ज्या जागेवर कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव
मुंबई- पुणे येथील कर्करोग रुग्णालयासाठी नियोजित केलेली जागा खाजगी व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देऊ नका अशी मागणी आज येथे आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत केली .मंगळवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची ८९०० चौरस मीटर जागा नाममात्र मूल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास हस्तांतरित केल्याने पुण्यात कर्क रोग रुग्णालय निर्माण करण्यास अडथळा येणार आहे म्हणून ही जागा खाजगी व्यावसायिकाला देऊ नये अशी आग्रही मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात केली
त्यांनी सदर नियोजित जागेबाबत सभागृहात माहिती दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांचे कार्यालयाचे पत्रानुसार दिनांक५ मे २०१२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर मंगळवार पेठ पुणे येथील जागा ‘वैद्यकीय शिक्षण विभागास’ हस्तांतरित करण्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय यांनी सुचित करून त्या मोबदल्यात महामंडळाचे आर्थिक नुकसान शासनामार्फत भरून देण्याच्या अटीस अधीन राहून सदर मंगळवार पेठ, पुणे येथील जागा वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरित करण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची हरकत नसल्याचे दि.१२.०२.२०१३ रोजीच्या पत्रान्वये कळविले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार IAS यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करून बैठका घेऊन पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणेचा प्रस्ताव तयार झाला असून लवकरच तो मंत्रिमंडळ मान्यतेसाठी ठेवणार आहे असे सांगितले होते. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालय व छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कॅन्सर रुग्णालयात रुग्णांवर मोफत तसेच सवलतीच्या दरांत उपचार होतात परंतु, संपूर्ण राज्यातील रुग्णांचा भार या रुग्णालयांवर पडत असल्याने पुण्यासारख्या ठिकाणी ससूनच्या आवारात एक सरकारी कॅन्सर रुग्णालय उभे करण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी दिलेली होती.पुण्यात राज्यातून उपचारांसाठी रुग्ण येत असतात.त्यासाठी, ससून हॉस्पिटलच्या समोरील रस्ते विकास महामंडळाची जागा देण्याचे नियोजन केलेले होते. त्यासाठी सध्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व तत्कालीन ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी या जागेत साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु अद्याप त्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही.. ज्या जागेवर कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता ती मंगळवार पेठ, पुणे, येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मालकीची ८९०० चौरस मीटर जागा मे. एनजी वेंचर्स यांना भाडेतत्त्वावर विकासासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादितचे संचालक मंडळ यांचे दि.२९.०२.२०२४ रोजीचे बैठकीत मान्य केला आहे. कोट्यावधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा खाजगी बिल्डरला 70 कोटी रुपयाला लीज वर देण्याचा निर्णय घेतला.सध्या या जागेचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत आहे. सदर जागा मे. एनजी वेंचर्स यांना हस्तांतरित करावयाची असल्याने सार्वजनिक बांधकाम पुणे अंतर्गत असलेली कार्यालये व सदर कार्यालयाच्या इमारती इतरत्र हलवून व जागा मोकळ्या करून देणेबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे कळविले आहे. परंतु या जागेवर नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे कर्करोग रुग्णालयाची उभारणी करण्याची गरज आहे. सदरच्या जागेवर कर्करोग रुग्णालय न बांधता जर ती जागा खाजगी व्यवसायिकाला भाडेतत्त्वावर दिली तर नागरिकांमध्ये शासनाविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष वाढून आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे ही जागा खाजगी व्यावसायिकाला देऊ नये. या जागेवर कर्करोग रुग्णालय लवकर उभारावे अशी आग्रही मागणी आमदार टिळेकर यांनी केली.