पुणे: लाखो भारतीयांना फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर फूड ऑर्डरिंगचा जास्तीत जास्त अनुभव प्रदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, झोमॅटोने टाटा डिजिटलसोबत एका रोमांचक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून डिस्काउंट ऑफर प्रोग्राम सादर करण्यात आला आहे. हा डिस्काउंट प्रोग्राम टाटा नेउ एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड (नेउकार्ड) वापरून झोमॅटोवर त्यांच्या फूड ऑर्डरसाठी पैसे देणाऱ्या युजर्सना आकर्षक लाभ प्रदान करेल. नेउकार्ड हे टाटा डिजिटलचे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे, ज्यामध्ये टाटा डिजिटल को-ब्रँडिंग भागीदार आहे आणि एचडीएफसी बँक कार्ड जारीकर्ता आहे.
या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत, झोमॅटोवर नेउकार्ड वापरणारे ग्राहक आता प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहारावर झोमॅटो मनीच्या स्वरूपात १०% पर्यंत कॅशबॅक मिळवू शकतील. ही ऑफर किमान ९९ रुपयांच्या ऑर्डर रकमेसह सर्व फूड डिलिव्हरी ऑर्डरवर लागू असेल. भविष्यातील ऑर्डरसाठी हे क्रेडिट्स सहजपणे रिडीम केले जाऊ शकतात, ज्यामुळे ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पदार्थांची किंमत प्रभावीपणे कमी होते आणि युजर्सना अधिक वारंवार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
या भागीदारीचा उद्देश युजर्सची सुविधा वाढवणे आणि टाटा डिजिटलच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमशी त्यांचा संबंध अधिक दृढ करणे आहे. नेउकार्ड युजर्स झोमॅटोवर केवळ रिवॉर्ड्सचा लाभ घेत नाहीत तर त्यांना नेउकॉइन्स देखील मिळतात. नेउकॉइन्स टाटा नेउ अॅपवर उपलब्ध असलेल्या विविध उत्पादने आणि सेवा खरेदी करण्यासाठी रिडीम केले जाऊ शकतात – ज्यामुळे हा खऱ्या अर्थाने एकात्मिक डिजिटल जीवनशैली अनुभव बनतो.
ऑफरचीप्रमुखवैशिष्ट्ये:
फूड ऑर्डरवर झोमॅटो मनीच्या स्वरूपात १०% पर्यंत कॅशबॅक
किमान ₹९९ च्या किमतीच्या सर्व ऑर्डरवर ऑफर लागू.
झोमॅटोवर व्यवहार करणाऱ्या नेउकार्ड युजर्ससाठी विशेषतः उपलब्ध.
भविष्यातील झोमॅटो ऑर्डरसाठी कॅशबॅक रिडीम करता येतो, ज्यामुळे बचत आणि ग्राहकांची प्लॅटफॉर्मवरची निष्ठा वाढते.
भारतात डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी वेगाने वाढत असताना, ही भागीदारी देशभरातील तंत्रज्ञान-जाणकार, सुविधा शोधणाऱ्या ग्राहकांना अधिक फायदे आणि अधिक मूल्य प्रदान करण्यासाठी दोन्ही भागीदारांचा एक सामायिक दृष्टीकोन प्रतिबिंबित करते.
ही ऑफर आता सुरु झाली आहे आणि सर्व नेउकार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहक त्यांचे नेउकार्ड लिंक करू शकतात आणि झोमॅटोवर व्यवहार करून त्वरित रिवॉर्ड्स मिळवू शकतात.
पुणे: “कृत्रिम बुद्धिमतेमुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. येणारा काळ हा ‘एआय’चा असून, भारतीय सनदी लेखापालांना ‘एआय’चे ज्ञान व्हावे, त्याचा चांगला उपयोग करता यावा, यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सीए विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘एआय’चा समावेश केला जात आहे. त्यामुळे सनदी लेखापाल अधिक तंत्रज्ञानाभिमुख व ‘एआय’ प्रशिक्षित होत आहेत,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी केले.
संसदीय कायद्यानुसार स्थापित दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आयोजित ‘एआय इनोव्हेशन समिट २०२५’, या सनदी लेखापालांसाठीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘अकाऊंटिंग, ऑडिट, कर प्रणाली आणि शासकीय कार्यपद्धतीत परिवर्तन’ अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. बाणेर येथील बंटारा भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए प्रसन्नकुमार डी, सचिव सीए डॉ. जयकुमार बत्रा, ‘आयसीएआय’च्या एआय कमिटीचे चेअरमन सीए उमेश शर्मा, व्हाईस चेअरमन सीए दयानिवास शर्मा, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए केतन सैय्या, आयसीएआय पुणे शाखेचे चेअरमन सीए सचिन मिणियार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे, विभागीय समितीचे, तसेच पुणे शाखेचे पदाधिकारी व १००० पेक्षा अधिक सीए सभासद या परिषदेला उपस्थित होते.
‘आयसीएआय’च्या पुणे शाखेच्या वतीने या परिषदेचे संयोजन केले होते. केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनात विभागीय समिती सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे, पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रज्ञा बंब, सीए नंदकुमार कदम, सीए सारिका दिंडोकार आदींनी संयोजनात परिश्रम घेतले. आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व ओपनएआय सोर्सच्या पब्लिक पॉलिसी अँड पार्टनरशिप हेड प्रज्ञा मिश्रा यांचे ‘एआय’वर बीजभाषण झाले.
सीए चरणज्योत सिंग नंदा म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाची भीती न बाळगता ते तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. शिकण्याची आसक्ती हवी. ‘एआय’मुळे अनेक गोष्टी सहज होत आहेत. केंद्र सरकारने संशोधन व इनोव्हेशनसाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी भारत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बनत आहे. या संधींचा सनदी लेखापालांनी लाभ घ्यावा. आज ५०० पेक्षा अधिक ‘एआय’ प्रशिक्षण वर्ग झाले असून, त्यातून २५ हजार सनदी लेखापालांनी ‘एआय’ मोड्यूल शिकले आहेत. सनदी लेखापालांनी सकारात्मक मानसिकता ठेवण्यासह शरीर व मनाच्या स्वास्थ्यावर लक्ष द्यावे. कुटुंबाला पुरेसा वेळ द्यावा. ‘वर्क लाईफ बॅलन्स’ साधण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.”
सीए प्रसन्नकुमार म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता हा आपल्या व्यवसायाचा अविभाज्य भाग बनला असून, ‘एआय’ आत्मसात केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. लाखो सनदी लेखापाल आणि सीए विद्यार्थी हे नवे तंत्रज्ञान वापरत आहेत. त्याचा आणखी प्रभावी वापर कसा करता येईल. नोकऱ्या जाणार ही भीती मनातून काढायला हवी. नवी कौशल्ये, तंत्र आत्मसात करणाऱ्यांसाठी हे संधींचे भांडार आहे. सव्वाकोटी पेक्षा अधिक रोजगार निर्मिती ‘एआय’मुळे होणार आहे. मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ असून, त्याला कृत्रिम बुद्धिमतेची जोड मिळाल्याने विकासाचा वेग झपाट्याने वाढणार आहे.”
सीए उमेश शर्मा म्हणाले, “गेल्यावर्षी ‘आयसीएआय’ने ‘एआय कमिटी’ स्थापन केल्यापासून कृत्रिम बुद्धिमतेच्या वापराचे प्रशिक्षण अधिक व्यापक झाले आहे. प्रत्येक सनदी लेखापालांना ‘एआय’ प्रशिक्षित करून काळाबरोबर चालण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जवळपास साडेचार ते पाच लाख सनदी लेखापाल येत्या काही महिन्यात हे प्रशिक्षण घेतील. २०२७ नंतर सीए होणाऱ्यांसाठी अभ्यासक्रमात ‘एआय’चा विषय शिकवला जाणार आहे.”
सीए दयानिवास शर्मा, सीए केतन सैय्या यांनीही आपले विचार मांडले. सीए (डॉ.) जयकुमार बात्रा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए नेहा फडके व सीए प्रज्ञा बंब यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिणियार यांनी आभार मानले.
मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) च्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय इमारत आणि वर्ग दोन्हींचे उदघाटन यावेळी झाले. त्यानंतर, एनएफडीसी-नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) येथील गुलशन महल येथे वेव्हज 2025 भारत दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज 2025) फलनिष्पत्ती अहवालाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश सिंह मीना आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. आयआयसीटी लोगोचे अनावरण आणि सतरा अभ्यासक्रमांचे औपचारिक उद्घाटनही या कार्यक्रमात झाले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेडच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि प्रसारभारती यांच्यात एक सामंजस्य करार यावेळी झाला. याद्वारे देशातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात सर्जनशीलतेचे महत्त्व ओळखून, एकात्मिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यम केंद्र विकसित करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. यामुळे माध्यम क्षेत्रात नवोन्मेष, कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन मिळेल.
देशाची मनोरंजन राजधानी असणाऱ्या मुंबईत पहिल्या वेव्हज शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारचे आभार मानले. यावर्षी मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत पहिल्या वेव्हज शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतात जागतिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून ‘वेव्ह्स (WAVES)’चे यशस्वी आयोजन करण्यात आले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘वेव्ह्स (WAVES)’ आता एक चळवळ बनली आहे आणि या घटनेचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत आहेत.
‘वेव्ह्स (WAVES)’ ने सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक नवीन मंथन सुरू केले आहे, असेही ते म्हणाले. ‘वेव्ह्स (WAVES)’ उपक्रमाला आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 150 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. फिल्म सिटी येथे आकाराला येत असलेले आयआयसीटी कॅम्पस, हे केवळ जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणूनच नव्हे, तर जगभरातील लोकांना आकर्षित करणारी वास्तू आणि सांस्कृतिक चिन्ह म्हणून उदयाला येईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, वेव्ह्स (WAVES) 2025 मध्ये प्रशंसेला पात्र ठरलेले आणि आता एनएमआयसी मधील गुलशन महाल येथे स्थलांतरित झालेले भारत पॅव्हेलियन मुंबईच्या पर्यटन सर्किटमध्ये एका नव्या सांस्कृतिक स्थळाची भर घालणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, ‘वेव्ह्स’ दरम्यान जाहीर करण्यात आलेला आणि सुरुवातीला 42 कंपन्यांचा समावेश असलेला ‘वेव्ह्स (WAVES)’ निर्देशांक, ज्याचे एकत्रित मूल्यांकन अंदाजे 93,000 कोटी रुपये होते, त्याने अल्पावधीतच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामधून सर्जनशील निर्माती अर्थव्यवस्थेची जलद वाढ आणि अफाट क्षमता स्पष्टपणे प्रतिबिंबित होते, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सर्जनशील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आयआयटी आणि आयआयएम च्या दर्जाची संस्था असावी, असे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न होते, आणि आयआयसीटीची स्थापना हा त्या दिशेने एक महत्वाचा निर्णय आहे. ते पुढे म्हणाले की, सर्जनशील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांना नवीन कौशल्ये, प्रशिक्षण आणि साधने उपलब्ध करून देणे आणि जगातील सर्वोत्तम पद्धती भारतात आणणे महत्वाचे आहे. तरच भारतात नवीन इन्क्युबेशन, नवीन कल्पना आणि नवे तंत्रज्ञान तयार होईल, असे वैष्णव यांनी सांगितले. अल्पावधीतच पहिले आयआयसीटी कॅम्पस सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. फिल्म सिटी येथे महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर उभारण्यात येणारा नवीन कॅम्पस सौंदर्यशास्त्रीय निकषांना अनुसरून आणि निसर्गरम्य वातावरणाशी सुसंगत असेल. आयआयसीटीसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांनी दिली. आयआयसीटीमध्ये व्हीएफएक्स, पोस्ट प्रॉडक्शन, एक्सआर, गेमिंग आणि अॅनिमेशनमधील पूर्णपणे उद्योग-संलग्न प्रगत कार्यक्रम असतील, अशी माहितीही वैष्णव यांनी दिली. उद्योग-शिक्षण एकत्रीकरणाच्या भावनेतून आयआयसीटीने गुगल, मेटा, एनव्हीडिया, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अॅडोब आणि डब्ल्यूपीपी सारख्या कंपन्यां बरोबर औपचारिक भागीदारी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, पहिल्या बॅचमध्ये 300 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आणि एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक आणि प्रशिक्षकांना प्रगत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) संचालक शेखर कपूर आणि प्रसिद्ध गीतकार तसेच केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाचे (CBFC) अध्यक्ष प्रसून जोशी देखील उपस्थित होते.
भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेविषयी (IICT)
भारतीय सर्जनशील तंतज्ञान संस्था (IICT) येत्या ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहे. या घडामोडीसह आता भारताची वेगाने वाढत असलेली डिजिटल आणि सर्जनशील अर्थव्यवस्था एका परिवर्तनकारी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संस्थेद्वारा ए.व्ही.जी.सी.-एक्स.आर. (AVGC-XR – ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी) क्षेत्रात उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांचा एक मजबूत संच उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबद्दलच्या तपशिलांसाठी इथे क्लिक करा.
भारतीय सर्जनशील तंतज्ञान संस्था -राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (IICT-NFDC) प्रांगणातील एक वर्ग
भारत पॅव्हेलियन बद्दल
भारताच्या कालातीत कथात्मक मांडणीच्या वारशाचे आणि हा वारसा जागतिक आशय-सामग्री निर्मितीच्या बहुआयामी भविष्याच्या दिशिने घेत असलेली झेप, एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित केल्या गेलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज शिखर परिषद (WAVES) 2025 मध्ये उभारलेले भारत पॅव्हेलियन या परिषदेचा केंद्रबिंदू ठरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले होते. हे पॅव्हेलिअन अर्थात बहुपदरी दालन म्हणजे भारताचा सांस्कृतिक आत्मा आणि कलेपासून कोड (Kala to Code) पर्यंतच्या त्याच्या डिजिटल परिवर्तनाचा केला गेलेला गौरवच होता. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात साकारलेले हे भारत पॅव्हेलियनचे म्हणजे देशाला सर्जनशील क्षेत्रातील एक महासत्ता बनण्याच्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व करणारे दालन होते. भारत पॅव्हेलियनमध्ये मांडलेल्या विविध क्षेत्रांशी संबंधित संकल्पनाधारीत प्रदर्शनांनी अभ्यांगतांना एक गहिरा अनुभव दिला आणि त्यासोबतच आशय-सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या माध्यमातून चालना दिली जात असलेल्या ऑरेंज इकॉनॉमीला चालना देण्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबही या प्रदर्शनांतून उमटले होते.
गुलशन महाल, राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय – राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NMIC-NFDC) येथील भारत पॅव्हेलियन
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (WAVES) 2025 चा फलनिष्पत्ती अहवाल
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (WAVES) परिसंस्थेशी संबंधित नवोन्मेष, अवलंब आणि जागतिक सहभाग यावर भर असलेल्या अनेक अहवाल आणि उपक्रमांचे औपचारिक प्रकाशन झाले. या अहवालांमध्ये खाली नमूद गोष्टींचा समावेश होता
या अहवालांच्या प्रकाशनांमुळे चित्रपट, दूरचित्रवाणी, ॲनिमेशन, गेमिंग, इमर्सिव्ह मीडिया, प्रत्यक्ष कला सादरीकरणाचे सोहळे, संगीत आणि डिजिटल आशय-सामग्री यासह भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे असाधारण बहुआयामित्व आणि विविधता अधोरेखित झाली आहे.
गोव्यातील 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीचे आज मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) मुख्यालयात आयोजन करण्यात आले. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम गोवा सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि एनएफडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि भारत आणि जागतिक चित्रपट उद्योगातील सुकाणू समितीच्या सदस्यांचे पॅनेल उपस्थित होते.
या बैठकीत इफ्फी 2025 साठी धोरणात्मक नियोजनावर विशेष भर देण्यात आला. महोत्सवाची समावेशकता, जागतिक स्थान आणि सार्वजनिक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी, संपर्काची व्याप्ती, प्रतिभावंताचा सहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. 56वा इफ्फी महोत्सव गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित होणार आहे. तरुणांवर नव्याने लक्ष केंद्रित करत, हा महोत्सव विद्यार्थी चित्रपट निर्माते आणि तरुण आशय निर्मात्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल. विशेष प्रकारे रचना केलेले मास्टरक्लासेस, उद्योग कार्यशाळा आणि नवीन कलाकारांना जागतिक मार्गदर्शकांशी जोडणारे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म यांचा यात समावेश आहे.
इफ्फीसोबतच नव्याने रिब्रँडिंग करण्यात आलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या चित्रपट बाजाराचे आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट व्याप्तीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या वेव्ह्ज फिल्म बाजाराचे आयोजन करण्यात येईल. फिल्म बाजारचे वेव्हज फिल्म बाजार असे पुनर्ब्रँडिंग करण्यावर सुकाणू समितीने चर्चा केली आणि त्याला मान्यता दिली.भारताला आशय, सर्जनशीलता आणि सह-निर्मितीसाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या व्यापक धोरणात्मक दृष्टिकोनाचा हा एक भाग आहे.
महोत्सवाच्या डिझाइनमध्ये अधिक समावेशकता आणि सर्जनशील अंतर्दृष्टी वाढवण्यासाठी, सुकाणू समितीचा लक्षणीय विस्तार करण्यात आला असून सदस्यांची संख्या 16 वरून 31 करण्यात आली आहे, ज्यामधून एक अधिक वैविध्यपूर्ण आणि उद्योग-प्रतिनिधी मंडळ प्रतिबिंबित होत आहे. समितीमध्ये अनुपम खेर, गुनीत मोंगा कपूर, सुहासिनी मणिरत्नम, खुशबू सुंदर, पंकज पराशर आणि प्रसून जोशी यांसारख्या नामांकित आणि सिनेमा, निर्मिती, माध्यम आणि सांस्कृतिक नेतृत्वातील समृद्ध कौशल्ये असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
इफ्फी 2025 भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या, माध्यम आणि मनोरंजनातील स्टार्ट-अप्सना समर्थन देण्याच्या, आणि एक खिडकी सुविधा आणि प्रोत्साहन-आधारित धोरणांद्वारे जागतिक चित्रपट निर्मितीसाठी भारतात चित्रिकरण करण्यास प्रोत्साहित करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाशी देखील संलग्न आहे.आपल्या महत्त्वाकांक्षी प्रोग्रामिंग, समावेशक दृष्टिकोन आणि चित्रपट उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसह, इफ्फीची 56 वी आवृत्ती एक ऐतिहासिक उत्सव बनण्यासाठी सज्ज आहे—जी परस्परांशी जोडलेल्या, सर्जनशील आणि सहयोगी जगात सिनेमाच्या विकसित होत असलेल्या अर्थाचे प्रतिबिंब दर्शवणार आहे.
पुणे : सारसबागेजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी अंकल सोनावणे, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, लक्ष्मीताई पवार, दीपक कसबे, अशोक हरणावळ, ॲड.एकनाथ सुगावकर, संजय केंदळे आदी उपस्थित होते.
तसेच बिबवेवाडी आणि अन्य मंडळांनी आयोजित केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभिवादन कार्यक्रमात सुभाष जगताप यांनी सहभाग घेतला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी त्यांनी केलेले योगदान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून जिद्दीने लढण्याची आणि जगण्याची प्रेरणा मिळाली, असे सुभाष जगताप यांनी अभिवादन कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले. तसेच ‘संघर्षाशिवाय प्रगती नाही’, असा अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला संदेशही आपण अंगिकारायला हवा, असे आवाहनही सुभाष जगताप यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना केले.
पुणे- विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात सरसकट कार्यकर्त्यांना बंदी घातली तर ते अन्यायकारक होईल असे मत पुण्याच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी मांडले आहे. पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यात झालेल्या हाणामारी मुळे आज विधान सभा अध्यक्ष यांनी आपले काही निर्णय जारी केले आहेत . ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना जरूर कडक च शिक्षा व्हावी पण जे खऱ्या अर्थाने येथे जनतेचे प्रश्न घेऊन येतात काही शिकायला येतात अशा सरसकट कार्यकर्त्यांचा बळी या निर्णयाने गेला नाही तर बरे होईल असे रुपली पाटील म्हणाल्या आहेत.
पुणे-‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या फर्ग्युसन महाविद्यालयात एक हजार देशी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ फुलगाव येथील श्री श्रुतीसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते आज करण्यात आला.
रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटीकर, पर्यावरण समितीचे अध्यक्ष विवेक मठकरी, प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व विश्वस्त, संचालक,प्राचार्य, बँकांचे अधिकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
नानासाहेब जाधव म्हणाले, “पर्यावरणाचे असंतुलन व्हायला आपण सर्वजण जबाबदार आहोत. आपण ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विकासाच्या चुकीच्या धारणा आणि आपली दोषयुक्त जीवनशैली पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला कारणीभूत आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे निसर्गाचा एकात्मिक विचार करणे आवश्यक आहे. जैविक परिवार संकल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे. तसेच निसर्गाकडे सहअस्तित्व, सामंजस्य आणि सौहार्दपूर्ण दृष्टीने पाहण्याची गरज आहे. “ . स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, ” विकासाच्या नावावर आपण अहोरात्र काम करत आहोत. परंतु काय विकास झाला आणि किती विकास झाला हा प्रश्न आहे. सर्व जण विकासाची भाषा बाह्य अंगानेच वापरतात. जास्तीत जास्त संसाधनांचा वापर म्हणजे विकास असे म्हटले जाते. परंतु विकास करताना माणूस कुठल्या स्तराला जाऊन पोचला आहे. खरोखर विकास झालाय की जीवनाच्या नीतीमूल्यांचे, विचारांचे अवमूल्यन झाले आहे हा प्रश्न आहे.”
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शंभर एकर परिसरात जैवविविध्यता आहे. या ठिकाणी दोनशेहून अधिक प्रजातींचे दहा हजारहून अधिक वृक्ष आहेत. त्यामुळे या परिसरात परदेशी स्थलांतरित पक्षीही वास्तव्यासाठी दरवर्षी येतात. हा परिसर अधिक जैववैविध्य संपन्न करण्याच्या उद्देशाने आज शंभर प्रजातींचे एक हजार वृक्षांच्या लागवडीचा शुभारंभ केल्याची माहिती पर्यावरण समितीचे अध्यक्ष विवेक मठकरी यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.
पुणे, दि. १८: बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी (पुणे) यांच्यावतीने युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भरती मेळावा ४ ऑगस्ट २०२५ पासून खडकी, पुणे येथे पार पडणार असून अग्निवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर (ट्रेड्समन ८ वी व १० वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुल्या श्रेणीसाठी) यांची भरती केली जाणार आहे.
पात्र उमेदवारांची प्रारंभिक तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, सॉफ्टवेअर नोंदणी आणि शारीरिक मापन चाचणी पुढील वेळापत्रकानुसार केली जाईल. अग्निवीर खेळाडू खुल्या श्रेणीसाठी (फुटबॉल, पोहणे, हॉकी, बास्केटबॉल, रोइंग, सेलिंग आणि ट्रायथलॉन) ४ ऑगस्ट २०२५ रोजी, ५ ऑगस्ट रोजी अग्निवीर सामान्य कर्तव्य (शीख : मजहबी आणि रामदासी) ६ व ७ ऑगस्ट रोजी सामान्य कर्तव्य (मराठा), ८ ऑगस्ट २०२५ रोजी सामान्य कर्तव्य (इस्लामिक सहकार्य आणि मुस्लिम संघटना) व अग्निवीर तांत्रिक (आखिल भारतीय सर्व वर्ग), ९ ऑगस्ट २०२५ रोजी अग्निवीर व्यापारी, ८ वी व १० वी उत्तीर्ण (खुला वर्ग) संगीतकार, शेफ, ड्रेसर, स्टीवर्ड, सपोर्ट स्टाफ, वॉशरमन, मेस कीपर आणि हाऊस कीपर) यांच्यासाठी प्रारंभिक तपासणी आदी कार्यवाही केली जाईल.
सर्व उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी सकाळी ५ ते ८ या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. फुटबॉल, पोहणे, हॉकी, बास्केटबॉल, रोइंग, सेलिंग आणि ट्रायथलॉन क्रीडा शाखेतील उमेदवारांचे मूल्यांकन २५ जुलैपासून केले जाईल. बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, जनरल स्टाफ (क्रीडा) यांच्याकडून प्रायोजित उमेदवारांनाच भरती प्रक्रियेसाठी ४ ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
भरतीप्रक्रिया मुख्यालय बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र यांच्या आदेशाने पुढे ढकलली किंवा रद्द केली जाऊ शकते. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.bsakirkee.org या संकेतस्थळाला भेट देऊन सेवा, अटी व आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ००००
पुणे दि. 18 : शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत युरोप-नेदरलॅन्ड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाईन्स, चीन, दक्षिण कोरिया या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषय तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब, त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या- त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी या दौऱ्यात देण्यात येणार आहेत. या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावणे हा या दौऱ्यांमागील उद्देश आहे.
युरोपातील नेदरलॅन्ड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स या देशात फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन, इस्राईल मध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण, जपानची सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान ही तेथील शेतीची वैशिष्ट्ये आहेत. मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाईन्स या देशात फळे व भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान, चीनमध्ये विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो, दक्षिण कोरिया देशात आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान पहायला मिळाणार आहे.
शेतकरी अभ्यास दौऱ्याकरीता निवडीचे निकष पुढील प्रमाणे राहील. लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. स्वत:च्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उत्तारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र, शेतकऱ्याचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. आधार प्रमाणपत्राची प्रत द्यावी. शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. शेतकऱ्याचे वय २५ वर्षे पूर्ण असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक असावा. शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए अभियंता, कंत्राटदार आदी नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसाहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये एक लाख प्रती लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. शेतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याचा १०० टक्के खर्च प्रवासी कंपनीकडे आगावू स्वतः भरावा लागेल व दौरा पूर्ण झाल्यावर अनुदानार्थ रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल.
इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
बारामती, दि. 18: सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय व राज्य सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 19 जुलै 2025 रोजी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
यानुसार 19 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा स्पर्धा संपेपर्यंत शहर व परिसरातील वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
बारामती शहरातील भिगवणकडे जाणारी वाहतूक तीन हत्ती चौक-माळावरची देवी-संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग ते भिगवण रोडकडे तसेच भिगवणकडून बारामतीकडे येणारी वाहतूक डायनामिक्स कंपनी ते एअर पोर्ट रोडकडे वळविण्यात येत आहे. जळोची माळावरची देवी-मोतीबाग कडून इंदापूर रोड अशी किंवा वंजारवाडी येथील स्व. गोपीनाथ मुंडे चौक येथून डाव्या बाजुने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने जळोची मार्गे माळावरील देवी इंदापूर रोड वळविण्यात येत आहे.
पाटस रोड-देशमुख चौकाकडून येणारी वाहतूक रेल्वे ब्रीज उतरल्यानंतर वळून रेल्वे रुळाच्या बाजूने मेहता हॉस्पीटल मार्गे महिला हॉस्पीटल मार्गे एम.आय.डी.सी.कडे वळविण्यात येत आहे. पाटस रोड पालखी महामार्गाकडून एम.आय.डी.सी.कडे जाणारी वाहतूक विमानतळाच्या बाजूचा पालखी मार्ग-रेल्वे सर्कल-नवीन पालखी मार्ग याप्रमाणे वळविण्यात येईल. भिगवण रोडकडून पाटसकडे जाणारी वाहतूक नवीन पालखी मार्ग रेल्वे सर्कल पुढे चार पदरी पालखी मार्गाने पाटस कडे वळविण्यात येत आहे.
तीन हत्ती ते पेन्सील चौक ते असा दोन्ही दोन्ही बाजूचा मुख्य मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात येत असून मार्गाच्या दोन्ही बाजूला रहिवाशी निवासस्थाने आहेत. निवासस्थानातील नागरिकांची वाहतूक मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवारस्त्याने करण्यात येत आहे.
पुणे बाजूकडून मोरगाव रोडने भिगवणकडे जाणारी वाहतूक महात्मा फुले चौकातून कारभारी सर्कलकडे न पाठवता महात्मा फुले चौकातून देशमुख चौक-सातव चौक-रेल्वे पुलाकडून डाव्या बाजूकडे मेडीकल कॉलेजकडे पाठविणेत येत आहे.
फलटण रोडकडून बारामतीकडे येणारी वाहतूक ही कारभारी सर्कलकडे न पाठविता फलटण चौकातून रिंग रोडने वाबळे हॉस्पीटल रोडकडे पाठविण्यात येत आहे.
शारदानगर अॅग्रीकल्चर कॉलेज ते कारभारी सर्कलकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत असून पर्यायी मार्ग म्हणून कॅनॉल रोडने जामदार रोडकडे वळविण्यात येत आहे.
मुंबई, १८ जुलै २०२५ : महाराष्ट्राची समृद्ध मराठी भाषा राज्याच्या सीमा ओलांडून देशभर तसेच परदेशात प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन यांनी भेट घेऊन मराठी भाषेच्या प्रसारासंदर्भातील मंडळाची भूमिका आणि पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीला उद्योग व मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत आणि देवदत्त राजोपाध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशनाचे निमंत्रण आणि निवेदन सादर करण्यात आले.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुढाकाराने या विषयावर प्राथमिक बैठकही पार पडली होती. त्यांच्या दालनात झालेल्या या चर्चासत्रास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, मिलिंद महाजन व देवदत्त राजोपाध्ये उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन संपूर्ण बाब अवगत करण्यात आली.
“मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राबाहेर व देशभर प्रभावीपणे कसा करता येईल?” या विषयावर या बैठकीत सखोल विचारमंथन झाले. बृहन्महाराष्ट्र मंडळाची या कार्यातील सक्रिय भूमिका कशी असू शकेल, यावरही विस्तृत चर्चा झाली.
यानंतर १४ जुलै २०२५ रोजी डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात मंत्री उदय सामंत यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. “मराठी भाषेच्या प्रसारासाठी ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जातील,” अशी ग्वाही यावेळी मंत्री सामंत यांनी दिली.
विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार
मुंबई/ संगमनेर १८ जुलै २०२५
महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले? त्यांनी कोणते फंडे वापरले? पक्ष कसे फोडले? चुकीचे निकाल कसे दिले ? हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची घानाघाती टीका काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभेमध्ये झालेला राडा, आमदार निवासातील भांडण आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीड मधील निरापराध सरपंचाला ज्या पद्धतीने मारले गेले. ते मानवतेला लाज वाटणारे आहे. एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. एक आमदार कॅन्टीन मधील वेटरला मारहाण करत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गुंडांनी मारहाण केली ते गुंड भाजपचे पदाधिकारी आहेत.
एखाद्या समाजाला विरोध करायचा, वडीलधाऱ्यांना काहीही बोलायचे अशी भाजपने काही गुंड आणि वाचाळवीरांना मुभा दिलेली आहे. एक प्रकारे राज्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, किती पक्ष फोडले, कसे चुकीचे निकाल दिले हे सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात नियंत्रण नाहीत. गुंड फोफावले आहेत. दहशत निर्माण झाली आहे. आणि ही दहशत भाजप पुरस्कृत असून राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्या पक्षाला हे लाजिरवाने आहे.
मी चाळीस वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम केले अशी संस्कृती कधीही नव्हती .वादविवाद असतात परंतु त्यानंतर चहापानासाठी एकत्र यायचे. परंतु सध्या गुंड विधानसभेत येत आहेत. मारहाण करतात. त्या गुंडांना संरक्षण दिले जाते आहे. मारहाण करणाऱ्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला मात्र शिक्षा हा काय प्रकार आहे. हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे. विधानसभेमध्ये झालेला राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याचबरोबर प्रवीण गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर आणि संत परंपरांचे विचार समतेचे व बहुजनांचे विचार सांगत आहेत. हा विचार काही कडवट लोकांना सहन झाला नाही. आणि त्यातून त्यांच्यावर हल्ला झाला आहे हा काटे कोण आहे. तो गुंड आहे आणि तो पदाधिकारी आहे. त्याला पद दिले जात आहे .या काटे मागचे खरे सूत्रधार शोधले पाहिजे. असे काटे जनतेने मोडून काढले पाहिजे. अशा प्रसंगी जनतेने अधिक संवेदनशील होऊन जागृत झाले पाहिजे. सरकार विरोधात आवाज उठवला पाहिजे आम्ही तर लढणारच आहोत परंतु जनतेनेही याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
महायुती सरकार अनेक खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे अमिष दाखवले. मात्र पंधराशे वेळेवर दिले जात नाही . अनेक लाडक्या बहिणींची नावे दररोज कमी केली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेतकरी अडचणीत आहे खरे तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र आता सरकार याबाबत बोलत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे असेही ते म्हणाले.
तर निळवंडे कालव्याबाबत बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की धरण व कालवे आपण दुष्काळी जनतेसाठी निर्माण केले. यावर्षी मी आणि जून मध्ये चांगला पाऊस झाला ओहर फ्लो चे पाणी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी आपण शासनाला पत्र दिले. आता उर्वरित वितरिकांची कामे लवकर व्हावी व या पाण्यापासून उपेक्षित जो शेतकरी आहे त्याला पाणी मिळावे अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
पुणे- डॉ.अण्णाभाऊ साठे यांना सरकार भारतरत्न पुरस्कार का नाही देत ? असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला आहे.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ, अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दहावी व बारावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा सत्कार समारंभ व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते . डॉ श्रीपाल सबनीस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन चरीत्र्यावर आधारीत खास शैलीमध्ये अण्णा भाऊचा संपूर्ण जिवन प्रवासाचे वर्णन करतांना म्हणाले की अण्णा भाऊचा साहित्य है जगविख्खात साहित्य असुन त्यांच्या शाहिरीचा संपूर्ण जगामध्ये गौरव केला जात आहे म्हणूनच त्यांना जगविख्यात साहितिक शाहिर म्हणून ओळखलं जाते अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्व उच्छ नागरिक किताब का नाही दिला जात असा सवाल त्यांनी सरकार ला केला आहे ? पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांचा सत्कार डॉ . श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याच बरोबर त नुकत्याच झालेल्या विधी व न्याय विभागाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कु. सबोरी अण्णा लोंढे हिने दंडाधिकारी म्हणून तिने पदवी प्राप्त झाली तिचे त्याचबरोबर काशिवाडी भागातील रहिवाशी, मनपा शाळेत शिकून संपूर्ण शिष्यवृत्ती वर अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेला समाजातील तरुण विद्यार्थी कु.ओम गायकवाड यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्ख संयोजक व संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी यादवराव सोनवणे , साहित्यिक संपत जाधव अँड. एकनाथ सुगावकर दादासाहेब सोनवणे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष सौ लक्ष्मीताई पवार सचिव दीपक कसबे , मातंग एकता आंदोलन संघटनेचे महिला आघाडीचे अध्यक्षा अँड. राजश्रीअडसूळ, सौ.सुरेखा खंडाळे, विठ्ठल थोरात , अरुण गायकवाड, विठ्ठल गायकवाड , दयानंद अडगळे, रवी आप्पा पाटोळे , सुनिल बावकर, विलास कांबळे उपाध्यक्ष, संघटनेचे शहरातील पदाधिकारी शाखा प्रमुख त्याचबरोबर शहरातील विविध भागातील इयत्ता दहावी आणि बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. राजश्री अडसूळ, यांनी केले तर आभार दयानंद अडागळे यांनी मांडले.
भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधारकार्ड मध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट करण्यात यावाअशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा तसेच जागतिक आरोग्य संघटना आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक श्रीमती सायमाजी वाजेद यांना निवेदन देत केली आहे.. माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाचे कागदपत्रांपैकी एक म्हणजे आधारकार्ड हा ओळखीचा पुरावा दिलेला. आधार कार्ड हे एक असे कागदपत्र बँकिंग आणि दूरसंचार क्षेत्रात एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा बँक खाते क्रमांक आणि टेलिफोन नंबर त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडला जातो. आधारकार्ड वर १२ अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. त्यामध्ये नागरिकांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, फोटो आणि इतर आवश्यक माहिती असते. त्यामुळे भारतीय नागरिकांना त्यांची ओळख दाखवण्यास अत्यंत सुलभ झाले आहे. आजच्या काळात प्रत्येकठिकाणी आधारकार्ड हे वापरले जाते आणि ते प्रत्येक भारतीयास आवश्यक मानले जात आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीचा रक्तगट हा रक्तगट महत्त्वाचा असतो कारण तो वैद्यकीय उपचारांमध्ये, विशेषतः रक्त संक्रमणाच्या वेळी अत्यंत आवश्यक असतो. रक्तगट जुळल्यास, गंभीर आरोग्य समस्या टाळता येतात.रक्तगट महत्त्वाचे कारण रक्त संक्रमण, गर्भावस्थेतील गुंतागुंत, अवयव प्रत्यारोपण,आजारांचा धोका या वेळी रक्तगट महत्त्वाची भूमिका बजावतो. जसे की रक्त संक्रमणाच्या वेळी, रक्तगट जुळणे आवश्यक आहे. विसंगत रक्तगटाचे रक्त दिल्यास, रक्ताच्या गुठळ्या होऊन गंभीर समस्या किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. आई आणि बाळ यांच्यातील रक्तगट जुळणे आवश्यक आहे. विशिष्ट परिस्थितीत, विसंगत रक्तगट माता आणि बाळासाठी धोकादायक असू शकतो. अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी, रक्तगट जुळणे महत्वाचे आहे, कारण यामुळे प्रत्यारोपित अवयवाचे शरीर सहजपणे स्वीकारू शकेल. काही विशिष्ट रक्तगट विशिष्ट आजारांसाठी अधिक संवेदनशील असू शकतात. मात्र आता रक्तगट जाणून घ्यायचा असल्यास त्यामध्ये बराच वेळ निघून जातो. एखादा अपघात किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती झालेल्या घटनेमध्ये अपघाती नागरिकांना दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. त्यावेळी त्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास रक्तगट माहित नसल्यामुळे उपचारामध्ये दिरंगाई होणे किंवा चुकीचे रक्तगट दिले जाणे यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आधारकार्ड मध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट झाल्यास त्या व्यक्तीला कोणत्याही अपघाती घटनेमध्ये रक्त देण्याची वेळ आल्यास आधारकार्ड मध्ये रक्तगट समाविष्ट असल्याने रक्त देण्यास सुलभ होऊ शकते.
महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा पारित केलेला आहे. या कायद्यामधील तरतुदी ह्या लोकशाही प्रणालीच्या विरूध्द आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे, याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबुब नदाफ, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रविंद्र माझीरे, अजित जाधव, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, राज अंबिके, प्राची दुधाने, अनिता धिमधिमे, सीमा सावंत, अनुसया गायकवाड, सुंदर ओव्हाळ, प्रियंका मधाळे, सीमा महाडिक, कांचन बालनायक, मंदा जाधव, ज्योती परदेशी, सतिश पवार, ॲड. रमेश पवळे, सचिन दुर्गोडे, संदिप मोकाटे, सुरेश चौधरी, भगवान कडू, संजय कवडे, नुर शेख, सुरेख नांगरे, लतेंद्र भिंगारे, वैभव डांगमाळी, विल्सन चंदेवळ, राजेश मोहिते, अनिल धिमधिमे आदींसह असंख्य काँग्रेसजण सहभागी होते.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘संविधानिक मूलभूत अधिकारांचा गळा घोटणारा जन सुरक्षा कायदा २०२४ महाराष्ट्र सरकारने चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बहुमताच्या जोरावर नुकताच पास केला आहे. सरकारच्या असंविधानिक, चुकीच्या ध्येय धोरणावर जो जो विरोधी पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक टिका टिपणी करतील, सरकारच्या विरोधात बोलतील, न्यायासाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील त्या त्या पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना विना चौकशी जेलमध्ये टाकण्याचा अधिकार या जन सुरक्षा कायद्याने सरकारला मिळाला आहे. संविधानिक मार्गाने काम करणारे विरोधी पक्ष संघटना, शिव शाहू फुले आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी, शेतकरी कामगार संघटना यांना संपवण्यासाठीच सरकार या कायद्याचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार, लेखक यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा कायदा आहे. तरी या जुलमी असंविधानिक कायद्याच्या विरोधात सर्व संविधान समर्थक लोकशाहीवादी बंधू, भगिनी यांनी एकीची वज्रमुठ आवळून, या संविधान विरोधी काळ्या कायद्याला आम्ही विरोध करीत आहोत. जनसुरक्षा विधेयकावर १२ हजारांपेक्षा जास्त व्यक्ती व संघटनांनी सुचना आणि आक्षेप नोंदवलेले आहेत, त्याची जनसुनावणी घेतलेली नाही. संयुक्त समितीत आमदारांचे म्हणणे ऐकूण घेतले पण लोकांच्या मनात या विधेयकावर अनेक शंका आहेत त्या दुर करण्याची गरज आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेले कायदे नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी सक्षम असताना नव्या कायद्याची गरजच काय.’’