Home Blog Page 3202

पारंपारिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकास महत्वाचा- खासदार अनिल शिरोळे

0

पुणे- : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमावर भर दिला आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्य विकसित झाले तर अधिक पैसे मिळतात त्यामुळे कौशल्य विकास अत्यंत गरजेचा  आहे असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.

‘यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स’ आणि श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ‘श्री संतमाई कौशल्य विकास केंद्राचे’ उद्घाटन शिरोळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्टचे सुनील रुकारी, यशस्वी संस्थेचे  अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, बाबरे बाबा मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुनीलकुमार गर्ग हे यावेळी उपस्थित होते.

शिरोळे  यावेळी पुढे म्हणाले की,२०१४ पासून मोदींनी देशाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून देशातील संपूर्ण वातावरण बदलले आहे. गेल्या काही काळात वातावरण बदलले असून लोकांची देण्याची प्रवृत्ती वाढली आहे.आपण आपल्या समाजाचं देणं लागतो या  भावनेतून समाजातील दुर्बल घटक, महिला  आणि  वंचित युवकांना  प्रगतीची साधने व संधी  उपलब्ध  करून  देण्यासाठी  समाजातील  प्रत्येकाने  आपापल्यापरीने मदतीचा  हात  पुढे  केला  पाहिजे, देण्याची, दातृत्वाची  भावना  वाढली  पाहिजे.

कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे उद्योजक तयार व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे.  भारत देश श्रेष्ठ व समर्थ झाला पाहिजे त्यासाठी समाज स्वावलंबी झाला पाहिजे हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. समाज स्वावलंबी कौशल्य विकासातूनच होईल. ‘यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स’ हेच कार्य करते आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी  आपल्या  मनोगतात सुनील रुकारी म्हणाले की, आपली मुले घडली पाहिजे यासाठी श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्टची स्थापना झाली. महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे ते ‘यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स’ या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्यांना भांडवलाची गरज आहे. त्यांना बँकेतून भांडवल मिळू शकते. १० लाखापर्यंत कुठल्याही जामीनदाराची त्यासाठी गरज नाही. उद्योग सुरु करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. उद्योजक घडले पाहिजे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

याप्रसंगी सुनीलकुमार गर्ग म्हणाले की, कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्थिक सहाय्याची आवश्यकता असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशांना सहाय्य करणे हे बाबरे बाबा मंदिर ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्हाला या माध्यमातून ती मदत करण्याची संधी मिळाली असून पहिल्या १०० महिलांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल.

विश्वेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,  सूत्रसंचालन अमला  करंदीकर   यांनी केले तर आभार यशस्वी संस्थेच्या  संचालिका स्मिता धुमाळ यांनी मानले.

याप्रसंगी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे व नीलिमा खाडे  यांनीही  या कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत माहिती  घेतली. तसेच कार्यक्रमाला बाबरे बाबा  मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त रितू गर्ग, श्री काशी विश्वनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.महादेव सगरे, सचिव रामेश्वर करजखेडे, खजिनदार श्रीकांत  तोडकर, संस्थेचे सदस्य भगवान कोठावळे  यांच्यासह  विविध पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी  संजय  तांबोळकर, सचिन मोरे, प्राची  राऊत, मीनाक्षी हिरेमठ,प्रसाद  शाळीग्राम, शाम  वायचळ आदींनी  विशेष  सहकार्य  केले.

असे रंगले व्‍यंगचित्रकारांचे संमेलन

0

व्‍यंगचित्रसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंतीनिमित्‍त अखिल भारतीय मराठी व्‍यंगचित्रकार संस्‍था ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ आयोजित ‘हास्‍यदर्शन 2018’ हे व्‍यंगचित्र प्रदर्शन आणि व्‍यंगचित्रकारांचे संमेलन 20 आणि 21 जानेवारीस ठाणे येथे संपन्‍न झाले. पाचपाखाडी परिसरातील ज्ञानराज सभागृहात दिवंगत व्‍यंगचित्रकार तसेच सध्‍याच्‍या  नामवंत व्‍यंगचित्रकारांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे पहाण्‍याची संधी ठाणेकरांना लाभली. दोन दिवस चाललेल्या संमेलनातील सर्वच उपक्रमांना रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सर्वसामान्‍य माणसाला व्‍यंगचित्रांची ओळख असतेच तथापि ती अधिक जवळून व्‍हावी, त्‍यांच्‍या मनातील शंका-कुशंका दूर व्‍हाव्‍यात, व्‍यंगचित्रकारांना प्रत्‍यक्ष भेटता यावे, हा प्रदर्शनाचा मुख्‍य हेतू होता. देश-विदेशातील 70 हून अधिक व्‍यंगचित्रकारांचा संमेलनात प्रत्‍यक्ष सहभाग होता.

पहिल्‍या  दिवशी संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे चित्रकार सुहास बहुलकर यांच्‍या हस्‍ते झाले. ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर, ठाणे मनपा परिवहन समितीचे सदस्‍य राजेश मोरे, नगरसेविका रुचिता मोरे, कंबाईनचे अध्‍यक्ष विवेक मेहेत्रे, चारुहास पंडित, पितांबरीचे राजेश दामले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुहास बहुलेकरांनी आपल्‍या अभ्‍यासपूर्ण भाषणात कलेच्‍या प्रांतातील भिंती पाडून टाकण्‍याची गरज प्रतिपादन केली. गायनाच्‍या क्षेत्रातही शास्‍त्रीय संगीत गाणारा, भावगीत गाणारा, गजल गाणारा असे प्रकार नकोत. चित्रकलेतही हाच नियम लावावयास हवा. चित्रकार, व्‍यंगचित्रकार, अर्कचित्रकार असे भेद नकोत. मानवी जीवनातील गंमती-जमती बघण्‍याची सवय खूप कमी असल्‍याने  धीरगंभीर वागलो तर सज्‍जन समजतात. गांभिर्यालाच सज्जनता मानण्याचा प्रवाह सध्या दृढ होत असल्याने समाजातील गमतीजमती बघण्याची दृष्टीच नकळत हरवत आहे. या पार्श्वभूमीवर, विनोदाच्या माध्यमातून समाजातील व्यंग दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्यंगचित्रकार करत असतो, ही बाब लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी भावनाही त्‍यांनी बोलून दाखविली. दुस-यांचे नुकसान न करणे हे चांगले असते तथापि, समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्‍ही प्रवृत्‍ती असतात. या दोन्‍ही प्रवृत्‍ती समजावून घेऊन त्‍यावर भाष्‍य करण्‍याची क्षमता व्‍यंगचित्रात असते. पूर्वी राजाच्‍या दरबारी विदूषक असायचे, ते अशा प्रकारचे भाष्‍य करायचे. आपल्‍याकडे व्‍यंगचित्रकला अस्तित्‍वात असावी, पण त्याचे पुरावे नाहीत.  ब्रिटीशांच्‍या काळात भारतीय कलेकडे अधिक लक्ष दिले गेल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मराठी व्‍यंगचित्रकारांची माहिती असणारे पुस्‍तक प्रकाशित होण्‍याची गरजही त्‍यांनी बोलून दाखविली.  व्‍यंगचित्रकारांच्‍या कार्यक्रमात पुस्‍तक भेट न देता, संबंधित पाहुण्‍यांचे व्‍यंगचित्र काढून भेट दिल्‍यास ती अविस्‍मरणीय आठवण राहील, सांभाळून ठेवल्‍या जाईल, असेही ते म्‍हणाले.

ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांनी नर्मविनोदी शैलीत आपले मनोगत मांडले. ते म्‍हणाले, व्‍यंगचित्राशी माझा पहाण्‍यापलिकडे संबंध नाही. लहानपणी माझे वागणे पाहून घरातील मंडळींनी मला ‘कार्टून’ ही उपाधि दिली.  1959 मध्‍ये सुधा करमरकर दिग्‍दर्शीत नाटकांत मला काम मिळाले, याचे लेखक रत्‍नाकर मतकरी होते तर वेशभूषा रघुवीर तळाशीलकर यांनी केली होती. त्‍यातील वेशभूषा आणि अभिनय कार्टून पध्‍दतीने करावयाचा होता. माझे काम चांगले झाल्‍याचे समीक्षक ज्ञानेश्‍वर नाडकर्णींनी लिहीले होते. समाजातील दोष न बोलता चित्रातून दाखवण्‍याचे काम व्‍यंगचित्र करते. व्‍यंगचित्रकला ही हसवणारी कला आहे, पूर्वी नट सहसा दिसत नसत, आज दोन घरामागे नट असतो. नाटक, एकांकिका, मालिकांमध्‍ये कामे करतात. पण समाजात व्‍यंगचित्रकार दिसत नाहीत. त्‍यांची संख्‍या कमी आहे, अशी खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. संमेलनात अमोल ठाकूर यांच्‍या कडून स्वतःचे व्‍यंगचित्र रेखाटून घेताना पहिल्यांदाच मॉडेलिंग या नव्या क्षेत्राचा परिचय झाल्याचे त्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. मला जेव्‍हा नैराश्‍य आल्‍यासारखे वाटते तेव्‍हा ‘सौजन्‍याची ऐशी तैशी’ या नाटकाची कॅसेट लावतो. त्‍यामध्‍ये राजा गोसावी अभिनेते आहेत, नाटक पहातांना मनमुराद हसायला येते आणि नैराश्‍य जाते, असेही त्‍यांनी आनंदी जीवनाचे रहस्‍य सांगितले.

कंबाईनचे माजी अध्‍यक्ष चारुहास पंडित यांनी व्‍यंगचित्रकार संमेलनाचा इतिहास सांगितला. दादर येथील संमेलनात शि.द. फडणीस आणि वसंत सरवटे यांना तर नागपूर येथील संमेलनात मनोहर सप्रे यांना जीवनगौरव प्रदान करण्‍यात आला होता. राजेश मोरे यांनी व्यंगचित्र कलेला उर्जितावस्था यावी, या हेतूने आयोजनात सहभाग घेतल्याचे सांगितले.   विश्‍वास दामले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कंबाईनचे अध्‍यक्ष विवेक मेहेत्रे यांनी संमेलनाचा हे‍तू विशद केला. ते म्हणाले, मराठी व्यंगचित्रकारांचे नाव जगभरात व्हावे, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी ‘कार्टूनिस्ट कंबाईन’ असे संस्थेचे नामकरण केले. परदेशाच्‍या तुलनेत भारतात कमी व्‍यंगचित्रकार आहेत. सर्वसामान्य माणसाला व्यंगचित्रकलेची ओळख व्हावी, या हेतूने शाळा-शाळांमध्ये व्यंगचित्रकार जाऊन कार्यशाळा घेणार आहेत.  यात प्रामुख्याने शाळा मुख्याध्यापक आणि कला शिक्षक यांच्याशी संवाद साधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. साहित्यिकाप्रमाणेच समाजातील दोष दाखविण्‍याचे काम व्यंगचित्रकार करत असूनही त्यांना साहित्यिक मानले जात नाही, अशी खंत व्‍यक्‍त करुन दैनिकाशिवाय फेसबुक, व्हॉटस्अप, ट्विटर सारख्या समाजमाध्यमांचा वापर करून व्‍यंगचित्रकारांनी लोकजागृती करावी, असे आवाहन त्‍यांनी केले. व्‍यंगचित्रसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आहे. परंतु हे संमेलन कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही, संमेलनात उपस्थित राहणारे  सर्व राजकीय नेते केवळ कलारसिक म्हणून उपस्थित राहणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. व्‍यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी संमेलनाचा लोगो तयार केला असून 400 हून अधिक व्यंगचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची अप्रकाशित सामाजिक चित्रे प्रदर्शनात लावण्‍यात आली आहेत. कार्टूनिस्ट कंबाईनने यापूर्वी नांदेड, दादर, नागपूर येथे संमेलन आयोजित केले होते. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. आताही लोकसहभाग सकारात्मक असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले. व्‍यंगचित्रकलेला गती मिळावी, यासाठी नियमितपणे उपक्रम राबविले जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी तर आभारप्रदर्शन अरविंद गाडेकर यांनी केले. त्‍यानंतर व्‍यंगचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

दुपारी ज्ञानराज सभागृहातच महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी व्‍यंगचित्र कार्यशाळा घेण्‍यात आली. वैजनाथ दुलंगे आणि राधा गावडे यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी कचराळी उद्यानात व्‍यंगचित्रकारांनी प्रात्‍यक्षिके सादर केली. यामध्‍ये वैजनाथ दुलंगे, अरविंद गाडेकर, सुरेश क्षीरसागर, विवेक प्रभुकेळुस्‍कर, संजय मोरे, उमेश चारोळे, भटू बागले, विनय चाणेकर, ज्ञानेश बेलेकर, प्रकाश घादगिने यांनी सहभाग घेतला.

शेवटच्‍या सत्रात परिसंवाद झाला. विषय होता ‘सोशल मिडीया आणि व्‍यंगचित्रांचे सामर्थ्‍य’.  यामध्‍ये पत्रकार नंदकुमार टेणी, चित्रकार विजय बोधनकर, व्‍यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारुहास पंडित, गणेश जोशी,  महेंद्र भावसार आणि संपादक कैलास महापदी यांनी भाग घेतला. नंदकुमार टेणी यांनी व्‍यंगचित्रांचा दर्जा घसरत चालल्‍याचे निरीक्षण नोंदविले. व्‍यंगचित्राची रेषा सुखावह असली, त्‍यात गोडवा असेल तर व्‍यंगचित्राला ग्रेस येते. व्‍यंगचित्रकारांनी वाचन वाढवावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

चित्रकार बोधनकर यांनी गृहिणी भाजीमध्‍ये जितके मीठ टाकते, तितकाच सोशल मिडीयाचा वापर असावा, असे स्‍पष्‍टपणे सांगितले. ते म्‍हणाले, मी एक कविता लिहीली, ती व्‍हॉट्सअप वर पाठविली, पाचच मिनिटांत कवितेखालील माझे नाव बदलून दुस-याकडून मला आली. एखाद्याचे वडील वारले तर त्‍या पोस्‍टलाही लाईक येते, तुम्‍हाला बरे वाटावे म्‍हणून न वाचताच पोस्‍ट लाईक करणा-यांचीही संख्‍या कमी नाही, हे सोशल मिडीयाचे वास्‍तव त्‍यांनी लक्षात आणून दिले.  सराव आणि वाचनामुळे अज्ञान जेवढे बाहेर येते, तेवढी जागा ज्ञानाने भरुन येते, असे मतही त्‍यांनी  व्‍यक्‍त केले.

संपादक महापदी यांनी प्रिंट मिडीयाचे महत्‍त्व आजही अबाधित असल्याचे अभिमानाने सांगितले. सोशल मिडीयाची कितीही मोठी इमारत उभी राहिली तरी त्‍यांची मूळं प्रिंट मिडीयातच आहेत. व्‍यंगचित्रकारांनी आपला दर्जा सुधारला पाहिजे. बातमी पिळायची असते म्‍हणजे जसे ओला कपडा पिळून त्‍यातील पाणी काढून टाकले जाते तसेच बातमीमध्‍ये शब्‍दांचा फापटपसारा नको असतो. व्‍यंगचित्र ही तसेच हवे, असे ते म्‍हणाले. व्‍यंगचित्रकार कुलकर्णी यांनी सोशल मिडीया हे एक चांगले व्‍यासपीठ असल्‍याचे सांगितले. दैनिके, साप्‍ताहिके यामध्‍ये प्रत्‍येकाला संधी मिळेलच असे नाही, अशा व्‍यंगचित्रकारांना फेसबुक, व्‍हॉट्सअपमुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. मला मधुकर पाटकर, निखील वागळे यासारखे संपादक लाभले, सोशल मिडीयात असे संपादक लाभत नाहीत, अशी उणीवही त्‍यांनी लक्षात आणून दिली. व्‍यंगचित्रकार हा दंगली व्‍हाव्‍यात, तेढ निर्माण व्‍हावी म्‍हणून व्‍यंगचित्र रेखाटत नाही, तथापि व्‍यंगचित्रकारांनी सेल्फ सेन्‍सॉरशिपची जाणीव ठेवावी. अशी जाणीव ठेवली तर सोशल मिडीयासारखा पर्याय नाही, असे ते म्‍हणाले. गणेश जोशींनी  वृत्‍तपत्र ते सोशल मिडीयातील आपल्‍या व्‍यंगचित्रकलेचा प्रवास सांगितला. व्‍यंगचित्रांत कोणते रंग वापरावे, यासाठीही कार्यकर्त्‍याकडून सूचना येत असल्‍याचे ते म्‍हणाले. चारुहास पंडित यांनी स्‍वत:चा दर्जा ओळखून, वाचक ओळखून व्‍यंगचित्र रेखाटले तर सोशल मिडीयाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकता, असे सांगितले. व्‍यंगचित्रांना वृत्‍तपत्रांकडून संधी  मिळत नसल्याचे मत नोंदवत व्‍यंगचित्रकारांनी स्‍वत:ला अपग्रेड केले पाहिजे. सोशल मिडीयाचा तंत्रशुध्‍द वापर करुन आर्थिक उपयोग कसा करता येईल, ही शिकले पाहिजे, असे सांगितले. महेंद्र भावसार यांनी व्‍यंगचित्रांत व्‍यासंगता आणि सखोलता आली पाहिजे, असे सांगून स्‍वयंमुल्‍यमापनाची गरज प्रतिपादन केली. आज फेसबुक, व्‍हॉट्सअप या सामाजिक माध्‍यमांची चलती आहे. भविष्‍यात दुसरे एखादे माध्‍यम झपाट्याने येऊ शकते. तेही माध्‍यम आत्‍मसात करता आले पाहिजे.  बदलत्‍या काळाप्रमाणे व्‍यंगचित्रकारांनी स्‍वत:ला घडवले पाहिजे, असे ते म्‍हणाले.

रात्री ज्ञानराज सभागृहात मनोरंजनाचा व प्रबोधनात्‍मक कार्यक्रम संपन्‍न झाला. मराठी मातीत जन्मलेले, वाढलेले ‘मायबोली’ या इस्रायलमधल्या मराठी ज्यू बांधवांच्या त्रैमासिकाचे संपादक नोहा मस्सील व त्यांच्या पत्नी सीबीया यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. नोहा मस्सील इस्रायल मध्ये स्थायिक झाले आहेत. पण मायमराठीला विसरलेले नाहीत. आपण मात्र महाराष्ट्रात राहून मराठी बोलत नाही, याची जाणीव सर्व उपस्थितांना झाली. डॅनियल सॅम्‍युअल यांनी एकपात्री कार्यक्रम सादर करुन मनोरंजन केले.

21 जानेवारीस सकाळी कचराळी उद्यानात सर्व वयोगटांसाठी व्‍यंगचित्र कार्यशाळा घेण्‍यात आली. यावेळी लहान मुले, पालक व त्यांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यंगचित्रकार गणेश जोशी, वैजनाथ दुलंगे, विवेक मेहेत्रे, विवेक प्रभुकेळूस्कर, नागराज गरड यांनी मानवी आकृती, मानवी भावभावना, पक्षी, प्राणी यांच्या चित्रांची प्रात्यक्षिके सादर केली. या सादरीकरणात त्यांनी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले.

दुपारच्‍या पहिल्‍या सत्रात उपस्थित असलेल्‍या व्‍यंगचित्रकारांचा ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्‍या हस्‍ते  सत्‍कार करण्‍यात आला. बाबूजी गंजेवार, विश्‍वास सूर्यवंशी, गणेश काटकर, रवींद्र बाळापुरे, किशोर शितोळे, सुहास पालीमकर, धनराज गरड, दिनेश धनगव्‍हाळ, अतुल पुरंदरे, वैजनाथ दुलंगे, अनंत दराडे, सतीश उपाध्‍याय, उमेश चारोळे, संजय मोरे, अरविंद गाडेकर, जी. ए. बारसकर, विनोद गोंगे, घनश्‍याम देशमुख, योगेंद्र भगत, चारुहास पंडित, विनय चाणेकर, अरविंद देशपांडे, सुरेश राऊत, सिध्‍देश देवधर, अशोक सुतार, ज्ञानेश बेलेकर, लहू काळे, नीलेश जाधव, गौरव यादव, विवेक प्रभूकेळुस्‍कर, अमोल ठाकूर, महेंद्र भावसार, विवेक मेहेत्रे, प्रशांत कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, जगदीश कुंटे, राधा गावडे, शरयू फरकांडे यांचा समावेश होता. याच संमेलनात राजेंद्र सरग यांचा  सन 2017 मध्‍ये व्‍यंगचित्र क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कामगिरी केल्‍याबद्दल ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्‍या हस्‍ते शाल आणि सन्‍मानचिन्‍ह देऊन गौरव करण्‍यात आला. सरग यांना देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार आणि दिवाळी अंकांच्‍या संपादकांचा ‘दिवा पुरस्‍कार’ गेल्‍या वर्षी प्राप्‍त झाला. तसेच 2017 मध्‍ये 100 हून अधिक नामांकित दिवाळी अंकांमध्‍ये त्‍यांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली. याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी व्‍यंगचित्रकार संमेलनात हा गौरव करण्‍यात आला. व्‍यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनाही विविध पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल गौरवण्‍यात आले. याशिवाय संमेलनाच्‍या निमित्‍ताने नवोदितांसाठी व्‍यंगचित्र स्‍पर्धा घेण्‍यात आली होती. त्‍यामध्‍ये अजित गौड, सुधीर पगारे, किशन गुप्‍ता, राई राणे, एन. धीरजा, आर्य प्रभूकेळुस्‍कर यांना पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. या स्‍पर्धेसाठी ऑस्‍ट्रेलिया, दिल्‍ली, काश्‍मीरसह महाराष्‍ट्रातील नवोदित व्‍यंगचित्रकारांनी भागघेतला होता.

दुस-या सत्रात व्‍यंगचित्रकार राज ठाकरे यांच्‍या हस्‍ते प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच  ‘हास्यविवेक’ आणि ‘आक्रोश’ या दोन पुस्तकांचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमात दिवाळी अंक आवाजचे संपादक भारतभूषण पाटकर, आक्रोशचे ज्ञानेश्‍वर उर्फ तात्‍यासाहेब जराड, उद्वेलीच्‍या वैशाली मेहेत्रे यांचा राज ठाकरे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी मार्गदर्शन करतांना ठाकरे म्‍हणाले,  मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना मी परवडणार नाही, म्हणूनच फेसबुक पेज सुरु केले आणि त्यावर मी काढलेली व्यंगचित्र टाकतो. तुम्हीही सोशल मीडियावर व्यंगचित्रे टाकावी. पत्रकार, साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून भूमिका मांडली पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी केले.

मानधन नसल्याने व्यंगचित्रकारांना कलादालनांमध्ये प्रदर्शनेही भरविता येत नाहीत, त्‍यामुळे बहुतांश व्यंगचित्रकारांनी सोशल साइट्सची मदत घेतल्याचे  विवेक मेहेत्रे यांनी सांगितले.  मुंबई विद्यापीठात व्यंगचित्रकलेचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. शि.द.फडणीस म्हणाले, व्यंगचित्ररेषा ही तीव्र नि वेगवान असते. तरुणांनी या कलेमध्ये रुची घ्यावी. एकदा अर्कचित्राची भाषा उमजल्यावर व्यंगचित्रकार म्हणून साऱ्या वाटा मोकळ्या होतात, असे ते म्‍हणाले.

सायंकाळच्‍या सत्रात ‘आमच्‍यासारखे आम्‍हीच’ ही व्‍यंगचित्रकारांसाठी आव्‍हानात्‍मक स्‍पर्धा घेण्‍यात आली. यामध्‍ये ऐनवेळी विषय देऊन अर्कचित्र, व्‍यंगचित्रे काढण्‍यास सांगण्‍यात आली. यामध्‍ये सतीश उपाध्‍याय, संजय मोरे, उमेश चारोळे यांची टीम विजयी ठरली. अतुल पुरंदरे, योगेंद्र भगत, अशोक सुतार यांना  द्वितीय तर विवेक प्रभूकेळुस्‍कर, अमोल ठाकूर, वैजनाथ दुलंगे यांना तृतीय पुरस्‍कार प्राप्‍त झाला.

शेवटच्‍या सत्रात ‘मराठी दैनिकांचे संपादक राजकीय व्यंगचित्रांपासून दूर का?’  या विषयावरील परिसंवाद झाला. यामध्‍ये व्‍यंगचित्रकार सुरेश लोटलीकर, बाबू गंजेवार, पत्रकार भाऊ तोरसेकर, पंढरीनाथ सावंत सहभागी झाले होते.

लोटलीकर यांनी परदेशातही राज्‍कीय व्‍यंगचित्रे छापण्‍याचे प्रमाण कमी झाल्‍याचे सांगून याबाबत गंभीरपणे विचार होण्‍याची गरज मांडली. बाबू गंजेवार म्हणाले, आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे गुदगुल्या करणारी, तर बाळासाहेब ठाकरे यांची व्‍यंगचित्रे गालगुच्चे घेणारी होती. जातीयतेचे विष पसरलेले काही समाजगट व्‍यंगचित्रकारविरोधी आंदोलन करतात, अशा वेळी समाज व्यंगचित्रकाराच्या पाठीशी उभा राहत नाही, ही बाबही व्यंगचित्रकारांच्या पिछेहाटीला जबाबदार आहे असल्‍याचे मत मांडले.

पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आपली परखड मते मांडली. विशिष्‍ट अजेंडा घेऊन काम केले तर त्रास होणारच, असे नमूद करुन ते म्‍हणाले, जोपर्यंत व्‍यंगचित्र, काव्‍य, पत्रकारिता लोकांसाठी आहे, लोकांपर्यंत जाण्‍याचा प्रयत्‍न करते तोपर्यंत घाबरण्‍याचे कारण नाही.   पंढरीनाथ सावंत यांनी व्यंगचित्रकाराने आपले चित्र सर्वोत्कृष्ट कसे राहील याकडे लक्ष देण्‍याचे आवाहन केले. व्‍यंगचित्र सुचले म्‍हणून काढले असे होता कामा नये, व्‍यंगचित्रकारांनी निरीक्षण, मेहनत करायला हवी, असे ते म्‍हणाले.   प्रशांत      कुलकर्णी यांनी समारोप करतांना व्‍यंगचित्रकारांनी आपली निष्‍ठा व्‍यंगचित्रकलेशी ठेवायला हवी, असे सांगून ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकारांच्‍या शैलीचाही अभ्‍यास केला गेला पाहिजे, असे सांगितले.

या प्रदर्शनास अनेक कलारसिक, मान्‍यवरांनी भेटी दिल्‍या. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही व्‍यंगचित्रांचा आनंद घेतला. ठाणे महापालिकेतर्फे व्‍यंगचित्रस्‍पर्धा आयोजित केली जाईल, असे पालकमंत्री श्री. शिंदे म्‍हणाले. अमोल ठाकूर आणि संजय मोरे यांनी एकाचवेळी उत्‍सफूर्तपणे त्‍यांचे अर्कचित्र रेखाटले.

मराठीतील ‘हिंदूपंच’ हे व्यंगचित्र नियतकालिक ठाणे नगरीत सुमारे दीड शतकापूर्वी प्रकाशित झाले होते. त्याच ठाण्यात व्यंगचित्रकार संमेलन आयोजित करण्‍यात आले होते, हा सुवर्णयोगच म्‍हणावा लागेल. नामवंत व्‍यंगचित्रकारांना प्रत्‍यक्ष भेटण्‍याची संधी, त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांचा आनंद, विविध विषयावरील परिसंवाद, व्‍यंगचित्र कार्यशाळा, मार्गदर्शन, ‘तुमचे व्यंगचित्र तुमच्यासमोर’ हा धमाल अनुभव रसिकांच्‍या दीर्घकाळ नक्‍कीच स्‍मरणात राहील.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे (भ्रमणध्‍वनी 9423245456)

सारा सिटी फेज डी’मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

0
चाकण / प्रतिनिधी:सारा सिटी फेज डी सहकारी गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्यावतीने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कड यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खराबवाडीचे सरपंच सागर खराबी, सारा सिटीचे सेल्स मॅनेजर विजय जाधव, फेज बी सहकारी गृहनिर्माण सहकारीचे सोसायटीचे अध्यक्ष तानाजी येळवंडे, फेज ए’चे नियोजित अध्यक्ष झाकीर तांबोळी, खराबवाडीचे पोलीस पाटील किरण किर्ते, उद्योजक भगवान चौधरी, योगेश टेकाळे, सोसायटीचे खजिनदार बाबुराव कदम, सचिव मल्हारी घाडगे, सर्वेष पोरे, शंकर जाधव, सोमनाथ पाटोळे, प्रमोद टेकाळे, रमेश गोमकाळे, अमोल शिंदे, शरद जागुष्टे, राम कदम, कलाप्पा सुतार, चेतन चव्हाण, राहुल शेटे, लहु काकडे, आदित्य राघव, ज्ञानेश्‍वर करपे, प्रकाश लोखंडे, अंजन महाराणा, जितेंद्र बोरसे, सुब्रमन्यम तेवर, निलेश गोरीवाले, नितीन पडवळ, प्रकाश कुलकर्णी, विजय चौंडणकर, अरुण चव्हाण, रणजेत चौधरी, दीपक पाटील, निलेश गुरव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षारक्षकांच्या संचलनाने झाली. ध्वजवंदन, प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यानंतर खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी बालचमूंच्या सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विविध देशभक्तीपर गीते, हिंदी-मराठी चित्रपटातील गीते, तसेच नृत्ये बालचमूंनी सादर केली. त्याला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

केअर टेकर्स सोसायटीतर्फे लष्कर भागात प्रजासत्ताक दिनानिमित्त शोभायात्रा

0

पुणे –  – देशभक्तीपर संगीताच्या तालावर तरुण -तरुणीचा जल्लोष करणारे नृत्य … मुलीचे संगोपन करणारे आम्ही मायकेकीचा संदेश देणारे फलक … हम सब एकच संदेश देणारा आणि स्वच्छतेचे महत्व सांगणारे चित्ररथ … एन .. सी . सी कॅडेटचा उत्साहवर्धक सहभागाने प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात काल शुक्रवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेचे कॅम्प परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत तर केलेच . त्याचबरोबर भारत माता कि जयच्या जयघोष करत तेही या शोभायात्रेत सहभागी झाले. संपूर्ण कॅम्प परिसर काल देशभक्तीने भारावून गेला होता .
केअर टेकर्स सोसायटी व लष्कर भागातील मंडळातर्फे काल शुक्रवारी भव्य शोभायात्रा पुणे कॅन्टोन्मेंट भागात काढली . गोळीबार मैदाना पासून काल सकाळी १० वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा न्यू मोदीखाना चौक,सेंटर स्ट्रीट, खाणे मारुती देवस्थान , बाबाजन चौक , भोपळे चौक मार्गाने महात्मा गांधी रस्त्याने आली. या शोभायात्रेचा समारोप हॉटेल अरोरा जवळील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ झाला.


शोभायात्रेच्या अग्रभागी न्यू सुयोग म्युजिकल बँड चे पथक देशभक्तीपर गीताची धून वाजवत निघाले होते. त्यापाठोपाठ कॅम्प एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे एन . सी .सी . चे कॅडेटचे पथक सहभागी झाले होते. यानंतर केअर टेकर्स सोसायटी संस्थेचा सर्व धर्म समभाव चा संदेश देणारा चित्ररथ होता . या रथात विविध धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे वेशभूषेतील विधार्थी हम सब एक चा संदेश देत होते. याच चित्ररथात भारताच्या संविधानचे महत्व समजावून सांगणारा फलक होता . त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्वच्छतेचे महत्व सांगणारा चित्ररथ सहभागी झाला होता . यानंतर सरगम बँडचे पथक आणि देशभक्तीपर संगीताच्या तालावर नृत्य करत तरुण -तरुणी सहभागी झाले होते.या शोभायात्रेत भारतमाता कि जयचा जयघोष निनादत होता. त्याचबरोबर मुलीचे महत्व समजावून सांगणारे- मुलगी ओझं नाही … आधार आहे , आम्हाला मुलगी आहे याचा आम्हाला अभिमान आहे . मुलीला शिकवून मोठे करायचे आहे असे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या .
या शोभायात्रेत केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , सदस्य दिलीप गिरमकर , प्रशांत यादव , नितीन पंडित , रणजित परदेशी, रवींद्रनाथ सल्ले, दत्ता दरपेल्ली , बाळसुंदर ठुबे , पवन देडगावकर , अमोल भोसले ,श्रीमती छबूआक्का जाधव , कपिल कल्याणी , विशाल कामठे , श्याभि मंडोसा , सौ . तृप्ती सबनीस , कुमारी मिनल खरात , सौ . मेघना कल्याणी , सौ . प्रियांका शिंदे , सौ . शिला खेमकर ,सौ मंजुषा देडगावकर यांच्यासहित विविध मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .

पुणे हे विकासाचे नवे स्मार्ट मॉडेल – पालकमंत्री बापट

0

 

पुणे पुणे जिल्ह्याची देशात ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून वेगळी ओळख आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत ही ओळख आणखी दृढ झाली असून माहितीतंत्रज्ञान आणि ॲटोमोबाईलचे देशातील प्रमुख केंद्र म्हणूनही जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे स्मार्ट मॉडेल म्हणून विकसित होत असल्‍याचे प्रतिपादन अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

             भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिन समारंभात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्‍यालयाच्‍या मैदानावर झालेल्‍या समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक,  न्यायमूर्ती, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, नागरिक,  विद्यार्थी उपस्थित होते.

सर्वप्रथम पालकमंत्री श्री. बापट यांनी सर्वांना प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.  ते म्‍हणाले,    केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटीज मिशनच्या अंतर्गत देशातून पुणे शहराची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा मान पुण्याला मिळाला. या योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यासाठी “पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड” या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन, समान पाणीपुरवठा आणि स्मार्ट मिटरींग, झोपडपट्टी पुनर्विकास, स्मार्ट रस्ते, फुटपाथ, लाईट हाऊस, सेंट्रल कमांड कंट्रोल सेंटर, कॉमन मोबिलिटी कार्ड, सार्वजनिक वाहतुकीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती होणार आहे. यासर्व कामांना सुरुवात झाली असून या योजनेमुळे पुणे शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

                  पुणे शहराच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढविणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2020 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून हिंजवडी ते शिवाजीनगर अशा 23.3 किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प नुकताच प्राधिकरण सभेने मंजूर केला आहे. या मार्गावर 23 स्टेशन असणार आहेत. या प्रकल्पास राज्य शासनानेही  मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2017-18 या वर्षाकरीता पुणे जिल्यातील 190 गावे टंचाईमुक्त करण्यासाठी निवड करण्यात आलेली आहेत. त्या गावांमध्ये 5 हजार 858 कामे व 171.28 कोटी रक्कमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 हजार 245 कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी 418 कामे पूर्ण झाली आहेत व 827 कामे प्रगती पथावर आहेत. त्यासाठी 2.32 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सन 2015-16 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानातील उत्कृष्ट कामाबद्दल पुणे जिल्हयाला राज्य पातळीवरील व्दितीय क्रमांकाचे तर पुरंदर तालुक्याला राज्यपातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

प्रारंभी पालकमंत्री श्री. बापट यांनी परेडचे निरीक्षण करुन मानवंदना स्‍वीकारली. पथ संचलनात राज्‍य राखीव पोलीस दल, महिला पोलीस पथक, पुणे ग्रामीण, पुणे शहर यांच्‍या जवानांनी भाग घेतला होता. तसेच सामाजिक वनीकरण, सामाजिक न्‍याय विभाग, सर्व शिक्षा अभियान, जलयुक्‍त शिवार अभियान, पुणे मनपा,  स्‍वच्‍छ भारत मिशन यांचेही चित्ररथ सहभागी झाले होते.

समारंभात  जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांचा सत्‍कार  करण्‍यात आला. विद्यार्थ्‍यांचे दप्‍तराचे ओझे कमी करण्‍यासाठी श्री. मांढरे यांनी  महिन्‍याभरात शिकविल्‍या जाणा-या सर्व विषयाच्‍या धड्यांचे संकलन करुन प्रत्‍येक महिन्‍यासाठी स्‍वतंत्र पुस्‍तकाची निर्मिती केली. त्‍यामुळे 5-6 पुस्‍तकांऐवजी एकच पुस्‍तक घेऊन मुले शाळेत जाऊ शकतील.या अभिनव उपक्रमाबद्दल त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

पालकमंत्री श्री. बापट यांच्‍या हस्‍ते राष्‍ट्रपती पोलीस पदक विजेते, जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार,  गुणवंत क्रीडा शिक्षक, गुणवंत क्रीडा संघटक,  राष्‍ट्रीय हरित सेना पंचतारांकित शाळा पुरस्‍कारांचे वितरण करण्‍यात आले.

यावेळी विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी,   पोलीस सह आयुक्‍त रवींद्र कदम, जिल्‍हाधिकारी सौरभ राव यांच्‍यासह इतर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा तबीब व प्रिया बेल्‍हेकर यांनी केले.

आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेमध्ये एमसीई सोसायटी महाविद्यालयाला विजेतेपद

0
पुणे ः 
 
‘पुणे शहर विभाग क्रीडा समिती’द्वारा आयोजित वरिष्ठ गट आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेमध्ये एमसीई सोसायटी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. 
 
अलीकडेच झालेल्या सामन्यामध्ये एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने एमएमसीसी महाविद्यालयाचा 4 गडी राखून पराभव केला. ‘महाराष्ट्र कॉस्मोपोलोटिन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, आझम स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
 
प्रथम फलंदाजी करताना एमएमसीसी महाविद्यालयाने 40 षटकात 9 गडी बाद 223 धावा केल्या. त्यामध्ये पारस गवळी व विनय पाटील यांनी प्रत्येकी 68 धावा केल्या. त्यांना अभिमन्यू याने 41 धावा करून साथ दिली. दानिश पटेल याने 4 गडी बाद केले. त्यास प्रतिउत्तर देताना एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने 39.5 षटकांमध्ये 6 गडी गमावून 224 धावा करून विजय मिळवला.
 
विजयी संघाकडून झैद पटेल याने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर झैद अन्सारी याने 42 आणि दानिश पटेल याने 40 धावा केल्या. 

एकात्मतेचा संदेश देत भाजपच्या तिरंगा एकता रॅली

0

पुणे – प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला एकात्मतेचा संदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगा एकता रॅली या दुचाकी फेर्‍यांचे आयोजन करण्यात आले होते.

भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय संविधानाचा विजय असो, हम सब एक है अशा घोषणा देत, दुचाकीवर तिरंगा फडकावीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहर पिंजून काढले.
पालकमंत्री गिरीश बापट व शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदीर ते ओमकारेश्‍वर मंदीर या मार्गावर दुचाकी फेरी काढण्यात आली.
विविधतेतून एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. विविधतेतून नटलेल्या या देशात एकता व अखंडता राखण्यासाठी कटिबध्द होण्याचे आवाहन श्री. बापट यांनी यावेळी केले.
एकात्मता व अखंडतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश भाजपच्या वतीने तिरंगा एकता रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती शहराध्यक्ष गोगावले यांनी यावेळी दिली. शहरातील सर्व मतदारसंघांमध्ये पाच हजारहून अधिक दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे स्मारक स्वारगेट ते स्वारगेट या मार्गावर पर्वती मतदारसंघाच्या रॅलीचे नेतृत्व आमदार माधुरी मिसाळ, सरचिटणीस दीपक मिसाळ यांनी केले. आमदार मिसाळ यांनी एकात्मतेची शपथ दिली. महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. अध्यक्ष हरिष परदेशी यांनी संयोजन केले.
बावधन पोलीस चौकी ते बालाजीनगर धनकवडी या मार्गावर आमदार भीमराव तापकीर यांनी नेतृत्व केले. सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अरुण राजवाडे यांनी संयोजन केले. शिवाजीनगर मतदारसंघाचीफेरी फर्ग्युसन महाविद्यालयापासून आमदार विजय काळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होते. अध्यक्ष सतिश बहिरट यांनी संयोजन केले. हडपसर मतदारसंघातील फेरी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. अध्यक्ष सुभाष जंगले यांनी संयोजन केले.

…तर तीन वर्षात पुणे होईल ‘स्मार्ट’ : अरुण फिरोदिया

0

पुणे: वाहतूक व्यवस्थेबरोबरच कचरा व्यवस्थापन ही पुणे शहरासमोर असलेली मुख्य समस्या असून कचरा व्यवस्थापनाचे खाजगीकरण करून त्याद्वारे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास केवळ तीन वर्षात पुणे शहर ‘स्मार्ट’ झाल्याशिवाय रहाणार नाही; असा दावा विख्यात उद्योजक अरुण फिरोदिया यांनी केला.
दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडिया पुणे केंद्राच्या हिरकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे स्मार्ट सिटी: सद्यस्थिती आणि आव्हाने’ या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप यांनी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाबाबत दृकश्राव्य सादरीकरण केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश मुंदडा; मानद सचिव अविनाश निघोजकर; माजी सचिव वसंत शिंदे; डॉ सुरेखा देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
घन कचरा व्यवस्थापन ही पुणे शहरासमोर उभी ठाकलेली प्रमुख समस्या आहे. कचरा निर्मूलनाच्या समस्येवर प्रभावी उपाय करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शहर डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांची राजधानी होऊ घातले आहे. सध्या महापालिका कचरा निर्मूलनासाठी प्रतिवर्ष ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करते. कचरा जमा करण्याच्या कामाचे खाजगीकरण केल्यास त्यातून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि हे काम अधिक कार्यक्षमतेने होऊन पुणेकरांचे आरोग्य सुरक्षित राहील. तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट झाल्याचे म्हणता येईल; असे मत फिरोदिया यांनी व्यक्त केले.
शहराभोवती ‘रिंग रोड’ करून त्याच्या आजूबाजूला ‘सॅटेलाइट सिटी’ विकसित करून शहराच्या वाढत्या लोकसंख्येचे विभाजन करावे; कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांना २० मिनिटांत अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था व्हावी; घराजवळ चांगल्या शाळा उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांची गळती थांबावी; शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट बाजारात आणता यावी; इलेक्ट्रीक व्हेईकलद्वारे प्रदूषण कमी व्हावे; अशा अपेक्षा फिरोदिया यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुणे होणार ‘फ्युचर रेडी’ शहर 
‘५ जी’ तंत्रज्ञान उपलब्ध असलेले ‘फ्युचर रेडी’ शहर विकसित करण्याच्या उद्दीष्टाने पुण्याच्या विकासाचे नियोजन असून त्यासाठी १५ वर्षात ३१ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका; राज्य आणि केंद्र सरकारसह कर्जरोखे आणि खाजगी गुंतवणुकीतून हा निधी उभारण्यात येईल; अशी माहिती डॉ जगताप यांनी यावेळी दिली. शहराचे जीवनमान उंचावण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेमध्ये असलेल्या विविध क्षेत्रातील प्रकल्पांची माहिती जगताप यांनी आपल्या सादरीकरणात दिली. वाहतूक समस्येतून मार्ग काढण्यासाठी रिंग रोडची सुविधा; २४ तास पाणी पुरवठा; प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ई व्हेइकल्सच्या वापराला प्राधान्य; कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोसह बी आर टी; पीएमपीएमएलचे सुनियोजित व्यवस्थापन करून शहरातील प्रवासाची कमाल वेळ ३० मिनिटांपर्यंत आणणे; यासह अनेक प्रकल्पांची सविस्तर माहिती जगताप यांनी दिली.
डॉ देशमुख आणि डॉ मुंदडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य व्याख्यानांनंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात उपस्थित अभियंत्यांच्या प्रश्नांना वक्त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

शुभांगी चिपळूणकर यांनी सूत्रसंचालन केले. निघोजकर यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यापूर्वी पुणे होते स्मार्ट 
स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे शहर हे आरोग्यपूर्ण वातावरणासाठी विख्यात होते. मर्यादित लोकसंख्या; शुद्ध हवा; मुबलक पाणी; उत्तम शिक्षण; सायकलीच्या वापरामुळे प्रदूषणमुक्ती अशा परिस्थितीत तत्कालीन पुणे हे ‘स्मार्ट सिटी’ होते असे म्हणावे लागेल. पुण्याला हेच गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी कंबर कसणे हे सर्व पुणेकरांचे कर्तव्य आहे; असे आवाहन फिरोदिया यांनी या परिसंवादात केले.

सामाजिक क्षेत्रातील तरुणाईच्या गौरव समारंभाचे आयोजन

0
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त ​’​वन स्टेप फाऊंडेशन ​’च्या वतीने आणि
​’​एसजीएम मॉल ​’​च्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणां
च्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ​दिनांक २६ जानेवारी रोजी ​एसजीएम मॉल, मोलेदिना रोड कॅम्प येथे सायंकाळी ५. ३० वाजता होणार आहे. सत्कारार्थीना​’​पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ​’च्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमांतर्गत इंदिरा भिलारे (संस्थापक/अध्यक्ष बहुउद्देशीय धर्मादाय संस्था), विराज तावरे, सचिन बेनकर, महेश घाग, पुजा भाले या पाच जणांचा सत्कार करण्यात येणार आहे.
समाजात सुधारणा घडवून आणणे आणि समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी उपक्रम राबवले जावे या हेतूने स्थापन झालेल्या ​​’​वन स्टेप फाऊंडेशन

‘​संस्थेच्या वतीनेया वर्षी प्रथमच या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची 

संकल्पना पर्यावरण संरक्षण अशी आहे. तरुणाईला पर्यावरणविषयक जनजागृती करणे आणि प्रोत्साहन देणे हा या मागचा प्रमुख हेतू आहे. 
​सन्मानार्थींचा परिचय पुढील प्रमाणे :​
इंदिरा भिलारे (संस्थापक/अध्यक्षबहुउद्देशीय धर्मादाय संस्था) यांचा आपल्या संस्थेमार्फत कष्टकरी व बिगारी कामगार यांच्या मुलांकरिता स्वतः शिकवणी घेणे, आहार व औषध उपचार करणे, अशाप्रकारची जबाबदारी स्वीकारून समाजहिताचे कार्य केल्याबद्दल, 
विराज तावरे यांचा गडाकोट व सह्याद्रीमधील छोट्या गावातील मुलांचे शिक्षण व पोषण अशाप्रकारची जबाबदारी स्वीकारून समाजहित कार्य केल्याबद्दल,
सचिन बेनकर यांचा सायकल चालवा- इंधन वाचवा, आरोग्य सांभाळा हा संदेश पोहचविण्यासाठी वाघा बॉडर ते पुणे असा 2100 की.मी. चा बिकट प्रवास सायकलद्वारे पूर्ण केल्याबद्दल,
महेश घाग यांचा अभिनयाने रंगभूमी व टेलीव्हिजनवर एक वेगळा ठसा उमटविला आहे. सध्या सुरु असलेली आपली मलिका ‘लागीर झालं जी’ यातील फौजी या व्यक्तिरेखेने आपण सर्व रसिकांना आपलेसे केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी,
तसेच पुजा भाले यांचा पर्यावरणाच्या व वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

 

नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत वीजग्राहकांनी एजंटांना थारा देऊ नये

0

पुणे : महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली असून या कामांसाठी कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना वीजग्राहकांनी थारा देऊ नये असे स्पष्ट आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणने वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणार्‍या शुल्काची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.

वीजग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरण नेहमीच तत्पर असते. नवीन वीजजोडणी, नावांत बदल किंवा वाढीव वीजभार मंजुरी आदींची प्रक्रिया महावितरणने अतिशय सुलभ व पारदर्शक केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्वतः कार्यालयात येऊन त्याचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर प्रशासकीय दिरंगाई होत असल्याची तक्रार असल्यास 1800-200-3435 व 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकांवर 24×7 संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून 022-26478989 किंवा 022-26478899 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शिवाय ट्‌वीटरच्या माध्यमातून सुद्धा ग्राहकांना तक्रारीचा निपटारा करता येऊ शकेल.

वीजयंत्रणेत बिघाड असल्यास किंवा दोष असल्यास त्याचा परिणाम मीटरमधील वीजवापराच्या रिडींगवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजमीटरपुढील सर्व वायरिंग सुस्थितीत व दोषविरहित ठेवण्यासाठी नियमित तपासणी करून घेणे मात्र अतिशय आवश्यक आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांत एक खिडकी ग्राहक सुविधा केंद्रात वीजजोडणीबाबतच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती अर्जांसह उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी, वीजभार मंजुरी, नावांत बदल आदींच्या विविध सेवांसाठी पद्मावती, रास्तापेठ, नगररोड, पर्वती व बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी रास्तापेठ येथील ग्राहक सुविधा केंद्गात तसेच कोथरूड विभागातील ग्राहकांनी एसएनडीटी कॉलेजजवळील ग्राहक सुविधा केंद्गात, शिवाजीनगर विभागातील ग्राहकांनी चतुश्रृंगी मंदिरासमोरील ग्राहक सुविधा केंद्गात तर पिंपरी, भोसरी विभागातील ग्राहकांनी पिंपळे सौदागर येथील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क करू शकतात.

हे सर्व असताना वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा.

हडपसरमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

0

पुणे :- 213-हडपसर विधानसभा मतदार संघातर्फे दि. 25 जानेवारी 2018 रोजी एस एम जोशी कॉलेज हडपसर येथे 8 वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून 213-हडपसर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री उत्तम पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमास एस एम जोशी कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी तरुण मतदारांना मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय मतदार कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धैतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. तसेच सहस्त्रक मतदार म्हणून विद्यार्थी  गणेश कुमावत, अक्षता हादिमणी, एश्वर्या पत्तार व पदमेश शिरामे यांना गौरवण्यात आले. तसेच हडपसर विधानसभा मतदार संघातील उत्कृष्ठ कामगिरी केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्रीमती वंदना काजळे, श्रीमती प्रेमा थापा, श्रीमती जेनिस वासू व पर्यवेक्षक श्री सुरेश रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॉलेजमध्ये मतदार साक्षरता क्लबचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल एस एम जोशी कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रभंजन चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी नविन मतदारांना मार्गदर्शन करताना श्री उत्तम पाटील म्हणाले की, तरुण मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवायला हवा. मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्यांना मतदारांना नोंदणी करणेसाठी प्रोत्साहीत केले पाहीजे. तसेच निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. त्यासाठी नवीन स्थापन झालेल्या मतदार साक्षरता क्लबने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सुदृढ लोकशाहीसाठी या गोष्टी होणे अत्यावश्यक आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी एस एम जोशी कॉलेजचे उपप्राचार्य श्री धुमाळ, निवडणूक नासब तहसिलदार श्री दिनेश पारगे, लिपिक प्रशांत करपे, विष्णू लोहकरे उपस्थित होते. प्रस्तावना निवडणूक नायब तहसिलदार दिनेश पारगे यांनी केली तर समारोप श्री प्रभंजन चव्हाण यांना केला. सुत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती डॉ. सरोज पांढरबळे यांनी केले.

‘कॉलेज जर्नी’ २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

0

मैत्री, प्रेम आणि तरुणाईचा सळसळता उत्साह कॉलेज मध्येच पाहायला मिळतो. मित्रांसोबत घातलेला राडा, पहिलं प्रेम, नव्याने मिळालेले स्वातंत्र्य, लेक्चर्स बंक करण्यातली मजा, नवनवे अनुभव घेण्याची उत्सुकता या सगळ्या गोष्टी घडण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कॉलेज कट्टा. कॉलेजच्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने मनाशी जपलेला असतो. कॉलेजची हीच धमाल अशी ही आमची कॉलेज जर्नी या आगामी चित्रपटातून अनुभवत नॅास्टेलजिक होण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. बालाजी फिल्म क्रिएशनची प्रस्तुती असलेला कॉलेज जर्नी सिनेमा २ फेब्रुवारीला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाल (आप्पा) कानकाटे या चित्रपटाचे निर्माते असून अभिजीत साठे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

कॉलेज लाइफमध्ये धम्माल मस्ती करणारी दोस्त मंडळी, एकमेकांशी असलेले नाते आयुष्यभर जपतात. त्यांच्या याच मैत्रीच्या नात्याचा वेध घेत शंतनू आणि अश्विनी यांच्या प्रेमाचा हृदयस्पर्शी प्रवास हा चित्रपट उलगडतो. कॉलेजमधील धमाल अनुभवत असताना शंतनूला काही गोष्टींचा सामना करावा लागतो. या गोष्टींचा सामना शंतनू करू शकतो का? व यातून त्याची मैत्री व प्रेम त्याला मिळतं का? याची कथा म्हणजे कॉलेज जर्नी हा सिनेमा.

वेगवेगळ्या जॉंनरची चार गाणी या सिनेमात आहेत. गीतकार अभिजीत साठे, शुभम जाधव, गरुठा गुळीक यांच्या लेखणीने सजलेल्या या गाण्यांना साई-पियूष यांनी संगीतसाज चढवला आहे. अवधूत गुप्ते, रोहित राऊत, मालविका दीक्षित यांनी ही गाणी गायली आहेत. पार्श्वसंगीत अनुराग भारद्वाज यांचे आहे. अर्चना जावळेकर व अनिल सुतार यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी तर सहनृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी ललिता साठे, कोमल निळकंठ, प्रियंका जावळेकर, मयुरी जावळेकर यांनी सांभाळली आहे.

सुप्रिया पाठारे, हर्षद वाघमारे, मोहिनी अवसरे, शरदभाऊ जोरी, प्रदीप बनसोडे, सतीश बनसोडे, शुभम बनसोडे, सोमनाथ बोरगावे, मयुरी भालेराव, सुप्रिया बरकडे, आदेश चांदोडे, राजलक्ष्मी बसवंती या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद अभिजीत साठे यांनी लिहिले आहेत. सहनिर्माते केडी चौधरी (ग्रुप पुणे) तर कार्यकारी निर्माते विनोद बरई आहेत. मुख्य सहदिग्दर्शन प्रवीण देशमुख यांनी केले असून सहदिग्दर्शन अश्विनी अशोक दौंडकर, आकाश बनसोड, सौदागर बदर, सुधीर धुरी, आकाश कांबळे यांचे आहे. वेशभूषा धनश्री कामतेकर, महेश ढावरे यांनी केली आहे. कलादिग्दर्शक मधु कांबळे आहेत. संकलन विनोद चौरसिया तर छायांकन रवी लोकरे यांचे आहे.

कॉलेज जर्नी२ फेब्रुवारीला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.

प्रत्‍येकाने मतदार यादीत आपले नांव असल्‍याची खात्री करावी – अपर जिल्‍हाधिकारी काळे

0

पुणे- प्रत्‍येक नागरिकाने मतदार यादीत आपले नांव आहे की नाही याची खात्री करावी तसेच नवयुवक आणि मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले.

जिल्‍हास्‍तरीय राष्‍ट्रीय मतदार दिवसानिमित्‍त सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्‍ये आयोजित कार्यक्रमास ज्‍येष्‍ठ अभिनेते राहूल सोलापूरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्री छत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार विजेते डॉ. दिनेश पांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा समन्‍वयक यशवंत मानखेडकर, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, उप विभागीय अधिकारी भाऊ गलांडे,  एच.व्‍ही देसाई कॉलेजचे प्राचार्य गिरीश पठाडे, देवदत्‍त ठोंबरे, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.

अपर जिल्‍हाधिकारी काळे यांनी लोकशाहीमध्‍ये मतदानाचे महत्‍त्‍व विशद करुन हे राष्‍ट्रीय कर्तव्‍य बजावण्‍याचे आवाहन केले तसेच उपस्थितांना मतदार शपथ दिली. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी राजकारणातील सजगता, आजूबाजूला काय चालले आहे, याबाबतीतील सतर्कता लक्षात घेऊन योग्‍य व्‍यक्‍तीला निवडून देऊन मतदानाचे कर्तव्‍य पार पाडावे, असे सांगितले.

ज्‍येष्‍ठ अभिनेते राहूल सोलापूरकर यांनीही देशातील निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.  भ्रष्‍टाचार हा केवळ आर्थिक नसतो तर तो मानसिकतेशी निगडीत असतो. वाहतुकीचे नियम न पाळणे, मतदान न करणे हा एक प्रकारचा भ्रष्‍ट आचार आहे.  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, श्री छत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार विजेते डॉ. दिनेश पांडे यांचेही समयोचित भाषण झाले.

उपजिल्‍हा निवडणूकअधिकारी  मोनिका सिंह यांनी या वर्षी भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणुका ही संकल्‍पना राबविण्‍याचे निश्चित केल्‍याचे सांगितले. तसेच प्रमुख पाहुण्‍यांचे स्‍वागत केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ गणेशवंदनेने झाला. त्‍यानंतर दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. निवडणूक कार्यात उत्‍कृष्‍ट काम केल्‍याबद्दल बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील यांचा सत्‍कार यावेळी करण्‍यात आला. रांगोळी प्रदर्शन, पथनाट्यात भाग घेणा-यांचाही यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. नवमतदार, दिव्‍यांग मतदार,वंचित मतदारांना मतदार ओळख पत्र वितरित करण्‍यात आले.

सकाळी महाविद्यालयातून मतदार जागृती रॅली काढण्‍यात आली. यामध्‍ये नेहरु युवा केंद्र, सर परशुरामभाऊ महाविद्यालय,  एच.व्‍ही देसाई कॉलेज तसेच निर्भय नारी फाऊंडेशनच्‍या उषा पाटील आणि इतर विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला.  कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उप विभागीय अधिकारी भाऊ गलांडे यांनी केले.

माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन मलेशियात

0

 

  तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर पोस्टर ने गोड करणा-या माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटात नेमका कोणता कलाकार तिच्यासमोर पाहायला मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. ज्याचं उत्तर नुकत्याच समोर आलेल्या फोटोमधून मिळालं आहे. होय! या कलाकाराचं नाव आहे, सुमित राघवन… हा हरहुन्नरी अभिनेता बकेट लिस्टच्या निमित्ताने धकधक गर्ल माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या रोमॅंटिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच बकेट लिस्टची टीम मलेशियात (लंकावी) जाऊन पोहोचली आहे ज्या गाण्याचे बोल ‘तू परी’ असे आहेत. बॉलिवूड गाजवणारी ही परी ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमातून आपल्या समोर अवतरणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.

बकेट लिस्ट टीमच्या या मलेशिया सफारी निमित्ताने सुमित राघवनच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

स्वीप कार्यक्रमांतर्गत एसओएस बालग्रामच्या 45 विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्राचे वाटप

0

पुणे : समाजातील मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या अनेक समुहांना मतदान कार्ड मिळवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष शिबीराचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग असलेल्या 208 वडगांवशेरी विधानसभा मतदार संघामध्ये  दि. 22 जानेवारी 2018 रोजी एस.ओ.एस. या अनाथ मुलांच्या बालग्राममध्ये एक आगळया वेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 18 ते 21 वयोगटाच्या विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वंचित समूह शोधून त्यांच्या शिबीराचे आयोजन करुन कागदपत्रांची जुळवा-जुळव करुन, अंतिमत: त्यांना कार्डाचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणे ही कामाची पोच पावतीच होती.

पुणे जिल्हयात साजरा होणारा हा पहिला एकमेव कार्यक्रम असून शासकीय कामाबाबत असणारी नागरिकांची उदासीनता अशा वैशिष्टयपूर्ण शिबीरांनी झटकली आहे. या कार्यक्रमात एकूण 45 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोनिकासिंग, वडगांव शेरी मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी ज्ञानेश्वर मोळक, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव, एस.ओ.एस.संस्थेचे झोनल डायरेक्टर एन.के.लोकश, व्हिलेज प्रमुख टी.कोठरेश, निवडणूक नायब तहसिलदार शुभांगी जाधव आदि उपस्थित होते.

रंगीत मतदान कार्डासोबत प्रशस्तीपत्रक घेताना शासनाची ही सेवा आमच्या घरापर्यंत येत असल्याचा आनंद आपल्या मनोगतामधून बालग्राम मधील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी यावेळी व्यक्त केला, असे संजय गांधी योजनेचे तहसिलदार यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.