पुणे : महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली असून या कामांसाठी कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना वीजग्राहकांनी थारा देऊ नये असे स्पष्ट आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणने वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणार्या शुल्काची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.
वीजग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरण नेहमीच तत्पर असते. नवीन वीजजोडणी, नावांत बदल किंवा वाढीव वीजभार मंजुरी आदींची प्रक्रिया महावितरणने अतिशय सुलभ व पारदर्शक केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्वतः कार्यालयात येऊन त्याचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर प्रशासकीय दिरंगाई होत असल्याची तक्रार असल्यास 1800-200-3435 व 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकांवर 24×7 संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून 022-26478989 किंवा 022-26478899 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शिवाय ट्वीटरच्या माध्यमातून सुद्धा ग्राहकांना तक्रारीचा निपटारा करता येऊ शकेल.
वीजयंत्रणेत बिघाड असल्यास किंवा दोष असल्यास त्याचा परिणाम मीटरमधील वीजवापराच्या रिडींगवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजमीटरपुढील सर्व वायरिंग सुस्थितीत व दोषविरहित ठेवण्यासाठी नियमित तपासणी करून घेणे मात्र अतिशय आवश्यक आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांत एक खिडकी ग्राहक सुविधा केंद्रात वीजजोडणीबाबतच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती अर्जांसह उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी, वीजभार मंजुरी, नावांत बदल आदींच्या विविध सेवांसाठी पद्मावती, रास्तापेठ, नगररोड, पर्वती व बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी रास्तापेठ येथील ग्राहक सुविधा केंद्गात तसेच कोथरूड विभागातील ग्राहकांनी एसएनडीटी कॉलेजजवळील ग्राहक सुविधा केंद्गात, शिवाजीनगर विभागातील ग्राहकांनी चतुश्रृंगी मंदिरासमोरील ग्राहक सुविधा केंद्गात तर पिंपरी, भोसरी विभागातील ग्राहकांनी पिंपळे सौदागर येथील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क करू शकतात.
हे सर्व असताना वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा.