गौतमीचा ड्रायव्हर स्वतःच गाडी चालवत होता -सहप्रवाशाचा किंवा मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सहआरोपी करा अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही-पुणे पोलीस
पुणे-पुण्यातील नवले उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघात प्रकरणात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला अखेर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अपघाताच्या वेळी ती स्वतः त्या गाडीत नव्हती हे पोलिस तपासात स्पष्ट झाले असे पोलिसांनी सांगितले आहे . पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गौतमी पाटीलचा या अपघाताशी प्रत्यक्ष संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिच्यावर कोणतीही गुन्हेगारी जबाबदारी येत नाही, असा निष्कर्ष तपास अधिकाऱ्यांनी काढला आहे.
नवले पुल परिसरात गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने रोडवर उभ्या असणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली होती. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात ठिय्या देत, गौतमी पाटीलविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. “सेलिब्रिटी असल्याने पोलिसांकडून चालढकल होते आहे,” असा आरोपही त्यांनी केला होता.
कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील डीसीपींना फोन करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अपघाताच्या तपासासाठी विशेष अधिकाऱ्याची देखील नेमणूक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलला पोलिसांनी नोटीसही बजावली होती. मात्र, तपास जसजसा पुढे गेला, तसतसे वेगळे चित्र समोर आले. पोलिसांनी अपघाताच्या परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात अपघातावेळी गाडीत फक्त चालकच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच पोलिसांनी गौतमी पाटील निर्दोष असल्याचे सांगत तिला क्लीन चिट दिली.
या अपघाताबाबत माहिती देताना डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले की, अपघातातील कार ही गौतमी पाटीलच्या नावावर आहे. गाडीचे काही पेपर्स आपल्याला इन्शुरन्ससाठी लागतात, त्यामुळे हे डिटेल्स मिळवण्यासाठी कदाचित कोथरूड पोलिस ठाण्याकडून गौतमी पाटीलला पत्र पाठवलं असेल. चौकशीसाठी संबंधित व्यक्तीची गरज असेलच तर पोलिस अधिकारी तिला बोलावू शकतात. पण जर पोलिसांकडे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली तर संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्याची गरज पडत नाही. पण जर गरज भासलीच तर भविष्यातही तपास अधिकारी त्यांना बोलावू शकतात.
जेव्हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळाचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यानुसार गौतमीचा ड्रायव्हर स्वतःच गाडी चालवत होता हे निष्पन्न झाले. अपघातावेळी गौतमी पाटील प्रत्यक्ष गाडीत असल्याचे प्राथमिकदृष्टया दिसत नाही. पण जरी असली तरी हा अपघाताचा प्रकार आहे. यामध्ये ड्रायव्हरने जर गुन्हा केला, तर कायद्यानुसार गाडीत बसलेल्या सहप्रवाशाचा किंवा मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सहआरोपी करा अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही. अपघाताच्या गुन्ह्यात गंभीर अपघातप्रकरणी शिक्षाच 3 वर्षांपेक्षा खाली असते, त्यामुळे त्यामध्ये अटकेचा विषयच येत नाही, असेही डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले.
रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांच्या आरोपांवर काय म्हणाले पोलिस? पहिल्या दिवसापासून तपास पारदर्शीप्रमाणे होत आहे. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 5 ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना वडगाव पुलाच्या सर्व्हिस रोडला झाली आहे. यामध्ये तपासात जो आरोपी निष्पन्न झाला त्याचा लोकेशनवरील सीसीटीव्ही फुटेज किंवा सीडीआर लोकेशन असतील या सर्व गोष्टीवरुन फिर्याद दाखल केली आहे. रिक्षावाल्याच्या सहकाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन त्याच दिवशी त्यांची फिर्याद आपण घेतली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे, असे डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले.

