Home Blog Page 363

शासनमान्य ग्रंथांच्या यादीसाठी २०२४ मध्ये प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत आवाहन

पुणे, दि. २९ सप्टेंबर :राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शक ठरावी म्हणून दरवर्षी ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रंथ निवड समितीच्या शिफारशीवर आधारित “शासनमान्य ग्रंथांची यादी” प्रकाशित करण्यात येते.

सन २०२४ या कॅलेंडर वर्षात (दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांचा शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्यासाठी संबंधित ग्रंथकार, प्रकाशक यांनी प्रत्येकी एक प्रत विनामूल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वीच संचालनालयास पाठविले असल्यास त्यांची पुन्हा प्रत पाठविण्याची आवश्यकता नाही. असे अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हवामान बदल आणि पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव

▪️ सीओईपी पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात तरुण क्लायमेट चॅम्पियन्सचा सन्मान

पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ –
हवामान बदल व पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात गौरव करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम आणि सीईई यांच्या सहकार्याने “राज्यस्तरीय पाणी संवर्धन उत्कृष्ट पुरस्कार समारंभ” सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर येथे संपन्न झाला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विविध महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय पाणी संवर्धन कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन हे व्यापक सामाजिक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचे असते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार असलेले आजचे युवक शास्त्रीय ज्ञान आणि ठोस कृतीतून हवामान बदलासारख्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत हे निश्चितच उत्साहवर्धक आहे.”

महाराष्ट्र शासन व युनिसेफ महाराष्ट्र यांनी २०२३ पासून “यूथ एंगेजमेंट अँड वॉटर स्टुअर्डशिप (YEWS)” ही राज्यव्यापी मोहिम राबवली आहे. या अंतर्गत १३ जिल्ह्यांतील १,५०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ग्रीन क्लब स्थापन करून पाणी बचतीसाठी वैयक्तिक, संस्थात्मक व सामुदायिक पातळीवर उपक्रम राबवले गेले आहेत.

विद्यार्थ्यांनी गळणारे नळ दुरुस्त करणे, आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, दात घासताना पाणी न वाहू देणे असे उपाय दैनंदिन जीवनात अंगीकारले. संस्था स्तरावर पावसाचे पाणी साठवणे, सोक पिट्स व रिचार्ज पिट्स तयार करणे आदी उपक्रमही राबवले गेले.

ऑगस्ट २०२३ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत ७,९१,००० विद्यार्थ्यांनी दैनंदिन सवयींमध्ये बदल करून एकत्रितपणे सुमारे २५.८ दशलक्ष घनमीटर पाणी वाचवले असून ही माहिती “Why Waste YEWS” या मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदवली गेली आहे. याशिवाय, MahaYouthNet पोर्टलवर राज्य सरकारने हवामान बदल व पाणी व्यवस्थापन विषयक ऑनलाइन सेल्फ-पेस्ड कोर्स सुरू केला आहे. आतापर्यंत २,२५,३७८ विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये प्रवेश घेतला असून १,३१,२९१ विद्यार्थ्यांनी तो यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मधील उपक्रमांच्या मूल्यमापनाच्या आधारे “सर्वोत्कृष्ट ग्रीन क्लब”, “पाणी संवर्धनावर सर्वोत्तम पोस्टर” आणि “पाणी बचतीवर सर्वोत्तम शॉर्ट व्हिडीओ/रील” या गटांमध्ये पाच राज्यस्तरीय व तीन जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यासाठी निवडलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स व विद्यार्थी उपस्थित होते. अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पालघर, पुणे व सातारा जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, नॅशनल सर्व्हिस स्कीम (एनएसएस), युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम, सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन (सीईई), वाय वेस्ट आणि युवक नेटवर्क यांच्या सहकार्याने राबवण्यात आला.

जिल्ह्यात क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय

पुणे दि. २९ –
जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे घनकचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून स्थानिक स्तरावर त्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. गावस्तरावर प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने, एकत्रित क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या अनुषंगाने आज महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद पुणे येथे बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस श्री. चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
श्रीमती शालिनी कडू प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), श्री. व्यंकटेश दुर्वास सहआयुक्त नगरपालिका शाखा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, श्री. अनिल दौंडे उपविभागीय अधिकारी, खेड, श्री. नितीन गवळी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी चाकण, श्री. भूषण जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. अप्पासाहेब गुजर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी-स्वच्छता विभाग, श्री. विशाल शिंदे गटविकास अधिकारी, पंचायत समिती खेड, श्री. अंकुश जाधव मुख्याधिकारी नगरपालिका चाकण, श्री. भांडगे कार्यकारी अभियंता, एमआयडीसी चाकण तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत चाकण नगरपालिका व एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायती म्हणजे कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरळी-खराबवाडी, खालुम्ब्रे, म्हाळुंगे, निगोजे, मोई तसेच आंबेठाण या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

बैठकी दरम्यान प्रकल्पासाठी जागा उपलब्धता, अपेक्षित खर्च तसेच गावनिहाय निर्माण होणारा दररोजचा घनकचरा याबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या एकत्रित सहभागातून क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी पुढील कार्यवाहीचे सविस्तर नियोजन करण्यात आले.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

पुणे, दि. २९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तसेच १२ वी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व समाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (मराठा ) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांनी आपले अर्ज COVIS प्रणाली किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरून त्याची हार्ड प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आळंदी रोड, पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या व अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दर बुधवारी व गुरुवारी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून परिपूर्ण प्रकरणात तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती संजय दाणे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांनी दिली.

भारताचा इतिहास महात्मा गांधीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही- श्रीपाल सबनीस

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनचे उद्घाटन
पुणे-

महात्मा गांधी यांचा विचार विश्वाची सुख_शांती आनंद,मानवता, माणुसकी यांचे प्रतीक होते. जगभरात विविध मान्यवरांनी त्यांचे नेतृत्वास मान्यता दिली. मात्र, भारतात वेगळी परिस्थिती आजकाल दिसून येत आहे. अध्यात्म,अहिंसा, सत्य या विचारांवर त्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात प्रखर लढा दिला, त्यामुळे भारताचा इतिहास गांधीं शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे चारित्र्य व चिंतन देशाशी एकरूप झालेले होते,त्यामुळे ते भाजपसह कोणीही तोडू शकत नाही. “महात्मा” पद उगीच कोणाला प्राप्त होत नसते. गांधीतील “महात्मा” जिवंत असून त्याला उजाळा देणे महत्त्वाचे आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी व्यक्त केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांचे जीवनचरित्र मांडणाऱ्या फोटो प्रदर्शनचे उद्घाटन सारसबाग जवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन याठिकाणी श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,माजी महापौर कमल व्यवहारे,संजय बालगुडे,अभय छाजेड,सुनील शिंदे,विठ्ठल गायकवाड, नीता परदेशी, डॉ. विवेक शर्मा, अक्षय जैन उपस्थित होते.
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमा दरम्यान सबनीस म्हणाले, अभय छाजेड आणि उल्हास पवार यांच्या निष्ठाकडे पाहून मला त्यांचा आदर वाटतो. आपली निष्ठा हीच आपल्या जीवनाच्या चारित्र्याला अर्थ देत असते. अभय छाजेड कायम गांधीवादी आणि काँग्रेस विचारांचे अनुयायी राहिलेले आहेत. महात्मा गांधी यांची शिकवण आजचे विद्वान, राजकारणी, कार्यकर्ते विसरत चालले असल्याचे दिसत आहे. मात्र,मागील 25 वर्षापेक्षा अधिक काळ गांधी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन भरवणे हे निष्ठेचे प्रतिक आहे. महात्मा गांधी यांनी बॅरिस्टर होऊन सुद्धा सर्वसामान्यांमध्ये सहजरित्या मिसळत अहिंसा व असहकार याचे महत्व सामान्यांना प्रतिकूल परिस्थितीत पटवून दिले. राजकारणात सध्या स्वार्थ, धर्म आणि जातीयवाद वाढलेला दिसत असून राजकारण म्हणजे व्यभिचार, गचाळ असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे. गांधी केवळ तोंडाच्या चवीपुरते मर्यादित नको असून त्यांचा विचार स्वदेशी, स्वधर्म आणि सर्वसमावेशक याप्रती अधिक होता हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण आहे. गांधीतील महात्मा आजही जिवंत आहे कारण, त्यांचे हिंदुत्व उदारमतवादी होते. इतरांशी मतभेद असूनही त्यांनी व्यापक विचार करून भारतीय संस्कृतीचे पालन केले. नथुराम गोडसे या मारेकऱ्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली मात्र, आज काही मूठभर लोक त्याला देशभक्त ठरवत आहेत. अशाप्रकारचा ग्रुप हा विखारी विचारधारेचा असून ते देशाचे आणि मानवतेचे गुन्हेगार आहेत. जगाचे आदर्श मॉडेल म्हणून महात्मा गांधी यांच्याकडे पाहिले जाते. सत्ता हे सेवेचे साधन आहे हे सिद्ध करणारे त्यांचे नेतृत्व होते. अस्पृश्यता, जातीभेद यांना त्यांनी कुठेही थारा दिला नाही. गांधींचे नाव घेण्याची आवश्यकता आज देखील निर्माण होत आहे यातच त्यांची महती आहे.

उल्हास पवार म्हणाले, महात्मा गांधींचे विचारांची त्याकाळी लोकांनी टिंगलटवाळी केली. मात्र, 1945 साली जपान मधील हिरोशिमा व नागासाकी येथे अणुबॉम्ब हल्ला झाला आणि हिंसेचा अनर्थ ज्यांना कळला नाही त्यांना हिंसेचा अर्थ समजला गेला. लालबहादूर शास्त्री हे देखील महात्मा गांधींचे अनुयायी होते. गांधींचे विचार त्यांनी प्रत्यक्षात आत्मसात केलेले दिसून येत आहे. आज अशाचप्रकारे कृतीशील नेतृत्वाची गरज भासत आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते वांगचुक सनदशीर मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, सत्ताधारी यांनी त्यांना अटक केली हा निंदनीय प्रकार आहे.

अभय छाजेड म्हणाले,आजचा काळ महात्मा गांधी यांचे विचार अनुकरण करण्याचा आहे. मात्र, दुर्दैवाने प्रतिगामी शक्ती त्यांचे विचार मारून नथुराम गोडसेचे विचार पुढे नेत आहे. आज जगभरात महात्मा गांधी यांच्या विचाराचे महत्व पोहोचवण्याची गरज आहे.त्याकाळात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात असताना देखील, गांधी यांनी अहिंसेचा विचार लोकांसमोर मांडून त्यामाध्यमातून त्यांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला ही बाब अवघड गोष्ट होती. तेव्हाची आणि आजची परिस्थिती पुन्हा सारखी झालेली आहे. सत्ताधारी हे गांधींचे विचार मारण्यात धन्यता मानतात मात्र, सर्वांनी मिळून गांधीजींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वपूर्ण आहे.
हे प्रदर्शन २ ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.

आयटी हब खराडीतील बहुमजली इमारतीत मसाज पार्लरच्या आड वेश्याव्यवसाय


पुणे -मार्केट यार्ड आणि पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील मसाज पार्लर नंतर आता शहराच्या आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी परिसरात पोलिसांनी एका बहुमजली इमारतीवर पोलिसांनी छापा टाकला.यावेळी मसाज पार्लर च्या नावाखाली येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी एका महिलेसह चार आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये संदीप चव्हाण, रोहित शिंदे, स्वाती उर्फ श्वेता विजय शिंदे आणि गोपाळ यांचा समावेश आहे. पोलिस शिपाई वर्षा सावंत यांनी या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लब जवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवत होते. या पार्लरमध्ये दलालांमार्फत छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाचा वापर केला.

खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मसाज पार्लरवर अचानक छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात पीडित तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, आरोपींनी या तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले आणि त्यातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे शहर परिसरात मसाज पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्तांनी अशा गैरप्रकारावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवसांत पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली आहे.

रंगली सलग  १०१ गीतांची सुरेल विक्रमी मैफल   !

उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये

पुणे :गानकोकिळा भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कोथरूड येथील अंबर हॉलमध्ये गाण्यांच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘लतांजली’ या नावाने सादर झालेल्या या कार्यक्रमात सलग  १०१ गीतांची सुरेल मैफल रंगली. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री ८ वाजेपर्यंत असा सलग दहा तास चालला. या उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली.

आरती दीक्षित यांच्या संकल्पनेतून, हार्मनी इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संस्थापक आमोद देव आणि अपूर्वा देव यांच्या आयोजनातून पार पडलेल्या या संगीतमय आदरांजलीत ३५ हून अधिक कलाकारांनी एकल व द्वंद्व गीतांच्या माध्यमातून लतादीदींना अभिवादन केले.या कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाला खा.मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर उपस्थित होत्या.त्यांच्या हस्ते सर्व सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र  आणि पदक  देण्यात आले. लता मंगेशकर यांची १०६  गाणी  सलग गाऊन ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मधे या कार्यक्रमाची नोंदणी झाल्याचे डॉ.इंद्रजित मोरे यांनी जाहीर केले.कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लतादीदींच्या गाण्यांनी  वातावरण भारून टाकले आणि पुणेकर संगीतप्रेमींनी एका दिवसात १०१ गाण्यांचा आनंद घेत अविस्मरणीय अनुभव घेतला.

या कार्यक्रमात संजीव टांकसाळी, मिलिंद दामले, तुषार साधले, अनिता तळेले, ममता नरहरी, मृणाल भिडे, सुजाता माळवे,निशी बोथे, स्वाती बोरावके, विद्या हजारे,गायत्री बेलसरे, अश्विनी दातार, शिल्पा,वसुधा कुलकर्णी, मीनाक्षी दुसाने,शुभांगी पांचाळ, मृणालिनी चव्हाण,वर्षा भालेराव, प्रेरणा जेऊरकर,दिशा वालावलकर, सुनीता जाधव,भावना शुक्ला, मीना अवचट, शमा देशपांडे,श्रद्धा चौधरी, संजय खटावकर,अनघा धोपाटे, जयश्री रोकडे,गायत्री लडकत, माधव राखेलकर, रवींद्र क्षीरसागर,सोमनाथ हिवराळे,आमोद देव, प्रकाश सावंत, मोहित पारखी,दिलीप करमरकर यांनी आरती दीक्षित यांना साथ देत कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला

लावणी कलावंताना लोकाश्रय मिळाला राजाश्रय देखील मिळावा – संदीप खर्डेकर.

“तुमच्यासाठी काय पण” लावणीचे सादरीकरण व कलावंतांचा सत्कार संपन्न.

पुणे:सुशिक्षित समाजाने “लावणी” ह्या लोककले कडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. ह्या कलेला ग्रामीण भागात लोकाश्रय मिळाला मात्र शहरी भागात अजूनही “लावणी” चा कार्यक्रम म्हंटलं की नाकं मुरडली जातात याची खंत वाटते, लावणी कलावंतांना मिळणारी दीड हजार रुपयाची पेन्शन तुटपुंजी असून त्यांचे वय झाले की होणारी हेळसांड थोपविण्यासाठी योजना आखली पाहिजे असेही ते म्हणाले व ह्या कलेला राजाश्रय लाभावा असे मत ही खर्डेकर यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात आज लावण्यांचा कार्यक्रम पार पडला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,भाजपा चे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर,मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उत्सव प्रमुख उमेश भेलके, सौ. अक्षदा भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर,सौ. श्वेताली भेलके, सुधीर फाटक, चंदन बकरे, दिलीप ठोंबरे,राजेंद्र जाधव इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब दाभेकर व रवींद्र साळेगावकर यांच्या हस्ते लावणी कलावंत पूनम कुडाळकर,रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर, पियू मुंबईकर, वैशाली गायकवाड यांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुशिक्षित आणि “व्हाईट कॉलर्ड” नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीत लावणी चा बहारदार कार्यक्रम सादर करताना आनंद होतं आहे असे लावणी विषयात पी एच डी केलेले योगेश देशमुख म्हणाले.
रोजच वाघजाई देवी ला साडी नेसविणाऱ्या सौ.तन्वी सूर्यवंशी, सौ.वरदायीनी भेंडे यांचा देखील यावेळी कल्याणी खर्डेकर, अक्षदा भेलके व श्वेताली भेलके सत्कार करण्यात आला.
लावणी च्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केल्याबद्दल सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी कोथरूडकरांचे आभार मानले.

मुळशी:रासायनिक कंपनीत आग आणि स्फोट

पुणे : मुळशी तालुक्यात अंबडबेट येथील एका रासायनिक कंपनीत रविवारी (ता. 28) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी साधारण 12.15 च्या सुमारास लागलेल्या आगीसोबत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

https://www.facebook.com/share/v/1LXLxpExE5/
या कंपनीत सोडियम क्लोराइडचे पॅकेजिंग केले जात असल्याचे समजते.आगीची माहिती मिळताच मारुंजी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पौड पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिसर सील करून बचावकार्याला सुरुवात केली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते. स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असलेल्या तिघा कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये संदीप लक्ष्मण शेंडकर (49, जळीत सुमारे 60 टक्के), मोहित राज सुखन चौधरी (49, जळीत सुमारे 60 टक्के) आणि महिला रेणुका धनराज गायकवाड (40, जळीत अंदाजे 10 टक्के) यांचा समावेश आहे. तिघांनाही तातडीने घोटावडे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
घटनेचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. रासायनिक स्फोटामुळे आग लागली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास पौड पोलिस करीत आहेत. यासंदर्भात कंपनीतील इतर कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचेही जबाब घेतले जात आहेत.

३१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका

पुणे- घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप, लालित्यपूर्ण पदन्यास, सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे ‘वन्स मोअर’चे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’त रविवारी दुपारी १२ पासून सलग १२ तासांचा ‘लावणी धमाका’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आयोजित केला गेला. “महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज ‘लावणी महोत्सव’ पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम ३१ वर्षांपूर्वी सुरू केला. गेली ३१ वर्षे त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो,” असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.

विक्रमी लावणी महोत्सवात सीमा पोटे, भाग्यश्री बारामतीकर (पाव्हनं फक्त तुमच्यासाठी), रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर (तुमच्यासाठी कायपण), रील स्टार कुकू, वर्षा मुंबईकर (लावणी सुपरस्टार), सिनेतारका अर्चना सावंत, ज्योती मुंबईकर (मदनाची मंजिरी), शलाका पुणेकर, सोनाली शिंदे (कैरी मी पाडाची) या नामवंत कलावंत सहकाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल १२ तास ठसकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
प्रारंभी भारतरत्न स्वरसम्राज्ञी कै. लता मंगेशकर यांच्या २८ सप्टेंबर या जन्मदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्रास आबा बागुल यांच्यासमवेत लावणी कलावंतांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लावणी महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सवाची सुरुवात गण-गवळण व मुजऱ्याने झाली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्याविष्कार सादर करून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री गणेश कला-क्रीडा रंगमंचाचे प्रेक्षागृह दुपारी १२पासून रसिक प्रेक्षकांनी अखेरपर्यंत गच्च भरले होते. यावेळी प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्या व नृत्य करून लावणीला ‘वन्स मोअर’ची दाद दिली. या लावणी महोत्सवात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचाही मोठा प्रतिसाद होता.

‘माझी मैंना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा..’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, तुमच्यासाठी जीव झाला वेडा पिसा’, ‘आंबा तोतापुरी’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी बसा भावजी’, ‘फड सांभाळ तुऱ्याला’, ‘होऊ द्या दमानं’, ‘येऊ कशी तशी नांदायला’, ‘मला म्हनत्यात हो पुण्याची मैना’, ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ अशा अनेक लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.

‘विचार काय आहे तुमचा पाहुनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ’आजकाल पाटलाचा’, ’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनि अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा’ अशा एकाहून एक सरस अशा लावण्या व गवळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली.

याबरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’ या लावणीने ‘वन्स मोअर’ची दाद मिळविली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यांसह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका उर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूनि गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या लावण्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.

हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग १२ तास नृत्यांगनांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. अनेक राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंत कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री एँड. आशिष शेलार यांची घोषणा

पुणे, दि. 28 सप्टेंबर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री एँड. आशिष शेलार यांनी पुणे येथे केली.

मंत्री आशिष शेलार हे आज पुणे दौऱ्यावर असून वयाची शंभरी पूर्ण केलेल्या व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांची त्यांनी निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांचे पुस्तक त्यांना शासनाच्या वतीने भेट देऊन त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या व्यंगचित्राची शैली व 100 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, यावेळी सोबत असलेले भाजपाचे पदाधिकारी राजेश पांडे यांनी पुणेकरांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये व्यंगचित्र अध्यासन केंद्र असावे आणि त्याला शि.द. फडणीस यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत चर्चा केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याला तातडीने मान्यता देऊन आजच शी.द.फडणीस यांच्या घरूनच ही घोषणा करा, असे सूचित केले. त्यानुसार आज आशिष शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत संबंधित सेवांचा घरबसल्या घेता येईल लाभ

पुणे (दि.२८) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ आण‍ि व‍िह‍ित कालमर्यादेत शासनाच्या सेवा – सुव‍िधा देण्यात येत आहे. पीएमआरडीएमधील एकूण २९ सेवांपैकी १९ सेवा ऑनलाइन देण्यात येत असून उर्वर‍ित सेवा कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने सुरु आहे. आगामी काही द‍िवसात संबंध‍ित सेवा पण ऑनलाइन करण्यात येणार असून त्यांची प्रकिया सुरु आहे.

शासनाने १५० दिवसाच्या उपक्रमांतर्गत नागरिकांना ऑनलाईन शासकीय सेवा – सुव‍िधा देण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यात येत आहे. पीएमआरडीएने सुरू केलेल्या या ऑनलाईन सेवांची माह‍िती अर्जदारांनी आपल्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी या २९ सेवा देण्यात येत आहेत.

पीएमआरडीएच्या संबंध‍ित सेवांचा तपशील

विकास परवानगी विभाग : अभिन्यास / इमारत बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा/नकाशा देणे, सुधारित बांधकाम परवानगी, तात्पुरते रेखांकन परवानगी, सुधारित तात्पुरते रेखांकन, अंतिम रेखांकन परवानगी, नूतनीकरण परवानगी, भागश: भोगवटा प्रमाणपत्र, साईट एलेवेशन प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येत आहे. यासह अभियंता परवाना, स्ट्रक्चरल इंजिनिअर परवाना, सुपरवायझर परवाना, नगर रचनाकार परवाना, आकाशचिन्ह परवाना, आकाशचिन्ह नियमितीकरण परवाना, विकासाचे उद्दिष्टे प्रमाणपत्र (IOD) या सेवा ऑफलाईन कार्यालयात उपलब्ध आहे.

जमीन व मालमत्ता विभाग : वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तातंरण करणे, वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर वारसानोंद करणे, वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर कर्जासाठी ना- हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन सुरु आहे. यासह प्राधिकरण मालकीच्या मोकळ्या जागा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देणे, भाडेपट्ट्यानंतर भूखंडाचा ताबा देणे आण‍ि वाटप भूखंडाची फेरमोजणी करून देणे या सेवा ऑफलाईन आहे.

अग्निशमन विभाग : प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखला अदा करणे, अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला अदा करणे, पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र, अग्निशमन बंदोबस्त या सेवा ऑनलाईन आहे. संबंध‍ित सेवा आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in आण‍ि पीएमआरडीएच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जतन करणे आवश्यक – पृथ्वीराज नागवडे

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरांजली

पुणे-बदलत्या काळात महाराष्ट्राची लोककला, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वचे आहे. महाराष्ट्राची संपन्न लोकपरंपरा, लोककला त्याच्या मूळ स्वरूपात सादर करण्यासाठी आणि याबाबतचा प्रसार करून लोकांना त्याच्याशी जोडण्यासाठी ‘अस्मिता महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक समूहाची स्थापना करण्यात आली, असे मत निर्माते पृथ्वीराज नागवडे यांनी व्यक्त केले. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘अस्मिता महाराष्ट्राची’ कार्यक्रम सदर झाला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून या महोत्सवाचे आधारस्तंभ बनलेले ‘राष्ट्रपती पुरस्कारा’ने सन्मानित ज्येष्ठ लोककलावंत कै. केशवराव बडगे यांचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याची भावना आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमात प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ गायिका पद्यश्री माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, निर्माते पृथ्वीराज नागवडे आणि सर्व कलाकारांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच गायिका माणिक वर्मा यांनी गायलेले प्रसिद्ध ‘अमृताहूनि गोड..’ हे भावगीत गाऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
राज्यभरातील ५०पेक्षा अधिक नवोदित कलाकार मेहनतीने आणि निष्ठेने पारंपरिक लोककला आत्मसात करुन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अस्मिता महाराष्ट्राची’ माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे यावेळी दिसून आले. पुरुष कलाकारांनी सदरा, धोतर आणि फेटा, तर महिला कलाकारांनी नऊवारी साडी नेसून हातात भगवा झेंडा फडकवीत जल्लोषपूर्ण पद्धतीने विठुरायाची पालखी थेट प्रेक्षकांमधून घेऊन येत कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात केली.
भारुड, गोंधळ, पोतराज, जोगवा, वासुदेव, बतावणी, वाघ्या-मुरळी या लोकनाटय आणि पारंपरिक कलाप्रकारांच्या सादरीकरणातून रसिकांना दुर्मिळ होत चाललेल्या ग्रामीण परंपरांची पुनर्आठवण कलाकारांकडून करून देण्यात आली. पारंपरिक ग्रामीण संस्कृती शहरातील लोकांना पुन्हा माहीत व्हावी, असा प्रयत्न याद्वारे करण्यात आला.
संगीत व नृत्यशैलीच्या माध्यमातून लावणी, कोळीनृत्य, मंगळागौर, ढोल-ताशा-लेझीम, गवळण, अंगाई गीत, शंकासुर, काठोळी आदी प्रकार सादर करण्यात आले. कोणत्याही आधुनिक फ्युजनशिवाय आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांची महती गण, अभंग, वारी, धनगरी गजा, तुंबडी, भल्लरी, नंदीबैल सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली. प्रशांत मखरे यांनी अभ्यासपूर्ण आणि सहजरीत्या सर्वांना भावेल अशा भाषाशैलीत सूत्रसंचालन करीत कार्यक्रमात रंगत आणली. पुणे नवरात्रौ महोत्सवातील “अस्मिता महाराष्ट्राची” कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी कलाकारांना विविध लोकपरंपरा सादर करताना सिद्धेश उंडाळकर ( पखवाज), कृष्णा अवघडे (ढोलकी, संबळ), साहिल कांबळे (ड्रम), अनिकेत काळोखे, अभिषेक सुरडकर (पियानो) , श्रेया बऱ्हाटे (बासरी), जयेश म्हस्के ( ढोल), आफताब शाह ( हार्मोनियम ), ऋषिकेश उंडाळकर , शुभम मुकीर (साइड ऱ्हिदम) यांनी आपल्या वादनातील कौशल्य दाखवीत साथ दिली. तर, गायनासाठी गायक म्हणून ऋषिकेश आडे, प्रदीप लोंढे, सोपान कामगुणे, सौरव चव्हाण, रोहित शिंदे आणि गायिका सानिका अभंग, श्रद्धा गद्रे, जान्हवी गद्रे, पायल वारुंगसे, रुचिता शिरसाठ, जान्हवी खडपकर यांनी सहाय्य केले.
याप्रसंगी जयश्री बागुल, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हर्षदा बागुल, सागर बागुल उपस्थित होते.

उद्योग क्षेत्रातील नव दुर्गांचे विद्यार्थ्यांकडून पूजन 

संयुक्त स्त्री संस्थेच्या शाळेचा उपक्रम … 

पुणे – अडचणी आल्या तरी डगमगत नाहीत. संकटे आली तरी त्यांना ठामपणे सामोरे जातात त्याच खऱ्या उद्योजिका. कोणताही उद्योग करायचा तर त्यासाठी पैसे लागतातच पण पैसे असले म्हणजे तुम्ही यशस्वी उद्योजक व्हालच असे नाही. उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर पैसे म्हणजे भांडवल कमी असले तरी  समाजात चांगल्या भावनेने काम किंवा उद्योग केला तर त्याला समाज चांगला प्रतिसाद देतो आणि यशस्वी करतो. मात्र त्यासाठी तुमच्याकडे संयम, सातत्य, सकारात्मकता आणि साहस असणे आवश्यक आहे असे नवदुर्गांनी आज येथे सांगितले.

 शारदीय नवरात्रोत्सवात आदीशक्तीचा जागर केला जातो. हे औचित्य साधून संयुक्त स्त्री संस्थेच्या वतीने समाजातील आदीशक्ती असलेल्या नवदुर्गा पूजनाचा कार्यक्रम आयोजत करण्यात येतो. या निमित्ताने नविन पिढीला समाजातातूल कर्तृत्वंवान महिलांची आणि आपल्या परंपरांची ओळख करून देण्यासाठी हा कार्यक्रम गेली १४ वर्षे शाळेत करण्यात येत आहे. 

यंदा समाजातील आत्मनिर्भर उद्योजिका श्रीमती रोहिणी नाईक (कागदी पिशव्या, फाईल्स), श्रीमती शीला बानावळकर टोकेकर (टेलरिंग), श्रीमती सुवर्णा मुसळे (वाती, कापसाची वस्त्र), श्रीमती कुंदा पायगुडे (मसाजिस्ट), श्रीमती स्वाती नरगुंदे (सर्व प्रकारची पिठाची गिरणी), श्रीमती स्वाती ओतारी (वज्रलेपन), श्रीमती छाया जगदाळे (रसवंतीगृह), श्रीमती सुनंदा आंधळे (पर्स), श्रीमती सुवर्णा पारखी (दिवाळी फराळ) यां नवदुर्गांचा शारदीय नवरात्राचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हळक कुंकू, अत्तर लावले, प्रसाद दिला. हातावर स्वस्तिक काढले. त्यानंतर त्यांना तांब्याचा कलश, त्यावर आंब्याच्या पानांवर श्रीफळ व त्यावर गरजा ठेवलेला मंगल कलश देऊन त्यांचे पूजन केले. अध्यक्षा नीता रजपूत, सचिव  मधुरा जोगळेकर, साधना अबिके आणि त्यांच्या सहकारी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थानी नव दुर्गाना प्रश्न विचारून बोलते केले. 

महिलाकडे अगभूत कौशल्य असते, गरज ते कौशल्य ओळखून त्यानुसार काम करण्याची असे नवदुर्गानी सांगितले. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांची, त्यांचा कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शारदीय नवरात्रात हा दुर्गा पूजनाचा उपक्रम गेली तेरा वर्षे संस्थेत सुरू आहे. पुण्यातील पानशेत पूराच्या आपत्तीत मदतीसाटी त्यावेळी पुण्यातील महिलांच्या 56 संस्था एकत्र आल्या होत्या. त्यांची संयुक्त स्त्री समिती स्थापन केली. त्यांनी मदत कार्यही केले. त्यानंतर ही समिती बरखास्त करू नका असे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व आयुक्त स. गो. बर्वे यांनी सांगितले. त्यातून संयुक्त स्त्री संस्थेची स्थापना 31 मे 1963 या दिवशी झाली. या संस्थेच्यावतीने गरीब मुलांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा चालवल्या जातात. त्यात 650 मुले शिक्षण घेत आहेत. याशिवाय पाच झोप़डपट्टयांमध्ये बालवाड्या चालवल्या जातात.

अध्यक्षा नीता रजपूत यांच्यासह उद्योजिका नवदुर्गांनी दीपप्रज्वलन केले. सामुहिक श्रीसूक्त पठणानंतर पाहुण्यांचा व नवदुर्गांचा परिचय करून देण्यात आला. अध्यक्षा नीता रजपूत यानी सांगितले की, समाजाचे चलनवलन चालवण्यासाठी नवदुर्गा हा महत्वाचा घटक आहे. आज एकत्र कुटुंब पध्दत गली. ती उणिव या नवदुर्गा भरून काढत आहेत. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या नव दुर्गांची आणि त्यांच्या कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने विद्यार्थीच्या हातून दुर्गाचे पूजन करण्यात येते. उपक्रमाचे हे १४ वे वर्ष आहे. या निमित्ताने महिला समाजात का काय काम करू शकतात ? त्यासाठी कशी मेहनत घेतात अन यश मिळवता याची महिती मुलांना मिळते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेनगुप्ता यांनी करून  शेवटी अश्विनी माने यांनी आभार मानले. 

बारामतीच्या सुपा मंडळात शेतांसाठी ९६ नवे रस्ते

विभागीय आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक

पुणे, दि. २८: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित सेवा पंधरवड्यात बारामती तालुक्यातील सुपा मंडळाचे मंडळ अधिकारी हंसध्वज मनाळे आणि त्यांच्या सर्व ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पाच दिवसांमध्ये नव्याने ९६ रस्ते करून दिले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी आज मंडल अधिकारी कार्यालयास भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

सेवा पंधरवडामध्ये पहिला टप्पा रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत याबाबतीत होता. या पहिल्या टप्प्यांमध्ये सुपा मंडळ करेला अंतर्गत चांगले काम झाले आहे. आता या रस्त्यांची नोंद गाव नकाशावर आणि अधिकार अभिलेखांमध्ये घेण्यात येत आहे. हे काम अत्यंत प्रशंसनीय असल्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केलं.

मंडळ अधिकारी कार्यालय परिसरामध्ये यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.