Home Blog Page 354

सिंहगड रस्त्यावरील ‘त्या’ सोसायट्यांमध्ये शिरले पाणी , रात्रभर अधिकाऱ्यांची धावपळ आणि नागरिकांचा संताप

पुणे- सिंहगड रस्त्यावरील एकता नगर परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धारणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जात आहे.घाटमाथ्यावरील पाऊस थांबत नसल्याने आणखीन विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकतानगर भागातील एका सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. खडकवासला धरणातून 35000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.तो १० वाजता ४० हजार क्युसेक्स करण्यात आला .

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकता नगर या परिसरात रात्रीपासून महानगरपालिकेचे आयुक्यातंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत. इथं अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी महानगरपालिकेने या सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था एका शाळेत केली आहे. मात्र तरी देखील इथले लोक घरातून बाहेर यायला तयार नाहीत.. वारंवार महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना आवाहन करत आहेत. मात्र काही लोक त्यांचं घराच्या बाहेर यायला तयार नाहीत.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या एकता नगर परिसरात पुन्हा एकदा लोकांच्या घरात इमारतींच्या पार्किंग मध्ये पाणी शिरलं आहे. अनेक लोकं सध्या घरात अडकून पडले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा फक्त प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आली अनेक मंत्री येऊन गेले मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. गेल्या वर्षी या एकता नगर परिसरात अनेक लोकांचा नुकसान झालं होतं त्याचं मोबदला देखील लोकांना मिळालेला नाही. या सगळ्या परिस्थितीला सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे.

पावसामुळे पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द

पुणे-पावसामुळे आज सिंहगड एक्सप्रेस सह डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातून या तीन रेल्वे दररोज मुंबईसाठी धावतात. दुपारच्या सत्रातील डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज रद्द केली आहे. सोलापूर ते पुणे मार्गे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज धावणार नाही. काल मुंबईहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या सुद्धा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईतील मुसळधार पावसामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्याहून मुंबईसाठी आज कुठल्या ट्रेन रद्द, ते पहा

११०१०: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

११००७: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस

१२१२८: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस

२२१०६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस

१२१२६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

१२१२४: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्विन

२२२२६: वंदे भारत एक्सप्रेस

२०/०८/२०२५ रोजी ११.५० वाजता कोल्हापूरहून सुटणारी ट्रेन क्रमांक १७४१६ KOP-TPTY हरिप्रिया एक्सप्रेस ही पेअरिंग रेक उशिरा धावल्यामुळे २०/०८/२०२५ रोजी कोल्हापूरहून १६.४० वाजता सुटण्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा फटका बसत असून याचा थेट परिणाम रेल्वे सेवांवर झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी पुणेहून मुंबईकडे धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस या तिन्ही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. दुपारच्या सत्रात धावणारी डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज धावणार नाहीत. याशिवाय सोलापूर-पुणे मार्गे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. सततच्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अनेकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून हवामान लक्षात घेऊन पुढील काही दिवस गाड्यांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी रेल्वेची अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोयना धरणातून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग:नदीपात्रात पूरस्थिती, एनडीआरएफकडून रेस्क्यू

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरली असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 13 फुटांपर्यंत उघडून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

दरम्यान कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्याने कोयना नदीला पूर आला आहे. यामुळे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्क्याजवळ पुरात अडकलेल्या 11 माकडांना वाचवण्यासाठी कराडमधील एनडीआरएफच्या (NDRF) टीमने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले. दुपारपासून सुरू असलेले हे थरारक बचावकार्य रात्री उशिरा पूर्ण झाले. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या मदतीने एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर माकडांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. या बचाव कार्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
कोयना धरण: प्रकल्पाची एकूण क्षमता 105.25 टीएमसी असून, सध्या 101.47 टीएमसी पाणीसाठा आहे (93.66% भरले).

धोम धरण: एकूण क्षमता 13.18 टीएमसी असून, 13.50 टीएमसी पाणीसाठा आहे (97.85% भरले). धरणातून 17,274 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धोम-बलकवडी धरण: एकूण क्षमता 4.08 टीएमसी असून, 3.82 टीएमसी पाणीसाठा आहे (97.79% भरले). धरणातून 7,329 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कण्हेर धरण: एकूण क्षमता 10.10 टीएमसी असून, 9.57 टीएमसी पाणीसाठा आहे (96.93% भरले). धरणातून 14,823 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

उरमोडी धरण: एकूण क्षमता 9.96 टीएमसी असून, 9.72 टीएमसी पाणीसाठा आहे (98.29% भरले). धरणातून 8,936 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तारळी धरण: एकूण क्षमता 5.85 टीएमसी असून, 5.45 टीएमसी पाणीसाठा आहे (94.28% भरले). धरणातून 4,435 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वीर धरण: एकूण क्षमता 9.83 टीएमसी असून, 9.50 टीएमसी पाणीसाठा आहे (96.50% भरले). धरणातून 55,887 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू

दरम्यान, तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट आहे. तथापि, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट. या मार्गावर देवगड निपाणी रोडवरील फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आल्याने तो सुद्धा मार्ग ,पर्यायाने घाट बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

राधानगरी धरण

पाणी पातळी :590.86M
पाणीसाठा – 8.28TMC
2 स्वयंचलित द्वारातून – 2856 विसर्ग
मोहिते पावर हाऊसमधून 1500
एकुण विसर्ग – 4356 क्युसेक
राजाराम बंधारा पाणी पातळी : 39.05″ (542.20m)
विसर्ग 56057 क्युसेक (नदी इशारा पातळी 39′ फूट व धोका पातळी 43′ फूट)
धरणांची विसर्ग माहिती

राधानगरी – 4356 क्युसेक
दूधगंगा – 25000 क्युसेक
वारणा – 39663 क्युसेक
कोयना – 95300 क्युसेक
अलमट्टी – 200000 क्युसेक
हिप्परगी – 82800 क्युसेक

कोयना धरणाचे वक्र दरवाजे 13 फुटापर्यंत उघडले

दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवरून 13 फुटापर्यंत उघडून 93200 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 95,300 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

दरम्यान, जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. आबिटकर म्हणाले की, मागील दोन दिवस जिल्ह्यात धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होवू शकते. तथापि नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

अलमट्टी व हिप्परगीच्या यंत्रणांशी समन्वय ठेवा

त्यांनी सांगितले की, राधानगरी व काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क रहा. मुख्यालय सोडू नका. गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही जीवित हानी होणार नाही, याची दक्षता घ्या. अलमट्टी धरणातून जास्तीत जास्त विसर्ग होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कर्नाटक सरकारच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याच्या विसर्गाबाबत धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद:मोनोरेलमधून 800 प्रवाशांची सुटका; महाराष्ट्रात 5 दिवसांत 21 मृत्यू

मुंबई-बुधवारी मुंबईत मुसळधार पावसाचा तिसरा दिवस आहे. २४ तासांत येथे ३०० मिमी पाऊस पडला. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी आणि निमसरकारी कार्यालये बंद राहिली. मुंबईतील ३४ गाड्या (१७ जोड्या) लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. २५० हून अधिक उड्डाणांवरही परिणाम झाला आहे.

मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील २ मोनोरेलमधून सुमारे ८०० लोकांना वाचवण्यात आले. म्हैसूर कॉलनी रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी ६ वाजता एक मोनोरेल उंच ट्रॅकवर अडकली. त्यातील ५८२ प्रवाशांना क्रेनच्या मदतीने खिडकी तोडून सुमारे ४०-५० फूट उंचीवरून वाचवण्यात आले.

एमएमआरडीएने सांगितले की, वाढत्या गर्दीमुळे हे घडले. रेल्वेची मूळ वजन क्षमता १०४ आहे, जी काल वाढून १०९ टन झाली. ५ टन अतिरिक्त वजन (प्रवाशांचे) होते. त्याच वेळी, आचार्य अत्रे आणि वडाळा मोनो रेल स्टेशनवरून २०० लोकांना बाहेर काढण्यात आले.

ट्रेनमधील एका प्रवासी सागर म्हणाला- वीज आणि एसी बंद असल्याने डब्यांमध्ये गुदमरल्यासारखे होत होते. बाहेर पाऊस पडत होता आणि अंधार वाढत होता. सर्वात भयानक क्षण म्हणजे जेव्हा ट्रेन धोकादायकपणे झुकली, तेव्हा आम्ही जिवंत बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत होतो.
मुंबईतील पर्जन्यमानाची माहिती
१९ ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजल्यापासून ते २० ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईतील पर्जन्यमानाची (मिमी मध्ये) माहिती:-

​विक्रोळी: २२९.५ मिमी
​सांताक्रूझ: २०९.० मिमी
​भायखळा: १९३.५ मिमी
​जुहू: १५०.० मिमी
​वांद्रे: १३७.५ मिमी
​कुलाबा: १०७.४ मिमी
पावसात अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था
भर पावसात नागरिक जर मुंबईमध्ये कुलाबा ते वांद्रे कुठेही अडकले असतील तर त्यांना तात्पुरता राहण्याकरिता जवळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सोय केली आहे.
संपर्क:-

  • संतोष नाईक:- +919167924748
  • संदेश शिरधनकर:- +919920022186
  • निकेतन तोडणकर:- +918779430142
  • रिना ठाकूर:- +919004822983

महापालिकेत परमनंट नौकरी नाहीच -नवल किशोर राम

पुणे- कोणा भलत्या सलत्याच्या नादाला लागू नका आता महापालिकेत कायम स्वरूपी नौकरी नाहीच ,विशिष्ट कालावधी साठी कंत्राटी भरती होते तीही कशी होते ते जाणून घ्या आणि फसवेगिरी करणाऱ्या एजंटांपासून दूर राहा असा सल्ला खुद्द महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.

त्यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रात सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून https://www.pmc.gov.in/l/recruitment यावर ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येऊन पारदर्शकरित्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.
याद्वारे सर्व नागरिकांना / उमेदवारांना आम्ही सूचित करत आहोत कि, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. कायम नोकरी मिळेल असे सांगणारे दावे पूर्णपणे खोटे आहेत. तसेच कंत्राटी कर्मचारी देखील विशिष्ट कालावधीसाठी नियुक्त केले जातात. त्यांना कायम करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अथवा योजना अस्तित्वात नाही. कोणी व्यक्ती नोकरी संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैसे मागणी अथवा खोटी माहिती देत असल्यास अशा प्रकरणाची माहिती तात्काळ संबधित विभागाला द्यावी. तरी, कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित / अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरती करावयाची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती व सविस्तर जाहिरात अधिकृत दैनिक वर्तमानपत्रांत व पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नागरिकांनी/उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती उपलब्ध करून घ्यावी.असेही महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.

मिळकतकर कमी करून देतो/थकबाकी कमी करून देतो सांगणाऱ्या एजंटांपासून सावधान -अविनाश सकपाळ

पुणे- महापालिकेचा मिळकत कर अगर मिळकत कराची थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यांचा महापालिकेत सुळसुळाट झाला असून अशा तथाकथित एजान्तांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि थेट महापालीकेशीच संपर्क करून आपल्या कामाबाबत योग्य ते मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी महापालिका सर्वांना सहकार्य करणार आहे अशी ग्वाही कर आकारणी व कर कर संकलन प्रमुख व महापलिका उप आयुक्त अविनाश सकपाळ यांनी येथे दिली आहे .

या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, काही मध्यस्थ/दलाल/परिचित/अपरिचित/व्यक्तीं मिळकतकर कमी करून देतो/थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून रोख स्वरुपात पैसे घेत असल्याचे निदर्शनास येत आहे अशी कोणी व्यक्ती कर कमी करून देणे संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैशांची मागणी करत असल्यास अशा व्यक्तीसोबत कोणताही आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी आपला मिळकत कर पुणे मनपाची अधिकृत वेबसाईट propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर, मनपाचे नागरी सुविधा केंद्र (CFC), बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बँक, कॉसमॉस बँक, जनता सहकारी बँक, पुणे येथेच रोख/धनादेश/डी.डी. ने भरावा व त्याची अधिकृत पावती घ्यावी.


गोयलगंगा चौक ते इनामदार चौक हा १५४० मी. लांबीचा उड्डाणपूल अद्याप का सुरु नाही ? महापालिकेने दिले स्पष्ट उत्तर

पुणे-

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम सिनेमा दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपूलाच्या कामातील राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल व विठ्ठलवाडी कमान ते फन टाईम सिनेमा हा २१२० मी. लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीस यापूर्वीच खुला करण्यात आलेला आहे.
सध्यस्थितीत तिसऱ्या टप्प्यातील गोयलगंगा चौक ते इनामदार चौक हा १५४० मी. लांबीचा उड्डाणपूल पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सदर पुलाचे बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परंतु थर्माप्लास्टिक पेंट, साईनेजेस, हजार्ड मार्किंग बोर्ड, जंक्शन इम्प्रुव्हमेंट ही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची कामे सुरु आहेत. उड्डाणपूल सुरु करण्यापूर्वी इनामदार चौक, राजाराम चौक, मातोश्री चौक या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी वाहतुक विभागाचे सुचनेनुसार काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. उड्डाणपुलावर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी विद्युत पोल कार्यान्वित करण्याचे काम सुद्धा सुरु आहेत. सदरची कामे सध्यस्थितीत सुरु असलेल्या पावसामुळे पूर्ण करणेस काही अडचणी येत असल्या तरी प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करून उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्याचे पुणे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

ठाकरे बंधूंना धक्का:बेस्ट निवडणुकीत भोपळा, महायुतीला 7 शशांक राव पॅनलला 14 जागा

मुंबई-दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला असून, त्यांना 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले, तर महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.

बेस्ट पतपेढीवरील ठाकरेंच्या शिवसेनेची नऊ वर्षांची सत्ता या पराभवाने संपुष्टात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याचा विचार करत असताना, दोन्ही पक्षांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) प्रणित बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी एकत्र येत ‘उत्कर्ष’ पॅनलची स्थापना केली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड, नितेश राणे आणि शिवसेना (शिंदे गट) चे किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे ‘सहकार समृद्धी’ पॅनल रिंगणात होते. तसेच, बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनलनेही जोरदार टक्कर दिली.

निकाल जाहीर झाल्यावर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर महायुतीच्या ‘सहकार समृद्धी’ पॅनलला 7 जागा मिळाल्या. या पराभवामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चिंता वाढली असून, आगामी काळात त्याचा राजकीय परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूण निकाल (21 जागा):

शशांक राव पॅनेल – 14 जागा

महायुती सहकार समृद्धी पॅनेल – 7 जागा

उत्कर्ष पॅनेल (ठाकरे गट + मनसे) – 0 जागा

पुणे: लोणावळा लोकलसाठी तिसऱ्या,चौथ्या मार्गिकेला मंजुरी

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश
  • ⁠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत निर्णय

पुणे : पुणे-लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढावी आणि या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीगेसाठी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात असलेली मागणी आता पूर्णत्वास जात आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्र सरकारने या प्रकल्पाला आधीच सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याला मंजुरी दिल्याने पुणेकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार समान करणार असून यासंदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. तसेच पाठपुरावाही केला होता. आता राज्य सरकारच्या मंजुरीमुळे या दोन्ही मार्गीकांचा मार्ग मोकळा झाला असून यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या ११ वर्षांत रेल्वेचे आधुनिकीकरण आणि मार्गांचा विस्तार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारले असून आवश्यक तेथे मार्गिकांची संख्याही वाढवली जात आहे. अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात अशा कामांनी आणखी वेग आलेला आहे. पुणे-लोणावळ्यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून तिसरी आणि चौथी मार्गीका झाल्यास यादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे’.

‘या दोन मार्गिकांमुळे रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार असून मालगाड्यांमुळे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच एक्सप्रेस गाड्यांचा वेगदेखील वाढणार आहे. याचा फायदा औद्योगिक, व्यावसायिक, नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे, असेही सांगत मोहोळ यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद केले असूम या प्रकल्पाची पुढील प्रक्रियाही वेगाने होईल आणि सदर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

आपत्कालीन परिस्थितीचा सामना
करण्यासाठी पीएमआरडीए तत्पर

पिंपरी : गेल्या दोन दिवसापासून पुणे शहरासह जिल्हाभरात दमदार पाऊस होत असल्याने या पावसामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढत आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून नदीलगतच्या नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

हवामान खात्याने पुणे शहरासह जिल्हात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून नदीलगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी नदीकाठ किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, घरातील आवश्यक कागदपत्रे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी यासह प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी पीएमआरडीए आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल तत्पर आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक
पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) 9545282930
वाघोली अग्निशमन केंद्र -02029518101
मारुंजी अग्निशमन केंद्र -02067992101
नांदेडसिटी अग्निशमन केंद्र -0206752001/2

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात येईल. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित रु.२७७ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गणेशखिंड रस्त्याचे पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय (RBI) या लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मी. पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध – शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांग‍ितले.

ऑगस्ट २०२२ पासून कामाला सुरुवात
या उड्डाणपुलाच्या आराखड्यास प्राधिकरण सभा, कार्यकारी समिती, पुणे महानगरपालिका व पुणे एकीकृत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास ऑगस्ट २०२२ पासून प्रारंभ करण्यात आला होता. या कामासाठी शासनाने २६/०५/२०२० रोजीच्या पत्रान्वये मेट्रो सवलतकार कंपनी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे दरम्यान स्वाक्षांकित करावयाच्या पूरक सवलत करारनामाच्या मसुद्यास मान्यता दिली होती. तत्पूर्वी, अस्तित्वातील दोन एकेरी वाहतुकीचे उड्डाणपूल ऑगस्ट २०२० मध्ये शासनाच्या मान्यतेने पाडण्यात आले होते. यानंतर संबंध‍ित उड्डाणपुलाचे काम सुरु केले होते. मुख्य विद्यापीठ चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी ५५ मी. लांब स्टील गर्डर बसवण्यात आला आहे.

मेट्रो प्रकल्प
माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ या २३.२०३ किमी उन्नत मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर असून आजपर्यंत ८८. ५१ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानक क्र. १९ चे बांधकाम विद्यापीठ चौक येथे प्रगतीपथावर असून मेट्रो स्थानक व औंध, बाणेर आणि पाषाण या तिन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी मेट्रो जिना प्रस्तावित केला आहे.

वैशिष्ट्ये
✅ एकूण १.७ किमी लांबी
✅ औंध ते शिवाजीनगर १.३० किमी लांबी
✅ ३ लेन रोड
✅ ९.५ मीटर रुंदी
✅ दोन खांबामधील अंतर २८ मीटर
✅ प्रकल्पाची किंमत रु. २७७ कोटी

गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे दि.19 :- यंदाचा गणेशोत्सव हा शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे पूर्वीपासून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिध्द आहे. यावर्षी सुध्दा गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे आणि मोठ्या उत्सहात साजरा व्हावा यासाठी प्रशासन, महानगरपालिका, पोलिस विभाग व सर्व गणेशमंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
शहरातील गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा या दृष्टीने शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठकीचे आज बाल गंधर्व रंग मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त् मनोज पाटील, शहरातील गणपती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला गणपती मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या यानंतर बोलतांना पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार म्हणाले की, शासनाने यावेळी गणेशोत्सवास राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे. पूर्वीपासूनच आपल्या शहरातील गणेशोत्सव खूप प्रसिध्द आहे त्यामुळेच आपल्या शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, शांततेत व निर्विघ्नपणे तसेच निर्भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शहरातील गणपती मंडळांनी कोणतेही वाद विवाद घडतील असे देखावे करू नयेत. पाऊस सुरू आहे त्यामुळे वीजेची कामे करतांना काळजी घ्यावी. मंडळांनी आपल्या मंडळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. आपातकालीन घडना घडू नयेत यासाठी सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी. पोलिस विभागाकडून वाहतूकीसंदर्भात, गर्दीच्या नियोजनाबाबत योग्य दक्षता घेण्यात येत आहे.
गणपती मंडळांनी विर्सजन मिरवणूकीबाबत व इतर काही मांडलेल्या अडचणीबाबत लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशासन आणि पोलिस विभाग गणपती मंडळांच्या मदतीसाठी सदैव सोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, आपल्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव खूप उत्सहाने व मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावेळी गणेशोत्सवाला शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने गणेशोत्सवामध्ये शासनामार्फत विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्व मंडळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा. आपल्या शहरातील गणेशोत्सव आपल्या शहरापुरता मर्यादित न रहाता त्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्सव साजरा करतांना मंडळांना सुरळीत वीज पुरवठा, वाहतूकीबाबतच्या अडचणी तसेच इतर काही अडचणी सोडविण्यासाठी व सोई सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रभाग निहाय गट तयार करण्यात आले असून त्यांच्या मार्फत आपल्या सर्व अडचणी सोडवल्या जातील व गणेशोत्सवात गणेश भक्तांना, नागरिकांना जास्तीत जास्त सोई सुविधा देखील पुरवल्या जातील.
तसेच गणपती मंडळांनी मांडलेल्या अडचणी देखील सोडविण्यात येतील व सूचनांचा देखील विचार करण्यात येईल. गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेशोत्सवावेळी महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोई सुविधा विषयक माहिती दिली. तसेच मागील वर्षी देण्यात आलेल्या सोई सुविधा पेक्षा जास्त सोई सुविधा यावर्षी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे इंग्रजांच्या काळापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या गणेशोत्सवामधून सामाजिक बांधिलकी जपली जाते. यावर्षी गणपती मंडळांनी देखावे सादर करताना सामाजिक संदेश असलेले देखावे सादर करावेत. सर्व शासकीय विभागातील अधिकारी देखील गणेशोत्सवात सहभागी होवून आपणाला कोणत्याही सोई सुविधेची कमतरता भासणार नाही यासाठी नियोजनबध्द काम करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले.

सरकारकडून ९० हजार कोटींची थकबाकी वसुलीसाठी कंत्राटदार जाणार न्यायालयात

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे भरपावसात धरणे आंदोलन

पुणे: राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली ९० हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉटमिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी संस्था, पुणे काँट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डोक्यावर धो-धो पाऊस कोसळत असतानाही कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी दोन तास धरणे आंदोलन केले. पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे ८०० ते ९०० कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘राज्यकर्ते जोमात, कंत्राटदार कोमात’, ‘रुपया नाही तिजोरीत, मंत्री मात्र मुजोरीत’, ‘राज्यशासन कंत्राटदारांना देईना पैका, मंत्री माझ्याच गप्पा ऐका’, ‘भीक नको हक्क हवाय, कंत्राटदारांना न्याय हवाय’, ‘नियोजनशून्य कारभारी, कंत्राटदार झाला भिकारी’ अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केला.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर, राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव, महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू, पुणे काँट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले, राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खैरे, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अमित शिवतारे, राज्य मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार, राज्य हॉटमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. एस. पंजाबी यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचे निवेदन दिले.

अजय गुजर म्हणाले, “राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांची ९० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बिले थकीत आहेत. लाडकी बहीण योजनेला सरकारकडे पैसे आहेत. मात्र, आम्हाला द्यायला पैसे नाहीत. आमच्या हक्काचे पैसे त्या योजनेसाठी वळवण्यात आले आहे. राज्यभरातील कंत्राटदार कंगाल झालेला आहे. त्यामुळे सरकारने कंत्राटदारांना वाचवण्यासाठी त्वरित बिले द्यायला हवीत.”

जगन्नाथ जाधव म्हणाले, “थकीत बिलाच्या कारणावरून काही दिवसांपूर्वीच सांगलीतील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली. मात्र सरकारला अजूनही जाग आलेली नसून, थकीत बिलांवर चकार शब्द काढला जात नाही. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंत्राटदारांचे पैसे देऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखावे. अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल.”

रवींद्र भोसले म्हणाले, “कंत्राटदारांची राज्य सरकार यमाच्या भूमिकेत दिसत आहे. काम करूनही आमचे पैसे फाईलींमध्ये अडकून पडले आहेत. सर्व कंत्राटदार कर्जबारी झाले आहेत. त्यांची आर्थिक व मानसिक अवस्था बिघडत चालली आहे. शासन आमच्या भावनांशी खेळत आहे. हा खेळ थांबवून पहिल्या टप्प्यात किमान ५० टक्के तरी पैसे द्यावेत.”

सुरेश कडू म्हणाले, “सरकारच्या तिजोरीत पैसे नसतानाही विकासकामांच्या निविदा काढून कंत्राटदारांना कर्जबाजारी करण्याचे काम सुरु आहे. पैसे नसतील तर फसव्या योजना आणू नका, निविदा काढून उसने अवसान आणू नका. कंत्राटदारांची पहिली बाकी द्या आणि मग तुम्हाला ज्या काही नव्याने निविदा काढायच्या त्या काढा. नाहीतर कंत्राटदार देशोधडीला लागेल.”

मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे लोणावळ्याजवळ हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

पुणे -जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या साल्टर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अचानक लँडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली, परंतु दोन वैमानिक आणि चार प्रवाशांसह सर्व सहा जण सुरक्षित बचावले.

हेलिकॉप्टर लोणावळ्याकडे जात असताना प्रतिकूल हवामानात ते कोसळण्याच्या धोकादायी स्थितीत पोहोचले आणि सततच्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे, पायलटने पुढे जाणे असुरक्षित असल्याचे ठरवले आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साल्टर गावाजवळील एका मोकळ्या मैदानात सावधगिरीने लँडिंग केले.

महामहोपाध्याय पुरस्कार डॉ.नंदकिशोर कपोते यांना प्रदान.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने प्रतिष्ठेचा व मानाचा “महामहोपाध्याय” पुरस्कार प्रसिद्ध व ज्येष्ठ कथक नर्तक, संगीत नाटक अकादमी अवार्डी डॉ.नंदकिशोर कपोते यांना ज्येष्ठ नर्तिका पद्मविभूषण, खासदार डाॅ. सोनल मानसिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुर्यवंशी, सचिव पं. सुधाकर चव्हाण, रजिस्ट्रार विश्वास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा तेरणा ऑडिटोरियम, नेरुळ, नवी मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. डॉ.नंदकिशोर कपोते यांना या पूर्वी भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळाला आहे. तसेच याशिवाय महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार , पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मरणार्थ हा महामहोपाध्याय पुरस्कार अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या दीक्षांत समारोहात देण्यात आला. महामहोपाध्याय पुरस्कार हा कलाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.