Home Blog Page 364

मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद करा”, “तरुणांना नोकरी द्या”, “लोकशाही वाचवा” अशा आक्रमक घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या नेतृत्वात देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की –”सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे, जी भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल.”

त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक भाषेत सरकारला इशारा देत म्हटले “युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत. मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल.”

या मशाल मोर्चामध्ये हर्षवर्धन सपकाळ, डॉ विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे,माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील,  अभय छाजेड, अरविंद शिंदे,मोहन जोशी मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, सौरभ अमराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिल्ली लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपी चैतन्यानंद​​​​​​​ला आग्रा येथून अटक

0

दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थसारथी यांना शनिवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून अटक केली. चैतन्यानंदवर अनेक विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत.

चैतन्यानंद फरार होता आणि त्याचे शेवटचे ठिकाण आग्रा येथे सापडले. दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी छापे टाकले होते. पोलिसांच्या मते,

आरोपी विद्यार्थिनींना धमक्या देऊन, अश्लील मेसेज पाठवून आणि परदेश दौऱ्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवत असे. तो अनेकदा रात्री उशिरा विद्यार्थ्यांना त्याच्या खोलीत बोलावून कमी गुण देण्याची धमकी देत ​​असे.


तपासादरम्यान सापडलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजेसमधून असे दिसून आले की चैतन्यानंद विद्यार्थिनींना “बेबी,” “आय लव्ह यू,” आणि “आय अ‍ॅडॉर यू” असे मेसेज पाठवत असे आणि त्यांच्या केसांचे आणि कपड्यांचे कौतुकही करत असे.

पोलिस तपासात असेही आढळून आले की तीन महिला वॉर्डन आणि प्राध्यापक देखील आरोपीला मदत करत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या चॅट्स डिलीट करण्यास दबाव आणला आणि त्यांना गप्प राहण्यास सांगितले.
आरोपींनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत असलेल्या EWS श्रेणीतील विद्यार्थिनींना लक्ष्य केले. पोलिसांनी सांगितले की, ३२ विद्यार्थिनींच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यापैकी १७ जणांनी थेट लैंगिक छळ आणि मानसिक छळाची तक्रार केली.

आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचे जबाब नोंदवले आहेत. काही विद्यार्थ्यांना आरोपींनी परदेशी दौऱ्यांचे आमिष दाखवून फसवल्याचेही उघड झाले.

विद्यार्थिनींना त्याच्या खोलीत बोलावून कमी गुण देण्याची धमकी द्यायचा

पोलिस तपासात असे दिसून आले की चैतन्यानंदने विद्यार्थिनींना धमकावण्याची आणि लाच देण्याची रणनीती वापरली. तो वारंवार अश्लील संदेश पाठवत असे.

त्याचे मेसेज असे असायचे की, “माझ्या खोलीत ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला काहीही खर्च करावा लागणार नाही. जर तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला परीक्षेत नापास करेन.” आरोपी रात्रीच्या वेळी महिला विद्यार्थिनींना त्याच्या खोलीत बोलावत असे आणि नकार दिल्यास त्यांना कमी गुण देण्याची धमकी देत ​​असे.

आरोपींविरुद्ध आधीच गुन्हे दाखल आहेत

स्वामी चैतन्यनंद सरस्वतीवर आधीच अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. २००९ मध्ये दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१६ मध्ये वसंत कुंजमधील एका महिलेने त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा खटला दाखल केला होता. तथापि, चैतन्यनंदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

कला अनुभवाने जीवनात  येते समृद्धी : डॉ.मेधा कुलकर्णी

पुणे :

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे आणि सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (मिनिस्ट्री ऑफ कल्चर), दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा पर्व २०२५’ अंतर्गत आयोजित ‘विकसित भारत के रंग, कला के संग’  या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी एरंडवणे शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत शालेय गटात ७०० हून अधिक आणि महाविद्यालयीन गटात ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. एकूण १०८५ विद्यार्थ्यांनी  भाग घेतला.

या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सभागृहात झाले. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद इंदुरकर, उपसंचालक दिबकर दास, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.र्धा शालेय गटासाठी सकाळी ११ ते दुपारी १ आणि महाविद्यालयीन गटासाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडली. रंग, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेने परिपूर्ण कलाकृतींमुळे वातावरण रंगतदार झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला सीसीआरटी तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.संध्याकाळी ६ वाजता पारितोषिक वितरण व समारोप सोहळा संपन्न झाला. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे निवडक चित्रकृती दिल्ली येथील कला अकादमीमध्ये प्रदर्शित होणार आहेत.या उपक्रमामुळे पुण्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकारांना कला व संस्कृतीच्या उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव घेता आला.

  कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रथमत: अशा प्रकारची चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि CCRT यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी व कला शिक्षकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, उत्कृष्ट कला शिक्षकच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व व भवितव्य घडवू शकतात. आज शालेय शिक्षणात कला विषयांना मिळालेल्या महत्त्वामुळे ही जबाबदारी कला शिक्षक अतिशय उत्तम रित्या पार पाडत असल्याचे दिसून येते. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, उद्याची पिढी ही या अनुभवांमुळे अतिशय समृद्ध असणार आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. इंदुरकरांनी जीवनातील कलेचे महत्व अधोरेखित केले आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शालेय शिक्षणातील इतर व कला विषय हे वेगळे करताच येणार नाहीत. कलेच्या माध्यमातूनच इतर विषय अधिक उत्तमरीत्या समजू शकतात. संगीत, नृत्य, कीर्तन शिक्षण क्षेत्रातील दर्जा, कलेचे कार्य करण्याची धडाडी लक्षात घेता डॉ. इंदुरकर म्हणाले की, भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् सोबत केलेला कराराअंतर्गत आता वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील आणि याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. शारंगधर साठे यांनी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ची माहिती दिली. ते म्हणाले , ‘स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे कलेतील कार्य बघून CCRT, नवी दिल्ली ने आमच्याशी सामंजस्य करार केला आहे. आजचा कार्यक्रम या करारातील पहिला कार्यक्रम होता. यातून विदयार्थ्यांना संधी मिळणार आहे’.

मुंबई,पुण्यात रात्रभर पाऊस,मुंबई- पुण्याला रेड अलर्ट

0

मुंबई: राज्यात मागील आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून राजधानी मुंबईतही जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याने आज पुन्हा एकदा मुंबई शहराला रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज साधारणतः आकाश ढगाळ राहील. तसंच जोरदार ते अतिजोरदार पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पवासाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे. नाशिक घाट परिसराला रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस रेड ॲलर्ट आहे. आज, रविवारी मात्र महामुंबईला रेड ॲलर्ट देण्यात आल्याने मुंबईकर धास्तावले असून, मेगा ब्लॉकच्या दिवशी पावसामुळे आणखी किती खोळंबा होतो, अशी चिंता निर्माण झाली आहे. दक्षतेचे आवाहन करण्यात आले.मुंबईत शनिवारी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंतच्या १२ तासांमध्ये दिंडोशी येथे ३२.२, के पूर्व महापालिका विभाग कार्यालय येथे २४.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये बेलापूर येथे ७२ मिलीमीटर, नेरुळ येथे ९१ मिलीमीटर, महापालिका मुख्यालय येथे ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 36 जणांचा मृत्यू

0

शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ महिला आणि ८ मुलांचा समावेश आहे, असे तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम.ए. सुब्रमण्यम यांनी सांगितले. या अपघातात ५८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्षाच्या तमिळगा वेट्टी कझगम (टीव्हीके) च्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. ९ वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. विजयने तिला शोधण्यासाठी मंचावरून पोलिस आणि त्याच्या समर्थकांना आवाहन केले, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

गर्दीत अडकल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अनेक लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध पडू लागले. परिस्थिती बिकट होताना पाहून विजयने आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर ते भाषण सोडून गेले.

विजयच्या रॅलीला १०,००० लोकांसाठी परवानगी होती. प्रशासनाने अंदाज लावला होता की, ५० हजार लोक जमतील. परंतु, तिथे सुमारे १ लाख २० हजार लोक जमले होते.

लोकमान्यनगरचे पुनर्वसन थांबविण्यामागे नेमकं रहस्य दडलंय काय ?

‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या व्यवस्थापन परिषदेवर प्रसेनजीत फडणवीस

0

पुणे –

प्रसेनजीत फडणवीस यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (वायसीएमओयू, नाशिक) व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थी दशेपासून फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. २०१७-२०२२ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून गेली आठ वर्षे ते कार्यरत आहेत. अधिसभेत विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. ‘एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन’च्या संचालक मंडळाचे ते सदस्य आहेत.

फडणवीस म्हणाले, “यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असल्याने व्यापक स्वरूपात काम करण्याची संधी मिळणार आहे. सर्वांसाठी शिक्षण, मुक्त व दूरस्थ शिक्षण पद्धतीचा प्रसार, समाजातील सर्व घटकांसाठी अभ्यासक्रमांची उपलब्धता, स्वयंअध्ययन आणि लवचिकता, आजीवन शिक्षणाचा प्रचार कौशल्य विकास व व्यावसायिक शिक्षण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे.”

आयआयटी बॉम्बे येथील संशोधक प्राध्यापक डॉ. अक्षय निकूंभ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर कॉलेजचे मनोहर गुजराथी यांचीही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त ‘वर्दीतील नवदुर्गां’चा चित्रपट आणि नाट्य संस्थेतर्फे सन्मान

पुणे: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून चित्रपट आणि नाट्य संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वर्दीतील नवदुर्गा’ या उपक्रमांतर्गत पुणे शहरातील शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, फरासखाना, खडक, स्वारगेट, चंदननगर, येरवडा व विमाननगर या नऊ पोलीस ठाण्यांमधील कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व महिला पोलिस अधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटपही करण्यात आले.

या उपक्रमाला संस्थापक अध्यक्ष शुभम शशिकांत मोरे, सचिव अभिनेता चेतन दशरथ गिरी, बालगंधर्व टॅलेंट कट्टा अध्यक्ष निलेंद्र यादव, उपाध्यक्ष अभिनेता कुणाल देशमुख, संचालिका अभिनेत्री रश्मी बांदल, संचालिका अभिनेत्री अनुश्री ढम, आनंदी फाउंडेशनचे गणेश विटकर, सामाजिक कार्यकर्ते रोहित भिसे, दीपक भारती, रंगभूषाकार बालाजी गोरे, अनिल गायकवाड, सुधीर भालेराव, ओमकार जाधव, अनिकेत जगताप, मयूर कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शुभम मोरे म्हणाले, “आपल्या समाजजीवनात पोलिसांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. २४ तास कर्तव्य बजावताना घरातील जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखणाऱ्या महिला पोलिस अधिकारी खऱ्या अर्थाने आधुनिक नवदुर्गा आहेत. त्यांच्या त्याग, धैर्य आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा उपक्रम गेली आठ वर्षे सातत्याने राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस दलातील महिलांना एक वेगळी ऊर्जा व प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा आहे.”

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

बीएसएनएलच्या स्वदेशी 4जी सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪ राज्यात नवीन ९ हजार ३० ‘4जी’ टॉवर्सच्या माध्यमातून लाखो लोकांना मिळणार सेवा

▪ स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी विकसित करणारा जगातला भारत पाचवा देश

पुणे, दि. २७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ‘4G’ नेटवर्कच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पणानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदीर येरवडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारती एअरटेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, खासदार मेधा कुलकर्णी, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल दी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात राज्य शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यातील ९० टक्के सेवा एन्ड टू एन्ड डिजीटल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना बसल्या जागी त्याच्या अर्जाची माहिती मिळणार आहे. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलवरून सेवा उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. गावोगावी भारतनेटच्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आणि बीएसएनएलचे अभिनंदन केले.

बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण होणे ही आनंदाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, यातील ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रातील आहे. देशातील २४ हजार ६८० हजार गावांना या टावर्सच्या माध्यमातून ‘4जी’ नेटवर्क उपलब्ध होणार आहे. देशाला विकसीत करण्यासाठी परस्पर दळणवळण (कम्युनिकेशन) महत्वाचे आहे. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी विकासाचा मार्ग हा दळणवळण असल्याचे म्हटले होते. त्यांनी दळणवळणाच्या दृष्टीने देशाला आणि गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केल्या. आता २१ व्या शतकात विकासासाठी केवळ रस्तेच नाही तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असल्याचे लक्षात आले. मोबाईल कनेक्टीव्हीटी आणि इंटरनेट गावात पोहोचविल्याशिवाय या शतकातील विकास गावापर्यंत पोहोचविता येत नाही. त्यामुळे गावागावात हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी 4जी टॉवर्सची निर्मिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली.

सुरूवातीला स्वतःचे 4जी तंत्रज्ञान फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉट, तेजस, आयआयटी, तेजस, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी शुद्ध, देशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञान, तेज, कर्मण्यते्द्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्य, शिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाची, वातावरण बदलाची माहिती देवून त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योग, शेती, बाजारासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. कनेक्टीव्हीटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे. ते गावापर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे ही 4जी कनेक्टिव्हिटी आहे. या टॉवर्समध्ये 5जी मध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्याने जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बीएसएनएलची स्वदेशी ‘4जी’ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीने आजचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्रांतीच्या नंतरचे हे सर्वात मोठे अभियान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक महासत्ता म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

बीएसएनएल आता नफ्यात आले असून पुढे जात असल्याचा आनंद आहे. स्वदेशी ‘4जी’ तंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे महत्वाचे पाऊल आहे. जे अमेरिकेला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ग्रामीण भागाला, ग्रामीण भागात शिक्षण, दूरस्थ आरोग्य सेवा (टेलिमिडेसिन), पर्यटन आदीला याचा फायदा होईल. बीएसएनएलची स्वदेशी ‘4जी’ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएलचा नवा प्रवास सुरू होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे सहाय्य लागेल ते महाराष्ट्र करेल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, प्रधानमंत्री यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वदेशी 4जी तंत्रज्ञान फक्त २२ महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली आहे. नेटवर्किंग, संरक्षण क्षेत्र, अवकाश विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर येऊ लागली आहे. पुढील काळात आपण 5जी आणि 6जी कडे जाणार आहोत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी भागात जाणार असून २५ हजार ठिकाणी पोहोचणार आहोत. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात हरिंदर कुमार यांनी महाराष्ट्रात ९ हजार ३० टॉवर्सचे उद्घाटन होत असून त्यात डिजीटल भारत निधी 4जी प्रकल्पांतर्गत २ हजार १७४ टॉवर्सचा समावेश आहे. राज्य शासनाने २ हजार ७५१ टॉवर्ससाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असून वीजेची व्यवस्था, टॉवर्सपर्यंत पोहोचण्याचा रस्त्यांचा अधिकार (राईट ऑफ वे) आदी सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. आगामी काळात ९३० अतिरिक्त टॉवर्सद्वारे जोडणी नसलेल्या गावांपर्यंत पोहणार असल्याची माहिती दिली.

महावितरणच्या महिला संघाला ४७व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक; दुहेरीतही सुवर्ण

0

पुरुष संघाने केली कांस्यपदकाची कमाई

मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२५: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन २०२५ च्या स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले तर पुरुष संघ कांस्यपदकाचे विजेते ठरले. यासह महिला खेळाडूंनी दुहेरीत सुवर्ण, एकेरीमध्ये रौप्यपदक जिंकत राष्ट्रीय स्पर्धेत वर्चस्व गाजवले. या सर्व खेळाडूंचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले आहे.

हिसार (हरियाणा) येथे तीन दिवसीय ४७ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुक्रवारी (दि. २६) समारोप झाला. देशभरातली विविध वीज कंपन्यांचे संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. महावितरणच्या महिला संघाने स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत गुजरात संघाला २-० ने पराभूत केले आणि सलग दुसऱ्या सुवर्णपदकाचा मान मिळवला. महावितरणच्या रितिका नायडू (कर्णधार), अनिता कुलकर्णी, चैत्रा पै, वैष्णवी गांगरकर, राणी पानसरे या खेळाडूंनी ही कामगिरी केली. तर चैत्रा पै व रितिका नायडू यांनी दुहेरी महिला गटात सुवर्णपदकाची तर अनिता कुलकर्णी यांनी एकेरी गटात रौप्यपदकाची कमाई केली.

महावितरणच्या पुरुष संघातील भरत वशिष्ठ (कर्णधार), पंकज पाठक, रोहन पाटील, सुरेश जाधव, दिपक नाईकवाडे यांनी चुरशीच्या सामन्यांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली व स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. महावितरणच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणून गुणवंत इप्पर तर संघ व्यवस्थापक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले. महिला व पुरुष बॅडमिंटन संघातील खेळाडूंना पुणे येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे व पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी पुढाकार घेतला व संवाद साधून खेळाडूंचे मनोबल वाढवले.

रस्त्यावरील फ्लेक्स उखडण्यासाठी नागरिकच उतरले रस्त्यावर ..महापालिका अधिकारी तर दबावाखाली

पुणे- गणपती नंतर आता नवरात्र उत्सवात फ्लेक्स बाजी करणारांना आलेला ऊत शमविण्यासाठी आता पुण्यात नागरिक रस्त्यावर येऊ पाहत असल्याचे दिसून आले आहे . महापालिका अधिकारी राजकीय दबावाखाली असल्याने पुण्यातील नागरिकांनी आता फ्लेक्स हटावो ची मोहीम आपल्या हाथी घेण्याचे ठरविलेले दिसतेय .भर पावसात विमाननगरमधील रहिवाशांनी हि मोहीम राबवून या नागरिकांनी स्वतःच ५० फ्लेक्स हटविले आहेत


अनधिकृत जाहिरातींनी गच्च भरलेला आपला परिसर मोकळा करण्याच्या उद्देशाने विमाननगरमधील रहिवाशांनी आज सकाळी स्वयंस्फूर्तीने फ्लेक्स काढण्याची मोहीम राबविली. भर पावसात सकाळी त्यांनी केवळ एका तासात सुमारे ४० ते ५० फ्लेक्स एकत्रितपणे हटवले.लहान-मोठ्या फ्लेक्सनी ग्रासलेला व विद्रुप झालेला विमाननगरचा परिसर पुन्हा स्वच्छ करण्याचा निर्धार करून येथील अनेक नागरिक सकाळी ५.३० वाजता एकत्र जमले आणि ५.४५ वाजता त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेपूर्वी त्यांनी पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला फ्लेक्स काढून टाकण्यासंदर्भात विनंती केली होती. या विभागाने अलिकडेच खासगी क्लासेसचे काही फ्लेक्स काढले होते. मात्र उरलेले फ्लेक्स नवरात्रीनंतरच काढू, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दररोज वाढतच जाणाऱ्या या फ्लेक्सच्या समस्येमुळे नागरिकांनी मग स्वतःच कारवाईचा निर्णय घेतला.फ्लेक्स काढताना एक चिंताजनक गोष्ट समोर आली. नवे फ्लेक्स जुन्या फ्लेक्सवरच चिकटवले गेले होते. त्यामुळे त्यांचे अनेक थर तयार झाले होते. मंदिरे, शाळा, बागा, दुकानांच्या पाट्या, नो पार्किंगचे फलक, अगदी विजेचे खांबसुद्धा फ्लेक्सनी पूर्णपणे झाकले गेले होते. कोणतीही सार्वजनिक आणि सामुदायिक जागा फ्लेक्सच्या तावडीतून सुटली नव्हती.“ही समस्या एखाद्या विषाणूसारखी पसरत आहे. तिच्यावर कोणताही ताबा नाही. वाहतुकीचे फलक असो वा दुकानांची नावे, कुठलाही भाग वाचलेला नाही,” असे एका स्वयंसेवकाने सांगितले.विमाननगरच्या नागरिकांनी स्पष्ट केले, की फ्लेक्स काढण्याची ही मोहीम राजकीय नसून सामाजिक आहे. दृश्य प्रदूषण कमी करणे आणि सार्वजनिक जागा पुन्हा स्वच्छ राखणे हा यामागचा उद्देश आहे. त्यांनी महापालिकेला वेळेवर आणि धाडसी पावले उचलण्याचे आवाहन केले. “पावसाचीही फिकीर न करता आम्ही जे करणे आवश्यक होते ते केले. आता महापालिकेने कठोर कारवाई करावी; जेणेकरून नागरिकांना हा त्रास एकट्याने सहन करावा लागू नये,” असे दुसरे एक रहिवासी म्हणाले.

“नो मोअर फ्लेक्स, नो मोअर मेस!” अशा घोषणा देत नागरिकांनी या मोहिमेचा शेवट केला. #FlexFreeVimanNagar या हॅशटॅगद्वारे त्यांनी याबाबत जनजागृती सुरू केली आहे. भविष्यात अधिकाधिक नागरिक यात सहभागी होतील, अशी त्यांना आशा आहे.

भारताने म्हटले – PAK पंतप्रधानांचे ते हास्यास्पद नाटक …

0

वॉशिंग्टन –भारताने शनिवारी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि खोटे बोलण्याचा आरोप केला. “पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हास्यास्पद नाटक रचले आहे. ते दहशतवादाला प्रोत्साहन देतात, जो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. कितीही नाटक किंवा खोटे बोलून सत्य लपवता येत नाही,” असे भारतीय राजदूत पेटल गहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) म्हटले आहे.मे महिन्यातील संघर्षाबद्दल शरीफ यांचे दावे गेहलोत यांनी फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, “९ मे पर्यंत पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची धमकी देत ​​होता. पण १० मे रोजी भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे शत्रू म्हणून वर्णन केले आणि दावा केला की पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला आहे. त्यांनी म्हटले की, या संघर्षादरम्यान पाकिस्तानने सात भारतीय विमाने पाडली होती.
गेहलोत म्हणाल्या, “भारत आणि पाकिस्तानमधील सर्व मुद्दे द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवले जातील. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही.”त्यांनी पाकिस्तानच्या शांततेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की त्यांचा देश द्वेषाने बुडालेला आहे. भारताने स्पष्ट केले की ते दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारेल.

गेहलोत यांनी पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरीदके येथे ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख केला आणि सरकार कुख्यात दहशतवाद्यांना श्रद्धांजली आणि आदर देत असल्याचा आरोपही केला.गेहलोत म्हणाल्या, “एक चित्र हजार शब्द बोलते आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूर आणि मुरीदके दहशतवादी छावण्यांमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे अनेक फोटो आम्ही पाहिले. जेव्हा पाकिस्तानी सैन्य आणि अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहतात, तेव्हा ते राजवटीवर शंका घेणार नाही का?”
गेहलोत यांनी जोर देऊन सांगितले की, “सत्य हे आहे की, भूतकाळात जसे होते तसेच, भारतातील निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्ही आमच्या लोकांचे रक्षण करण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याचा आमचा अधिकार वापरला आहे.”त्यांनी पाकिस्तानने सर्व दहशतवादी छावण्या ताबडतोब बंद कराव्यात आणि दहशतवाद्यांना त्यांच्या स्वाधीन करावे अशी मागणी केली. त्यांनी इशारा दिला की भारत “अणु ब्लॅकमेल” ला बळी न पडता दहशतवादी आणि त्यांच्या प्रायोजकांना जबाबदार धरेल.

पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला दहा वर्षे लपवून ठेवले होते-या वर्षी एप्रिलमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने एका दहशतवादी संघटनेचे रक्षण केले याकडे गेहलोत यांनी लक्ष वेधले. म्हणाल्या, “हा तोच पाकिस्तान आहे ज्याने २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिकार आघाडीचे रक्षण केले होते. ही संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांच्या हत्येसाठी जबाबदार होती.”पुढे म्हणाल्या, “पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला दहा वर्षे लपवून ठेवले होते. त्यांचे मंत्री आता कबूल करत आहेत की ते अनेक दशकांपासून दहशतवादी छावण्या चालवत आहेत.”

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी दरवर्षीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “मी काश्मिरी जनतेसोबत उभा आहे. पाकिस्तान त्यांच्यासोबत उभा आहे. काश्मीरमधील भारताचे अत्याचार लवकरच संपतील.”शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयाखाली काश्मीरसाठी जनमत चाचणी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी असा दावा केला की पाकिस्तान दहशतवादाचा निषेध करतो आणि तेहरिक-ए-तालिबान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सारख्या गटांना परदेशी पाठिंबा मिळतो. भारताने या टिप्पण्या फेटाळून लावल्या आणि म्हटले की पाकिस्तान सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देतो.

पाकिस्तानी PM नी संयुक्त राष्ट्रात म्हटले, भारताविरुद्ध आम्ही विजय मिळविला, पहलगाम हल्ल्याचा भारताने राजकीय फायदा घेतला

0

शरीफ म्हणाले – भारताने एकतर्फी सिंधू जल करार थांबवला,ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर मोठे युद्ध भडकले असते

न्यूयॉर्क-पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे शत्रू म्हणून वर्णन केले आणि दावा केला की, पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानला आता शांतता हवी आहे.पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी अशी विनंती त्यांनी केली होती, परंतु भारताने हा प्रस्ताव नाकारला आणि या दुर्घटनेचा राजकीय फायदा घेतला, असे शाहबाज म्हणाले.

शरीफ म्हणाले की, त्यांनी गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून इशारा दिला होता की, पाकिस्तान कोणताही बाह्य हल्ला सहन करणार नाही. त्यांचा इशारा खरा ठरला असे त्यांनी सांगितले. या वर्षी मे महिन्यात पाकिस्तानवर कोणत्याही चिथावणीशिवाय हल्ला करण्यात आला.संघर्षादरम्यान मजबूत स्थितीत असूनही पाकिस्तानने युद्धबंदीला पाठिंबा दिल्याचा दावा शाहबाज यांनी केला. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानत म्हटले की, त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय संपूर्ण प्रदेशात मोठे युद्ध भडकले असते.

शाहबाज म्हणाले की, पाकिस्तानने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले, कारण त्यांच्या शांतता प्रयत्नांमुळे दक्षिण आशियातील विनाशकारी युद्ध टाळता आले.

शाहबाज म्हणाले की, पाकिस्तान भारतासोबत वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. दक्षिण आशियाला प्रक्षोभक नेत्यांची नव्हे, तर समजूतदार नेत्यांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान शाहबाज यांनी भारतावर सिंधू जल करार एकतर्फी थांबवल्याचा आरोप केला आणि म्हटले की, हे केवळ कराराचे उल्लंघन नाही तर आंतरराष्ट्रीय कायद्याचेही उल्लंघन आहे.ते म्हणाले की, पाकिस्तानने हे स्पष्ट केले आहे की ते त्यांच्या २४ कोटी लोकांच्या जल हक्कांचे रक्षण करेल आणि सिंधू जल कराराचे कोणतेही उल्लंघन युद्धाची कृती मानेल.

शाहबाज यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि ते काश्मिरींच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांना विश्वास आहे की एक दिवस संयुक्त राष्ट्रांच्या कायद्यानुसार काश्मीरमध्ये निष्पक्ष जनमत चाचणी होईल आणि काश्मिरींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल.

गुरुवारी रात्री उशिरा शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट सुमारे एक तास २० मिनिटे चालली. ही भेट व्हाईट हाऊसमध्ये बंद दाराआड झाली. या बैठकीपासून माध्यमांना दूर ठेवण्यात आले.

ट्रम्प आणि शरीफ-मुनीर यांच्यातील संभाषणाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ व्हाईट हाऊसने अद्याप प्रसिद्ध केलेले नाहीत. सामान्यतः, जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष परदेशी नेत्याला भेटतात, तेव्हा व्हाईट हाऊस अधिकृत फोटो प्रसिद्ध करते.

४५ दिवसांचे लग्न अन ४५ लाखांची पोटगी

पुणे-लग्नानंतर अवघ्या 45 दिवसांत संसारवेल तुटल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला तब्बल 45 लाख रुपयांची पोटगी दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. या महागड्या घटस्फोटाची चर्चा आता कुटुंब न्यायालयात रंगली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, या प्रकरणातील दाम्पत्याचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला होता. लग्न अतिशय थाटामाटात झाले होते. पण नवरी सासरी नांदण्यास गेल्यानंतर लग्नातील हुंडा व मानपान या मुद्यांवर कुटुंबात कुरबुरी निर्माण झाल्या. त्यानंतरही काही दिवस तसेच गेले. त्यानंतर पतीने पत्नीला ‘मला तू पसंत नाहीस, कुटुंबाच्या दबावाखाली मी हे लग्न केले’ असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती-पत्नीतील मतभेद टोकाला गेले. त्यातच हा वाद चिघळल्यानंतर सासरच्या मंडळींनी एकेदिवशी नवरीला थेट घराबाहेर काढले.

या घटनेनंतर पीडित महिलेने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळ व हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सविस्तर तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मधल्या काळात पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या अर्जानंतर पत्नीची बाजू लढवणाऱ्या वकील प्रियांका काटकर व वकील रेश्मा सोनार यांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यात पतीने 45 लाख रुपयांची एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली. त्याला पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यानंतर वर्षभरापासून एकमेकांविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या या दाम्पत्याच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला. पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात तडजोडीचा मार्ग निघाला आणि एकरकमी पोटगीच्या बदल्यात या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. या घटनाक्रमानंतर नववधूने सासरच्या मंडळीविरोधात दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा मागे घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालयाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून वाघळवाडी येथे साकारण्यात येणार अत्याधुनिक रुग्णालय

बारामती, दि. २६: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमरजीत रामशे, अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

आरोग्य पथक रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आराखड्यातील कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून श्री. पवार म्हणाले, आराखड्यातील रस्ते, पाण्याची टाकी, शवागृह, वाहनतळ, वसतीगृह आदी कामांबाबत केलेल्या सूचनांचा समावेश करुन सुधारित आराखडा तयार करावा.

विकासकामे करतांना परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या.

रुग्णालयात सुविधा
वाघळवाडी येथे १० एकर जागेत नवीन शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालयाच्या बांधकामासाठी ६४ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. रुग्णालय व परिसरामध्ये १० बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), ५ सुसज्य ऑपरेशन थिएटर, महिला व पुरुष सामान्य कक्ष (जनरल वार्ड), अतिदक्षता विभाग (आय.सी.यू/एन.आय.सी.यू), एक्स-रे कक्ष, प्रसूती व बालरुग्ण विभाग, उपहारगृह, औषधालय, अंतर्गत रस्ते, बगिचा (गार्डन), सुशोभिकरण, वाहनतळ, ८० मुला-मुलींसाठी वसतिगृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र:

वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता ४३७.२२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्रामध्ये महिला व पुरुषांकरिता प्रत्येकी ३ याप्रमाणे ६ खाटांची क्षमता, वैद्यकीय अधिकारी कक्ष, प्रयोगशाळा, ड्रेसिंग कक्ष, महिला कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष (ऑपरेशन थिएटर), औषधसाठा कक्ष, स्वच्छतागृह, अभिलेख कक्ष, सोलार सुविधा, अग्निशमन यंत्रणा, फर्निचर, संरक्षक भिंत, वाहनतळ, जागा सपाटीकरणाची कामे करण्यात येणार आहे. या केंद्राअंतर्गत एकूण १३ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या प्रयत्नातून बारामती परिसरातील नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. वाघळवाडी हे गाव बारामती शहरापासून ४० कि.मी. पेक्षा अधिक अंतर आहे, त्यामुळे रुग्णालयाच्या माध्यमातून तालुकाच्या दक्षिण व पश्चिम भागातील तसेच इतर परिसरातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सोईसुविधा विनाविलंब उपलब्ध होणार आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरणार आहे.

या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार तसेच स्तनदा माता, लहान बालकांचे लसीकरण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ होणार आहे.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पुरुषोत्तम जगताप यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर होते.