Home Blog Page 421

पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई – राज्य सरकारने पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण करून पुणे, मुंबईच्या एकत्रित विकासाला चालना द्यावी, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना केले.

सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी भाग घेतला. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी विकसित होत आहे, त्याचबरोबर पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण करावे, ही सध्याची गरज आहे. त्यातून पुणे, मुंबई इकॉनॉमिक रिजनच्या एकत्र विकासाला चालना मिळेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. पुणे विभागात महिला व्यावसायिकांकरीता ‘स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र’ निर्माण करावे, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली.

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या उद्दीष्टाकडे नेणारा उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी आणि सेवा क्षेत्र याचे संतुलन साधणारा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या घोषणेची ग्वाही देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे या अर्थसंकल्पाचे वर्णन आमदार शिरोळे यांनी केले.

मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीशील भूमिकेमुळे दाओस येथील आर्थिक परिषदेत अनेक कंपन्यांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे १६ लाख रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला. राज्याने निर्यातीत वाढ होण्यासाठी धोरण आखले, त्यामुळे राज्यातील निर्यातीचे प्रमाण १५.४ टक्के झाले. राज्याने लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली त्यातूनही रोजगार निर्मिती होईल, असे शिरोळे म्हणाले.

पुण्याचे औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. तळेगाव ते चाकण २५ किलोमीटरचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) प्रस्तावित केला आहे. पुणे ते शिरूर ५४ किलोमीटरचा उन्नत रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक पट्टा आणि पुणे ते नगर प्रवास करणाऱ्यांना फायदा होईल. वाहतूक कोंडीतूनही मुक्तता होईल. पुण्यामध्ये मेट्रोच्या विस्ताराला उत्तम गती मिळाली आहे आणि असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. तसेच सुमारे दोनशे सत्तावीस डिझेल बसेस ह्या लवकरात लवकर सी एन जी मध्ये रूपांतर कराव्यात आणि पुण्याला अजून तीन हजार बसेस ची गरज असून लवकर त्यावर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शिरोळे यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. तसेच पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याचे काम सरकार ने करावे अशी ही सूचना शिरोळे यांनी केली.

प्रस्तावित पुणे-नाशिक इंडस्ट्रिअल एक्स्प्रेस वे चा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प ३ वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता दिल्याबद्द्ल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले.

शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार, मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार:शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार

मुंबई दि. १२ मार्च २५
आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक दिली. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकारातून काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द या घोषणांनी आझाद मैदान दणाणून सोडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वड्डेटीवार, आमदार कैलास पाटील, प्रविण स्वामी, दिलीप सोपल, सचिन अहिर, राजेश विटेकर, राजू नवघरे, अरुण लाड, जयंत आसगावकर,माजी खासदार राजू शेट्टी, आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाडगे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गिरीश फोंडे, उपस्थित होते.

अंबादास दानवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातील एका भाषणातील व्हिडीओ क्लिप ऐकवली. शक्तीपीठ रद्द करणार असे ते जाहीर भाषणात म्हणाले होते. मग आता तो रद्द होत नाही म्हणजे फडणवीस तुमचं ऐकत नाही असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

जयंत पाटील म्हणाले, एकाही शेतकऱ्याची मागणी नसताना सरकार हा रस्ता करत आहे. राज्यात असे अनेक रस्ते आहेत ते मागणी नसताना होत आहेत हा चमत्कार आहे. पक्षनिधी उभा करण्यासाठी सरकारने हा नवा मार्ग अवलंबला आहे. कंत्राटदार यांना पोसण्याची ही नवी साखळी आहे, ठराविक सहा जणांना कामे दिली जातात याचा भुर्दंड आपल्या सर्वांवर बसत आहे. तुम्ही शेतकरी याला विरोध करणार असाल तरच आम्ही यात पुढाकार घेतो. यावेळी उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी जयंत पाटील यांना समर्थन देत शक्तीपीठ महामार्ग विराधात जोरदार घोषणा दिल्या.

आमदार सतेज पाटील म्हणाले, कुणाचे तरी वाळू सिमेंट खपवण्यासाठी हा महामार्ग कंत्राटदारांसाठी झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जो गरजेचा रस्ता आहे त्याला कोणी विरोध करत नाही मात्र हा रस्ता नको म्हणत असतानाही सरकार तो रेटत आहे. ठेकेदाराला हवे असणारे कामच हे सरकार करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तीपीठ रद्द झाल्याची घोषणा केली पण आता त्यांना विसर पडला आहे. विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, हे सरकार डबल धूलकी सरकार आहे. खाण्यासाठी हे एकत्र येतात आणि लोकांचे हित पाहताना मात्र विराधाभास दाखवतात. सद्याचे सरकार टक्केवारीवर चालते. सध्या 9 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. ज्यांनी पक्षांशी गद्दारी केली त्यांनी शेतकऱ्यांनाही फसवले.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग म्हणजे देवाची आळंदी सोडून चोराची आळंदी करता कशाला. ज्या ज्या ठिकाणी नव्या रस्त्यावर टोल उभारले आहेत त्यांची 25 टक्के सुद्धा वसुली होत नाही.
आमदार विश्वजित कदम म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याला विरोध केला जात असताना याची फिकीर नाही.

जमीन मोजणी केली असेल तर त्या खुणा मुजवा, उपसून टाका असे आवाहन शेट्टी यांनी केले. हा रस्ता झाला तर कोल्हापूर जिल्ह्यात ४० दिवस पूर हटणार नाही.पूर्ण शेती पुराच्या पाण्यात जाणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.

लातूरला ८ एप्रिल ला मेळावा
शक्तीपीठ महामार्गचा हा लढा पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या ८ एप्रिलला लातूर येथे भव्य मेळावा घेण्याचा निर्णय या मोर्चात घेण्यात आला. प्रत्येक जिल्यात मेळावे, स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्री यांना जाब विचारण्यासाठी घरावर मोर्चे काढणार, सरकार निर्णयाचा निषेध म्हणून शेतात काळे झेंडे लावणार असे निर्णय यावेळी घेण्यात आले.

सतेज पाटील यांनी दाखवली ताकद
या मोर्चाला किती लोक उपस्थित राहतील याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चाला आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक उपस्थिती होती. शक्तीपीठ महामार्गाचा विषय आमदार सतेज पाटील यांनी शेवटपर्यंत लावून धरल्याने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

२५२ सीसीटीव्ही तपासुन अखेरीस लावला त्या २ अल्पवयीन मुलींना शोधले

पुणे-अपह्त झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा सीसीटीव्ही कॅमे-याच्या फुटेजचे आधारे शोधुन काढण्यात फरासखाना पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश आले आहे.
फरासखाना पोलीस स्टेशन येथे दिनांक ०७/०३/२०२५ रोजी १४ वर्षे व ८ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुली तितली फाऊडेशन बुधवार पेठ पुणे येथुन अपह्त झाल्याची तक्रार नोंदवली गेल्याने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ सदर घटनेची दखल घेवुन तपासाबाबत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ श्री. संदिप सिंग गिल्ल पुणे शहर यांना आदेश दिले.
त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ संदिप सिंग गिल्ल यांनी लागलीच परिमंडळ १ मधील गुन्हे पथकाचे पोलीस अधिकारी व पो. अंमलदार यांना वर नमुद गुन्हयाचे अनुषंगाने तैनात करुन, फरासखाना पोलीस ठाण्याचेवरिष्ठ पोलीस निरिक्षक व पोलीस निरिक्षक गुन्हे याचे देखरेखीखाली तपास करणेबाबत आदेश दिले.
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भस्मे यांनी फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव गायकवाड, पोलीस उप निरिक्षक अरविंद शिंदे व तपास पथकातील पोलीस अंमलदार व खडक पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना गुन्हयाचे अनुषंगाने सुचना देवुन वेगवेगळ्या ७ पथके तयार करुन त्यांना कामाची विभागणी करुन दिले. त्याप्रमाणे तपासकामी नेमण्यात आलेल्या ७ पथके यांनी एकमेकांचे संपर्कात राहुन, वर नमुद गुन्हयातील अपह्त झालेल्या दोन अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही फुटेजचे मदतीने शोध सुरु केला, गुन्हयाचे अनुषंगाने पासोडया विठोबा मंदिर, बुधवार चौक, शिवाजी रोड, स्वारगेट सीटी बस स्टॅण्ड, ससुन हॉस्पीटल, पुणे स्टेशन, केशवनगर, पदमावती सहकारनगर भागात जवळपास २५२ सीसीटीव्ही कॅमे-याच्या तपासुन, सीसीटीव्ही फुटेज चे मदतीने दोन अल्पवयीन मुलीचा माग काढुन, त्याचा शोधु घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमारपाटील, पोलीस उप-आयुक्त परी-१ संदिप सिंग गिल्ल, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, पोलीस उप निरिक्षक संतोष गोरे, सपाफौ गेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, तानाजी नागंरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, अविनाश गोपनर, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, अर्जुन कुंडाळकर, अमोल गावडे, भाग्येश यादव, शोएब शेख, मयुर काळे, सागर मोरे यांनी केलेली आहे.

महापालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा कधी मंजूर होणार; पठारे यांचा अधिवेशनात सवाल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार यांनी महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या लोहगाव सह इतर गावांच्या विकास आराखड्याबाबतीत शासनाचे लक्ष वेधले. पठारे म्हणाले, “समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप शासनाकडून मंजूर न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गावांमध्ये डीपी (विकास आराखडा) प्लॅन नसल्यामुळे नागरिकांच्या जमिनी, भूखंड आणि बांधकाम संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया रखडल्या आहेत. परिणामी, अनेक कुटुंबांना मालमत्तेच्या संदर्भातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख रस्ते, जोडरस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून, याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.” महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील संबंधितांकडून हप्ते वसूली होत असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार पठारे यांच्या ठोस मागणीनंतर उद्योग मंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांनी या सर्व बाबींची सखोल शहानिशा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. यामुळे वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या त्वरित हस्तक्षेपामुळे या भागातील नागरी समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा आहे.

एचएसआरपी नंबर प्लेटलावण्याची मुदत ३ महिने वाढवा-आमदार शिरोळे यांची मागणी

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्याचे काम चालू झाले आहे. नंबरप्लेट लाण्यासाठीची मुदत तीन महिने वाढवून मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत आज (बुधवारी) केली आहे.

एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे सुप्रीम कोर्टाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, राज्यात वाहनांना नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे. केवळ पुणे शहरातच सर्व प्रकारची ४० लाख वाहने आहेत. आजपर्यंत फक्त २ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात आली आहे. वाहनांची मोठी संख्या पाहता ३० एप्रिल पर्यंत पुण्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे सध्याच्या वेगाने अशक्य आहे. आरटीओ कार्यालयांत त्यासाठी सक्षम व्यवस्था नाही. हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत. केवळ पुण्यातच नव्हे तर राज्याच्या विविध शहरांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे, याकडे आमदार शिरोळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

तसेच या नंबर प्लेट लावणारी सेंटर्स कमी असल्यामुळे नागरिकांना अपॉइंटमेंट लवकर मिळत नसून, राज्यात सेंटर्स वाढवून द्यावीत आणि नंबर प्लेट लावून देण्यासाठीची मुदत ३ महिने वाढवून द्यावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र आमदार शिरोळे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही पाठविले आहे.

अवघी दुमदुमली आळंदी

पुणे-नभी फडकणारी भगवी पताका अन मुखी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराज की जय’ चा जयघोष क्षणाक्षणाला वाढणारा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि त्यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं, निमित्त होत.. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं. रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर अशा आनंदानुभव उपस्थितांनी याप्रसंगी घेतला. येत्या १८ एप्रिलला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटातील आपल्या संत भूमिकेच्या रूपात दर्शन दिलं.

असामान्य बुद्धिमत्ता आणि भक्तीयोगमार्गात उच्च स्थान प्राप्त केलेल्या संत मुक्ताई या अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे जीवन जगल्या. मानवी मनाचे समुपदेशन करणाऱ्या आदीशक्ती मुक्ताईचे नाव स्त्री संतांच्या मांदियाळीत प्रामुख्याने घेतले जाते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई. ही चारही भावंडे विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तीमंत दिव्य स्वरूप होत. बोलण्यात स्पष्टता आणि कठोरता असणाऱ्या मुक्ताईने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी भावंडांचे आईपण स्वीकारत शिष्यांवर मायेची चादर पांघरली. अशा संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

केलेली पापे इथेच फेडायची आहेत… मानकरांचा हल्लाबोल

अजितदादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. धंगेकर यांना कडक भाषेत सुनावले

पुणे- रविंद्र धंगेकर ने अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’रविंद्र धंगेकरने स्वतः चार दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्याची लायकी आहे का ? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन हा गद्दार निवडून आला नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागला. पुण्यातील पब संदर्भात आंदोलन करायची हप्ते वसुल करून नंतर आंदोलन स्थगित करायची. कॉर्पोरेशनच्या कामांमध्ये बिल्डर लोकांची कामे अडवून खंडणी वसूल करायची.लक्ष्मीरोडच्या सराफांकडून घर दुरुस्तीच्या नावाने कॉर्पोरेशन कडून बांधकामाला परवानगी घेवून सगळ्या सोन्या मारुती चौकातील बांधकामे बेकायदेशीर करून पैसे वसूल करायचे. वक्फ बोर्डाची मुसलमान समाजाची गणेश पेठेतील जमीन गिळंकृत केली. लाचलुचपत खात्यात त्याच्या विरोधात १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली याची चौकशी सुरु आहे. क्राईम ब्रांच युनिट १ ला खंडणीचा गुन्हा प्रलंबित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा पडीक आमदारास दादांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही. वाटेल ते स्टेटमेंट करतोय. दादांनी त्याला दाखवले आहे. ज्या दिवशी बडगा दाखवतील त्यावेळी ह्या बांडगुळाला त्याची लायकी समजेल. शिंदे गटात जाऊन स्वतःला भविष्यात पोलिसांकडून होणारा त्रास कमी होणार नाही. गृह खाते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. याची जाणीव ठेवा. केलेली पापे इथेच फेडायची आहे. मुस्लीम समाजाला वापरून त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केलेली आहे. शिक्षण मंडळाच्या बालवाडी शिक्षिका, सेविका यांना कायम करण्यासाठी करोडो रुपये वसूल केले. त्या गरीब महिलांनी स्वतःचे दागीने मोडून पैसे दिलेत. काही महिला एजंट,काही कार्यकर्ते पैसे वसुलीसाठी नेमले होते. याची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी म्हणजे ह्या भुरट्याचे सत्य समोर येईल.
ज्या काँग्रेस पक्षाने लोकसभा,विधानसभेची अनेकांना डावलून ह्या धंगेकरला उमेदवारी दिली.त्याने फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांना वापरून आपला रंग दाखवला. हा कोणाचा होवू शकत नाही.शिंदे साहेबांना ह्याचा अनुभव येईल. त्यावेळी बराच उशीर झालेला असेल. हा Who is Dhangekar नाही तर He is Real Criminal Dhangekar हे सत्य तुमच्या समोर लवकरच येईल. अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही. फालतु वाचाळ बडबड मिडीयाच्या माध्यमातून सारखी कडून सवंग प्रसिद्धी मिळवू नका. हीच मिडिया लवकरच तुमच्या विरोधातील बातम्या तुम्ही केलेल्या वाईट कर्माच्या बातम्या प्रसिद्ध करतील.

स्वारगेट बसस्थानकाचा वीजपुरवठा सुरळीतच- महावितरण

मंगळवारी रात्रभर वीज खंडित नव्हती

पुणे, दि. १२ मार्च २०२५: स्वारगेट येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. ११) रात्रभर सुरळीतच होता. वीजपुरवठ्यामध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. तथापि, स्वतंत्र वीजजोडणी असलेल्या बस आगारामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दोन फेज सुरु असले तरी हायमास्ट व कार्यालयांचा वीजपुरवठा सुरु होता असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे. स्वारगेट बसस्थानकामध्ये काल रात्रभर वीज खंडित होती का याबाबत बुधवारी (दि. १२) सकाळपासून माध्यमांद्वारे विचारणा होत आहे. त्यासंदर्भात महावितरणकडून हे स्पष्टीकरण करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानक व आगारासाठी स्वतंत्र उच्चदाबाची वीजजोडणी आहे. यातील बसस्थानकाचा वीजपुरवठा अखंडित व सुरळीत आहे. तर आगाराच्या जोडणीला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये काल सायंकाळी बिघाड झाला. मात्र महावितरणकडून दोन फेजद्वारे आगारामध्ये कार्यालयीन व हायमास्ट दिव्यांचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला होता. बिघाड झालेली वीजवाहिनी उड्डाणपुलाखालील कॉन्क्रीट रस्त्याखाली आहे. त्यामुळे आगाराला पर्यायी व्यवस्थेतून तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र स्वारगेट बसस्थानक व आगाराच्या वीजपुरवठ्यात मंगळवारी (दि. ११) रात्रभर कोणताही व्यत्यय आलेला नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

करीअर सोबतच मुलांवर चांगले संस्कार करा-सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष : महिला उद्योजिकांचा सन्मान

पुणे: महिलांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेत केवळ आर्थिक स्वावलंबनच नव्हे, तर संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, व्यवसाय किंवा नोकरी करताना महिलांनी केवळ पैसा कमविण्यावर लक्ष केंद्रित न करता, मुलांवर चांगले संस्कार देखील कसे करता येतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे.अशी भावना ज्येष्ठ उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल यांनी व्यक्त केली.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला उद्योजिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृणाली रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम अभिनेत्री वाळके उपस्थित होते. महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि शासकीय स्वयंरोजगारासाठी योजनांचे माहिती प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सारिका पाठक, सोनल गांधी या महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.    

कृष्णकुमार गोयल म्हणाले, महिलांचे कर्तृत्व मोठे आहे. रोज त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. अनेक रुपात त्या आपले कर्तृत्व पार पाडत असतात. तुळशीबाग गणपती शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. महोत्सव अंतर्गत वर्षभर सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

दीदी कृष्णा कुमारी यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार

पुणे – रोटरी क्लब ऑफ निगडी, पुणे यांनी साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांना शांतता आणि सौहार्द वाढविण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ७:०० वाजता एल्प्रो ऑडिटोरियम, एल्प्रो सिटी स्क्वेअर, चिंचवड, पुणे येथे झाला.निगडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुहास ढमाले यांनी मेळाव्याचे स्वागत केले आणि दीदी कृष्णा कुमारी यांनी असंख्य व्यक्तींना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि विकसित होण्यास कसे प्रेरित केले आहे यावर प्रकाश टाकला.डीजीएन रोटेरियन नितीन ढमाले यांनी सांगितले की, रोटरी अनेक मानवतावादी प्रयत्नांमध्ये सहभागी आहे, परंतु शांतीचे राजदूत विकसित करणे हे त्यांच्या ध्येयाचे केंद्रबिंदू आहे.पीस डायरेक्टर रोटेरियन. त्यानंतर रानू सिंघानिया यांनी दीदी कृष्णाची ओळख करून दिली आणि त्यांचे वर्णन असे केले की त्या खोल भावनिक बुद्धिमत्ता आणि खोल आध्यात्मिक बुद्धिमत्ता दोन्हीचे उदाहरण दिले. त्यांनी दीदींच्या केवळ शब्दांद्वारेच नव्हे तर त्यांनी दाखवलेल्या करुणेद्वारे शांती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलले.त्यानंतर, दीदी कृष्णा कुमारी यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुरस्कार देण्यात आले. आपल्या स्वीकृती भाषणात, दीदींनी नम्रपणे सांगितले की तिचे गुरू – साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी – अधिक पात्र होते. त्यांनी त्यांचे वर्णन ‘शांतीचा खरा पैगंबर” /दूत असे केले.
दीदींनी एका सामान्य गैरसमजाचे निराकरण केले: “बरेच लोक असा विश्वास करतात की ते एकटे वैयक्तिकरित्या जागतिक शांततेत योगदान देऊ शकत नाहीत. पण युद्धे कशामुळे होतात? मत्सर, स्वार्थ. जर हे आपल्या आतून सुरू झाले तर शांती देखील आली पाहिजे.” शांती हा जन्मसिद्ध हक्क आणि जीवनपद्धती आहे, असे दीदी कृष्णा म्हणाल्या.

त्यांनी शांती विकसित करण्याचे सहा सोपे मार्ग सांगितले: संयम निवडा, वर्तमानात जगा, कृतज्ञ रहा, क्षमा करायला शिका, निःस्वार्थ प्रेम करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवासोबत करा आणि पहिला क्षण शांततेत घालवा.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते आर.टी.एन. सुहास ढमाले, सचिव आरटीएन रवींद्र कदम, संचालक आरटीएन राणू सिंघानिया, डीजीएन आरटीएन नितीन ढमाले, आरटीएन राकेश सिंघानिया, आरटीएन सुजाता ढमाले, आरटीएन ईश्वर ठाकूर आदी मान्यवर व अन्य सन्माननीय रोटेरियन उपस्थित होते.संध्याकाळची सांगता दीदींच्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणेने झाली, जिथे उपस्थितांनी अलौकिक शांतीचे क्षण अनुभवले.पूर्वी ध्यानात रस नसलेल्या एका ६२ वर्षीय महिलेने सांगितले की, दीदींच्या शब्दांनी तिच्या विचारांना उजळून टाकले आहे.

दीदी कृष्णा बद्दल
दीदी कृष्णाने तिच्या आयुष्याची सुरुवात साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्या मार्गदर्शनाने केली. तो वासवानीच्या शिकवणींना समर्पित आहे आणि सर्व प्राण्यांसाठी प्रेम, सेवा आणि श्रद्धेचा संदेश पसरवत आहे. साधू वासवानी मिशनच्या प्रमुख म्हणून, त्या शिक्षण, आरोग्यसेवा आणि मदत कार्यातील मानवतावादी उपक्रमांची देखरेख करतात. ती तिच्या गुरूंचे ज्ञान सामायिक करण्यासाठी व्यापक प्रवास करते आणि विविध श्रोत्यांना संबोधित करते, ज्यात आंतरधर्मीय मेळावे आणि जागतिक शांतता मंचांचा समावेश आहे.

धंगेकरांनंतर अजून एक फायरब्रँड नेत्या सुलभा उबाळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला

0

पुणे-राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सध्या मिशन टायगर जोरात सुरू आहे. पुण्यात शिंदे उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसरा धक्का दिल्याचे समोर आलंय. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत.ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलंय. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

शहरातील तीनही मतदार संघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात पक्षाचं अस्तित्वचं शिल्लक नाही, पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्षसोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असं ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी म्हटलंय.

धंगेकर म्हणजे पुण्यातील कराड;काँग्रेसच्या अध्यक्षांचा आरोप
काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र या पक्षप्रवेशानंतर पुण्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी भीतीपोटी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याचा दावा केला तर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नाही. आमचा पक्ष कुठच कमी पडला नाही. पक्षाने त्यांना चारवेळा संधी दिली तरी पक्षाला सोडून गेले. मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले. काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे. त्यांना लीड घेता आलं नाही. अशी टीका काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांच्यावर केली.पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, धंगेकर पक्षासाठी काम करत नव्हते मात्र पक्षाने माझ्यासाठी काम केला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. यापुढे पक्षाला विनंती आहे की, अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही. हे संधीसाधूपणा करत आहेत, आम्ही पक्षाला सांगितलं होतं अनेकदा पक्षाच्या विरोधात काम करत आहेत, असे सांगितलं होतं. आम्ही कधीच त्यांच्यावर बोललो नाही. रस्त्यावर आम्ही उतरून काम केलं. देश राम मंदिर उत्सव साजरा करताना हे बाबरी मशीदवर बोलत होते, विचारधारा नाही. यांना एका पार्टीची लाइन धरता येत नाही. कुठल्याच बैठकीला, आंदोलनांना येत नाहीत, अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती. त्यांना अनेकदा समज दिली, मात्र बदल झाला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात, यांनी काय केलं नाही. एक नगरसेवक केला नाही, आम्हाला दुःख आहे की,अशा नाकर्त्यांवर आम्ही विश्वास ठेवला, यांनी केवळ मतलबी राजकारण केलं. असं देखील यावेळी अरविंद शिंदे म्हणाले.तर खासदार संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी पक्ष सोडला. वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता, विषय वक्फ बोर्डचा होता आणि या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून त्यांनी पक्ष सोडला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. त्यांच्या बायकोचा विषय नाही, वहिनींचं नाव कुठ नाही. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी राजकारण केलं असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.तसेच त्यांच्यामुळे पक्षाला कोणताही फायदा झाला नाही. यांच्यात हिम्मत असती तर समोर येऊन पत्र देऊन पक्ष सोडून गेले असते. तीन नगरसेवक असताना त्या पक्षातील लोकांनी अनेक विषय बाहेर काढले, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत.येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना हरवू त्यांना कायमचं माजी ठेवू. ससूनमधले विषय, ड्रॅग्सचे विषय पुढे का गेले नाहीत, स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन केली. पुढं या आंदोलनाचं काय झालं. असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या उच्च विचारांची परंपरा जपणे आपली जबाबदारी” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन कार्यक्रम

मुंबई दि. १२ मार्च २०२५ : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आज सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण केला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी त्यांना अभिवादन करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेच्या राजकारणाची संकल्पना रुजवली. मतभेद असले तरी समाजकारणाला महत्त्व द्यावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांची परंपरा जपणे ही आपली जबाबदारी आहे.”

तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होण्यासाठी मोठे योगदान दिले. सहकार, शेती, संस्कृती, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले.

शाळेत असताना आम्ही यशवंतराव चव्हाण यांना पाहिलं होतं. महाराष्ट्र गीताच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. ते नेहमी म्हणायचे की राजकारण हे सर्वांचं मिळून असतं, मात्र समाजकारण अधिक महत्त्वाचं आहे. मतभिन्नता असली तरी सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला जपणं आवश्यक आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अन्य मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत त्यांच्या योगदानाला स्मरले.

मंगळवार पेठेतील ‘तो’ भूखंड बिल्डरच्या गळ्यात मारू नका -आमदार टिळेकर

ज्या जागेवर कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव

मुंबई- पुणे येथील कर्करोग रुग्णालयासाठी नियोजित केलेली जागा खाजगी व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देऊ नका अशी मागणी आज येथे आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत केली .मंगळवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची ८९०० चौरस मीटर जागा नाममात्र मूल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास हस्तांतरित केल्याने पुण्यात कर्क रोग रुग्णालय निर्माण करण्यास अडथळा येणार आहे म्हणून ही जागा खाजगी व्यावसायिकाला देऊ नये अशी आग्रही मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात केली
त्यांनी सदर नियोजित जागेबाबत सभागृहात माहिती दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांचे कार्यालयाचे पत्रानुसार दिनांक५ मे २०१२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर मंगळवार पेठ पुणे येथील जागा ‘वैद्यकीय शिक्षण विभागास’ हस्तांतरित करण्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय यांनी सुचित करून त्या मोबदल्यात महामंडळाचे आर्थिक नुकसान शासनामार्फत भरून देण्याच्या अटीस अधीन राहून सदर मंगळवार पेठ, पुणे येथील जागा वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरित करण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची हरकत नसल्याचे दि.१२.०२.२०१३ रोजीच्या पत्रान्वये कळविले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार IAS यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करून बैठका घेऊन पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणेचा प्रस्ताव तयार झाला असून लवकरच तो मंत्रिमंडळ मान्यतेसाठी ठेवणार आहे असे सांगितले होते. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालय व छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कॅन्सर रुग्णालयात रुग्णांवर मोफत तसेच सवलतीच्या दरांत उपचार होतात परंतु, संपूर्ण राज्यातील रुग्णांचा भार या रुग्णालयांवर पडत असल्याने पुण्यासारख्या ठिकाणी ससूनच्या आवारात एक सरकारी कॅन्सर रुग्णालय उभे करण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी दिलेली होती.पुण्यात राज्यातून उपचारांसाठी रुग्ण येत असतात.त्यासाठी, ससून हॉस्पिटलच्या समोरील रस्ते विकास महामंडळाची जागा देण्याचे नियोजन केलेले होते. त्यासाठी सध्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व तत्कालीन ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी या जागेत साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु अद्याप त्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही.. ज्या जागेवर कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता ती मंगळवार पेठ, पुणे, येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मालकीची ८९०० चौरस मीटर जागा मे. एनजी वेंचर्स यांना भाडेतत्त्वावर विकासासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादितचे संचालक मंडळ यांचे दि.२९.०२.२०२४ रोजीचे बैठकीत मान्य केला आहे. कोट्यावधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा खाजगी बिल्डरला 70 कोटी रुपयाला लीज वर देण्याचा निर्णय घेतला.सध्या या जागेचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत आहे. सदर जागा मे. एनजी वेंचर्स यांना हस्तांतरित करावयाची असल्याने सार्वजनिक बांधकाम पुणे अंतर्गत असलेली कार्यालये व सदर कार्यालयाच्या इमारती इतरत्र हलवून व जागा मोकळ्या करून देणेबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे कळविले आहे. परंतु या जागेवर नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे कर्करोग रुग्णालयाची उभारणी करण्याची गरज आहे. सदरच्या जागेवर कर्करोग रुग्णालय न बांधता जर ती जागा खाजगी व्यवसायिकाला भाडेतत्त्वावर दिली तर नागरिकांमध्ये शासनाविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष वाढून आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे ही जागा खाजगी व्यावसायिकाला देऊ नये. या जागेवर कर्करोग रुग्णालय लवकर उभारावे अशी आग्रही मागणी आमदार टिळेकर यांनी केली.

विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे सासवड येथे आयोजन- सचिव सोनल पाटील

पुणे, दि. 12: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 16 मार्च 2025 रोजी वाघीरे कला, वाणिज्य आणि विज्ञान, महाविद्यालय, सासवड, जि. पुणे येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे.

या महाशिबीराचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहीते-डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हे महाशिबीर संपन्न होणार आहे.

या महाशिबीरास जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि सासवड या तालुक्यातील सुमारे 10 हजार 940 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागाच्या 75 पेक्षा अधिक स्टॉल असणार असून स्टॉलवर लाभार्थ्यांना संबंधित विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. यावेळी 50 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. तसेच शासकीय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) योजनांबाबतचे माहितीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या शिबीरात बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि सासवड या तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून या संधीचा लाभ लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.

उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येईल- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. १२: जिल्ह्यामध्ये अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक व विकास व्हावा यासाठी उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत आहे. उद्योगांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यालाही प्रशासनाचे उच्च प्राधान्य असून कोणत्याही घटकाकडून त्रास होत असल्यास उद्योगांनी खुलेपणाने, निर्भिडपणे त्याची माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

एमसीसीआयए येथे आयोजित औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम, मोठे उद्योजक, बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबाने, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासाला व अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम उद्योग क्षेत्र करते असे सांगून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असून त्यादृष्टीने शासन काम करत आहे. महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री २.०) पोर्टल या एकाच व्यासपीठावरुन उद्योगांना सर्व परवानग्या, सुविधा देण्याची व्यवस्था तयार करण्यात आली असून त्यामुळे गुंतवणुकीला व उद्योग उभारणीला चालना मिळणार आहे.

विभागात उद्योग उभारणी, त्यांच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, असामाजिक तत्त्वांकडून येणारे अडथळे आदींच्या अनुषंगाने उद्योगांशी संवाद साधण्यासाठी प्रशासन कायम उपलब्ध असून दर तीन महिन्यांनी उद्योगांसोबत आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आले असल्याने आता खासगी क्षेत्रात उद्योग उभारणीला चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात खासगी क्षेत्रातही रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा चांगल्या उपलब्ध आहेत. त्या अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या धोरणात्मक सुधारणांच्या अनुषंगाने शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील.

जिल्ह्यात विकसित होत असलेला बाह्य वर्तुळाकार मार्ग तसेच अन्य सुविधांमुळे बाह्य क्षेत्रातही उद्योग विकासाला चालना मिळणार आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या अनुषंगाने अधिसूचना निघताच तात्काळ समृद्धी महामार्ग तसेच पुणे बाह्य वर्तुळाकार मार्गाच्या धर्तीवर गतीने भूमीसंपादन करण्यात येईल. त्याशिवाय पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून अशा प्रकारे बाह्य व अंतर्गत वाहतूक कोंडीवर गतीने मार्ग काढण्याच्या उपाययोजना सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येईल- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, जिल्हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून त्याच्या वृद्धीसाठी शासन आणि उद्योगांनी एकत्रित प्रयत्न करावेत. प्रशासन उद्योजकांसोबत आहे असा विश्वास देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री यांचे उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे निर्देश असून त्यादृष्टीने जिल्हा पातळीवर एक समिती कार्यरत आहे. या समितीची दर दोन महिन्याला बैठक घेऊन उद्योगांना त्यासाठी आमंत्रित करण्यात येईल तसेच त्यांना आवश्यक जागा, वीज, पाणी, मनुष्यबळ आदींच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी, समस्या गतीने सोडविण्यात येतील.

ते पुढे म्हणाले, उद्योगांची वाढ होत असतानाच सार्वजनिक वाहतूक, एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. उद्योगांची उभारणी करत असताना आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन ठेवावा लागेल तसेच केवळ पुणे जिल्ह्यालाच समोर ठेऊन चालणार नाही तर पुणे मुंबई कॉरिडॉर एकत्रित लक्षात घ्यावा लागेल.

पुणे जिल्ह्यात कृषी क्षेत्राच्या तसेच कृषीशी निगडीत व्यवसाय, उद्योग वाढीच्या मोठ्या संधी आहेत. येथे उद्योग, कृषीशी निगडीत नवसंशोधन करणारे व नवोद्योग, प्रगतीशील शेतकरी असून पुणे व मुंबईसारख्या मोठ्या स्थानिक बाजारपेठा आणि जेएनपीटीसारखे मोठे आंतरराष्ट्रीय बंदर असल्याने कृषी निर्यातीची मोठी संधी आहे. हे पाहता उद्योगांनी कृषीशी संबंधित नवीन उद्योग सुरू करण्यास पुढे यावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कृषीमाल प्रक्रिया उद्योग आणि निर्यात या बाबींसाठी उद्योगांनी पुढे यावे असेही ते म्हणाले.

पुढील महिन्यात प्रशासन देशात पहिल्यांदाच नाविन्यपूर्ण अशी पुणे ॲग्री हॅकॅथॉन आयोजित करण्यात येणार असून यासंदर्भात देशामध्ये कृषीमध्ये होत असलेले नवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करत असलेल्या मोठ्या उद्योगांसोबतच नवकल्पनांच्या माध्यमातून स्टार्टअप स्थापन करणाऱ्यांनाही बोलावण्यात येणार आहे. या सर्वांना त्यांचे तंत्रज्ञान दाखविण्याची संधी मिळणार असून ते प्रत्यक्ष शेतीपर्यंत कसे जाईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

राजपूत म्हणाले, या परिषदेत ७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे सुमारे १७२ सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या गुंतवणुकीमुळे ५० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. मैत्री २.० च्या अंमलबजावणीतून उद्योगस्नेही वातावरण व धोरण राबविण्यात येत असून उद्योग विभागाकडून उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गिरबाने म्हणाले, एकूण निर्यातीत पुणे जिल्हा हा देशात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असून अभियांत्रिकी निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीतही पुणे जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. चेंबर तसेच सदस्य उद्योगांच्यावतीने इलेक्ट्रॉनिक वाहने (ईव्ही) धोरण तसेच नवीन औद्योगिक धोरणासाठी उपयुक्त सूचना देण्यात येतील. जिल्ह्यात येणाऱ्या गुंतवणूकदारांना विश्वास वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया असेही ते म्हणाले.

या परिषदेत ५० लाख रुपये ते १ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार असल्याचे सांगण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यापैकी काही प्रमुख गुंतवणूकदारांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.