्भातील सूचना जारी करत जनमानसाच्या भावनांचा आदर करावा अशीही मागणी केली.

टीसीएसला फॉर्च्युन®ने २०२५ च्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांमध्ये सामील केले

नावीन्यग्राहककेंद्री दृष्टिकोन आणि लोकांना प्राथमिकता देण्याच्या संस्कृतीप्रती बांधिलकीने वेगाने विकसित होत असलेल्या व्यावसायिक वातावरणामध्ये टीसीएसचे नेतृत्व मजबूत केले आहे

न्यूयॉर्क/मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५: माहिती तंत्रज्ञान सेवा, कन्सल्टिंग आणि व्यावसायिक उपाययोजनांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) फॉर्च्युन® मॅगझीनच्या २०२५ च्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांच्याTM यादीमध्ये स्थान दिले आहे. हे यश टीसीएसच्या ग्राहक-केंद्री नावीन्यामार्फत दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्याची, लोकांना प्राथमिकता देणाऱ्या प्रभावी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची आणि आपल्या एआय व नेक्स्ट-जेन क्षमता वाढवण्याची क्षमता अधोरेखित करते.

कॉर्पोरेट प्रतिष्ठेतील एक मापदंड मानली जाणारी, फॉर्च्युन®ची जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांचीTM यादी पात्र कंपन्यांच्या ३३०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, संचालकांच्या व आर्थिक विश्लेषकांच्या सर्वसमावेशक सर्वेक्षणावर आधारित आहे. त्यासाठी उद्योगक्षेत्रातील ६५० कंपन्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. दोन दशकांहून जास्त काळापासून फॉर्च्युनने वार्षिक रँकिंग संकलित करण्यासाठी जागतिक ऑर्गनायझेशनल कन्सल्टिंग फर्म कॉर्न फेरीसोबत हातमिळवणी केली आहे. संघटनांचे मूल्यांकन नावीन्य, जागतिक स्तरावर व्यापार करण्याची क्षमता, प्रतिभा आकर्षित करण्याची, विकसित करण्याची व कायम राखण्याची क्षमता तसेच समुदाय व पर्यावरणाप्रती जबाबदारीचे पालन या निकषांच्या आधारे केले जाते.

फॉर्च्युनच्या मुख्य संपादक एलिसन शोंटेल म्हणाल्या, “फॉर्च्युनच्या यावर्षीच्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांच्या यादीमध्ये सामील करण्यात आलेल्या सर्व कंपन्यांचा आम्हाला अभिमान आहे. हे यश संपादन करण्याची त्यांची क्षमता खरोखरीच प्रभावी आहे. आव्हानात्मक जागतिक व्यवसाय वातावरणामध्ये देखील उच्च मानके, लवचिकता आणि दूरदर्शीपणाचे हे प्रमाण आहे.”

हे यश मिळवून देणारा एक प्रमुख घटक टीसीएस पेसइनोवेशन इकोसिस्टिम आहे. यामध्ये टीसीएसची अनोखी कार्यप्रणाली, जागतिक अंतर्दृष्टी, संशोधन, बौद्धिक प्रतिभा आणि को-इनोवेशन नेटवर्क TM(COIN™)चा उपयोग केला जातो. हे नेटवर्क नेक्स्ट-जनरेशन उपाययोजना विकसित करण्यासाठी ग्राहक, सहयोगी, स्टार्टअप आणि शिक्षणतज्ञ यांना एकत्र आणते. लंडन, पॅरिस आणि स्टॉकहोममध्ये टीसीएस पेस पोर्टकेंद्रांचा विस्तार, सुविधांची संख्या १२ पर्यंत वाढवणे, या गोष्टी सहयोगी दृष्टिकोन अजून मजबूत करतात, एआय, रोबोटिक्स आणि नवनवीन तंत्रज्ञानामध्ये यशाला गती प्रदान करतात.

टीसीएसचे उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष श्री अमित बजाज यांनी सांगितले, “हे स्थान नावीन्य आणि ग्राहक-केंद्री दृष्टिकोन, अव्वल प्रतिभांना आकर्षित करून स्वतःकडे कायम ठेवण्याची क्षमता, आमच्या ग्राहकांसाठी उच्च मूल्य असलेले व्यावसायिक परिवर्तन सक्षम करण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड यांच्याप्रती टीसीएसची बांधिलकी अधोरेखित करते. व्यवसायांना सातत्याने अडीअडचणींचा सामना करावा लागतो, आम्ही त्यांना एक अनुकूलित उद्यम बनण्यासाठी सक्षम बनवतो, त्यामुळे त्यांना दीर्घकालीन विकास व लवचिकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात मदत मिळते.”

डिजिटल नावीन्याच्या पलीकडे जाऊन, टीसीएस डिजिटल ट्विन तंत्रज्ञानासारख्या उपक्रमांमार्फत सस्टेनेबिलिटीला पुढे नेते, ज्यामुळे औद्योगिक व वाणिज्यिक संचालनामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत मिळते. जगातील पहिले हायड्रोजन-चालित विमान इंजिन विकसित करण्यासाठी रोल्स-रॉयससोबत त्यांची भागीदारी अधिक शाश्वत भविष्य तयार करण्याप्रती त्यांची बांधिलकी मजबूत करते.

तंत्रज्ञानामध्ये अतिशय वेगाने होत असलेले बदल, पुरवठा शृंखलेमध्ये क्रांती, ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये होत असलेली वाढ अशा सध्याच्या काळात व्यवसायांना कायम आघाडीवर राहण्यासाठी सातत्याने नावीन्य व अनुकूलन करणे आवश्यक आहे. टीसीएस या गुंतागुंतीतून बाहेर पडून पुढे जाण्यासाठी आघाडीच्या व्यवसायांसोबत सहयोग करते, विकास आणि लवचिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एआय, क्लाऊड, सायबर सुरक्षा, स्वयंचालन आणि प्रगत कम्प्युटिंगमध्ये अत्याधुनिक डिजिटल उपाययोजनांचा लाभ घेते. आपल्या अनेक ग्राहकांसोबत फॉर्च्युनच्या यादीमध्ये मिळालेले स्थान, व्यवसाय परिवर्तनासाठी एक धोरणात्मक प्रवर्तक म्हणून टीसीएसची भूमिका अधोरेखित करते. 

टीसीएसला फॉर्च्युनच्या यादीमध्ये मिळालेले स्थान लोकांना प्राथमिकता देण्याची त्यांची बांधिलकी दर्शवते. लोकांच्या आचरणातील उत्कृष्टतेसंदर्भात काम करणारे जागतिक प्राधिकरण, टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्यूटने यावर्षी टीसीएसला त्यांचे एंटरप्राइज-वाईड टॉप एम्प्लॉयर सर्टिफिकेशन दिले, हे टीसीएससाठी एक खूप मोठे यश आहे. सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये कामाच्या ठिकाणच्या प्रथांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्टता प्रदर्शित करणाऱ्या, निवडक संघटनांना हा प्रतिष्ठित सन्मान दिला जातो. याखेरीज टीसीएसला २०२५ साठी ग्लोबल टॉप एम्प्लॉयर म्हणून मानांकन देण्यात आले. हा मजबूत पाया टीसीएसला आघाडीच्या प्रतिभा आकर्षित करण्यात व त्या कायम राखण्यात सक्षम बनवतो, हे सुनिश्चित करतो की, त्यांचे मनुष्यबळ नावीन्य व व्यावसायिक यशाचे प्रमुख चालक बनेल. टीसीएस आपल्या कर्मचाऱ्यांच्या समाधानावर खूप भर देते आणि कौशल्यवृद्धी उपक्रमांमार्फत एआयसाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

आयटी सेवांमध्ये टीसीएसच्या नेतृत्वाला उद्योग विश्लेषकांनी आणि बाजारपेठ रँकिंगने सातत्याने मान्यता दिली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ब्रँड फायनान्सच्या २०२५ आयटी सेवा रँकिंगनुसार, कंपनीचे ब्रँड मूल्य २० बिलियन डॉलर्सच्या पुढे पोचले. हे यश मिळवणारी टीसीएस ही दुसरी जागतिक आयटी सेवा कंपनी बनली आहे.

राग प्रहरांच्या संकल्पनांपासून मुक्त:डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित संगीतोत्सव

‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे 2 मार्चला आयोजन
पुणे : राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे रविवार, दि. 2 मार्च 2025 रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत सादरीकरणाला राग-समयाचे बंधन नको या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित गायन-वादनाचा हा पहिला संगीत महोत्सव आहे.
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील रागांचे समय प्रहरानुसार सादरीकरण करायचे झाल्यास ज्या प्रहरात सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत ते राग विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. तसेच मिश्र रागांचे सादरीकरण होणे शक्य नाही. यातून पर्यायाने भारतीय संगीत क्षेत्राचे आणि कलाकाराचे नुकसानच होईल. अशा परिस्थितीत कोणत्याही रागाचे कोणत्याही वेळी उत्तम प्रस्तुतीकरण होऊन तो रोग त्याच्या पूर्ण सौंदर्यासह खुलविला जाऊ शकतो, अशी धारणा डॉ. प्रभा अत्रे यांची आहे. या संकल्पनेला अनुरसरून हा महोत्सव आयोजित केला असल्याचे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
संगीतोत्सव दि. 2 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 9:30 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या सत्राची सुरुवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे. त्यानंतर पंडित उदय भवाळकर, पंडिता पद्मा तळवलकर, पंडित राम देशपांडे, पंडित राजा काळे यांचे गायन होणार आहे.
दुसऱ्या सत्राची सुरुवात दुपारी 4 वाजता होणार असून सुरुवातीस ताकाहिरो अकाई यांचे संतूर वादन होणार आहे. त्यानंतर पंडित श्रीनिवास जोशी, पंडित विनायक तोरवी, पंडिता अलका देव-मारुलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन होणार आहे.
कलाकारांना पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पंडित योगेश समसी, पंडित अरविंदकुमार आझाद, भरत कामत, ऋषिकेश जगताप, प्रशांत पांडव, अजिंक्य जोशी (तबला), चैतन्य कुंटे, सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी, अविनाश दिघे, राहुल गोळे (संवादिनी), मृणाल उपाध्याय, प्रताप आव्हाड (पखवाज) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

थेरगाव येथील अन्‍यायग्रस्‍त दलित कुटुंबाची फिर्याद दाखल होणार

  • वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे बाबा कांबळे यांना आश्‍वासन
    -अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर बाबा कांबळे यांचे आत्मक्लेष सत्याग्रह आंदोलन स्थगित

पिंपरी ! प्रतिनिधी
थेरगाव येथील पिडित असलेल्‍या दलित कुटुंबियांची फिर्याद दाखल करण्याचे आश्‍वासन पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्‍याशी झालेल्‍या चर्चेनंतर हे आश्‍वासन देण्यात आले. तसेच बाबा कांबळे यांच्‍या मागण्यांवर लवकर कार्यवाही केली जाईल, असेही आश्‍वासन दिले. त्‍यामुळे आत्‍मक्‍लेश सत्‍याग्रह आंदोलन स्‍थगित करत असल्‍याची माहिती बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

सोमवारी (दिनांक १७) आज पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्‍या बैठकीत बाबा कांबळे यांच्‍या मागण्यांबाबत सविस्‍तर चर्चा करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

थेरगाव येथील कुटुंबावर पाणी पुरवठा तोडून अन्‍याय केला आहे. त्‍यासाठी ते कुटुंब मुंबईपर्यंत चालत जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली कैफियत मांडणार आहेत. हे सर्व प्रकरण दुर्देवी असल्‍याचे सांगत या बाबत आंदोलन करणार असल्‍याचा इशारा कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला होता. शहरात कायदा व सुव्यवस्‍थेचा बोजवारा उडाला असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. त्‍यांच्‍या इशाऱ्यानंतर पोलिस प्रशासनाने त्‍वरीत पाऊले उचलली आहेत.

दलित कुटुंबावरील अन्‍याय. सावकारी त्रासावरून झालेल्‍या आत्‍महत्‍या या सर्व प्रकरणाचे एसीपी दर्जाच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. सध्या मुंबई येथे पायी चालत गेलेल्या दलित कुटुंबाची फिर्याद घेण्यास पोलीसांनी सकारात्‍मकता दाखवली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 विशाल गायकवाड व सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे साहेब यांनी मुंबई आझाद मैदान येथे महिला पोलिस कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. पीडित दलित कुटुंबाची फिर्याद घेण्यात येणार आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती बाबा कांबळे यांनी बैठकीनंतर दिली.
या सर्व बैठकीनंतर सर्व मागण्यांबाबत सकारात्‍मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन मिळाले आहे. त्‍यामुळे आत्‍मक्‍लेश सत्‍याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. प्रत्येक शनिवारी तक्रार अर्ज संदर्भामध्ये तक्रार निवारणासाठी जनता दरबार घेण्यात येतो याबाबत सर्वसामान्य माणसांना अधिक जागरूकता व्हावी यासाठी याबाबतची प्रसिद्धी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्‍या वतीने करण्यात येणार आहे. हे आंदोलनाचे यश आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने दिलेले आश्वासन पुढील 15 दिवसात पूर्ण न केल्यास शहरांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील यावेळी बाबा कांबळे म्हणाले

  • बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र राज्‍य.

टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि शिव स्वराज्य यात्रेचा समारोप

पुणे : शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर होणारा पुष्पवर्षाव…पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक… रॉयल एनफिल्ड वर स्वार होऊन बाईकर्सने शिवरायांना दिलेली मानवंदना…शिव शंकराचा तू अवतार हाती घेउनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार ही आरती म्हणत महिलांनी शेकडो दिव्यांनी केलेली शिवरायांची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शेकडो पुणेकरांच्या उपस्थित शिव स्वराज्य यात्रेचा समारोप आणि शिव पूजन सोहळा रंगला.

आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि भारतातील १३ राज्यातून सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. यावेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, आजचा कार्यक्रम हा भारत देशासाठी हा एक सुवर्णक्षण आहे. संपूर्ण जगासाठी एक स्वातंत्र्यदेवता म्हणून शिवाजी महाराज यांचे महत्त्व आहे. आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी हा युगपुरुष प्रेरणादायी आहे. जगभरात त्यांचे स्मारक निर्माण झाले पाहिजे. सामर्थ्य हे दीनदुबळ्यांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी असले पाहिजे हे शिवरायांनी सांगितले. जगाला आदर्शवादाकडे नेणारे शिवराय आवश्यक आहेत.

प्रदीप रावत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर ते राष्ट्रपुरुष आहेत. छत्रपती महाराज झाले नसते तर ज्ञानोबा माऊली पासून तुकाराम महाराज पर्यंत संतांनी निर्माण केलेला सहिष्णू परंपरा असलेला समाज नष्ट झाला असता. वारकरी जगायचे असतील तर महाराजांसारखे धारकरी उभे रहावे लागतात. शांतता हवी पण स्मशान शांतता नको या दोन गोष्टीला फरक महाराजांनी दाखवला, हा इतिहासाचा दाखला संपूर्ण जगासाठी कायम आदर्श ठरणार आहे.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, एक सुंदर, कृतिशील आणि दिशादर्शक असा हा उपक्रम आहे. जगातले महान राजा शिवाजी महाराज आहेत त्यांची तुलना करण्यासारखे कोणीही नाही. जगाला मार्ग दाखविणारे आदर्श म्हणजे शिवाजी महाराज, असेही त्यांनी सांगितले.

हेमंत जाधव म्हणाले, सन २०२३ साली कुपवाडा येथे सैनिकांना स्फूर्ती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले. अशाच प्रकारचे लोक वर्गणीतून साकार झालेले जागतिक स्मारक टोकियो शहरात होत आहे.

कार्यक्रमात जपान मधील इडीगोवा इंडियन कल्चरल सेंटरचे विश्वस्त योगेंद्र पुराणिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मनोगत व्यक्त केले. याशिवाय शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांनी शिवकालीन युद्ध कला सादरीकरण, राम देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटन केले. भक्ती गुरुकुल भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले. केशव शंखनाद पथकाने शंखवादन केले तर आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

संतोष रासकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम मांढरे यांनी आभार मानले.

राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर

९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

नवी दिल्ली :
यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून (दिनांक २१ फेब्रुवारी) नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडिअम) मध्ये होत आहे. २१ते २३ फेब्रुवारीदरम्यान कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, चर्चा असे वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, यंदाच्या साहित्य संमलेनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. ‘लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे’ असा प्रवास ही ग्रंथदिंडी करणार आहे, अशी माहिती साहित्य संमेलन आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी दिली. दिल्लीत त्यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरहदचे डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे उपस्थित होते.

संजय नहार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. २१ फेब्रुवारीला दुपारी ३.३० ला विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. ग्रंथदिंडीची सुरुवात संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल, या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील, असेही संजय नहार म्हणाले.

संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याचे संजय नहार म्हणाले.

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे
१९ फेब्रुवारीला पुणे येथून साहित्य संमलेनासाठी विशेष रेल्वे दिल्लीकडे येणार आहे. या रेल्वेमध्येही साहित्य संमेलन होणार आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत.

यावेळी बोलताना संजय नहार यांनी सांगितले की, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या ३ दिवसांमध्ये कोणते कार्यक्रम घ्यावे हा अधिकार साहित्य महामंडळाचा असतो. त्यामुळे महामंडळाच्या नियमानुसारच कार्यक्रम होणार आहेत. मात्र संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला काही कार्यक्रम घेता येतात, तसे जवळपास १०० विविध कार्यक्रम झाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. इतिहासात दिल्ली जिंकताना मराठ्यांचा तळ तालकटोरा स्टेडियम होते. त्या जागेवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.

संजय नहार म्हणाले की, साहित्य संमेलन हा उत्सव कुठल्या खासगी संस्थेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. साहित्य संमलेनात परिसंवाद, काव्य संमेलन असे भरगच्च कार्यक्रम तीन दिवस होणार आहेत. जवळपास १०० पुस्तके संमेलनात प्रकाशित होतील, असा अंदाज आहे. दिल्लीतील लोकांना पुस्तकांसाठी ही मोठी संधी आहे, असेही ते म्हणाले.

इंग्लड, पाकिस्तानमधून लोकांची उपस्थिती
साहित्य संमलेनाला पाकिस्तानातील कराची, इंग्लंड आणि अन्य काही देशांतून लोक येत आहेत. लंडनमधून एक व्यक्ती पुस्तक प्रकाशन करण्यासाठी येणार आहेत.व्यवस्थेबाबत बोलताना डॉ. शैलेश पगारिया म्हणाले की, संमेलनाला महाराष्ट्रातून २७०० लोक येतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत १८०० लोकांची व्यवस्था झाली आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. तर याबाबत बोलताना नहार म्हणाले की, व्यवस्था नाही म्हणून काही लोक येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शक्य असेल तर दिल्लीतील मराठी लोकांनी आपल्या घरी काही लोकांना ठेवावे, ही आमची विनंती आहे, असेही ते म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ”

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज लोकमान्य सभागृह, केसरीवाडा येथे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी शहरातील माजी नगरसेवक, विधानसभा अध्यक्ष व सेल अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांकडून सभासद नोंदणीसाठी करावयाची पूर्वतयारी म्हणून आढावा घेत माहिती घेण्यात आली.

सदर प्रसंगी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक सुभाष जगताप, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, विनोद ओरसे, अविनाश जाधव, शीतल सावंत,शशिकला कुंभार,रईस सुंडके, फिरोज शेख,नंदा लोणकर, फारुख इनामदार, हिना मोमीन, अश्विनी भागवत,वासंती काकडे, विधानसभा अध्यक्ष शिवाजीनगर अभिषेक बोके, कोथरूड हर्षवर्धन मानकर, पर्वती संतोष नांगरे, हडपसर डॉ.शंतनू जगदाळे, पुणे कँन्टोमेंट नरेश जाधव, कसबा अध्यक्ष अजय दराडे, सेल अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक समीर शेख, सामाजिक न्याय जयदेव इसवे, सांस्कृतिक विजय राम कदम, सोशल मिडिया शीतल मेदने, दिव्यांग पंकज साठे, महिला बचत गट अश्विनी वाघ, अल्पसंख्याक महिला नूरजहाँ शेख, केमिस्ट विनोद काळोखे, माहिती अधिकार दिनेश खराडे, वैद्यकीय मदत कक्ष विजय बाबर, ग्राहक संरक्षण राजेंद्र घोलप,अभियंता सतीश आडके, क्रीडा राजेंद्र देशमुख, उद्योग चैतन्य जोशी, पथारी प्रशांत कडू, माथाडी हर्षद बोडके, जैन जया बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त:राहुल गांधींनी नियुक्तीला केला विरोध

0

नवी दिल्ली-1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज ही जबाबदारी स्वीकारतील. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज निवृत्त होत आहेत. नवीन कायद्यांतर्गत नियुक्त झालेले ते पहिले सीईसी आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत राहील.सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. या पॅनेलच्या शिफारशीवरून नवीन सीईसीची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीत विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणाचे मुख्य सचिव आणि १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्याच वेळी, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू हे त्यांच्या पदावर राहतील.मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन सीईसीसाठी 5 नावांची यादी देण्यात आली होती. पण राहुल यांनी नावांचा विचार करण्यास नकार दिला होता.बैठकीनंतर राहुल गांधी यांनी एक असहमती पत्र जारी केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे ही बैठक होऊ नये.

त्याच वेळी, काँग्रेसने म्हटले होते – आम्ही अहंकाराने काम करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाला लवकर निर्णय घेता यावा म्हणून बैठक पुढे ढकलावी लागली.

सिंघवी म्हणाले- सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत वाट पाहावी
काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सीईसी निवड समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीतून सरन्यायाधीशांना काढून टाकून सरकारने हे स्पष्ट केले आहे की त्यांना निवडणूक आयोगाची विश्वासार्हता नको आहे तर त्यावर नियंत्रण हवे आहे.

सिंघवी म्हणाले की, सीईसी आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीच्या नवीन कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी आहे. फक्त ४८ तासांचा प्रश्न होता. सरकारने याचिकेची लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यायला हवी होती.

निवडणूक आयोगाच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी
सर्वोच्च न्यायालय १९ फेब्रुवारी रोजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करेल. या प्रकरणाची सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार होती, परंतु प्रकरण सूचीबद्ध झाले नाही. त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला.

प्रशांत म्हणाले होते की, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत, सरकार नवीन सीईसी नियुक्त करू शकते, म्हणून न्यायालयाने या प्रकरणाची लवकरच सुनावणी करावी. यावर न्यायालयाने १९ फेब्रुवारीची तारीख दिली आणि सांगितले की जर यादरम्यान काही घडले तर ते न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असेल, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

हे प्रकरण मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, २०२३ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांशी संबंधित आहे.

मुंडेंच्या शुक्रवार पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,32 जण पकडले

पुणे:शक्रवार पेठेतील शाहु चौकाजवळील अंग्रेवाडा येथे सुरु असलेल्या अंग्रेवाडा येथे छापा टाकून जुगार खेळणार्‍या एका महिलेसह ३२ जणांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार ४२० रुपयांची जुगाराची साधने मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे.

सुनिल मुंडे हा पत्त्यांचा क्लब चालवत होता.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुतांश अवैध धंदे बंद असताना शुक्रवार पेठेसारख्या मध्य वस्तीत एकाच वेळी इतके लोक जुगार खेळण्यासाठी जमलेले दिसून आले. दिघी पासून धनकवडीपर्यंत, गोखलेनगरपासून नाना पेठ आणि भवानी पेठेपासून नांदेडसिटीपर्यंतच्या भागात राहणारे या जुगार अड्ड्यावर जमले होते.

पत्त्यांचा क्लबच्या मॅनेजर भास्कर दत्तात्रय पंडीत (रा. संतनगर, अरण्येश्वर), घनश्याम ज्ञानेश्वर गुलापिल्ले (वय ४२, रा. भवानी पेठ), गणेश लक्ष्मण कांबळे (वय ३८, रा. भवानी माता मंदिराजवळ, भवानी पेठ), भागवत सखाराम कटारे (वय ३३, रा. कर्वेरोड, कोथरुड), आनंद सतिश खिवंसरा (वय ४५, रा. रविवार पेठ), निलेश रोहिदास गव्हाणे (वय ४२, रा. पर्वती दर्शन), शेखर चंद्रकांत जगताप (वय ५५, रा. काकडे वस्ती, कोंढवा), आशिष ज्ञानेश्वर राशणकर (वय ३५, रा. धनकवडी, आंबेगाव), गुड्डु रणजित रवानी (वय ३०, रा. हडपसर, माळवाडी), सतेंद्र सुनिल सिंग (वय २७, रा. माळवाडी, हडपसर), नवाज निझन पठाण (वय ४२, रा. गुरुनानक नगर, भवानी पेठ), रसुल बरसु शेख (वय ३०, रा. अपर डेपो), प्रदीप दशरथ खवळे (वय ४३, रा. जनता वसाहत), विलास गणपत काळे (वय ६३, रा. धनकवडी), बाळासाहेब बळीराम साठे (वय ३७, रा. अपर इंदिरानगर), कुमार गुंडा माने (वय ६०, रा. संतोषनगर, कात्रज), दीपक अर्जुन बागल (वय ६०, रा. ताडीवाला रोड), राकेश सुरेश मसुळे (वय ३२, रा. नांदेड सिटी), उमेश दत्तात्रय काळे (वय ४४, रा. गोखलेनगर), विष्णु रघुनाथ ढगे (वय ४८, रा. धनकवडी), दत्ता वसंत सितप (वय ५३, रा. संकल्प सोसायटी, आंबेगाव), बाळु किसन भेलके (वय ४८, रा. बालाजीनगर, धनकवडी), विलास विक्रम माने (वय ४७ रा. भारतमातानगर, दिघी), योगेश सतिश डेंगळे (वय २७, रा. अपर ओटा), विकास राजाभाऊ अडसुळ (वय ४७, रा. अपर बिबवेवाडी), दत्ता आबरावु शेटे (वय ५७, रा. जवाहर बेकरी शेजारी), बाळु शंकर कांदे (वय ५०, रा. शुक्रवार पेठ), बजरंग बाबुराव डोळसे (वय ५७, रा़ स्वारगेट), सचिन यशवंत माने (वय ५०, रा. राजवाडी, नाना पेठ), विकास सुभाष बनसोडे (वय ३५, रा. धायरी) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.

जुगार खेळणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज देण्यात आली आहे. जुगार अड्डा मालक सुनिल मुंडे (रा. अंग्रेवाडी, शुक्रवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्याकडून खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना आदेश दिला की, अंग्रेवाडा येथे जुगार खेळला जात आहे. तेथे जाऊन कारवाई करा. त्यानुसार खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, बनकर, ढोणे, हवालदार हर्षल दुडुम, ठवरे, कुंभार, बोडके, पेरणे, धारुरकर, राऊत, हरबा, लांडगे,गायकवाड, खराडे, नायकरे, नदाफ, देशमुख, वाबळे असे पथक रविवारी सायंकाळी शुक्रवार पेठेतील अंग्रेवाडा येथे पोहचले. त्यांनी आत जाऊन पाहिले तर चार गोलाकार टेबलावर अनेक जण तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी सर्वांना जागच्या जागी थांबायला सांगितले. जुगार अड्ड्याचा मॅनेजर भास्कर पंडित याने हा जुगार अड्डा सुनिल मुंडे याचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वांची झडती घेऊन १ लाख ४६ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण तपास करीत आहेत.