मुंबई – राज्य सरकारने पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण करून पुणे, मुंबईच्या एकत्रित विकासाला चालना द्यावी, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना केले.
सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी भाग घेतला. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी विकसित होत आहे, त्याचबरोबर पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण करावे, ही सध्याची गरज आहे. त्यातून पुणे, मुंबई इकॉनॉमिक रिजनच्या एकत्र विकासाला चालना मिळेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. पुणे विभागात महिला व्यावसायिकांकरीता ‘स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र’ निर्माण करावे, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली.
विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या उद्दीष्टाकडे नेणारा उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी आणि सेवा क्षेत्र याचे संतुलन साधणारा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या घोषणेची ग्वाही देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे या अर्थसंकल्पाचे वर्णन आमदार शिरोळे यांनी केले.
मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीशील भूमिकेमुळे दाओस येथील आर्थिक परिषदेत अनेक कंपन्यांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे १६ लाख रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला. राज्याने निर्यातीत वाढ होण्यासाठी धोरण आखले, त्यामुळे राज्यातील निर्यातीचे प्रमाण १५.४ टक्के झाले. राज्याने लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली त्यातूनही रोजगार निर्मिती होईल, असे शिरोळे म्हणाले.
पुण्याचे औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. तळेगाव ते चाकण २५ किलोमीटरचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) प्रस्तावित केला आहे. पुणे ते शिरूर ५४ किलोमीटरचा उन्नत रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक पट्टा आणि पुणे ते नगर प्रवास करणाऱ्यांना फायदा होईल. वाहतूक कोंडीतूनही मुक्तता होईल. पुण्यामध्ये मेट्रोच्या विस्ताराला उत्तम गती मिळाली आहे आणि असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. तसेच सुमारे दोनशे सत्तावीस डिझेल बसेस ह्या लवकरात लवकर सी एन जी मध्ये रूपांतर कराव्यात आणि पुण्याला अजून तीन हजार बसेस ची गरज असून लवकर त्यावर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शिरोळे यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. तसेच पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याचे काम सरकार ने करावे अशी ही सूचना शिरोळे यांनी केली.
प्रस्तावित पुणे-नाशिक इंडस्ट्रिअल एक्स्प्रेस वे चा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प ३ वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता दिल्याबद्द्ल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले.