परप्रांतीयांना महाराष्ट्रात नो एन्ट्री ची गर्जना करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १० ऑक्टोबर रोजी पुण्यात सभा होणार आहे. यापूर्वी ही सभा एस. पी. कॉलेजच्या मैदानात होईल, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी पक्षाने एस. पी. कॉलेजकडे तशी परवानगी मागितली होती. राज ठाकरे यांची सभा एस. पी. कॉलेजमध्येच व्हावी, यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आग्रही होते. तर ही सभा नदीपात्रातच व्हावी, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आग्रही होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा एस. पी. कॉलेजच्या मैदानाऐवजी आता नदीपात्रात होणार आहे. मध्यवर्ती ठिकाण, पार्किंगची सोय म्हणून नदीपात्रात सभा घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
यापूर्वी राज ठाकरे यांच्या नदीपात्रात झालेल्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तसेच त्याचे काही प्रमाणात मतदानातही रूपांतर झाले होते. त्यामुळे नदीपात्रातील मैदान पक्षासाठी ‘लकी’ आहे, असा कार्यकर्त्यांचा समज आहे.
‘नदीपात्र हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचा अनेक मतदारसंघातील मतदारांवर प्रभाव पडतो. यापूर्वी राज ठाकरे यांच्या सभा यशस्वी झाल्या आहेत. तसेच येथे पार्किंगला फारशी अडचण येत नाही.एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा घेतल्यास ती आतील बाजूस होते, तसेच तिथे पार्किंगलाही अडचण येते. त्यामुळे नदीपात्रातच ही सभा व्हावी, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आग्रही होते. त्यानुसार आता ही सभा नदीपात्रात घेण्यात येणार आहे. एस. पी. कॉलेजमध्ये सभा घेतल्यास आर्थिक गणितासह अन्य काही समीकरणे बदलण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर नदीपात्रच योग्य असल्याचा निर्णय अंतिम करण्यात आला.
दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नदीपात्रात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, असे पक्षाचे शहराध्यक्ष बाळा शेडगे यांनी सांगितले.
राज ठाकरे १० ऑक्टो . ला पुण्यात गरजणार
पुण्यात गडकरींवर फेकला बूट-कारण गुलदस्त्यात ?

केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना बूट मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने सोमवारी रात्री पुण्यात केला. कोथरूडमधील प्रचारसभेत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चोप दिला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.ज्या माथेफिरू तरूणाने गडकरींवर बूट उगारला त्याचे नाव भारत कराड (वय- 37, रा. सध्या सुतारदरा, मूळ मराठवाडा) तो वंजारी समाजाचा असून भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी शिक्षकनगरच्या मैदानावर गडकरी यांची सभा आयोजिली होती. सव्वानऊच्या सुमारास गडकरी यांचे सभास्थानी आगमन झाले. तेथे अनेकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते उपस्थितांना अभिवादन करीत व्यासपीठाच्या दिशेने निघाले होते. मोबाईल फोनद्वारे त्यांचे फोटो काढण्यासाठी आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी अनेक जण पुढे येत होते. त्यावेळी एक तरुण हातात बूट घेऊन पुढे आला आणि त्याने तो बूट गडकरी यांच्या अंगावर उगारला. त्यावेळी गडकरींच्या बाजूला स्थानिक भाजप नेते होते. त्यामुळे गडकरींना तो बूट लागला नाही. मात्र भाजप नेते संदीप खर्डेकर यांना तो लागला.अचानक झालेला हा प्रकार काही क्षण कोणाच्याच लक्षात आला नाही. मात्र, गडकरी यांचे सुरक्षारक्षक आणि कार्यकर्ते लगेच पुढे आले आणि त्यांनी त्या तरुणास बाजूला घेतले आणि त्याला बेदम चोप दिला. काही वेळाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संबंधित माथेफिरू तरूण हा वंजारी समाजाचा असून, त्याने द्वेषातून गडकरींवर बूट उगरल्याचा प्रयत्न केल्याचे पुढे येत आहे
उड्डाणपूल,भुयारी मार्ग,मोफत आरोग्य सुविधांचा रमेश बागवेंचा जाहीरनामा प्रसिध्द
पुणे-रुबी हॉल ते अलंकार चौक उड्डाणपूल, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्कायवॉक, भुयारी मार्ग, इलेव्हेटेड रोड आणि मल्टीलेवल पार्किंग, संवेदनशील जागी सीसीटिव्ही, एसआरए-बी.एस.यू.पी-ईन्सिटीव्ह अशा योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन, विविध भागांत मोफत डायलिसिस सेंटर आदी आश्वासनांसह पुणे कॅन्टोंन्मेट विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश बागवे यांचा जाहीरनामा सोमवारी प्रकाशित करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करता येईल, अशा बाबी जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. गेल्या ५ वर्षांत विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समजावून घेत प्रत्येकाला न्याय देण्याचे प्रयत्न केले आहे. काँग्रेस पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबबाबदारी मी पार पाडत आहे, असे बागवे यावेळी म्हणाले.घोरपडी येथील उड्डाणपूल उभारण्यासाठी माझ्यासह अनेक आमदारांनी प्रयत्न केले आहेत. मात्र ती जागा आर्मीच्या हद्दीत येत असल्याने पूल उभारणीस अनेक अडणची येत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कामास परवानगी देण्यात आली नाही. याबाबत अनेक अधिकार्यांबरोबर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वतोपरी प्रय▪करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन बागवे यांनी दिले.घोरपडीच्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावणार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, नगरसेविका लक्ष्मी गोडगे, लता राजगुरू, अविनाश बागवे, माजी नगरसेवक रजनी त्रिभुवन, लक्ष्मण आरडे आणि शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नुरुद्दीन सोमजी आदी यावेळी उपस्थित होते. विविध विकासकांचे भुमिपूजन, पुण्यातील सर्वात मोठी उदरु बालवाडी, अनेक शाळांमध्ये संगणकांचे वाटप तसेच शालेय त्यांना वस्तू पुरविणे, झोपडपट्टय़ांमधील विविध समस्यांचे निराकरण, युवकांसाठी आंतर राष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिग स्टेडीयम, फुटबॉलचे मैदान, जॉगिंग ट्रक, व्यायामशाळा आदी विकासकामे केली असल्याची माहिती बागवे यांनी दिली.
रमेश बागवे यांची रास्ता पेठ पदयात्रा
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे आज प्रभाग क्रंमांक २३ व ३९ मधील रास्ता पेठ व के. ई. एम. हॉस्पिटल परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती . ताई लक्षात ठेवा पंजा , दादा लक्षात ठेवा पंजा, आले रे आले पंजावाले असे नारे देत पदयात्रेमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्ते सहभागी झाले होते .फटाक्यांच्या आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात येत होते . *
रास्ता पेठमधील महाराजा लॉज चौकापासून या पदयात्रेस सुरुवात झाली . हि पदयात्रा धनगर आळी , त्रिशुंडा गणपती मंदिर , खडीचे मैदान , रास्ते वाडा , दारूवाला पूल . अपोलो थिएटर , के. ई. एम. हॉस्पिटल, उंटाड्या मारुती मंदिर , मंगलमूर्ती मंडळ येथे समारोप करण्यात आला.
यामध्ये स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी , सुजाता शेट्टी , कॉंग्रेस सरचिटणीस रमेश अय्यर , प्रा.वाल्मिक जगताप, भगवान धुमाळ , सुनील दैठणकर, राजेश पौडवाल , माधव बारणे , राजेश शिंदे , जयश्री कांबळे , एडविन रॉबर्ट , मनोज पवार , शौनक जांभुळकर , सुरेश ठाकूर , संजय नाईक , प्रकाश जगताप , बाळासाहेब सोनावणे , मांगीलाल शर्मा , सादिक शेख , रेश्मा जांभळे , चित्रा नगरकर , रजनी खेडेकर , स्मिता पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
एक जाहिरात … भाजपला भोवणार ?
एका जाहिरातीने भाजपाला मोठ्ठा फटका बसणार असून या जाहिरातीने महाराष्ट्र प्रेमी नागरिकांना मनोमन नाराज करवून ठेवले आहे याबाबतची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून उमटते आहे. दरम्यान आज ‘बंद करा हि जाहिरात ‘ अशी तक्रार पुण्यातील वसंत खुटवड , राजेंद्र पवार , रवि सहाने , राजाभाऊ मुकेरकर . शैलेश बढाई, निखिल काची , सचिन समुद्रे आदी तरुणांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील हि जाहिरात महाराष्ट्राची बदनामी करणारी असल्याचे म्हटले होते .
‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’… ही काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना जाब विचारणारी भाजपची जाहिरात सध्या टिव्ही, वर्तमानपत्रांमध्ये प्रचंड गाजते आहे. पण विरोधकांना जाब विचारणाऱ्या याच भाजपने महाराष्ट्रभरात याच काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचे तब्बल ५१ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे भाजपचा ढोंगी चेहरा समोर आणण्यात येतो आहे .
सोशल मीडियावर सध्या अधिराज्य गाजविणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप’ने भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची याबाबतची वेदना अचूक टिपली आहे. ‘व्हॉट्सअॅप’वरून भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात केलेल्या उमेदवारांची संपूर्ण यादीच फिरवली जात आहे. यात काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ व समता परिषदेचा एक अश्या आयत्यावेळी पक्षात आयात केलेल्यांना , म्हणजे भाजपच्या भाषेत सांगायचे झाले तर गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तत्काळ उमेदवारी का दिली, असा सवालही केला जात आहे.
काँग्रेस मधून आलेले मनोहर बडने (धुळे ग्रामीण) सुनील देशमुख (अमरावती )समीर मेघे (हिंगणा )माधवराव किन्हाळकर (भोकर )आनंद भरोसे (परभणी) शिवाजीराव नाईक (शिराळा )अजित घोरपडे (तासगाव ),प्रशांत ठाकूर (पनवेल )राजन तेली सावंतवाडी , संजयदुधगावकर उस्मानाबाद ,शैलेश लाहोटी लातूर ,माणिकराव कोकाटे सिन्नर, बाळासाहेब मुरकुटे नेवासा ,भाऊसाहेब वाकचौरे श्रीरामपूर ,विलासराव खरात घनसावंगी ,अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण, तर राष्ट्रवादी तून भाजपात आलेले अभय नगरकर नगर, विजयकुमार गावित ,नंदुरबार संजय सावकारे भुसावळ ,योगेंद्र गोडे बुलढाणा, किसन कथोरे मुरबाड ,मंदा म्हात्रे बेलापूर , लक्ष्मण जगताप चिंचवड , बबन पाचपुते श्रीगोंदा ,शरद बुट्टे पाटील खेड ,राहुल कुल दौंड प्रताप चिखलीकर कंधार स्नेहलता कोल्हे कोपरगाव भीमराव धोंडे आष्टी मोनिका राजळे पाथर्डी ,जगदीश वळवी चोपडा शिवाजी कर्डिले राहुरी राजेंद्र पिपाडा राहाता अद्वय हिरे नांदगाव अरविंद चव्हाण जालना रमदास सदाफुले देवळाली
तर शिवसेनेतून भाजपात आलेले भगवान बोरस्ते निफाड, किशनचंद तनवाणी औरंगाबाद मध्य,
बाबासाहेब तांबे पारनेर ,विनायक हिवाळे पैठण , शरद ढमाले भोर, नेताजी डोके जुन्नर ,जयसिंग एरंडे आंबेगाव द्रकांत खाडे इगतपुरी दिलीप कुंदकर्ते नांदेड दक्षिण संगीता राजे निंबाळकर पुरंदर मनसेतून आलेले राम कदम घाटकोपर पश्चिम यांना उमेदवारी दिली आहे कन्नडसमता परिषडेचे संजय गव्हाणेअपक्ष प्रशांत बंब गंगापूर, धुळे शेतकरी संघटना मधून आलेले अनिल गोटे आणि अपक्ष शिवाजी मानकर येवला यांना उमेदवारी दिली आहे

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी चे उमेदवार दीपक मानकर यांनी मस्जिद मध्ये जावून मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या शुभेच्छ्या दिल्या
यावेळी मौलाना काझी साहब , मौलाना इम्रान साहब , अहमद कुरेशी आदी मान्यवरांनी मानकर यांचे स्वागत केले 
गोळीबार मैदाना नजीकच्या इदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांच्या भेटी घेवून पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे तसेच भगवान वैराट , परशुराम वाडेकर , दिलीप कांबळे आणि कास्ब्याचे गिरीश बापट यांनी एकत्रितपणे त्यांना शुभेछ्या दिल्या

शिवाजीनगर मतदार संघातील काँग्रेस चे उमेदवार विनायक निम्हण यांनी सोमवारी सकाळीबोपोडी, पाटील इस्टेट, गोखलेनगर, पोलिस लाईन शिवाजीनगर, खडकीतील इदगाह मैदान येथील मस्जिदला भेट देऊन मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या

कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस चे उमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी तांबोळी मशिद, चाँदतारा मशिद, मक्का मशिद, छोटी मशिद आदी ठिकाणी डॉ. रोहित टिळक यांनी भेटी दिल्या. यावेळी रशीद खान, मिलिंद काची, वसीम पठाण, सैलानी खान आदी टिळक यांच्या समावेत आदी होते.
“राष्ट्रीय समाज पक्षा’च्या प्रवक्तेपदी दीपक बिडकर
पुणे :”राष्ट्रीय समाज पक्षा’च्या प्रवक्तेपदी दीपक बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. “राष्ट्रीय समाज पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
वाहिन्यांवर, प्रसारमाध्यमातून पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे मांडणे, सोशल मीडियावरून पक्षाचे प्रतिमा संवर्धन करणे अशी जबाबदारी दीपक बिडकर यांच्यावर देण्यात आली आहे. दीपक बिडकर हे “प्रबोधन माध्यम’ (न्यूज फिचर्स एजन्सी), “सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’आणि “सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’ या संस्थांचे संस्थापक असून, पत्रकारिता, जनसंपर्क आणि समाजकारण या क्षेत्रात 16 वर्षे कार्यरत आहेत.
पर्यावरण जतन – संवर्धन, टेकड्या वाचविण्यासाठी योगदान, पुण्यातील नागरीप्रश्न या विषयीही श्री. बिडकर यांनी काम केले आहे.
टेकड्यांच्या संरक्षणासाठी, बी.डी.पी. आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी “सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’ ही संस्था स्थापन केली तर पुण्याच्या नागरी प्रश्नांवर काम करण्यासाठी “सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’ही संस्था स्थापन केली. पुण्याच्या विकास आराखड्यातील मोकळ्या जागा गिळंकृत करणे, मेट्रोला 4 एफ एस आय देणे याला श्री.बिडकर यांनी विरोध करून नागरिकांच्या हरकती नोंदविल्या होत्या.
मुंडेंच्या अंत्यविधीसाठी वेळ नव्हता मग आता 25 सभांसाठी आहे काय ? भुजबळांचा मोदींवर प्रहार
मोदी म्हणजे भूलभुलय्या आहे त्यांनी सोशल मिडियाचा संमोहन शास्त्राप्रमाणे वापर केला धनगर समाजाचे नेते व विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांनी मुंडेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली म्हणून म्हणून त्यांचे तिकीट कापले.ज्या गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर हाडाची काडे करून भाजपला महाराष्ट्राच्या कानाकोप-यात नेले त्याच मुंडेंच्या अपघाती मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या अंत्यसंस्काराला वेळ नव्हता. त्याच मोदींना आता बीडसह राज्यभर 25 सभा घ्यायला कसा वेळ मिळाला असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी मोदींवर टीका केली.
छगन भुजबळ यांनी यवतमाळमध्ये म्हणाले, भारतीय जनता पक्ष अतिशय धोकादायक पक्ष आहे. या पक्षाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हा पक्ष फक्त उच्चवर्णियांचा आहे. ते सर्व समाजाला बरोबर घेत असल्याचे दाखवतात. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. आता तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राज्यातील मंत्र्यांच्या यादीवर लक्ष घाला किंवा अमित शहांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली राष्ट्रीय कार्यकारिणी पाहा. यात बहुजन समाजाला कोठेही स्थान दिले नाही. ज्यांना स्थान दिले ते लोक चांगले आहेत त्याबद्दल तक्रार नाही. पण यांना बहुजन समाजाचे नेते दिसत नाहीत का?. भाजप हा बहुजन समाजाला सत्तेपासून वंचित ठेवणारा पक्ष आहे. आता सांगलीतील उदाहरण पाहा, तेथील धनगर समाजाचे नेते व विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे या बड्या नेत्याचे तिकीट भाजपने कापले. का कापले तर म्हणे शेंडगे यांनी मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर तातडीने दिल्लीत मुंडेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.
आपल्या पक्षाच्या नेत्याबाबत अशी दुर्देवी घटना घडल्यानंतर तशी मागणी केली तर प्रकाश शेंडगेंचे काय चुकले? असा सवाल उपस्थित करून भुजबळ म्हणाले, याच भाजपवाल्यांनी गोपीनाथ मुंडेंना किती त्रास दिला होता याची जाणीव तुम्हा आम्हासह सा-या महाराष्ट्राला आहे. अगदी मंत्रिमंडळात स्थान देताना पण त्यांना यातना दिल्या. ज्या माणसाने आयुष्यभर पक्ष राज्याच्या कानाकोप-याच नेला त्याच मुंडेंना भाजपने अशी वागणूक दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंडेंच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी वेळ मिळाला नाही. पण तेच मोदी आता गोपीनाथ यांच्या बीडमध्ये प्रचाराला गेले आणि आता राज्यात 25 सभा घेणार आहेत अशी घाणाघाती टीका भुजबळ यांनी भाजप व मोदींवर केली. लोकसभा निवडणुकीत भाजपने सोशल मिडियाचा संमोहन शास्त्राप्रमाणे वापर केला आणि यश मिळवले. तरूण मोदींना भुलले पण तरूणांना मोदी काय आहेत ते लवकरच कळेल. सत्तेत आल्यापासून भाजपचा उन्माद वाढला आहे. सगळे मला हवे अशी त्यांची धारणा झाली आहे. त्याचमुळे 25 वर्षापासूनचा मित्र असलेल्या शिवसेनेलाही त्यांनी धोका देत फेकून दिले. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यानंतरही भाजपने सेनेला केवळ एक तेही दुय्यम खाते दिले आहे. बाळासाहेब आज असते आणि केंद्रात एकच मंत्रिपद दिले गेले असते तर बाळासाहेबांनी असल्या सत्तेवर कधीच लाथ घातली असती असेही भुजबळांनी सांगितले.
खोटी स्वप्ने आणि बोलबच्चनगिरीचे मार्केटिंग करून मोदींनी फसविले – अजित पवार
खुल्ताबाद -खोटी स्वप्ने दाखवून, बोलबच्चन आणि प्रसिद्धीचा फंडा वापरून मोदींनी मतदारांना फसवल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद येथे प्रचारसभेत भाजपवर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. या सरकारच्या कार्यकाळात महागाई वाढत असल्याचेही ते म्हणाले
आज प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावत आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसने २८१ उमेदवार उभे केले होते. केवढीही मोठी लाट असली तरी ती थोपवण्याची ताकद तुमच्यात आहे. वारंवार हे तुम्ही दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीत अच्छे दिनच्या गप्पा मारून मोदींनी मते मागितली. त्यांनी उत्तम मार्केटींग केले. त्यांना प्रतिसाद मिळाला. लोकांनी त्यांचे खासदार निवडून दिले. पण आता लोकांची निराशा झाली आहे. गेल्या पाच महिन्यात खतांचे दर वाढले, रेल्वेचे भाडे वाढले. त्यामुळे लोकांनी यावेळी विचार करुनच निर्णय घेणे गरजेचे आहे.
पाककडून दहाव्यांदा आगळीक – ग्रेनेड हल्ला – ५ ठार ;३१ जखमी
56 इंचाची छाती आता कुठे गेली-गुलाम नबी आझाद
पाकिस्तान महिन्यात दहाव्यांदा आगळीक काढली असून यावेळी सर्वात मोठे शस्र संधीचे उल्लंघन करण्यात आले आहे सीमेजवळ अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्री दीड वाजेपासून सलग फायरिंग सुरू आहे. तसेच यावेळी पाककडून ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. यात झोपलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि एका 13 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. 2003 च्या शस्त्रसंधीनंतर हे सर्वात मोठे उल्लंघन असल्याचे एका अधिका-याचे म्हणणे आहे.यावर 56 इंचाची छाती आता कुठे गेली? असा संतप्त सवाल गुलाम नबी आझादयांनी आहे
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतात आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. तर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. 56 इंचाची छाती आता कुठे गेली माहिती नाही. आता कोणी नजरेला नजर भिडवून बोलतही नाही, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमध्ये पाकिस्तानी जवानांनी सकाळी सुमारे आठ वाजता फायरिंग सुरू केली. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजुंनी गोळीबार झाला. फायरिंग बंद झाल्यानंतर जवानांनी नियंत्रण रेषेच्या जवळ गस्तही घातला. त्यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत काहीही पुरावे मिळालेले नाहीत. भाजपने पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारावर टीका केली आहे. सीमेवर पाकिस्तानला काय उत्तर द्यायचे, याचा निर्णय घेण्याचे अधिकार लष्काराला असल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत. निवारी मुशर्रफ यांनी दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद म्हणाले की, मुशर्रफ यांना पाकिस्तानमध्ये कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची काहीही गरज नसल्याचे ते म्हणाले आहेत. भारताकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन योग्य नसल्याचे मुशर्रफ म्हणाले होते. भारताने पाकिस्तानच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे मुशर्रफ म्हणाले होते.
या आनंदीबेन ‘म’ चा ‘गु’ करायला निघाल्या– राज ठाकरे
मुंबई – राज ठाकरे यांनी काल गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा समाचार घेतला. त्यांनी उद्योगपतींना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन केले, यावर राज यांनी टीका केली. इतिहासात एक आनंदीबाई होत्या त्यांनी ‘ध’ चा ‘मा’ केला, आता या आनंदीबेन ‘म’ चा ‘गु’ करायला निघाल्या आहेत. महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नसल्याचा इशारा राज यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रथमच जाहीर टीका केली आहे. भांडूप येथील सभेत राज यांनी, मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्या सारखे वागत, असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारने घोषणा केलेल्या पहिल्या बुलेट ट्रेनवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. बुलेट ट्रेन मुंबई- अहमदाबादच का हवी, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी बळ दिले, असे सांगत त्यांनी भाजपच्या स्वबळावर घणाघात केला.
पंतप्रधान अमेरिकेत गेले तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी ‘केम छो’ म्हणून मोदींचे स्वागत केले. त्यांना हिंदीत स्वागत करता येत नव्हते का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मोदी काय गुजरातचे पंतप्रधान आहेत का? असा सवाल करत ते म्हणाले, मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी त्याच पद्धतीने वागले पाहिजे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रचारसभा अटोपून मुंबईत परतले आहेत. रविवारी रात्री त्यांची शिशिर शिंदे यांच्या प्रचारार्थ भांडूपमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील ऑक्टोबर हिटमध्येही हजारो लोक सभेसाठी तळ ठोकून बसत असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्रात येण्याची गरजच काय, असा सवाल उपस्थित करुन महाराष्ट्रात भाजपला बाळासाहेब ठाकरेंनी बळ दिले आता तेच बेंडकुळ्या दाखवत आहे. महाराष्ट्राला स्वायत्तता हवी असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
मोदी सरकारवर तोफ डागताना राज ठाकरे म्हणाले, ‘मोदी म्हणत आहेत, आमच्या हातात सत्ता द्या, केंद्र मदत करेल. यावर अक्षेप घेत राज ठाकरे यांनी सवाल केला, आमच्या हातात सत्ता आली तर, मदत करणार नाही का? मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्यांनी केली ना मदत. मग, महाराष्ट्रात राज ठाकरेंचे सरकार आल्यावर तुम्हाला मदत करावीच लागेल.’
भाजपकडे महाराष्ट्रात नेताच नाही, हे आम्हाला सांगण्याची गरज नाही ते मोदींनी त्यांच्या पहिल्याच सभेत सांगितले, असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मोदींनी भाजपच्या नेत्यांची पहिल्याच सभेत लायकी काढली, असे सांगत राज म्हणाले, ‘मुंडे असते तर मला महाराष्ट्रात येण्याची गरजच नव्हती, असे मोदींनी बीडमधील पहिल्याच सभेत सांगितले. म्हणजे सध्या जे स्वतःला नेते म्हणवून घेत आहेत त्यातील एकही लायकीचा नाही. भाजपच्या एकाही बॅनरवर स्थानिक नेता नाही. यांची लायकीच नाही, अशी टीका त्यांनी केली.
भाजपचे उमेदवार कोणत्या पक्षातून आणि कुठून आले याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली आणि भाजपच्या स्वबळाची पोलखोल जनतेसमोर केली.
आंबेगाव शिरुर मधील राष्ट्रवादीची दहशत मोडून काढू – खा .आढळराव-पाटील
जांबूत-
आंबेगाव शिरुरचे आमदार म्हणून अरुण गिरेंच्या रूपाने अरुणोदय होणार आहे, त्याचबरोबर शिवशाहीचे सरकार येणार आहे. राष्ट्रवादीची ही दहशत आपण मोडून काढू असे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांच्या प्रचारार्थ ते टाकळीहाजी, जांबूत (ता. शिरूर) येथे बोलत होते. या वेळी टाकळीहाजी येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश चोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
खा.आढळराव पाटील म्हणाले की, या माणसाने सोज्वळ असल्याचा मुखवटा धारण केला आहे. प्रत्यक्षात बुरख्यामागे भीषण वास्तव दडले आहे. आंबेगावच्या जनतेला ते आता पूर्णपणे समजले आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र शासनाच्या एमकेसीएलचा दोन हजार कोटींचा घोटाळा समोर आणला आहे.
या वेळी बोलताना अरुण गिरे म्हणाले की, या वेळी बदल घडणार व आंबेगाव-शिरूर मतदारसंघावर भगवा फडकणारच आहे. खासदार आढळराव-पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वा खाली या मतदारसंघाचा आपण विकास करणार आहोत. या वेळी उपजिल्हाप्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख दादा खर्डे, रविंद्र करंजखेले, बी. डी. आढळराव-पाटील, गणेश जामदार, माउली घोडे, बाळासाहेब वाघ, पारभाऊ गावडे, लक्ष्मण घोड, नागरिक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
केळकर रोड आरक्षणाचा प्रश्न सोडवणार – डॉ. रोहित टिळक
केळकर रस्त्यावर डीपी रोडचे आरक्षण असल्याने अनेक वाड्यांचा विकास थांबला आहे. या रस्त्यावरचे आरक्षण महापालिकेने पर्यायी नदीपात्रातील रस्त्यावर टाकले असल्याने केळकर रोड आरक्षण उठवण्याचा प्रश्न तातडिने सोडवू असे कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट आघाडीचे उमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी आज येथे सांगितले.
या शिवाय प्रस्तावित विकास आराखड्यातील काही तरतुदी कशा त्रासदायक आहेत याच्या तक्रारी अनेक नागरीकांनी आजच्या प्रचार फेरी दरम्यान डॉ. टिळक यांच्याकडे मांडल्या आहेत. त्यातही लक्ष घालू असे सांगत त्यांनी नागरीकांना आश्वस्त केले. दुपारी केसरी वाड्यापासून डॉ. टिळक यांनी प्रचार फेरी सुरू केली. त्यांच्या समावेत आमदार अनंतराव गाडगीळ, गोपाळ तिवारी, प्रणेती टिळक, बाळासाहेब दाभेकर, कसबा मतदारसंघाचे प्रचार समन्वयक वीरेंद्र किराड, डॉ. सायली कुलकर्णी आदी मान्यवर तसेच काँग्रेसचे स्थानिक तरूण पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केसरीवाड्यातील गणरायचे दर्शन घेत प्रचारफेरी सुरू झाली. मोदी गणपती जवळ डॉ. टिळक यांचे फटाक्यांच्या माळा उडवून दणदणीत स्वागत दाभेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. नारायण पेठे आणि शनिवार पेठेतील अनेक वाड्यांच्या जागी इमारती उभ्या राहिल्या आहेत. यातील जुने भाडेकरू आवर्जून डॉ. टिळक यांच्या स्वागतासाठी खाली येऊन थांबल्याचे चित्र बघायला मिळाले. आजचा प्रचार फेरीत डॉ. सायली कुलकर्णी यांच्या सर्व सहका-यांनी लालरंगाचे बांधलेले फेटे लक्ष वेधून घेत होते. मोदी गणपती, पत्र्या मारूती, लोखंडे तालीम, फुटका बुरूज, मुठेश्वर मंडळ, कबीर बाग परिसर, विनायक मंडळ अशा मार्गावर प्रचार फेरी झाली. अनेक ठिकाणी डॉ. टिळक यांना वैयक्तीक ओळखणारे घरी नेण्यासाठी उत्सुक होते. आजच्या प्रचार फेरीचा मार्ग मोठा असून सर्वांच्या समावेत चालत जाणेच डॉ. टिळक यांनी पसंत केले. प्रत्येक गणपती मंडळाजवळ कार्यकर्तेही डॉ.टिळक यांचे स्वागत करण्यासाठी थांबलेले दिसले. गणपतींचे दर्शन घेत व आरती करत प्रचार फेरी सुरू होती. अखेर अनाथ हिंदू महिला आश्रमाजवळ प्रचारफेरीचा समारोप झाला.
ओट्यांच्या घरांना मालकीहक्क देऊ : अभय छाजेड
अप्पर-सुप्परच्या काही भागांत अजूनही पाण्याचे व ड्रेनेजचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला आणि या भागातील ओट्यांच्या घरांना मालकीहक्क मिळवून देण्यासाठी, आपण निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य देणार असल्याचे पर्वर्ती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे गटाचे उमेदवार अँड़ अभय छाजेड यांनी सांगितले. त्यांनी रविवारी संपूर्ण अप्पर-सुप्पर इंदिरानगरचा परिसर पदयात्रेद्वारे पिंजून काढला.
अँड़ अभय छाजेड यांच्या पदयात्रेला अप्पर इंदिरानगर येथील पासलकर चौकातून सुरुवात झाली. त्यांच्यासमवेत स्वीकृत नगरसेवक रमेश सोनकांबळे, विजयराव मोहिते, विजय पवार, चव्हाणसर, रवी नलावडे, मखांबलेताई, डॉ. सौ. अहिरे, जयकुमार ठोंबरे, संतोष हराळे, बंडू नलावडे आदी प्रमुख कार्यकर्ते, तसेच शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पासलकर चौकातून पुढे अप्पर भागातील प्रत्येक गल्ली न् गल्ली, वसाहती, चाळींच्या घराघरांत जाऊन अभय छाजेड यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. सुवासिनी अगदी रस्त्यावर येऊन अभय छाजेड यांना औक्षण करीत होत्या. ही पदयात्रा पुढे अण्णा भाऊ साठे वसाहत, संपूर्ण इंदिरानगर, न्यू गणेशनगर, महेश सोसायटी, तुकाईनगर असे मार्गक्रमण करीत पुष्पम गॅस एजन्सी येथे समाप्त झाली. पदयात्ना सुरू असताना अप्पर आणि २७६ ओटा नागरिकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. सतत जाणारी वीज व इतर प्रश्नांबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना छाजेड यांनी लक्ष देण्याच्या सूचना केल्यानंतर लगेचच अधिकार्यांना फोन करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात होता.
लालमहालास महत्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार

पुणे -कसबा विधानसभा मतदारसंघात असणार्या लालमहालास जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व मिळवून देण्यास माझा प्रयत्न राहणार असून, छत्रपती शिवाजीमहाराजांना आयुष्यभर साथ देणारे सरदार झांबरे, गायकवाड, पासलकर आदींचा वैभवशाली इतिहासही जगापुढे आणणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी दिले.
शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबा मतदारसंघात प्रसिद्ध ऐतिहासिक लालमहालाचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार्या स्मारकात रूपांतर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये उपलब्ध जागेचा नेटका वापर करून महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकाचा सचित्र इतिहास पुतळे व म्युरल्सच्या माध्यमातून आपण उभा करणार आहोत, त्याचबरोबर महाराजांच्या जन्मापासून ते स्वराज्य उभारणीपर्यंतच्या काळात त्यांना जीवाभावाची साथ करणारे कसब्यातील शिलेदार ज्यांचा उल्लेख केवळ आज ऐतिहासिक पुस्तकांपुरताच र्मयादित राहिला आहे अशा झांबरे, गायकवाड, पासलकरांबरोबरच शिवा काशिद, जीवा महाले, मदारी मेहतर, बाजीप्रभू देशपांडे आदि मावळ्य़ांच्या स्मृतिदेखील सचित्र स्वरूपात जिवंत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लालमहालास लागूनच असलेल्या जागेमध्ये ऐतिहासिक प्रसंगावर आधारित लेझर शोचे आयोजन, बागेचे सुशोभीकरण अशी एक शिवसृष्टीच निर्माण करण्याचा आपला मानस आहे.
यावेळी मानकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भय्या डाखवे, राजेंद्र कदम, गणेश नलावडे, प्रवीण तरवडे, एकलव्य गुंजाळ, संजय पासरेकर, किरण परदेशी, तात्या कुलकर्णी, सुरेश परदेशी, श्रीमती वनिता जगताप, वंदना नलवडे, देशकर ताई, जयश्री कडबाने, विमल यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो साभार – सुशील राठोड )



