मंगळवारी रात्रभर वीज खंडित नव्हती
पुणे, दि. १२ मार्च २०२५: स्वारगेट येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. ११) रात्रभर सुरळीतच होता. वीजपुरवठ्यामध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. तथापि, स्वतंत्र वीजजोडणी असलेल्या बस आगारामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दोन फेज सुरु असले तरी हायमास्ट व कार्यालयांचा वीजपुरवठा सुरु होता असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे. स्वारगेट बसस्थानकामध्ये काल रात्रभर वीज खंडित होती का याबाबत बुधवारी (दि. १२) सकाळपासून माध्यमांद्वारे विचारणा होत आहे. त्यासंदर्भात महावितरणकडून हे स्पष्टीकरण करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानक व आगारासाठी स्वतंत्र उच्चदाबाची वीजजोडणी आहे. यातील बसस्थानकाचा वीजपुरवठा अखंडित व सुरळीत आहे. तर आगाराच्या जोडणीला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये काल सायंकाळी बिघाड झाला. मात्र महावितरणकडून दोन फेजद्वारे आगारामध्ये कार्यालयीन व हायमास्ट दिव्यांचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला होता. बिघाड झालेली वीजवाहिनी उड्डाणपुलाखालील कॉन्क्रीट रस्त्याखाली आहे. त्यामुळे आगाराला पर्यायी व्यवस्थेतून तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र स्वारगेट बसस्थानक व आगाराच्या वीजपुरवठ्यात मंगळवारी (दि. ११) रात्रभर कोणताही व्यत्यय आलेला नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.