Home Blog Page 3293

नवभारताच्या निर्मितीसाठी शैक्षणिक संस्थांनी योगदान द्यावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

 

पुणे दि. 25: आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, या तरुणाईला मानवसंसाधनात परिवर्तीत करणे आवश्यक आहे. येत्या पाच वर्षात आपल्याला नवभारताची निर्मिती करावयाची असून या प्रक्रीयेत शैक्षणिक संस्थांची भूमीका महत्वाची आहे. शिक्षण संस्थांनी कौशल्यधारित शिक्षण देवून नवभारत निर्मितीत आपले योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

वारजे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहर देव, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाहक प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाहक प्रा. सुरेश तोडकर, प्रा.सौ. ज्योत्सना एकबोटे उपस्थित होते.

श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला देश सध्या संक्रमाणावस्थेतून जात आहे. आपल्या देशात तरुणाईची संख्या मोठी आहे. या तरूणाईला कौशल्याधारित शिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. आपला देश जगाचा मार्गदर्शक व्हावा असे आपले सर्वांचे स्वप्न आहे, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येत्या पाच वर्षात भ्रष्टाचार, अस्वच्छता अशा वाईट व्याधींपासून मुक्त असणारा देश आपल्याला घडवायचा आहे. यासाठी प्रत्येक देशवासीयांनी कोणती ना कोणती जबाबदारी उचलली पाहिजे.

माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कक्षा रुंदावल्या आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. नवभारत घडविण्यात शिक्षण क्षेत्राची महत्वाची भूमीका आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने आराखडा तयार केला आहे. त्यामाध्यमातून शासनाचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या राज्याला पहिल्या क्रमांकावर न्यायचे आहे. त्यासाठी राज्यातील 30 हजार शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. सरकारी शाळांबरोबरच खासगी शाळांतूनही दर्जेदार शिक्षण मिळावे ही सरकारची भूमीका आहे. त्यादृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत.

प्राथमिक शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केवळ पदवी देणारी शिक्षण संकुले उभी न राहता ज्ञान आणि संस्कार देणाऱ्या शिक्षण संस्था निर्माण होण्याची आवश्यकता आहे. गुणवत्ता राखण्याचे विद्यापीठांचे काम आहे, महाविद्यालये स्वायत्त असावीत. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच त्यामागची भूमीका आहे. पदव्यांबरोबरच रोजगार निर्मिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून‍ शिक्षण घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकले आहेत. येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यावर संस्थेचा भर असतो.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवाकर पारखी, हिरामण जगताप, शारदा हगवणे व रणजित हगवणे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहायता निधीʼसाठी 15 लाखांचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या ‘ज्ञानमयʼ रिसर्च जर्नलचे प्रकाशन, मॉडर्न शैक्षणिक संकुलच्या स्मरणिका, वेबसाईट आणि नूतन संकुलाचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. तर आभार प्रा. यशवंत कुलकर्णी  यांनी मानले.

समाजातील मरगळ दूर करण्यास उत्सव- महापौर मुक्ता टिळक

0

पुणे-गणेशोत्सव मंडळे हे सांस्कृतिक कार्यक्रम व देखाव्यांमधून सामाजिक संदेश देतात. त्याचा परिणामनिश्चितच समाजमनावर होतो. त्यामुळे शहराची परंपरा व सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा आलेख मोठा होत आहे. सातत्याने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणे हे अनेक मंडळांचे वैशिष्टय आहे. मंडळात जे पडेल ते काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते. म्हणूनच ते ख-या अर्थाने मॅनेजमेंट गुरु आहेत. उत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र आला, तरच समाजातील मरगळ दूर होईल, असे सांगत महापौर मुक्ता टिळक यांनी कार्यकर्त्यांसह नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप सोसायटीतर्फे २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या लोकमान्य महागणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केसरी वाडयातील लोकमान्य सभागृहात करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शैलेश टिळक, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, स्पर्धेचे परीक्षक पराग ठाकूर आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरुप होते. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे.
लोकमान्य महागणेशोत्सव स्पर्धेत सहकारनगरमधील अरण्येश्वर मित्रमंडळ गवळीवाडाने सर्वोकृष्ट मंडळाचे पारितोषिक पटकाविले. तर, गणेश पेठेतील काळभैवनाथ तरुण मंडळाने व्दितीय आणि येरवडयातील अष्टविनायक मित्र मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच सोसायटी विभागात चिंचवडमधील आनंदवन सोसायटीने प्रथम क्रमांक पटकाविला.

वर्षभर कार्यरत राहून समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या धनकवडीतील आदर्श मित्र मंडळासह हिंदमाता तरुण मंडळ, वीर शिवराज मंडळ, संयुक्त प्रसाद मंडळ, एस.के.एफ.चिंचवड, महाराष्ट्र तरुण मंडळ, पोटसुळ्या मारुती, शिवसम्राट मंडळ, धर्मवीर शंभूराजे मंडळ, अष्टविनायक मंडळ, भैरवनाथ तरुण मंडळ या मंडळांचा विशेष सन्मान करण्यात आला. सोसायटी विभागात समृद्धी सोसायटी आंबेगाव, आदर्शनगर गुलटेकडी, विशाल रेसिडेन्सी चाकण, विशाल पार्क चाकण आणि नवपिनाक सोसायटी औंध यांना गौरव पारितोषिके देण्यात आली.
शैलेश टिळक यावेळी म्हणाले, वाडा संस्कृती संपून आता फ्लॅट संस्कृती आली आहे. परंतु पुण्यामध्ये उत्सवाची जपणूक आजही होत असून त्यांना प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यंदा स्पर्धेमध्ये शहर व उपनगरांतील ७८ मंडळे आणि २७ सोसायटयांनी सहभाग घेतला होता. पुढील वर्षी हा आकडा नक्कीच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुशील जाधव म्हणाले, गणेशोत्सव मंडळे केवळ उत्सवापुरतेच नाही, तर वर्षभर कार्यरत असतात. त्यामुळे मंडळांच्याकडून लोकमान्य टिळकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले जात आहे. लोकमान्य सोसायटी ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असून नफ्यातील मोठा हिस्सा समाजाला देण्यासाठी प्रयत्नशील असते, असेही त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मानांच्या गणपतींची प्रतिष्ठापना …

0

पुणे- अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी,आणि त्यातही गणपती बाप्पा मोरया..चा जयघोष, ढोल-ताशा पथकांचा गजर आणि , गणेशभक्तांचा उत्साह, अशा चैतन्यपूर्ण वातावरणात गणेशमूर्तींच्या  मिरवणुकीनंतर पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.  

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना सांगली येथील संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते झाली. मंडळाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने 125 सुवासिनींनी गणपतीचे औक्षण केले. त्यापूर्वी सकाळी सव्वादहा वाजता उत्सव मंडपापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. हमालवाडा येथील नीलेश पार्सेकर यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतली गेली तेथून अप्पा बळवंत चौक, तांबडी जोगेश्वरी चौक, बुधवार चौक आणि लाल महाल या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात आले. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, आदिमाया ढोल-ताशापथक, नवीन मराठी शाळेचे लेझीमपथक आणि प्रभात बॅण्डपथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते.

शनिवार पेठ येथील गोखले मूर्तीकार यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतल्यानंतर ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची आढाव बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, शिवमुद्रा आणि ताल या ढोल-ताशा पथकांसह न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. पारंपरिक चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आली. मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षी व्यापारी समीर शहा यांच्या हस्ते  गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक गणपती चौकापासून सकाळी दहा वाजता सुरू होऊन लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये पोचली. महिलांचा सहभाग असलेले नादब्रह्म हे पथक मिरवणुकीच्या अग्रभागी  गर्जना, शिवगर्जना आणि गुरुजी प्रतिष्ठान या ढोल-ताशापथकांचा समावेश होता. उद्योजक सुकन शहा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव या मानाच्या चौथ्या गणपतीची प्रतिष्ठापना मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते त्यापूर्वी सकाळी दहा वाजता उत्सव मंडपापासून सुरू करण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा होता तर नूमवि, नादब्रह्म, श्री महादुर्गा आणि उगम या ढोल-ताशापथकांचा सहभाग होता.

गणेशोत्सव ही एक चळवळ…रोहित टिळक(व्हिडीओ)

0

पुणे- भाऊ रंगारी च्या विषयावर बोलताना लोकमान्य हे गणेश उत्सवाचे प्रणेते आहेत, पण आपण हे विसरतोय कि ,धार्मिक बाबीत ब्रिटीश सरकार काही ढवळाढवळ करत नाही हे लक्षात घेवून स्वराज्यासाठी चळवळ म्हणून लोकमान्यांनी गणेश उत्सव सुरु केला . असे आज रोहित टिळक यांनी मायमराठी शी बोलताना सांगितले; रोहित टिळक काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका .. आणि तत्पूर्वी मान्चा पाचवा गणपती म्हणून ख्याती असलेला लोकमान्यांच्या केसरीवाड्यातील गणपतीची प्रतिष्ठापना झलक हि पहा ….हा व्हिडीओ…

महापौरांनी मोडली परंपरा .. भाऊ रंगारीची मिरवणूक पहाच ही…(व्हिडीओ )

0

पुणे- प्रत्येक वर्षी गणेश प्रतीष्ठापने पूर्वी निघणाऱ्या भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीतील रथाचे सारथ्य महापौर करतात . यंदा मात्र महापौर तिकडे फिरकले नाहीत. हि परंपरा महापौर मुक्ता टिळक यांनी मोडली, असे सांगत भाऊ रंगारी ट्रस्टच्या सदस्यांनी आज मिरवणुकीनंतर नाराजी व्यक्त केली . पण भाऊ रंगारीची मिरवणूक शानदार निघाली . या मूर्तीचे आकर्षण भक्तांना खूप ..त्यामुळे मूर्तीचे फोटो टिपण्यासाठी गर्दी होत होती. मंडळाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी ,तसेच सुरज रेणुसे, भाऊ निकम ,अनंत कुसुरकर, परेश खांडके, प्रतिक जोशी, गणेश उरणकर, अॅड. मिलिंद पवार,मनोज वडनेरे,प्रा. वाल्मिक जगताप ,गुंडू गुप्ता,अमर निकम आदी कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध मिरवणुकीचे नियोजन केले. अनेक ढोल पथकांना या मिरवणुकीत सहभागी होण्याची इछ्या असते. आयत्यावेळेला अनेक जन घुसखोरी करतात . पण त्यांच्या इच्छेला मंडळाला नकार द्यावा लागतो.. या मिरवणुकीत अक्षरशः नाईलाजाने काही ढोल पथकांना मिरवणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. तब्बल क्रांतीची आणि १२६ वर्षाची ज्वाज्ल्य परंपरा असणाऱ्याया गणपतीची हि मिरवणूक पहाच ..
पहा  व्हिडी ओ

रोजगार मेळावा एक अभिनंदनीय उपक्रम- कुलसचिव डॉ. शाळीग्राम

0

पुणे- संवाद निर्माण झाला तर प्रगती होत असते. शासनाचे उपक्रम विविध घटकांमध्‍ये संवाद होऊन प्रगती व्‍हावी यासाठी आहेत. रोजगार मार्गदर्शन केंद्राच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेला रोजगार मेळावा हे त्‍याचेच प्रतीक  असून हा एक अभिनंदनीय उपक्रम आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले. प्रोगेसिव्‍ह एज्‍युकेशन सोसायटीच्‍या मॉडर्न महाविद्यालयात रोजगार मेळावा आयोजित करण्‍यात आला होता. त्‍यावेळी ते बोलत होते. मेळाव्‍यास कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपसंचालक शरद आंगणे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्राचार्य डॉ. संजय खरात, डॉ. प्रकाश दीक्षित, केंद्राच्‍या सहायक संचालिका अनुपमा पवार, डॉ. वर्षा बापट आदी उपस्थित होते.

डॉ. शाळीग्राम म्‍हणाले, तांत्रिक शिक्षणामुळे व्‍यवसायाच्‍या विविध संधी प्राप्‍त झाल्‍या आहेत. शैक्षणिक संस्‍था विद्यार्थ्‍यांवर संस्‍कार करुन त्‍यांना समाजात परत पाठवण्‍याचे काम करतात. उद्योजक हे ग्राहक आहेत. शिक्षण संस्‍थामधील मुलांचा पुढे कसा उपयोग करुन घ्‍यायचा हे ते ठरवतात. विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या कला-गुणांचा उपयोग करुन व्‍यक्तिमत्‍व विकास साधावा, असेही त्‍यांनी आवाहन केले.

कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपसंचालक शरद आंगणे यांनी केंद्राच्‍या विविध उपक्रमांची माहिती देऊन बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन केले. केंद्राच्‍या संकेतस्‍थळावर या योजनांची संपूर्ण माहिती असून रोजगार मेळाव्‍याबाबतही मार्गदर्शन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

केंद्राच्‍या सहायक संचालिका अनुपमा पवार यांनी रोजगारमेळाव्‍याचा उद्देश सांगितला. शिक्षण संस्‍था आणि केंद्राच्‍या संयुक्‍त विद्यमाने मेळावे यशस्‍वी होत असून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहे. त्‍यांनी स्‍कील इंडिया, स्‍टार्टअप इंडिया या योजनांचीही माहितीही दिली. प्राचार्य डॉ. संजय खरात यांचेही यावेळी समयोचित मार्गदर्शन झाले.  प्रास्‍ताविक डॉ. वर्षा बापट यांनी केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. मेळाव्‍यास 30 हून उद्योजक सहभागी झाले होते. या सर्वांना स्‍मृतिचिन्‍हे देऊन गौरवण्‍यात आले. आभारप्रदर्शन श्रध्‍दा अवसरे यांनी केले.  महाविद्यालय परिसरात महाराष्‍ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्‍या लोकराज्‍य मासिकाचा स्‍टॉल लावण्‍यात आला होता. या स्‍टॉललाही प्रमुख पाहुण्‍यांनी भेट देऊन पहाणी केली. जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी त्‍यांना लोकराज्‍य मासिकाचा अंक भेट दिला. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी विजय कानिटकर, श्री. तु. डगळे, मिलिंद भिंगारे, विशाल तामचीकर  आदी प्रयत्‍नशीलहोते.

बाप्पा मुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे : गणपती बाप्पाचा आम्हाला आशीर्वाद आहे. बाप्पा मला चांगले काम करण्याची प्रेरणा देतो त्यामुळे मी मनोभावे गणपतीची सेवा करत असतो. असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

 

गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी श्री गणेशाचे आगमन झाले. त्यांनतर ते बोलत होते.

श्री बापट म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आमच्याकडे गणेश मूर्तींचा संग्रह आहे. जवळपास ५०० हुन अधिक गणपती मी कार्यकर्त्यांना त्यांच्या देवाऱ्यात ठेवण्यासाठी दान केल्या आहेत. अजूनही आमच्याकडे १०० हुन अधिक गणेशमूर्ती आहेत.

 

आमच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. याकाळात नातेवाईक, मित्रपरिवार मनोभावे गणपतीची सेवा करतो.

गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी घडलो. त्यामुळे सामाजिक कार्य करतच मंत्री पदापर्यंत पोहचलो आहे.आजच्या दिवशी आमच्या हातून अधिकाधिक चांगले कार्य घडो एवढाच आशीर्वाद श्री गणरायाच्या चरणी मागितला. असेही ते म्हणाले.

२०० रुपयांची नवी नोट चलनात

0

पुणे-केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्याबरोबर २०० रुपयांची नवी नोट उद्या गणेशाच्या आगमनाबरोबर चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँकेनं देशवासीयांना २००च्या नोटेचं दर्शन घडवलं आहे.

सध्या १, २, ५, १०, २०, ५०, १००, ५०० आणि २००० या नऊ नोटा चलनात आहेत. आता, सुट्या पैशांचा प्रश्न सोडवण्याचं महत्त्वाचं काम करण्यासाठी २०० रुपयांची नोट उद्यापासून दाखल होतेय. नोटेतील सिक्युरिटी थ्रेडवर ‘भारत’ आणि ‘RBI’ असं लिहिलं आहे. नोट हलवल्यास या अक्षरांचा हिरवा रंग निळा होतो. तसंच, उजव्या बाजूला नोटेच्या खालच्या भागात रुपयाच्या चिन्हासह छापलेला २०० च्या अंकातही रंग बदलणारी शाई वापरण्यात आली आहे.

शाडूच्या गणेश मूर्ती साकारण्यासाठी 3 हजार ८२ विद्यार्थ्यांचा सहभाग ;गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद

0

पुणे– गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने सारसबागे जवळील सणस मैदानावर शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्ती साकारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार असून यामध्ये तब्बल 3 हजार 82 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

 

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. या रेकॉर्डमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 किलो मातीची पिशवी आणि 2 बिया त्यामध्ये टाकण्यासाठी देण्यात आल्या आहेत. तयार करण्यात आलेल्या मूर्ती विद्यार्थी घरी नेऊन प्राणप्रतिष्ठा करणार आहे, असे सांगण्यात आले आहे. पहिले रेकॉर्ड हाँगकाँगमधील 1082 गणपती बनवण्याचे होते ते मोडीत काढले. पुण्यातील रेकॉर्ड 1 तास 31मिनिट 3082 विद्यार्थी सहभागी झाले आहे.
तर यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहभागी झालेल्या काही विद्यार्थी संवाद साधत गप्पा देखील मारल्या. त्यानंतर या उपक्रमास सुरुवात झाली. तसेच आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागताला काही तास शिल्लक असताना या उपक्रमातून विद्यार्थीच्या कलागुणांना वाव देण्याचे काम या उपक्रमातून केल्याची भावना व्यक्त केली तर आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती साकारताना विद्यार्थ्याच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळाला.

कसबा गणपतीची 126 कलाकारांकडून आरती

0

 

 

 

पुणे-सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त आज पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीची आरती  126कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव शांततेत ,निर्विघ्नपणे आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून या कलावंताकडून कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक. स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ. पालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील  जेष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी राहुल सोलापूरकर मोहनकुमार भंडारी ,प्रवीण तरडे ,ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी,जयमाला काळे,अभिनेत्री पूजा पवार ,जादुगार विजय रघुवीर ,महेश टिळेकर ,बंडा  जोशी,वंदन नगरकर ,निकिता ओंबासे ,नीता दोंदे,मयूर लोणकर ,वैभव पगारे,राहुल लोहगावकर,विजय कोटस्थाने,योगेश वणवे,सुवदन आंग्रे ,कुणाल निंबाळकर ,प्रशांत बोगम ,शास्त्रीय गायक आनंद भाटे, कीर्ती गायकवाड, हरी आंबेकर, कल्याण गायकवाड, सुनील गोडबोले, राधा कुलकर्णी, राहुल बेलापूरकर,सचिन शिंदे ,प्रीती व्हिक्टर ,शार्दुल लिहिणे ,मयुरेश जोशी ,विनोद सातव ,सुनंदा काळूस्कर ,सुबोध चांदवडकर,शेखर गरुड,माणिक बजाज तसेच जुने – नवे कलाकार यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद -पुणे अध्यक्ष सुरेश देशमुख  यांच्यासह ,बालगंधर्व परिवार, लोककला -लावणी निर्माता व कलावंत संघ, नाट्य निर्माता संघ, ऑर्केस्ट्रा निर्माता संघ, रंग भूमी सेवक संघ ,नृत्य परिषद , साउंड लाईट जनरेटर असोसिशन आदी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

बांगड़ आणि सहानी यांचा सत्कार

0

पुणे-राम बांगड़(रक्ताचे नाते ट्रस्ट)व शामजी सहानी(उत्कृष्ट खेळाड़ू)यांचा सिध्दार्थ ग्रंथालयातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी सत्यश्री महाराज,कॅन्टो.बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला,ग्रंथपाल दिलीप भिकुले,विश्वनाथ सातपुते, विकास भांबुरे,अक्रम शेख,प्रशांत गांधी,विजय भोसले आदी उपस्थित होते.

गणपती बाप्पाचे आगमन झी युवा वर!!

0

सगळीकडे गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच झी युवा या वाहिनीच्या विविध मालिकांमध्ये गणपतीचे आगमन होणार आहे. फुलपाखरू, अंजली, जिंदगी नआऊट आणि गर्ल्स हॉस्टेल या मालिकांमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि त्यासाठी अगदी जय्यत तयारी सुरू आहे . फुलपाखरू मध्ये मानस च्या घरी गणपती येणार आहे आणि त्यासाठी सगळेच गणपतीच्या तयारीत मग्न झाले आहेत. अंजली मालिकेमध्ये हॉस्पिटल मध्ये गणपती बाप्पा येणार आहे. आणि संपूर्ण हॉस्पिटल परिवार मिलीं मिसळून आनंदाने गणपतीची भक्ती करणार आहेत. जिंदगी न आउट मध्ये सुद्धा सचिन च्या घरातील सर्वच मंडळी जोमाने तयारी करत आहेत. गर्ल्स हॉस्टेल मधील अनिष्ट टाळण्यासाठी सगळ्या मुली गणेशाच्या मूर्तीची स्थापना करणार आहेत.

 

गणेशोत्सवात सर्वच कलाकारांना सुट्टी देण्यात आली आहे. झी युवाच्या कलाकारांसाठी सुद्धा दोन्ही वेळच्या आरतीला घरी राहण्याचा आनंद देणे हे वाहिनीचे यामागचे उद्दिष्ट्य होते. अंजली मालिकेतील अंजली म्हणजेच सुरुची अडारकर म्हणाली. ” माझ्या घरी गणपती येत नाही पण आमच्या कुटुंबातील गणपतीसाठी, पहिल्या दिवशी आम्ही २१ उखडीच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवतो. थर्माकॉल किंवा पुठ्ठ्याचे डेकोरेशन न करता अगदी साध्या पद्धतीने गणपतीची आरास केली जाते. घरातचं उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रीक तोरणांनी सजावट करतो.”.  फुलपाखरू मालिकेतील वैदेही म्हणजेच ऋता दुर्गुळे म्हणाली कि, “घरात गणपती येणे या पेक्षा कोणतेच सुख नसते. आमचा गणपती ठाण्यात माझ्या काकांकडे येतो. २० जणांचे आमचे एकत्र कुटुंब त्या एका घरात राहते. सर्वजण अतिशय भक्तिभावाने गणपतीची पूजा करतो. गणपतीतमध्ये संपूर्ण कुटुंब गप्पा टप्पा करत संपूर्ण रात्र जागवतो. लालबाग च्या राजाची प्रतिकृती हे दुर्गुळे कुटुंबाच्या गणपतीचे वैशिष्ठ आहे   “. फुलपाखरूमधील मानस म्हणजेच यशोमान आपटे कडे सुद्धा दीड दिवसाचा गणपती येतो. “आम्ही अतिशय सुंदर तर्हेने गणपतीचा मखर सजवतो. आपटे कुटुंबाचा गणपती हा नेहमीच सजावटे साठी विले पार्ले मध्ये प्रसिद्ध आहे. “.  लव्ह लग्न लोचा या मालिकेतील विवेक सांगळे, समिहा सुळे, सिद्धी कारखानीस आणि श्रीकर पित्रे यांच्याकडे गणपती येतो तर गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुद्धा ध्यानलक्ष्मी म्हणजेच दीपश्री कडे गणपती येतो.

गोळवलकर विद्यालयाची प्रबोधन फेरी

0

पुणे, ता. २४ ः पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे आवाहन करित आज सकाळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  नवी पेठ परिसरात प्रबोधन फेरी काढली.
शाडू मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करा. पूजेसाठी लागणार्‍या पत्रीचा वापर टाळा. निर्माल्य नदीत टाकू नका. ध्वनी प्रदूषण करु नका आणि चिनी मालावर बहिष्कार टाका असे संदेश दिले.
लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला घेतली. शिक्षिका माधुरी ठकार यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरे गरण्याचे महत्व पटवून दिले. मुख्याध्यापीका कल्पना धालेवाडीकर, पर्यवेक्षक विकास दिग्रसकर यांनी मार्गदर्शन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

एफसी पुणे सिटी संघात जोनातन लुक्का करारबद्ध

0
पुणे: राजेश वाधवान समूह आणि ह्रितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने २०१७-१८ या मौसमासाठी ब्राझिलियन मध्यरक्षक जोनातन लुक्का याला पुन्हा करारबद्ध केले आहे.  एफसी पुणे सिटी संघाकडून २३ वर्षीय जोनातन लुक्का २०१६च्या मालिकेत १४ सामने खेळला आहे.
 
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, लुक्का हा उत्कृष्ट खेळाडू असून चाहत्यांचा देखील तो आवडतीचा खेळाडू आहे. गेल्या मौसमात तो प्रत्येक सामना शेवटच्या ९० मिनिटांपर्यंत खेळला आहे. 
युवा आणि प्रतिभाशाली जोनातनला एफसी पुणे सिटी संघातून खेळताना नेहमीच अगदी घरच्यासारखा वाटतं. कारण त्याला सर्व चाहत्यांचाही पाठिंबा मिळतो.  संघाचे पुरस्कर्ते यांचाही तो अतिशय आवडता आहे.  
 
ब्राझिलियन युवा खेळाडू जोनातन लुक्काने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्राझिलियन आंतरराष्ट्रीय क्लबमधून केली. त्यानंतर त्याचा समावेश एएस रोमा संघात झाला. त्यानंतर गिल्लारोस्सी संघाकडून तीन वर्षे खेळताना त्याने ३२ सामन्यांमध्ये ९ गोल केले.
 
यावेळी जोनातन लुक्का म्हणाला कि, एफसी पुणे सिटी संघाकडून  खेळताना माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अनुभव मिळत आलेला आहे. एफसी पुणे सिटी संघाने यावर्षीच्या मौसमात काही अतिशय दर्जेदार खेळाडू करारबद्ध केले आणि त्या सर्वांच्या साथीत खेळताना मला संस्मरणीय कालखंड अनुभवयाला मिळेल. ऑरेंज आर्मी मी पुन्हा येत आहे. 

आसाम, बिहारमधील पूरग्रस्तांसाठी पुण्यातून मदत गोळा करण्यास प्रारंभ

0

 

 

– उम्मती बैतुल माल आणि इतर संघटनांचा पुढाकार
– आर्थिक सहाय्य, ब्लँकेट आणि औषधांची मदत करणार

पुणे-
आसाम आणि बिहारमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी कोंढव्यातील बैतुल उलूम मदरसा आणि धार्मिक अभ्यासक मुफ्ती शाकिर यांनी पुढाकार घेतला असून, ‘उम्मती बैतुल माल’ या सामाजिक संघटना स्थापून मदतनिधी आणि सर्वप्रकारची आवश्यक मदत गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. ‘उमत चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अॅण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्स’ आणि ‘राबता फाउंडेशन’ यांचेही या कामी विशेष सहकार्य लाभत आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतून
मुफ्ती शाकिरयांनी दिली  ते म्हणाले,आसाम आणि बिहारला पुराचा प्रचंड तडाखा बसला असून, एकट्या बिहारमध्ये जवळपास एक कोटी नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यांचे फक्त संसारच उद्ध्वस्त झाले नसून, अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. अनेकांना अन्नपाण्यापासून वंचित रहावे लागत असून, जीवनावश्यक सोयीसुविधांचीही वानवा आहे.
‘पूरग्रस्त नागरिकांसाठी आम्ही ब्लँकेट्स, औषधे आणि रोख स्वरुपात मदतनिधी गोळा करीत आहोत. ही मदत योग्य आणि विश्वासार्ह सरकारी माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्यासाठी – उम्मत चॅरिटेबल ट्रस्टः मौलाना मुनीर – ७७६७०२७९९७- वक्फ प्रोटेक्शन अॅण्ड लिबरेशन टास्कफोर्सः सलीम मुल्ला – ९१५६६९६४५८- राबता फाउंडेशनः निहाल खान – ९९२३३७२१५३ यांना संपर्क साधावा असेही ते म्हणाले .आर्थिक मदत थेट जमा करण्यासाठी त्यांनी दिलेल्या खात्याची माहिती…
उम्मत एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आयसीआयसीआय बँक, कोंढवा शाखा
अकाउंट नंबर (खाते क्रमांक) – ००७४०५००५८३७, आयएफएससी (IFSC) कोडः ICICI०००००७४