Home Blog Page 451

राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर लिखित ‌‘महापूर‌’ या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील स्पर्धक आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रयोग रंगला.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धेतील प्रयोग नेटका कसा असावा याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कै. राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाट्य प्रयोगाचे आयोजन केले जाते. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या मुद्द्यांवर स्पर्धकांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, असा स्पर्धा संयोजक म्हणून महाराष्ट्रीय कलोपासकचा आग्रह असतो. ‌‘महापूर‌’ या नाटकात आरोह वेलणकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार, दिलीप जोगळेकर यांच्या भूमिका होत्या. तर ऋषी मनोहर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते. या प्रयोगात सहभागी कलाकारांनी पुरुषोत्तम स्पर्धा गाजविली आहे. सुमारे 13 वर्षांपूर्वी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने भरत नाट्य मंदिरातील रंगमंचावर पाऊल ठेवले होते. ‌‘महापूर‌’ या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रीय कलोपासकसाठी या रंगमंचावर येण्याची संधी मिळाल्याचे आरोह वेलणकर यांनी आवर्जून सांगितले.

मुळा-मुठा नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊनच पूर्ण करणार ! मंत्री मोहोळ

पुणे- मुळा-मुठा नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊनच पूर्ण करणार असे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.शनिवारी मुळा-मुठा नदीकाठ सुधार आणि नदी पुनरुज्जीवन या दोन प्रकल्पांसंदर्भात PARK (Policy Advocacy Research Centre) या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद सत्रात सहभागी होत या दोन्ही प्रकल्पांबाबत त्यांनी सर्वांगीण चर्चा केली.आणि आपली भूमिका विशद केली भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या या संवादात पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम, मुख्य अभियंता श्री. प्रशांत वाघमारे, या प्रकल्पांशी संबंधित विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या संदर्भात त्यांनी असे म्हटले आहे कि,’ महेश पोहनेरकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर नदीप्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञांचे, शासकीय अधिकाऱ्यांचे आणि नागरिक प्रतिनिधींचे दोन्ही प्रकल्पांसंदर्भात सादरीकरण झाले. डॉ. मन्वी सिंह आणि डॉ. अमृता जोगळेकर यांनी मांडलेली नागरिकांची बाजू, तसेच पूर व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था, पर्यावरणपूरक वृक्षलागवड, वॉटर रिटेन्शन आणि SCADA प्रणालीसारख्या तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाली.पुण्यातील तज्ज्ञांची आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका लक्षात घेऊनच हे दोन्ही प्रकल्प पुढे नेले जाणार आहेत. प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन नदीकाठ सुधार आणि नदी पुनरुज्जीवन या प्रकल्पांचा सर्वांगीण विचार केला, तर पर्यावरण आणि विकास यामध्ये योग्य समतोल साधता येईल. मुळा-मुठा नदीकाठ सुधार आणि पुनरुज्जीवन हे प्रकल्प केवळ एक अभियांत्रिकी उपक्रम नसून, पुण्याच्या पर्यावरणीय भवितव्याशी जोडलेला आहे.या प्रकल्पातील अडचणी, नागरिकांच्या समस्या आणि पर्यावरणपूरक उपाययोजना यांचे तंत्रशुद्ध नियोजन करून नदीला तिचे पूर्वीचे रुप मिळवून देणे, हे निश्चितच आमचे कर्तव्य आहे, अशी भूमिका यावेळी मांडली.

सिनेकलाकारांच्या समवेत क्रिकेट खेळण्याचा मंत्री मोहोळांनी लुटला आनंद … म्हणाले,’खेळ, संघभावना आणि एक वेगळी ऊर्जा मिळाली

0

पुणे- प्रवीण तरडे,प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, संजय जाधव, उपेंद्र लिमये, हार्दिक जोशी, प्रथमेश परब, समीर धर्माधिकारी, महेश लिमये, रमेश परदेशी आणि अभिनेत्री राधा कुलकर्णी उर्फ राधा सागर अशा नामांकित सिनेकलाकारांच्या समवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद काल केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लुटला , याबाबत त्यांनी अगदी मोजक्या फोटोत आणि मोजक्या शब्दात सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .. ,’खेळ, संघभावना आणि एक वेगळी ऊर्जा! या शब्दात त्यांनी हा आनंद व्यक्त केला आहे.

त्यांनी असे म्हटले आहे कि,’ पहिल्यांदाच खासदार सिलेब्रिटी क्रिकेट लीगमध्ये नेत्यांच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पहिलाच सामना नेते विरुद्ध अभिनेते असा होता आणि मैदानावरचा हा अनुभव खूपच आनंददायी ठरला! कारण क्रिकेट हा माझा स्थायीभाव आणि बालपणीच्या आठवणींची शिदोरीही !नेहमीच लोकांच्या प्रश्नांमध्ये, मंत्रालयाच्या कामकाजात, राजकीय आणि संघटनात्मक कामात गुंतलेलो असलो, तरी आज मैदानावर संघबांधणी, उत्साह आणि खेळातून मिळणाऱ्या आनंदाचं वेगळंच समाधान मिळालं !या सामन्यात सहकाऱ्यांसोबत मैदानावर उभं राहणं, कलाकारांविरुद्ध खेळणं आणि सर्वांनी मिळून हास्यविनोद करत खेळाचा आनंद घेणं, यातून मिळालेली उर्जा निश्चितच मोठी होती !खेळ भावना ही नक्कीच आपल्याला अधिक जवळ आणते, भावनांचे बंध अधिक घट्ट करते.

आमच्या नेत्यांच्या संघात आमदार सुहास बाबर, माजी आमदार सुनील टिंगरे, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, नगरसेवक नाना भानगिरे, विशाल धनवडे, किशोर शिंदे, रुपाली पाटील, सागर पाठक, मंदार जोशी व पुढारीचे योगेश जाधव यांनी नेत्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व केले.

या खासदार सिलेब्रिटी मान्सून क्रिकेट लीग साठी युवराज ढमाले कॉर्प , बधेकर ग्रुप सारखे बिल्डर, गोखले, अभिजित भोसले , कोकोनेट ट्री सारखे आणि अनेकांनी प्रायोजकत्व दिले होते

दिव्यांग, विधवा महिला, निराधार आणि दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना प्राधान्याने अन्नधान्य योजनेचा लाभ द्या; बापूसाहेब पठारे यांच्या सूचना

पुणे: दिव्यांग, विधवा महिला, निराधार आणि दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना प्राधान्याने अन्नधान्य योजनेचा लाभ द्यावा, अशी सूचना वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दिल्या.

वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची (ता. २१) येरवडा ई झोन येथे अन्नधान्य वितरण कार्यालय व परिमंडळ कार्यालय अंतर्गत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मतदारसंघातील अन्नधान्य वितरणाची सद्यस्थिती, लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या तसेच विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना वेळेवर व नियमानुसार धान्य मिळते का, याचीही चौकशी आमदार पठारे यांनी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार पठारे यांनी स्पष्ट सूचना दिल्या, की “शिधापत्रिका प्रक्रियेमध्ये कुठल्याही एजंटमार्फत होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती यांना शिधापत्रिका मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत प्रशासनाने तातडीने करावी.”

शिधापत्रिकेसंबंधित कोणतेही काम करण्यासाठी शासनाने विकसित केलेली https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित व्यक्तीने स्वतः अर्ज करावा आणि आपले काम निशुल्क करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लागणार नाही किंवा कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती एजंट मार्फत करू नये त्यांना या कामासाठी पैसे देऊ नये असे आवाहनही यावेळी केले.

ऑनलाइन कामांमध्ये कोणतीही अडचण आल्यास संबंधित व्यक्तीने परिमंडल कार्यालयात जाऊन परिमंडल अधिकारी व इतर कोणीही शासकीय अधिकारी असेल त्यांच्याकडून या कामाचा निपटारा करून घ्यावा आणि अधिकाऱ्याने ते प्राधान्याने करून द्यावे याबाबतच्या सूचनाही पठारे यांच्याकडून देण्यात आल्या.

बैठकीला येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर अशोक भवारी, अन्नधान्य वितरण झोनल अधिकारी चांगदेव नागरगोजे, विविध अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. या बैठकीत अन्नधान्य वितरणाबाबत प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सुधारणेसंबंधी निर्णय घेण्यात आले.

मुंबईत एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले,विमानाचे 3 टायर फुटले

मुंबई–केरळच्या कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान आज सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.\मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे रनवेवर काही ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी, विमानाच्या उड्डाणांत व लँडिंगच्यावेळी अनेक अडचणी येत आहेत. विशेषतः यामुळे काही विमाने रद्द करण्याची वेळ आली आहे, तर काहींना विलंबाने उड्डाण करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेत विमान घसरून रनवेपासून 16-17 मीटर दूर गेल्याची माहिती आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी घडली. या घटनेत विमानाचे 3 टायर फुटलेत. यात मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टीचे 09/27 देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे ती उड्डाणासाठी बंद करण्यात आली आहे. दुसरी धावपट्टी 14/32 वरून विमान वाहतूक सुरू ठेवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) एक पथक विमानतळावर पोहोचले आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI2744 विमान सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. हे विमान कोच्चीहून मुंबईला येत होते. या अनपेक्षित घटनेमुळे हे विमान काही क्षण अनियंत्रित झाले. पण वैमानिकाने प्रसंगावधान राखून त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. विमान सुरक्षितपणे लँड झाले. सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप आहेत. विमान कंपनीने सांगितले की, विमानाला सुरक्षितपणे हँगरपर्यंत पोहोचवण्यात आले. सर्वच यात्री व क्रू सदस्यांना उतरवण्यात आले. विमानाला आता पुढील तपासासाठी ग्राऊंड करम्यात आले आहे. या प्रकरणी आवश्यक ती सुरक्षा तपासणी केली जात आहे.


पावसाळ्यात मुंबई विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये, विशाखापट्टणमहून येणारे व्हीएसआर व्हेंचर्स लिअरजेट 45 विमान मुसळधार पाऊस व कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टीवरून घसरले होते. त्यानंतर खराब झालेले हे विमान बाहेर काढण्यासाठी अनेक तास लागले होते.

गत सोमवारी ट्रक विमानाला धडकला होता

उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गत सोमवारी (14 जुलै) एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाईन्सच्या विमानाला धडक दिली होती. यामुळे विमानाचे अंशतः नुकसान झाले होते. ही घटना घडली त्यावेळी एक थर्ड पार्टी ग्राउंड हँडलर हे वाहन चालवत होता. घटनेनंतर विमान कंपनीने या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी विमान चालू नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती

अहमदाबाद विमानतळावर घडली होती दुर्घटना

तत्पूर्वी, गत महिन्यात गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एक विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले होते. त्यात जवळपास 260 जणांचा बळी गेला होता. हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने झेपावले होते. पण उड्डाणानंतर अवघ्या 39 सेकंदांतच ते विमानतळ परिसरातील एका मेडीकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. हे विमान कोसळले तेव्हा या वसतीगृहाच्या मेसमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर जेवण करत होते. त्यात ते ही मारले गेले. आजच्या घटनेमुळे या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे धक्का बसलाय; फाशी झालीच पाहिजे, सुप्रीम कोर्टात जा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईला हादरवून टाकणाऱ्या २००६ लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवलेल्या सर्व १२ जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केलीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसलाय असे म्हणत याप्रकरणी एक चांगले तपास पथक व लीगल टीमची रचना करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी आणि मुंबईकरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सोमय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसल्याचं म्हटलं. निश्चितपणे २००६ चा तपास आणि त्यानंतर कायदेशीर प्रतिनिधित्व (Legal representation) व न्यायालयीन मांडणी यात काही त्रुटी राहिल्या असतील, परंतु मुंबईकरांना न्याय हवाय. ते जे दहशतवादी आहेत ते फासावर लटकलेच पाहिजेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की, एक चांगले तपास पथक व लीगल टीमची रचना करून सर्वोच्च न्यायालयात जा. मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.११ जुलै २००६ रोजी मुंबईतील विविध लोकल ट्रेनमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात साखळी बाँबस्फोट झाले होते. या स्फोटांसाठी प्रेशर कुकरमध्ये स्फोटके लपवण्यात आली होती. पहिला स्फोट संध्याकाळी ६.२४ वाजता तर शेवटचा स्फोट ६.३५ वाजता झाला होता. हे बाँम्ब चर्चगेटहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये ठेवण्यात आले होते. हे स्फोट माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, भायंदर आणि बोरिवली स्थानकाजवळ झाले होते.

विशेष मकोका न्यायालयाने याप्रकरणी ३० सप्टेंबर २०१५ रोजी निकाल देताना १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तथापि, सबळ पुरावे नसल्याचे निरिक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज सर्व १२ जणांना निर्दोष ठरवले. तसेच, त्यांची तुरुंगातून त्वरित मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपींना अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. निर्दोष ठरवलेल्या १२ पैकी एका आरोपीचा याआधीच मृत्यू झाला असल्याने आता ११ जणांची मुक्तता होणार आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले होते, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.

छोट्या अणूची मोठी गोष्ट‌’तून माणूसपणाचीही मांडणी : डॉ. श्रीपाल सबनीस

दिलीपराज प्रकाशनतर्फे ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट‌’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पाश्चात्त्य वैज्ञानिक, संशोधकांनी अणुउर्जेसंबंधी संशोधनाचा वापर विद्‌ध्वंसासाठी केला. अणुबॉम्ब तयार करून अणुउर्जेचे विनाशक रूप जगासमोर आणले. या अणुउर्जेच्या विनाशक आणि महासंहारक शक्तीमुळेच जग आज तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभे आहे. अणुचे विनाशक रूप संशोधित न करता, त्याच्या विधायक वापराचे संशोधन पुढे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

दिलीपराज प्रकाशन प्रकाशित आणि दिलीप बर्वे लिखित ‌‘छोट्या अणूची मोठी गोष्ट‌’ या विज्ञानविषयक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी कर्वे रस्त्यावरील स्वामीकृपा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका अश्विनी धोंगडे, प्रकाशक मधुर बर्वे तसेच लेखक दिलीप बर्वे मंचावर होते. दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे उपस्थित होते.
लेखक दिलीप बर्वे म्हणाले, गोष्टी सांगणे मला शालेय जीवनापासून आवडते. मोठेपणी मी स्लाईड शोच्या माध्यमातून शास्त्रज्ञ, महान व्यक्तिमत्त्वे यांच्या गोष्टी विद्यार्थी तसेच नागरिकांसमोर मांडत गेलो. १९९८ मध्ये आपल्या देशाने जे दोन अणुस्फोट घडवले, त्यांची इत्थंभूत माहिती सर्वांसमोर यावी, हा हेतू ठेवून पुस्तकाचे लेखन केले. तांत्रिक, वैज्ञानिक परिभाषा न वापरता, सोप्या आणि गोष्टीरूपात हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, अणुउर्जा हे केवळ शस्त्र नाही, तर त्या उर्जेचे विधायक, मानवाला उपयुक्त असे विनियोग पुढे येण्याची आवश्यकता आहे. लेखक दिलीप बर्वे यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अणु, अणुस्फोटाचा इतिहास, अणुचे विखंडन, त्यासंदर्भातील संशोधन, शास्त्रज्ञांची चरित्रे तसेच अणुउर्जेचे विधायक उपयोग यांची माहिती गोष्टीरूपात वाचकांसमोर आणली आहे. बर्वे यांनी पुस्तकात शास्त्रज्ञांचे संशोधन, चरित्र तसेच माणूसपणही मांडले आहे. विधायक, संवेदनशील, शैलीदार आणि विश्वकल्याणकारी भावना जपणाऱ्यालेखनाची आज गरज आहे.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’ या पुस्तकाच्या शीर्षकापासूनच लेखक दिलीप बर्वे यांची सर्जनशीलता प्रकट झाली आहे. बर्वे यांचे लेखन गोष्टीरूप असल्याने, अवघड वैज्ञानिक संज्ञा, परिभाषा, अतितांत्रिकता यापासून ते मुक्त आहे. अणुविषयक संशोधन ज्या शास्ज्ञज्ञांनी केले, त्या संशोधनाचे वैज्ञानिक युगातील योगदान नेमके काय आहे, याचे विवेचन लेखकाने या पुस्तकात केले आहे. चरित्रात्मक माहितीतून शास्त्रज्ञांचे काम लेखकाने पुढे आणले आहे. अणुउर्जेच्या वापराबाबतची काळजी कशी घ्यावी आणि अणुउर्जा मानवी कल्याणासाठी कशी वापरता येईल, विश्वशांततेसाठी तिचा वापर कसा करता येईल, याचे मार्गदर्शन लेखकाने केले आहे, ते महत्त्वाचे आहे.
दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी प्रकाशकीय मनोगतात अणुच्या शोधाचे श्रेय प्राचीन भारतातील कणाद यांचे असल्याचा उल्लेख केला. सुदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

बरखा रंग‌’ मैफलीत रसिकांनी अनुभवला स्वरवर्षाविष्कार

प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे गायन-वादनाची अनोखी मैफल ‌

पुणे : वर्षा ऋतुनिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित ‘बरखा रंग’ या अनोख्या मैफलीत रसिकांनी विदुषी सानिया पाटणकर, पंडित प्रवीण गावकर यांच्या सुश्राव्य गायनाची तर पंडित मुकुंदराज देव यांच्या बहारदार तबला वादनाची अनुभूती घेत स्वरवर्षाविष्कार अनुभवला.


टिळक रोडवरील गणेश सभागृहात ‌‘बरखा रंग‌’ या आयोजन करण्यात आले आहे. ‌‘बरखा रंग‌’ मैफलीची सुरुवात गोवा येथील सुप्रसिद्ध गायक पंडित प्रवीण गावकर यांनी राग मधुवंतीमधील ‘आयी बरखा’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत लयीतील ‘मोरे कर्तार नैय्या करो मोरी पार’ ही बंदिश सादर केली. खुला आवाज, सुमधुर सादरीकरण रसिकांना विशेष भावले.
यानंतर पंडित मुकुंदराज देव यांचे बहारदार तबला वादन झाले. त्यांनी तीन तालातील विविध छटा रसिकांसमोर सादर केल्या. ठेका पेशकार, ‘धीन्‌’चा विस्तार, बनारस घराण्याचे चलन, लखनवी अदब दर्शविणारा रेला तसेच कथक नृत्याला तबला साथ करताना तबल्यातून सादर केलेले होरीचे कवित्त, छंद, परण यांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद देत तबला वादनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची सांगता विदुषी सानिया पाटणकर यांच्या समधुर, सुश्राव्य गायनाने झाली. बरखा ऋतुनिमित्त आयोजित विशेष मैफलीत त्यांनी साडेसात मात्रांची गिनती दर्शवित राग भूपेश्र्वरी मधील गुरू अश्र्विनी भिडे-देशपांडे यांनी रचलेली ‘कारी बदरिया घेरी, पिया नही पास’ ही बंदिश तयारीने सादर केली. त्यानंतर द्रुत लयीत ‘प्रितमबिन लागत नाही जिया’ ही बंदिश सादर केली. पाटणकर यांनी कार्यक्रमाची सांगता गंगाधर महांबरे रचित ‘बिजलीचा टाळ, नभाचा मृदुंग‘ या भावपूर्ण अभंगाने केली. घुमावदार आवाज, सुरेल ताना, उत्तम दमसास आणि सुमधुर सादरीकरण रसिकांना विशेष भावले.
कलाकारांना मालू गावकर, देवेंद्र देशपांडे (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), वासिम खान (सारंगी), स्मीता पुरंदरे, मनिषा पिंपळगावकर, रुची शिरसे, आदिती नगरकर, मधुरा पेठे (सहगायन, तानपुरा) यांनी साथसंगत केली.
प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे विश्र्वस्त नितीन महाबळेश्वरकर यांच्या मातोश्री विजया महाबळेश्र्वरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मातोश्री पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा मातोश्री पुरस्कार सुप्रसिद्ध युवा गायक विराज जोशी यांच्या मातोश्री शिल्पा श्रीनिवास जोशी यांना प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या विश्र्वस्त डॉ. सुचित्रा कुलकर्णी आणि नितीन महाबळेश्र्वरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रूपये अकरा हजार रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना शिल्पा जोशी म्हणाल्या, आजची युवा पिढी शास्त्रीय संगीताकडे आकृष्ट व्हावी आणि भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत टिकून राहावे यासाठी प्रयत्न केले जावेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.

“दीपक टिळक यांच्या जाण्याने टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे विचारवंत प्रतिनिधित्व हरपले – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

पुणे, २० जुलै २०२५ : लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त व संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आज त्यांनी टिळक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व या कठीण प्रसंगी कुटुंबियांना धैर्याने उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे ते प्रभावी आणि विचारवंत प्रतिनिधी होते. शिक्षण, पत्रकारिता व समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अनुकरणीय आहे. ‘केसरी’ चे संपादक म्हणून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रहितवादी विचारधारेला आधुनिक समाजात अर्थपूर्ण पद्धतीने पेरले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण, मूल्य आणि संस्कारांची दिशा दिली.”

त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रतिभाशाली विचारवंत, कुशल प्रशासक आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गमावले असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

या दुःखद प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या व ईश्वराने या कठीण काळात कुटुंबियांना धैर्य द्यावे, अशी प्रार्थना केली.

विमान प्रवास बनतोय अवघड ? सरकारी नियंत्रण विचलित?

इंडिगोचे विमान 40 मिनिटे हवेत फिरत राहिले:तांत्रिक बिघाडामुळे परतले
रविवारी इंडिगोच्या एका विमानात तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमान सुमारे ४० मिनिटे हवेत फिरत राहिले. त्यानंतर ते तिरुपतीला परतले.एअर ट्रॅफिक ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ नुसार, एअरबस ए३२१निओ विमानाने तिरुपती विमानतळावरून संध्याकाळी ७:४२ वाजता उड्डाण केले आणि रात्री ८:३४ वाजता परतले.

तिरुपती ते हैदराबाद हे दिवसाचे शेवटचे नियोजित विमान होते, जे रद्द करण्यात आले. या प्रकरणावर इंडिगोकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.या विमानाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यामध्ये काही प्रवासी एअरलाइन कर्मचाऱ्यांकडून वेळापत्रक बदलण्याची मागणी करत आहेत. इंडिगोच्या वेबसाइटनुसार, विमान तिरुपतीहून संध्याकाळी ७:२० वाजता निघते आणि रात्री ८:३० वाजता हैदराबादला पोहोचते.

१९ जुलै: तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान परतले.

१९ जुलै रोजी एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान उड्डाणानंतर अवघ्या १६ मिनिटांनी हैदराबादला परतले. बोईंग ७३७ मॅक्स ८ आयएक्स११० हे विमान सकाळी ६:४० वाजता हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले.

हे विमान सकाळी ११:४५ वाजता थायलंडमधील फुकेत येथे उतरणार होते. तथापि, उड्डाणानंतर काही वेळातच वैमानिकाने विमान हैदराबादला परत आणले. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, जरी बिघाडाचे प्रकार अधिकृतपणे कळले नव्हते.

१६ जुलै: गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E 6271 ला बुधवारी रात्री 9:53 वाजता मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विमानाचे इंजिन हवेतच बिघाड झाला. विमानात 191 लोक होते.

तथापि, इंडिगोने इंजिन बिघाड झाल्याची पुष्टी केलेली नाही. विमान कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की दिल्लीहून उड्डाण करत असताना विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला. प्रोटोकॉलनुसार, विमान वळवून मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.

१५ जुलै: पटना येथे धावपट्टीला स्पर्श केल्यानंतर इंडिगोच्या विमानाने पुन्हा उड्डाण केले.
१५ जुलै रोजी दिल्लीहून पाटणा येथे आलेले इंडिगोचे विमान ६ई२४८२, लँडिंग दरम्यान धावपट्टीला स्पर्श केल्यानंतर पुन्हा उड्डाण केले. त्यानंतर, तीन-चार फेऱ्या मारल्यानंतर, विमान ५ मिनिटांनी पुन्हा उतरले. या काळात १७३ प्रवाशांना श्वास रोखला गेला.

८ जुलै: इंडिगो विमानाचे इंदूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
इंदूरहून रायपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उड्डाणाच्या अर्ध्या तासानंतर तांत्रिक बिघाड झाला. विमानाचे इंदूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. प्रवाशांनी सांगितले की, अचानक विमानात जोरदार धक्का बसला. त्यानंतर काही वेळातच वैमानिकाने विमान इंदूरला परत आणण्याची घोषणा केली. सकाळी ७:१५ वाजता विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

11 जुलै 2006 : एकामागून एक सात स्फोट अवघ्या ९ मिनिटात …

11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी 6:24 वाजता मुंबईच्या वेस्टर्न रेल्वे मार्गावर पहिला स्फोट झाला. तेव्हा लोकल ट्रेनमध्ये कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती. एकामागून एक माटुंगा रोड, वांद्रे, खार रोड, माहिम जंक्शन, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरिवली स्थानकांजवळ सात स्फोट झाले. प्रत्येक स्फोटामध्ये 1 ते 2 मिनिटांचे अंतर होते. संपूर्ण परिसरात आरडाओरड, गोंधळ, आणि मृतदेहांचा सडा पडला होता. सर्वात भीषण स्फोट माहिम स्थानकावर झाला, याठिकाणी सर्वाधिक मृत्यू झाले.
स्फोटात कोणत्या स्थानकावर किती मृत्यू झाले?

चर्चगेट-बोरीवली लोकल: 43 मृत्यू

मीरा रोड-भाईंदर लोकल: 31 मृत्यू

चर्चगेट-विरार लोकल: 28 मृत्यू

चर्चगेट-बोरीवली लोकल: 28 मृत्यू

चर्चगेट-विरार (बोरीवली) लोकल: 26 मृत्यू

चर्चगेट-बोरीवली (वांद्रे-खार रोड) लोकल: 22 मृत्यू

चर्चगेट लोकल : 9 मृत्यू

बॉम्बस्फोटांची टाइमलाईन

पहिला स्फोट – 6:24 वाजता

दुसरा स्फोट – 6:24 वाजता

तिसरा स्फोट – 6:25 वाजता

चौथा स्फोट – 6:26 वाजता

पाचवा स्फोट – 6:29 वाजता

सहावा स्फोट – 6:30 वाजता

सातवा स्फोट – 6:35 वाजता

बॉम्बस्फोटासाठी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर

या स्फोटांसाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. हे सर्व बॉम्ब लोकल रेल्वेच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये ठेवण्यात आले होते. बॉम्बस्फोटानंतर कोचचे तुकडे झाले होते. स्फोटासाठी चर्चगेटहून लांबच्या गाड्यांना लक्ष्य करण्यात आले कारण या ट्रेनमध्ये घराकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने घेतली होती.

गुजरातमधील हिंसाचाराचा बदला म्हणून घडवले स्फोट?

अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या या सात शक्तिशाली स्फोटांनी मायानगरी हादरुन गेली होती. या स्फोटांनंतर मुंबईतील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर झालेल्या तपासणीत काही स्फोट न झालेले कुकर बॉम्ब मिळाले होते. या शक्तिशाली स्फोटांमुळे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले होते. या स्फोटांनंतर मुंबईतील सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने जखमींना आणले जात होते. बहुतांश बॉम्ब हे चर्चगेटवरुन सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचाराचा सूड म्हणून मुंबईतील गुजराती नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने हे स्फोट घडवून आणल्याची एक थिअरी तपासादरम्यान समोर आली होती.

मुंबई हायकोर्टाचा निकाल अत्यंत धक्कादायक:उज्वल निकमांची प्रतिक्रिया, म्हणाले निकालाचे मूल्यमापन करावेच लागेल

सत्र न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालयाने फिरवला,सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागेल

मुंबई-मुंबई 2006 बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत धक्कादायक असून, एक नागरिक म्हणून मला दुःख झाले, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचे मूल्यमापन करावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.11 जुलै 2006 च्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण मुंबईला हादरवून टाकले होते. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यापैकी 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यातील 11 आरोपींची 19 वर्षांनी निर्दोष सुटका केली आहे. तर एका आरोपीचा आधीच नागपूर तुरुंगात मृत्यू झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया उमटत असून, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

उज्ज्वल निकम म्हणले,’अत्यंत धक्कादायक निकाल आहे. कारण मार्च 1993 मध्ये ज्या पद्धतीने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले, तशाच पद्धतीने आरडीएक्स वापरून 2006 मध्ये रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये 200 ते 250 निरपराध प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, असे उज्ज्वल निकम म्हणाले.त्यावेळेस टाडा कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली हा खटला चालवण्यात आला होता. या कायद्याखाली सक्षम पोलिस अधिकाऱ्यांनी काही आरोपींचे कबुली जबाबही घेतले होते. अर्थात हा खटला जरी मी चालवला नव्हता आणि त्या खटल्याविषयी मला काही प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहिती नाही की, त्या खटल्यात काय पुरावा नोंदवण्यात आला, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, सकृतदर्शनी ही बाब स्पष्ट होते की, मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालयाने फिरवला. याचाच अर्थ असा की, ज्या पुराव्यांवर सत्र न्यायालयाने शिक्षा दिली होती, तो पुरावा मुंबईच्या उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला नाही आणि सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. यातील काही आरोपींना फाशीची शिक्षाही झाली होती. हे सगळेच आरोपी निर्दोष सुटल्यामुळे एक नागरिक म्हणून मला दुःख झाले आहे आणि ते प्रत्येकालाच झाले असणार आहे,

उज्जवल निकम पुढे म्हणाले की, सरकारला आता या निकालाची पुन्हा एकदा चाचपणी करून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागेल. परंतु, मुंबई उच्च न्यायालयात या निकालावर स्थगिती मागितली गेली असेल, तर आरोपींची लगेच सुटका होणार नाही. परंतु, असे काही नसेल, तर सरकारला याबाबत अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. तसेच निर्दोष मुक्ततेविरुद्ध अपील आणि शिक्षेविरुद्ध अपील हे तातडीने चालवले गेले पाहिजे. काही खटल्यात आरोपी सत्र न्यायालयात निर्दोष सुटतात, त्याविरोधात सरकार अपील करते. परंतु, त्याची सुनावणी बरेच वर्ष होत नाही आणि तो निर्णय फिरल्यानंतर धक्का बसू शकतो. ज्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झालेली आहे, त्याचे अपील तातडीने लागले पाहिजे. परिणामतः सरकारला तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावी लागेल आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचे मूल्यमापन करावे लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील रुग्णांना अवघ्या सहा महिन्यात १७ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

आरोग्यदायी महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

आरोग्य हा नागरिकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून आहे. रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास अशा व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक स्थितीसोबतच कुटुंबाच्या मानसिक, आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होत असतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशासन आरोग्य क्षेत्रात गरजूंना दिलासा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. याच उपक्रमापैकी एक असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखाली ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे काम कक्षामार्फत होत आहे. याकरिता राज्यशासनाच्यावतीने रुग्णांची सेवा करुन त्याचे जीवन पूर्वपदावर आणण्यासोबत आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याकरिता कक्ष प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी:
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या निधीचे व्यवस्थापन करण्यासोबतच निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहिले जाते. मुख्यमंत्र्यांचे सचिव हे या सहाय्यता निधीचे सचिव म्हणून मानद आधारावर सेवा प्रदान करतात. अन्य अधिकारी सचिवांना मानद आधारावर मदत करतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे वितरण मुख्यमंत्री यांच्या स्वेच्छानिर्णयाने त्यांच्या निर्देशानुसार करण्यात येते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याची प्रक्रिया:
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आरोग्यदायी, सदृढ, निरोगी महाराष्ट्राचा ध्येयपूर्तीच्यादृष्टीने वाटचाल करीत असून समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आदी घटकांना या निधीमध्ये आपले योगदान देऊन दुर्बल, असहाय्य घटकांची सेवा करण्याची संधी आहे.

मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई, येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे पोस्टल ऑर्डर, मनी ऑर्डरद्वारे धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरणा करता येते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य खाते क्र. १०९७२४३३७५१, मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड १९) खाते क्र. ३९२३९५९१७२० या खात्यावर निधीमध्ये योगदान देता येईल. याकरिता या SBIN००००३०० आयएफएससी कोडचा वापर करावा. धनादेश, डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक, शाखेतून आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री रिलीफ फंड, एसबीआय संकलन शाखा जमा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे करता येईल.

देणगीदाराने क्युआर कोडद्वारे दिलेल्या देणगीबाबत रकमेची पावती मिळविण्यासाठी देणगीदाराचे नाव, व्यवहार क्रमांक, व्यवहार केल्याची तारीख, निवासी पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, भ्रमणध्वनी नंबर तपशील नमूद करुन donationscmrf-mh@gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवावे. निधीचा पॅन क्रमांक AAATC0294J असा आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केलेली रक्कम ही भारतीय प्राप्तीकर कायद्यातील कलम 80 (जी) अंतर्गत आयकर सूट घेण्यास पात्र आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने मदत:
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रामुख्याने पूर, चक्रीवादळ व भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती तसेच मोठा अपघात, दंगलीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वापरण्यात येतो. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी शासकीय प्राधिकृत रुग्णालयात अत्यंत गरिब व गरजू रुग्णांना मुख्य आजारपणाच्या उपचाराकरिता आर्थिक मदत करण्याकरिता उपलब्ध आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळण्याकरिता असलेले आजार: हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थीमज्जा, हात, खुबा, गुडघा प्रत्यारोपण, अंतस्त कर्णरोपण (कॉकलियर इम्प्लाँट), कर्करोग, अस्थिबंधन शस्त्रक्रिया, नवजात शिशु, लहान बालकासंबंधित आजार, रस्ते अपघात, मेंदू आजार, हृदयरोग, डायलिसीस, जळीत रुग्ण आणि विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारपणाकरिता अर्थसहाय्य करण्यात येते.

मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ हजार रुपये, ५० हजार, १ लाख, जास्तीत जास्त २ लाख रुपयांचे आजारांनिहाय अर्थसहाय्य करण्यात येते. उपचार पूर्ण झालेल्या रुग्णाला तसेच राज्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अर्थसहाय्य दिले जात नाही.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष:
दुर्धर आजारावरील उपचाराकरिता आर्थिक साहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साहाय्य याबाबत नागरिकांना जिल्हा स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यासोबतच मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खोली क्रमांक १०, तळमजला, जुनी जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

डॉ. मानसिंग साबळे, वैद्यकीय अधिकारी हे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख असून त्यांच्या अधिपत्याखाली एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयक कार्यरत आहेत. वैद्यकीय मदतीचा अर्ज भरण्यासंदर्भात अडचण आल्यास कक्ष प्रमुखांच्या ८०८७६७८९७७ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच cmrfpune@gmail.com ईमेल पत्त्यावर क्रमांकावर संपर्क साधावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया व कागदपत्रे:
जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांनी या कक्षाद्वारे अर्थसाहाय्य मागणीकरिता https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, कक्षाच्या cmrfpune@gmail.com ईमेल पत्त्यावर ऑनलाईनपद्धतीने किंवा प्रत्यक्ष कक्षात ऑफलाईनपद्धतीनेही अर्ज सादर करता येते. इमेलद्वारे अर्ज केलेल्यांनी मूळ अर्जासह आवश्यकत ती सर्व कागदपत्रे एकत्रित रित्या aao.cmrf-mh@gov.in ईमेल पत्त्यावर पीडीएस्वरुपात पाठवावे. ऑफलाईन अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहेत.

अर्जासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल झाल्यास त्याचा जिओ टॅग छायाचित्र, निदान व उपचाराकरिता लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक, (खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुखांकडून प्रमाणित) चालू आर्थिक वर्षाचा 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा तहसिलदारांचा उत्पन्न दाखला, रुग्णाचे आधारकार्ड, लहान बालकाच्या बाबतीत मातेचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, व्याधी विकार, आजाराच्या संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्ताच्या प्रकरणात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर), अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्याबाबतीत विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती मान्यता आवश्यक राहील. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्ष सुरु करण्यात आले. त्यातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळत आहेत. पुणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत झालेल्या मदतीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी: मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १ हजार ७८५ रुग्णांना १७ कोटी २८ लाख रुपये इतक्या रक्कमेचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. कक्षामार्फत गरीब व गरजू रुग्णांना अडचणीच्या काळात अर्थसहाय्य करत दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचाराकरिता सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात ४४५ रुग्णालय संलग्नित आहेत. नागरिकांनी वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य मिळण्याकरिता या कक्षाशी संपर्क साधावा.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

पहलगामचे हत्यारे दहशतवादी का पकडले नाहीत, उत्तर द्या…राज्यसभेत खरगेंचा सवाल अन ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ

नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरवर लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा व्हावी अशी मागणी करत विरोधकांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे कामकाज सध्या तहकूब करण्यात आले आहे.राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले – पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांना मारलेही गेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे उपराज्यपालांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी २४ वेळा सांगितले आहे की आम्ही युद्ध थांबवले. सरकारने या सर्वांचे उत्तर द्यावे.

यादरम्यान, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले – देशात असा संदेश जाऊ नये की सरकार पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू इच्छित नाही. आम्ही चर्चा करू आणि ते सर्व प्रकारे करू. ऑपरेशन सिंदूरचे सर्व मुद्दे देशासमोर ठेवले जातील.

तत्पूर्वी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले – प्रश्नोत्तराच्या तासानंतर आम्ही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू. सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. ही पद्धत योग्य नाही. पहिल्याच दिवशी हे वर्तन योग्य नाही. आपण हा गैरसमज मोडला पाहिजे.पावसाळी अधिवेशनापूर्वी, I.N.D.I.A. आघाडीची बैठक झाली. यामध्ये ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीवरील दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर सरकारला सभागृहात कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यात आली. या सर्व मुद्द्यांवर विरोधकांना पंतप्रधानांकडून उत्तरे हवी होती.

महाराष्ट्राच्या तिजोरीतील 36 हजार कोटींच्या अनुदानाचा हिशेब लागत नाही:कॅगचा ठपका

राज्यावर ९ लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज -कर्जाचे व्याज भरण्यात अडचणी:२०२३-२४ या आर्थिक वर्षात अहवालाने राज्याच्या वित्तीय व्यवस्थेतील गंभीर अनियमितता उघड केल्या आहेत. अनेक शासकीय विभागांकडून उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेवर सादर केली जात नसल्याने निधीच्या वापराचा तपशील उपलब्ध होत नाही, ज्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता वाढते. राज्याने विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले असून आता हे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेण्याची वेळ आली आहे. सध्या राज्यावर ९ लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे. केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा कराची रक्कम वेळेवर न मिळाल्याने कर्जाचे व्याज भरण्यात अडचणी येत आहेत.

मुंबई-सरकारच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये आर्थिक नियोजनाचा मोठा गोंधळ समोर आला आहे. नगरविकास (३०.६४%), नियोजन (१३.१७%), जलसंपदा (९.६५%) आणि ग्रामीण विकास विभाग (९.६०%) आणि इतर १० विभागांनी सुमारे ३६,७५६ कोटी रुपयांच्या निधीचा हिशेब अद्यापही दिलेला नाही. ३१ मार्च २०२४ पर्यंत या निधीचा विनियोग कसा केला याची माहिती देणारी १०,७९३ “उपयोगिता प्रमाणपत्रे’ (यूसी) शासनाकडे अजूनही जमा झालेली नाहीत. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या (कॅग) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीच्या राज्य वित्तविषयक अहवालातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

याआधी २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे २५,७५९ कोटी रुपयांच्या हिशेबाची ९,२८० उपयोगिता प्रमाणपत्रे प्रलंबित होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या आणि रक्कम लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता १०,७९३ उपयोगिता प्रमाणपत्रे प्रलंबित असून त्यामध्ये ३६,७५६ कोटी रुपयांचा हिशेब समाविष्ट आहे.कॅग अहवालात ५५२ कोटी रुपयांचा अपुरा भरणादेखील उघड झाला आहे. राज्याच्या तिजोरीत १ एप्रिल २०२३ रोजी ६१,०२९ कोटी रुपयांच्या व्याज देणाऱ्या ठेवी आणि २५,५११ कोटी रुपयांचा राखीव निधी जमा होता. या रकमेवर सरकारने अनुक्रमे २,९१३ कोटी रुपये आणि ५०० कोटी रुपये व्याज देण्याची जबाबदारी स्वीकारली होती, परंतु प्रत्यक्षात ५५२ कोटी रुपयांचा अपुरा भरणा करण्यात आला आहे. ही केवळ आकड्यांची चूक नसून शासनाच्या आर्थिक शिस्तीतील गंभीर त्रुटी दर्शवते. लेखा प्रणालीतील हा गोंधळ शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून यामुळे महसुली आणि राजकोषीय तूट वाढण्याचा धोका गडद झाला आहे.