Home Blog Page 449

बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करा-सहायक आयुक्त विशाल लोंढे


पुणे, दि. २२: बेघर नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण असून रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केली
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रमाई आवास घरकुल निर्माण, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत जिल्हास्तरीय समिती, तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय तसेच अनुदानित वसतिगृह निरीक्षण समिती, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची आढावा बैठकीत ते बोलत होते.

श्री. लोंढे म्हणाले, समाज कल्याण विभागाच्यावतीने ९७३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्र, ८०५ मतदान कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून याबाबत पुणे जिल्हा देशात क्रमांक एकवर आहे. शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्याबाबत विशेष शिबीर आयोजित करावे. याकरिता सामाजिक संस्थेची मदत घ्यावी.
रमाई आवास घरकुल योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता विशेष मोहीम राबवावी. लाभार्थ्यांचे घरकुलाबाबत एका महिन्यात प्रस्ताव सादर करावे. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक करिता विरंगुळा केंद्राची स्थापना करावी. केंद्राकरिता जागा उपलब्धतेकरिता प्रशासनाने स्थानिक लोकोप्रतिनिधीशी समनव्य साधावा. ज्येष्ठ नागरिकांच्या पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त तक्रारीचे पोलीसाने प्राधान्याने निराकरण करावे. आरोग्य विभागाने त्यांना उपचार वेळेत मिळेल यादृष्टीने कार्यवाही करावी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ९ जुलै २०१८ रोजीच्या धोरणाची अंमलबजावणी करुन ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्याची कार्यवाही करावी.
शासकीय आणि अनुदानित वसतिगृहामधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोई-सुविधांबाबत त्यांच्याशी चर्चा करुन अडीअडचणीचे निराकरण करावे. भाड्याच्या जागेवर असलेल्या इमारती शासकीय जागेवर बांधण्याचे नियोजन असून जागांबाबत संबंधित विभागाने पाठपुरावा करावा.
जिल्ह्यातील साखर कारखान्याने संबंधित ग्रामसेवकाशी समन्वय साधून ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात यावे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. तसेच कामगारांना नियमितपणे अन्नधान्य मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना श्री. लोंढे यांनी दिल्या.
यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, साखर कारखान्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.
0000

अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ केले रेकॉर्ड घरात व बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे-पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरे बसवले. या कॅमेराच्या माध्यमातून या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीवर नजर ठेवणे सुरू केले. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या अंघोळीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल देखील केले. यानंतर पत्नीने आपल्या क्लास वन अधिकारी पतीसह सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत क्लास वन अधिकारी त्याच्या पत्नीकडून माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्यासाठी दीड लाखांची मागणी करत मानसिक छळ करत असल्याचे अधिकारी पत्नीने सांगितले. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

सन 2020 मध्ये पीडितेचा संबंधित क्लास वन अधिकाऱ्यासोबत विवाह झाला होता. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत आणि आनंदात सुरू झाला. मात्र काही काळातच पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे वागणे अधिक त्रासदायक बनत गेले. पती वारंवार पैशांची मागणी करत होता आणि त्यासाठी पत्नीवर मानसिक दबाव टाकत होता. यासोबतच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने घरात गुप्त स्पाय कॅमेरे बसवले.ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या पत्नीवर हा अधिकारी आपल्या पत्नीवर नजर ठेवायचा. इतकेच नव्हे तर या अधिकाऱ्याने बाथरूममध्ये देखील स्पाय कॅमेरे बसवले. या माध्यमातून पत्नीचे अंघोळीचे व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले असल्याचे समोर आले आहे. अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. तसेच गाडी आणि घरच्या हप्त्यासाठी दीड लाख रुपये माहेरून घेऊन येण्यासाठी जबरदस्ती सुरू केली.

आपल्याला पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याचा आरोप करत त्या पत्नीने पोलिसात धाव घेतली आहे. यामध्ये स्पाय कॅमेराच्या व्हिडीओंचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

फर्ग्युसन रस्त्यावर रात्री उशीरा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या बाहेरील लोकांवर कारवाई करा-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

पुणे, दि. २२ जुलै, २०२५ : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा शहराची शान असणारा भाग आहे. अलीकडच्या काळात या ठिकाणी रात्री उशिराने येऊन बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. हे विक्रेते बाहेरील लोक आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. देशातील कुठल्यातरी राज्याच्या नावावर बेकायदेशीररीत्या भारतात आलेले आणि पुणे शहरात फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांमुळे सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यांना विरोध केला जायलाच हवा, असेही त्यांनी नमूद केले.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिरोळे यांनी उपस्थित केलेल्या शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिरोळे बोलत होते.  

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर रात्री नऊ नंतर वेगळेच लोक येऊन लहान खोक्यांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करत असतात, हे लोक स्थानिक नसून बाहेरून आलेले आहेत. इथे विक्री करण्याचा व्यवसाय ते बेकायदेशीरपणे करत आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आपण महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त या दोघांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली असल्याचे शिरोळे यावेळी म्हणाले.

शिवाजीनगर बसस्थाकाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिरोळे म्हणाले, बसस्थानकाच्या विकासाचे काम हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सुरु आहे. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट लिझ जर अधिक काळ ठेवता आले, तर त्याचा फायदा होणार आहे. सध्या त्यावर काम सुरु असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना हे काम रेंगाळले होते. आपण या कामात कोणताही खोडा घालत नसून हे काम मार्गी लावण्याचे पूर्ण प्रयत्न करत असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.

पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेल्या पुलापैकी एका पुलाचे म्हणजे राजभवनापासून ते ईस्क्वेरकडे येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या महिन्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या पुलाचे काम देखील अंतिम टप्यात आले असून ते देखील लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. शिवाजीनगर येथील आकाशवाणी चौकातील मेट्रोचा खांब हा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे, त्यामुळे त्यावर कोणता पर्याय काढता येईल, यावर चर्चा सुरु असून त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधायक चर्चा झाल्या, चांगल्या प्रकारचे निर्णय या वेळी घेण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.

पुण्यामध्ये ओव्हरहेड केबलचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, त्यामुळे सरकारने त्याबाबतचे डक्ट पॉलिसी तयार करून त्याची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा शिरोळे यांनी अधिवेशनात लावून धरला होता. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी समितीची स्थापना करून सरकार धोरण निश्चित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे मेडिकल टुरिझम हब म्हणून विकसित करण्याची सूचना शिरोळे यांनी सरकारकडे केली. त्याचबरोबर पुणे हे डिफेन्स स्टार्टअप आणि उत्पादन केंद्र म्हणून सरकारने जाहीर करण्याची मागणी आणि अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या धरती वर गहुंजे येथे कॉन्सर्ट अरीना करावा अशी सूचना शिरोळे यांनी अधिवेशनात केली होती.

शहरांमध्ये अंडर फ्लायओव्हर रिडेव्हलपमेंट पॉलिसी करावी, शहरात अन्नधान्य वितरणात होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी पुण्यामध्ये पूर्णवेळ अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याची नेमणूक, सायबर गुन्ह्याचा वाढता धोका लक्षात घेता शहरात पाच ठिकाणी सायबर पोलीस ठाणी निर्माण करण्याच्या प्रस्तावाला सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी, ऑनलाइन दाखले मिळण्यात विलंब होतो आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये अडचण येते या करिता राज्य शासनाची वेबसाईटची क्षमता वाढवावी अशी मागणी,  शहरातील टेकड्यांवर टाकण्यात येणाऱ्या राडा रोडा थांबवण्यासाठी एक सर्वेक्षण करून असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवताना त्याची देखभाल करण्याची यंत्रणा देखील उभी करण्यात यावी,  खाजगी जागेतील झाडांच्या फांद्या महानगरपालिकेकडून सवलतीच्या दारात तोडून मिळाव्यात अशा अनेक मागण्या अधिवेशनादरम्यान केल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.

कार्यतत्पर मंत्री महोदय जरा यांच्या बेशिस्त कारभारावर काहीतरी करा- संदीप खर्डेकरांकडून मोहोळांना विनंती

त्यांना मराठी बोलायला शिकवा

पुणे- महाराष्ट्राचे नायक देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस जोमाने आणि उत्साहाने साजरा करता करता पुण्यातील भाजपचे जुने जनते कार्यकर्ते आणि प्रवक्ते ज्यांची चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळख आहे त्यांनी आजच केंद्रीय राज्यमंत्री असलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावे एक पत्र प्रसिद्धीस दिले आहे … आणि कार्यतत्पर मंत्री महोदय जरा इंडिगो चा कारभारावर अधिकाऱ्यांना धारेवर धरा जणू अशाच आशयाची मागणी केली आहे. वाचा नेमके पत्र .. जसेच्या तसे त्यांच्याच शब्दात ….

मा. ना. मुरलीधरअण्णा मोहोळ,
केंद्रीय नागरी उड्डाण व सहकारिता राज्यमंत्री.
विषय – “इंडिगो” च्या सेवेतील त्रुटी बाबत….
मा. महोदय,
आपण एक कार्यतत्पर मंत्री आहात अशी आपली ख्याती आहे.

सध्या वारंवार इंडिगो विमान सेवेबाबत माध्यमातून वाचायला मिळत आहे व अनेकदा उड्डाणं झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे पुन्हा लँडिंग झाल्याच्या बातम्या देखील येत आहेत.
मी ह्या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की त्वरित इंडिगो च्या प्रमुखांची बैठक आयोजित करावी व सामान्य प्रवश्यांच्या तक्रारी दूर कराव्यात.
मला स्वतःला गैरसोयींचे आलेले काही अनुभव याठिकाणी नमूद करत आहे…
1) इंडिगो च्या विमानाने 13 जुलै ला नैरोबी साठी उड्डाण केल्यावर माझे आसन हे मागे जात नव्हते, महत्प्रयासाने हवाईसुंदरींनी ते रिलेक्स अवस्थेत करून दिले व विमान नैरोबीला उतरताना देखील त्यांनीच पुढे प्रयत्नपूर्वक करून दिले. काल रात्री नैरोबी ते मुंबई उड्डानादरम्यान पण असाच अनुभव आला व हवाई सुंदरीने खूप प्रयत्न करून देखील ( सीट नंबर E 23) त्यांना जमले नाही व त्यांनीच मला तक्रार करायला सांगितले. त्यामुळे विमानाच्या देखभालीचा (मेंटेनन्स) विषय ऐणीवर आला आहे.
2) काल नैरोबी येथून इंडिगो ने प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरलो असता baggage belt वर बॅग घेण्यास गेलो असता बहुतांश बॅग ह्या पावसात भिजलेल्या आढळून आल्या, त्या भिजू नयेत याची संबंधित कंपनीने दक्षता घेणे गरजेचे वाटते.
3) आपल्याला कल्पना असेल की विमानाच्या लँडिंग च्या वेळी झटके बसून प्रवाश्यांचे डोकं आपटू नये म्हणून ही काळजी घेतली जाते त्यासाठी खुर्ची पुढे घेण्यासाठी विमान कंपन्या प्रचंड आग्रही असतात.
4) विमान कंपनीचे पोर्टर म्हणजे बॅग भरून विमानात ठेवणारे व नंतर काढून बॅगेज बेल्ट वर सोडताना ते नीट हाताळणी करत नाहीतव त्यातून बॅग खराब होणे, महागड्या बॅग ला पोचा पडणे असे प्रकार घडतात, त्यामुळे हाताळणी नीट करण्याबाबत विमान कंपन्यांना समज द्यावी.
5 ) 21 सप्टेंबर 2024 ला माझ्या नातेवाईकांना आलेला अनुभव तर अत्यंत क्लेशकारक असून त्यांची केवळ बॅग नादुरुस्त झाली असं नव्हे तर तर बॅगेतील नेकलेस देखील गायब झाले. याबाबत आपणाकडे तक्रार केल्यावर इंडिगो ने अवघे 2000 रुपये बॅगेची नुकसानभरपाई देणे मान्य केले व नेकलेस बाबत मात्र जबाबदारी झटकली. त्यामुळे ह्याबाबत ही संबंधित कंपनीला समज द्यावी व यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी दक्षता घेण्यास सांगावे.
6) पैसा कमविण्याच्या नादात संबंधित विमान कंपनी ऑनलाईन सीट कन्फर्मेशन करताना खिडकीच्या किंवा पुढच्या पसंतीच्या सीट साठी अतिरिक्त पैसे मागते इथपर्यंत ठीक आहे मात्र विमानतळावर चेक इन करताना नवरा बायकोला वेगवेगळ्या सीट दिल्या जातात ह्यात बदल व्हायला हवा. मला ही मुंबई नैरोबी प्रवासात हाच अनुभव मुंबई विमानतळावर आला. तेथील इंडिगो प्रतिनिधी अंजली चौधरी यांनी ह्या लांबच्या प्रवासात मला व पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणचे आसन क्रमांक दिले, त्यांना विनंती केली असता “मी काही करू शकत नाही, तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा, सह प्रवाश्यशी बोलून जागा बदलून घ्या” अशी दुरुत्तरे केली.
तरी ह्या प्रक्रियेत बदल व्हावा ही आग्रही विनंती.
तसेच प्रवासादरम्यान त्यांचे कर्मचारी मराठीत बोलत नसल्याचेही निदर्शनास आले, किंबहुना त्यांच्या विमानांतर्गत उदघोषणेतही मराठी चा वापर दिसून येत नाही.किमान महाराष्ट्रात येणाऱ्या वा जाणाऱ्या विमानातून एका कर्मचाऱ्याने तरी मराठी बोलावे अशी अपेक्षा आहे. याबाबत ही योग्य सूचना द्याव्यात ही विनंती.

आपला,
संदीप खर्डेकर.
मो – 9850999995

शिरुर येथील वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे दि. 22 : शासकीय मुलींचे वसतिगृह गोलेगाव रोड, शिरुर या वसतिगृहात प्रवेश घेण्याकरिता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करुन अधिकाधिक विद्यार्थीनींनी या संधीचा लाभ घ्यावा.
इयत्ता 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनु.जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय, वि.मा. प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील विद्यार्थीनींनी अर्ज करावे. या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरूण पांघरून व दरमहा निर्वाह भत्ता इ. सोयी सुविधा देण्यात येतात.
अधिक माहितीसाठी मुलींचे शासकीय वसतिगृह शिरुर येथे कार्यालयीन वेळेत अधीक्षिका- 9011461232, कार्यालयीन सहाय्यक – 9022771564 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकान्वये गृहपाल श्रीमती ए. एस. सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी निधीमधून शिष्यवृत्ती योजना

पुणे दि. 22 : जिल्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा यांच्या पाल्यांना सन 2024-25 मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून 10 वी, 12 वी व पदवी परिक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहेत अशा सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून संबंधितांनी त्यांचे पाल्यांचे अर्ज 15 ऑक्टोबर 2025 पूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन ले. कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार

0

पुणे दि. 22 :- विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एकरकमी विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार प्राप्त केलेले, सन 2024-2025 मध्ये इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळविणारे, यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळविणारे, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळविणारे सर्व माजी सैनिक पत्नी, पाल्य या पुरस्कारासाठी पात्र असतील.
विशेष गौरव पुरस्कार मिळणेबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे अर्ज 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत सर्व कागदपत्रासह जिल्हा सैनिक कार्यालय, पुणे येथे सादर करावेत असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. ( नि.) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता प्रयत्न गरजेचे-क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २२: देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनासाठी राज्यशासनाच्यावतीने देशी गाय संशोधन केंद्राला ७३ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला असून आगामी काळातही याकामी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहा’च्या समारोपप्रंसगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दराडे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने आदी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, देशी गायी बाबत समाजात प्रेम, आत्मयिता असून ग्रामीण भागात महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे देशी गायीबाबत आज विविध ठिकाणी संशोधन होत आहेत. आगामी काळ हा कृषी क्षेत्राला अनुकूल असून कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेती तसेच देशी गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम करावे. पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीत वाढ होते, त्यामुळे देशी गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करण्यासोबतच त्याचे मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचे काम करावे, असेही श्री. भरणे म्हणाले.

श्री. बनसोडे म्हणाले, देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमातून विविध देशी गाईबाबत माहिती मिळाली. त्यामुळे आगामी काळात विविध गोशाळेला भेटी देऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या कामकाजाविषयी माहिती घेण्यात येईल, असेही श्री. बनसोडे म्हणाले.

श्री. मुंदडा म्हणाले, महाराष्ट्र गोसेवा आयोगाला स्थापन होवून दोन वर्ष झाली असून गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोवंश परिपोषणासाठी प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये आणि प्रत्येक तालुक्यात एका गोशाळेला देशी गोवंश निवाऱ्याकरिता १५ ते २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. आज सर्वत्र देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करण्यात येत आहे. गोसेवा आयोगाच्यातीने गोवंश संवर्धनाकरिता गोसंवर्धन, गोसंगोपन, गोसंरक्षण, गोमयमुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोआधारित शेती, गोपालक, गोसाक्षरता आणि गोपर्यटन या संकल्पनेवर आधारित ‘गो-टेन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. देशी गोवंश संगोपन, संवर्धनाकरिता महाराष्ट्र गोसेवा आयोग कटीबद्ध आहे, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. मुंदडा यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

शरद पवारांकडूनही फडणवीसांचे तोंडभरून कौतुक, म्हणाले – त्यांना पाहून माझा पहिला कार्यकाळ आठवतो

देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट:फडणवीस थकत कसे नाहीत? असा प्रश्न मला पडतो

मुंबई-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, नेहमी वैचारिक मतभेद असलेले आणि परस्परांवर टीका करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या निमित्ताने फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांना पाहून मला माझा मुख्यमंत्रीपदाचा पहिला कार्यकाळ आठवतो, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे.

गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकात शरद पवारांनी फडणवीस यांच्याविषयी विशेष लेख लिहिला असून, त्यात त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे, नेतृत्वगुणांचे आणि धैर्याचे मन:पूर्वक कौतुक केले आहे.

नेमके काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणतात, दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे! अन् बोलायचंच म्हटले तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, हे कसे काय नाकारता येईल? देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला ‘मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो’ तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो.

शरद पवार यांनी म्हटले की, क्रियाशील राहण्याकरीता प्रकृती शिडशिडीत असावी, असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ‘ते थकत कसे नाहीत?’ असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणे, उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे हे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे.

देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसताना देखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यांनी केलेल्या कामांचा ऊहापोह कॉफी टेबलबुकमध्ये होईलच. परंतु, मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावरील मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो, असेही पवार यांनी म्हटले आहे.

कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा. जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असे सांगितले आहे. कौटिल्याची योगक्षेम या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्य प्राप्ती नाही तर जनहित आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय आखाड्याबाहेरील क्षितीजे अधिकाधिक पार करावीत, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या हातून व्यापक जनहिताची कार्ये पार पडतील, देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याकरिता माझ्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा वाढदिवासानिमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद, असे शरद पवार यांनी या लेखात म्हटले आहे.

ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांचे भरभरून कौतुक,म्हणाले.. गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी,त्यांना भविष्यात केंद्रात मोठी संधी मिळणार

0

अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने आव्हानांचा सामना

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कौतुकाने. देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी अशा शब्दांत ठाकरेंनी स्तुती केली.

गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकमध्ये शरद पवार, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे यांसह अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे आणि कामगिरीचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत भावनिक आणि राजकीय दोन्ही अंगांनी महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत. देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला आणि वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. ही उपलब्धी त्यांच्याप्रारंभिक काळातील धडाडी आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष देते. त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि कायदेशीर, आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळे ठरवते. त्यांनी कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनात डिप्लोमा मिळवला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे पुस्तक ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे त्यांच्या जटिल विषयांना साध्या भाषेत मांडण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. नझूल जमिनीच्या नूतनीकरणासारख्या प्रश्नांवर त्यांनी तीव्र लढा दिला आणि कामगार, झोपडपट्टीवासीय यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. 2014 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांनी राजकीय कारकीर्दीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड दिली.

ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मराठी पुस्तके लिहिली, ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे. त्यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता, ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय संस्कार खोलवर झाले. या पार्श्वभूमीवरही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांना पाठिंबा दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपा युती सरकारने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे राबवली.

देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कारकीर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला आहे. फडणवीस यांच्या 2014-2019 च्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सारख्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या, ज्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढली.

फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू, आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!

2006 मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरण:काल दोषींची निर्दोष सुटका,आज सरकार सुप्रीम कोर्टात …

मुंबई- २००६ च्या मुंबईतील साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील केले होते.२१ जुलै रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने म्हटले की, सरकारी वकील आरोपींविरुद्धचा खटला सिद्ध करण्यात अपयशी ठरले.२०२३ मध्ये निवृत्तीनंतर ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या वतीने बाजू मांडली. ओरिसापूर्वी ते दिल्ली, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश होते.बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांचा न्यायालयात युक्तिवाद असा होता की, पोलिस आयुक्तांना दिलेले आरोपींचे जबाब सारखेच आहेत. त्यांचे शब्दही सारखेच आहेत. काही ठिकाणी प्रश्नांचे आकडे उलटे करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त या उत्तराने समाधानी असतील, परंतु न्यायालयाचे समाधान झाले नसावे.

उच्च न्यायालयाने म्हटले की, आरोपींनी गुन्हा केला आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, म्हणून त्यांना निर्दोष सोडण्यात येत आहे. जर ते इतर कोणत्याही प्रकरणात नको असतील तर त्यांना तात्काळ तुरुंगातून सोडण्यात यावे.न्यायालयाच्या आदेशानंतर, सोमवारी संध्याकाळी १२ आरोपींपैकी दोघांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले. यामध्ये एहतेशाम सिद्दीकी यांचा समावेश आहे, ज्याला २०१५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.दुसरा आरोपी मोहम्मद अली जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. १२ पैकी एक असलेला नावेद खान हा नागपूर तुरुंगातच राहणार आहे. कारण तो हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अंडरट्रायल आहे.

‘हनी ट्रॅप’ प्रकरण पोहोचले पुण्यापर्यंत ? लोढा वर बलात्काराचा गुन्हा दाखल

नवऱ्याला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बालेवाडी येथील हॉटेलमध्ये बलात्कार, लोढावर मुंबईत अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे-‘हनी ट्रॅप’ प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या प्रफुल्ल लोढाविरुद्ध पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रफुल्ल लोढाने माझ्या नवऱ्याला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले, असा आरोप या महिलेने केला आहे. ही घटना 27 मे 2025 रोजी रात्री 8च्या सुमारास बालेवाडी येथील पुणे – बंगळुरू महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घडल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, संशयित प्रफुल्ल लोढा याने पीडित महिलेस पतीला नोकरी लावतो, असे सांगून 27 मे 2025 रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील हॉटेलमध्ये बोलावले. पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात शरीरसंबंध ठेवू दे, अशी मागणी केली. महिलेने याला नकार दिला, तेव्हा “तुझीही नोकरी घालवतो,” अशी धमकी देत जबरदस्तीने पीडिताशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी पीडित महिलेने 17 जुलै रोजी बावधन पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या घटनेच्या काही दिवस आधीच प्रफुल्ल लोढाविरुद्ध मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये दोन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. दोन्ही घटनांमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, धमकी, डांबून ठेवणे, आणि अश्लील फोटो काढण्याचे गंभीर आरोप आहेत.

साकीनाका पोलिस ठाण्यात 3 जुलै रोजी लोढावर ‘पोस्को कायदा’, बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 5 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली. यानंतर 14 जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘हनी ट्रॅप’सह ‘पोस्को’ कायद्याअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंमत असेल तर मुलाच्या मृत्युसंदर्भात सीबीआय चौकशी करा:एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना आव्हान

खडसे म्हणाले, महाजनांचे डोके फिरलेले दिसतंय,हनीट्रॅप प्रकरणी फडणवीसांनी एसआयटी स्थापन करावीएकनाथ खडसे पुढे म्हणाले, प्रफुल्ल लोढावर आत्ताच कसे गुन्हे दाखल व्हायला लागले? मुंबईती साकीनाका आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. हे गुन्हे एकाच डीएसपीच्या अंतर्गत कसे दाखल होतात? त्याच तारखांच्या दरम्यान पुण्यातही एक गुन्हा दाखल होतो. कुठल्या महिला आहेत? हे कळत नाही. एफआयआरची कॉपी मागितली तर मिळत नाही. हे सर्व चाललंय का? सध्या लोढावर वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत, तीन ठिकाणी हनी ट्रॅफ प्रकरणात लोढावर गुन्हे दाखल आहेत.

गिरीश महाजन हनीट्रॅपमध्ये असल्याचा संशय – खडसे….गिरीश महाजन हॉटेल ट्रायडन येथे माझे तीन महिने पाय धरत होते असे प्रफुल लोढा यांनी म्हटले आहे. नेमके काय आहे ट्रायडेंट हॉटेल प्रकरण? असा प्रश्न विचारला असता, हनी ट्रॅपमधे गिरीश महाजन आहे, असा माझा संशय असल्याचे खडसे यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री यांच्याबाबत माझा राग नाही. नाशिकमधील व्यक्ती त्यांना माहिती आहे, हॉटेल देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांनी याची चौकशी करावी, तात्काळ एसआयटी नेमा अशी माझी मागणी आहे, असेही खडसेंनी पत्रकार परिषदेत म्हटले.

जळगाव : सध्या चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रफुल लोढा याच्या संदर्भाने भाजप नेते गिरीश महाजन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या दोघांमध्ये जुंपली आहे. गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपचे आरोप असणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा दाखला देत खडसेंवर त्यांच्या मुलाला संपवल्याचा आरोप केला होता. आता, महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली. हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खडसेंनी केली आहे.त्याबरोबर हनी ट्रॅप प्रकरणामुळे महाजनांचे डोके फिरलेले दिसतंय असेही ते म्हणालेत .

एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन आज सरकारमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा झाल्याचे लोक म्हणतात. त्यामुळे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या मुलाच्या मृत्युसंदर्भात चौकशी करावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले. पोलिसांकडून माझी एकदा चौकशी झालेली आहे. पण पोलिस यांची चौकशी करणार नाही. म्हणून माझ्या मुलाच्या मृत्युसंदर्भात सीबीआय चौकशी करा.

खडसे पुढे म्हणाले, यांचे डोके फिरलेले दिसतंय. माझा एकुलता एक मुलगा गेला. त्याचे दु:ख अजून माझ्या मनातून गेलेले नाही. गिरीश महाजनला मुलगा नसल्यामुळे मुलाचे दु:ख काय असते ते समजू शकणार नाहीत. त्यामुळे माझ्यावर बेछुट आरोप करत आहेत. तुमच्यात ताकद असेल, हिंमत असेल, सरकार खरंच तुमचे ऐकत असेल, तर सीबीआयकडून चौकशी करून सत्य काय आहे ते बाहेर काढा. वारंवार हवेत वाफा का सोडत आहात, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली.

एकनाथ खडसे हे आजारपण व सर्वदूर अपयश यामुळे द्वेषभावनेने पछाडले गेलेत. त्यांची मानसिकताच खराब झाली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. यावरही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्रजींविषयी मी कधी आक्षेपार्ह बोललोच नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले. हनीट्रॅप आणि बलात्कार प्रकरणाची चौकशी खालचे अधिकारी करणार नाहीत. त्यांच्यावर दबाव येईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी. मुख्यमंत्री हे महिलांच्या बाबती संवेदनशील आहेत, हे मी तीन दिवसांपासून सांगत आहे. मुख्यमंत्र्यासोबतचे असल्यामुळे महाजनांवर संशय घ्यायचा असे काही नाही. जे सत्य आहे ते बाहेर आणले पाहिजे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंनी स्वतःच्या मुलाला संपवले:प्रफुल्ल लोढाने केला होता आरोप, महाजनांनी करून दिली आठवण

मुंबई-भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. या प्रकरणी त्यांनी हनी ट्रॅपचे आरोप असणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा दाखला देत खडसेंवर त्यांच्या मुलाला संपवल्याचा आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांनीच आपल्या मुलाचा खून केला असे याच लोढाने सांगितले होते, असे ते म्हणालेत.एकनाथ खडसे यांनी सोमवारी हनीट्रॅप प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. जळगावच्या प्रफुल्ल लोढा नामक एका व्यक्तीकडे हनी ट्रॅपची संपूर्ण माहिती आहे. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्याविषयी काय बोलावे? त्यांना सर्वदूर अपयश आले आहे. ते सत्तेपासून दूर फेकले गेलेत. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी लोटांगण घातले. पण कुणीही त्यांना पक्षात घेतले नाही. आजारपण व सर्वदूर अपयश यामुळे ते द्वेषभावनेने पछाडले गेलेत. त्यांची मानसिकताच खराब झाली आहे. मी प्रफुल्ल लोढा यांचा खडसेंसोबतचाही एक फोटो दाखवतो.

एकनाथ खडसे यांचे सुपुत्र निखील खडसे यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी हाच प्रफुल्ल लोढा काय बोलला होता? काय – काय बरळला होता? आता खडसे म्हणतात लोढाची एसआयटी चौकशी करा. असे असेल तर या लोढाने निखील खडसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर आले पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला असे याच लोढाने सांगितले होते. त्यावेळी मी खडसेंसोबत होतो. मला त्यावर भाष्य करायचे नाही. मी त्या लेव्हलचा माणूसही नाही. पण त्यांनी बोलताना थोडे तारतम्य बाळगले पाहिजे, असे गिरीश महाजन म्हणाले

प्रफुल्ल लोढाने काय केला होता दावा? गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढाचा एक जुना व्हिडिओ समोर आणला आहे. या व्हिडिओत प्रफुल्ल लोढा म्हणतो, माझा मित्र स्वर्गीय निखील भाऊ खडसे याने आत्महत्या केली. परंतु मला शंका आहे की, त्याच्या व्यसनामुळे एकनाथ खडसे यांची बदनामी होत होती. म्हणून या निखीलने आत्महत्या केली की, काही काळबेरे एकनाथ खडसेंनी केले? याची चौकशी होण्याची गरज आहे. मी या प्रकरणी न्यायालय, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, शरद पवार, राष्ट्रपती, राज्यपाल या सर्वांकडे मागणी करणार आहे.

निखील खडसेंनी केव्हा केली होती आत्महत्या? एकनाथ खडसे यांचे सुपुत्र निखील खडसे यांनी 1 मे 2013 रोजी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली होती. यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. निखील खडसे यांनी विधानपरिषेदची निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केले होते.

गदिमांप्रमाणे कोथरुडमध्ये सुधीर(बाबूजी) फडके यांच्या स्मारकाचा प्रस्ताव तयार करा!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची मनपा आयुक्तांना सूचना

पुणे:गदिमांप्रमाणे कोथरूड मध्ये सुधीर फडके अर्थात बाबूजींचे स्मारक उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने गीतरामायणाचे कवी ग. द. माडगूळकर यांचे स्मारक कोथरुड मध्ये उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गीतरामायणाचे संगीतकार असलेल्या सुधीरजी फडके यांच्या कार्यास साजेसे स्मारक कोथरुडमध्ये झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. या दोन महान शिल्पकारांची स्मृती जतन करण्याची संधी यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेला मिळणार आहे. चांदणी चौक परिसर रस्ते विकासामुळे आणि बंगलोर-मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोथरुडजवळूनच जात असल्यामुळे हे स्मारक कोथरुड परिसरातच होणे आवश्यक वाटते.

यामुळे शहरातील वाहतुक या अडचणीशिवाय संपूर्ण राज्यातील आणि देशभरातील रिसकांना तसेच मान्यवर मंडळींना या दोन्ही स्मारकांमध्ये जाणे सोयीचे होईल. महाराष्ट्रातील आणि विदेशातील सुद्धा लक्षावधी रिसकांकडून पुणे महानगरपालिकेच्या या सांस्कृतिक कामाची नोंद घेतली जाईल. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुधीरजी फडके यांचे उचित स्मारक कोथरुडमध्ये उभे करण्याबाबत आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचना ना. पाटील यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.