पुणे :- 213-हडपसर विधानसभा मतदार संघातर्फे दि. 25 जानेवारी 2018 रोजी एस एम जोशी कॉलेज हडपसर येथे 8 वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून 213-हडपसर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री उत्तम पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमास एस एम जोशी कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी तरुण मतदारांना मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय मतदार कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धैतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. तसेच सहस्त्रक मतदार म्हणून विद्यार्थी गणेश कुमावत, अक्षता हादिमणी, एश्वर्या पत्तार व पदमेश शिरामे यांना गौरवण्यात आले. तसेच हडपसर विधानसभा मतदार संघातील उत्कृष्ठ कामगिरी केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्रीमती वंदना काजळे, श्रीमती प्रेमा थापा, श्रीमती जेनिस वासू व पर्यवेक्षक श्री सुरेश रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॉलेजमध्ये मतदार साक्षरता क्लबचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल एस एम जोशी कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रभंजन चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी नविन मतदारांना मार्गदर्शन करताना श्री उत्तम पाटील म्हणाले की, तरुण मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवायला हवा. मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्यांना मतदारांना नोंदणी करणेसाठी प्रोत्साहीत केले पाहीजे. तसेच निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. त्यासाठी नवीन स्थापन झालेल्या मतदार साक्षरता क्लबने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सुदृढ लोकशाहीसाठी या गोष्टी होणे अत्यावश्यक आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी एस एम जोशी कॉलेजचे उपप्राचार्य श्री धुमाळ, निवडणूक नासब तहसिलदार श्री दिनेश पारगे, लिपिक प्रशांत करपे, विष्णू लोहकरे उपस्थित होते. प्रस्तावना निवडणूक नायब तहसिलदार दिनेश पारगे यांनी केली तर समारोप श्री प्रभंजन चव्हाण यांना केला. सुत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती डॉ. सरोज पांढरबळे यांनी केले.