Home Blog Page 452

राज्यातील चार मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकलेले, त्यातील दोन भाजपचे:संजय राऊत यांचा मोठा दावा

नवी दिल्ली-राज्यातील चार मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात खोटे बोलत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देखील अशाच हनीट्रॅपचा वापर करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. या आधीचे सरकार हे घटनाबाह्य होते, तर आताचे सरकार हे अनैतिक असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सरकार हे राज्याला कलंकित करणारे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. महाराष्ट्र सरकार नाही तर गुंडाची टोळी काम असल्याचे राऊत यांनी म्हटल आहे. महाराष्ट्राने इतका हतबल मुख्यमंत्री कधीही पाहिला नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.

संजय राऊत यांनी हनीट्रॅप प्रकरणात भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अशाच हनीट्रॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले होते, असा दावा राऊत यांनी केला होता. या आधी देखील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला होता. मात्र, त्याची खरी सर्व माहिती आपल्याकडे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अशाच हनीट्रॅप प्रकरणात अडकून आमचे नेते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

आमचे चार तरुण खासदार देखील अशाच हनीट्रॅप मध्ये अडकून तिकडे गेले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. चार तरुण खासदार आमच्याकडून हनीट्रॅप प्रकरणामुळे त्यांच्याकडे पळून गेले. तर काही सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणा आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे गेले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा कोणाचाही हिंदुत्वाशी काही संबंध नाही. अजित पवार यांचा देखील सामाजिक न्याय, फुले- शाहू – आंबेडकर यांचे विचार, असा काहीही संबंध नाही. त्यांची पळून जाण्याची कारणे फार वेगळी आहेत, असा दावा राऊत यांनी केला. या अशा अनेक हनीट्रॅपच्या सीडी आणि पेन ड्राइव्ह यांच्या माध्यमातूनच चौथ्या दिवशी सरकारमधील नेते पळून सुरत मार्ग गुवाहाटीला पोहोचले होते. असा दावा त्यांनी केला. सीडी बाहेर येईल म्हणूनच पटापट सगळे सुरतला रवाना झाले होते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाव फडणवीस असले तरी त्यांच्या अंतरंगात, मनामध्ये जो संस्कार असायला पाहिजे, तो दिसत नाही. आमदार निवासामध्ये हाणामारी होत आहेत, संजय शिरसाट यांच्या नोटांनी भरलेल्या बॅगा सर्वांनीच पाहिल्या आहेत, मंत्री रम्मी खेळत आहेत. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांचे समर्थन करत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात काही मुख्यमंत्री अकार्यक्षम होऊन गेले असतील. त्यांच्याकडून काही चुका देखील झाल्या असतील. मात्र भ्रष्टाचार, व्यभिचार, मंत्रिमंडळातील गुंडागर्दी आजपर्यंत कोणीही पाहिली नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आज काय चालू आहे हे राज्याचे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो मी आज पोस्ट केला आहे. त्याची चौकशी करा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात अगदी पुराव्यासह एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. चार मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत. हे देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे. म्हणूनच त्याचा पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी पोलिस जंग-जंग पछाडत असल्याचा दावा त्यांनी केला. आज देखील पोलिसांनी पाच ठिकाणी धाडी टाकल्या असल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही या प्रकरणातील प्रफुल्ल लोढा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील राऊत यांनी दाखवला.

2006च्या मुंबई बॉम्बस्फोटातल्या सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका: 189 जणांचा गेला होता बळी

मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने 2006 च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठा निकाल दिला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस.जी. चांडक यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यापैकी 5 जणांना मृत्युदंड आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, 11 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर यातील एका आरोपीचा आधीच मृत्यू झाला आहे.

मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. उच्च न्यायालयाने म्हटले की, आरोपींविरुद्धचा खटला सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. घटनेला 19 वर्षे झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. न्यायाधीश अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष न्यायपीठाने म्हटले की, सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी निर्णायक नाहीत. 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय भागात सात गाड्यांमध्ये साखळी स्फोट झाले होते. त्यात 189 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 824 लोक जखमी झाले होते. हे स्फोट संध्याकाळी 6:24 ते 6:35 दरम्यान झाले. हा तो वेळ होता जेव्हा लाखो प्रवासी काम केल्यानंतर मुंबईच्या लोकल ट्रेनमधून घरी परततात.
पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींकडून जप्त केलेले पदार्थ त्यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत.
बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेले स्फोटके योग्यरीत्या राखली गेली नव्हती. पुराव्यांचे सीलिंग देखील खराब होते.
गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचे प्रकार रेकॉर्डवर आणण्यातही सरकारी वकिलांना अपयश आले आहे.
आरोपींकडून घेतलेले जबाब जबरदस्तीने नोंदवण्यात आले आहेत असे दिसते.
20 जुलै 2006 ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींना अटक केली. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये, आरोपींनी न्यायालयाला लेखी माहिती दिली की, त्यांच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब घेण्यात आले. आरोपपत्रात 30 आरोपींना दाखल करण्यात आले होते. यापैकी 13 जण पाकिस्तानी नागरिक म्हणून ओळखले गेले.

सुमारे 9 वर्षे खटला चालल्यानंतर, विशेष मकोका न्यायालयाने 11 सप्टेंबर 2015 रोजी निकाल दिला. 13 आरोपींपैकी 5 दोषींना मृत्युदंड, 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा आणि एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

2016 मध्ये, आरोपींची मुंबई उच्च न्यायालयात धाव, खटला 9 वर्षे चालला

2016 मध्ये, आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आणि अपील दाखल केले. 2019 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने अपिलांवर सुनावणी सुरू केली. न्यायालयाने सांगितले की या प्रकरणात सविस्तर युक्तिवाद आणि रेकॉर्डचा आढावा घेतला जाईल. 2023 ते 2024 पर्यंत हा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित राहिला, सुनावणी तुकड्या-तुकड्यात होत राहिली.

सहकारनगरमध्ये ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग

पुणे-एका ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागात घडली. आरोपी ज्योतिषाने वनस्पती देण्याची बतावणी करुन तरुणीला कार्यालयात बोलावले. त्याने कार्यालायत तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे.

अखिलेश लक्ष्मण राजगुरू (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या ज्योतिषीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीने तिच्या मोठ्या भावाची जन्मपत्रिका दाखवण्यासाठी आरोपी ज्योतिषीची भेट घेतली होती. त्या वेळी राजगुरू याने पत्रिका पाहून भावाच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी एका विशेष वनस्पतीची आवश्यकता असल्याची बतावणी केली होती. शनिवारी (१९ जुलै) तरुणीला वनस्पती घेण्यासाठी कार्यालयात या, असा संदेश पाठवून बोलावून घेतले.

पीडित तरुणी पुणे-सातारा रस्त्यावरील त्याच्या कार्यालयात गेली. आरोपी राजगुरुने वनस्पती देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे ती घाबरली. तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी राजगुरू याला अटक केली.

पुणे वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराची आत्महत्या:मुलं शाळेतून आल्यावर घरात दिसला वडिलांचा मृतदेह

पुणे-पुणे पोलिस दलातील वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे.या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव,पुणे) असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंड याठिकाणी गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले देखील आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने पतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी यबाबत घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गायकवाड यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

ना कोयता थांबतोय, ना कट्टा ,ना मॅफेड्रॉन ..पुण्याला बसतोय विळखा

पुणे- राजकारण प्रत्येक पक्षात शिगेला पोहोचलेले असताना ते एकमेकावर कुरघोड्या करण्यात रम्य झालेले दिसते आहे आणि पुण्यासारख्या शहरात लोकप्रतिनीधी आपापले कार्यकर्ते तसेच सिलेब्रिटी घेऊन विविध कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात धन्यता मानत असताना शहरातील गुन्हेगारीच्या प्रकाराने मात्र मोठा आ केला आहे. इथे रोज कट्टे सापडत आहेत त्या सोबत काही काडतुसे सापडत आहेत , आणि मॅफेड्रॉन, गांजा देखील वाहतो आहे अन कोयत्याची दहशत देखील थांबायचे नाव घेईनाशी झाली आहे.अन सायबर गुन्ह्यांनी देखील थैमान घातले आहे … पोलीस कारवायातूनच या बाबी स्पष्ट होत असल्याने पोलीसही काही हातावर हात धरून बसल्याचे म्हणता येणार नाही .पण शहरातील गुन्हेगारीची समस्या मात्र बिकट होत असल्याचे दिसून येते आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भवानी पेठ परिसरात अगदी किरकोळ कारणावरून कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांचा प्रकार उघडकीस आला आहे. “आम्हीच इथले भाई” असे म्हणत तरुणांच्या जमावाने तब्बल 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगात सुरू आहे. किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या काही तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेऊन थेट रस्त्यावर उतरून हिंसाचार घडवून आणला.या हल्लेखोर तरुणांनी 10 ते 12 दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये हे तरुण “आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये” असा इशारा देत दहशत माजवत असल्याचे दिसून येते.

भवानी पेठ येथील या प्रकरणात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, काही तासांतच या वादाने हिंसक वळण घेतले. मध्यरात्रीच्या सुमारास, काही तरुणांनी जमाव तयार करून हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण केली.या तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर जोरदार हल्ला चढवून तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे भवानी पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे.

दरम्यान औंध परिसरात घडलेल्या काही दिवसांपूर्वी चतु:शृंगी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. 28 जून रोजी रात्री 12.15 वाजता, सात जणांच्या टोळीने काही तरुणांवर कोयत्याने आणि काठ्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी या प्रकरणी सातही आरोपींना अटक केली असून, त्यांची धिंड काढत कडक संदेश दिला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि तीन लोखंडी कोयते जप्त केले आहेत. ही तातडीने केलेली कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरली असून, नागरिकांनी याचे स्वागत केले आहे.

शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणुक करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाणे, तसेच कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लाेणी काळभोर भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाख ३४ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ४७ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोणी काळभोर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. रकम गुंतविल्यानंतर त्यांना सुरुवातीला परतावा देण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी रकम गुंतविली. रकम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, तसेच परतावाही देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक एस निकम तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चाेरट्यांविरुद्ध फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

…पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना बाणेर परिसरात घडली.याबाबत एका ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला बाणेर भागात राहायला आहेत. त्या बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकाविले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाणेर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.

पुणे शहरातील गणेशोत्सव सर्व दिवस 24 तास खुला राहण्यासाठी आमदार हेमंत रासनेंकडून पाठपुरावा सुरु

पुणे (दि २०): राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून पावसाळी अधिवेशनात घोषित करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी रूपरेषा देखील जाहीर करण्यात आली. पुणे शहरातील गणेशोत्सव भक्तांसाठी 24 तास खुला रहावा तसेच संपूर्ण निर्बंधमुक्त पार पाडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात असल्याचा आमदार हेमंत रासने यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रम आणि भरघोस निधीची घोषणा करण्यात आल्याने मोठ्या धुमधडाक्यात यंदाचा उत्सव साजरा होणार आहे.

पुणे शहरात गणेशोत्सव भक्तांना दर्शनासाठी 24 तास खुला रहावा. धर्म संस्कृती परंपरा जपत उत्सव साजरा करणे, जिवंत देखावे, खाण्यासाठी हॉटेल्स, पीएमपीएमल तसेच मेट्रोची सेवा या काळामध्ये २४ तास उपलब्ध रहावी, सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिसांची संख्या वाढवत निर्बंधमुक्त आणि भयमुक्त गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रासने म्हणाले.

भुयारी मार्गांचा डीपीआर अंतिम टप्प्यात
करून मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा असा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून डीपीआर करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. एका महिन्याभरामध्ये याचे काम पूर्ण होऊन, पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाईल अशी माहिती रासने यांनी दिली आहे. विधानसभा अधिवेशनादरम्यान देख शहर आणि मतदारसंघातील वाहतूक कोंडीवर प्रश्न मांडल्याचे रासने यांनी सांगितले.

राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
ऐतिहासिक वर्षाचे जतन करणाऱ्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारीकरणाच्या मला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्या माध्यमातून संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला गती मिळणार आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर यशस्वी पाठपुरावा
कसबा मतदारसंघात अभ्यासिकांच्या माध्यमातून हजारो स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात, स्पर्धा परीक्षा करत असताना त्यांना अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातीलच एक म्हणजे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर न लागणे अथवा या निकालाच्या प्रक्रियेला विलंब होणे. या संदर्भात हेमंत रासने यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. लक्षवेधी म्हणतात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

विमानतळ परिसर स्वच्छ ठेवा, अन्यथा जागा ताब्यात घेऊ; आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा

पुणे-.लोहगाव विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असून, त्यामुळे पक्ष्यांचा वावर वाढला आहे. याचा त्रास विमानांच्या उड्डाण व लँडिंगवेळी होतो आहे. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणी प्रसंगी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त एम. जे. पंद्रन, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप, संदीप कदम, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, प्रशांत ठोंबरे आणि विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी जागेवर जाऊन स्वच्छतेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.या वेळी परिसरातील जागामालकांनी सात दिवसांत स्वच्छता न केल्यास महापालिकेकडून त्या जागा ताब्यात घेण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणार्‍या जागांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना तातडीने स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. येथील अनेक खासगी मोकळ्या जागांवर कचरा आणि राडारोडा टाकलेला आहे. अशा जागांच्या मालकांना महापालिकेने सात दिवसांची नोटीस देत स्वच्छतेचे आदेश दिले आहेत. जर यानंतरही स्वच्छता न झाल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत या जागा ताब्यात घेण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.लोहगाव विमानतळावरून विमानांचे उड्डाण करताना पक्ष्यांचा तसेच भटक्या श्वानांचा अडथळा निर्माण होत असल्याचे काही प्रकार घडले होते. धावपट्टीवर विमान उतरविताना अचानकपणे भटके श्वान आल्याने काही दिवसांपूर्वी विमान पाऊण तास हवेतच थांबवावे लागले होते. तसेच अनेकदा पक्ष्यांचाही त्रास वाढत असल्याने अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त, विमानतळ प्राधिकरण तसेच हवाई दलातील अधिकार्‍यांची बैठक नुकतीच घेतली होती. या बैठकीत विमानतळ परिसरातील मोकळ्या जागांवर कचरा टाकला जातो.

तसेच वाघोली येथील भाजी मंडई भागातील कचरा उचलला जात नाही. हडपसर कचरा रॅम्प येथे पडलेला कचरा हा पक्ष्यांची संख्या वाढण्यास कारणीभूत असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली होती. त्यावेळी येथे आवश्यक ती स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले होते.

महापालिकेत ब्लॅकमेलर्सचा वाढला उपद्रव…?

पुणे -महापालिकेत सामाजिक कार्याच्या नावाने येणाऱ्या काही हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून महापालिकेत हे संबधित जणू ‘बाप ‘ असल्याचा आणि कायदेतज्ञ असल्याचा अविर्भाव आणून त्रासदायी वर्तन करत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत त्यामुळे एकीकडे अधिकारी तणावाखाली असताना दुसरीकडे प्रामाणिक माणूस , कार्यकर्ता देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच महापालिकेच्या सुरक्षा विभागात काम करणारे प्रभारी सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी आपल्या पदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.

खाते प्रमुख यांना पत्र लिहित आपल्याला आपल्या मूळ खात्यात परत पाठवावे, अशी मागणी विटकर यांनी केली आहे. सुरक्षा अधिकारी वर्ग-२ या पदांची डिपीसी (प्रमोशन कमिटी) ची बैठक पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे विटकर यांनी अशी मागणी केली आहे.विटकर यांनी लिहिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभाग कार्यालयाकडे प्र. सुरक्षा अधिकारी पदावर माझी नेमणूक करण्यात आली होती. माझे वेतनाचे खाते उप आयुक्त, कर आकारणी कर संकलन येथे असून सदर ठिकाणी मी उप अधिक्षक म्हणून माझी नेमणूक आहे. गेली ३ वर्षे सुरक्षा विभागामध्ये प्र. सुरक्षा अधिकारी म्हणून प्रशासनाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे, सचोटीने आणि पुर्ण क्षमतेने पार पाडलेली आहे. तृतीय पंथीयाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता २५ तरूण-तरूणींना खाजगी सुरक्षा मध्ये नियुक्त करणेकामी तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्या सहकार्याने हि जबाबदारी मी पार पाडलेली आहे. कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याची त्यामुळे मोठी संधी मिळाली तसेच कायम पदावर काम करणारे सुरक्षा रखवालदार आणि सेवानिवृत सुरक्षा रखवालदाराचे सुध्दा वेतन, भत्ते, सेवानिवृत्तीचे प्रकरणे यासारख्या प्रशासकीय कामामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या सोबत राहून काम केले आहे.

महानगरपालिकेच्या मुख्य भवनामध्ये येणारे मोर्च, आंदोलने, निषेध सभा, उपोषणे, धरणे बैठका च्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाशी सौजन्याने आणि उत्तम संमन्वय राखून प्रशासन आणि शिष्टमंडळ यांच्या मध्ये योग्य दुवा राखण्याचे काम सहाय्यक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा जमादार आणि इनचार्ज यांचेमार्फत केले आहे. पालखी बंदोबस्त, गणेशोत्सव बंदोबस्त तसेच विविध महामानवाच्या जंयती आणि पुण्यतिथी निमित्त तसेच विविध संभा-संमारभाना सुरक्षा बंदोबस्त तैनात करून सदैव उर्जात्मक काम करण्याचा प्रयत्न केला आहे.विटकर यांनी पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत असताना काही तथाकथित पत्रकार, यु टयुब चॅनलचे प्रमुख, माहिती अधिकारी कार्यकर्ते यांची विशिष्ट मागणी पुर्ण न केल्यामुळे तसेच खाजगी सुरक्षा एजन्सीचे प्रतिनिधी आणि त्यांचे हितचिंतक यांनी कंपनीला दंड केल्यामुळे नाराज होवून माझी शैक्षणिक अर्हता व शारीरीक क्षमता धारण करून पात्र यादीत क्रमांक १ वर नाव असताना सुध्दा वारंवार माझ्या उंची, शिक्षण, स्वभाव आणि वर्तन यावर आक्षेप घेवून समाजमाध्यमावर माझी प्रतिमा मलीन होईल असे आक्षेपार्ह माहिती टाकून मला बदनाम करणे, माझ्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित करणे याबाबतची माहिती महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, उप आयुक्त सामान्य प्रशासन यांच्याकडे माझ्याबाबत खोटी माहिती काल्पनिक माहिती देवून खोटया तक्रारी करणे, ब्लॅकमेल करणे, खोटया तक्रारीचे ई-मेल राज्य सरकारचे प्रतिनिधी यांना पाठविणे अशा प्रकारे प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम वारंवार काही मंडळी दररोज करीत आहेत. त्यामुळे सुरक्षा अधिकारी वर्ग-२ या पदांची डिपीसी (प्रमोशन कमिटी) ची बैठक पुढे ढकलली जात आहे.

अशी वस्तुस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षा अधिकारी पदाचे अत्यावश्यक सेवेतील कर्तव्य करताना मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम काही विशिष्ट मंडळी सुपारी घेवून करीत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात महापालिका प्रशासन पाठीशी नसेल तर काम करणे माझ्यासारख्या अधिकाऱ्याला निश्चितच अवघड जात आहे. काही मंडळी मी या पदावर काम करू नये याकरिता वेगवेगळया प्रकारे आरोप करून प्रशासनात माझे विरूध्द चुकीचे सामाजिक जनमत तयार करीत असल्याचे दिसून येत आहे आणि प्रशासन देखील त्यामुळे हतबल झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे सुरक्षा अधिकारी पदावरून तातडीने मुक्त करण्यात यावे. माझे वेतनाचे मुळ खाते उप आयुक्त, कर आकारणी कर संकलन या विभागात काम करण्यासाठी रूजू होण्याकरिता कार्यमुक्त करून ही बाब आपल्या अभिप्रायासह वरिष्ठाना अवगत करावी. असे विटकर यांनी उपायुक्त यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

५ लाखांवरील होणाऱ्या कामांची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी का नाही? महापालिका आयुक्तांनीच विचारला सवाल

पुणे -महानपालिकेच्या विविध विभागांमार्फत विकसित होणाऱ्या विकास कामांची मे. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम ) या त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक गुणवत्ता तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही खाती त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी करून न घेता परस्पर खातेप्रमुखांच्या स्तरावर अन्य संस्थेमार्फत तपासणी करून घेत असल्याचे किंवा तपासणी न करता निविदेबाबतची पुढील कार्यवाही करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीच का नाही ?असा सवाल केला आहे . तसेच याबाबत खात्यामार्फत कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित कनिष्ठ अभियंता, उप अभियंता / कार्यकारी अभियंता व खातेप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. असा इशारा महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.पुणे मनपाकडील विविध विकासकामांकरिता महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांचा स्थायी समिती च्या मान्यतेने थर्ड पार्टी क्वालिटी अॅशुरन्स सर्व्हिसेसची कामे मे. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ( भारत सरकारचा उपक्रम) यांचेमार्फत महाराष्ट्र महापालिका अधिनियम शेड्युल चॅप्टर कलम ५ (२) (२) अन्वये करून घेण्यास मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार मार्च अखेर पर्यंत कामांची गुणवत्ता तपासणी मे. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ( भारत सरकारचा उपक्रम ) यांचेकडून करून घेणे बंधनकारक आहे.

तथापि महापालिकेची क्षेत्रीय कार्यालय, परीमंडळे व मुख्य खात्यांमार्फत संदर्भाकित परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात नसलेबाबत आमचेकडे अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध संस्थांनी PMC केअर, आपले सरकार, अभ्यागत कक्ष व लेखी अर्जाद्वारे आणि समक्ष भेटून वारंवार तक्रारी करत आहेत.

सर्व क्षेत्रीय कार्यालये, परीमंडळे व मुख्य खाते अंतर्गत दरवर्षी रक्कम रु. ५ लाखांवरील होणाऱ्या सर्व विविध विकास कामांची ( दुरुस्ती व देखभाल विषयक कामे वगळून ) गुणवत्ता व दर्जाबाबतची तपासणी मे. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ( भारत सरकारचा उपक्रम या त्रयस्त संस्थेमार्फत करून घेणे बंधनकारक आहे. तथापि काही खात्यांमार्फत मे. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ( भारत सरकारचा उपक्रम) या त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी करून न घेता परस्पर खातेप्रमुखांच्या स्तरावर अन्य संस्थेमार्फत तपासणी करून घेत असल्याचे किंवा तपासणी न करता निविदेबाबतची पुढील कार्यवाही करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून प्रशासकीय शिस्तीचा भंग करणरी आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये EIL ची तपासणी करून घेणे खात्यास शक्य नसल्यास अशा प्रकरणी संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची खात्याने पूर्व मान्यता घेणे आवश्यक आहे.

सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालये, परीमंडळे व मुख्य खात्याकडील विविध विकास कामांच्या एकूण निविदा प्रकरणांपैकी कोणत्याही ( Randomly ) किमान १० अथवा १० % निविदा प्रकरणे यापैकी जी संख्या जास्त असेल तितक्या निविदा प्रकरणांची दक्षता विभागामार्फत प्रत्यक्ष जागेवर तपासणी करून घेऊन ते काम गुणवत्तापूर्ण झाले अगर कसे ? त्याबाबतचा अहवाल आमचे कार्यालयाकडे सादर करावा. यामध्ये खात्यामार्फत कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित कनिष्ठ अभियंता, उप अभियंता / कार्यकारी अभियंता व खातेप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुखमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार

स्पर्धेमुळे पुणे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येईल – उपमुख्यमंत्री

पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने तयारीला लागावे, असे निर्देश उपमुखमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. या स्पर्धेमुळे पुणे शहर व जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा युक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड शहर सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीएफआय) महासचिव मनिंदर पाल सिंग आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, मार्गाची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आदी बाबींवर लक्ष द्यावे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा. केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी. त्यानुसार आवश्यक तेथे त्रुटींची दुरुस्ती करता येईल, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व सायकलपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्व ती तयारी करण्यात यावी. मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात.

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, स्पीड ब्रेकर बाबत आवश्यक कार्यवाही आदी कार्यवाही व्हावी असे सांगितले. शहरातील बहुतांश भागातून स्पर्धेचा मार्ग असल्याने वाहतूक वळविणे, बॅरीकेटिंग आदींच्या अनुषंगाने वेळेत माहिती दिल्यास सर्व पुर्वतयारी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनाच्या क्षमता आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचणार आहेत. स्पर्धेसाठी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (युसीआय), स्वित्झर्लंडकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच मान्यता मिळेल. स्पर्धा युसीआय आणि सीएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. आगामी ऑलिम्पक स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा गणली जाणार आहे.

स्पर्धेच्या मार्गाचे शहरात पुणे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, ग्रामीण भागात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विविध विभागांद्वारे संयुक्त पाहणी आणि मूल्यमापन करण्यात आले असून सीएफआयनेही रस्त्यांची संयुक्त पाहणी केली आहे. सीएफआयच्या समन्वयाने स्पर्धेचा प्राथमिक मार्ग निश्चित करण्यात आला असून त्यात चर्चेअंती काही बदल करण्यात येतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या मानकांप्रमाणे रस्त्यासाठी तयारी करण्यात येईल.

पुणे शहर व पिंपरी चिंचवड, मावळ मुळशी पिंपरी चिंचवड, भोर,वेल्हे, मुळशी, पुणे शहर, पुरंदर आणि बारामती अशी चार टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची मोठी पूर्वप्रसिद्धी आणि स्पर्धेदरम्यानही २५ देशात थेट प्रक्षेपण व्हावे असा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती आणि क्रीडा संस्कृतीला या स्पर्धेमुळे चालना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. सिंग म्हणाले या स्पर्धेत सुमारे ५० देशांचे खेळाडू सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे. स्पर्धेसाठी भारतातील ४० खेळाडूंना संधी दिली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील १० खेळाडूंचा समावेश असेल. जगात आंतरराष्ट्रीय सायकल दिन साजरा केला जातो. मात्र भारतात राष्ट्रीय सायकल दिन नसल्याने या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेदरम्यानचा एक दिवस ‘राष्ट्रीय सायकल दिवस’ म्हणून घोषित केल्यास सायकलिंगला देशात चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

ही सायकल स्पर्धा पाहून प्रेरणा मिळालेल्या नवोदित सायकलपटूंना सराव करता यावा यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे वेलोड्रम उभारण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव केला असल्याचे श्रीमती तेली उगले यांनी सांगितले. यावर या प्रस्तावाला तत्काळ निधी देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे पदाधिकारी, पुणे महानगरपालिका, आरोग्य विभाग आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत जैन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

“विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे; सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा”, डॉ. गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या १२५ व्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रम

पुणे, २० जुलै २०२५ : राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या १२५ व्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त आयोजित जैन विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. हा सोहळा महावीर प्रतिष्ठान, सॅलेसबरी पार्क, पुणे येथे जिनशासन प्रभाविका प.पू. चैतन्यश्रीजी म.सा. यांच्या पावन सान्निध्यात पार पडला.

या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चेनसुखजी संचेती, माजी आयएएस अधिकारी विशाल सोळंकी, उद्योगपती राजेंद्र मुनोत, अध्यक्ष साधना सदन विजयकांत कोठारी, अचल जैन, शिवसेना शहरसंघटक आनंद गोयल, एकनाथ ढोले, वैभव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सन्मान सोहळा वीतराग सेवा संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी पालकांच्या ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवत अभ्यासात सातत्य राखावे. कमी मार्क मिळाल्यास मुलांवर मानसिक ताण येऊ नये याची काळजी पालकांनी घ्यावी. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळावे, कारण ते अभ्यासातील लक्ष विचलित करते. दिवसातील २०-३० मिनिटांपेक्षा जास्त सोशल मीडिया वापरू नये.”

तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “मॉडेल पेपर्सचा सराव केल्यास स्मरणशक्ती वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. अभ्यासात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागे राहिलेल्या मित्रांना देखील सोबत घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये, तर समाजासाठी योगदान देण्याची भावना ठेवावी.”

मुलींच्या शिक्षणातील प्रगतीचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, “आज शिक्षणाच्या क्षेत्रात मुली मुलांपेक्षा पुढे आहेत. हे त्यांना करावा लागणाऱ्या संघर्षामुळे शक्य झाले आहे. नवीन शिक्षण धोरणांमुळेही विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होत आहेत.”

पालकांनाही संदेश देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “मुलांवर अनावश्यक अभ्यासाचा ताण देऊ नका. त्यांना प्रोत्साहन द्या आणि योग्य वातावरण द्या. मुलांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपल्या समाजासाठी आणि देशासाठी योगदान देण्याची शपथ घ्यावी.”

शिवरायांनीही नेताजी पालकरांना स्वराज्यात घेतले:एकनाथ शिंदेंबाबतच्या प्रश्नावर अंबादास दानवेंचे उत्तर

मुंबई-विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी आशा नुकतीच व्यक्त केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांना भविष्यात सोबत घेण्याबाबत त्यांनी नेताजी पालकरांचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

अंबादास दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेच्या भवितव्यावर भाष्य करत अनेक राजकीय संकेत दिले आहेत. आमची एवढी मजबूत संघटना फुटली, ती कुणीतरी फोडली, याची सल मनात कायम राहते. मात्र, आता शिवसेना म्हणून पुन्हा एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. तशी आशा ठेवायला काय हरकत आहे? असे विधान त्यांनी नुकतेच केले होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे भविष्यात सोबत आल्याने त्यांना गद्दार म्हणणार का? असा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी नेताजी पालकरांचा दाखला देत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील नेताजी पालकर यांना शुद्धीकरण करून स्वराज्यात घेतले होते, असे म्हणत एकनाथ शिंदे यांना भविष्यात सोबत घेण्याबाबत अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नेताजी पालकर यांना शुद्धीकरण करून स्वराज्यात घेतले होते, यावर मी एवढेच बोलेल, असे सूचक सूचक विधान अंबादास दानवे यांनी केले.अंबादास दानवे पुढे म्हणाले, शिवसेनेबाबत आजही वेदना होतात. रक्ताने जोडलेले लोक जेव्हा विरोधात जातात, तेव्हा वेदना होणे साहजिक आहे. एकनाथ शिंदे यांनाही आतून काहीतरी जाणवत असावे, असे मला वाटते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य भेटीबाबत प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, आम्ही भाजपला उघडपणे भेटलो आहोत. आम्ही शत्रू नाही, विरोधक आहोत. आमच्यात विचारांची लढाई आहे. त्यामध्ये काही सुरू आहे, असे आम्हाला वाटत नाही.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात:शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधान

मुंबई-मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आले तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, असे विधान सरनाईक यांनी केले आहे. त्यामुळे आता युतीच्या चर्चा चांगल्याच रंगत असल्याचे दिसत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते, येत्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात.महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. जवळपास 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे.

दरम्यान, सध्या आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर येत आहेत. यावर देखील प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्या पक्षातील आमदारांकडून काही विधाने करण्यात आले, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. शिंदेंनी आमदारांना सक्त सूचना देखील दिल्या आहेत. आमच्याच आमदारांच्या तक्रारी आहेत असे नाही. सगळ्या पक्षातील आमदार बोलतात.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला होता. जादूटोणा करून आमदार निवडून आले, असे त्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक म्हणाले, तुमचे आमदार निवडून आले हे काय जादूटोणा न करता आले? आणि आमचे जादूटोणा करून आले का? तुमचे लोकसभेला खासदार जादूटोणा करूनच निवडून आले होते का? असा सवाल सरनाईक यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ब्रँड आहेत. आमच्या पक्षाचा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे, असेही यावेळी सरनाईक यांनी म्हटले आहे.

एक्का, दुर्री, तिर्री आणि हा बघा जोकर…:रोहिणी खडसेंचा कृषिमंत्र्यांवर हल्लाबोल

कृषिमंत्रीच रमीत गुंग, शेतकऱ्यांचे काय भले होणार? काय दुर्दैव शेतकऱ्यांचे.. कृषिमंत्रीच रमी खेळताना मिटींग करतंय. विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या संबंधित समिती गठीत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी कोणत्या उपाययोजना करू, याच्यासाठी समिती गठीत केली मात्र कृषी मंत्र्यांकडून आठवी नववी चूक असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल करत बच्चू कडूंनी माणिकराव कोकाटे यांच्यावर संताप व्यक्त केला. पुढे ते असेही म्हणाले की, एकीकडे म्हणायचे तुम्ही दारू पिताय, लग्नात खर्च होतोय म्हणून तुमच्यावर कर्ज होतंय. पण आमचा कृषिमंत्रीच रमीत गुंग असेल तर शेतकऱ्याचे काय भले होईल, असा संताप बच्चू कडू यांन माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवर व्यक्त केला आहे.

पुणे- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात रमी गेम खेळता नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. या प्रकारावरून कोकाटेंवर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही यावर प्रतिक्रिया देत कृषि मंत्र्यांना थेट जोकर म्हटले आहे. तसेच त्यांनी मंत्रिपदी न राहण्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या, असा टोलाही लगावला.

सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते रमी खेळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, आणि कृषिमंत्री मात्र खेळण्यात दंग आहेत. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या,” असे रोहित पवार यांनी म्हटले. त्यानंतर आता रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत माणिकराव कोकाटेंना लक्ष्य केले आहे.

नेमक्या काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

एक्का, दुर्री, तुर्ती आणि हा बघा जोकर… शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळत आहेत. मंत्रीपद न राहण्याच्या सर्व अटी कृषीमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत, असा टोला रोहिण खडसे यांनी लगावला. त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार होतोय. ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. अर्वाच्य भाषेत बोलतात. पण शेतकऱ्यांबाबत एकही काम करत नाही, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला.

मॅक्डॉवल नं.1,इम्पीरीअल ब्ल्यु,ऑफीसर्स चॉईस,डिएसपी ब्लॅक,बॅगपायपर,रॉयल स्टॅग सारे काही गोवा बनावटीचे ..

पुणे- तुम्ही कुठे मद्यप्राशन करत आहात किंवा खरेदी करत आहात हे आता जपून आणि सावधानतेने पाहण्याची गरज निर्माण झाली असून प्रख्यात ब्रँडच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूचा सुळसुळाट पुणे शहर आणि जल्ह्यात झाल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे, जसे पुणे पोलिसांना रोजच कट्टे गोळ्या मिळत आहेत , किंवा मॅफेड्रोन, गांजा सारखे अंमली पदार्थ रोजच सापडत आहेत त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा बनावटीच्या दारूने हैराण करून सोडले आहे.

पाटस टोल नाक्याजवळ, पाटस ता. दौंड, जि.पुणे येथे राज्य उत्पादन शुल्क च्या दौंड विभागाच्या पथकाने पुण्याच्या दिशेने पाठोपाठ येणाऱ्या दोन संशयित वाहनांची तपासणी करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य बनावटीच्या मद्याचे ७५० मि.लो चे २५ बॉक्स (३०० बाटल्या) पकडले . सदर प्रकरणी आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पुढील तपासात जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी छापे टाकून तीन चार चाकी वाहने व ८४ बॉक्स मद्यासह ४७७९ बूचे असा एकूण रु. ३९,५६,४९५/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आणि पाच आरोपीना अटक केली आहे.


या प्रकरणाची हकीकत अशी, एम. व्ही. गाडे दुय्यम निरीक्षक, दौंड क्र.१ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम शिंदे, उप-अधोक्षक, हडपसर व निरीक्षक दौंड विभागाच्या पथकाने पाटस येथील टोल नाक्याजवळ सापळा रचून इंदापूर कडून पुण्याच्या दिशेने लागोपाठ जाणाऱ्या संशयित मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच-१२ आरएन ९४३१) व मारुती स्विफ्ट (एमएच-१२ ईटी ४४८५) या दोन वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनात मिळून गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक व्हिस्को या ब्रँडचे एकूण ४३ बॉक्स मिळून आले. या प्रकरणी आरोपी संतोष सुनील मारकड, वय-२१ रा, एच नं ३/७७८/दत्तवाडी (दत्तनगर), उरळीकांचन, ता, हवेली, जि. पुणेवैभव शिवाजी तरंगे वय २२ वर्षे, रा. भंवरापूर रोड, व्यंकटेश नगर, ता. हवेली, जि. पुणे यांना अटक करण्यात आली.
या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हयामध्ये पुढील तपासा दरम्यान उरुळीकांचन ता. हवेली, जि. पुणे येथे आरोपी संतोष सुनील मारकड याच्या राहत्या घरी गोवा राज्य बनावटीचे अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ११ बॉक्स (१३२ बाटल्या) व ५५९ बुचे व रिकाम्या बाटल्या इत्यादी असा एकुण रुपये १,३२,०७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच चंदनवाडी येथील हॉटेल गावकरी येथे अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ५ बॉक्स (६० बाटल्या), रॉयल व्हीस्की १८० मि.लीच्या (४२ बाटल्या), इम्पीरीअल ब्ल्यु व्हीस्की १८० मि.ली च्या (६ बाटल्या), ऑफीसर्स चॉईस व्हीस्कीच्या १८० मि.ली च्या (३० बाटल्या), डिएसपी ब्लॅक व्हीस्की १८० मि.ली च्या (१४ बाटल्या), आयकॉनीक व्हीस्की ९०मि.ली च्या (१५ बाटल्या), ग्रॅण्ड मास्टर ओडका ९० मि.ली च्या (५१ बाटल्या), बॅगपायपर व्हीस्की १८० मि.ली क्षमतेच्या (२५ बाटल्या). असा एकुण रुपये ९६,८७५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी आकाश बाळासाहेब कोडलिंगे, रा. चंदनवाडी याला अटक करण्यात आली आहे.
तसेच नांदुर येथील हॉटेल पैलवान येथे गोवा राज्य बनावटीचे अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ४ बॉक्स (४८ बाटल्या), रॉयल स्टॅग व्हीस्की १८० मि.ली च्या (१० बाटल्या), इम्पीरीअल ब्ल्यू व्हीस्की १८० मि.लीच्या (५ बाटल्या), मॅक्डॉवल नं. १ व्हीस्की, ऑफीसर्स चॉईस व्हीस्कीच्या ९० मि.ली च्या (२२ बाटल्या), रॉयल चॅलेंजर्स व्हीस्की, ओक्समीत व्हीस्की १८० मि.ली च्या (१४ बाटल्या) असा एकुण रुपये ६८६८०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी कुणाल सुनिल कोल्हे, रा. नांदुर याला अटक करण्यात आली.
तदनंतर या आरोपींकडून मिळालेल्या माहीतीनुसार क्र.५ बबन देवचंद पावने, रा. मोई, निघोजे रोड, मोई ता. खेड.जि. पुणे याच्या राहत्या घरी हयुडाई कंपनीच्या क्रेटा चारचाकी वाहन क्र. एमएच १४ के.ई. ७००२ मध्ये गोवा राज्य निर्मीत अॅडरील क्लासीक व्हीस्की ७५० मि.ली चे ९ बॉक्स (१०८ बाटल्या), मॅकडॉल नं. १ व्हीस्की १८० मि.ली च्या २४० बाटल्या, इम्पेरीयल ब्लू व्हीस्की च्या १८० मि.ली च्या १४४ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हीस्कीच्या १८०मि.ली च्या २८ बाटल्या, देशी दारु पावर पंच ९० मि.ली च्या २०० बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याकरीता लागणारे मशीन आरएस, मॅक्डॉवल नं. १ चे बनावट ४००० बुचे, विवीध विदेशी मद्याचे रिकाम्या बाटल्या. असा एकुण एकुण रु. १३,९४,७९०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि बबन देवचंद पावने, रा. मोई याला अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयामध्ये आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए), (डी), (इ), (एफ), ८०, ८१, ८३, ९०, १०८ व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३ नुसार गुन्हा नोंदविण्यात येऊन आरोपींना दि १९/०७/२०२५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक अ.अ. कानडे,उपअधीक्षकउत्तम शिंदे तसेच विजय रोकडे, एन.एस देवणे, शहाजी शिंदे, निरीक्षक, दु. निरीक्षक एम. व्ही गाडे, प्रदीप झुंजरुक, डी.आर ठाकुर, दिनेश सुर्यवंशी, सागर साबळे, विकास थोरात, सहाय्यक दु. निरीक्षक, जवान शुभम भोईटे, डी.जे साळुंखे, निलेश पवार, केशव वामने, संकेत वाजे, एस आर देवकर, गोपाळ कानडे, एस.एस. कांबळे, कर्च, सागर दुबळे यांनी सहभाग घेतलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, बीट क्र.१, चे दुय्यम निरीक्षक एम. व्ही गाडे, हे करत आहेत.
पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्र. 18002339999 व दुरध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.