Home Blog Page 344

भारताची सायकल राजधानी बनणार पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम

पुणे, १३ ऑक्टोबर – “पुणे हे आपल्या समृद्ध सायकल संस्कृतीसाठी ओळखले जाते. आता ही परंपरा पुन्हा उजळविण्याची आणि पुण्याला भारताची सायकल राजधानी बनविण्याची वेळ आली आहे. आमचे उद्दिष्ट संपूर्ण शहरभर सुमारे ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणे आहे, ज्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वार सुरक्षितपणे प्रवास करू शकतील,” असे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.

श्री. राम हे हिंदआयन शनिवाऱवाडा ते सिंहगड बाइक अँड हाइक या उपक्रमात सहभागी झालेल्या सायकलस्वारांना संबोधित करत होते. या कार्यक्रमात टेरीटोरियल आर्मी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, भारतीय वायुदल, तसेच पुणे महानगरपालिका सायकल क्लब आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

“सायकलिंग हे पर्यावरणपूरक तसेच आरोग्यास उपयुक्त असे वाहतूक साधन आहे. त्यामुळे सायकलस्वारांसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे,” असे श्री. राम यांनी पुढे सांगितले. “या उद्देशाने महानगरपालिका ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ साठी ७५ किमी सायकल मार्ग तयार करत आहे. हा उपक्रम जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. या उपक्रमांमुळे पुणे लवकरच देशाची सायकल राजधानी म्हणून ओळखले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

उमाकांत दिग्गीकर, इमारत परवाना विभागातील सहाय्यक अभियंता, ज्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, यांनी सांगितले – “भारतीय टेरीटोरियल आर्मी, वायुदल आणि बीएसएफच्या जवानांसोबत सायकल चालविण्याचा सन्मान लाभला. सिंहगडाच्या माथ्यावर भारतीय सैन्याने पुरविलेला भोजनाचा अनुभव संस्मरणीय होता. पुणे महानगरपालिकेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे आणि वैद्यकीय सहाय्यामुळे हा प्रवास अत्यंत आनंददायी झाला. आम्ही पुढील हिंदआयन उपक्रमांमध्ये नक्की सहभागी होऊ.”

हिंदआयन सायकल मोहिमेचे आयोजक व जगभर भूमार्गे भ्रमण करणारे पहिले भारतीय विश्‍नुदास चपके यांनी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी नागरिकांना पुढील उपक्रमांसाठी निमंत्रण दिले –
“आम्ही सर्व पुणेकरांना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती विशेष शनिवाऱवाडा ते सिंहगड बाइक अँड हाइक मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देतो. तसेच पुणेकरांना दिल्लीतील कर्तव्य पथावरील २० किमी सायकल परेड, सिंधुदुर्गमधील १०० किमी स्टेज रेस, मुंबई ते पुणे राईड, तसेच दिल्ली ते आग्रा ‘डबल सेंच्युरी राईड’ (यमुना एक्सप्रेसवे मार्गे) या विविध स्तरांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल.”

अभाविप कार्यालयाची तोडफोड, मनविसे पदाधिकाऱ्यांसह 20 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 20 ते 30 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे (वय 20) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘मनविसे’चे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह 20 ते 30 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते १३ ऑक्टोबर दुपारी साडेतीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात शिरले. अभाविपच्या कार्यालयातील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. कार्यालयाची तोडफोड करुन त्यांनी अभाविपच्या कार्यालयातील भिंतीवर पत्रक चिकटवले. कार्यालयाला कुलूप लावून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले, असे संजीवनी कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक एस सुरवसे तपास करत आहेत.

महाविकास आघाडी – निवडणूक आयोग उद्या पुन्हा बैठक:आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित

मुंबई -लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता . दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पत्रकार परिषद होणार नाही. उद्या आमची बैठकीतील निष्कर्षानंतर ती पत्रकार परिषद होईल. आता तिथे कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.चोकलिंगम यांच्यासोबतच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत. ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी चोकलिंगम यांची एकत्र भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ घेतील. त्यामुळे उद्याच पत्रकारांना भेटून माहिती देऊ, असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

चोकलिंगम यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मतदारयादीतील घोळ सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी सर्व विरोधीपक्षाच्या वतीने भेट घेतली. राज ठाकरे यांनी अनेक आणलेली निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींची अनेक उदाहरणे पुराव्यानिशी दिलेली आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ असल्याचे बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. तीच निवडणूक यादी १ जुलैला गोठवून, त्या यादीवर निवडणुका घेतल्या, तर तो गोंधळ पुन्हा चालू होईल, आम्ही याला आक्षेप घेतला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सीईओ चोकलिंगम यांनी एकत्रित यावे आणि आमचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी आम्ही केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, उद्या ते दोघे एकत्रित येऊन आमचे म्हणणे ऐकतील. आम्ही त्यासाठी सादर केलेले पुरावे त्याची पुन्हा चर्चा होईल. महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणुका घेण्याआधी राज्यातील सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. उद्या सकाळी अकरा वाजता आमची पुन्हा बैठक होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटून जी मागणी करतोय, अशीच मागणी भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडे करत आहेत. केरळ आणि कर्नाटकमध्येही भाजप अशीच मागणी करतोय. त्याच मागणीसाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटत असताना भाजप नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावे, ही आमची भूमिका आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे

निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली?
जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का?
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव.
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ.
वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी.
निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता?
31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का?
ठाकरे बंधू, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात हे निवडणूक अधिकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले . शिवालयातून निघाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दाखल झाले होते . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यावेळी सोबत दिसून आले. शरद पवार देखील अनेक वर्षांनी मंत्रालयात पोहोचलेले पाहायला मिळाले.
पराभव दिसतो तेव्हा कारणे बघावी लागतात. ताकद नसल्यावर रडीचा डाव केला जातो, हा त्यातलाच प्रकार असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

निवडणूक आयोगात जाण्याआधी शिष्टमंडळाचे सर्व नेते शिवालयात जमले होते. या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची याबाबत चर्चा झाली. दुसरीकडे विरोधकांचे शिष्टमंडळ भेटीला येण्याआधी राज्य निवडणूक आयोगातही अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच संदर्भात, निवडणुकीच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल वाढलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा ६ वा दीक्षांत समारंभ

पुणे, १४ ऑक्टोबर २०२५ : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे, आपल्या ६ व्या दीक्षांत समारंभाची अभिमानाने घोषणा करत आहे. हा समारंभ १६ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी, सकाळी १०. ३०  वाजता सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, किवळे, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या नव्या विभागाचे उद्घाटन मा. राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे. हा विभाग भारताच्या वाढत्या संरक्षण नवोन्मेष क्षेत्राला पाठबळ देत “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला पुढे नेणारा ठरेल.

या प्रसंगी, विविध कौशल्याधारित आणि व्यावसायिक कार्यक्रमांतून पदवी प्राप्त करणाऱ्या १५३२ विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे. हा सोहळा विद्यापीठाच्या “इंडस्ट्री-रेडी” व्यावसायिक घडविण्याच्या ध्येयाला अधोरेखित करतो. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार असून, महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री, भारत सरकार; चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन; मंगल प्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री, महाराष्ट्र शासन; तसेच माधुरी मिसाळ नगरविकास राज्यमंत्री वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, महाराष्ट्र शासन या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.  डॉ. एस. बी. मजुमदार, यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. स्वाती मजुमदार, प्रो-चान्सलर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने हा समारंभ पार पडणार आहे.

या वर्षीचा पदवीदान समारंभ विशेष महत्त्वाचा आहे, कारण सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सलग दुसऱ्या वर्षी एन. आय. आर. एफ. (NIRF) क्रमवारीत भारतातील कौशल्याधारित उच्च शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, ज्यामुळे विद्यापीठाची नेतृत्वाची भूमिका अधिक दृढ झाली आहे. तसेच एसएसपीयूने आंतरराष्ट्रीय सहकार्यांतर्गत वॉर-विक कम्युनिटी कॉलेज (अमेरिका) यांच्याशी भागीदारी केली असून, ॲलेन विद्यापीठ (जर्मनी) सोबत विद्यार्थ्यांच्या अदलाबदलीचा करार केला आहे.

या प्रसंगी बोलताना प्रो-चान्सलर डॉ. स्वाती मजुमदार म्हणाल्या,

“हा पदवीदान समारंभ केवळ आमच्या पदवीधरांच्या यशाचा उत्सव नाही, तर विद्यापीठाच्या प्रगतीतील एक अभिमानाचा क्षण आहे. सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीने भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाला मूर्त रूप दिले आहे. आमचे १५३२ पदवीधर हे कौशल्य, नवोन्मेष आणि रोजगारक्षमतेच्या समन्वयातून उभ्या राहिलेल्या शिक्षणमॉडेलचे यश दर्शवतात.”

समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या, चान्सलरचा सुवर्णपदक पुरस्कार, आत्मनिर्भर पुरस्कार आणि कुशल पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिले जातील

गुजरातमधील पाचवीतला इशित भट्ट पहा kbc मध्ये कसा बोललाय बिग बीं बरोबर

‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिएलिटी शोमध्ये काही ज्युनियर्स त्यांची हुशारी दाखवणार आहेत. केबीसी ज्युनियर सुरू झालं असून अतिशय हुशार असलेली छोटी मुलं हॉटसीटवर बसताना दिसत आहेत.त्यांच्या हुशारीने बिग बी आश्चर्यचकित झाले. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एका भागात गुजरातचा इशित भट्ट सहभागी झाला होता. पण, वयाने मोठ्या असलेल्या आणि एका दिग्गज अभिनेत्यासमोर इशित त्याच्या अकलेचे तारे तोडताना दिसला. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


केबीसीमधील इशितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं आहे. तर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत “बोलायला काहीच नाही, स्तब्ध आहे” असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत “त्या मुलाला दोन कानाखाली द्यायच्या होत्या”, असं म्हटलं आहे.
यामध्ये हॉटसीटवर बसलेला इशित बिग बींशी उद्धटपणे बोलताना दिसत आहे. नवीन स्पर्धक हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बी त्याला खेळाचे नियम प्रत्येकवेळी समजावून सांगतात. मात्र या मुलाने हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बींना उद्धटपणे “तुम्ही मला आता नियम समजावत बसू नका. मला सगळं माहीत आहे”, असं म्हटलं. एवढ्यावरच तो मुलगा थांबला नाही तर अमिताभ बच्चन यांनी पुढे प्रश्न विचारताच तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसला. बिग बींनी प्रश्न विचारताच मला उत्तर माहितीये ऑप्शन सांगू नका, असं तो म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर काही प्रश्नांची उत्तर ऑप्शन देण्याआधीच लॉक करा असं तो अमिताभ बच्चन यांना सांगत आहे. पण, पाचवीत शिकणाऱ्या इशितचा हा अतिआत्मविश्वास त्याला नडला.
आगाऊपणा करणाऱ्या इतिशची बिग बींनीही चांगलीच फिरकी घेतली. “वाल्मिकी रामायणाच्या प्रथम काण्डचं नाव काय आहे?” असा प्रश्न इशितला २५ हजार रुपयांसाठी विचारण्यात आला होता. याचं उत्तर त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे तो ऑप्शनची वाट बघत होता. पण, बिग बींनीही त्याला काही वेळ ऑप्शन न देत त्याची फिरकी घेतली. बिग बी म्हणाले, “फक्त तुच हुशार नाहीस, तर हेदेखील हुशार आहेत”. त्यानंतरही त्याने उद्धटपणे “अरे ऑप्शन द्या”, असं अमिताभ बच्चन यांना म्हटलं. पण ऑप्शन दिल्यानंतर त्याने B) अयोध्या काण्ड हा पर्याय निवडला. हा पर्याय लॉक करण्यासाठीही तो बिग बींना जोरजोरात ओरडून सांगत होता. पण, त्याचं हे उत्तर चुकलं आणि अवघ्या पाचव्या प्रश्नावरच इशितची विकेट उडाली

पुणे शहरात महावितरण ग्राहकसेवा कार्यालयांच्या पुनर्रचनेला प्रारंभ

» तत्पर ग्राहकसेवा अन् कर्मचाऱ्यांच्या कामांचे विभाजन

» ८ उपविभागीय कार्यालयांची नव्याने निर्मिती

» कर्मचाऱ्यांचा ताण कमी, कामकाजात होणार सुसूत्रता

पुणे, दि. १३ ऑक्टोबर, २०२५ – महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेला पुणे शहरात सोमवार (दि. १३) पासून प्रारंभ झाला असून, पुनर्रचनेमुळे पुणे शहरात ८ उपविभागांची नव्याने निर्मिती झाली आहे.

महावितरणमध्ये उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, वीजबिलांची थकबाकी वसुली, वीजहानी कमी करणे आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत होती. तसेच ही रचना सुमारे २५ वर्षांपूर्वीची व त्यावेळच्या ग्राहकसंख्येनुसार होती. मात्र त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर होत असल्याने व्यवस्थापनाने विशेष समिती स्थापन करून कर्मचारी संघटनांशी वेळोवेळी चर्चा करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे.

नविन रचनेत प्रामुख्याने थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. सोबतच ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

महावितरणच्या रास्तापेठ व गणेशखिंड शहर मंडलांतर्गत पुणे महानगराचा भाग येतो. या शहरी  भागातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी पूर्वी २९ उपविभाग होते. आता वीजपुरवठा आणि बिलींगसाठी स्वतंत्र उपविभाग झाल्याने आठ उपविभागांची नव्याने निर्मिती झाली आहे. तर पुणे ग्रामीण मंडलांतर्गत उपविभागांची संख्या १५ असून, तिथेही कामकाजात बदल करण्यात आला आहे.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, रास्तापेठचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांचेसह सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सर्व उपविभागातील कर्मचाऱ्यांना नवीन रचनेनुसार कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी नविन बदलानुसार नविन जबाबदारी स्विकारत कामकाजाला सुरुवात केली आहे.

कर्मचाऱ्यांचा ताण कमी, कामकाजात होणार सुसूत्रता-

पूर्वी अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत होती. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर परिणाम होत होता. नवीन रचनेत प्रत्येकाला कामाजी जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, कामकाजात सुसूत्रता येणार आहे.

कामातील नविन बदल असे-

देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसुली, वीजचोरी रोखणे आदी कामे करणार आहेत.

वीजग्राहकांनी विजेसंबंधिच्या सर्व तक्रारींसाठी महावितरणच्या 1912, 18002333435 व 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे क्रमांक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. महावितरणच्या मोबाईल ॲपवर देखील सर्व सुविधा २४ तास उपलब्ध आहेत.

इस्रायलच्या संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरु असताना’नरसंहार Genocide’ पोस्टर दाखवत निदर्शने करणाऱ्या इस्त्रायली खासदाराला बाहेर काढले

इस्रायलच्या संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबोधित करत असताना गदारोळ झाला. जेव्हा ट्रम्प संसदेला संबोधित करत होते. त्यावेळी एका व्यक्तीने ट्रम्प यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याला तेथेच अडवत संसदेच्या बाहेर काढण्यात आले. गदारोळ करणाऱ्या खासदाराचे नाव ओफर कासिफ आहे. जे इस्रायलच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. ते अरब-बहुल-हदाश-ताअल पक्षाचे एकमेव ज्यू सदस्य आहेत आणि ते गाझापट्ट्यातील कारवाईचे प्रमुख विरोधी आहेत. नेसेटचे सदस्य अयमान ओडेह आणि ओफर कासिफ यांनी भाषणादरम्यान Genocide म्हणजे नरसंहार लिहिलेला पोस्टर दाखवला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा कराराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर इस्रायलच्या संसदेला भेट दिली. पंतप्रधान नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचा इस्रायलच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला. यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणात करारासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. “20 धाडसी ओलिस ठेवलेल्या व्यक्ती परत येत आहेत. आज बंदुका शांत आहेत, सायरन शांत आहेत. ईश्वर इच्छितो की ही भूमी आणि हा प्रदेश अनंतकाळ शांत राहील.” डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी घोषणाबाजी करत त्यांचा विरोध केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला सभागृहातून बाहेर काढले. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, ही सलोख्याची सुरुवात आहे. हा एका नवीन मध्यपूर्वेचा ऐतिहासिक उदय आहे. नेतन्याहू यांच्याशी व्यवहार करणे सोपे नाही, पण यामुळेच ते महान आहेत. हा एक अत्यंत असामान्य वळणाचा काळ होता.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील अलीकडील युद्धविराम आणि स्थिरतेचा उल्लेख करताना म्हटले की, “आकाश शांत आहे, बंदुका शांत आहेत आणि पवित्र भूमीवर शांतता आहे.” डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब देश आणि मुस्लिम नेत्यांचे आभार मानले, जे ओलिसांना सोडवण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी एकत्र आले होते. त्यांनी पुढे सांगितले की, “हा इस्रायल आणि जगासाठी एक मोठा विजय आहे की हे सर्व देश शांततेसाठी भागीदार म्हणून एकत्र काम करत आहेत.” यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले होते की, “आमच्या शत्रूंना आता समजले आहे की इस्रायल किती शक्तिशाली आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणे ही एक मोठी चूक होती.”
नेतन्याहू यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक करताना संसदेत उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात म्हटले की, “मी कधीही कोणालाही आमचा मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे जगाला इतक्या वेगाने, निर्णायकपणे आणि ठामपणे पुढे नेताना पाहिले नाही.” यासोबतच, नेतन्याहू यांनी इस्रायली कुटुंबांसाठी करार घडवून आणल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांच्या निवडणुकीनंतर सर्व काही बदलले.

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट

0

वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार

दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहिर केला.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतना सोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे श्री सरनाईक यांनी सांगितले.

००००

पुणे शहरासाठी १००० ई-बसेसच्या प्रक्रियेला गती…

नवी दिल्ली

पुणे शहरासाठी आवश्यक असणाऱ्या १००० ई-बसेसच्या विषयासंदर्भात आज केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. १००० बसेसच्या मागणीसंदर्भातील पीएमपीएमएलकडून अपेक्षित असणारा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे दाखल झाला असून याबाबत पुढील प्रक्रिया वेगाने करण्यासंदर्भात कुमारस्वामीजी यांच्या चर्चा केली.पुणे शहराला १००० बसेस मिळण्याच्या दृष्टीने असणाऱ्या प्रक्रियेला आता गती आली असून ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने करण्याचा प्रयत्न आहे. या चर्चेवेळी कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत पुढील प्रक्रियेसंदर्भात सूचित केले आहे.

मोहोळ यांनी म्हटले आहे कि,’ पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने एकीकडे मेट्रो मार्गांचा आपण विस्तारत करत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरण हादेखील आपला प्रमुख अजेंडा आहे. या दृष्टीने या बसेससाठी आवश्यक असणारे पत्र राज्य सरकारने रिझर्व बँकेला प्रस्ताव पाठवावा, याबाबत नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव रिझर्व बँकेला राज्य सरकारकडून पाठवण्यात आले असून या प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून पीएमपीएमएलकडून अधिकृत प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.

पदवीधर व शिक्षक मतदार संघांची नोंदणी मोहीम सुरू

▪️ नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कॅम्पचे आयोजन

पुणे, दि. १३ ऑक्टोबर
पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबरपासून सुरू झाला असून नागरिक ६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करू शकतात.

या मोहिमेसाठी विभागीय आयुक्त पुणे श्री. चंद्रकांत पुलकुंडवार हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त असून, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम पाहतील.

या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे कार्यालयातील सर्व पदवीधर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी श्री. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या वेळी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अशा प्रकारचे विशेष नोंदणी कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “जास्तीत जास्त पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही या विशेष कॅम्पला भेट दिली आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू

-शालेय शिक्षण विभागाची माहिती

मुंबई, दि. १३ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

२०२५-२६ या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविताना या अभियानाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यावर्षीही अभियानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. २०२५-२६ या वर्षामध्ये सदर अभियान सुधारित निकषांसह राबविण्याच्या अनुषंगाने सर्व संचालकांशी समन्वय साधून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्त (शिक्षण) यांना कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने २०२५-२६ या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-३ अभियान राबविण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांच्यामार्फत २९ ऑगस्ट २०२५ रोजी शासनास प्राप्त झाला आहे. या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून हे अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ९५ टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

२०२४-२५ मध्ये देखील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-२ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह २६ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये २९ जुलै २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२४ व ९ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पारितोषिकाची ७३.८२ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर अभियानास २०२३-२४ प्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला.

आता २०२५-२६ या वर्षाकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून सदर अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

अवजड वाहनांच्या चालकांची तपासणी करण्याचे निर्देश

पीएमआरडीएमधील बैठकीत महत्त्वपूर्ण न‍िर्णय; रहदारीच्या वेळेत अवजड वाहने नको

पुणे / पिंपरी (दि.१३) : हिंजवडीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी अवजड वाहने पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेतच शहरात यायला हवी. यासह बांधकाम व्यवसायिकांनी याबाबत खबरदारी घेत ज्या भागात त्यांची बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी रहदारीच्या नियमांचे पालन करत संबंधित वाहन चालक कुठल्या नशेत नसल्याची खात्री करूनच त्याचे परवाने अध्यायवत असलेल्याबाबत खात्री करूनच एकत्रित माहिती विकासकाने त्याच्या प्रकल्पसाइटवर अद्यावत ठेवावी, असे निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात सोमवारी झालेल्या अधिकारी आण‍ि बांधकाम व्यवसायिकांच्या बैठकीत व‍िव‍िध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली

सध्या शहरालगत असलेल्या हिंजवडी – माण, म्हाळुंगे परिसरात अनेक बांधकाम व्यवसायिकांच्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी बांधकाम करताना संबंधितांना अवजड वाहनांद्वारे सिमेंट, स्टील आदी साहित्यांची वाहतूक करावी लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित वाहनांपासून सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. संबंधित अपघात टाळण्यासाठी पीएमआरडीएने सोमवारी हिंजवडी – माण, म्हाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिकांच्या प्रतिनिधींची बैठक घेत अवजड वाहनांबाबत पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेतच शहरात आणावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

आयटीनगरी असलेल्या हिंजवडी – माण भागात सकाळी आण‍ि सायंकाळी दुचाकीसह चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. यादरम्यान बऱ्याचदा बांधकाम व्यवसायिकांची अवजड वाहने या मार्गावर धावत असल्याने इतर वाहनचालकांना अडचणी येतात. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार सोमवारी विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्यासह हिंजवडी – माण, महाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिक यांच्या प्रतिनिधी व पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

त्या बांधकाम व्यवसायिकाचे काम थांबवणार
हिंजवडी भागात शुक्रवारी काँक्रीट मिक्चरखाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवला असून याआधारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संबंधित वाहन ज्या ठिकाणी काम करण्यासाठी जात होते, त्या ठिकाणची बांधकाम परवानगी रोखणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

  • डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

त्रिधारा’मध्ये रसिकांनी अनुभवला सुरेल स्वराविष्कार

तीन पिढीतील कलाकारांचे बहारदार सादरीकरण

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित कैवल्यकुमार गुरव, ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायकीची परंपरा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या मुकुल कुलकर्णी यांच्यासह युवा पिढीतील आश्र्वासक शास्त्रीय गायक अभेद अभिषेकी यांच्या सुरेल स्वराविष्कारात रसिकांनी ‘त्रिधारा’ मैफलीचा आनंद लुटला.

निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘त्रिधारा‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ कोथरूड येथे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

ख्यातनाम गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नातू व प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांचे पुत्र अभेद अभिषेकी यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग पुरिया धनश्रीतील ‘बल बल जाऊ मीत मोरे’ या बंदिशीने केली. त्याला जोडून ‘पायलिया झनकार मोरी’ ही सुप्रसिद्ध बंदिश प्रभावीपणे सादर केली. उत्तम फिरत असलेला सुमधुर आवाज आणि बहारदार सादरीकरणाने अभेदने रसिकांची मने जिंकली. कौस्तुभ स्वैन (तबला), माधव लिमये (संवादिनी), चिन्मय कुलकर्णी, ऋचा कुलकर्णी (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या मध्यधारेत ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक मुकुल कुलकर्णी यांनी आपल्या नजाकतपूर्ण सुरांनी रसिकांना मोहित केले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग श्यामकल्याण मधील तिलवाडातील ‘जियो मोरे लाल’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्यानंतर मुकुल कुलकर्णी यांनी ‘ऐसो तुम्हीको मै’ ही शामकल्याणधील बंदिश आणि  ‘आन बान जिया मे लागे’ हा पारंपरिक दादरा सादर केला. अलवार सुरांची पक्की बैठक त्यांच्या गायनातून प्रकर्षाने जाणवली. वेदांग क्षीरसागर (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी), कुणाल भिडे, कन्हैया बाहेती (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.

कार्यक्रमाची सांगता किराणा घराण्याचे विख्यात गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या मैफलीने झाली. त्यांनी सुरुवातीस राग मारुबिहागमधील ‘अब मे हू न जानू’ ही बंदिश सादर केली. त्याला जोडून ‘तरपत रैना दिन’ ही बंदिश प्रवाभीपणे सादर केली. त्यानंतर ‘छेडो ना मोहे’ ही रचना ऐकविली. रसिकांच्या आग्रहास्तव पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी ‘मै तोरी ना मानुंगी बतिया’ ही बंदिश तर राग दुर्गा सादर करताना ‘तू रस कान्हा रे’ आणि ‘अजहू न आयिल पिया मोरा रे’ या बंदिशी सुमधुरपणे सादर केल्या. आपल्या मैफलीची सांगता भैरवीतील ‘अकेली जी न जय्यो राधा जमुना के तीर’ या पारंपरिक बंदिशीने केली. बहारदार आवाज, सुरांवरील पकड, तीन सप्तकात सहज फिरत असणारा आवाज असलेल्या या अद्भुत सादरीकरणाने रसिक मोहित झाले.

प्रणव गुरव (तबला), स्वरूप दिवाण (संवादिनी), आदित्य जोशी, वैष्णवी बरकते, सचिन जाधव  (तानपुरा, सहगायन) यांनी सुमधुर साथसंगत केली.

कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनच्या संचालिका चेतना कडले, सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी, प्रसिद्ध गायिका सुमन नागरकट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद देशपांडे यांनी केले.

“आयुर्वेद-युनानी महाविद्यालयांना शासनमान्य सेवा नियम लागू करावेत”, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शासन-अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांमधील अध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मागणी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागांतील एकूण १६ आयुर्वेद आणि ३ युनानी शासन-अनुदानित महाविद्यालयांमध्ये शेकडो शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व संस्थांना शासनाकडून शंभर टक्के आर्थिक अनुदान मिळते. तरीदेखील आजपर्यंत या संस्थांना महाराष्ट्र सेवा नियम किंवा शासनमान्य Grant-in-Aid Code लागू करण्यात आलेला नाही. या दुर्लक्षामुळे अनेक कर्मचाऱ्यांना न्याय्य सेवा नियमांचा लाभ मिळालेला नाही आणि परिणामी, वारंवार न्यायालयीन वाद निर्माण होत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी याबाबत पुढे म्हटले आहे की, शासनमान्य पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका आणि वेतन नोंदींचे लेखापरीक्षण वर्ष २००० पासून आजपर्यंत झालेले नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि अन्यायकारक असून तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी शासन अनुदानित आयुर्वेद आणि युनानी संस्थांसाठी महाराष्ट्र सेवा नियम किंवा शासनमान्य Grant-in-Aid Code तत्काळ लागू करणे, सर्व अध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका व वेतन नोंदींचे शासनमान्य प्राधिकरणामार्फत नियमित लेखापरीक्षण करणे, तसेच या विषयावर आयुष संचलनालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत एक समन्वय समिती स्थापन करून कालबद्ध कार्यवाही करणे अशी पावले शासन स्तरावर उचलण्याची मागणी केली आहे .

डॉ. गोऱ्हे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या न्याय्य मागण्यांचा विचार होऊन सकारात्मक निर्णय झाल्यास आयुर्वेद आणि युनानी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शासनाच्या पारदर्शक व न्याय्य कारभाराला बळकटी मिळेल.

शिरूरसह पुणे विभाग बिबट्या संघर्ष बाधित विभाग म्हणून (‘Leopard Conflict Management Zone’) घोषित करावा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बालिकेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, मानव–वन्यजीव संघर्षावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

पुणे, दि. १३ ऑक्टोबर २०२५ : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे १२ ऑक्टोबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात बालिका शिवण्या शैलेश बोंबे हिचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देत वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षावर तातडीने सर्वंकष आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, ही घटना केवळ एका कुटुंबाची वेदना नसून संपूर्ण समाजाचे दु:ख आहे. मागील काही वर्षांपासून शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अशा घटना सातत्याने घडत असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि असहायतेचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात आ.शरद सोनावणे आणि सचिन बांगर ,युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांनी डॉ.नीलम गोर्हे यांच्याकडे पाठपुरावा करून लक्ष वेधले होते

वनविभागाकडून तातडीने कारवाई करण्यात आली असली तरी आता केवळ उपचारात्मक उपायांपेक्षा प्रतिबंधात्मक आणि शाश्वत नियोजनाची गरज आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यांनी शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड हे चार तालुके ‘Leopard Conflict Management District Zone’ म्हणून घोषित करून या क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि मनुष्यबळ मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच पुणे येथे २४ तास कार्यरत राहील असा ‘Wildlife Conflict Command Center’ स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली आहे. या केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष, ड्रोन सर्व्हेलन्स आणि रॅपिड रिस्पॉन्स यंत्रणा एकत्रितपणे कार्यान्वित राहील, असेही त्यांनी सुचविले आहे.

त्याचप्रमाणे सर्व संवेदनशील गावांचा GIS आधारित डिजिटल Conflict Map तयार करून नागरिकांवरील आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचा एकत्रित डेटाबेस विकसित करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. वाघांप्रमाणे बिबट्यांना RFID कॉलर बसविण्याचा प्रयोग करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल का, याची चाचपणी करावी, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अशा तांत्रिक उपाययोजनांनी या भागातील बिबट्यांच्या वर्तनाचा अभ्यास होऊन भविष्यातील धोके ओळखणे शक्य होईल.

डॉ. गोऱ्हे यांनी संरक्षणात्मक उपाययोजनांबाबतही ठोस सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावात शालेय मुलांना सुरक्षितपणे थांबता येईल अशा “Safe Waiting Zones for Children” उभाराव्यात, ज्यामध्ये शेड, लाईट आणि CCTV कॅमेऱ्यांची सोय असेल. याशिवाय फक्त सौर कुंपणांवर अवलंबून न राहता “Hybrid Shock-Fence + Sound Alarm Units” या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन किलोमीटरच्या परिसराला संरक्षण द्यावे. सर्वाधिक सक्रिय असलेल्या पिंपरखेड, कोळवाडी आणि घोडनदी परिसरात Forest Drones आणि AI Pattern Tracking System तैनात करून बिबट्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना स्पष्ट अधिकार देऊन “Attack-Prone Leopard Capture Protocol” लागू करावा, जेणेकरून फक्त अटकावच नव्हे तर आवश्यक असल्यास तत्काळ स्थलांतरही करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

या संघर्षावर दीर्घकालीन उपाय म्हणून डॉ. गोऱ्हे यांनी सामाजिक सहभागाचीही गरज अधोरेखित केली आहे. प्रत्येक गावात “बिबट्याशी सहजीवन समिती” स्थापन करून ग्रामपंचायतीच्या मान्यतेनेच रात्रीची हालचाल, कचरा व्यवस्थापन आणि पशुधन चराईसंबंधीचे नियम ठरवावेत, असे त्यांनी सुचवले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धर्तीवर “मानव–वन्यजीव संघर्ष विमा योजना” सुरू करून मृत्यू किंवा जखमी झालेल्या प्रकरणात शासकीय मदत २४ तासांच्या आत संबंधितांच्या खात्यात जमा व्हावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

त्यांनी विशेष नमूद केले की, पिंपरखेड येथील मृत बालिकेच्या कुटुंबाला शासनमान्य आर्थिक मदत तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुणे विभागाने या प्रसंगाच्या दृष्टीने “शिरूर मॉडेल” तयार करावे, जे राज्यातील आणि देशातील मानव–वन्यजीव सहअस्तित्वाचे आदर्श उदाहरण ठरेल.
“मृत्यूमुखी पडलेल्या छोट्या शिवण्याची न्याययात्रा केवळ कागदपत्रांत न राहता ती धोरणात्मक निर्णयांमध्ये परावर्तित व्हावी, हीच आपली जबाबदारी आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी नमूद केले आहे.