पुणे-राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सध्या मिशन टायगर जोरात सुरू आहे. पुण्यात शिंदे उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसरा धक्का दिल्याचे समोर आलंय. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत.ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलंय. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
शहरातील तीनही मतदार संघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात पक्षाचं अस्तित्वचं शिल्लक नाही, पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्षसोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असं ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी म्हटलंय.
धंगेकर म्हणजे पुण्यातील कराड;काँग्रेसच्या अध्यक्षांचा आरोप
काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र या पक्षप्रवेशानंतर पुण्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी भीतीपोटी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याचा दावा केला तर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नाही. आमचा पक्ष कुठच कमी पडला नाही. पक्षाने त्यांना चारवेळा संधी दिली तरी पक्षाला सोडून गेले. मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले. काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे. त्यांना लीड घेता आलं नाही. अशी टीका काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांच्यावर केली.पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, धंगेकर पक्षासाठी काम करत नव्हते मात्र पक्षाने माझ्यासाठी काम केला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. यापुढे पक्षाला विनंती आहे की, अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही. हे संधीसाधूपणा करत आहेत, आम्ही पक्षाला सांगितलं होतं अनेकदा पक्षाच्या विरोधात काम करत आहेत, असे सांगितलं होतं. आम्ही कधीच त्यांच्यावर बोललो नाही. रस्त्यावर आम्ही उतरून काम केलं. देश राम मंदिर उत्सव साजरा करताना हे बाबरी मशीदवर बोलत होते, विचारधारा नाही. यांना एका पार्टीची लाइन धरता येत नाही. कुठल्याच बैठकीला, आंदोलनांना येत नाहीत, अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती. त्यांना अनेकदा समज दिली, मात्र बदल झाला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात, यांनी काय केलं नाही. एक नगरसेवक केला नाही, आम्हाला दुःख आहे की,अशा नाकर्त्यांवर आम्ही विश्वास ठेवला, यांनी केवळ मतलबी राजकारण केलं. असं देखील यावेळी अरविंद शिंदे म्हणाले.तर खासदार संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी पक्ष सोडला. वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता, विषय वक्फ बोर्डचा होता आणि या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून त्यांनी पक्ष सोडला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. त्यांच्या बायकोचा विषय नाही, वहिनींचं नाव कुठ नाही. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी राजकारण केलं असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.तसेच त्यांच्यामुळे पक्षाला कोणताही फायदा झाला नाही. यांच्यात हिम्मत असती तर समोर येऊन पत्र देऊन पक्ष सोडून गेले असते. तीन नगरसेवक असताना त्या पक्षातील लोकांनी अनेक विषय बाहेर काढले, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत.येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना हरवू त्यांना कायमचं माजी ठेवू. ससूनमधले विषय, ड्रॅग्सचे विषय पुढे का गेले नाहीत, स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन केली. पुढं या आंदोलनाचं काय झालं. असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.