Home Blog Page 450

राजीनामा देण्यासाठी मी विनयभंग केला का?:कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विरोधकांना सवाल; बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा

मी कधीच रम्मी खेळलेलो नाही, मला रम्मीच खेळता येत नाही

मुंबई-सभागृहामध्ये रम्मी खेळल्या प्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार होत आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलन केले जात आहे. मात्र, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. मी रम्मी खेळलेलो नाही, मला रम्मी खेळता येत नाही, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी याप्रकरणी आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर बदनामी करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांना पत्र देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

रम्मी प्रकरणावर माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, मला माझ्या अधिकाऱ्यांकडून सभागृहात उत्तर देण्यासाठी माहिती मागवायची होती. त्यासाठी मी मोबाईल मागवला होता. तो मोबाइल देखील माझा नव्हता. मोबाइल हातात घेताच त्यावर गेम सुरू झाला. मात्र, असे गेल काही सेकंद स्किप करता येत नाहीत. तो स्किप करण्याचा प्रयत्न करत असताना 15 ते 20 सेकंदाचा वेळ लागतो. तेवढ्याच वेळात काढलेला तो व्हिडिओ आहे. त्यानंतर गेम स्किप झाला आणि मी माझे काम केले. मात्र, नंतरचा व्हिडिओ समोर आणलेला नाही, असा दावा कोकाटे यांनी केला आहे.

रम्मी प्रकरणावर माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोणाचा विनयभंग केला का? काही गुन्हा केला का? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मी शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला नाही. मी बलात्कार केलेला नाही किंवा माझी कोणत्याही गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे राजीनामा देण्यासारखे काय घडले? असा प्रतिप्रश्न माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला. दोषी सापडलो तर कोणालाही न सांगता आधी राज्यपालांकडे जाऊन थेट राजीनामा देईल, अशा शब्दात माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हा अत्यंत छोटा विषय आहे. हा विषय एवढा का लांबला? असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. ऑनलाइन रम्मी खेळताना आपला मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक त्याला जॉइन करावा लागतो. ज्या दिवसापासून ऑनलाईन रम्मी सुरु झाली, त्या दिवसापासून एक रुपयाची देखील रम्मी मी खेळलेलो नाही. मला रम्मी खेळता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. अशा पद्धतीचा आरोप करणे बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात यामुळे माझी मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी हा आरोप केला आहे. ज्यांनी- ज्यांनी माझी बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचल्या शिवाय मी राहणार नाही, असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. ज्या गोष्टीचा शेतकऱ्यांशी संबंध नाही. त्या सर्वांनी याच गोष्टी दाखवल्या गेल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सर्वांचा सीडीआर तपास करण्याची मागणी माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देणार असल्याचे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना लाँच करण्यात येत असल्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी लागणारी औषधी आणि बी बियाणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे कृषिमंत्री यांनी म्हटले आहे. यासाठी अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे आपण केली होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लगेच त्याला मंजुरी दिली आहे, असे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. या योजनेमध्ये काही त्रुटी आढळल्या तर चार ते सहा महिन्यांमध्ये त्याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना अत्यंत सुलभ योजना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

संत निरंकारी मिशनतर्फे गंगाधाम, पुणे येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर; ५५० नागरिकांना लाभ२० वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन; तपासण्या व औषधे मोफत

गंगाधाम(पुणे), ता. २२ जुलै:
            सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे गंगाधाम, पुणे  येथील संत निरंकारी सत्संग भवनात भव्य मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन रविवारी (दि. २० जुलै) करण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराचा लाभ सुमारे ५५० नागरिकांनी घेतला.
            या शिबिरात विविध वैद्यकीय तज्ञांची उपस्थिती लाभली. जनरल फिजिशियन, कान-नाक-घसा तज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, कायरोप्रॅक्टिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, ऑक्युप्रेशर अशा अनेक शाखांतील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना सल्ला व उपचार दिला.
            या शिबिरासाठी १३ जुलै रोजी नागरिकांचे रक्तनमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते, तपासणी अहवालांनुसार आवश्यक त्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात ECG सुविधा देखील उपलब्ध होती. डॉ. पुरुषोत्तम अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली २० हून अधिक डॉक्टरांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, तपासण्या अल्पदरात करण्यात आल्या असून औषधे मोफत पुरविण्यात आली. शिबिरासाठी आलेल्या सर्व नागरिकांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती.
            संत निरंकारी मिशनतर्फे मानवसेवेच्या हेतूने देशभर विविध उपक्रम राबवले जातात. स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, नेत्र चिकित्सा शिबिर, महिला सशक्तीकरण, बालविकास व नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य या माध्यमातून मिशन समाजातील सकारात्मक बदल घडवून आणत आहे. भारत सरकार व राज्य सरकारांनीही या कार्याची दखल घेत विविध स्तरांवर सन्मानित केले आहे.
            या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये संत निरंकारी सेवादल, स्थानिक ब्रँचचे स्वयंसेवक व मिशनचे अनुयायी यांनी मोलाचे योगदान दिले.

पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणारा नेता ….

तरुण वयापासूनच पुण्याच्या राजकीय संस्कृतीत मी वाढत गेलो. पुढे शिक्षण मंडळाचा अध्यक्ष, नगरसेवक, पुण्याचा उप महापौर अशी पदे भूषवीत असताना माझ्या डोळ्यांसमोर सदैव ‘रोल मॉडेल’ राहिलेत ते अजितदादा पवार! या तरुण तडफदार नेतृत्वास मोठे वलय लाभले. स्पष्टवक्तेपणा, कणखरपणा, अभ्यासू वृत्ती आणि अफाट लोकसंग्रह या जोरावर त्यांचे नेतृत्व खुलत गेले. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज या दैवतांना आदर्श मानून, महाराष्ट्रात शाहू-फुले -आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करीत त्यांनी संपूर्ण
महाराष्ट्रात घरा-घरात आणि मना-मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. स्वतःची कर्तबगार अशी प्रतिमा तयार केली आणि त्यामुळेच लाखो तरुणांचे ते ‘रोल मॉडेल’ बनले!
१९९१ मध्ये बारामतीमधून प्रथम लोकसभेचे ते खासदार बनले. मात्र काही महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा देऊन बारामतीचे आमदार म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत बारामतीचे आमदार म्हणून ते निवडून येत आहेत. प्रथम राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी वैभवशाली वाटचाल करताना राज्यातील शेतकरी आणि गरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशा उपेक्षित वर्गाच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करीत त्यांनी साऱ्या महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेले.
राज्यातील युवकांना शिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबविणारे अजितदादा अतिशय दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यामुळेच पारंपरिक शिक्षणाच्या जोडीला व्यवसायाभिमुख तंत्रशिक्षण देण्यावर त्यांनी सदैव भर दिला. तसेच स्वयंरोजगाराचा मंत्र त्यांनी गावोगावी तरुणांच्या मनात रुजविला. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी अनेक योजना राबविताना त्यांनी ‘शिकलेली स्त्री कुटुंबाचा उद्धार करते’ हा विचार प्रमाण मानला. त्यांनी दीर्घकाळ राज्याचे अर्थमंत्रिपद भूषविले. या काळात प्रत्येक वेळी त्यांनी मुलींना चांगले शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था, मुलींसाठी वसतिगृहे, मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्त्या यांसाठी त्यांनी सदैव भरभक्कम आर्थिक तरतूद केली. त्यांचे हे फार मोठे क्रांतिकारक कार्य आहे.
सध्या राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत गरीब महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्याचे धोरण अमलात आणताना अशा सुमारे अडीच कोटी महिलांसाठी वार्षिक अंदाजपत्रकात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची कसरत ते कुशलतेने करतात आणि ‘लाडक्या बहिणींसाठी एक रुपयादेखील कमी पडू देणार नाही’ ही स्वतः केलेली घोषणा तंतोतंत सत्यात आणतात. हे केवळ अजितदादाच करू जाणे! अजितदादांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे जडलेले भावनिक नाते! महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठीवर थाप मारत ते नावाने हाक मारतात, तेव्हा त्यांच्या अफाट लोकसंपर्काचे आणि स्मरणशक्तीचे कौतुक वाटते.

कार्यकर्त्याची छातीदेखील अभिमानाने फुलते. कार्यकर्त्यांना बळ देणे ही तर अजितदादांची खासियत आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अंगभूत गुण आहे. एखादे काम होणार असेल, तर ते तसे सांगतात. मात्र एखादे काम होणार नसेल, तर स्पष्टपणे ‘नाही’ सांगतात. कोणतेही वेडेवाकडे, बेकायदेशीर काम घेऊन कोणी आले, तर त्याला स्पष्टपणे नकार देणारे अजितदादा त्यामुळेच सर्वांच्या आदरास पात्र ठरले आहेत.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समता या मूल्यांवर अजितदादांची अपार श्रद्धा आहे. सत्ता हे परिवर्तनाचे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्याचे प्रभावी साधन असते, हे ओळखून महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि एखाद्या झंझावाताप्रमाणे सकाळी ६ वाजल्यापासून १८-१८ तास ते काम करीत राहतात. प्रशासनावरही त्यांची भक्कम पकड आहे. अजितदादांनी कधी सुट्टी घेतल्याचे कोणालाच ऐकिवात नाही.
पुणे हा अजितदादांचा जिल्हा! पुण्याचे ते पालकमंत्रीदेखील आहेत. पुण्याचा विकास व समतोल वेगाने व्हावा, यावर ते कटाक्षाने लक्ष ठेवतात. पुण्याचा पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक अशा नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञाना देखील ते सहभागी करून घेतात. त्यामुळे पुणे असो अथवा पिंपरी-चिंचवड, या दोन्ही शहरांचा विकास झपाट्याने तर झालाच, शिवाय नागरी प्रश्न वेगाने सुटण्यासही मदत झाली. याबद्दल नागरिक त्यांचे सदैव ऋणी राहतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र गुंफले आहे. राजकीय कामाबरोबरच सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींची ताकद हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे आणि ती केवळ अजितदादांमुळेच! माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा त्यांनी सोपविली होती. तो माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण मी मानतो. ‘पक्ष-संघटना मजबूत करीत जनतेचे प्रश्न सोडवीत राहणे, हेच आपले जीवनध्येय आहे, असे मानून काम करीत राहा’ हा त्यांनी त्यावेळी दिलेला संदेश आजही मनाला प्रेरणा देत राहतो. अजितदादांनी माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना विकासाची दृष्टी दिली, हे त्यांचे फार मोठे योगदान मी मानतो.
अजितदादांसारख्या धुरंधर नेतृत्वाच्या हाती आपले महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील, ही भावना राज्यातील कानाकोपऱ्यातील जनतेच्या मनात आहे आणि त्यासाठीच अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही अपेक्षा राज्यातील लाखो जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने मी व्यक्त करतो. ज्येष्ठ लोकनेते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण हे अजितदादांचे राजकीय जीवनातील आदर्श आहेत. त्यांच्या विचारांना प्रणाम मानून आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणारे धुरंदर लोकनेते आदरणीय शरदराव पवार साहेब यांच्या विचारांचा सन्मान करीत व सर्वांना सोबत घेत अजितदादा वाटचाल करीत आहेत. हीच वाटचाल त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाईल हा विश्वास मला आहे.

आपला

दीपक मानकर

निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान, मुख्यमंत्री कर्तृत्ववान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस. यानिमित्त सर्वप्रथम त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र ‘सुजलाम्-सुफलाम्’ राज्य व्हावं म्हणून कार्यरत असलेल्या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परमेश्वर शक्ती देवो, निरोगी व उदंड आयुष्य देवो, त्यांच्या हातून देशाची सेवा घडो… ही प्रार्थना!

निष्कलंक नेतृत्व : आजपर्यंतच्या कारकीर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप न झालेले नेतृत्व. स्वच्छ व निष्कलंक चारित्र्य असलेल्या संपूर्ण देशातल्या मोजक्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत फडणवीस साहेबांचा समावेश आहे.

जातीपातीच्या पलीकडलं नेतृत्व : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता जातीपातीच्या पलीकडं जाऊन फडणवीस साहेब काम करीत आहेत.

उच्च शिक्षित नेतृत्व : निष्कलंक चारित्र्य आणि उच्च विद्याविभूषित मुख्यमंत्री. नागपूरमधून कायद्याची पदवी. तर, जर्मनीतून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण. असे उच्च शिक्षित मुख्यमंत्री देशात खूपच कमी आहेत.

दूरदृष्टी नेतृत्व : हुशार व चाणाक्ष असलेल्या फडणवीस साहेबांना भारतातल्या युवा पिढीच्या अपेक्षा, त्यांची गरज अतिशय नेमकेपणानं माहिती आहे. उद्याच्या महाराष्ट्राचे, भारताचे आणि युवा पिढीचे भविष्य सुरक्षित व उज्ज्वल करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून मुख्यमंत्री फडणवीस साहेब काम करीत आहेत.

कर्तृत्ववान नेतृत्व : मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला सर्वप्रथम मानून शेती, उद्योग-व्यापार, शिक्षण, आरोग्य आदी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्याचा संकल्प केला आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची करण्याचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वप्न पाहिलंय. आणि ते पूर्ण करण्यासाठी एकट्या महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलियन डॉलर्स करण्याचा दृढसंकल्प देवेंद्रजींनी केला आहे. फडणवीस हे कर्तृत्ववान आहेत. त्यांच्या नेतृत्वात हे स्वप्न निश्चित पूर्ण होईल.

विकास प्रकल्प : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग, मुंबई, पुणे व नागपूर शहरात मेट्रो, मुंबईमध्ये कोस्टल रोड, अटल सेतू व ट्रान्स-हार्बर लिंक, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात रिंग रोड, २४ तास पाणीपुरवठा व नदी सुधार प्रकल्प, मराठवाड्यात वॉटर ग्रीड प्रकल्प, जलशिवार योजना याबरोबरच रस्ते, रेल्वे, विमान, सार्वजनिक बस, शेतकरी, कष्टकरी, आरोग्य, शिक्षण संदर्भात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या काळातले आहेत.

साहेब… आपलं नेतृत्व असंच बहरत जावो आणि आपल्या हातून महाराष्ट्राची व देशाची सेवा घडो! त्यासाठी परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य देवो हीच मनोभावे प्रार्थना!
वाढदिवसाच्या पूनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा!

आपलाच,
संजय काकडे उपाध्यक्ष,भाजपा महाराष्ट्र माजी खासदार,राज्यसभा

कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक संसद अधिवेशनात म्हणाल्या, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी..

कर्करोग नियंत्रणासाठी ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्यात
नवी दिल्ली/पुणे: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाच्या वाढत्या संख्येबाबत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी सोमवारी संसदेत लक्ष वेधले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सत्रात महिलांमधील वाढत्या कर्करोगाबाबत चिंता व्यक्त करत कर्करोग नियंत्रणासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपायोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी केली.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या ‘संजिवनी’ आरोग्य तपासणी मोहिमेत २.९३ लाख महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १४,५०० महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, ग्रामीण आणि वंचित भागांमध्ये वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमा स्तुत्य असल्या तरी त्या केवळ पहिला टप्पा असून, त्यानंतरच्या उपचार, फॉलोअप आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव मोठा अडथळा ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने काही तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. कुलकर्णी यांनी स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये मॅमोग्राफी, गर्भाशय मुख तपासणी व बायोप्सीसारख्या निदान चाचण्यांसाठी अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना मांडली. त्याचप्रमाणे दुर्गम भागांमध्ये मोबाइल ऑन्कोलॉजी युनिट्स (कर्करोग निदान गाड्या) उप्लब्ध करून सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान करण्याची गरज त्यांनी मांडली. महिलांमध्ये कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची जाणीव व्हावी व या आजाराबाबतचा सामाजिक कलंक दूर व्हावा यासाठी व्यापक जनजागृती मोहिमा राबवाव्यात, असेही त्यांनी सुचवले. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या योजना अधिक प्रभावीपणे राबवून कर्करोग निदान व उपचारांचा संपूर्ण खर्च या माध्यमातून करावा, अशी शिफारस त्यांनी केली.

महाराष्ट्रात २०२३ मध्ये १.२१ लाख नव्या कर्करोग रुग्णांची नोंद झाली असून, २०२१ मध्ये ही संख्या १.१८ लाख होती. ही वाढती आकडेवारी राज्यातील, विशेषतः ग्रामीण महिलांमधील कर्करोगाचे संकट अधोरेखित करते, असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. ही एक ‘मूक आरोग्य आपत्ती’ आहे आणि त्यासाठी बहु-क्षेत्रीय, तातडीची आणि सातत्यपूर्ण कृतीची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यानंतर वेळेवर उपचार सुरू व्हावेत, जेणेकरून रुग्णांना योग्य काळजी मिळेल आणि त्यांचे आयुष्य वाचवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

हडपसर विधानसभा मतदारसंघाची पुन्हा होणार मतमोजणी

पुणे- नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मोजणी पुन्हा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती माजी महापौर आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कळविली आहे. भोसरी गोडाऊन येथे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ही मतमोजणी होणार आहे.असेही ते म्हणालेत.

त्यांनी या प्रकरणी सविस्तर कळविले आहे कि,’नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनेक मतदारसंघातून आक्षेप नोंदवण्यात आले होते. हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या प्रक्रिये बाबतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी आक्षेप नोंदवत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली होती.त्यानंतर निवडणूक आयोगाने हडपसर विधानसभा मतदारसंघातील २७ EVM मशिन्स व VVPAT मशिन्सची पुन्हा मोजणी करण्यास मान्यता दिली होती. मात्र ही मोजणी करताना प्रत्यक्ष निवडणुकीत झालेले मतदान संपूर्णपणे मशीन मधून खोडून, मॉकपोल घेऊन मोजणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या या निर्णयास प्रशांत जगताप यांच्यासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून येत्या २५ जुलैपासून प्रत्यक्ष झालेल्या मतदानाची पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे. भोसरी गोडाऊन येथे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ही मतमोजणी होणार आहे.याबद्दल प्रशांत जगताप यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत हडपसर विधानसभा मतदारसंघात झालेली मतांची चोरी जगासमोर येणार हा विश्वास व्यक्त केला.

अध्यात्म व विज्ञानाच्या विचारांचा समन्वय म्हणजे ‘नवा भारत’-पद्मभूषण डॉ. विजय भटकर

‘महाराष्ट्र वारकरी किर्तनकार गोलमेज परिषदे’ चा समारोप.

पुणे:” विज्ञान व अध्यात्माच्या एकत्रीकरणातून नव्या विचारांचा समन्वय होईल, आणि या दोन्हीच्या विचारांचा समन्वय म्हणजे नवा भारत असेल. पंतप्रधान सतत म्हणतात की भारत एक महान व चांगले राष्ट्र होणार आहे. याची सुरूवात ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’तून झाली आहे. भारतीय राजकारणाला बदलावयाचे असेल तर अध्यात्मिक विचार मांडले गेले पाहिजे. येथून निघालेले मंथन हे भारतीय संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी सज्ज आहे.” असे विचार जागतिक किर्तीचे संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवसीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ च्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी पंढरपूर येथील श्रीगुरू साखरे महाराज परंपरा पाईकचे हभप रामकृष्ण महाराज वीर, आळंदी येथील साधकाश्रमचे प्रमुख हभप यशोधन महाराज साखरे, बदलापूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार हभप विश्वनाथ महाराज वारिंगे, देहूचे हभप पांडुरंग महाराज घुले, पंडित उद्धवबापू आपेगावकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड होते. तसेच पद्मश्री पोपटराव पवार व परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,” राजकारणाला अध्यात्मिक कल कसा मिळू शकेल यावर महात्मा गांधीजी सतत विचार मांडत होते. पण या परिषदेच्या माध्यमातून यांची सुरूवात झाली आहे. येथील राजकारणाला आध्यात्मिक कसे करता येईल हे सर्वात मोठे परिवर्तन असेल. राजकारणाला स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारच्या गोलमेज परिषदेचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य कसे आणि कोणत्या पद्धतीने मिळावे या साठी ब्रिटीशकाळात गोलमेज परिषदेला अतिशय महत्व आले होते. ही परिषद लंडन ला भरणार होती आणि येथे हे विचार मांडले जाणार होते. त्याच प्रमाणे ही परिषद देशासाठी अत्यंत महत्वाची आहे.”
डॉ. सदानंद मोरे म्हणाले,” समाजात प्रबोधनाचे सामर्थ्यशाली माध्यम कीर्तन आहे. कीर्तनकार प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व जातीचे कांगोरे कमी करण्याचे प्रयत्न करीत असतो. या परिषदेत वारकरी शिक्षण संस्थेबद्दल जी चर्चा झाली त्यानुसार आता त्यांना व्यावसायिक कार्याचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. वारकरी संप्रदायात शिस्तबद्ध आणि ज्यांना व्हिजन आहे अश्या लोकांची खूप गरज आहे. या संप्रदायाने आता मिशन ठेऊन मार्गावर चालावे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” ऐतिहासिक परिषदेतून असे सरपंच आणि महाराज तयार व्हावे जेणे करून देशात परिवर्तनाची लाट आली पाहिजे. जीथे अध्यात्माचा बेस असतो तेथे विकास असतोच. त्याच प्रकारे राजकारणात चारित्र्यवान लोक निर्माण करण्यासाठी भारतातील पहिली एसओजी संस्थेची निर्मिती केली आहे. आज याच माध्यमातून राज्यात दोन आमदार व देशात ८ आमदार निवडून आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नव नवीन प्रयोग सातत्याने राबविले जात आहे.”
यशोधन महाराज सारखे म्हणाले,” वारकरी संप्रदाय हा परोपकारी संप्रदाय आहे. कीर्तनकारांनी आपल्या आचरणातून आदर्श निर्माण करावा. या परिषदेतून समोर आलेल्या वेगवेगळ्या समस्यांच्या समाधानांचे निराकरण करण्यासाठी संतांनी सांगितलेल्या विचारांवर विचार विमर्श करावा लागेल. तसेच सामाजिक समस्यांसाठी वारकरी संप्रदायाने विचार करावा. ”
यानंतर हभप रामकृष्ण महाराज वीर महाराज आणि विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजाला खरी दिशा देण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदाय आणि सरपंच करू शकतात. वारकरी संप्रदाय हा विश्वधर्मी असून स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील भारत निर्मितीच्या कार्यात अनमोल वाटा असेल. कल्याणाची आणि विकासाची मुळ कल्पना घेऊन वारकरी संप्रदायाने मानवी मूल्यांचे मुळ तत्व धरून कार्य करीत आहेत.
सूत्रसंचालन डॉ. शलिनी टोणपे यांनी केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.

हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली; उच्चस्तरीय चौकशी करा.

सत्ताधारी पक्षातील आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले, मुख्यमंत्र्यांनी माज उतरवण्याची धमक दाखवावी: हर्षवर्धन सपकाळ

दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमीत रमतो, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही?

लातूरमधील झुंडशाहीचा फुसका निषेध करण्याचे ढोंग बंद करा; गुंडगिरी करणाऱ्या NCP च्या पदाधिकाऱ्याच्या मुसक्या आवळा.

मुंबई, दि. २१ जुलै २०२५
राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची मर्दुमकी दाखवणाऱ्यांनी निर्ल्लज कृषी मंत्री व गुंडगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या हाणामारीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, की आमदार माजलेत पण आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले आहेत हे त्यांना दिसत नाही का? कृषीमंत्री कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात तर कधी कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी मुलांची लग्न करतात म्हणून अपमान करतो आणि आतातर हे महाशय चक्क विधानसभेत रमी खेळत बसले होते. या घटनेचा निषेधार्थ करताना छावा संघटनेने लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना निवेदन देत पत्ताच्या सेट दिला, हा निषेध करण्याचा मार्ग आहे, त्यात चुकीचे काय? पण अजित पवारांच्या पाळलेल्या गुंडांनी त्या आंदोलकांना बेदम मारहाण केली, हा माज कशातून येतो? सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण सत्तेची ही नशा जास्त काळ रहात नाही. या प्रकरणाचा आता निषेध केला जात आहे पण असा पोकळ निषेध काय करता? कृषी मंत्र्याला घरी पाठवा आणि या माजलेल्या सडकछाप गुंडांना जेलमध्ये खडी फोडण्यासाठी पाठवा, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात अडकला…
राज्यातील काही मंत्री व अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने विधानसभेत केला पण राज्याचे मुख्यमंत्र्यांनी, असे काहीच घडले नाही अशा राणाभीमदेवी थाटात निवेदन केले. पण सवयीप्रमाणे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलले. या हनी ट्रॅपचे धागेदोरे भाजपाच्या अत्यंत जवळ पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटच्या मंत्र्याबरोबर हनीट्रॅपशी संबंधित व्यक्तीचा फोटो झळकल्याने या प्रकरणातील गांभिर्य अधिकच गडद झाले आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे पण हनी ट्रॅपची उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना जाहीर

पुणे-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,’ पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम ताई गोन्हे यांना जाहीर करण्यात येत आहे. त्यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी केलेले सामाजिक, राजकीय आणि साहित्य विषयक कार्य यांची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. हा पुरस्कार शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ३० मि. मा. राजे भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून मा. विजय बापू शिवतारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मा. विजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या प्रसंगी दिलीप दादा बारभाई व सुदामाप्पा इंगळे रोहिदास कुंभार माणिकराव झेंडे पाटील मंगेश घोणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे.त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू केला आहे.प्रथम पुरस्कार सक्षणा सलगर यांना देण्यात आला होता. दुसरा पुरस्कार डॉक्टर मेधा पुरव-सामंत यांना देण्यात आला होता.

या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी जेजुरी व परिसरातील नागरिक आजी-माजी महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी केले आहे.

प्रफुल्ल लोढाला हनीट्रॅपची सगळी माहिती:त्याच्याकडे सगळे व्हिडिओ, आमदार एकनाथ खडसे यांचा दावा

हनीट्रॅपची सिनेसृष्टीतही मोठी चर्चा

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी हनीट्रॅप प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी प्रफुल्ल लोढा नामक एका व्यक्तीचे नाव घेतले आहे. जळगावच्या प्रफुल्ल लोढा नामक कार्यकर्त्याकडे हनीट्रॅपची संपूर्ण माहिती आहे. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत.

राज्यात सध्या हनीट्रॅपच्या कथित प्रकरणामुळे राजकीय व प्रशासकीय गोटात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी काही आजी-माजी मंत्री तथा उच्चपदस्थ अधिकारी अडकल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीला हनीट्रॅपची संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या कालखंडात अनेक ठिकाणी हनीट्रॅपची प्रकरणे उजेडात येत आहेत. नाशिक येथील एक प्रकरणही नुकतेच समोर आले होते. या प्रकरणात 72 अधिकारी अडकल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुर आहे.

दुसरे प्रकरण प्रफुल्ल लोढा नामक जळगावच्या माणसाचे आहे. हा व्यक्ती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्याविरोधात अंधेरी व साकिनाका या 2 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा हा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे, त्यांना छळणे, ब्लॅकमेल करण्याचा आहे. तर दुसरा गुन्हा हा हनीट्रॅपचा आहे. प्रफुल्ल लोढा हा पूर्वी एक सामान्य कार्यकर्ता होता. अगोदर तो काँग्रेसमध्ये होता. नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. नंतर त्याने भाजपत प्रवेश केला. त्याच्या प्रवेश सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री कार्यालयाचे रामेश्वर नाईकही उपस्थित होते.

एक बटण दाबले की…

प्रफुल्ल लोढा, गिरीश महाजन व रामेश्वर नाईक या तिघांचे पूर्वी खूप चांगले संबंध होते. पण गतवर्षी लोढाने रामेश्वर नाईक व गिरीश महाजन यांच्याविरोधात एक तक्रार दाखल केली. त्यांचे चांगले संबंध अचानक का खराब झाले? असा सवाल उपस्थित होतो. याच प्रफुल्ल लोढाने एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओत त्याने, एक बटण दाबले की, संपूर्ण देशात हाहाकार माजेल. पण मी कुणाला तरी आई व वहिनी बोललो आहे, असे म्हटले होते, असे खडसे म्हणाले.

या प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडिओ आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असेही एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोढा यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात प्रफुल लोढा ‘मला पुरावे देण्याची गरज नाही, मला फक्त एक बटन दाबण्याचे काम आहे’, असे म्हणत थेट इशारा दिल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रफुल लोढा म्हणतात, मी 2 तारखेला जामनेर पोलिस स्टेशन, एसपी ऑफिस आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे, माझे स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी. कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे, यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळेच माझ्या जीवाला धोका आहे. मला 31 जुलै (2024) रोजी स्वतःला बालब्रह्मचारी म्हणवणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती प्रफुल लोढा यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या मोबाइलवर आलेले कॉल पण दाखवला.

पुढे बोलताना प्रफुल लोढा म्हणाले, गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की जर काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिस स्टेशनला द्यावे. मला पुरावे पोलिस स्टेशनमध्ये देण्याची गरज नाही. मला फक्त एक बटन दाबण्याचे काम आहे. परंतु, मी एक मनुष्य आहे आणि कोणाला वहिनी म्हटले आहे, कोणाला आई म्हटले आहे, कोणाला मुलगी म्हटले आहे. त्याची मर्यादा पाळून मी अजून चूप आहे. परंतु, ज्या दिवशी यांचे शंभर पाप पूर्ण होतील, मला त्या दिवशी आपल्या सगळ्यांची गरज लागणार नाही, असे प्रफुल लोढा यांनी यात म्हटले आहे.

राष्ट्रीय पांचभौतिक चिकित्सा परिषद संपन्न

पुणे

वैद्यराज दातार पांचभौतिक चिकित्सा व संशोधन केंद्र सांगली, आयडीआरए ,भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट वाघोली व सेंटर ऑफ एक्सलन्स, आयुष विभाग ,पुणे विद्यापीठ या चार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 20 जुलै रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पांचभौतिक चिकित्सा या आयुर्वेदातील विषयावरील दोन दिवसांची राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषद दिमाखात संपन्न झाली. यासाठी भारतभरातून 400 पेक्षा अधिक वैद्य ,विद्यार्थी , पदव्युत्तर विद्यार्थी ,संशोधक यांनी उपस्थिती दाखवली. धूतपापेश्वर, सांडू व इतर अनेक औषधी निर्माण कंपन्यांनी आपली संशोधनाभिमुख उत्पादने येथे सादर केली .
या परिषदेमध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.गोसावी ,
आयुष विभागाचे डॉ.भूषण पटवर्धन डॉ. कौस्तुभ उपाध्याय. आय टी आर ए च्या डायरेक्टर डॉ. तनुजा नेसरी, एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डॉ राकेश शर्मा बी एस डी टी या संस्थेचे प्रमुख डॉक्टर सदानंद सरदेशमुख तसेच मुख्य कन्व्हेनर वैद्य प्रशांत सुरू, वै.गिरीश टिल्लू ,वै. सुहास जोशी
वै. अशोक वाली, प्रकुलगुरू काळकर सर ,वै. राजेंद्र प्रसाद वै. वारियर हे उपस्थित होते .वैद्य आ.वा. दातारशास्त्री प्रणित पांच भौतिक चिकित्सेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्याचप्रमाणे त्यामध्ये वेगवेगळे संशोधन व्हावे आणि त्याचा जनसामान्यांसाठी उपयोग व्हावा असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या पांचभौतिक चिकित्सेच्या अनुषंगाने वैद्यक परिषदा आयोजित केल्या जातील असे संयोजकांकडून सांगण्यात आले. यावेळेस “पांचभौतिक चिकित्सा तत्त्व संग्रह” या संशोधनपर लेखांच्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

जनतेने ५ वर्षे सेवा करायला पाठवले , गुंडागर्दी,जातीयवाद करायला नाही

0

विधीमंडळात गुंड व गुन्हेगारांच्या हैदोसा विरोधात पुणे स्थित माजी आमदारांची संयुक्त पत्रकार परिषद

पुणे : आम्ही आहोत पुणे शहरात राहणारे माजी आमदार, आज आम्ही राजकारणात सक्रीय आहोत असा आमचा दावा नाही, पण कधीतरी आम्ही आमदार होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सदस्य म्हणून बसत होतो. आम्ही कोणत्या राजकीय पक्षातर्फे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसत होतो ही बाब गौण आहे. आमच्या काळात विधानसभेचे सभागृह राज्यातील सर्वोच्च पवित्र असे मुक्त संवादाचे, प्रामाणिक मतभेद व्यक्त करण्याचे तीर्थ स्थळ होते, हे सर्वोच्च सभागृह पूर्णपणे सुरक्षित होते, आता आमची इच्छाच मेली ! अशी उद्विग्न भावना पुण्यातील माजी आमदारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधीमंडळात गुंड व गुन्हेगारांच्या हैदोसा विरोधात पुणे स्थित ज्येष्ठ माजी आमदारांची युवक क्रांती दलाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या प्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी, ॲड. वंदना चव्हाण, ॲड. जयदेवराव गायकवाड,  बाळासाहेब शिवरकर, ॲड. एल. टी. सावंत,, संयोजक राहुल डंबाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या १२ ॥ कोटी जनतेने आपल्या मतदानाद्वारे विधानसभेत लोकांच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी २८८ लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात, त्यांनी लोकांच्या सुखदुःखाचे, भावनांचे, सोयी-गैरसोयीचे प्रतिनिधीत्व करायचे असते, या कर्तव्याचा आम्हाला सातत्याने जाणीव असायची, त्यासाठी आम्ही फक्त माध्यम आहोत, हे आम्ही लक्षात ठेवायचो. सभागृहाचे खरे मालक राज्यात राहणारे नागरिक आहेत, जनहिताला मारक कायदे या कायदेमंडळात संमत होणार नाहीत हे डोळयात तेल घालून पाहायचे, हे अल्पमतातल्या विरोधकांचे कामच असते, तसेच ज्यांनी विधीमंडळात बहु‌मत प्राप्त केले असेल, त्यांनी सरकार स्थापन करून जनहिताचे रक्षण करणे, जनताभिमुख धोरणे अंमलात आणून राज्याचा विकास करणे, ही कामे अपेक्षित असतात,

सध्या मात्र गंगा उलट्या  दिशेने वाहू लागली आहे. आमदार संवादापेक्षा एकमेकांना साता जन्माचे वैरी मानू लागले आहेत, आमदार गोपीचंद पडळकर हे सरकार पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात. ते मुख्यमंत्र्याचे खास, विशेष लाडके आहेत. सातत्याने विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना अर्वाच्य भाषेत लाखोली वाहणे हे त्यांच्यावर सोपविलेले काम ते निष्ठेने पार पाहत असतात, १६ जुलै २०२५ रोजी त्यांनी कळस गाठला, विधानसभेच्या सुरक्षित परिसरात ते नामचीन गुन्हेगारांना घेऊन आले, त्या गुंडांमार्फत विरोधी पक्षांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढविला, सारे आमदार या घटनेचे प्रेक्षक तर होतेच पण ही घटना कॅमेरात टिपल्यामुळे वृत्त वाहिन्यांमार्फत देशभर लोकांना याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य लाभले.

लोकशाहीचे मंदिर तोच उद्ध्वस्त करू शकतो, ज्याला लोकशाही अमान्य आहे, लोकशाही प्रणालीत सत्तारूढ पक्षाने विरोधी पक्षाला वैरी मानायचे नसते. परंतु महाराष्ट्राचे सरकार तिकडमबानी करून संधिसाधू प्रवृत्तींना एकत्र करून स्थापन झाले असल्यामुळे ते विरोधक संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, हे स्पष्ट झाले आहे. आजचे विधीमंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेणे आवश्यक असल्याचे दिसते.

रामदास फुटाणे म्हणाले,  आधी राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्यात आले जाता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी सरकार ताब्यात घेतलेले दिसते, विरोधी पक्षांच्या मुसक्या बांधलेल्या, अशा अवस्थेत लोकशाहीच्या पवित्र मंदिराला उद्‌ध्वस्त करणारांचा आम्ही एकमुखाने तीव्र निषेध करतो  आणि तो जनतेच्या कोर्टात नोंदवित आहोत. सध्या, लोकशाहीचे, प्रतिनिधीशाहीत रूपांतर झाले आहे, जनतेच्या प्रश्न वर आम्ही सभागृहात भान मात्र कुणाला मारणे किंवा मारनायर लोक पालन अ काळात नव्हते.  

ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, राज्याला आज गृहमंत्री आहेत की नाही असा प्रश्न पडत आहे, असतील तर कारवाई का होत नाही हा गंभीर पविषय आहे. राजकारण करणारे असे वागत असतील तर जनतेने काय करायचे. राज्यात शिक्षण, शेती, रोजगार हे गंभीर विषय आहेत मात्र विधिमंडळ मध्ये होत असलेल्या गोंधळात हे विषय मागे पडत चालले आहेत, परिणामी महाराष्ट्राची अधोगती होत असल्याचे दिसते.  

बाळासाहेब शिवरकर म्हणाले, आज सभागृहात महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे काम सुरू आहे. आमदारांच्या काही समस्या, तक्रार असतील तर त्या एका समिती मार्फत सोडवल्या जातात, आज सत्ताधारी आमदार कुणाला मारहाण करतात हे चित्र विदारक आहे. राज्याच्या संविधानिक सभागृहाने जनतेला दिशा देण्याचे काम करायचे असते याचा विसर आजच्या राजकीय मंडळींना पडला आहे का असा सवाल उपस्थित होतो असेही शिवरकर म्हणाले. .

रोटरी विज्डमच्या अध्यक्षपदी स्वाती यादव.

पुणे- रोटरी क्लब विज्डमच्या अध्यक्षपदी स्वाती यादव यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष निलेश धोपाडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सचिवपदी प्रशांत अकलेकर यांची निवड करण्यात आली. पुण्याई सभागृह कोथरूड यथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल संतोष मराठे. सहाय्यक प्रांतपाल अॅड.भूषण कुलकर्णी, रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष स्वाती यादव यांनी आगामी वर्षात ग्रीन स्कूल्स आणि ग्रीन एक्स्पो सारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांसह अॅनिमिया थॅलेसेमिया विषयक वैद्यकीय शिबिरे, मिलेट(नाचणी,बाजरी ज्वारी) शेतीस प्रोत्साहन, तसेच बोअरवेल रिचार्ज व पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आदी समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.

इनरव्हील डिस्ट्रीक्ट ३१३ च्या प्रांतपालपदी डॉ.आशा देशपांडे.

पुणे-सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील डिस्ट्रीक्ट ३१३ च्या प्रांतपालपदी डॉ आशा देशपांडे यांची निवड करण्यात आली. मावळत्या प्रांतपाल डॉ.शोभना पालेकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या माजी पास्ट इंटरनॅशनल इनरव्हील रिप्रेझेंटिव्ह चारू चिंचणकर, या समारंभाच्या कन्व्हेनर माजी प्रांतपाल सुनंदा हुल्याळकर, को कन्व्हेनर माजी अध्यक्ष शृणाली आपटे, संयोजक इनरव्हील पुणे अध्यक्ष माधवी पुरोहित,सचिव सुजाता जयवंत,ज्येष्ठ उद्योजक फतेचंद रांका आदी मान्यवरांच्या बरोबरच महाराष्ट्रातील सुमारे ६०० समाजसेवी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित प्रांतपाल डॉ.आशा देशपांडे यांनी इनरव्हीलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील गरजूंसाठी प्रकल्प राबवावेत असे सांगितले. ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते फतेचंद रांका यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर विषयी महिलांमध्ये जनजागृती,निदान व आवश्यकता असल्यास वैद्यकीय सहाय्य यात काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

अचूक वीजबिलासाठी टीओडी मीटर महत्वाचे, महावितरणची भूमिका

पुणे, दि. २१ जुलै, २०२५ – महावितरणकडून वीजग्राहकांना टीओडी (Time of Day) वीजमीटर मोफत बसविले जात आहेत. पुणे परिमंडलात आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ४ लाखांहून अधिक ग्राहकांना वीजमीटर बसविण्यात आले असून, त्यांचे अचूक वीजबिल तयार होत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अफवांना बळी न पडता सदरील मीटर बसविण्यास सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजग्राहकांना त्यांचे वीजबिल त्यांच्या वापरानुसार अचूक व वेळेत मिळावे ही अपेक्षा असते. त्यामुळे महावितरण देखील रिडींगसाठी नवनवीन तंत्रज्ञान स्विकारुन वीजबिल तयार करत असते. बदलत्या युगात बहुतांश गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसे वीजमीटरचे रिंडीग घेण्यासाठी लागणारा वेळ व त्यात होणाऱ्या मानवी चुका टाळण्यासाठी महावितरणने आता टीओडी मीटर बसविण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. महावितरणतर्फे हे मीटर मोफत बसविण्यात येत आहेत.

हे मीटर अत्याधुनिक आहेत. यात ग्राहकाला त्याचा वीजवापर मोबाईलमधून केंव्हाही व कोठूनही तपासता येतो. त्यासाठी ‘महाविद्युत’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. नवीन मीटरमुळे महावितरणला रिडींग घेण्यासाठी कोणा बाह्यव्यक्ती अथवा कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे ठरलेल्या तारखेला व काही क्षणांत मीटरची रिडींग ऑनलाईन प्राप्त होते. शिवाय ती अचूक असते. त्यामुळे वीजबिल विनाविलंब तयार होऊन ग्राहकाला उपलब्ध होते. तसेच सौरऊर्जेमुळे महावितरणला स्वस्त विजेची उपलब्धता दिवसा अधिक होत आहे. ही स्वस्त वीज ग्राहकांना दिवसा उपलब्ध करुन देण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे. कारण आता दिवसाच्या वीज वापरावर सूट दिली जाणार असून या मीटरमध्ये टीओडी (Time of Day) सुविधा देखील उपलब्ध आहे.

मीटर प्रीपेड नसून, पोस्टपेडच

दुसरी अफवा म्हणजे ही मीटर प्रीपेड आहेत त्यामुळे रात्री अपरात्री रिचार्ज संपल्यावर काय करायचे अशाही अफवा सोशलमिडीयावर येत आहेत. यातही तथ्य नाही. सदरचे मीटर पूर्वीच्या मीटरप्रमाणेच पोस्टपेड असतील. महिनाभराच्या वापरानंतर त्यांना नेहमीसारखेच घरपोच किंवा ऑनलाईन वीजबिल मिळणार आहे.

वीजबिल जास्त येत नाही- काकडे

महावितरण पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी म्हटले आहे कि,’ काही ठिकाणी नविन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच अनाठायी विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ज्या ग्राहकांना मीटरवर शंका आहे. त्यांनी महावितरणच्या विभागाशी संलग्न असलेल्या मीटर चाचणी कक्षात त्याची प्रत्यक्ष पडताळणी करु शकतात. इथे जुन्या व नवीन मीटरवर समान वीजभार टाकून ग्राहकाला मीटर तपासून देण्याची सोय आहे. त्यामुळे ऐकीव किंवा सोशल मिडीयावर आलेल्या अफवांना बळी पडू नये.