Home Blog Page 420

साहसी प्रशिक्षण घेतलेल्या माजी सैनिकांनी माहिती देणेबाबत

पुणे दि.12 :- जिल्ह्यातील साहसी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माजी सैनिकांची माहिती सैनिक कल्याण विभागाने 21 ऑगस्ट 2025 पर्यंत मागितली आहे. ज्या माजी सैनिकांचे साहसी प्रशिक्षण (बेसिक माउंटेनिंग कोर्स, एडवांस्ड माउंटेनिंग कोर्स, पैरा ग्लाइडिंग, पैरा जंपिंग, रिवर राफ्टिंग, एक्सपर्ट इन स्विमिंग) झालेले आहे त्या माजी सैनिकांनी खालीलप्रमाणे आपली माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे 21ऑगस्ट 2025 पर्यंत जमा करावी.
माजी सैनिकांनी आर्मी नंबर, रैंक, नाव, पत्ता, जन्म तारीख, कोर्सचे नाव, कोर्स केलेल्या संस्थेचे नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप.

पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२५
भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत, ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुलजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू असे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम संदीप, यु बी. व्यंकटेश, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, संजय दत्त रविंद्र दळवी, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, देश कठीण परिस्थितीतून जात आहे. शेजारी देशांशी आपले चांगले संबंध नाहीत, अमेरिका भारताला धमकी देत आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अमेरिकाच काय कोणत्याही देशाने भारताला धमकी देण्याचे धाडस केले नाही. राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यावर टिप्पणी करतात. आता न्यायालय देशप्रेमी कोण हे ठरवणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार सर्वात भ्रष्ट असून कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळतो, तर गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात असे चेन्नीथला म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यावर आयोगाने उत्तर दिले पाहिजे पण फडणवीस उत्तर का देत आहेत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? असे चेन्नीथला म्हणाले.

राज ठाकरेंबद्दल अद्याप निर्णय नाही..
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्या दोघांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल असे चेन्नीथला म्हणाले.
नवीन कार्यकारिणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नवीन चेहरे आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम करा असे सांगून लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जिल्ह्या जिल्ह्यात मशाल मोर्चा काढा व सह्याची मोहीम राबवून राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या लढाईला शक्ती द्या असेही चेन्नीथला म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हा प्रदेशाध्यक्षच आहे. जे गेले ते जाऊ द्या, गेले ते कावळे होते व राहिले ते मावळे आहेत आणि मी तुमच्या बरोबर आहे असे आश्वस्त करत दोन दिवसांची कार्यशाळा संपली असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. आता Action, action आणि action वरच भर द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय खेचून आणा व काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष करा, असे आवाहनही सपकाळ यांनी केले.

काँग्रेसला नेरेटिव्ह व परसेप्शनची गरज नाही- पवन खेरा.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यावेळी नेरेटिव्ह या विषयावर बोलताना म्हणाले की, जे सरकार व पक्ष काम करत नाही त्यांना नेरेटिव्ह व परसेप्शनची गरज असते काँग्रेस पक्षाला त्याची गरज नाही. भाजपाने फक्त एक खोटी वातावरण निर्मिती करण्याचे काम केले. काँग्रेसचा रस्ता हा सत्याचा आहे, तो कठीण आहे पण त्याच मार्गाने काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून चालत आला आहे व यापुढेही याच मागाने वाटचाल करेल. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरुंनी लोकशाही व संविधानाचा रस्ता निवडला आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे ठरवले याच रस्त्याने आज राहुल गांधीही जात आहे. काँग्रेस पक्षाला मोठा जाज्वल्य इतिहास आहे. ५४ वर्षांच्या सत्तेत जनतेची भरपूर सेवा केली व देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले हे जनतेपर्यंत पोहचवा.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवर यावेळी म्हणाले की, राज्यातील भाजपा युतीच्या सरकारने १० लाख कोटीचे कर्ज करून ठेवले आहे व १ लाख ७८ कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. महाराष्ट्राला देशोधडीला लावले आहे. सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. शिक्षक भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन काम करावे सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहेत असे वडेट्टीवार म्हणाले.

माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाची विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची राज्यात आजही मोठी ताकद आहे, १४ खासदार आहेत, आमदारांची संख्या कमी असली तरी आवाज कमी नाही. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा लढवय्या आहे. जोमाने काम करा व काँग्रेस पक्षाला गत वैभव प्राप्त करुन द्या असे आवाहन करत आपल्याला राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे असे देशमुख म्हणाले.

पेरणेफाटा येथे  २१८ संत निरंकारी भक्तांचे रक्तदान 

पुणे :

             आध्यात्मिकताच मानवी एकता मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते.त्याच हेतूने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता जी यांच्या आशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच पेरणेफाटा,येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन  २१८ युनिट रक्त संकलन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढीच्या टीम ने रक्त संकलन करण्यासाठी विशेष योगदान दिले.

            या शिबिराचे उदघाटन श्री.ताराचंद करमचंदानी (झोनल प्रमुख, पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. 

            संत निरंकारी मिशन द्वारा पेरणेफाटा परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे  उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता  यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी  भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

            रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी पेरणेफाटा परिसरात  घरोघरी जाऊन  रक्तदानाचा संदेश पोहोचविण्यात आला.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार पेरणेफाटा ब्रांच प्रमुख  संजय भिलारे  यांनी व्यक्त केले.

सोशल मीडिया सर्वात प्रभावी अस्त्र, जास्तीत लोकापर्यंत पक्षाचे संदेश पाठवण्यासाठी वापर करा: सुप्रिया श्रिनेत

काँग्रेस ही एक चळवळ व विचारधारा, काँग्रेसचा रस्त्यावर व संसदेतही प्रभावी आवाज: संजय आवटे

मतचोरीविरोधात प्रदेश काँग्रेसचे “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम सुरु.

पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२५

सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी केले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘सोशल मीडिया’ या विषयावर सुप्रिया श्रीनेत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पाच महिन्यात मतदारांची संख्या कशी वाढली याची माहिती दिली तसेच मतचोरी कशी करण्यात आली हे राहुल गांधी यांनी केलेली पोलखोल दाखवली. २००४ ते २००२४ च्या दरम्यान झालेल्या सर्व निवडणुकातील मतदारसंख्या व झालेले मतदान यांची आकडेवारीसह माहिती दिली. आज मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांवर भाजपाने कब्जा करून ठेवला आहे आणि काँग्रेसला प्रसिद्धी खूप कमी दिली जाते अशा परिस्थितीत सोशल मीडिया हेच महत्वाचे साधन ठरत आहे असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची भरपूर कामे केली आहेत. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क कायद्या सारखी अत्यंत महत्वाची कामे केली पण मागील ११ वर्षात भाजपा सरकारने केलेले एकही काम उल्लेखनीय नाही. जनकल्याणाची कामे करूनही काँग्रेस पक्ष प्रचार व प्रसार करण्यात कमी पडला. आता जागे व्हा व जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रीय व्हा, असे श्रीनेत यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सोशल मीडिया संदर्भात काही प्रश्न विचारले, त्याची सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तरेही दिली.

काँग्रेस एक चळवळ व विचारधारा..
ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी, ‘गांधी नेहरु व आंबेडकर’ याविषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, काँग्रेस हा एक विचार आहे, एक चळवळ आहे. आज काँग्रेस रस्त्यावर दिसत आहे व संसदेतही दिसत आहे. राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. काँग्रेस पक्षाकडे महात्मा गांधी, पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आहे. विरोधकांनी ‘संघ’ उभा केला पण काँग्रेसने ‘संघराज्य’ उभे केले आहे. सर्वांना मतांचा अधिकार देणारा भारत हा पहिला देश आहे, हे ऐतिहासिक काम काँग्रेस पक्षामुळेच शक्य झाले आहे. मतदार यादी बनवणे अत्यंत अवघड काम होते पण ते काँग्रेसने करून दाखवले, त्यामानाने मतदार याद्यात घोळ घालणे सोपे आहे, असा टोला लगावत लोकशाहीवर जेव्हा आघात होत आहे त्यावेळी काँग्रेस उभी आहे हे संजय आवटे यांनी सांगितले.

आज काँग्रेस सत्तेत नाही आणि हाच काळ काँग्रेससाठी सर्वात चांगला काळ आहे. जे नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले ते सत्तेसाठी गेले असेही संजय आवटे म्हणाले. काँग्रेस पक्षाची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ते राहुल गांधी यांच्याबद्दलही संजय आवटे यांनी सविस्तर व्याख्यान दिले.

काँग्रेस पदाधिका-यांच्या कार्यशाळेच्या दुस-या दिवसाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने झाली. या प्रार्थनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

“नोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम.
निवडणूक आयोग आणि भाजपाने संगनमताने मतचोरी करून निवडणुकीत विजय कसा मिळवला याचा पर्दाफाश राहुलजी गांधी यांनी केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या मतचोरीविरोधात “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” ही स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे.

पुण्याच्या खडकवासला येथील शिबिर स्थळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वाक्ष-या करून या मोहिमेचा शुभारंभ केला.

वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळवेल

  • केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
  • ‘प्राज’ इंडस्ट्रीजच्या वतीने ‘प्राज बायोव्हर्स’ या जागतिक उपक्रमाची घोषणा
  • डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अ‍ॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : वाहननिर्मिती, संशोधन व डिझाईन या क्षेत्रातील देशाची गतिमानता आणि गुणवत्ता पाहता, नजीकच्या भविष्यात वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मी मंत्री झालो, तेव्हा आपण जगात ७ व्या क्रमांकावर होतो, आज आपण तिसऱ्या स्थानी आहोत, असेही ते म्हणाले. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मॅरिएट येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी ‘प्राज बायोव्हर्स’ या जैव अर्थव्यवस्थेशी संबंधित जागतिक उपक्रमाची घोषणा केली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना गडकरी बोलत होते. डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अ‍ॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, हिरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक विक्रम कसबेकर, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आणि प्राजच्या बायो-एनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे हे याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “देशातील वाहन उद्योग क्षेत्र हे २२ लाख कोटींचे उद्योगविश्व असून या क्षेत्राने साडेचार कोटी इतका रोजगार निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे हा उद्योग सर्वाधिक निर्यातक्षमताही राखून आहे. मात्र, या उद्योगाच्या काही बाजू नकारात्मक आहेत. ४० टक्के वायूप्रदूषण हे वाहनांमुळे होते. त्यामुळेच प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाला प्रदूषणरहित, स्वच्छ इंधनाचे पर्याय निर्माण करणे आणि त्यांचा सार्वत्रिक वापर वाढविणे गरजेचे आहे. प्राज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून डॉ. प्रमोद चौधरी आणि त्यांच्या टीमने यासंदर्भात केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आज ग्रामीण अर्थव्यवस्थेत असंतुलन आहे. कारण कृषी क्षेत्राचा वाटा अवघा १२ टक्के आहे, पण आजही देशातील सुमारे ६५ टक्के जनता ही कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. सेवा क्षेत्राचा वाटा मात्र वाढत आहे. हे प्रमाण संतुलित करण्यासाठी पर्यायी इंधनस्रोतांची आवश्यकता आहे. पर्यायी इंधनस्रोत कृषी क्षेत्राला बळकटी देतील. आपला शेतकरी केवळ अन्नधान्य उत्पादक न राहता, तो इंधन उत्पादक होण्यासाठी, वाहन उद्योगाने पर्यायी इंधनस्रोतांना अनुकूल अशी निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.”

मी रस्ते बनवितो, हे सर्वपरिचित आहे, पण माझ्या ६ डॉक्टरेट्स या कृषी क्षेत्रातील कार्याशी संबंधित आहेत. त्यामुळे वाहननिर्मिती उद्योग कृषी क्षेत्राशी संलग्न होणे, मला महत्त्वाचे वाटते. इथेनॉल, हायड्रोजन आणि बांबू, असे नवे इंधनस्रोत आपल्या संशोधनाच्या, नवकल्पनांच्या, स्टार्टअप्सच्या केंद्रस्थानी आले, तर आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होणे शक्य आहे, असेही गडकरी म्हणाले.

भारतामध्ये अन्नधान्याची निर्मिती वाढली आहे, ते ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. काही वर्षांपूर्वी मक्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मक्याच्या दरात चांगली वाढ झाली. बिहार मधल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्याचप्रमाणे अन्य धान्याचा वापर करून इथेनॉल तयार केले गेले तर त्याचा शेतकरी वर्गाला चांगला फायदा होऊ शकतो. आपल्याकडे ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे, तिथे बाबूंची लागवड करून त्यापासून इथेनॉल तयार केले तर प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास देखील चांगली मदत मिळू शकते, इतकेच नाही तर त्यामधून चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती होऊ शकते असे गडकरी यांनी नमूद केले.

डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणा होते, त्यावर पर्याय म्हणून आपसोमिथेनॉल हा चांगला पर्याय आहे, भविष्य काळात तो देशासाठी वरदान ठरणार आहे. भारतामध्ये चांगल्या प्रकारचे संशोधन सुरु आहे, त्यामुळे भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. डॉ प्रमोद चौधरी यांनी इथेनॉल क्षेत्रात केलेले काम मोठे असून त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.

‘प्राज बायोव्हर्स’ या उपक्रमाविषयी माहिती देताना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “प्राज बायोव्हर्स ही संपूर्ण जैव अर्थव्यवस्थेच्या परिसंस्थेला एकत्र आणणारी चळवळ आहे. याद्वारे जैव अर्थव्यवस्थेशी संबंधीत अनेकविध घटक एकत्र येण्यासोबतच नवोपक्रमांना चालना देणे, एकमेकांना आवश्यक सहकार्य करणे, प्रेरणा देणे आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे अशा पद्धतीने एकत्रितपणे काम केले जाईल. याद्वारे आपण देशासोबतच जागतिक पातळीवर देखील शाश्वत विकासासाठी नवीन क्षितिजे शोधू शकू असा आम्हाला विश्वास आहे.”

संजय किर्लोस्कर, विक्रम गुलाटी, विक्रम कसबेकर आणि विशाल सोनी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अतुल मुळे यांनी आभार मानले. चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ

कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

मुंबई- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदत कर्ज योजना, ऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीय, निमशासकीय, शासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजना, बीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजना, तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.
या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटी, आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास: प्रति आसन देणार अनुदान शासन

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय

मुंबई- सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढक्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

पुणे-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.
या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य सरकारकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

पुणे-महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – १० हजार ९०८, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘वॉर 2′ १४ ऑगस्टला …

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला विश्वास आहे की त्याचा आगामी चित्रपट ‘वॉर 2’, जो १४ ऑगस्ट रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे, प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये पाहण्यासारखा अनमिसेबल प्रोजेक्ट ठरणार आहे.

या चित्रपटात हृतिक, पॅन-इंडियन सुपरस्टार ज्युनियर एनटीआर विरुद्ध एका नो-होल्ड्स-बार्ड, रक्तरंजित लढाईत भिडणार आहे, ज्याला तो मोठ्या पडद्यावरील एक भव्य व्हिज्युअल अनुभव मानतो.

हृतिक म्हणाला, “‘वॉर’ मध्ये कबीरची भूमिका करताना मला जे प्रेम आणि कौतुक मिळाले, त्याने मला ‘कहो ना… प्यार है’, ‘धूम २’ आणि ‘कृष’च्या काळातील प्रेमाची आठवण करून दिली. यावेळी मी पुन्हा कबीर म्हणून परत आलो आहे, आणि ही भूमिका करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण प्रेक्षकांनी हा कॅरेक्टर खूप आवडला होता. या वेळी तो आधीपेक्षा अधिक इंटेन्स आणि द्विधा मनस्थितीत आहे — खूप भावनिक. मला वाटते ‘वॉर २’ हा असा चित्रपट असेल जो चुकवता कामा नये.”

हृतिक, ज्याने गंभीर दुखापतींवर मात करून हा चित्रपट पूर्ण केला, सांगतो की या प्रोजेक्टसाठी सहन केलेला प्रत्येक त्रास आणि वेदना योग्य ठरल्या.

तो म्हणाला, “हे कठीण होते (वेदना आणि दुखापतींवर मात करणे). आम्ही खूप मेहनत घेतली. ‘वॉर २’ च्या शूटिंगदरम्यान आलेल्या सर्व वेदना, सर्व दुखापती या सगळ्या त्याच्यासाठीच होत्या. कधी सेटवर वेदना होत होत्या तेव्हा मी विचार करायचो — हे सगळं खरंच वर्थ आहे का? पण आता जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम पाहतो, तेव्हा उत्तर आहे — हो, नक्कीच.”

‘वॉर २’ हा प्रतिष्ठित वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे, ज्याने आतापर्यंत केवळ ब्लॉकबस्टरच दिल्या आहेत.

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा‘अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट ७ नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” हि तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे.

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेले चित्रपटाचे हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनले आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

स्वातंत्र्यदिनी पुण्यात पहिल्यांदाच ‘तिरंगा फेस्टिवल’

किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने आयोजन ; भारतीय लष्कराला ५०० ढोल-ताशा वादनातून मानवंदना

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘तिरंगा फेस्टिवल २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने शुक्रवार, दिनांक १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ यावेळेत श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर तिरंगा फेस्टिवल २०२५ होणार आहे, अशी माहिती आयोजक किरण साळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच होत आहे. देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणा-या भारतीय सैनिकांच्या पाच वीरपत्नींचा सन्मान तिरंगा फेस्टिवल मध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुस्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दिपाली मोरे यांचा समावेश आहे. तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव होणार आहे. सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार असून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या पुण्यातील ढोल ताशा पथकांतील ५००हून अधिक वादक एकत्रितपणे वाद्यवादन करणार आहेत. ढोल ताशाच्या वादनातून ‘आॅपरेशन सिंदूर’ व ‘आॅपरेशन महादेव’ मधील वीरांना मानवंदना देणार आहेत. संपूर्ण रस्त्यावर तिरंगी ध्वज लावण्यात येणार असून तिरंगी टॅटू यांसह विविध आकर्षण फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत.

विविध वाद्यांचा सुरेल अविष्कार असलेला ‘नादरंग’ -तालवाद्यकचेरी हा कार्यक्रम देखील होणार आहे. याशिवाय प्रख्यात कलादिग्दर्शक गणेश लोणारे व सहकारी यांचे देशभक्तीपर पथनाट्य व सादरीकरण होणार आहे. ‘वंदे मातरम’ या स्वर मैफलीतून बालकलाकार देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच गीततिरंगा/ रामराज्याभिषेक भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता होणार आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हा फेस्टिवलला उपस्थित राहणार असून पुणेकरांनी यामध्ये सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंदोलनासाठी मुस्लिम समुदायाच्या पाठिंबा

-15 ऑगस्ट रोजीच्या ठिय्या आंदोलनात मुस्लिम समाज सहभागी होणार

पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच या आंदोलनामध्ये मुस्लिम समुदायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी  नगरसेवक अॅड. हाजी  गफूर पठाण यांनी सांगितले. 

कोंढवा येथील सतेज हॉल या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती, या बैठकीत वरील प्रमाणेचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच याच वेळी मुस्लिम समुदायासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल राहुल डंबाळे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. 

मुस्लिम समुदाय हा कायम आंबेडकरी विचारधारेसोबत जोडला गेला आहे. या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाचे मिळालेले पाठबळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून यामुळे आंदोलकांची ताकद वाढली असल्याने स्मारकाचा  लढा सुटण्याच्या मार्गावर आलेला आहे, असे राहुल डंबाळे यांनी यावेळी सांगितले

दरम्यान पुणे शहरातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना एकत्रित करून या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज जास्तीत जास्त संख्येने सहभागी होईल याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे अॅड. हाजी  गफूर पठाण यांनी यावेळी सांगितले

महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत हसीनाताई इनामदार , आबीद सय्यद , जमीर कागजी , जावेद शेख, एजाज पठाण , बीलाल पटेल , सज्जन कवडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. 
दरम्यान याच अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये मुस्लिम समाजाची बैठक देखील पार पाडली होती याच माजी नगरसेवक रशीद शेख आयुब शेख रफिक शेख मेहबूब नदाफ रईस सुंडके मुक्तार शेख हाजी फिरोज शेख सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख अंजुम इनामदार जुबेर मेमन सलीम पटेल आसिफ खान आदी मान्यवरांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे

‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

“टँगो मल्हार” या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थे अंतर्गत करण्यात आली असून साया दाते या निर्मात्या आहेत. “टँगो मल्हार” या चित्रपटात एका रिक्षा चालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या तरुण अशा मल्हारला अचानकपणे “टँगो” या अर्जेटिनाच्या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्य प्रकारामुळे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी रंजकपणे घडत जातात या कथासूत्रावर ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट बेतला आहे.चित्रपटाच लेखन साया दाते, मनीष धर्मानी यांनी केले आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनी आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत केलं आहे. चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे या नवोदित कलाकरांचा अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.

साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित “मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” (एमआयटी) येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत युट्यूबमध्ये काम केलं, त्यानंतर भारतात परत येऊन पुण्यात स्वतःची कंपनी उभी केली. उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित फोर्ब्जच्या ‘३० अंडर ३०’ या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं.

साया यांच्यात चित्रपट प्रेमाचं बीजं बालपणीच पेरलं गेलं होतं. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी ‘ऑन द अदर लाइन’ ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुद्धा ही शॉर्टफिल्म गौरवली गेली. त्याशिवाय त्या स्वतः टँगो डान्सरही आहेत. त्यामुळे एकीकडे तंत्रज्ञान, उद्योगात उत्तम काम करत असताना कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपली आवड जपण्यासाठी त्यांनी ‘टँगो मल्हार’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. त्यामुळे एका संगणक शास्त्रज्ञ, उद्योजिकेचा मराठी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शनाचा प्रयत्न नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे यात शंका नाही.

फुफ्फुसांच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्याकबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळाच-डॉ. कल्याण गंगवाल

मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचे मोकळ्या जागेत स्थलांतर करावे

शाकाहार, अहिंसावादी कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांचे आवाहन

पुणे, ता. १२: “जैन धर्मातील प्राण्यांप्रती दया, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांवर माझा गाढ विश्वास आहे. कबुतरांना दाणे टाकणे ही श्रद्धेची आणि परंपरेची गोष्ट असली, तरी डॉक्टर म्हणून माझा कबुतरांना दाणे टाकण्याचा विरोध आहे. फुफ्फुसातील आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या कबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळायलाच हवे,” अशी स्पष्ट भूमिका पुण्यातील शाकाहार व अहिंसावादी कार्यकर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी मांडली. मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचे स्थलांतर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “एक डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून मला वास्तव सांगणे भाग आहे. कबुतर हा भारतातील स्थानिक पक्षी नसून तो मध्यपूर्वेतून आलेला आगंतुक प्रजातींमधील पक्षी आहे. त्याचे प्रजनन अतिवेगाने होते. कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. फुफ्फुसाचे गंभीर आजार त्यामुळे होत आहेत. यासह सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, वाहतुकीस अडथळे तसेच चिमणीसारख्या स्थानिक पक्ष्यांचे नामोनिशाण पुसले जात आहे.”

“कबुतरांना खाऊ दिला नाही, तर ते मरतील, ही समजूत चुकीची आहे. पृथ्वीवरील लाखो प्रजाती माणसांशिवाय लाखो वर्षे जगल्या आहेत. निसर्गाने त्यांना टिकण्याची क्षमता आणि संतुलन दिले आहे. कबुतरांना न खाऊ घातल्यास त्यांची नैसर्गिक अन्नशोध प्रवृत्ती वाढते, संख्या नियंत्रणात राहते आणि निसर्गसाखळी सुरक्षित राहते. धर्मापेक्षा आरोग्य व विज्ञान महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत व कबुतरखान्यांवर बंदी घालावी. कबुतरांना खाद्य द्यायचे असल्यास मर्यादित प्रमाणातच करावे; रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी, गल्ल्यांमध्ये हे टाळावे,” असेही आवाहन त्यांनी केले.

कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या विरोधात धार्मिक मुद्दा उपस्थित करणे अयोग्य आहे. हा मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय असून, कबुतरखान्यांवर बंदी योग्य आहे. या निर्णयाचे आपण प्रत्येकाने स्वागत करायला हवे. राज्य सरकारने यासंदर्भात कडक पावले उचलावीत व मानवी आरोग्य जपण्याला प्राधान्य द्यावे.”