Home Blog Page 448

गुन्हेगारीला पूर्णपणे गाडून टाकू -पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गरजवंत ५०० विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य

पुणे : पोलीस दल संपूर्ण कार्यक्षमतेने शहराला शिस्तीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वांचे प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत आहे. यामुळे आम्ही पुढील काळात गुन्हेगारीला पूर्णपणे गाडून टाकू, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. 

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये सदाशिव पेठेतील महाराष्ट्र विद्यालयातील गरजवंत ५०० विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. यामध्ये ३ हजार फुलस्केप वह्या आणि ५०० पॅड चा समावेश आहे. 

कार्यक्रमाला सद्गुरू मनोहर भोसले, राज्याच्या अंमलीपदार्थ विरोधी फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार पाटील, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, उद्योजक रवींद्र लुंकड, युवा उद्योजक संग्राम मुरकुटे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह लुंकड परिवार उपस्थित होता. आर.के.लुंकड हौसिंग फर्म चे संचालक रमणशेठ लुंकड यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले. 

अमितेश कुमार म्हणाले, धार्मिकतेसोबत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे केले जाते, ही कौतुकास्पद बाब आहे. समाजातील गरजवंतांसाठी अशा प्रकारचे कार्य व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील सुरु आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव
गुरुवार, दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

वीर जिवाजी महाले यांचे कार्य समाजाला आदर्श प्रेरणास्रोत-गणेश बिडकर

पुणे:प्रतापगडावरील रणसंग्रामाच्या वेळी छत्रपती शिवरायांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आपले अनमोल योगदान देणारे शूरवीर जिवाजी महाले यांचे कार्य सर्व समाजाला आदर्श प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन पुढे मनपाचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केले. बारा बलुतेदार समाज विकास संघ आणि सकल नाभिक समाज यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. रास्ता पेठ येथील वीर शिवाजी महाले स्मारकाचे रंगकाम आणि प्रकाश योजनेचे काम लोकार्पण करण्याचा कार्यक्रम गणेश बिडकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत पूजन करीत तसेच नारळ वाढवत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारा बलुतेदार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी होते. यावेळी व्यासपीठावर माथेरानचे नगरसेवक आकाश चौधरी,सौ अनिता गणेश वाळुंजकर, प्रदेश सचिव राजेंद्र पंडित,प्रभारी शहराध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष उदय दैठणकर विनायक लांबे, प्रमुख व समान वेळेत हेमंत श्रीखंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान गणेश बिडकर व रामदास सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती व शाल,गुलाबपुष्प देऊन संपन्न झाला. याप्रसंगी रामदास सूर्यवंशी यांनी वीर जिवाजी महाले,वीर भाई कोतवाल आणि वीर शिवाजी काशीद यांच्या स्मारकासाठी पुणे मनपातर्फे भरीव निधी देण्याची मागणी केली. तसेच भोर येथील कारी येथे होणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली. प्रतापगडावर होणाऱ्या स्मारकामध्ये वीर जिवाजी महाले यांचे स्वतंत्र दालन उभे करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उदय दैठणकर यांनी नाभिक व बारा बलुतेदार समाजाला आगामी निवडणुकीत संधी भाजपासह सर्व राजकीय पक्षांनी दिली पाहिजे कारण या समाजांतील कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहात आणल्याशिवाय त्या त्या समाजाचा विकास करताना त्यांचा सहभाग त्यामध्ये असेल व त्यातून सर्वांगीण विकास साधला जाईल असे ते शेवटी म्हणाले.
पुणे मनपा विद्युत विभागाचे सुनील कांबळे यांचाही प्रकाश योजना सुरु केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय दैठणकर,हेमंत श्रीखंडे,राजेंद्र पंडित,सुनील शिंदे,परशुराम काशीद,विनायक गायकवाड,प्रशांत गायकवाड,सुजीत मगर,रवींद्र मावडीकर,राजू माटे,विनोद माटे,सुजीत पुजारी, प्रशांत वाणी,उदय तुपे, संदीप दळवी,सोहंम सूर्यवंशी,अमोल थोरात, किशोर पवार,बबनराव काशीद,बाळासाहेब भामरे,वसंत गाडेकर,गोविंद वाघमारे, अशोक चटपल्ली, तुकाराम दैठणकर,गणेश दैठणकर,रवींद्र राऊत,राजेश आढाव,निलेश चटपल्ली, हनुमंत यादव, सूर्यकांत भोसले,लियाकत महाजन,गणेश आहेर,रवींद्र ननावरे,चारुदत शिंदे,मेजर सईद अन्सारी, रमेश पायगुडे,अनिल जाधव,संजय पाचेरकर,दत्ताभाऊ पाकिरे,महेंद्र गायकवाड,बालाजी तिरमकदार,जितेंद्र जाधव,सुरेंद्र तावरे, रोहित यवतकर,नाना आढाव,आदित्य दैठणकर,अपेक्षा राऊत,विवेक नायडू,ओंकार जोशी,भाऊ पवार,नागेश कोकाटे, नितीन दैठणकर,राहुल आढाव,संदीप जांभळे,वसंत ढवळे, नेताजी काशीद,प्रवीण दैठणकर,श्याम काशीद,सौ.नीता दैठणकर,राजकुमार राव, नुरायन सलमानी,सौ.रोहिणी दैठणकर,सुरेश गायकवाड सौ.नीलम दैठणकर,निलेश चातुर,सौ.रेश्मा दैठणकर,दिलीप शाह, सुरेश नाईक,सौ.केतकी दैठणकर,सचिन दळवी, प्रकाश राणे यांच्यासह अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले.यावेळी महिलांनी सुरवातीला औक्षण केले. महिलांची उपस्थिती मोठी होती.
कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय सुनील शिंदे अन त्यांचे स्वागत उदय दैठणकर,अध्यक्षीय मनोगत रामदास सूर्यवंशी व सुंदर सूत्रसंचालन रवींद्र राऊत तर आभार हेमंत श्रीखंडे यांनी मानले.

वाघोली ते रांजणगाव दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचा विचार करावा; बापूसाहेब पठारे यांची मागणी

पुणे: पुणे शहरातील वाहतूक समस्यांवर मात करण्यासाठी पुणे-शिरूर मार्गावरील उन्नत पुलाच्या कामास नुकतीच मान्यता मिळाली आहे. सोबतच, रामवाडी ते वाघोली (कटकेवाडी) दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेलाही केंद्र सरकारने मान्यता दिली असून लवकरच दोन्ही कामे सुरू होणार असल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब तुकाराम पठारे यांनी भविष्यातील दृष्टीकोन समोर ठेवत “पुणे-शिरूर उन्नत पुलाच्या कामात वाघोली (कटकेवाडी) ते रांजणगाव दरम्यान मेट्रोच्या संभाव्य विस्ताराचा विचार करून आवश्यक जागेची व आर्थिक तरतूद करण्यात यावी”, अशी मागणी महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या रामवाडी ते वाघोली (कटकेवाडी) दरम्यान मेट्रो मार्गिकेस मान्यता मिळालेली आहे. मात्र, या मार्गाचा पुढील टप्पा म्हणजे रांजणगावकडे होणारा संभाव्य विस्तार, या उन्नत पुलाच्या रचनेत समाविष्ट केला नाही. तर, भविष्यात जागेअभावी मेट्रोसाठी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करणे गरजेचे असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केले.

राज्य पातळीवर अशा महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची रचना करताना दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असतो, हे त्यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केले आहे.

महा मेट्रोने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळासोबत समन्वय साधून याबाबतची तरतूद करावी, अशी त्यांची विनंती आहे.

विमानतळ परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय,चार परदेशी पिडीत महिला व एक भारतीय पिडीत महिलेची केली पोलिसांनी सुटका

पुणे- विमानतळ परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणा-यावर पोलिसांनी कारवाई करुन चार परदेशी पिडीत महिला व एक भारतीय पिडीत महिलांची सुटका केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहर हद्दीमध्ये मसाजसेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालणा-या मसाज पार्लरवर कारवाई करणे बाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते.दि.२१/०७/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष व युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर यांना “व्हिक्टोरिया थाई स्पा” ईडन पार्क बिल्डींग सी, ६ वा मजला, ऑफीस नंबर ६०१ विमानतळ पुणे येथे मसाज स्पा सेटरचे नावाखाली वेश्याव्यवसाया करिता मुली ठेवून त्यांना पुरुष गि-हाईकांना मसाजच्या नावाखाली पुरवून त्यांचेकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असले बाबत खात्रीशीर बातमी गोपनिय बातमीदारामार्फत प्राप्त झाली. सदर बातमीची माहिती पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी वरिष्ठांना कळविली. त्यावर वरिष्ठांनी सदर बातमीची खातरजमा करुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेशित केले.
त्याप्रमाणे बनावट गि-हाईकास पाठवून खात्री करून छापा टाकुन दोन स्पा मॅनेजर व एक स्पा चालक मालक यांचेवर बीएनएस कलम १४३, ३ (५) व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अन्वये विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन चार परदेशी महिला व एक भारतीय महिला असे पाच पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक, श्रीमती आशालता खापरे, सपोफौ अजय राणे, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, अमेय रसाळ, ईश्वर आंधळे, म. पोलीस अंमलदार वैशाली खेडेकर, पोलीस अंमलदार अविनाश कोडे, व किशोर भुजबळ तसेच युनिट-४ कडील पोलीस अमंलदार हरिष जयवंत मोरे, व नागेश कुंवर, यांच्या पथकाने केली.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?: हर्षवर्धन सपकाळ

‘सरकार भिकारी आहे’ असे जर मंत्रीच म्हणत असतील तर हा असंवेदनशिलतेचा कळस; महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावू नका.

मुंबई
महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय ?, असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर त्यांनी सरकारच भिकारी आहे हे सांगून असंवेदनशीलतेचा कळस केला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवण्याची गरज नाही पण मुख्यमंत्री त्याला का पाठिशी घालत आहेत? कोकाटेंची हकालपट्टी करण्याची फडणवीस यांच्यात हिम्मत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, कोकाटे हे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमासह समाज माध्यमांवरही सर्वांनी पाहिले आहेत. शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याचा निर्णय होत नाही, राज्याच्या काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा अनेक संकटाचा सामना शेतकरी करत असताना त्याकडे कोकाटे गांभिर्याने पहात नाहीत असेच त्यांच्या कामावरून व बेताल वक्तव्यावरून दिसत आहे. शेतकऱ्याला भिकारी म्हणालो नाही तर ‘सरकारच भिकारी आहे’, राजीनामा दयायला मी काय विनयभंग केला आहे का? अशी मुक्ताफळे उधळून हे महाशय आपण काहीच चुकलो नाही असे बिनधास्त सांगत आहेत. हा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते जुमानत नाहीत असे त्यांच्या विधानांवरून दिसत आहे. अशा मुजोर मंत्र्याला तात्काळ घरचा रस्ता दाखवला पाहिजे पण तसे होत नाही हे पाहता फडणवीस यांची काही तरी मजबुरी असेल म्हणून ते कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. कारण काहीही असो अशा व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जातो त्याची तरी काळजी करा, असे सपकाळ म्हणाले.

सपकाळ पुढे म्हणाले की, सातत्याने वादग्रस्त विधाने करून माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची प्रतिमा मलीन केली आहे. अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे राज्याच्या व शेतकऱ्याच्या हिताचे नाही. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण हे चिंताजनक असून महाराष्ट्राला ते भूषणावह नाही, त्यामुळे कोकाटेंचा तातडीने बंदोबस्त करा व नारळ देऊन घरी पाठवा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पीएमआरडीएतर्फे १६६ अतिक्रमणावर कारवाई

हिंजवडी भागातील वाहतुकीला दिलासा; अनधिकृत बांधकामांवर / अतिक्रमणावर कारवाई सुरू

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गत १५ दिवसात संबंधित परिसरातील १६६ अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. या भागातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार असून त्या दृष्टीने सर्वे सुरू आहे.

हिंजवडी – माण – मारुंजी परिसरात अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी याचा वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासह काही ठिकाणी ओढे – नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. या भागातील अतिक्रमणविरोधी मोहिमेअंतर्गत लक्ष्मी चौक, विप्रो सर्कल, माण रोड आदी भागात पीएमआरडीएने कारवाई करत एकूण १६६ अतिक्रमणे / अनधिकृत बांधकामे काढली आहे. त्यामुळे या भागातील रहदारीला यामुळे दिलासा मिळला आहे.

हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिक्रमणावर कारवाई सुरू आहे. या भागात सर्वे सुरू असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक अतिक्रमणधारक स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेत प्रशासनाला सहकार्य करत आहे.
उर्वरित अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई सुरू आहे. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार आशा होळकर आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

या भागातील काढली अतिक्रमणे
१) विप्रो सर्कल – १४
२) लक्ष्मी चौक ते मेझा नाईन – ३८
३) माण रोड परिसर – ६६
४) लक्ष्मी चौक ते मारुंजी – ७३(कार्यवाही सुरू)
५) माण गाव नाला – २८ (खोल्या निष्कासित)
६) हिंजवडी परिसरातील – १९ होल्डिंग निष्कासित
एकूण कारवाई – १६६

अनधिकृत बांधकामांचे सुरू असलेले व नियोजित सर्वेची ठिकाणे
१) शिवाजी चौक ते स्मशानभूमी रोड
२) शिवाजी चौक ते वाकड रोड
३) शिवाजी चौक ते फेज १ रोड
४) हिंजवडी, माण, मारूंजीसह इतर परिसरात सर्वे सुरू

हिंजवडी परिसरातील नियोजित कामांसाठी उशीर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होणार

समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर नियमित आढावा

पुणे दि.२२- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही सुरू झाली असून परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दर १५ दिवसांनी नियमित आढावा घेण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हिंजवडी परिसरातील नागरिक संघटनांच्या प्रतिनिधिंशी याबाबत आज संवाद साधला. यावेळी उपस्थित प्रतिनिधिंनी तातडीने सुरू झालेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी ही कार्यवाही सातत्याने सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावीत अशाही सूचना त्यांनी दिल्या.

काही यंत्रणांकडून कामांमध्ये दुर्लक्ष होऊन रस्त्याच्या दुरूस्तीची कामे जर वेळेत पूर्ण केली नाहीत तर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. हिंजवडी परिसरातील नागरिक संघाच्या प्रतिनिधिंसोबत एक व्हॉट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व यंत्रणांचे प्रतिनिधीदेखील असतील. या प्लॅटफॉर्मवर त्यांना सर्व प्रश्न उपस्थित करता येतील आणि ते प्रश्न तातडीने सोडवले जातील, असेही निश्चित करण्यात आले आहे.

पारधी समाजाला आमदारकी, खासदारकी अजूनही का नाही ? राष्ट्रपतींना पुण्याच्या नगरसेविकेने केला सवाल

पुणे/नवी दिल्ली- देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण पारधी समाज अजूनही मुख्य प्रवाहात आला नाही,अजूनही हा समाज पोलीस आणि प्रशासनाच्या अत्याचाराचे लक्ष होत आहे,या समाजाला अजूनही मुख्य प्रवाहात आणण्यात यश आलेले नाही,अजूनही राष्ट्रपती निर्देशित राज्यसभा सदस्यत्व किंवा राज्यपाल निर्देशित विधानपरिषदेचे सद्स्त्यव देण्यात आलेले नाही असे का? असा स्पष्ट आणि लिखित सवाल पुण्यातील माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीत लिखित स्वरुपात राष्ट्रपतींना केला आहे.

आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार (दि.२१) रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील बैठकीसाठी भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांना निमंत्रण पाठविण्यात आले होते.पारधी समाजासाठी काळे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन या बैठकीसाठी त्यांना बोलाविले होते.राष्ट्रपती भवनात विविध क्षेत्रांतील प्रख्यात आदिवासी व्यक्तींशी संवाद साधला आणि आदिवासी समुदायां बाबत अधिक प्रभावी धोरणे आणि उपक्रम यावर राष्ट्रपती चर्चा केली.राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांची भेट घेऊन त्यांनी यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.

अजूनही पारधी समाजाला खोट्या गुन्ह्यात अडकविणे, कुठेही गुन्हा घडला तर त्रास देणे असे प्रकार पोलिसांकडून होतात,अजूनही या समाजाला राहायला देशात घर, जमीन मिळणे मुश्कील झालेले आहे.ते राहतात तिथेच तीच त्यांना जमीन देण्यात यावी आणि शेती करू द्यावी तसेच शैक्षणिक सुविधा पुरवून या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे अशा मागण्या यावेळी राजश्री काळे यांनी केल्या.

“उल्हासनगर येथे अल्पवयीन पीडितांच्या घरासमोर दहशत पसरवणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

मुंबई, दि. २२ जुलै २०२५ : उल्हासनगर (रमाबाई टेकडी) येथे अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींपैकी रोहित झा हा जामिनावर सुटून आल्यावर पीडित मुलींच्या घरासमोर ढोल-ताशे, फटाके वाजवत मिरवणूक काढत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना कठोर कारवाई करत आरोपीचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.

आरोपीने जामिनाच्या अटींचे उघड उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असून, हा कायद्यावरील विश्वास डळमळीत करणारा प्रकार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “उल्हासनगर येथे तीन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्यानंतर त्यातील आरोपी रोहित झा याला जामीन मिळाला आणि तो जामिनावर सुटल्यावर वाजतगाजत मिरवणूक काढून पीडित मुलींना धमकावण्याचा प्रयत्न करतो, ही अतिशय निंदास्पद व हीन प्रवृत्ती आहे. गुन्हा करून सुटल्यानंतर पीडितांना मानसिक त्रास देणे हे अजिबात सहन केले जाणार नाही. यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “मी ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे व सहआयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. पीडित मुलींना पुन्हा धमकावले जाणार नाही, यासाठी पोलिसांनी काही संरक्षणात्मक उपाययोजना देखील हाती घेतल्या आहेत. तसेच, पीडित मुलींना समुपदेशन देऊन त्यांचा धीर वाढवणे आवश्यक आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे मागणी केली आहे की, या घटनेच्या आधारे न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करून आरोपी रोहित झा याचा जामीन रद्द करण्यासाठी तातडीने प्रस्ताव दाखल करावा. तसेच, जामिनाच्या अटींचे उल्लंघन व न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल नवीन गुन्हा दाखल करून आरोपीला त्वरित ताब्यात घ्यावे.

तसेच, आरोपीच्या मिरवणुकीत सहभागी सर्व व्यक्तींवर कारवाई करून या प्रकरणाचा तपास विशेष पथकाद्वारे करावा, पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे व परिसरात अशा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त स्तरावर सतत आढावा घेतला जावा, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

शेवटी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “अल्पवयीन मुलींवर विनयभंगासारखे गुन्हे आणि त्यानंतर पीडितांना धमकावण्याच्या घटना थांबवण्यासाठी पाॅक्सो कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व समाजातील अशा प्रवृत्तीवर वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.”

भाजपच्या रक्तदान शिबिरातचार हजारहून रक्त पिशव्यांचे संकलन

पुणे, ता. २२ :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात चार हजार 220 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली.

शहराच्या विविध भागांमध्ये 38 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, दीपक उर्फ बाबा मिसाळ, शहराचे सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, बापू मानकर, महेश पुंडे, राहुल भंडारे, गणेश कळमकर, वर्षा तापकीर यांनी संयोजन केले.

ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली

पुणे-
पुणे शहरातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पत्रकार संघातील आजी माजी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे शहरातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.यावेळीं पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील,सरचिटणीस मंगेश फल्ले,प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे,दिवंगत पत्रकार अमित गोळवलकर यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.यावेळी शैलेश काळे,शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे ,निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे,राजेंद्र जोशी,ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे, अभय कुलकर्णी,स्वप्नील पोरे, कल्पना खरे यांच्यासह नम्रता वागळे,अंजली खमीतकर,सुनीत भावे,स्वप्नील बापट,मिलींद वाडेकर, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी श्रद्धांजली अर्पण करत मनोगत व्यक्त केले.गोळवलकर यांचा मुलगा अ‍ॅड.अथर्व गोळवलकर यानेही आपल्या पित्या बद्दल आठवणी शेवटी सांगितल्या.त्यानंतर सर्वांनी एक मिनीट स्तब्ध उभे राहून दिवंगत अमित गोळवलकर यांच्या स्मृतींना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण केली.

सडेतोड बोलणार हसमुख पत्रकार गेला..
यावेळी सर्वांनीच त्यांच्या बद्दलच्या आठवणी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितल्या,गोळवलकर हे क्राईम आणि क्रीडा रिपोर्टर होते मात्र ,बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचे होते.प्रिंटसह चॅनल क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला.त्यांनी जलतरण क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.टिळक जलतरण तलावाचे सचिव म्हणून त्यांनी भरीव काम केले अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठविलेल्या शोक संदेशही वाचून दाखविण्यात आला.

जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्नॲट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

पुणे, दि. २२: अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पुणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला.
कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या प्रकरणांत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करुन सदर कागदपत्रे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास उपलब्ध करुन द्यावेत. ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच पोलीस विभागाने त्याबाबत तातडीने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे व नागरी हक्क संरक्षण शाखा यांना अहवाल सादर करावा आणि पिडीत व्यक्तींचे जातीचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी पोलीस विभागाने संबंधित पिडीत व्यक्तींकडे पाठपुरावा करावा. पीडितांना न्याय देण्याकरिता सकारात्मक प्रयत्न करुन न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना समिती द्वारे देण्यात आल्या.
सदरचा आढावा अध्यक्षांच्या परवानगी ने सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी घेतला. बैठकीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पुणे ग्रामीणचे पोलिस उप अधीक्षक दिलीप शिंदे,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य संतोष कांबळे, संतोष शेलार, हनुमंत पाटोळे उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024ईव्हीएम मशीन्सची, बर्न्ट मेमरी,कंट्रोलरची तपासणी व पडताळणी

पुणे दि. 22 :- भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर 7 दिवसांच्या आत ईव्हीएम मशीन्सची, बर्न्ट मेमरी / कंट्रोलरची तपासणी व पडताळणी करीता उमेदवारांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्याची तरतुद आहे. पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघांपैकी 11 विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी या कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित 6 उमेदवारांपैकी 4 मतदार संघांमध्ये निवडणूक याचिका दाखल आहे. उर्वरित 2 उमेदवारांच्या अर्जानुसार 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये सदर ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी व पडताळणीचे कामकाज करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
21 जुलै 2025 रोजी 213 – हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमाद्वारे हडपसर विधानसभा मतदार संघातील 27 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रामधील नोंदवलेल्या मतांची मतमोजणी होणार असल्याचा तसेच त्याच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदान चिठ्ठयांची पुनश्च: मोजणी 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीत करण्यात येणार असल्याचा व्हिडीओ प्रसिध्द केला होता.
त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, तपासणीवेळी भारत निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार संबंधित उमेदवारांनी या कार्यालयास कोणत्या ईव्हीएम मशीन्स तपासावयाच्या आहेत याची यादी दिलेली आहे, त्यानुसार त्या क्रमांकाच्या ईव्हीएम मशीन्स सुरक्षा कक्षातून काढून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर कंट्रोल युनिट मधील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते पडलेली आहेत ते दाखवले जाणार आहे. यावेळी विधानसभा निवडणूकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या व्हीव्हीपॅट स्लीपस ची मोजणी होणार नाही. त्यामुळे प्रशांत जगताप यांनी प्रसिध्द केलेल्या व्हिडीओतील निवेदन हे मा. भारत निवडणूक आयोग यांच्या मतदान यंत्रांच्या तपासणी व पडताळणी संदर्भातील मानक प्रणालीनुसार नाही असे, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे मिनल कळसकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

पुणे जिल्हयामध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न87 उमेदवारांची प्राथमिक तर 7 उमेदवारांची अंतिम निवड

पुणे दि. 22 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,पुणे मार्फत नुकताच पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, प्लेसमेंट ड्राईव्ह व करिअर समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण 26 उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध प्रकारची एकूण 1408 रिक्तपदांसह सहभाग नोंदवला. या मेळाव्यामध्ये एकूण 152 बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. उपस्थित उद्योजकांमार्फत रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती प्रक्रियेद्वारे एकूण 87 उमेदवारांची प्राथमिक व 7उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
या मेळाव्यास आमदार सिद्धार्थ शिरोळे, यांनी उद्योजक तसेच उमेदवारांशी संवाद साधला.
रोजगार मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष,खडकी शिक्षण संस्था, पुणे हे उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच अनिल मेहता, उपाध्यक्ष, खडकी शिक्षण संस्था, आनंद छाजेड, चिटणीस, खडकी शिक्षण संस्था, संजय चाकणे, प्राचार्य, टीकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अनुपमा पवार, उपायुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,विभागीय आयुक्तालय, पुणे व सा.बा.मोहिते, प्र.सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे हे या प्रसंगी उपस्थित होते.
याशिवाय प्रधानमंत्री कौशल्य केंद्र-शिरुर, आळेफाटा,ता.जुन्नर, जि.पुणे येथे आयोजित प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये परिसरातील 5 उद्योजकांनी व 75 उमेदवारांनी तर अमेझ इंजिनिअर्स सोल्युशन, नाणेकरवाडी ता.खेड, जि.पुणे येथील प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 4 उद्योजकांनी व 25 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
तसेच जिल्हयातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पॉलीटेक्निक,नायगाव (नसरापूर), ता.भोर, जि.पुणे येथे सुमारे 176 उमेदवारांच्या उपस्थितीत व शारदाबाई पवार इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग,शारदानगर, ता.बारामती येथे सुमारे 100 उमेदवारांच्या उपस्थितीत करिअर समुपदेशन सत्रे संपन्न झाली. त्याद्वारे उमेदवारांना त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करण्याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, 22 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबीरात 50 रक्त पिशव्याचे संकलन झाले आहे. यावेळी 100 महिलांना रक्तवाढीच्या मोफत गोळ्या व औषधांचे, दिव्यांग रुग्णांना 44 वॉकर आणि वृध्द व दिव्याग रुग्णांना 15 व्हील चेअर वाटप करण्यात आले. सदरच्या गोळ्या व औषधे, वॉकर आणि व्हील चेअर विविध क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्राप्त झाले होते.
यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेचे मुख्य प्रबंधक आदिल्य गोगटे, उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, प्राध्यापिका डॉ. अंजली शेटे,सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरज जाधवर, सहाय्यक प्राध्यापक डॉ.सौरभ मुथा, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, समाजसेवा अधिक्षक बालाजी चांडोळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.