Home Blog Page 332

महावितरणच्या झटपट योजनेचा उद्योजकांना लाभ

0

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२५:
घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीजवापर वाढविण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना राबविल्यामुळे राज्यातील ४,१६४ वीज ग्राहकांनी सुमारे एक महिन्यात २२ मेगावॅट क्षमता वाढवून घेतली. यामध्ये २४६० औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश असून दिवाळीपूर्वी मागणीनुसार उत्पादन वाढविण्यास त्यांना मदत झाली.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना अधिकाधिक सहजपणे सेवा मिळण्यासाठी प्रक्रियेत बदल करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार ‘इज ऑफ लिव्हिंग’च्या सूत्रानुसार महावितरणने वीज ग्राहकांसाठी मंजूर भार वाढविण्यासाठी (लोड एनहान्समेंट) एक स्वयंचलित व्यवस्था सुरू केली आहे.

या योजनेमध्ये ग्राहक घरबसल्या महावितरणच्या मोबाईल ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटवर अर्ज सादर करून आणि योग्य शुल्क भरून आपला मंजूर भार वाढवून घेऊ शकतात. ग्राहकाने शुल्क भरल्यानंतर ४८ तासात त्याला परवानगी असलेला मंजूर भार वाढवून दिला जातो.

महावितरणने ही सुविधा २६ सप्टेंबर रोजी सुरू केली. महिनाभरात राज्यातील ४,१६४ ग्राहकांनी नव्या सुविधेचा लाभ घेतला. त्यामध्ये सर्वाधिक २,४६० औद्योगिक वीज ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांची संख्या ९४२ असून ५०९ व्यावसायिक ग्राहकांनी सुविधेचा लाभ घेतला. याखेरीज २५३ अन्य ग्राहकांनाही लाभ झाला.

वीज ग्राहकांना महावितरणकडून कनेक्शन देताना त्यांच्या मागणीनुसार वीज वापराबाबतची क्षमता निश्चित केली जाते, त्याला मंजूर भार म्हणतात. औद्योगिक ग्राहकांना उत्पादनात वाढ होत असेल किंवा अधिक क्षमतेची यंत्र सामुग्री वापरायची असेल तर अधिक भार मंजूर करून घ्यावा लागतो. सामान्यतः घरगुती वीज ग्राहकांचा मंजूर भार दोन ते पाच किलोवॅट इतका असतो. ग्राहकांना एअर कंडिशनिंगसारख्या सुविधा बसविण्यासाठी भार वाढवून घ्यावा लागतो. महावितरणने सुरू केलेल्या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन सेवा उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या साडेतीन वर्षात वीज वितरण जाळे अधिक मजबूत केले आहे. तसेच ग्राहकांच्या वाढत्या गरजेनुसार वीज उपलब्ध होण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत. त्यामुळे महावितरण ग्राहकांच्या मागणीनुसार तातडीने अधिक भार मंजूर करू शकत आहे.

महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी १ जुलैपासून नवीन वीजदर रचना लागू झाली आहे. प्रथमच सर्व प्रवर्गातील वीज ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरासाठी दरामध्ये अतिरिक्त सवलतही देण्यात येत आहे. त्याचा लाभ घेऊन अनेक वीज ग्राहकांचा वीज वापर वाढला आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या कनेक्शनसाठीचा भार वाढवून घेणे उपयुक्त ठरत आहे.

खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ यशस्वीतेसाठी भाजपा नेते कार्यकर्ते एकत्रित बैठक…

पुणे- खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ यशस्वीतेसाठी भाजपा नेते कार्यकर्ते एकत्रित बैठक येथे संपन्न झाली.

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले कि,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ या संकल्पनेतून प्रेरित होऊन संपूर्ण देशभर ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ आयोजित केला जात आहे. त्याच अनुषंगाने पुणे शहरात २ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये आरोग्याची जाणीव निर्माण करणे, सामाजिक ऐक्य दृढ करणे आणि खेळांद्वारे एक सक्षम व निरोगी भारत घडवणे, हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. या खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे भाजपा मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यालयात सविस्तर नियोजन बैठक घेतली. या बैठकीदरम्यान भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. खरंतर खेळ हे विकास आणि संघभावनेचा पाया आहेत. त्यामुळे खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकात फिटनेसची सवय रुजवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडिया, फिट इंडिया’ या संकल्पनेला अनुसरून, पुणे लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध वयोगटांसाठी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणाईला निश्चितच प्रोत्साहन मिळेल, तसेच, उदयोन्मुख खेळाडूंना पुढे येण्याची संधी उपलब्ध होईल. या बैठकीस आमदार भीमराव तापकीर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, पुनीत जोशी, बापू मानकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोककलांच्या जतन संवर्धनासाठी समिती स्थापन करावी— उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर

राज्यातील लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

विधानभवनात लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि उपाययोजना” या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. चौरे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, सुशांत शेलार, लोककलावंत नंदेश उमप, डॉ. भावार्थ देखणे आणि खंडूराज गायकवाड उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला हा अमूल्य वारसा आहे. मात्र, या कलांना आधुनिक काळात आवश्यक ते प्रोत्साहन आणि संरक्षण मिळणे गरजेचे आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, सांस्कृतिक विभागाने लोककलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीमार्फत लोककलांचे सहंतीकरण, संकलन, तसेच लोककलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय स्थापनेचे काम हाती घेता येईल. तसेच विविध लोककला महोत्सव राज्यभरात व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजनही या समितीमार्फत करता येईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की, लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समितीची स्थापना आवश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाशी समन्वय साधून लोककला विषयक प्रमाणपत्र कोर्सेस राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच लोककलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत उपस्थित लोककला अभ्यासक लोककलावंतांनीही आपले विचार मांडले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांनाजात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार


मुंबई- राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या निर्णयानुसार आता मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच तत्पूर्वी त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.
तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील तरतूदीत सुधारणा करण्यात येईल. या अनुषंगानेही महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही दोन्ही अध्यादेश राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने काढण्यात येणार आहेत.

जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डरला ‘व्यवहार रद्द ‘ बाबत चे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

पुणे: जैन ट्रस्टच्या भूखंडाचा सुमारे २३० कोटींचा व्यवहार रद्द करण्याची पुण्यातील गोखले बिल्डर, जैन ट्रस्टने या दोघांनी तयारी दाखवली आहे. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीतील जैन ट्रस्ट (सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट) प्रकरणात राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेला जैसे थे आदेश ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविला आहे. तोवर या दोघांना आपल्या भूमिकेबाबत प्रतिज्ञा पत्र सादर करण्यास सांगितले आहे.त्यामुळे आता पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.हा व्यवहार वादग्रस्त ठरल्यानंतर जैन समाजाच्यावतीने धर्मादाय आयुक्तांकडे या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ट्रस्ट संबंधित अर्जदारांतर्फे अ‍ॅड. योगेश पांडे तर प्रतिवादी ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एलएलपीतर्फे अ‍ॅड. इशान कोल्हटकर आणि अ‍ॅड. एन. एस. आनंद उपस्थित होते. दोन्ही प्रतिवादींनी जैसे थे वाढविण्यास हरकत घेतली नाही. या दरम्यान, अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, लक्ष्मीकांत खाबिया, स्वप्निल गंगवाल, महावीर चौगुले आदी उपस्थित होते. जैन बोर्डिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी गोखले बिल्डरकडून हा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचा ई-मेल द्वारे कळवण्यात आले होते. त्यानंतर आता ट्रस्टच्यावतीनेही व्यवहार रद्द करण्यासही धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वकिलांनी दिली आहे. गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार असे सांगण्यात आले.
दरम्यान मॉडेल कॉलनीतील ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’मध्ये एक हजार ४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे.

सरहद संस्थेच्या वतीने ज्योतिरादित्य शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गुवाहाटी, आसाम येथे डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ

पुणे : यंदाचे वर्ष भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सरहद संस्थेच्या पुढाकाराने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून ईशान्य भारतविषयक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आणि आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नागालँड विद्यापीठाचे कुलपती डॉ. समुद्र गुप्त कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण सोमवार दि.03 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.15 वा. गुवाहाटी, आसाम येथील ईशान्य भारत विकास परिषद गुवाहाटी येथील सभागृहात करण्यात येणार आहे.
डॉ.भूपेन हजारिका आणि सरहद संस्थेचे त्यांच्या अंतिम काळात म्हणजेच 2008 ते 2011 सलोख्याचे संबंध तयार झाले होते. संगिताच्या माध्यमातून हिंसाचाराची तीव्रता कमी करता येते आणि माणूस हा केंद्रबिंदू मानून काम करण्यासाठी काही योजना आखण्यात आल्या होत्या. मुंबई आणि महाराष्ट्राला ते कर्मभूमी मानत असत.
हजारिका यांच्या मृत्यूनंतर 2012 पासून संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या मान्यतेने ईशान्य भारतातील राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणार्‍या व्यक्तींना महाराष्ट्राच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. 51,000 रूपये, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदा मागील पाच वर्षाचे पुरस्कार मणिपूरमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिजात नृत्य कलाकार लैश्राम मेमादेवी तसेच मिझोराममधील एल. आर. सायलो. अरूणाचल प्रदेश मधील प्रसिद्ध लेखक व प्रशासकीय अधिकारी येशे दोर्जी थोंगची मेघालयातील प्रसिद्ध इतिहासकार व भारतीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री प्रो. डेविड रीड सिमलीह, आसाममधील प्रसिद्ध प्रकाशक व संगीतकार तसेच आसामी साहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. सुरजा कांता हजारिका आणि प्रसिद्ध अभिनेत्री तसेच चित्रपट निर्मात्या रजनी बासूमतारी यांना देण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभही करण्यात येणार आहे. ही माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार, शैलेश वाडेकर तसेच समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि झाहीद भट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई

पुणे, दि. २८ ऑक्टोबर: राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत “महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार संबंधित विभागांमार्फत समन्वयाने कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राज्य परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी कळविल्यानुसार वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वापर व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम तसेच त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या कार्यक्षेत्रांमध्ये करण्यात येईल.
गुन्ह्यानुसार कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे. ▪ पहिला गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करणे. ▪ दुसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ६० दिवसांसाठी निलंबित करणे,तिसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना कायमस्वरूपी रद्द करणे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता न दाखवता तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

• १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन
• तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश

मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आदी उपस्थित होते. यावेळी ‘मुंबई क्लायमेट वीक’ च्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. विकसनशील देशांतील वातावरणीय बदल, अन्न व ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी तो प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे पार पडेल. त्याचबरोबर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, चित्रपट, कला, क्रीडा, आरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत उपक्रम, आणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राज्यांचे मुख्यमंत्री, विविध शहरांचे प्रतिनिधी, उद्योग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट विकच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच या उपक्रमाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई हवामान सप्ताह कृतीसह नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचे प्रदर्शन करतो. माननीय पंतप्रधानांनी ठरवलेल्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक दक्षिणेसाठी न्याय्य, नाविन्यपूर्ण, चांगल्या निधीसह हवामान भविष्य घडवण्यास मदत करण्यास तयार आहेत.
ग्लोबल साउथमधील वातावरणीय कृती आणि सहकार्य या क्षेत्रामधील भारताचे नेतृत्व सिद्ध करणारे मुंबई क्लायमेट वीक हे मोठे व्यासपीठ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईत पहिल्यांदाच “मुंबई क्लायमेट वीक” कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे.
यासाठी आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यवसायाला आणि जीवनाच्या सर्व स्तरांना हवामान बदलाच्या परिणामांविरुद्ध मोहिमेत सहभागी व्हावे लागणार आहे. तसेच त्यांना कृतींद्वारे बदल कसे कमी करायचे हे प्रत्यक्षात सांगावे लागणार आहे.

“मुंबई क्लायमेट वीक” कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बेंचमार्क देखील निश्चित करावे लागतील, हवामान बदलाच्या क्षेत्रात कृती करण्यासाठी काही ध्येये निश्चित करावी लागतील. त्यासाठी आजपासून कृती सुरू करूया असेही ते म्हणाले.

तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्ते मुंबई क्लायमेट वीकच्या व्यासपीठावर एकत्र येऊन वातावरणीय बदलावरच्या सर्वंकष आणि व्यवहार्य उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम भारत आणि विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचविणारा ठरेल, असेही ते म्हणाले.
मुंबई क्लायमेट वीकचा भर अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या तीन प्रमुख विषयांवर असेल. न्याय, नवोन्मेष आणि वित्तीय दृष्टीकोनातून हे विषय सखोलपणे मांडले जातील.

‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की, “मुंबई क्लायमेट वीक हा महाराष्ट्र आणि भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे. वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी लोकसहभागावर आधारित असे शाश्वत आणि समावेशक उपाय या परिषदेतील मंथनातून तयार होतील.”

या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असणार असून क्लायमेट ग्रुप, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिस्ट्यूट (इंडिया), एव्हरसोर्स, एचटी पारेख फाउंडेशन, युनिसेफ, शक्ती फाउंडेशन, रेनमॅटर फाउंडेशन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि राष्ट्रीय सेवा योजना यासारख्या संस्था यात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयातील यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे, प्रोजेक्ट मुंबईचे सल्लागार मंडळ सदस्य रिधम देसाई, जलज दाणी आदी यावेळी उपस्थित होते.

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी पुण्याहून ३०० विद्यार्थी निघणार मुंबईला

0

पुणे-मुंबईच्या नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी पुण्याहून ३ शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थी गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईकडे निघत आहेत. पुण्यातील एड्स बाधित मुलांचे संगोपन व शिक्षण करणारी मानव्य संस्था (४५ विद्यार्थी) तुळापुर वळूज येथील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ईश्वरपूरम संस्था (४५ विद्यार्थी) आणि निंबाळकर गुर्जरवाडी येथील सुमती बालवन शाळा (१५० विद्यार्थी) शिक्षक व स्वयंसेवकांसह गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी या तीन शाळांमधून सकाळी ६ वाजता वातानुकुलीत बसेस मधून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. एक्झिम इंटिग्रेटेड क्लब (EIC ट्रस्ट) यांचा सहयोग यासाठी लाभला आहे अशी माहिती या संकल्पनेचे जनक व बँकिंग तज्ञ शशांक वाघ आणि EIC ट्रस्टचे खजिनदार व या प्रकल्पाचे प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी दिली.

त्यांनी सांगितले की हे विद्यार्थी ८-९ वर्षांपासून १५ वर्षे वयोगटातील असून गरीब कुटुंबातील आहेत. एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्ग, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी समुद्र असे या विद्यार्थ्यांना दाखवून झाल्यानंतर दुपारी हे विद्यार्थी डी. वाय. पाटील स्टेडीयम मध्ये येतील. एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्ग, मुंबई, समुद्र, स्टेडीयम मध्ये क्रिकेट मॅच बघणे या सर्वांची अनुभूती हे विद्यार्थी प्रथमच घेणार आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की या सर्व विद्यार्थी व सोबतच्या शिक्षक व स्वयंसेवकांना सकाळी नाश्ता, दुपार व रात्रीचे भोजन तसेच स्टेडीयम मध्ये नाश्ता व कोल्ड ड्रिंक दिली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विशेष टी-शर्ट आणि टोपी देखील दिली जाणार आहे. भारतीय महिला खेळाडूंना चीअर अप करण्यासाठी या विद्यार्थ्यांसमवेत ढोल-लेझीम व शंख-ध्वनी पथक देखील नेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मॅच बघतानाचा विद्यार्थ्याचा फोटो त्याला भेट म्हणून दिला जाईल. यानिमित्त विशेष गाणे बसविण्यात आले असून त्याच्या तालावर स्टेडीयम मध्ये डान्स करीत हे विद्यार्थी भारतीय महिला खेळाडूंना प्रोत्साहन देतील असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी ‘बुक माय शो’ ने एकाच ब्लॉकमधील ३०० तिकिटे उपलब्ध करून दिलेली असून टी. व्ही. ऐवजी प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये तेदेखील मुंबईत जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच बघण्याचा आनंद मिळणार असल्यामुळे या विद्यार्थांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे असे शशांक वाघ आणि प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

‘पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा लोगो व जर्सी अनावरण समारंभ २९ ऑक्टोबरला

0

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या उपस्थितीत होणार संपन्न

पुणे, दि. २८: भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या (UCI लेव्हल २.२ स्टेज रेस) लोगो आणि जर्सी अनावरणाचा भव्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत द वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे बुधवार , २९ ऑक्टोबर २०२५ रोजी
सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे.

या समारंभात स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, तो भारताच्या सायकलिंग इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडा सचिवांसह भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा, तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी पंकज सिंग, मनिंदर पाल सिंग, मनजीत सिंग जी.के., आणि ओंकार सिंह हे मान्यवर उपस्थित राहतील.

आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष व UCI चे उपाध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल (मलेशिया) आणि UCI व्यवस्थापन समिती सदस्या युआन युआन (चीन) यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.

सुमारे १८० मिनिटे चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रायोजक, मीडिया प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघ आणि सायकलिंगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्यांनी सांगितले की पुणे ग्रँड टूर ही भारतातील पहिली जागतिक दर्जाची मल्टीस्टेज सायकलिंग स्पर्धा ठरणार असून, महाराष्ट्रातील निसर्गरम्य मार्गांवर होणाऱ्या या स्पर्धेतून राज्याची क्रीडा प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल.

डोंगरदऱ्यांतील कातकरी वस्तीतही उजळली दिवाळी

मुळशीतील ४५ कुटुंबांना फराळ, कपडे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप  

 पुणे ः दिवाळीचा फराळ, आकाशकंदील आणि फटाक्यांची आतषबाजी यांचा आनंद कधी फक्त दूरून पाहणाऱ्या कातकरी वस्तीत यंदा खऱ्या अर्थाने प्रकाश उतरला. शहरातील तरुणांच्या पुढाकारामुळे डोंगरदऱ्यांमधील या पाड्यावरही दिवाळीचा आनंद झळाळून उठला. पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कातकरी समाजातील शेतमजूर दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

गुरुवार पेठेतील वीर शिवराय तरुण मंडळ, येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ आणि अरण्येश्वर एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जय गणेश व्यासपीठाअंतर्गत मुळशी तालुक्यातील कळमशेत भागातील कातकरी पाड्यावरील ४५ कुटुंबांना दिवाळी फराळ, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे तसेच वह्या-पुस्तके आदी साहित्य देण्यात आले. या वेळी मंडळाचे किरण सोनिवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, अमित जाधव, सुधीर ढमाले, रवी जाधव, पीयूष शहा आणि मयूर सोनावणे उपस्थित होते.

किरण सोनिवाल म्हणाले, डोंगरदऱ्यांतील या कातकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमची दिवाळीही प्रकाशमान झाली. त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा आनंद शब्दात मावणार नाही. प्रत्येकाने आपल्या आनंदाचा थोडा वाटा समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवावा, हीच खरी दिवाळी. जय गणेश व्यासपीठांतर्गत दरवर्षी वंचितांना मदत करून दिवाळी साजरी केली जाते असेही त्यांनी सांगितले. 

रवींद्र धंगेकरांचा अमित शहांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता:मंत्री उदय सामंतांचा खुलासा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अपमान केला असल्याचे बोलले जात होते. यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा करत म्हटले की, कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही, असे धंगेकर म्हणाले होते. परंतु, आमिषाला ऐवजी अमित शहा असा अपभ्रंश झाला असल्याचे उदय सामंत म्हणाले.

पुण्यातील जैन समाजाच्या संदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्ये जाऊन जैन समाजाचा मुद्दा ऐकून घेतला असून त्यांची भूमिका धंगेकर साहेबांना पटली आहे. काही गोष्टी गैरसमजातून घडल्या असतील तर अशा गोष्टी भविष्यात घडू नये यासाठी चर्चा करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मला असे वाटते की आपण सगळ्यांनी यावर पडदा टाकावा. तसेच भाजपच्या नेत्यांचा अपमान करण्याचा रवींद्र धंगेकर यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली आहे. तसेच महायुतीला बाधक होईल असे काही आमच्याकडून होणार नाही.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, शासनाने जे निर्णय घेतले आहेत त्याची अंमलबजावणी झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या विषयावरून कॅबिनेट बैठकीत कुठलाही वाद झाला नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, एखादी वाईट गोष्ट झाली की भाजपच्या नेत्यांना दोष देण्याचे काम ते करतात. आगामी निवडणुका पाहता त्यांचे आरोप सुरू आहेत.

आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत विधान आम्ही कुठेही पाहिले नाही, की मुंबईत युती करून लढू आणि इतर ठिकाणी युती न करता लढू. तिन्ही नेते सक्षम आहेत आणि आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार. तसेच याबाबतीत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

जे राहुल गांधी करतात ते महाराष्ट्रात होत आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत जे राहुल गांधींनी केले, तिथे एक चित्रपट दाखवला तो यांनी मागच्या रांगेत बसून बघितला. आता ते मुंबईत तेच करत आहेत. यात नावीन्य काहीच नाही. तसेच यांनी कधी यादीच पाहिली नाही, त्यांनी कधी मतदारसंघात लक्षच दिले नाही, त्यामुळे यांना ही प्रोसेसच माहीत नाही, अशी टीका सामंत यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी :चक्क मुख्यमंत्र्यांवर आली मध्यस्थी करण्याची वेळ

मुंबई -राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व प्रशासनात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला. त्यावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना आजपर्यंत करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अद्याप त्यांच्या खात्यात पोहोचली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘तुम्ही सरकारकडून देण्यात आलेली मदत पोहोचली म्हणता, जिल्हाधिकारीही मदत दिली म्हणतात, पण प्रत्यक्षात शेतकरी मदत मिळाली नसल्याचा दावा करतात’, असे ते या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरताना म्हणाले. त्यावर प्रशासनाने पुन्हा एकदा ‘आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचल्याचा’ दावा केला.

यावरून मंत्री व प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. हा वाद वाढत असल्याचे पाहून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप केला. आतापर्यंत झालेल्या मदतीसंदर्भात आजच आढावा बैठक घ्या व शेतकऱ्यांपर्यंत किती मदत पोहोचली याची माहिती सादर करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतानाही त्यांनी आजच्या बैठकीत अतिवृष्टी व महापुरासंबंधी सरकारने घोषित केलेल्या पॅकेजचा आढावा घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी व महापुराशी संबंधित सरकारने घोषित केलेल्या पॅकेजचा आढावा घेतला. या प्रकरणी आतापर्यंत 8 गजार कोटी रीलिज झाले आहेत. त्यानुसार 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. सरकारने अजून 11 हजार कोटींना मान्यता दिली आहे. सरकार या प्रकरणी 90 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. उर्वरित 10 टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या देखील लवकरच सोडवण्यात येतील, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, Agristack पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. सरकारकडे त्यांची माहिती आधीपासून उपलब्ध असल्याने निधी थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. ही व्यवस्था प्रक्रियेला गती देणार असून, शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची किंवा सरकारी कार्यालयांची धावपळ करावी लागणार नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सरकारने घोषित केलेल्या मदतीचा वाटा पोहोचला का? हे पडताळून पाहण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी शिवसैनिक घरोघरी जाऊन फॅक्ट चेक करत असताना मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावरून वाद झाल्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

मारणे टोळीचा म्होरक्या रुपेश मारणे अखेर गजाआड

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती कठोर कारवाईची मागणी

कोथरूडमधील अभियंता मारहाण प्रकरणात पोलिसांना यश
पुणे – कुख्यात गजा मारणे टोळीचा मुख्य सदस्य रुपेश मारणे याला अखेर कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीदिनी कोथरूड परिसरात भाजपा कार्यकर्ते असलेले अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण करून तो नऊ महिन्यांपासून फरार होता. मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून गुप्त माहितीच्या आधारे त्याला जेरबंद करण्यात आले.ही घटना १९ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. शिवजयंतीनिमित्त कोथरूडमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना वाद झाला. या वादातून रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांनी जोग यांना बेदम मारहाण केली होती.

देवेंद्र जोग हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यकर्ते असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून रुपेशच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले होते, मात्र रुपेश फरार झाला होता.रुपेश मारणे हा गजा मारणे टोळीचा निकटवर्तीय असून, गजा मारणे तुरुंगात असल्याने टोळीची सर्व सूत्रे तोच हलवत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत मारहाण, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे आदी गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांच्या उपायुक्त (झोन-२) संभाजी कदम यांनी दिली.

फरारी रुपेश पोलिसांना सतत चकमा देत ठिकाण बदलत होता. त्याच्या अटकेसाठी कोथरूड पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सापळे रचले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून मुळशी तालुक्यातील आंदगाव परिसरात धाड टाकत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अटकेनंतर रुपेशकडून टोळीच्या इतर गुन्ह्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल असून, पुढील तपास सुरू आहे. या अटकेमुळे मारणे टोळीच्या कारवायांना लगाम बसणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले.

केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता:1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा

नवी दिल्ली-केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली, ज्यामुळे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वेतन आयोग १८ महिन्यांच्या आत त्यांच्या शिफारशी सादर करेल. त्यांच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि भत्त्यांचा आढावा घेईल.
आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढू शकतो?

मूळ पगारातील वाढीची रक्कम फिटमेंट फॅक्टर आणि डीए विलीनीकरणावर अवलंबून असते. ७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. ८ व्या वेतन आयोगात तो २.४६ असू शकतो.

प्रत्येक वेतन आयोगात महागाई भत्ता शून्यापासून सुरू होतो. कारण नवीन मूळ पगार महागाई लक्षात घेऊन आधीच वाढवलेला असतो. त्यानंतर, महागाई भत्ता पुन्हा हळूहळू वाढतो.

सध्या, डीए मूळ वेतनाच्या ५५% आहे. डीए रद्द केल्याने, एकूण पगारातील वाढ (बेसिक + डीए + एचआरए) थोडी कमी दिसू शकते, कारण ५५% डीए घटक काढून टाकला जाईल.

उदाहरण:

समजा तुम्ही लेव्हल ६ वर आहात आणि ७ व्या वेतन आयोगानुसार तुमचा सध्याचा पगार आहे:

मूळ वेतन: ₹३५,४००
डीए (५५%): ₹१९,४७०
एचआरए (मेट्रो, २७%): ₹९,५५८
एकूण पगार: ₹६४,४२८
जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट २.४६ लागू केले तर नवीन वेतन असे असेल:

नवीन मूळ वेतन: ₹३५,४०० x २.४६ = ₹८७,०८४
डीए: ०% (रीसेट)
HRA (27%): ₹87,084 x 27% = ₹23,513
एकूण पगार: ₹८७,०८४ + ₹२३,५१३ = ₹१,१०,५९७
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

ही एक गुणक संख्या आहे जी सध्याच्या मूळ पगाराने गुणली जाते आणि नवीन मूळ पगार मिळतो. वेतन आयोग महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन ते निश्चित करतो.

शेवटचे वेतन आयोग कधी स्थापन आणि लागू करण्यात आले?

पाचवा वेतन आयोग: एप्रिल १९९४ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. जानेवारी १९९७ मध्ये सरकारला अहवाल सादर करण्यात आला, परंतु १ जानेवारी १९९६ पासून शिफारसी लागू करण्यात आल्या. ५१ वेतनश्रेणी होत्या, परंतु त्या ३४ पर्यंत कमी करण्यात आल्या.
सहावा वेतन आयोग: २० ऑक्टोबर २००६ रोजी त्याची स्थापना करण्यात आली. हा अहवाल मार्च २००८ मध्ये तयार करून सरकारला सादर करण्यात आला. ऑगस्ट २००८ मध्ये हा अहवाल मंजूर करण्यात आला आणि १ जानेवारी २००६ पासून या शिफारसी लागू झाल्या.
७ वा वेतन आयोग: फेब्रुवारी २०१४ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली आणि मार्च २०१४ पर्यंत त्याच्या अटी अंतिम करण्यात आल्या. नोव्हेंबर २०१५ मध्ये अहवाल सादर करण्यात आला. जून २०१६ मध्ये सरकारने त्याला मान्यता दिली आणि १ जानेवारी २०१६ पासून या शिफारसी लागू झाल्या.