९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम
नवी दिल्ली :
यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून (दिनांक २१ फेब्रुवारी) नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडिअम) मध्ये होत आहे. २१ते २३ फेब्रुवारीदरम्यान कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, चर्चा असे वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, यंदाच्या साहित्य संमलेनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. ‘लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे’ असा प्रवास ही ग्रंथदिंडी करणार आहे, अशी माहिती साहित्य संमेलन आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी दिली. दिल्लीत त्यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरहदचे डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे उपस्थित होते.
संजय नहार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. २१ फेब्रुवारीला दुपारी ३.३० ला विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.
तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. ग्रंथदिंडीची सुरुवात संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल, या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील, असेही संजय नहार म्हणाले.
संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याचे संजय नहार म्हणाले.
साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे
१९ फेब्रुवारीला पुणे येथून साहित्य संमलेनासाठी विशेष रेल्वे दिल्लीकडे येणार आहे. या रेल्वेमध्येही साहित्य संमेलन होणार आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत.
यावेळी बोलताना संजय नहार यांनी सांगितले की, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या ३ दिवसांमध्ये कोणते कार्यक्रम घ्यावे हा अधिकार साहित्य महामंडळाचा असतो. त्यामुळे महामंडळाच्या नियमानुसारच कार्यक्रम होणार आहेत. मात्र संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला काही कार्यक्रम घेता येतात, तसे जवळपास १०० विविध कार्यक्रम झाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. इतिहासात दिल्ली जिंकताना मराठ्यांचा तळ तालकटोरा स्टेडियम होते. त्या जागेवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.
संजय नहार म्हणाले की, साहित्य संमेलन हा उत्सव कुठल्या खासगी संस्थेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. साहित्य संमलेनात परिसंवाद, काव्य संमेलन असे भरगच्च कार्यक्रम तीन दिवस होणार आहेत. जवळपास १०० पुस्तके संमेलनात प्रकाशित होतील, असा अंदाज आहे. दिल्लीतील लोकांना पुस्तकांसाठी ही मोठी संधी आहे, असेही ते म्हणाले.
इंग्लड, पाकिस्तानमधून लोकांची उपस्थिती
साहित्य संमलेनाला पाकिस्तानातील कराची, इंग्लंड आणि अन्य काही देशांतून लोक येत आहेत. लंडनमधून एक व्यक्ती पुस्तक प्रकाशन करण्यासाठी येणार आहेत.व्यवस्थेबाबत बोलताना डॉ. शैलेश पगारिया म्हणाले की, संमेलनाला महाराष्ट्रातून २७०० लोक येतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत १८०० लोकांची व्यवस्था झाली आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. तर याबाबत बोलताना नहार म्हणाले की, व्यवस्था नाही म्हणून काही लोक येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शक्य असेल तर दिल्लीतील मराठी लोकांनी आपल्या घरी काही लोकांना ठेवावे, ही आमची विनंती आहे, असेही ते म्हणाले.