Home Blog Page 343

निलेश घायवळच्या लवकरच आवळणार मुसक्या:डांगी आणि मुसा शेखला पकडले

इंटरपोल ची ब्लू कॉर्नर नोटीस

पुणे-पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात गुंड निलेश घायवळ च्या मुसक्या आवळण्याची तयारी केली असून आज त्यांनी पुण्यात घायवळ टोळीतील तेजस डांगी आणि मुसा शेख याला धाड टाकून पकडले . तर दुसरीकडे इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस घायवळ ची जारी झाली असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश येईल असा विशाव्स व्यक्त होतो आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’
दिनांक १५/१०/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२ पथकातील पोलीस निरीक्षक वाहीद पढ़ाण, पोलीस उप निरीक्षक गौरव देव, अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे दिलीप गोरे, अमोल राऊत, पवन भोसले, गणेश खरात, प्रशांत शिंदे असे पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच पाहिजे आरोपी व अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढून कारवाई करीता पेट्रोलिंग कामी छाप्यास लागणारे साहित्यासह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार अमोल घावटे यांना बातमी मिळाली की, राधीका मसाला शॉप समोर सार्वजनिक रोडवर एक इसम उभा असून त्याच्या हालचाली संशयीत आहेत. सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता एक इसम हा पाठीवर सँगबेंग असलेला कोणाचीतरी बाट पाहत काव-या बाव-या नजरेने इकडे तिकडे पाहत संशयितरीत्या उभा असल्याचा दिसला, त्याची व आमची नजरा नजर होताच तो आम्हांस पाहुन तो तेथुन निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी आम्हांला त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने सदर इसमास आहे त्या परिस्थितीत स्टाफच्या मदतीने रात्रौ ०३.१० वा. ताब्यात घेतले असता त्यांने त्याचे नाव व पत्ता-मुसा इलाही शेख वय ३५ वर्षे, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड पुणे असे असल्याचे मराठी भाषेत सांगितले त्यांनतर मुसाब इलाही शेख यास आम्हास पाहुन निघुन जाणेचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, तुम्ही मला पकडाल, या भितीने मी निघुन जात होतो. त्यानंतर सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता सदरचा इसम हा निलेश घायवळ टोळीतील सदस्य असुन तो कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५ बी.एन.एस. कलम १०९, ३५१. ३५२, १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), ३(५),१११ (२). ६१(२), ४९, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), २७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३). १३५, क्रिमिनिल लॉ अमेन्डमेंट कलम ३.७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (२).३ (२), ३(४) मधील WANTED आरोपी असल्याचे समजले.
मुसाब इलाही शेख हा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा हा अंमली पदार्थ स्वतःजवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचे ताब्यात ८७८ ग्रॅम गांजा एकुण किं. रु. १८.२६०/- चा ऐवज मिळून आला. गांजा बाबत विचारले असता त्याने सदरचा गांजा हा अंमली पदार्थ त्याचा मित्र नामे तेजस पुनमचंद डांगी रा. नन्हे पुणे याचेकडुन विक्री करीता आणलाअसल्याचे सांगितले. लागलीच तेजस पुनमचंद डांगी वय ३३ वर्षे, रा. रमाना सृष्टी फ्लॅट नं.बी ४०२ मानाजीनगर नऱ्हे पुणे यांस नमुद पत्यावरून ताब्यात घेण्यात आले.
आणि त्याच्या विरुद्ध सिहगड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४८१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii) (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचे आरोपी नाने मुसाब इलाही शेख, वय ३५ वर्ष रा.संत ज्ञानेश्वर कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड पुणे यास आज दिनांक १६/१०/२०२५ रोजी २५०/२०२५ बी.एन.एस. कलम १०९, ३५१, ३५२, १८९(१), १८९(२). १८५(४), १९०, १९१(२), ३(५).१११ (२), ६१(२). ४९, सह मोक्का या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.


दोन दिवसांत सोने ₹7,250 ने घसरले; या वर्षी सोने ₹1.27 लाखांवर गेले, ₹51,000 ने वाढले

नवी दिल्ली- -सोन्याच्या किमतींमध्ये सलग १५ व्या दिवशीही वाढ होत राहिली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत आज (१६ ऑक्टोबर) ५३३ रुपयांची वाढ झाली आणि त्याने ₹१,२७,२४७ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. काल ते ₹१,२६,७१४ रुपयांवर होते.

दरम्यान, सलग २० दिवसांच्या वाढीनंतर, आज दुसऱ्या दिवशी चांदीच्या किमती घसरत आहेत. गुरुवारी, चांदीच्या किमती ₹३,१५० ने घसरून ₹१,७०,८५० प्रति किलो झाल्या. काल, चांदीचा दर ₹१,७४,००० प्रति किलो होता. परिणामी, दोन दिवसांत चांदीचा दर ₹७,२५० ने घसरला आहे. यापूर्वी, मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी, चांदीने ₹१,७८,१०० चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

या वर्षी सोने ५१,०८५ रुपयांनी आणि चांदी ८४,८३३ रुपयांनी महागले

या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ₹५१,०८५ ने वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹७६,१६२ होती, जी आता ₹१,२७,२४७ वर पोहोचली आहे.

या काळात चांदीच्या किमतीतही ₹८४,८३३ ने वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक किलो चांदीची किंमत ₹८६,०१७ होती आणि आता ती ₹१,७०,८५० प्रति किलोग्रॅम झाली आहे.

सोन्याची किंमत १.५५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते

गोल्डमन सॅक्सच्या अलिकडच्या अहवालानुसार, बँकेने पुढील वर्षीपर्यंत सोन्याचे प्रति औंस ५,००० डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे. रुपयाच्या बाबतीत, सध्याच्या विनिमय दराने हे दर १० ग्रॅमला अंदाजे १,५५,००० रुपये असतील. ब्रोकरेज फर्म पीएल कॅपिटलचे संचालक संदीप रायचुरा म्हणाले की, सोने प्रति १० ग्रॅमला १,४४,००० रुपये मिळू शकते.

सोन्याच्या किमती वाढण्याची तीन प्रमुख कारणे

सणासुदीच्या काळात मागणी: दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जास्त किमतींमुळे सोने कमी असले तरी खरेदीची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.
भू-राजकीय तणाव: मध्य पूर्वेतील अशांततेमुळे आणि व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सोने खरेदी करत आहेत. अमेरिकेच्या धोरणांबद्दल अनिश्चितता आहे.
मध्यवर्ती बँक खरेदी: जगभरातील प्रमुख बँका डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, म्हणून ते त्यांच्या तिजोरीतील सोन्याचा वाटा सातत्याने वाढवत आहेत.
३ कारणांमुळे चांदीच्या किमती वाढत आहेत

दिवाळीसारख्या सणांमुळे सोन्याप्रमाणेच चांदीची मागणी वाढली आहे.
रुपया कमकुवत झाल्यामुळे चांदीच्या किमती वाढत आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनेलसारख्या उद्योगांमध्ये चांदीची मागणी वाढली आहे.
सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ नाही

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, या वर्षी सोन्याच्या किमतीत जवळजवळ ६०% वाढ झाली आहे, त्यामुळे अल्पावधीत आणखी वाढ होण्याची आशा कमी आहे. लोक नफा बुक करू शकतात. तथापि, दीर्घकाळासाठी त्यात गुंतवणूक केल्यास फायदे मिळू शकतात.

सोने खरेदी करताना या २ गोष्टी लक्षात ठेवा

१. फक्त प्रमाणित सोने खरेदी करा: नेहमी भारतीय मानक ब्युरो (BIS) चा हॉलमार्क असलेले प्रमाणित सोने खरेदी करा. हा क्रमांक अल्फान्यूमेरिक असू शकतो, जसे की AZ4524. हॉलमार्किंग सोन्याचे कॅरेटेज दर्शवते.

२. किंमत तपासा: खरेदीच्या दिवशी सोन्याचे अचूक वजन आणि त्याची किंमत अनेक स्त्रोतांकडून तपासा (जसे की इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट). सोन्याच्या किमती २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेटनुसार बदलतात.

शालेय कुस्ती स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रांचा वापरसंबंधित शाळा व विद्यार्थ्यावर कारवाई

पुणे, दि. 15 ऑक्टोबर: शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तर शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १९ व २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत बापूसाहेब आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे करण्यात आले होते.

सदर स्पर्धेदरम्यान कु. आर्यन विक्रम दाभाडे, वय १७ वर्षाखालील ग्रीको रोमन प्रकार, वजनगट ७१ कि. ग्रॅ., सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कु. माऊली राजेंद्र कचरे, इयत्ता १० वी, माध्यमिक विद्यालय खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे या खेळाडूच्या जन्म नोंद प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता.

ग्रामपंचायत वरूड, ता. भूम, जि. धाराशिव यांच्या अहवालानुसार कु. माऊली कचरे यांनी सादर केलेली जन्म नोंद माहिती चुकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार संबंधित खेळाडूस जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले असून, कु. आर्यन दाभाडे (१७ वर्षाखालील ग्रीको रोमन, ७१ कि. ग्रॅ.) यांना पुढील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार, शालेय क्रीडा स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित विद्यार्थी व शाळेविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात १० ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे, येरवडा, पुणे यांचेकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. शासनाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता व खेळातील नैतिकता जपली जावी, या उद्देशाने सदर कारवाई करण्यात आली आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यांमुळे गेला ५ वर्षात किती मृत्यू , किती जखमी आता सरकार काय करणार ? अजितदादांनी घेतलेले निर्णय वाचा

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश-उपमुख्यमंत्री अजित पवार

▪️ बिबट् प्रभावित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा

▪️ वनविभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

पुणे, दि. 15:
मानव – बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.
आज विधान भवन, पुणे त्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार अमोल कोल्हे, सर्वश्री आ. दिलीप वळसे पाटील,बापू पठारे,शरद सोनवणे, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर कटके, माजी खा. आढळराव पाटील, माजी आ. अतुल बेनके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, वनसंरक्षक आशिष ठाकरे, उप वनसंरक्षक प्रशांत खाडे, महादेव मोहिते यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कृषी,महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत 21 मृत्यू, 52 जखमी, 18 हजार जनावरांचा बळी
मागील पाच वर्षांत या भागात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे 21 नागरिकांचा मृत्यू, 52 जखमी तर सुमारे 18 हजार पाळीव जनावरांचा बळी गेला आहे. या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मानव-बिबट संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत नैसर्गिक आपत्तीचे रूप घेत आहे, असे बैठकीत नमूद करण्यात आले.
दिवसा वीजपुरवठा व तत्काळ उपाययोजना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड, दौंड तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले व पारनेर या तालुक्यांमध्ये दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या असून 31 ऑक्टोबर 2025 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
वनविभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी प्रस्ताव वनविभागाने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा आणि त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आल्या.
बिबट नसबंदी आणि स्थलांतरावर भर
बिबट्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदीबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वन विभागाच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या. तसेच बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थलांतर करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
पिंजरे खरेदीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर
बिबट पकडण्यासाठी आवश्यक पिंजरे खरेदी करण्यासाठी तातडीने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मदतीने संवेदनशील भागांमध्ये पकड मोहिमेला गती मिळेल.
शेतकऱ्यांना 100% अनुदानित सौर कुंपण देण्याचा निर्णय
संवेदनशील गावांतील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानित सौर कुंपण पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येईल. यासाठी मंत्री (वने) आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या उपस्थितीत चर्चा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
मेंढपाळांसाठी तंबू, सोलार लाईट पुरवठा
संघर्षप्रवण भागातील मेंढपाळांना तंबू, सोलार लाईट आदी साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मेंढपाळांना संरक्षण व प्रकाश व्यवस्था उपलब्ध होईल.
AI आधारित 50 नवीन युनिट्स
बिबट प्रवण क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आणखी 50 युनिट्स वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे बिबट हालचालींचे निरीक्षण अधिक कार्यक्षमतेने करता येईल.
शिरुर येथे रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याची सकारात्मक चर्चा
शिरुर येथे 200 बिबट्यांसाठी नवीन रेस्क्यू सेंटर सुरू करण्याबाबत केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच ग्रामस्तरावर जनजागृती मोहिमा राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.
मानव – बिबट् संघर्ष संघर्ष संपविण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून वन खात्यातून सेवा निवृत्त झालेले अनुभवी अधिकारी अशोक खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फटाक्यांमुळे गेल्यावर्षी तब्बल ६० आगीच्या दुर्घटना: अग्निशामक दलाने आठवण देत केले पुण्याला सावधान

अनधिकृत स्टॉलला विरोध करा …फटाक्यांपासून सावधान …!
सुरक्षित आणि आनंदी दिवाळीसाठी पुणे अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन
शहरभर अग्निशमन दलाची जनजागृती मोहीम सुरूः फटाके विक्रेत्यांनाही सूचना
पुणे-दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. परंतु या सणात निष्काळजीपणे फटाके फोडल्यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. २०२१ मध्ये २१, २०२२ मध्ये १९, २०२३ मध्ये ३५ आणि २०२४ मध्ये तब्बल ६० फटाक्यांशी संबंधित आग लागण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यंदा विशेष “फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम” सुरू केली आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवली जात असून नागरिकांमध्ये सुरक्षितते बाबत जागरूकता निर्माण करणे आणि आग अपघातांना आळा घालणे हे उद्दिष्ट आहे. शहरातील सर्व २३ अग्निशमन केंद्रांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत आहेत व मेगा फोनद्वारे जन जागृती संदेश दिले जात आहेत.
देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दिवाळी चा आनंद टिकवून सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा आहे. निष्काळजीपणा टाळला तर प्रत्येक घरात प्रकाश आणि आनंद राहील. आम्ही ही दिवाळी ‘सुरक्षित दिवाळी’ म्हणून साजरी व्हावी, अशी अपेक्षा ठेवतो.”
अग्निशमन विभागाचे नागरिकांना मार्गदर्शन :
१) फटाके नेहमी मोकळ्या जागेतच फोडावेत. गर्दीच्या भागात, इमारती जवळ किंवा वाहनां जवळ फटाके फोडू नयेत.
२) लहान मुलांना एकटे फटाके फोडू देऊ नयेत. त्यांच्या जवळ मोठ्यांचा देखरेख आवश्यक आहे.
३) फटाके हातात धरून पेटवू नयेत. अर्धवट फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
४) नायलॉन वाले कपडे वापरू नयेत; सूती कपडे वापरावेत.
५) पेटते दिवे, मेणबत्त्या आणि अगरबत्त्या फटाक्यांच्या जवळ ठेवू नयेत.
६) फटाके फोडताना किमान पाच मीटर अंतरा वर उभे राहावे.
७) ज्वलनशील द्रव्ये, गॅस सिलिंडर, वाहनं वा विजेच्या तारा यांच्या जवळ फटाके फोडू नयेत.
८) फटाक्यांचा साठा घरात, वाहनात किंवा तळमजल्यात ठेवू नये. विक्रेत्यांनी साठा ठेवताना अग्निशमन परवानगी घेणे आवश्यक आहे.
९) फटाके विक्री केंद्रात अग्निशामक यंत्र (fire extinguisher) ठेवणे बंधनकारक आहे.
१०) प्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो “ग्रीन फटाके” वापरावेत.
११) फटाके संपल्यावर परिसरस्वच्छ ठेवावा.
१२) आग लागल्यास तत्काळ पाण्याने वा वाळू ने आग विझवावी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
अग्निशमन दलाची विशेष तयारी :
शहरातील सर्व 23 अग्निशमन केंद्रे आणि पथके २४४७ सतर्क असून या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत.

फटाके स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत जन जागृती करत आहेत.
नियंत्रण कक्ष सतत कार्यरत असून अधिकारी नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणार आहेत.फटाके विक्रेत्यांना आणि नागरिकांना लेखी व मौखिक सूचना देण्यात येत आहेत.


मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांचे नागरिकांना आवाहन :
“दिवाळी सणाचा आनंद सुरक्षितते सोबत साजरा करावा, निष्काळजी पणा टाळा, मुलांवर लक्ष ठेवा आणि पर्यावरण पूरक फटाके वापरा. कुठेही आग लागल्यास विलंब न लावता लगेच अग्निशमन विभागाशी दूरध्वनी १०१ या क्रमांक किंवा आपल्या नजीकच्या अग्रिशमन केंद्राशी संपर्क साधा. आनंदी दिवाळी सुरक्षितपणे हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.”


आपत्कालीन संपर्क क्रमांक:
१०१/०२०-२६४५१७०७/९६८९९३५५५६

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला

बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानातील माध्यमांनुसार, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी राजधानी काबूल आणि स्पिन बोल्दाक येथे बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोक मारले गेल्याचे वृत्त आहे.

प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्ताननेही पाकिस्तानातील पेशावरमध्ये ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एका प्लाझामधील एका खोलीला लक्ष्य करण्यात आले. गुप्तचर कारवायांसाठी त्याचा वापर गुप्त कार्यालय म्हणून केला जात असल्याचा दावा केला जात आहे.

या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही युद्धबंदी बुधवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता लागू झाली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की दोन्ही देश संवादाद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील.पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानातील कंधार भागात हल्ले केले. लष्कराने म्हटले आहे की:

“आम्ही अफगाण तालिबानच्या हल्ल्यांना त्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. त्यांचे मुख्य तळ उद्ध्वस्त झाले आहेत.

या हल्ल्यांमध्ये कंधार प्रांतातील तालिबानची चौथी बटालियन आणि सहावी बॉर्डर ब्रिगेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

अनेक तालिबानी लढाऊ आणि परदेशी मारले गेले. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांचे सैन्य कोणत्याही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देईल. अफगाण तालिबानने हे दावे फेटाळले आहेत, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

88 वर्षीय ज्येष्ठाची 19 लाखांची फसवणूक

पुणे – सायबर चोरट्यांनी अटक करण्याची भीती दाखवून एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला ९ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. ‘नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने ५३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, त्यात तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. तुमच्या बँक खात्याची तपासणी करायची आहे आणि या प्रकरणात तुम्हाला अटक केली जाईल,’ अशी भीती त्यांना दाखवण्यात आली.

या धमक्यांमुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख ८० हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता, त्यांना संशय आला. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

RSS विरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

केरळमधील इंजिनिअर आंनदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करा.

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२५

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग होत जोरदार घोषणाबाजी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध केला. या आंदोलनाची भनक लागताच पोलिसांनी सकाळपासूनच टिळक भवनला वेढा घातला होता. टिळक भवनला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही युवक काँग्रेसच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. तासभर चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विकृत चेहरा या प्रकरणातून समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

“लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असताना भाजपा सरकारने मात्र पोलिसांना पुढे करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही धिक्कार करतो. केरळमधील इंजिनिअर आनंदू अजि यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा करावी”, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांनी यावेळी केली.

मुख्य रस्त्यांप्रमाणे गल्लीबोळांचे देखील डांबरीकरण त्वरित सुरु करा’– संदीप खर्डेकर

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना शहरातील गल्लीबोळांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पाठवलेल्या पत्रात, मुख्य रस्त्यांसोबतच दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आणि कामगारवर्ग रोज वापरत असलेल्या उपरस्त्यांचीही दुरवस्था लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.

खर्डेकर यांनी नमूद केले की, पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्ग गुळगुळीत करण्याची तयारी सुरू असली तरी कर नियमित भरणाऱ्या सामान्य पुणेकरांच्या वापरातील गल्लीबोळांकडे दुर्लक्ष होते आहे. मॉन्सून परतल्यानंतर रस्ते दुरुस्तीला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे खड्डेमुक्ती आणि डांबरीकरण तातडीने सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे.पत्रात पुढे सांगितले आहे की, शहरात खड्डेयुक्त व असमतोल रस्त्यांमुळे नागरिकांना कंबरदुखी-मानदुखीचा त्रास वाढतो आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज झाकणं रस्त्याच्या समपातळीला नसल्याने अपघातांचा धोका निर्माण होतो. क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डे असलेल्या रस्त्यांची यादी तत्काळ तयार करून, त्या रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार याची सार्वजनिक माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

बालभारती ते पौड फाटा रस्ता सर्वोच्च न्यायालयाने उठविली स्थगिती,आचारसंहितेपूर्वी काम सुरु करण्याची केसकर, कुलकर्णींची मागणी

पौड फाटा ते बालभारती हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होता.रस्त्याला विरोध करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या काही भूमिका असतात त्याबद्दल आम्हाला आदर आहे.प्रसंगी आम्ही त्यांच्याशी संघर्षही केला.लोकशाही आहे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केलेली फेटाळून लावली.मुंबई उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळली होती त्यानंतर याचिका करणाऱ्याने CEC कडे देखील अपील केले.CEC कडे अधिकार नसताना त्यांनी सुनावणी घेतली, त्यालाही आम्ही विरोध केला होता.आमची महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे environment clearance certificate त्वरित प्राप्त करून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे.मागच्या वेळेला स्थगिती नसताना देखील दबावाखाली महानगरपालिका प्रशासनाने काम सुरू केले नव्हते नवीन आयुक्तांनी तातडीने याबाबत प्रशासनाला आदेश देऊन पुढील प्रक्रिया निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी करावी. :उज्ज्वल केसकर-माजी विरोधी पक्ष नेता,सुहास कुलकर्णी-माजी विरोधी पक्षनेता

पुणे-बालभारती पौड रोडला जोडणाऱ्या वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला महापालिकेने पर्यावरण परवानगी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या मार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बालभारती ते पौड रस्त्यादरम्यानचा सुमारे दोन ते सव्वादोन किलोमीटरचा रस्ता भांडारकर संस्थेजवळील टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला आक्षेप घेत काही सामाजिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीश भूषण गवई आणि विनोद चंद्र यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे बराच विलंब झाला आहे.
यामुळे प्रकल्पाचा खर्च देखील काही पटीत वाढला आहे, ही बाब महालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महापालिकेने याकामासाठी इन्व्हायर्न्मेंट क्लिअरन्स घ्यावा आणि त्यानंतर काम करावे असे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली. न्यायालयाची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील समजू शकेल असे त्या म्हणाल्या. महापालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ऍड. अभिजीत कुलकर्णी, ऍड. राहुल गर्ग, ऍड. धवल मल्होत्रा आणि ऍड. निशा चव्हाण यांनी काम पाहिले. डॉ. सुषमा दाते आणि आय एल एस विधी महाविद्यालय या प्रकरणी न्यायालयात गेले होते.
प्रकल्पाबद्दल आक्षेप आणि न्यायालयीन वाद

पर्यावरणीय चिंता : रस्ता वेताळ टेकडीच्या हरित पट्ट्यातून जातो, ज्यामुळे झाडे तोडली जातील अशी भीती आहे.

  1. पर्यावरणवादी संघटनांचा विरोध : नागरी चेतना मंच, सुषमा दाते आणि इतर पर्यावरणप्रेमींनी यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
  2. सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (CEC) ने ‘हा भाग Deemed Forest मध्ये मोडतो’ असे निरीक्षण दिले आणि बांधकाम थांबविण्याची सूचना केली.
  3. पुणे महापालिकेचा दावा : रस्ता वेताळ टेकडीला विना बाधक पद्धतीने आणि फ्लायओव्हर तंत्राने बांधण्यात येईल, त्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही.
    आक्षेप -.वेताळ टेकडीतील झाडे, जैवविविधता आणि भूजल पातळीवर परिणाम होईल.

’डोंगर फोडून रस्ता’ केल्यास पर्यावरणीय समतोल बिघडेल.

विद्यमान रस्त्यांचे सुयोग्य नियोजन केल्यास हा नवीन रस्ता आवश्यक नाही

प्रकल्पाचे फायदे

एफ.सी. रोड, गणेशखिंड रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.

कोथरूड-शिवाजीनगर प्रवासात वेळ वाचेल (सुमारे 20-25 मिनिटांची बचत).

शिवाजीनगर आणि चांदणी चौक-पुणे सेंट्रल दरम्यान वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

प्रकल्पाचा सारांश सविस्तर माहिती-

रस्त्याचे नाव बालभारती ते पौड फाटा रस्ता

अंतर सुमारे 2.1 ते 2.3 किमी रुंदी अंदाजे 30 मीटर

एमएनजीएलतर्फे दीपावली सुरक्षा जनजागृती अभियान

पुणे: सुरक्षित आणि आनंददायी दीपावली साजरी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख निवासी सोसायटींमध्ये piped natural gas (PNG) सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान राबवले. यामध्ये अरिस्टोरिया अपार्टमेंट्स, हडपसर; गंगा कॉन्स्टेला, खराडी; आणि ऑस्टिन काउंटी, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश होता.

या उपक्रमाचा उद्देश घरगुती PNG सुरक्षितपणे वापरणे आणि दिवाळी काळात घ्यावयाची विशेष सुरक्षितता उपायांची माहिती देणे हा होता. MNGLच्या ऑफिसर्सनी गॅस लीक ओळखणे, आपत्कालीन प्रतिसाद, आइसोलेशन व्हॉल्व्ह वापरणे, फायर एक्स्टिंग्विशर हाताळणे आणि प्राथमिक फायर सेफ्टी टिप्स याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच, स्थानीय लोकांना दीपावलीसाठी खास सुरक्षा सूचना दिल्या गेल्या. यामध्ये, MNGL पाईप, मीटर किंवा service regulator जवळ दिवे, मेणबत्त्या किंवा फटाके लावू नयेत, तसेच पाईप आणि मीटरवर काहीही ठेवू नये जे दिसण्यात अडथळा निर्माण करू शकते, जेणेकरून अपघात टाळता येईल. या जनजागृती कार्यक्रमात स्थानिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि घरगुती PNG सुरक्षिततेबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाल्याचे कौतुक केले.

“सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” यावर भर दिला गेला. “या दीपावली अभियानाद्वारे समुदायांना सुरक्षित, आनंददायी आणि जबाबदारीने सण साजरा करता यावा, यासाठी प्रयत्न राबवले जात आहेत.” अशी माहिती Fire & safety विभागाचे प्रमुख सागर वर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

कुसुमाकर शंकर जोशी यांचे निधन

पुणे- कुसुमाकर शंकर जोशी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री 1.30 वाजता अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमित करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. निगडी प्राधिकरण येथील जानकीबन सोसायटीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. तसेच अनेक वर्षे बजाज अ‍ॅटो कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. दैनिक प्रभातमधील संगणक विभाग प्रमुख दिपक पवार यांचे ते सासरे होत.

लोकमान्य नगरवासीयांचे आता प्रवीण दरेकरांनाही साकडे – पुनर्विकासातील स्थगिती उठवण्याची मागणी!

0

53 सोसायट्यांचा पुनर्विकास ठप्प – 700 नागरिकांच्या घराचे स्वप्न अधांतरी!

लोकमान्य नगर बचाव कृती समितीची प्रखर भूमिका, दरेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद!

पुणे – लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना निवेदन देण्यात आले. समितीने लोकमान्य नगरमधील पुनर्विकासावर लादण्यात आलेली स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी केली.

स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी काही बिल्डरधार्जिण्या व्यक्तींना हाताशी धरून 53 सोसायट्यांच्या पुनर्विकासास स्थगिती मिळवली, असा आरोप समितीने केला आहे. या निर्णयामुळे 700 पेक्षा अधिक कुटुंबांचे घराचे स्वप्न अधांतरी राहिले आहे. म्हाडातील काही अधिकाऱ्यांचीही यात मिलीभगत असल्याचा आरोप करण्यात आला.

पुनर्विकास प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने नागरिक संतप्त झाले असून, शेकडोंच्या संख्येने सुशिक्षित नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, म्हाडा कार्यालयाला घेराव घातला आणि आमदारांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री आणि म्हाडा उपाध्यक्षांना निवेदन देऊन, सह्यांची मोहीम राबवून निषेध नोंदविण्यात आला.

समितीने दरेकर यांच्यासमोर सांगितले की, 16 एकर परिसरातील 53 सोसायट्यांचा एकाच विकसकाद्वारे पुनर्विकास करणे अव्यवहार्य आहे. त्याऐवजी शासनाच्या 2022 च्या जीआरनुसार 2-3-4 इमारती एकत्र येऊन पुनर्विकास करीत आहेत, हे योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. काही सोसायट्यांनी म्हाडाला प्रीमियम स्वरूपात कोट्यवधी रुपये भरले असून, म्हाडाच्या निर्देशांचे पालन केले असल्याचेही स्पष्ट केले. प्रवीण दरेकर यांनी सर्व बाजू ऐकून घेतली, प्रश्न विचारून चर्चा केली व मुंबईत म्हाडा अधिकाऱ्यांसह समितीची बैठक घेऊन स्थगितीचा मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस गणेश सातपुते, हेमंत पाटील, सुनील कुसुरकर, डॉ. कपिल पाटील, मुकेश वैराट, अन्वय भोसले, कुणाल पाटील, वैभव ललवाणी, सारंग कुलकर्णी, शैलेश चौधरी, ज्योती गुजर आणि महेश महाले उपस्थित होते.

“आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी’ निघाली रॅली; युवक- युवती मोठ्या संख्येने सहभागी

पुणे दि. 15 : समाज कल्याण विभाग स्थापना दिन व व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी” या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती संभाजी मैदान ते शनिवारवाडा यादरम्यान हजारो युवक-युवतींच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली.

या रॅलीचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल स. भा. मडामे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळाचे विचार मासिक “कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा” याचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कल्याणयात्रा चे संपादक अमोल मडामे, होप व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. विजय मोरे, नशाबंदी मंडळाचे विभागीय संघटक प्रमुख ऍड. सुरेश सकटे, पुणे जिल्हा संघटक डॉ. फडके, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीला कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पथनाट्य सादरीकरणाचे कौतुक सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी केले. रॅलीच्या नियोजनात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती संसारे यांचा सत्कार सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.

रॅली छत्रपती संभाजी मैदान येथून सुरू होऊन पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून शनिवारवाड्यापर्यंत मार्गक्रमण करत पार पडली. रॅलीच्या अखेरीस शनिवारवाड्याच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्याकडून देण्यात आली.

यावेळी नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक व रॅलीचे संयोजक अमोल मडामे यांनी सांगितले की, “निर्व्यसनी तरुण पिढी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे प्रवृत्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले. सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “व्यसनमुक्त जीवनातूनच व्यक्तीचा उत्कर्ष साध्य होऊ शकतो आणि त्यातूनच समाजसेवा शक्य आहे.”

या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे विभागीय संघटक प्रमुख ऍड. सुरेश सकटे आणि पुणे जिल्हा संघटक डॉ. फडके यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड हेही उपस्थित होते.

27 वर्षांपासून न्यायालयाच्या चकरा मारून थकला,अखेर पुणे कोर्टाच्या इमारतीवरून उडी मारून संपला : ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे-पुण्यामध्ये न्याय व्यवस्थेतील विलंबामुळे हतबल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेली तब्बल 27 वर्षे कोर्टात खटला सुरू असतानाही न्याय मिळत नसल्याने नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव यांचा जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेला वाद पुणे जिल्हा न्यायालयात गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित होता. इतक्या दीर्घकाळ खटला चालूनही कोणताही निकाल लागत नसल्यामुळे ते अत्यंत निराश झाले होते. आज सकाळी (दि. 15 ऑक्टोबर) नामदेव जाधव न्यायालयात हजर झाले होते. काही वेळानंतर त्यांनी अचानक कोर्टाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्याय मिळण्यास होत असलेला विलंब आणि खटला दीर्घकाळ चालल्यामुळे जाधव मानसिक तणावाखाली होते. 27 वर्षांपासून न्यायालयाचे चक्कर मारूनही काही निर्णय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, आत्महत्येपूर्वी जाधव यांनी कोणती सुसाइड नोट लिहिली आहे का? याचाही शोध घेत आहेत.