Home Blog Page 3234

पुण्यातील २२५ वर्षे जुन्या सिटी चर्चचा मिरवणूक व ध्वजारोहाणाने आनंद सोहळा सुरु….

0

पुणे-नाना पेठेतील ओर्नेलाज हायस्कूल जवळील सिटी चर्चला ८ डिसेंबर २०१७ रोजी २२५ वर्षे
पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने आज दि २८ नोव्हेंबर २०१७ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन होण्यास
सुरुवात झाली. आज सायंकाळी ५ वाजता रस्ता पेठेतील होली एन्जल चर्च (कादर चौक )येथून मदर
मेरीच्या पुतळ्याची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी मुंबईचा सेंट फ्रान्सिस ब्यांड
होता.पाठोपाठ मदर मेरीचा पुतळा खांद्यावर घेतलेले स्वयंसेवक होते. पाठोपाठ सुमारे ५०० हून अधिक
ख्रिश्चन बांधव आणि भगिनी हातात प्ले कार्ड , ब्यानर, झेंडे घेऊन प्रार्थना म्हणत जात होते. रस्ता
पेठेतून एथेल गोर्डन कॉलेज – क़्वारटर गेट मार्गे ही शोभायात्रा सिटी चर्च येथे पोहोचली . मार्गावर ठीक
ठिकाणी फुलांचा वर्षाव करीत , फटाके वाजवत नागरिक शोभायात्रेचे स्वागत करीत होते. या शोभायात्रेत
सिटीचर्चचे प्रमुख फादर साल्व्हीडोर पिंटो ,विविध धर्मगुरू सहभागी झाले होते.
सिटीचर्च रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आले होते. तेथे पुणे धर्म प्रांताचे बिशप थोमस डाबरे
यांच्याकडे फादर पिंटो यांनी मदर मेरीचा पुतळा स्वाधीन केला. त्यानंतर बिशप डाबरे यांच्या हस्ते मदर
मेरींचे चिन्ह असणाऱ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर बिशप
डाबरे यांनी या चर्चच्या इतिहासाची माहिती देऊन म्हटले की, मदर मेरी ही येशू ख्रीस्तांची आई असून
त्यांनी साऱ्या समाजात चांगल्या संकृतीचा आणि विचारांचा संदेश रुजवला आहे,आपण भारतीय आपल्या
भूमीशी एकनिष्ठ राहून,येथील गोरगरीब जनतेसाठी काम करणे हा संस्कार त्यांच्या विचारांमुळेच
आपल्यात रुजला आहे
यानंतर सिटीचर्चमध्ये धार्मिक विधी करण्यात आले. ८ डिसेंबर पर्यंत तेथे रोज विविध धर्मगुरूंची
प्रवचने व अन्य कार्यक्रम होणार आहेत.या चर्चसाठी सन १७७४ मध्ये दुसर्या माधवराव पेशव्यांनी ४ एकर
जागा दिली व नाना फडणवीस यांनी पेशव्यांच्यावतीने आर्थिक मदत उपलब्ध केली आणि सन १७९२
मध्ये हे चर्च अस्तित्वात आले. आता ८ डिसेंबर रोजी पेशव्यांच्या वारसांचा सत्कार कृतज्ञता सोहळा
म्हणून केला जाणार आहे.

चिंचवडमधील इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची तात्काळ दुरूस्ती करा -राष्ट्रवादीचे अमित बच्छाव यांची आयुक्तांकडे मागणी

0
पिंपरी –
चिंचवड प्रभाग क्र.१० येथील इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या इमारतींची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
         त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटीचे वारे वाहत असल्याने पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर होईल, अशी सर्वांचीच भावना आहे. त्या अनुषंगाने शहरातील विवीध समस्या सोडविल्या जाणे गरजेचे आहे. वेळोवेळी शहरातील समस्यांचा पाठपुरावा करून देखिल महापालिका अधिकारी वर्गाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. असे विवीध प्रकरणांवरून नजरेस पडत आहे. विकास कामांच्या बाबतीत असणा-या विवीध समस्या सोडविणे शहर हिताचे आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव होऊ नये, अशी अपेक्षाही अमित बच्छाव यांनी व्यक्त केली.
         इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथिल नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्या इमारतींचे जिने तुटलेले असून,पावसाळ्यात टेरेस-भिंतींमधून पाणी झिरपत असते, इमारतींमधील शौचालयांचे पाईप्स तुटल्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे कचरा जमा करणेकामी पालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या घंटागाड्यांपैकी एकही घंटागाडी याठिकाणी आत्तापर्यंत आलेली नाही. त्यामुळे सोसायट्यांच्या सभाेवती कच-यांचे ढिग लागले आहेत. परिणामी रोगराई पसरत आहे. येथील शौचालयांचे ड्रेनज वारंवार जाम होउन मैला बाहेर येत असतो,त्यामुळे परिसरात दुर्गधी पसरुन लोकांना त्याचा त्रास होत आहे. म्हणून ड्रेनेज लाईन्स नविन टाकण्यात याव्यात.
         या भागात साचलेला कचरा, राडारोडा, डबक्यांमध्ये साचलेले घाण पाण्यामुळे या भागात डासांचा प्रादुभाव वाढला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साचुन डासोत्पती होत आहे. कचरा समस्या नेहमीचीच आहे. डास वाढल्यामुळे डेंगू, मलेरिया, अतिसार, ताप, सर्दी, खोकला व फ्ल्यू सारखे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार होत आहे.साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्याचे ठोस उपाय करावेत तथा या भागात वेळोवेळी किटक नाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. दर महिन्याला मनपाने ३-४ वेळा औषध फवारणी करावी.
         येथील इमारती/घरांपर्यंत पिण्याचे पाणी व वापराचे पाणी न पोचल्यामुळे नागरीकांना खुप दुरवरून पाणी आणण्यासाठी पायपिट करावी लागते. म्हणून तेथे असणा-या टाक्यांची दुरुस्ती करण्यात यावी. भटकी कुत्री/डुकरे तेथे असणा-या नागरीकांवर वेळोवेळी हल्ला करतात, भटकी कुत्री/डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा. त्याशिवाय इतर प्रभागातील आकर्षक बाकडय़ांप्रमाणे येथेही चौकात बाकडे बसविण्यात यावेत.
         इमारतींची डागडूजी, वॉटर प्रुफींग, जिन्यांची दुरूस्ती, शौचालयांचे तुटलेले पाईप्स बसविणे, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे. इमारतीची दुरूस्तीची मागणी वारंवार करून देखिल महापालिकेकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे आयुक्तांनी इंदिरानगर विभागास भेट देऊन नागरीकांच्या समस्या समजावून घ्याव्यात. तसेच या इमारती दुरूस्तीसाठी लवकरात-लवकर संबंधित विभागाला सुचना देण्यात याव्या, अशी विनंतीही अमित बच्छाव यांनी केली आहे.

सुभाष जगताप विरुद्ध पुन्हा घाटे आणि पोटे(मुख्य सभेतील सुंदोपसुंदी)-व्हिडीओ

0

पुणे- राष्ट्रवादीचे सुभाष जगताप आणि भाजपचे श्रीनाथ भिमाले यांची सभागृहात झालेली वादावादी -सुंदोपसुंदी या पूर्वी कधी तरी गाजली आहेच . अजूनही भिमाले यांची अधून मधून त्यांच्याशी शाब्दिक चकमक होते .पण आता हल्ली अलीकडे सुभाष जगताप यांच्या वक्तव्याला  भाजपचे नगरसेवक धनंजय घाटे आणि नगरसेवक पोटे यांच्याकडून कडाडून विरोध होताना दिसतो आहे कधी तरी तो टोकाला पोहोचतो . पण कॉंग्रेस चे नगरसेवक अरविंद शिंदे आणि स्वतः महापौर किंवा भिमाले हा प्रसंग शांततेत निभावून नेण्यात यशस्वी होतात .. असाच हा कालच्या मुख्य सभेतील प्रसंग …
विषय होता ..ठेकेदार रिंग प्रकरण , राष्ट्रवादीने त्यावर केलेलं आंदोलन आणि त्यानंतर सुभाष जगताप यांचे सुरु झालेले भाषण .. –पहा व्हिडीओ

ठेकेदाराकडे टक्केवारी मागणाऱ्या नगरसेवकाचा विषय पहा कसा गाजला (व्हिडीओ)

0

पुणे- पुण्यात चाललंय तरी काय ? ठेकेदाराला फोन करतात ,आणि १० टक्के दे तरच टेंडर भर असे सांगणाऱ्या नगरसेवकाच्या प्रकरणी महापौर चौकशी करा , त्यांच्या  गटनेत्यांपुढे त्यांना उभे करा असे बाबुराव चांदेरे यांनी म्हणताच महापालिकेच्या सभागृहात एकच गोंधळ उडाला .
या सभेत प्रारंभी राष्ट्रवादीने टेंडर प्रकरणी सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले . टेंडर भरताना रिंग होते असा आरोप केला , त्यानंतर पहा .. नेमके मुख्य सभेत काय कसे रंगले हे प्रकरण …

जनसेवेचे व्रत घेतलेल्या कार्यकर्त्यांची दखल नक्कीच घेतली जाईल -बापट (व्हिडीओ)

0

पुणे- जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून तळागाळातल्या ,आणि सर्व जनतेच्या ,लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी  सातत्याने प्रयत्नशील असलेल्या संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल भाजपा कडून निश्चित घेण्यात येते असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले .
राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुरु केलेल्या २४ तास जनसेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते . निंबाळकर तालीम चौकात हे २४ तास जनसेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे .. पहा याचा हा अल्पसा व्हिडीओ वृत्तांत …

महावितरणच्या ‘मानव संसाधना’ला लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड कार्यकारी संचालक श्री. सचिन ढोले यांची माहिती

0

पुणे: महावितरणमधील मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापन लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वतंत्र प्रणालीद्वारे सुरु होणार आहे अशी माहिती महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. सचिन ढोले (मुंबई) यांनी दिली.

रास्तापेठ येथे मानव संसाधन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. 27) आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. विजय भाटकर, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र म्हंकाळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर आदींची उपस्थिती होती.

कार्यकारी संचालक श्री. सचिन ढोले म्हणाले, की स्वतंत्र प्रणालीमध्ये महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती सहजतेने उपलब्ध असेल व त्यात आवश्यक बदलही सूचवता येईल. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सेवांमधील रजा, भविष्यनिर्वाह निधी, विविध देयके, शिस्तभंग कारवाई, गोपनीय अहवाल आदींची माहिती या प्रणालीत उपलब्ध राहणार आहे. यासह कार्यालयीन कामकाज तसेच कार्यपद्धतीत वेग व सुलभता आणण्यासाठी सुमारे 60 प्रकारच्या सेवा देणारी ही स्वतंत्र प्रणाली विकसीत करण्यात येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा या प्रणालीत समावेश असल्याने मानव संसाधन विभागाचे कामकाज अधिक गतीमान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (लेखा व वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंते आदींसह मानव संसाधन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

भाजपा नगरसेविकेच्या पित्याला मिळाला वाहनतळाचा ठेका -जागा जिल्हाधिकाऱ्यांची ; धंदा महापालिकेचा (व्हिडीओ)

0

पुणे- भाजप नगरसेविकेच्या नातेवाईकाला आज महापालिकेच्या सभागृहात मतदान करून पे अँड पार्कचा ठेका देण्यात आला . विशेष म्हणजे जिथे हा पे -पार्क चा ठेका देण्यात आला ती जागा जिल्हाधिकाऱ्यांची असल्याचे नमूद करून हा ठराव भाजप सेनेने बहुमताने संमत केला .
भवानी पेठ ,पीएमसी कॉलनी नंबर १० येथे नागझरी नाला आहे . या नाल्यावर स्लॅब टाकण्यात आलेला आहे . सर्व नाले , ओढे , नदी पात्रे आणि लगतची काही जागा जिल्हाधिकारी यांची असते .  भूमी जिंदगी विभागाचे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले कि ,
या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी पार्किंगसाठी या जागेचा वापर  करण्यास अनुमती दिली आहे.
मात्र  हि जागा जिल्हाधिकाऱ्यांची आहे त्यावर महापालिकेने पे आणि पार्क चा धंदा कसा उभारावा ? केवळ पार्किंग साठी अनुमती दिलेली आहे , पार्किंग चा व्यवसाय तिथे करता येणार नाही असे आक्षेप कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी घेतले. तर अविनाश बागवे यांनी या ठरावाला  विरोध करत , हा विषय न्यायालयात गेलेला आहे . न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी महापालिकेच्या प्राशासानाने ३० तारखे पर्यंत मुदत मागवून घेतली . आणि इकडे मात्र २७ तारखेलाच हा विषय मंजुरीचा घाट घातला जातो आहे. असा आरोप केला . शिवाय कोणत्याही महापालिका सभासदाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबध असतील तर असे ठराव घेता येत नाहीत , जाहिरात केली नाही ,एकच टेंडर आले ,अशा विविध आक्षेपांकडे बागवे यांनी लक्ष वेधले . तर सुभाष जगताप यांनी आंबील ओढा  येथील क्रीडा संकुलाचे उदाहरण देत , जिल्हाधिकारी  महापालिकेकडे भुर्दंड मागतील तर तो कोण देणार ? असा सवाल केला … तर भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी यावेळी या ठरावाचे समर्थन करताना सांगितले कि ,या जागेवर ड्रग्स, मुलींची छेडछाड असे गैरप्रकार चालत. म्हणून माझे नातेवाईक येथे वाहनतळाचा ठेका घेत आहेत ,ज्यामुळे येथील पार्किंग ची समस्याही सुटेल .
अखेरीस हा ठराव कॉंग्रेस राष्ट्रावादीचा विरोध झुगारून लावत भाजप सेनेने बहुमताने संमत केला .. पहा थेट .. व्हिडीओ

‘तरुणाईच्या ऊर्जा पातळ्या व विचारांचा मार्ग पुरेपूर वापरण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेनेच बदलायला हवे’ : मानसी किर्लोस्कर

0

पुणे : ‘आजची तरुण पिढी ‘सर्वकाही तत्काळ’ अशा काळात जन्माला आली आहे, हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्याकडे एखादी कल्पना असेल तर तिची अंमलबजावणी आपल्याला त्याच क्षणी व्हायला हवी असते. या स्थितीत तंत्रज्ञानाचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यामुळे आता प्रत्येक गोष्ट बोटाच्या टोकावर उपलब्ध आहे. माहितीच्या प्रत्येक तुकड्याशी आपण क्षणार्धात संपर्क साधू शकतो. तरुणाईने सध्याच्या व्यवस्थेशी जुळवून घ्यावे, असे मला वाटत नाही. उलट तरुणाईतील ऊर्जा पातळ्या व विचारांचा मार्ग यांचा पुरेपूर वापर होण्यासाठी व्यवस्थेचे बदलायला हवे,’ असे प्रतिपादन ‘किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांनी नुकतेच येथे केले.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) ‘आयआयएम, अहमदाबाद’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘लीडरशिप इन इंडस्ट्री 4.0 कॉन्फरन्स’ या परिषदेत एक प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. दिवसभर चाललेल्या या परिषदेत सहभागी होऊन विविध उद्योगांतील नामवंत, सदस्य व पाहुण्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

बिझनेस व यूथ आयकॉन असलेल्या मानसी किर्लोस्कर म्हणाल्या, “इंडस्ट्री 4.0 ही संकल्पना सायबर फिजिकल सिस्टिम, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाऊड कॉम्प्युटिंग व कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग या घटकांशी संबंधित आहे, जे आधुनिक कारखान्यांच्या निर्मितीसाठी ऑटोमेशनमध्ये सुधारणा घडवत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, तत्काळ संज्ञापन, बिग डाटा आणि सर्वदूर संपर्क आदी शक्ती या बदलाला चालना देत असून त्याचा परिणाम निर्मिती यंत्रणांत लक्षणीय क्षमता वृद्धी व अधिक लवचिकता येण्यात होईल. त्यामुळे उत्पादनातील कामगाराभिमुखता कमी होईल आणि संपूर्णपणे नव्या कौशल्य संचांची गरज भासेल. स्वस्त मनुष्यबळ व उत्पादनाचा आवाका या गोष्टी पूर्वीप्रमाणे स्पर्धात्मक आघाडीचा स्रोत राहणार नसल्याने इंडस्ट्री 4.0  सध्याच्या संकल्पनांत मुळापासून परिवर्तन घडवून आणेल.”

मानसी किर्लोस्कर यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र झाले, ज्याचे सूत्रसंचालन सीईओ गेट थ्रू गाईड्सच्या ओबीई वंदना सक्सेना पोरिया यांनी केले.

मानसी किर्लोस्कर या उद्योग जगतातील प्रख्यात किर्लोस्कर घराण्याच्या पाचव्या पिढीतील वंशज असून शंतनुराव किर्लोस्कर यांच्या पणती आहेत. किर्लोस्कर घराण्याची उद्योग क्षेत्रातील दीडशे वर्षांची परंपरा त्या बुद्धिमत्ता, बांधीलकी व शैलीच्या जोरावर अत्यंत चैतन्यशीलतेने पुढे नेत आहेत.

मानसी किर्लोस्कर यांच्याबरोबरच या परिषदेत ‘टाटा सन्स’चे बिगर-कार्यकारी संचालक इशात हुसेन व ‘रोल्स रॉईस’चे भारत व दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष किशोर जयरामन या वक्त्यांचीही भाषणे झाली.

गिरमे शाळेमधील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या २० वर्षांनी पुन्हा रंगल्या गप्पा

0

पुणे-

शाळेची मजा -मस्तीचा अनुभव घेत २० वर्षांनी आता पालक झालेल्या विद्यार्थ्यांची नुकतीच शाळा भरली होती . वानवडीतील ह. ब. गिरमे शाळेमधील माजी विद्यार्थांचा  शंकरशेट रोडवरील ग्रीन इनमध्ये  १९९७ चा दहावीचा वर्ग भरण्यात आला . शाळेतील आणि बालपणाच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला . व्यवसाय आणि कामानिमित्त दूर गेलेले मित्र , मैत्रिणी पुन्हा एकत्र जमले होते . या मेळाव्याचे संयोजक  विकास शितोळे व विशाल दळवी यांनी सांगितले कि , सर्वजण २० वर्षांनी एकत्र आल्याने खूप आनंदी आणि उत्साह होता . सर्वानी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम करण्याचा मानस व्यक्त केला . तसेच शाळेची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले . कार्यक्रमाची शेवटी सर्वानी  स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला .

या मेळाव्यामध्ये विकास शितोळे ,  विशाल दळवी,  ओम करे , अजय लोणकर , अमोल खुटवड ,  गणेश जांभुळकर , महेश जांभुळकर , विलास लोणकर , जयंत करजगीकर ,संजय गंडाळ , राहुल येलकर , बाळासाहेब जाधव , दत्ता पोकळे , पोपट जगताप , आरती गिरमे , स्वाती जांभुळकर ,  उन्नती शिनगारे , ललिता शेंडकर , मनिषा लोणकर , दया गवळी , स्वाती म्हस्के , ज्योती सांगवेकर , शिल्पा पतंगे , वंदना गायकवाड , मंजू कटके ,  संतोष लोणकर , महेश मंडलिक , सचिन रेड्डी सहभागी झाले होते . 

संविधानदिनानिमित्त अकरा शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

0

पुणे-

   संविधानदिनानिमित्त दि मुस्लिम वेलफेर एज्यकेशन सोसायटीच्यावतीने पुणे लष्कर भागातील मराठी , उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या अकरा शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून संविधानाविषयी जनजागृती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले . या प्रभात फेरीची सुरुवात लष्कर भागातील तय्यबिया अनाथ आश्रमपासून माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते ध्वज उंचावून करून करण्यात आली . यावेळी प्रभात फेरीचे संयोजक दि मुस्लिम वेलफेर एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक विनोद मथुरावाला ,लष्कर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संगीता यादव ,पोलीस निरीक्षक माया देंवरे ,  पोलिस पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी ज्योती परिहर , आझम कॅम्पसचे विश्वस्त अब्दुल वाहब शेख , दि मुस्लिम बँकेचे माजी संचालक शेख चाँद सरदार दिलीप भिकुले , सईद चौधरी , अक्रम शेख , असिफ शेख , भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयी असो ….. , संविधान दिन चिरायू होवो ….. अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या . हि रॅली भोपळे चौक , संत नामदेव चौक (कोहिनुर चौक ), महावीर चौक , महात्मा गांधी रोड , पंडित दीनदयाळ उपाध्यय चौक , अरोरा टॉवर्स यामार्गे काढण्यात आली . त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचन केले . त्यानंतर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता झाली . 

नलिनी सेनगुप्ता आणि रेवती श्रीनिवासन यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार

0

पुणे –  शिक्षण क्षेत्रातिल प्रमुख संस्थामधील एक ब्रेनफीड ने आपल्या ५व्या वार्षिक सम्मेलनाचे आयोजन केले होते. हे सम्मेलन आज २७ नोव्हेंबर रोजी हॅाटेल वेस्टिन पुणे,  येथे पार पडले. ह्यावेळी सुमारे २०० प्रमुख शिक्षणतज्ञ, व्यवसायी आणि विभिन्न शाळेंचे प्राध्यापक उपस्थित होते.

ह्यावेळी लाइफटाइम अचीव्हमेंट अवॅाड्स विद्या वैली स्कूल पुणेच्या नलिनी सेनागुप्ता आणि सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ठाणेच्या श्रीमती श्रीनिवासन यांना प्रदान कला गेला .हा सन्मान लीला पूनावाला फाउंडेशनच्या पद्मश्री लीला पुनावाला यांच्या हस्थे प्रदान केला गेला.  ह्यावेळी प्रमुख पाह्युण्यांचा सन्मान राष्ट्रीय स्तरवर विख्यात कलाकार माधुरी भादुरी, जॉय बासु, सीईयो अॅम्प्लीफाई माइंडवेयर आणि पुनीता रंजन यांनी केली.

कार्यक्रमामध्ये आपल्या विंचारांच्या प्रस्तृतीमध्ये पद्मश्री लीला पूनावाला म्हणाल्या कि ब्रेनफिड ने घेतलेला हा एक खुप मोठा पुढाकार आहे. परंतु आज आपन त्या मुलांच्या शिक्षणावर देखील लक्ष दिले पाहिजे जी मुले आर्थिकरित्या मागास असतात. आजच्या शिक्षणव्यवस्थेमध्ये नैतिक विज्ञान देखील हवे. जिथे मुलांना सहानुभूति आणि व्यवहाराचे धडे देखील  दिले जातात. कार्यक्रमावेळी ब्रेनफीड पत्रिका, हैद्राबादचे ब्रम्हम देखील उपस्थित होते.

ह्याचबरोबर प्रधानध्यापक आणि संस्थापकांमध्ये एक इंटरॅक्टीव सत्राचे आयोजन देखील करण्यात आले होते ज्यामध्ये, पद्धत्तीमध्ये आवश्यक परिवर्तन, लहान मुलांना शिक्षित करने आदि सारख्या महत्वुर्ण मुद्यांबर चर्चा करण्यात आली.

धर्मग्रंथातील उपदेश सर्वसामान्यांपर्यंत नेले पाहिजेत – मदन गोसावी यांचे प्रतिपादन;

0

पुणे- “मानवी जीवन सुखी करण्यासाठीच धर्म अस्तित्वात आले. शिवाय त्या-त्या काळातील भयंकर सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने उद्धारासाठी संतांनी मानवाला सुखी करण्याचा उपदेश केला. संतश्री ज्ञानेश्‍वरांनी भागवत धर्माचा पाया रचून मनुष्याला भक्ती करण्यास शिकविली. ज्ञानेश्‍वरी ही मानवाच्या मनातील अज्ञान घालवून जीवन प्रकाशमय करणारी आहे.,”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव आणि कायदेविषयक सल्लागार श्री.मदन गोसावी यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना ‘ज्ञानदेवाचा भागवत आणि वर्तमान स्थिती आणि प्राप्त परिस्थिती ’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड होते. याप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, वरिष्ठ पत्रकार डॉ.वेद प्रताप वैदिक, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर व प्रा.मिलिंद पात्रे उपस्थित होते.
श्री.मदन गोसावी म्हणाले,“ज्ञानेश्‍वरांच्या नुसत्या एका ओवीची अनुभूती घेतली तर मानवी जीवनाबरोबरच समाजजीवनही सुखी होईल. व्यवहाराबरोबच कर्मयोग कसा आचरावा, याचे ज्ञान त्यांनी दिले. ते आचरणात आणल्यावर मानव सदैव दुखापासून निवृत्त होतो. वारकरी संप्रदाय हा मानवला जोडून धरणारा मार्ग आहे. मानव हा अंतकरणाने दयावन असतो. या सृष्टीवरील ३०० धर्मात एकच शिकवण आहे, ती म्हणजे सर्वांवर प्रेम करा. हीच शिकवण माऊलींनी देऊन सामाजिक जीवन सुखी करण्याचे कार्य केले आहे. ज्ञानेश्‍वरांनी भागवत धर्माचा पाया रचला तर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कळस उभारला आहे.”
डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“भारत ही ऋषि मुनी, तपस्वी आणि संतांची भूमि आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, ही शिकवण आम्हाला संतानी दिली आहे. सर्व धर्मग्रंथ हे खर्‍या अर्थाने जीवन ग्रंथ आहेत. कसे जगावे व कसे जगू नये याचे सार त्यामध्ये आहे. .”
सकाळच्या सत्रात प्रबोधन कार्यशाळेत स्वरप्रकाशित चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. सुनील काळे व सुप्रसिध्द तत्त्वज्ञ व विचारवंत डॉ. दत्तात्रय तापकीर यांची व्याख्याने झाली.
डॉ. सुनील काळे म्हणाले,“मानवचा आंतरिक व बाह्य विकास हा त्याच्या विचारांवर आधारित असतो. त्यामुळे शुद्ध आचार-विचार हा सर्व परिवर्तनाचा स्त्रोत आहे. या विश्‍वात शांती स्थापित करावयाची असेल, तर ओम ध्वनी अर्थात प्रार्थना हे सर्वात मोठे साधन असेल. विज्ञानाने प्रयोगाद्वारा हे सिद्ध केले आहे, कि मानवी विचारांच्या आधारे तो सृष्टीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. प्रेम आणि शांती या दोनच गोष्टी अशा आहेत, की ज्या तुमच्या शरीरातील पेशींना युवावस्थेत आणण्याचे कार्य करते. त्यामुळे पुढची पिढी उत्तम घडविण्याचे कार्य हे तुमचे विचारच करू शकतात.”
व्यक्तिमत्व विकासासाठी आध्यात्मिक बुध्यांक या विषयावर प्रतिपादन करताना डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, “मानवाला आनंदी राहण्याचे सर्वात मोठे सूत्र म्हणजे सर्व धर्मांचा यथाशक्ती अभ्यास करणे, सर्वधर्म सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, सर्वधर्मममभाव निर्माण होणे गरजेचे आहे. मी कोण आहे, याचा शोध घेतांना फक्त मन आणि बुद्धीचाच शोध लागतो. कारण पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर शेवटी मातीतच मिळणार आहे. त्यामुळेच बुद्धिपर्यंत जाऊन केलेले अध्यात्म म्हणजे आध्यात्मिक बुध्यांक असे आपण म्हणू शकतो.”
प्रा.मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

आंतर आयटी क्रिकेट 2017-टिएटो, विप्रो, सिनेक्रॉन संघांची आगेकुच

0

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत टिएटो, विप्रो, सिनेक्रॉन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पुना क्लब क्रिकेट मौदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत भूषण परंदकरच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर विप्रो संघाने एक्स्ट्रीम वेबटेकचा ६०धावांनी पराभव केला. मिहीर देसाई ३६, कृष्णा चक्रवर्ती ५३, भूषण परंदकर नाबाद ७४ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर विप्रो संघाने २०षटकात ६बाद १९१धावांचे आव्हान उभे केले. १९१धावांचे आव्हान  एक्स्ट्रीम वेबटेक संघ पेलू शकला नाही. त्यांचा डाव २०षटकात ५बाद १३१धावावर संपुष्टात आला. यात प्रसाद पाटीलची नाबाद ७२धावांची खेळी अपुरी ठरली. विप्रोकडून मोहसीन शेख २०धावात ३ गडी बाद केले. सामनावीर भूषण परंदकर ठरला.

दुसऱ्या सामन्यात उमेश तोमर(४-२०)याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टिएटो संघाने सायबेजचा ४धावांनी विजय मिळवला. संजय सिंग नाबाद ८०धावांच्या खेळीच्या जोरावर सिनेक्रॉन संघाने आयप्लेसचा ८गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

टिएटो-१८.५षटकात सर्वबाद १००धावा(विक्रम माळी ३०, अंकित जैन २१, सौरभ रावळ २-११, गणेश मिसाळ ३-१०, निखिल गिरसे २-२५, राकेश शिंदे २-१८)वि.वि.सायबेज: १९.५षटकात सर्वबाद ९६धावा(प्रतीक पंडित ४२, संकेत कांबळे २४, अंकित जैन २-२०, उमेश तोमर ४-२०);सामनावीर-उमेश तोमर;

विप्रो: २०षटकात ६बाद १९१धावा(मिहीर देसाई ३६, कृष्णा चक्रवर्ती ५३, भूषण परंदकर नाबाद ७४, संजय रावत २-२८)वि.वि.एक्स्ट्रीम वेबटेक: २०षटकात ५बाद १३१धावा(प्रसाद पाटील नाबाद ७२, मोहसीन शेख ३-२०);सामनावीर-भूषण परंदकर;

आयप्लेस: १८.५षटकात ५बाद १३२ धावा(शशी झा २६, जोबीन जॉर्ज नाबाद २५, विवेक राठोड २-२२)पराभूत वि.सिनेक्रॉन: १३षटकात २बाद १३८धावा(संजय सिंग नाबाद ८०, मयूर सामंत नाबाद ३७, आकाश कनोजिया २-१७);सामनावीर-संजय सिंग.    

२४ तास जनसेवा केंद्र ;पुण्यात आजपासून ….

0


पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात या  उक्तीचा प्रत्यय यावा , अशा नवनवीन कल्पना ,योजनांना इथून सुरुवात होते, अशीच एक नवीन अभिनव योजना आता इथून सुरु होती आहे ती म्हणजे ‘२४ तास जनसेवा ‘ केंद्र … निंबाळकर तालीम चौकात राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर या नवयुवक कार्यकर्त्याने हे केंद्र सुरु करण्याचा ध्यास घेतला आहे . हे नुसते जनसंपर्क कार्यालय नसेल , इथून वंचितांना , अडलेल्या नडलेल्या गरजूंना आवश्यक ती मदत आणि सहाय्य करण्यासाठी २४ तास राबणारे हाथ बाप्पू पुढे आणणार आहे . रात्रीची  वेळ  आहे ,म्हणून ‘हे’झाले नाही,’हे’ होऊ शकत नाही असे होता कामा नये . आरोग्य ,आणि मुलभूत सेवा प्राप्त करवून घेण्यासाठी  नागरिकांना येथून थेट मदत कशी  पुरविता येइल या साठी बाप्पुंच्या मित्रांचा संच येथे कार्यरत राहणार आहे . वय वर्षे अवघे ३४ , आणि अशा वयात जनसेवेचे हे प्रसंगी संघर्षदायी ठरणारे व्रत घेणारी हा तरुण आणि त्याची मित्रमंडळी या कल्पनेतून कार्यरत होणार आहे . या जनसेवा केंद्राचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते येत्या २७ तारखेला होणार आहे . कोणाच्या आजारपणाची दाखल घेवून धावाधाव करून उपचारापर्यंत संबधितांना पोहोचविणे,कोणाच्या दुखद घटनेची वार्ता वेळीच पोहोचविणे,मुलभूत सेवां अभावी होणाऱ्या अडचणीतून नागरी जीवन सावरणे ,अपघात ग्रस्तांना मदत करणे अशी विविध आवाहने त्यांच्या पुढे ठाकणार आहेत .

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विद्यार्थी व शिक्षकांना संविधान भेट

0

पुणे  :
भारतीय संविधान दिनानिमित्त शहरातील सर्व शाळा व महाविद्यालय यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन संविधान दिन साजरा केला. या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास सुभाष जगताप यांनी केले.
शहरातील सर्व शाळा व महाविद्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिक्षक व विद्यार्थ्यांना भेटून संविधान प्रत देण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास जगताप, शहराध्यक्ष ऋषी परदेशी, विक्रम जाधव, विशाल मोरे, अभिषेक मोरे, अमोघ ढमाले, विशाल हबीब, योगेश ओसवाल आदी उपस्थित होते.
विद्यार्थी व शिक्षक यांना भारतीय संविधान व त्यामधील तरतुदींचा अभ्यास करता यावा आणि समाजात जनजागृती व्हावी म्हणून संविधान भेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे श्रीनिवास जगताप यांनी सांगितले.
संविधानाची माहिती व्हावी म्हणून पुढील काळात संविधानाचे सार्वजनिक वाचन हा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे जगताप यांनी सांगितले हे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.