Home Blog Page 345

कृषी पदवीधरांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतःचे उदाहरण निर्माण करावे- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

पुणे, दि.१३: महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांनी फार मोठी उंची गाठली आहे. विविध उद्योजक, राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न लागता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो श्वास जिवंत ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित ॲग्रीकॉस मासिकाच्या ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ चे प्रकाशनाच्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, “अतिवृष्टीमुळं नुकसान झाल्याने आज राज्यभरातील शेतकरी खचला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमत्री अजित पवार यांनी एकतीश हजार सहाशे कोटी रुपयाचे शेतकऱ्यायांना मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने नवनवीन योजना राबविण्यात येत आहे, कृषी विभागाच्या जवळपास ५० हून अधिक महत्वपूर्ण योजना आहेत, त्याचा ही शेतक-यांना लाभ मिळत आहे. येत्या काळामध्ये आपल्याला शेतीची दिशा बदलावी लागेल काय? असं सांगणारा हा काळ आहे. अशावेळी कृषी पदवीधरांनी या संकटाच्या काळात आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

ॲग्रीकॉस दिवाळी अंक हा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा, संशोधनाचा आणि तरुणांच्या कल्पकतेचा उत्सव
श्री. भरणे म्हणाले, ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ हा ॲग्रीकॉस आणि विनोद या विषयावर आधारित असून, शेती, ग्रामीण जीवन, नवकल्पना आणि विनोदी लेखन यांचा समतोल साधणारा अंक आहे. ॲग्रीकॉस दिवाळी अंक हा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा, संशोधनाचा आणि तरुणांच्या कल्पकतेचा उत्सव आहे. या अंकाच्या निमित्ताने शेखर गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी राज्यातील कृषी पदवीधरांना एकत्र आणून त्यांच्या संघटन शक्तीचा वापर सकारात्मकरित्या केले आहे. कृषी पदवीधरांची पहिली राज्य पातळीवरील कृषी पदवीधर पतसंस्था स्टेट ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावानं उभारण्यात आली आहे.

येत्या काळामध्ये ही संस्था शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जापासून अन्य वित्तीय गरजा भागविण्यामध्ये निश्चितपणे योगदान देईल. नुकताच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. याप्रमाणेही कृषी विभागाने कृषी शिक्षणाच्या बाबतीतही अशाचप्रकारे निर्णय घेईल. पुणे कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेला दिलेल्या जागेबद्दल देखील माझ्याकडे संघटनेने मुद्दा लक्षात आणून दिला आहे, असेही श्री. भरणे म्हणाले.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अर्थसहाय्यकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि.१३ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींनी स्वयंरोजगाराकरीता विविध योजनांअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे; याकरिता www.msobcfdc.org/msobefde.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना, १ लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

अर्जदाराचे वय १८-५० वर्ष असल्याबाबतचा वयासंबंधित कागदपत्रे (शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला), ३. जातीचा दाखला, आठ लाखाच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला उत्पन्नाचा दाखला. स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला (तहसीलदरांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.) कुटुंबाचे शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, आधारसंलग्न बँकचे पासबुक, विवाहीत स्त्री अर्जदारासाठी नावात बदलाबाबतचे प्रतिज्ञापत्र किंवा लग्नपत्रिका किंवा राजपत्र आणि अर्जदाराचा छायाचित्रांची आवश्यकता आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक-बी, सर्वे क्रमांक, १०४/१०५, मनोरुग्णालय कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा. दुरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३०५९, ई-मेल dmobcpune@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

१३ वर्षीय दोन मुली पुण्यातून हरवल्या पण ….

पुणे-१३ वर्षीय दोन मुली पुण्यातून हरवल्या पण …. सुमारे ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-याच्या फुटेजचे आधारे पोलिसांनी त्यांना शोधुन काढण्यात अखेरीस यश मिळविले . म्हणतात ना , इछ्या असेल आणि तयारी असेल तर कितीही कठीण परिस्थिती असू द्यात यश येणारच या प्रमाणे पुणे पोलिसांनी हि मोहीम फत्ते केली आणि मुलीना सुखरूप माघारी आणले .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) हा गुन्हा दि.०७/१०/२०२५ रोजी नोंद झाला. त्यामध्ये स्वाधार अनाथालय बुधवार पेठ पुणे येथे राहणा-या १३ वर्षे वयोगटातील राजमाता जिजाऊ विद्यायलय, कसबा पेठ, पुणे येथील ७ वी इयत्तेत शिकणा-या दोन अल्पवयीन मुली सदर शाळेतून अपह्त झाल्याची तक्रार दाखल होती.
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरिक्षक, (अति. कार्य.) श्री उत्तम नामवाडे, यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी सपोनि वैभव गायकवाड व पोलीस उप-निरिक्षक अरविंद शिंदे तसेच पोलीस अंमलदार यांना घटनेची गांभिर्य लक्षात घेवुन महत्वाच्या सुचना देवुन वेग-वेगळी २ पथके तयार करुन, त्यांना कामाची विभागणी करुन दिली. त्याप्रमाणे तपासकामी नेमण्यात आलेल्या पथके यांनी एकमेकांचे संपर्कात राहुन, वर नमुद गुन्हयातील अपहत झालेल्या दोन अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही फुटेजचे मदतीने शोध सुरु केला, सदर अल्पवयीन मुली या अनाथ असल्याने व त्यांचे कोणीही नातेवाईक अथवा ओळखीचे इसम उपलब्ध नसल्याने सदर अल्पवयीन मुली शोधण्यात खूप अडचणी आल्या होत्या. परंतु तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड व चेतन होळकर यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने कसबा पेठ, पवळे चौक कुंभारवेस चौक, शिवाजीनगर येथील सीसीटीव्ही कॅमे-याचे साहाय्याने शोध घेता त्यांतील एक अल्पवयीन मुलगी एकटीच वाकडेवाडी शिवाजीनगर येथे त्याच दिवशी रात्री मिळून आली. परंतु दुसरी अल्पवयीन मुलगी मिळून आली नाही.
सदर मिळालेल्या अल्पवयीन मुलीकडून दुस-या अल्पवयीन मुलीबाबत कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे तपास पथकाने परत दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही च्या आधारे शोध सुरू केला. दिनांक ०८/१०/२०२५ पासून शिवाजीनगर, पाटील इस्टेट, संगमवाडी, बॉम्बे सॅपर चौक, विश्रांतवाडी, मॅगझीन चौक, दिघी, आळंदी, मोशी व भोसरी या परिसरातील दिनांक ११/१०/२०२५ रोजी पर्यंत सलग चार दिवस रात्रंदिवस ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही च्या आधारे शोध घेतला असता तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर व प्रशांत पालांडे यांचे पथकास सदर अल्पवयीन मुलगी मोशी परिसरात तुपे वस्ती, गणेश नगर येथे दिसून आल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ रात्री ०९.०० वा. तेथे जाऊन सदर परिसरात शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलगी तेथील रस्त्याचे कडेला बसलेली मिळून आल्याने तिला सुस्थितीत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-१, कृषिकेश रावले, पोलीस उप-आयुक्त विवेक मासाळ, (अति.कार्य.) सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग साईनाथ ठोंबरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरिक्षक, (अति. कार्य.) उत्तम नामवाडे, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, संतोष गोरे, सपोफौ मेहबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर, पोलीस अमंलदार, प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड, चेतन होळकर, विशाल शिंदे, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, मनिषा पुकाळे यांनी केलेली आहे.

पुण्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

पुणे, दि. 13 ऑक्टोबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे या कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘विकसित भारत @ 2047’ या पार्श्वभूमीवर हा महोत्सव दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज, कॅम्प, पुणे येथे पार पडणार आहे.

या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र आणि बक्षीस रक्कम देण्यात येईल. तसेच प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांसाठी वयोगट १५ ते २९ वर्षे असा निश्चित करण्यात आला असून वयाची गणना 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. नावनोंदणी करताना आधार कार्ड आणि जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे; शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत dsopune6@gmail.com ई-मेल अथवा व्हॉटस् अपद्वारे अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी – 7387880427, ताहेर आसी – 9145402115, आशद शेख – 8484803529 सादर करावेत. सर्व स्पर्धकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी व संस्था येथील इच्छुक कलावंतांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन , जिल्हा क्रीडा अधिकारी, जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

लोकमान्यनगर पुनर्वसन प्रकल्प:गृह निर्माण व नगरविकास मंत्रालयाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समिती शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट

टिळक स्मारक मंदिरात प्रचंड गर्दीत ५ मिनिटांची चर्चा

पुणे : पुण्यातील लोकमान्य नगरमधील नागरिकांनी त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताब्यात सध्या नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याने या भेटीला विशेष महत्त्व होते.

ही भेट टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे पार पडली. ठिकाणी प्रचंड गर्दी असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकमान्य नगरवासीयांना खास पाच मिनिटांचा वेळ दिला. नागरिकांच्या प्रतिनिधीमंडळाने त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात लोकमान्य नगर परिसरातील विकासकामे, पुनर्विकास प्रक्रिया, नागरिकांच्या मालकी हक्काशी संबंधित प्रश्न, तसेच सुविधांच्या अभावाची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदन काळजीपूर्वक वाचून काही मुद्द्यांवर थेट प्रश्न विचारले आणि सविस्तर माहिती घेतली. यावेळी पुण्याचे आमदार हेमंत रासने यांचे शिफारस पत्र निवेदनासोबत जोडले नव्हते, ते तात्काळ जोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. त्यांनी लोकमान्य नगरचा प्रश्न नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून नक्की सोडवू, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रतिनिधीमंडळात ॲड. गणेश सातपुते, हेमंत पाटील,कपिल पाटील, वैभव ललवाणी, कुणाल पाटील, ज्योती गुजर, सुनिल कुसुरकर, मुकेश वैराट आदी नागरिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. भेटीदरम्यान सर्वांनी मुख्यमंत्री शिंदे यांना परिसरातील परिस्थितीचे वास्तव चित्र समजावून सांगितले.

लोकमान्य नगरवासीयांमध्ये या भेटीनंतर मोठा उत्साह दिसून आला असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकांना आता समस्येच्या तोडग्याची आशा वाटू लागली आहे.

पाकिस्तानात टीएलपी प्रमुख हाफिज साद हुसेन रिझवींवर तीन गोळ्या झाडल्या, पक्षाचा दावा – २५० कार्यकर्ते ठार, १,५०० जखमी

पाकिस्तानात पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांचा नरसंहार हाफिज साद हुसेन रिझवी गंभीर जखमी

इस्लामाबाद – पॅलेस्टाईनशी एकता दर्शवण्यासाठी इस्लामाबादकडे कूच करणाऱ्या टीएलपी समर्थकांवर सुरक्षा दलांनी हिंसक कारवाई सुरू केली. अहवालानुसार २२० हून अधिक जण ठार आणि १,९०० हून अधिक जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.टीएलपी नेते हाफिज साद हुसेन रिझवी यांनाही पाकिस्तानातील मुरीदके येथे तीन गोळ्या झाडण्यात आल्या आणि ते जखमी झाल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानच्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) चे प्रमुख हाफिज साद हुसेन रिझवी यांना अनेक गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रिझवी यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.त्यांना जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे ठिकाण किंवा हल्लेखोरांची ओळख याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. टीएलपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंजाबच्या अनेक भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि चकमकी सुरू आहेत.

पक्षाचा दावा आहे की आतापर्यंत त्यांचे २५० हून अधिक कार्यकर्ते आणि नेते मारले गेले आहेत, तर १,५०० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांनी मुरीदके येथील टीएलपी विरोधी छावणीला वेढा घातला आहे. इस्रायल विरोधी निदर्शनांमध्ये ही घटना घडली. टीएलपीने म्हटले आहे की ते मागे हटणार नाही.सोमवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सुरक्षा दल आणि तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) निदर्शकांमध्ये हिंसक संघर्ष झाला, ज्यामध्ये एक पोलिस अधिकारी ठार झाला आणि डझनभर जखमी झाले.

हे निदर्शक ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला विरोध करत होते. पाकिस्तानने या योजनेला पाठिंबा दिल्याने देशात तणाव निर्माण झाला आहे. टीएलपीचे नेतृत्व साद हुसेन रिझवी करतात. त्यांनी सरकारविरोधी, गाझा समर्थक आणि इस्रायलविरोधी मोहिमेचा भाग म्हणून लाहोर ते इस्लामाबाद असा लाँग मार्च आयोजित केला.

मुरीदकेमध्ये, पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी कडक कारवाई केली. पाकिस्तान रेंजर्ससह सुरक्षा दलांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. निदर्शकांनी अनेक ठिकाणी छावण्या उभारल्या होत्या, परंतु मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स असूनही हिंसाचार उफाळला.

शनिवारी झालेल्या निदर्शनांमध्ये पोलिसांनी १०० हून अधिक लोकांना अटक केली, ज्यांचा वापर सुरक्षा दलांनी त्यांच्याविरुद्ध केल्याचा निदर्शकांचा आरोप आहे. मीडिया कव्हरेजवरही बंदी आहे.

हमासने सर्व 20 इस्रायली बंधकांची केली सुटका:बदल्यात इस्रायल 250 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार ; ट्रम्प यांचे लवकरच इस्रायली संसदेत भाषण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान, प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर प्रदान करण्यात येईल.इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी सोमवारी याची घोषणा केली. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना यापूर्वी २०१३ मध्ये हा सन्मान मिळाला होता.

हमासने सर्व २० इस्रायली बंधकांना सोडले आहे. त्यांना सात आणि १३ अशा दोन तुकड्यांमध्ये सोडण्यात आले. हमासने त्यांना रेड क्रॉसकडे सोपवले. पहिल्या तुकडीतील सात बंधक इस्रायलमध्ये पोहोचले आहेत, तर दुसरी तुकडी येण्याच्या मार्गावर आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने केलेल्या युद्धबंदी कराराचा भाग म्हणून हमासने २० जिवंत इस्रायली बंधकांना सोडले, जे गाझामधील दोन वर्षांचे युद्ध संपवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हमासने आता कोणत्याही जिवंत इस्रायली बंधकांना ठेवलेले नाही. हमास आज २८ इस्रायलींचे मृतदेहही सोपवेल. त्या बदल्यात, इस्रायल आज २५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल.

इस्रायली लष्कराने सांगितले की सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. बेंजामिन नेतन्याहू त्यांचे स्वागत करण्यासाठी बेन गुरियन विमानतळावर स्वतः पोहोचले. ट्रम्प लवकरच इस्रायली संसदेला संबोधित करतील.

इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शर्म अल-शेख शिखर परिषदेला उपस्थित राहू शकतात. या शिखर परिषदेत २० हून अधिक देशांचे नेते सहभागी होतील.

गाझामधील सुरू असलेले युद्ध संपवणे आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी या शिखर परिषदेचे सहअध्यक्ष असतील.

एकनाथ शिंदेंचा मध्यरात्री SRAच्या CEOना फोन :अन दिली SRA प्रकल्पाला तातडीने स्थगिती

शाहू वसाहतीतील नागरिकांचा विजय — अन्यायकारक एसआरए प्रकल्पाला स्थगिती!

पुणे- पर्वती मतदारसंघातील सर्व्हे क्र. ९२, शाहू वसाहत परिसरातील अन्यायकारक एसआरए प्रकल्पाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला यश मिळत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून हा तातडीचा निर्णय घेतला आहे.

आज शाहू वसाहतीतील शेकडो नागरिकांनी पुण्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना दूरध्वनीवर संपर्क साधला आणि स्पष्ट शब्दांत आदेश दिले —

“या प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्या.”

हा निर्णय होताच परिसरात आनंदाचा जल्लोष उसळला. नागरिकांनी उत्स्फूर्त घोषणांनी वातावरण भारावून टाकले —
“एकनाथ शिंदे जिंदाबाद!”
“सर्वसामान्य जनतेचा खरा नेता — एकनाथ शिंदे!”
महिलांनी आनंदाने व्यक्त केला —

“लाडक्या भावाने दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींना खरी दिवाळी भेट दिली !”
नागरिकांच्या तक्रारी आणि लोकहिताची बाजू
शाहू वसाहतीत गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांचा संताप उफाळून आला होता. शासनाच्या नावाखाली लादण्यात आलेल्या एसआरए प्रकल्पामुळे सर्वसामान्य रहिवाशांचे हक्क, घरे आणि सुरक्षित भविष्य धोक्यात येत असल्याची भीती व्यक्त केली जात होती.
नागरिकांच्या मते, या प्रकल्पासाठी त्यांची संमती घेतली गेली नव्हती. कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न ठेवता काही मोजक्या व्यक्तींना लाभ मिळावा, अशा प्रकारे हा प्रकल्प पुढे नेला जात होता.
“आम्हाला विकास नको नाही, पण तो लोकशाही मार्गाने, पारदर्शकतेने आणि आमच्या संमतीने व्हावा,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकहितासाठी घेतलेला निर्णय
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवलेली तत्परता आणि नागरिकांच्या बाजूने घेतलेली भूमिका ही लोकहितासाठी केलेल्या प्रशासनिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
या निर्णयाने हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

संवेदनशील समाजामुळे आनंदी जगण्याची ‘उमेद’-चंद्रकांत पाटील

दिव्यांग, मतिमंद मुलांच्या पालकांचा, सेवाभाव जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव

पुणे,: “परमेश्वर समाजात दुःख आणि त्यावर फुंकर घालण्याची संस्कृती निर्माण करून समतोल साधतो. एकमेकांना मदतीचा हात देण्याची आपली संस्कृती आहे. संवेदशील वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांमुळेच समाजातील दुःखितांना जगण्यात आनंद मिळण्याची उमेद मिळते,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आनंदाने जगण्यासाठी आर्थिक नव्हे, तर मनाची व दातृत्वाची संपत्ती अधिक गरजेची असते, असेही त्यांनी नमूद केले.

उमेद फाऊंडेशन संचालित दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठीच्या बालक-पालक प्रकल्पाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक सुहास हिरेमठ, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके, उमेद फाऊंडेशनचे राकेश सणस, लीना देवरे, प्रकाश पारखी, प्रतिभा केंजळे आदी उपस्थित होते.

दिव्यांग, मतिमंद पाल्याना मोठ्या मेहतीने घडवणाऱ्या डॉ. रितेश व उल्का नेहेते (पुणे), चिंतामणी व राजेश्वरी राशीनकर (पुणे), अभिमन्यू पोटे (कोल्हापूर), अमृता भिडे (रत्नागिरी) या पालकांना ‘प्रेरणा पुरस्कार’, तर वैद्यकिय सेवेत योगदानाबद्दल डॉ. प्रदीप देशपांडे, इमारत उभारणीत योगदानाबद्दल शशिकांत नागरे, उमेद फाऊंडेशनला जागा देणार्‍या राजेंद्र रसाळ यांना ‘सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. आक्रंदन या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले.

डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, “समाजावर श्रध्दा ठेवून काम केल्याने स्नेहालयचे काम चांगल्या पद्धतीने पुढे नेता आले. सामाजिक संस्थांच्या पाठीशी उभे राहिले, तर समाजातील अनेक समस्या सोडविण्यासाठी मदत होते. वेदनेशी नाते जोडून घेता यावे. सामाजिक संस्थांना आर्थिक सहयोगाबरोबरच सेवाभावी कार्यकर्त्यांची गरज असते. त्यामुळे ‘उमेद’सारख्या संस्थांना सर्वतोपरी सहयोग देण्याची भावना समाजातील दानशूर, संवेदनशील माणसांनी करायला हवी.”

रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, “मदतीचा हात देणारी अनेक माणसे समाजात आहेत. सेवा हे आपले कर्तव्य असून, अवतीभवतीच्या सुख-दुःखात प्रत्येकाने सहभागी व्हावे. समाजातील दुःखितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम स्नेहालय, उमेद फाउंडेशनसारख्या संस्था करीत आहेत.”

प्रास्ताविकात राकेश सणस यांनी उमेद फाऊंडेशनच्या बालक-पालक प्रकल्पासहित अन्य उपक्रमांची माहिती दिली. उमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. लीना देवरे यांनी आभार मानले. तत्पूर्वी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

उस्ताद अब्दुल करीम खाँ : प्रतिभेतून रागरूपाचा छाप पाडणारे चौमुखा गायक

‘किराना परंपरा’ कार्यक्रमात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा उलगडला सांगीतिक जीवनप्रवास

पुणे : किराना घराण्याला उच्चतम अवस्थेत नेऊन ठेवण्यात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे मोलाचे योगदान आहे. गायनात कोरडे पांडित्य नको तर रंग भरणे अपेक्षित आहे, असे मानणारे आणि अध्यात्माकडे नेणारे सूरमग्न गायन करणारे अंतर्मुख कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. माधुर्य व स्वरात रममाण होणे ही किराना घराण्याची परंपरा त्यांच्यामुळे प्रवाहित राहिली. तालासह खेळताना ठोस रूपात लयकारी दर्शविणारे, गाणे व जीवन यात भेद न करणारे व स्वत:च्या प्रतिभेतून रागरूपाचा छाप पाडणारे चौमुखा गायक म्हणून ते प्रसिद्‌ध होते.

अशा ख्यात गायकाचे वैशिष्ट्य उलगडले गेले ते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुल आयोजित ‘किराना परंपरा’ या कार्यक्रमात. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतील या विशेष मालिकेतील उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्यावर आधारित असलेला पहिला कार्यक्रम रविवारी (दि. १२) आयोजित करण्यात आला. यात शास्त्रीय संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जीवनप्रवास अभ्यासपूर्ण मांडणीतून उलगडला. स्वरमयी गुरुकुलच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीताच्या रसिकांसह अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

युवा अवस्थेत लढंत-भिडंत करणारे उस्ताद अब्दुल करीम खाँ सारंगी, बीन, तबला, पखवाज तसेच ताशा वादनातही निपुण होते. त्यांच्याकडे रागांचा असिमित संचय होता. परंतु परिपक्वता आणि कौटुंबिक कारणांमुळे ते विरक्तीकडे वळले. त्यानंतर त्यांचे गायन परमेश्र्वरचरणी समर्पित झाले. त्यांच्या गायनात हृदयाची तार छेडण्याची ताकद होती.

तानपुऱ्याच्या झंकारात विरघळून जाणारी सूरप्रधान गायकी, परमोच्च सुरेलपण तसेच सुरांच्या केंद्रबिंदूपर्यंत जात मध्य आणि तार सप्तकात सहज फिरत असणारा आवाज याने उस्ताद Aअब्दुल करीम खाँ यांचे गाणे दैवी बनले. खाँसाहेब यांनी कधीही अनैसर्गिक आवाज लावला नाही तर प्रचंड मेहनत व रियाजाने त्यांनी सुरांची सिद्‌धी प्राप्त केली. त्यांना जन्मजात मिळालेल्या आवाजाला रियाजाची जोड देत तानपुऱ्याच्या गुंजनात आपले गुंजन एकरूप करणे, गाताना केवळ ‘आ’कार न लावता काव्यातील स्वरव्यंजने, शब्द यावर जोर देत रियाज करणे आणि त्याविषयी प्रशिक्षण देणे याला त्यांनी प्राधान्य दिले.

कंठसाधनेवर विचार करत कुठल्या सुरांवर लक्ष केंद्रीत करायचे, कंठसाधना कशी करायची, रागाचा सखोल विचार कसा करायचा आणि यातून गायन जास्तीत जास्त प्रभावीपणे सादर करणे ही वैशिष्ट्ये जपत त्यांनी पुढील पिढीला देखील मार्गदर्शन केले.

उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या आवाज, प्रयोग, निषाद, तंबोरे, रागविचार/रागसंच, गायनशैली, बंदिश, उच्चार, लयताल विचार, आलाप, बीन अंग, ताना, सरगम अशा विविध वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकत रंगलेल्या या अभ्यासपूर्ण विवेचनात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी रागदारी संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दाखविलेले मनाचे खुलेपण, जाहीर जलसे, त्यांची स्वरलिपी, गायन पद्‌धती तसेच त्यांनी स्थापन केलेल्या आर्य संगीत विद्यालयाचे महत्त्व अशा अनेक अंगांनाही डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी स्पर्श करत विवेचन अधिकाधिक अभ्यासपूर्ण व रंजक केले.

विवेचनादरम्यान राग ललत, बिलावल, अभोगी, मारवा थाटाचा गौरी, जौनपुरी अंगाचा खट, बसंत, शुद्‌ध कल्याण आणि दरबारी कानडा या रागातील उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी गायलेल्या रचनांची झलक देखील ऐकविली.

उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी केलेले श्रुती संशोधन, निर्माण केलेली शिष्य परंपरा आणि गायकच नव्हे तर वादकांनाही दिलेले प्रशिक्षण अशा विविध पैलूंचा उलगडा या कार्यक्रमात करण्यात आला.

प्रास्ताविकात कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे उपक्रमाविषयी माहिती दिली. डॉ. प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या अश्विनी वळसंगकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

आजची द्रौपदी न्यायाकडे, सबलतेकडे जाणारी : डॉ. रघुनाथ माशेलकर

अशोक समेळ लिखित ‌‘द्रौपदी काल..आज..उद्या‌’ कादंबरीचे प्रकाशन

पुणे : ‌‘द्रौपदी काल..आज..उद्या‌’ ही केवळ एक साहित्यकृती नव्हे तर स्त्री शक्तीचे अखंड चिंतन आहे. स्त्रीच्या सामर्थ्याची, धैर्याची जीवंत प्रतिमा आहे. या साहित्यकृतीतून मनोरंजनासह सामाजिक संदेशही दिला गेला आहे. लेखकाने यातून समाजाला फक्त जागृतच नव्हे तर समृद्ध देखील केले आहे. यातील नायिका म्हणजेच द्रौपदी ही स्वयंभू, स्थितप्रज्ञ, कुशल, बुद्धिमान, प्रगल्भ, सहनशीलता आदी गुण दर्शविणारी महानायिका आहे. आजची द्रौपदी अन्यायाकडून न्यायाकडे जाणारी, दुर्बलतेकडून सबलतेकडे जाणारी आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मी अशोक समेळ लिखित ‌‘द्रौपदी काल..आज..उद्या‌’ या द्रौपदीची विविध रूपे उलगडणाऱ्या कादंबरीचे प्रकाशन आज (दि. 12) वैशाली माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्षपदावरून बोलत होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी समेळ, अंमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, प्रसिद्ध अभिनेते संग्राम समेळ मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

डॉ. रघुनाश माशेलकर म्हणाले, या साहित्यकृतीच्या मागे प्रचंड संशोधन, मेहनत आहे. ही साहित्यकृती वाचकांना सामाजिक संदेश देत समाजाला घडवू शकण्याचे सामर्थ्य असणारी आहे. आजची द्रौपदी राष्ट्रपती भवन, अंतराळ, रणांगण अशा सर्व ठिकाणी ठामपणे अस्तित्व दर्शवित आहे. अवकाशात एकटे राहणे हे आधुनिक द्रौपदीचे रूप आहे. या पुस्तकातून कालची द्रौपदी ओळखा, आजच्या द्रौपदीला सन्मान द्या आणि उद्याची द्रौपदी घडवा याचे समग्र दर्शन घडते.

लेखनाविषयी बोलताना अशोक समेळ म्हणाले, महाभारत घडविणारी स्त्रीशक्ती म्हणजेच अग्निशिखा हिच्याविषयी लिखाण करावे या हेतूने या कादंबरीची निर्मिती केली. महाभारताच्या आधीची द्रौपदी, वस्त्रहरणानंतर पांडवांचे षंढत्व नाकारणारी द्रौपदी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांना चेतवत राहिलेली द्रौपदी ही समाजात पतीव्रता म्हणून ओळखली जाते. तिच्यातील अनेक गुण आजच्या स्त्रीयांमध्ये देखील आहेत या विषयीही या कादंबरीत भाष्य केले आहे.

डॉ. अविनाश जोशी म्हणाले, महाभारत आणि रामायणातून समाजाला जगण्याची मूल्ये दर्शविली जातात. महाभारतातील एका स्त्रीशक्तीचा म्हणजेच द्रौपदीचा विलोभनीय प्रवास या कादंबरीतून साकारला आहे.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी 120 वर्षांची साहित्य परंपरा लाभलेल्या वास्तूत अशोक समेळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या कादंबरीचे प्रकाशन होत आहे याचा आनंद आहे, असे सांगितले.

मान्यवरांचा सत्कार ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांचे होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संजीवनी समेळ, श्रद्धा समेळ आणि संग्राम समेळ यांनी ‌‘द्रौपदी काल..आज.. उद्या‌’  या कादंबरीतील प्रसंगांचे प्रभावी अभिवाचन केले त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवस ३५ स्पर्धांचे आयोजन; मनोज एरंडे यांची माहिती
पुणे, ता. १२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ येत्या २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. या १५ दिवसीय महोत्सवात शहरभरातील विविध मैदानांवर एकूण ३५ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा विविध खेळांच्या असोसिएशनच्या मदतीने आयोजित करण्यात येणार आहेत.

महोत्सवाचे प्रमुख समन्वयक आणि छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे यांनी सांगितले की, “या क्रीडा महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय पारंपरिक खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांचा यात समावेश आहे.”

आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, स्विमिंग, बास्केटबॉल, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, पिकलबॉल, रोलबॉल, शूटिंग, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योग, स्क्वॅश यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष स्विमिंग आणि व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धा, तसेच ज्येष्ठांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्पर्धा सणस मैदान, टिळक तलाव मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बालेवाडी क्रीडा संकुल, स. प. महाविद्यालय, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन जिमखाना, खराडी आदी ठिकाणी होणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये २० ते २५ हजार खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. खेळाडूंनी आपल्या संबंधित खेळाच्या असोसिएशनकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक मनोज एरंडे (९८२२०४५१०१) यांच्याशी संपर्क साधावा.

दीपोत्सवानंतर खेलोत्सव
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “राष्ट्रीय क्रीडा दिनी खासदार क्रीडा महोत्सवाची घोषणा केल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दीपोत्सवानंतर खेलोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. खासदार क्रीडा महोत्सव हा देशातील प्रतिभावान युवा खेळाडूंचा शोध घेणारा उपक्रम आहे. या महोत्सवातूनच ऑलिंपिकसारख्या सर्वोच्च जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू घडतील.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक, सामाजिक समानतेची स्वप्नपूर्ती व्हावी – सरन्यायाधीश भूषण गवई

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

रत्नागिरी, दि. १२ मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल. जेणेकरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.

मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी  न्यायाधीश (क.स्तर) अमृता जोशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंत, सदस्य संग्राम देसाई, वकील संघाचे अध्यक्ष मिलींद लोखंडे, आमदार किरण सामंत, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आदी उपस्थित होते.

सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते कळ दाबून न्यायालय इमारत प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे तसेच म्युरलचे अनावरण करण्यात आले. यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. न्यायदान कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश श्रीमती जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आले. येथील ग्रंथालयाचेही उद्घाटन आणि पाहणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या समारंभात मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, आजचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. न्यायमूर्ती म्हणून मला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन आणि आजच्या मंडणगड न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन हे दोन्ही कार्यक्रम माझ्या २२ वर्षाच्या सेवेमधील महत्त्वाचे आहेत. अतिशय कमी वेळेत मंडणगड येथे न्यायालय सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मंडणगड न्यायालयाच्या भूमिपूजनाला आम्ही दोघे उपस्थित होतो आणि आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही आम्ही दोघे उपस्थित आहोत. हा गौरवाचा क्षण आहे. महाराष्ट्र शासन विशेषत: विधी व न्याय विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मी आभार मानतो, त्यांनी मला या इमारतीच्या उद्घाटनाची संधी दिली.

अवघ्या 20 दिवसात कोल्हापूर येथील जुन्या इमारतीचा कायापालट करुन खंडपीठ सुरु केले. नाशिक, नागपूर, मंडणगड येथील इमारती पहा. विविध तालुक्यातील न्यायालयांच्या इमारती, माझ्या दर्यापूर तालुक्यातील इमारत पहा. मी अभिमानाने सांगू शकतो, देशातील कुठल्याही तालुक्यामध्ये अशा तऱ्हेची न्यायालये असणार नाहीत. एवढ्या सुंदर इमारती देशातल्या कुठल्याही तालुक्यात असणार नाहीत. एवढ्या सुंदर इमारती महाराष्ट्र शासनाने उभ्या केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 8 ऑक्टोबर 2023 रोजी सरन्यायाधीश गवई आणि मी या न्यायालयाचे भूमिपूजन केले. दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिशय सुंदर इमारत उभी केली आहे. कोल्हापूरचे खंडपीठ झाले, सरन्यायाधीश गवईंच्या नेतृत्वात आणि सल्ल्याने हा प्रवास 2014 पासून सुरु झाला. न्यायालय आणि राज्य शासन यामध्ये दुवा म्हणून ते लक्ष देत आहेत. सातत्याने त्यांचे लक्ष राहीले होते. 2014 ते 2025 पर्यंत जवळपास दीडशे न्यायालये आणि इमारतींना मान्यता दिली आणि त्याचे काम सुरु केले. त्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या आहेत. याचे श्रेय सरन्यायाधीश गवई यांना जाते. सातत्याने राज्य शासनाबरोबर संवाद करुन आणि त्यातील अडचणी दूर करुन आमच्याकडून या सगळ्या गोष्टी करवून घेतल्या. मी वकील असल्यामुळे उपमुख्यमंत्री असताना विधी व न्याय हा विभाग माझ्याकडे मागून घेतला होता. उपमुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री असताना 29 वेगवेगळ्या न्यायालयीन पायाभूत सुविधांना मान्यता दिली.

चिपळूण न्यायालय इमारतीची केलेली मागणी तत्काळ मंजूर करु. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे येथील स्मारकाच्या आराखड्याला वेग देण्याचे काम करु, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंडणगडचे न्यायालय हे अतिशय महत्त्वाचे आहे. या न्यायालयामुळे चार-साडेचार लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती ठिकाण असणार आहे. यामुळे लोकांचा प्रवास, पैसा वाचणार आहे. ही केवळ इमारत नसून, लोकांकरिता न्यायदानाची एक गतीशील व्यवस्था तयार झाली आहे. याचे शंभर टक्के श्रेय सरन्यायाधीश गवई यांचे आहे. प्रलंबित खटले वेगांनी निकाली निघतील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सुंदर संविधान दिले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देखील आहे आणि प्रत्येकाला न्याय देखील आहे. राज्य शासन म्हणून  ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वंचिताना न्याय देण्यासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचले, त्यांचा पुर्णाकृती पुतळा या न्यायालयात आहे. न्यायाचे हे मंदिर आहे, घटनेचे मंदिर आहे. याची जाणीव हा पुतळा करुन देईल. या इमारतीचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील सरन्यायाधीशांच्या हस्ते झाले. यातून शासन विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभाग सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. आज या इमारतीसाठी काम करणाऱ्या कामगांराचा सरन्यायाधीशांच्या हस्ते सत्कार करुन ती पूर्ण झाली आहे. न्याय गावा-गावांमध्ये मिळाला पाहिजे, ही दूरदृष्टी सरन्यायाधीशांची आहे. सर्वसामान्यांमधले असामान्य कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व आणि भारतीय न्यायव्यवस्थेचे ते भूषण आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचविण्याचे काम न्यायालय करत असतं. म्हणून न्यायालयांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये आम्ही काटकसर करत नाही. या मंदिरातून सर्वसामान्यांना न्याय मिळून खटले लवकर निकाली निघतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, 40 हजार लोकवस्तीच्या गावात दिवाणी व फौजदारी न्यायालय असणारे देशात एकमेव मंडणगड असावे. खेड येथे सेशन कोर्टाला नवीन न्यायालय बांधावे, चिपळूण न्यायालयासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. आंबडवे गावच्या स्मारकाचा आराखडा तयार झाला आहे. तो पूर्ण करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पालक न्यायमूर्ती जामदार यांनी प्रास्ताविक केले. वकील संघाचे अध्यक्ष लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, संविधान उद्देशिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्जवलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास वकील, पक्षकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिबानी फतवा आक्षेपार्ह, भाजपाला भारताचा तालिबान करायचा आहे. .

माहिती अधिकार कायद्याला कमजोर करण्याचा डाव हाणून पाडा, आरटीआयच्या सक्षमीकरणासाठी आवाज उठवू: हर्षवर्धन सपकाळ

सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असताना शेतक-यांकडून फक्त ३ हजार ५०० रुपयांनी खरेदी

सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी हमीभावाने करावी, अन्यथा काँग्रेस मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.

मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०२५
लोकशाही शासन व्यवस्थेत जनतेला मुलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत. त्याचाच पुढचा विचार करुन काँग्रेसच्या डॉ. मनमोहनसिंह सरकारने जनतेला माहितीचा अधिकार कायदा दिला. या कायद्याने सरकारवर अंकुश ठेवण्यास मदत झाली, भ्रष्टाचार उघड झाले. परंतु २०१४ पासून केंद्रात आलेल्या भाजपाच्या मोदी सरकारने या कायद्यात बदल करून तो कमकुवत केला आहे. आता पुन्हा एकदा माहिती अधिकार कायदा सक्षम करण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्षे झाली आहेत, जनतेला दिलेल्या या महत्वाच्या कायदेशीर अधिकाराची धार मात्र भाजपा सरकार बोथट करत आहे. विचारलेली माहिती न देणे, माहिती अधिकार आयुक्तांची पदे रिक्त ठेवणे, वैयक्तीक माहिती आहे अशी सबब देऊन माहिती न देणे हे प्रकार सुरु आहेत. आता तर आरटीआयच्या कक्षेतून रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगालाही वगळले आहे. मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज न देणे, मतचोरीचा भांडोफोड होऊ नये वा नोटबंदी चा फज्जा उडाला अशा प्रकारची माहिती जनतेला मिळू नये यासाठी यात बदल केले आहेत. एकूणच सरकारी पातळीवर सुरु असलेली अनागोंदी, भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून माहिती अधिकार कायदा कमजोर केला आहे पण काँग्रेस पक्ष याविरोधात आवाज उठवून हा कायदा अधिक मजबूत असावा यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सपकाळ म्हणाले.
भाजपाला भारताचा तालिबान करायचा आहे..
तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिबानी फतवा भारतात काढणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. भाजपाला भारताचा तालिबान करायचा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत महिलांना सन्मानाने आमंत्रित केले जाते अशी मिश्किल टिप्पणीही सपकाळ यांनी यावेळी केली.
नथुराम व देवेंद्र फडणवीस
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजा-समाजात भांडणे लावत आहेत. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नितीचा ते अत्यंत थंड डोक्याने वापर करून समाजात भांडणे लावत आहेत. नथुरामने जसे अत्यंत थंड डोक्याने महात्मा गांधी यांचा खून केला. गांधींवर गोळ्या झाडण्यापूर्वी नथुराम त्यांच्या पाया पडला होता. देवेंद्र फडणवीसही थंड डोक्याने कृती करतात. यात फडणवीस व नथुराम यांची तुलना केलेली नाही तर दोघांची मोडस ऑपरेंडी एकच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
राज व उद्धव ठाकरे भेट
राज व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आम्ही भारत जोडोवाले आहेत, दोन भावाने एकत्र यावे किंवा किती वेळा भेटावे यावर काँग्रेसची काही आक्षेप व हरकत नाही. इंडिया आघाडीत कोणाला सहभागी करायचे याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यात दंगली घडवण्याचे षडयंत्र..
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, जातीय सलोखा बिघडवणारी विधाने करणाऱ्या टॉप १० लोकांमध्ये त्यांचाही सहभाग आहे, त्यांच्या पक्षाने त्यांना सज्जड दम दिलेला आहे पण मागील काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणीवपूर्वक काही घटना घडवल्या जात आहेत. राज्यातील शांतता भंग करून दंगली घडवण्याचे षडयंत्र यामागे आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करा..
सोयाबिनला ५४०० रुपये हमीभाव असताना बाजारात मात्र ३२०० ते ३७०० रुपये दराने खरेदी केले जात आहे, ही शेतकऱ्यांची फसवणूकच असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी नाहीतर सरकारनेच हमीभावाने शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. सरकारने जर हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केले तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

पुणे, दि.११: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयाचा धनादेश राजर्षि शाहू सहकारी बँकेच्यावतीने सुपूर्द करण्यात आला. पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले.

यावेळी राजर्षि शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, उपाध्यक्षा कमल व्यवहारे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे आदी उपस्थित होते.

राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्यशासनाच्यावतीने नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्याचे काम करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे. पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी यावेळी केले.
0000