Home Blog Page 3120

संभाजी भिडेला त्याची जागा दाखवा -अजित पवार गरजले (व्हिडीओ)

नागपूर – ”माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे असून महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेणार नाही. यामागील मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा”, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ‘माऊली आणि तुकोबाचे विचार सर्व जगाला माहिती आहे. आपण त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो. पण कोण तरी संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे योग्य नाही’, असंही अजित पवार म्हणालेत.

57 टक्के लोकांना शुद्र मानणारा मनू श्रेष्ठ कसा ? हे आपल्या राज्यात चालणार नाही. यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. मागच्या वर्षी हे पालखीमध्ये तलवारी घेवून आले होते. यांचा पाठीराखा कोण आहे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. त्या व्यक्तीला काय बोलावं कसं बोलावं. एकीकडे सांगितले आंबे खा म्हणजे मुलं होतील…त्यांनी पिकवलेले आंबे… आणि काल तर कहरच केला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरमाऊली महाराज यांच्यापेक्षा मनु हा श्रेष्ठ होता या पध्दतीचं वक्तव्य…म्हणजे मनुने काय सांगितले होते. मनुने सर्वांना अतिशय तुच्छ लेखलं होतं. समाजातील दोन-तीन टक्केच लोक चांगली आहेत असे विचार मनुने सांगितले. तो विचार योग्य नाही हे सांगण्याचे काम महात्मा फुलेंनी केलं. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आणि ती मनुस्मृती फाडून जाळून टाकली. त्या मनुला हे गोंजारत आहेत हे कसले विचार आणले जात आहेत असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राधाकृष्ण विखेपाटील-

ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनु एक पाऊल पुढे होता, या संभाजी भिडे यांच्या विधानाशी सरकार सहमत नसेल तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी आणि सहमत असेल तर सभागृहात ठराव मांडून मनुस्मृतीला भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करावे, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनुला मोठे ठरवणाऱ्या संभाजी भिडेंवर आणि त्याअनुषंगाने सरकारवर सडकून टीका करताना विखे पाटील म्हणाले की, संभाजी भिडे सातत्याने कायद्याच्या चिंधड्या उडवत आहेत. 
ही भूमिका सरकारला मान्य आहे का? समाजातील वाईट चालीरिती, रूढींवर प्रहार करणारी, समतेची शिकवण देणारी आपली थोर संत-परंपरा कुठे आणि विषमतेची बिजे रोवणारी व समाजाला प्रतिगामी बनवणारी मनुस्मृतीत कुठे? असे प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केले.
गेल्या वर्षीच्या वारीत त्यांनी नंग्या तलवारी नाचवल्या होत्या. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही.

भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात त्यांची भूमिका संशयास्पद होती. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही. मनुस्मृतीचा उदो-उदो करणाऱ्या संभाजी भिडेंची सरकार सातत्याने पाठराखण करते; याचा अर्थ सरकार त्यांच्याशी सहमत आहे. संभाजी भिडेंवर आणि त्यांच्या भूमिकेवर सरकारला एवढेच प्रेम असेल, मनुस्मृतीचे श्रेष्ठत्व सरकारला मान्य असेल, तर मग अधिवेशन सुरू आहे, कायदा करा आणि मनूस्मृती भारताच्या संविधानापेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे जाहीर करून टाका, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –राज्य शासन ज्ञानोबा-तुकोबांच्या आणि राज्यघटनेच्या विचाराने चालणारे असून मनुवादाचे समर्थन करणारे नाही. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे संविधानाच्या विरोधात बोलले असल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व सदस्य अजित पवार यांनी या प्रश्नी उपस्थित केलेल्या मुद्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पालखी मिरवणुकीत दर्शनाला येताना व मिरवणुकीच्या स्वागतासाठी शस्त्र आणण्यास बंदी केली होती त्या ऐवजी डमी शस्त्र आणण्यास परवानगी होती. राज्य शासन कुठल्याही प्रवृत्तीला थारा देत नसून संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

संभाजी भिडे यांचे ‘मनु’संदर्भातील वादग्रस्त विधान
”गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता”, असे धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केले होते. पालखी सोहळ्यादरम्यान आपल्या धारकऱ्यांना जंगली महाराज मंदिरात संबोधित करताना ते बोलत होते.
ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे.त्या सर्वांनी गावागावात सभा संमेलन घ्यावे. देशाला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे भिडे यावेळी म्हणाले तसेच बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य  नाही असेही ते यावेळी म्हणाले.

माध्यमांनी विधिमंडळाचे कामकाज तटस्थपणे मांडावे – गजानन निमदेव

0

नागपूर, दि. 9 : विधिमंडळ हे जनमताचा आरसा आहे. संसदीय लोकशाहीत विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं, विधानपरिषद व विधानसभेत जनहिताच्या चर्चा होत असतात. माध्यमांनी विधीमंडळाचे कामकाज सामान्य जनतेपर्यंत योग्य वार्तांकन करून तटस्थपणे मांडावे, असे प्रतिपादन नागपूर तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव यांनी केले.

विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारीया विषयावर श्री. निमदेव बोलत होते. यावेळी राज्यातील विविध विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते.

 श्री. निमदेव म्हणाले, न्यायपालिका, कायदेमंडळ आणि लोकप्रशासन यांच्याबरोबरीने माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करीत असतात. माध्यमांची भूमिका ही निष्पक्ष आणि तटस्थपणे हवी. विधिमंडळातील चर्चा, घटना यांचे योग्य अवलोकन करून वार्तांकन करणे गरजेचे आहे. न घडलेल्या घटनांची माहिती प्रसिद्ध करता येत नाही. सभापती अथवा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्याशिवाय प्रश्नोत्तरे होत नाहीत. ती प्रसिद्ध करता येत नाहीत, अन्यथा विधिमंडळाचा हक्कभंग होतो, काहीवेळेस संपादकाला शिक्षाही होऊ शकते. काहीवेळा सदस्याने आक्षेपार्ह विधान केलं अन ते कामकाजातून काढून टाकलं असेल तर ते प्रसिद्ध करता येत नाही, याच भान माध्यमांना हवे.

 अधिवेशन हे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील समस्या मांडून त्यावर चर्चा घडवून आणून सोडविण्यासाठी असते, येथे गुणवत्तापूर्ण व अभ्यासू चर्चा होणे अपेक्षित आहे. गोंधळ घालून कामकाज करणे हे सदस्याचा अधिकार आहे, मात्र यावरही अंकुश ठेवायला हवा. माध्यमांनी गदारोळाला महत्व देऊ नये, तरच सभागृहातील कामकाजाची स्थिती सुधारेल. अनेक सदस्य गंभीरपणे वेगळ्या पद्धतीने भागातील समस्या मांडत असतात, यावरही माध्यमांचे लक्ष हवे. एखाद्या सदस्याला न्याय मिळत नसेल तर माध्यमांनी त्यांची भूमिका मांडायला हवी. अभ्यासपूर्ण सदस्यांच्या भूमिकांना माध्यमांनी योग्य स्थान द्यायला हवे, असेही श्री. निमदेव यांनी सांगितले.

             दैनिकाला योग्य भाव मिळाला तर माध्यम प्रतिनिधींची भूमिका बदलेल व जबाबदारीही सुधारेल. माध्यमांनी सभागृहातील हलकं-फुलकं वातावरण, सकारात्मक बातम्यांना जास्त प्राधान्य द्यावे. त्यांनी नेहमी न्यायाधीशाच्या भूमिकेत राहू नये. कोणाचा अवमान व अपमान होऊ नये, असे लिखाण टाळावे. घटनेने माध्यमांना स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी दिली, मात्र याचा दुरूपयोग करू नये. आपल्या लेखणीद्वारे सकारात्मक संदेश जावा. सदस्यावर अंकुश असला पाहिजे, त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, असे माध्यम प्रतिनिधींचे लेखन असायला हवे, असेही श्री. निमदेव यांनी सांगितले.

 श्री. निमदेव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. प्रास्ताविक अवर सचिव सुनील झोरे यांनी केले तर आभार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कान्होपात्रा लोणाग्रे यांनी मानले.

 

ससून रुग्णालयातील तंत्रज्ञ, परिचारिकांच्या संपास मेस्मा लागू – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

0

नागपूर : बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील डॉक्टरांना सहकार्य करणारे तंत्रज्ञ, परिचारिकांच्या संपास राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (मेस्मा) लागू केला असून या कर्मचाऱ्यांना  दि. 7 जुलै 2018 पासून संपास मनाई केली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.

बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील परिचारिकांचे प्रशासकीय कारणास्तव झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी दि. 4 जुलै 2018 पासून कामबंद आंदोलन  होते.

          तसेच कामबंद आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने दि. 3 जुलै 2018 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात राज्य सरकारने रुग्णांचे हित विचारात घेता महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण आणि संबधित कर्मचारी यांनादेखील संप करण्यास बंदी घालण्याबाबत शासन स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे नमूद केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          मुंबई उच्च न्यायालयाने दि. 3 जुलै 2018 रोजी चे अंतिरम आदेश व रुग्णसेवेवर होणारा विपरित परिणाम विचारात घेता, बै.जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील डॉक्टरांना सहकार्य करणारे तंत्रज्ञ, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांच्या संपास लोकहिताच्या दृष्टिने बंदी घालणे आवश्यक असल्याची शासनास खात्री झाल्याने राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांच्या संपास दि.7 जुलै 2018 पासून मनाई केली आहे. त्याचप्रमाणे आदेश दि. 6 जुलै 2018 रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

‘संवादवारी’चा उपक्रम कौतुकास्‍पद – सरपंच गौरी गायकवाड

पुणे – (लोणी काळभोर) :- शासनातर्फे सर्वसामान्‍य नागरिकांसाठी राबविण्‍यात येणा-या योजना
‘संवादवारी’च्‍या माध्‍यमातून थेट पोहोचत असल्‍यामुळे हा उपक्रम कौतुकास्‍पद असून त्‍याचा फायदा
नागरिकांना निश्चितच होईल, असा विश्वास लोणी काळभोर येथील कदमवाक वस्‍तीच्‍या सरपंच श्रीमती
गौरी गायकवाड यांनी व्यक्त केला.
संवादवारी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाल्‍यानंतर त्‍या बोलत होत्‍या. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी,
मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली विविध लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी होत आहे.
जनतेला योजनांचा थेट लाभ मिळत आहे.
महाराष्‍ट्रात आषाढी वारीची जुनी परंपरा असून यानिमित्‍ताने आयोजित केलेला 'संवादवारी'
उपक्रम प्रथमच पाहण्‍यात आला. असा उपक्रम दरवर्षी व्‍हायला हवा, म्‍हणजे वारीमध्‍ये सहभागी होणा-या
सर्वांनाच शासनाच्‍या योजनांची माहिती मिळू शकते. शासनाच्‍या योजनांचा शेतकरी, वारकरी यांनी लाभ
घ्‍यावा, असे त्‍यांनी आवाहन केले. उपसरपंच भाऊसाहेब कदम यांनीही सकारात्‍मक प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.
ते म्‍हणाले, शासकीय योजनांची माहितीसंवादवारीच्‍या माध्‍यमातून ग्रामपंचायत स्‍तरापर्यंत झाली.
चित्‍तरंजन गायकवाड यांनी संवादवारी उपक्रमाचा नागरिकांना लाभ होईल, असे मत व्‍यकत केले. यावेळी
नागरिक व वारकरी उपस्थित होते.

प्रबोधनाच्या माध्यमातूनराज्यातस्वच्छता अभियान गतीमान करणार -बबनराव लोणीकर

पुणे  : स्वच्छता ही जनसेवा आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून
निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच माध्यमातून राज्यात स्वच्छता अभियान अधिक गतीमान
करणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
येथील विधानभवन परिसरात ग्रामविकासविभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागयांच्यावतीने
आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ श्री. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते
बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक
म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पाणी
पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेकर उपस्थित होते.
श्री. बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी
सहभागी होतात. या वारकऱ्यांना शासनाच्यावतीने सर्व सुविधा पुरविण्यात येतात. पंढरपूरच्या वारीत
शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत असते. वर्षभरात एक कोटीहून अधिक भाविक भेट देत असतात.
पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये 25 हजार शौचालये उभारण्यात आली
आहेत. गेल्या काही वर्षात प्रबोधनाच्या माध्यमातून पंढरपूरची वारी निर्मल झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. विश्वासराव देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा
परिषदेच्या माध्यमातून वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर मोठ्या वाहनांना
जाता येत नाही, त्यासाठी पालखी मार्गावर टू व्हिलर आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील 17 जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले
आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी “नमामि”चंद्रभागा अभियान शासनाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे.
चार टप्प्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यावेळीजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे भाषण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून
आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा
दिंडीत सहभागी झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

वारकऱ्यांसाठी महाप्रसाद आणि ईद मिलन सयुंक्त कार्यक्रमाने दिला सर्वधर्म समभावाचा संदेश

पुणे- क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने आज येथे नगरसेवक अविनाश बागवे आणि सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या वारकऱ्यांसाठी महाप्रसाद आणि ईद मिलन या सयुंक्त कार्यक्रमाने  सर्वधर्म समभावाचा संदेश दिला.
सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी ,डॉ. मौलाना काझमी,नगरसेवक रफिक शेख,विठ्ठल थोरात ,रशीद खिजर,तसेच युवा नेते यासर बागवे ,इंदिरा बागवे आणि येथील मस्जिद चे ट्रस्टी ; हिंगोली ,परभणी, मुंबई आणि शिरवळ च्या दिंडीचे प्रमुख आणि वारकरी असे असंख्य मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते .
दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांच्या पालख्या पुण्यात विसावतात तेव्हा वारकरी आणि मुस्लीम बांधव यांच्या एकत्रित स्नेहसंमेलनाचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते …पहा एक व्हिडीओ झलक ….

अमित शहांनी घेतली बाबासाहेब पुरंदरेंची भेट…पहा फोटो ..

पुणे-संपर्क फॉर समर्थन या उपक्रमातंर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी  आज (रविवार) पुण्यात सांयकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली.  यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. बाबासाहेब पुरंदरेंनी अमित शहांना  छत्रपती शिवाजी महाराजांवरील दोन पुस्तके भेट दिली. बाबासाहेब पुरंदरेंना भेटून आपल्याला खूप आनंद झाल्याचे अमित शहांनी  म्हटले आहे .

प्रसिद्धीसाठी मी देवदर्शनाला जात नाही ;शरद पवारांचा अमित शहांना अप्रत्यक्ष टाेला

पुणे : मी कधीच वारीला जात नाही, मात्र वारीचा अनादरही करत नाही. काही कामानिमित्त सोलापूर भागात गेलो तर मोजक्या लोकांसह पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेतो. दुस-या दिवशी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांमध्ये फोटो यावा, अशी कधीच अपेक्षा नसते. प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करायला आवडत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शहांचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

राष्ट्र सेवा दलातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शामसुंदर महाराज सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी एस.एम.जोशी सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. याप्रसंगी तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश परांजपे, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘सध्या टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येतात. हा विज्ञानाचा चमत्कार असला तरी पुढील पिढी तंत्रज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने कसा करेल, ही बाब चिंताजनक बनली आहे. देशाच्या, समाजाच्या हिताच्या गोष्टी, विचार यातून पुढे यायल्या हव्यात. पूर्वीच्या काळी अशी कोणतीही माध्यमे उपलब्ध नसताना किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन झाले. विठोबाच्या दर्शनाने सामान्य माणूस, शेतक-यांना मानसिक, वैचारिक, बौध्दिक आधार आणि आत्मविश्वास मिळतो. नामदेवांनी संतपरंपरेचा विचार देशात सर्वदूर पोहोचवला. शेतक-यांमध्ये किर्तनातून आत्मविश्वास जागवण्याची, धर्मकांड करणा-या प्रवृत्तीच्या आहारी न जाता संतविचार मनावर ठसवण्याची नितांत गरज आहे.’ आजही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला नाही. कर्तृत्व ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही. स्त्रीसुध्दा तितकीच कर्तृत्ववान आहे. स्त्रीची महती संतांनी किर्तनातून अनेक वर्षांपूर्वी अधोरेखित केली.

‘अलंकृता’नटली एक सांगीतिक मैफल…

पुणे-दागिने व अलंकार यांच्याशी स्त्रीचे भावनिक, सामाजिक शृंगारिक नाते असते. या नात्याला गीते शास्त्रीय बंदिशी यातून
रचनाकारांनी उत्कटतेने मांडलेले दिसते. संकल्पनेचा विचार व विस्तारयाच नात्याला शास्त्रीय गायन नृत्य यातून साकार
करायचे. दागिन्यातले संगीत लेउनी नटली एक सांगीतिक मैफल अलंकृता.नुकतीच अलाकृता हि मैफल पुण्यात टिळक
स्मारक इथे अगदी दिमाखदारपणे पार पडली. अलंकृता या कार्यक्रमाची मूळ संकल्पना डॉ.अभिजीत नातू यांची होती
.शुभाराम्भानंतरचा पहिला प्रयोग पार पडला .डॉ रेवा नातू यांनी स्वतः स्वरबद्ध केलेल्या दागिन्यांवर आधारित रचना
सादर केल्या आणि त्यावर शास्त्रीय नृत्यसई परांजपे-भरतनाट्यम् व मुग्धा पाठक-कथ्थक यांनी केले
बैसे हो गणराज ,खेळत रास मोरी , बतिया ना करो , सैया नाही लायो मोहे करधानी ,लचकत जावे रूप मोहिनी या
रचनांचे संगीत डॉ रेवा नातू यांनी दिले होते .त्यावर कथक भरतनाट्यमचा मिलाफ अतिशय कसदार सादर झाला, त्याच
प्रमाणे राग पुरिया धनश्री मधील पायालीया झनकार मोरी ही बंदिश , परब्रम्ह निष्काम तो हा , भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
या रचना डॉ रेवा नातू यांनी आपल्या तडफदार आवाजात पेश करून रसिकांची वाहवा मिळवली . रेणुका स्तोत्र ,मुद्रिका ,
आणि भैरवीतील तराना या राचानांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले .
हार्मोनियमची साथ श्री सुरेश फडतरे, मोहनीश जाजू यांनी तबला तर श्री अक्षय शेवडे पखवाज , डफची साथ केली बासरीची
साथ श्री मृगयेंन्द्र मोहडकर ,सिंथेसाइजर ची साथ श्री दीप डाबरे यांनी केली. क्रांती साने ,सानिका सोमण , आरती मांडके,स्नेहलनाई क, प्रणाली पवार या डॉ रेवा नातू यांच्या शिष्यांनी सह गायनाची साथ अतिशय तयारीने केली . तसेच डॉ नातू यांची शिष्य तन्मयी मेहेंदळे हिने सहगायन आणि तालवाद्याची देखील साथ केली .अंकिता खोजे, ऐश्वर्या कुलकर्णी यांनी भरतनाट्यम सहनृत्याचीसाथ परांजपे यांना केली .रुचिता कल्याणी, तन्वी पाठक, कीर्ति कडेकर-गोस्वामी यांनी कथकला सहनृत्याला साथ मुग्धा पाठककेली .स्नेहल थोरात ,माधुरी आपटे ,मोशमी जाजू यांनी पढंत आणि नृत्यातील काव्य वाचन केले. नील साळेकर यांनी दृक्श्राव्य व्यवस्थासंभाळली .निवेदन गौरी स्वकुळ हिने केले.

पालख्यांचे दर्शन घेतले अमित शहा ,सीएम फडणवीस आणि दानवेंनी…

पुणे-महाराष्ट्रातील अनेक वर्षांच्या आषाढी वारी परंपरेचे औचित्यनिमित्त मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज भवानी पेठ येथील ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या पादुकेचे दर्शन घेतले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. अमित शहा यांनीही दर्शन घेतले.

आज पुणे येथील  विठोबा मंदिर देवस्थान येथे त्यांचे आगमन झाले.  त्यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खा.रावसाहेब दानवे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक,नगरसेवक अजय खेडेकर  आदी उपस्थित होते.

याशिवाय  भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर देवस्थानचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, गोरख भिकुले, प्रमोद बेंगरूट, रत्नाकर हरिश्चंद्रे, स्थानिक नगरसेविका  श्रीमती सुलोचनाताई कोंढरे हेही उपस्थित होते. दर्शनानंतर देवस्थानच्यावतीने मुख्यमंत्री श्री फडणवीस, श्री. अमित शहा, श्री. दानवे यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरीत केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

श्री गंधर्व वेद प्रकाशनच्या “संतदर्शन चरित्र ग्रंथा”चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ. सदानंद मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.

यावेळी श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिला. संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणाची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.

संत विचार हे काळसापेक्ष आहेत. प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्व आहे. मात्र हे संत विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. संत दर्शन या संतांच्या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे संत विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

श्री गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.

चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. बदणाऱ्या सामाजिक मनोविकासामुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. संतांचे विचार पुढे सुरू राहण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला संत चरित्र ग्रंथांच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केले.  सूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या पुढील काळातील निवडणूक ही सोशल मीडिया मधून लढवली जाणार -अमित शहा

सर्व विरोधी नेते एकत्र आले तरी भाजपाला काही फरक पडणार नाही.

भाड्याचे तट्टू चेतक घोड्याचा पराभव करू शकत नाही’

सोशल मिडिया चा वापर करणारी  प्रशिक्षित फौज गरजेची .

हेतू साध्य करणाऱ्या  पोस्ट आणि मेसेज टोकदार असले पाहिजेत

सरकारविरोधी वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांना प्रत्युत्तर द्या

सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांना योजनाबद्ध प्रत्युत्तर द्या

पुणे-देशातील सर्वपक्षीय राज्यस्तरीय पराभूत नेते आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी एकत्र येत आहेत. हे नेते एकत्र आले तरी भाजपाला काही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील भाजपाची सत्ता येणार असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वंयसेवकांशी संवाद साधताना विरोधी पक्षावर सडकून टीका केली. कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर अचूक काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर भाड्याचे तट्टू चेतक घोड्याचा पराभव करू शकत नाही, अशा शब्दांत विरोधकांना टोलाही  त्यांनी लगावला.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदेश भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांशी शाह यांनी संवाद साधला. शहा पुढे म्हणाले, ७० वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आम्हाला साडेचार वर्षांचा हिशेब विचारतात. पण आम्ही मागील साडेचार वर्षांपासून त्यांनी ७० वर्षांत केलेली घाण साफ करत आहोत, हे त्यांना दिसत नाही.

सोशल मीडिया या विषयावर शहा म्हणाले की, या पुढील काळातील निवडणूक ही सोशल मीडिया मधून लढवली जाणार आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर करणारी प्रशिक्षित फौज आपल्याकडे तयार पाहिजे. फक्त मला सोशल मीडिया वापरता येतो असे करून चालणार नाही. तुम्हाला तुमचा हेतू साध्य करायचा असल्यास तुमच्या पोस्ट आणि मेसेज टोकदार असले पाहिजेत, असा सल्ला दिला.

आपली प्रत्येक पोस्ट उपयोगाची ठरणार असेल तरच ती पुढे पाठवण्यात अर्थ आहे. तसे नसेल तर मग अशा पोस्ट कुचकामीच ठरतील. यावर विशेष काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. २४ तास जागे राहून पक्ष आणि सरकारविरोधी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांना योजनाबद्ध प्रत्युत्तर द्यावे लागेल.

महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सभागृह  नेते श्रीनाथ भिमाले   आदी यावेळी उपस्थित होते

चित्रप्रदर्शन आणि कलापथक शासनाचे स्तुत्य उपक्रम

पुणे : चित्रप्रदर्शनातून चित्र पाहता येते, नकळत चित्रांशी बोलता येते, चित्ररुपी वाक्य बोलके वाटतात.
शासनाच्या विविध योजना चित्ररुपाने खूप छान पध्दतीने मांडल्या आहेत. याठिकाणी लावलेले छायाचित्र प्रदर्शन
खरोखरच स्तुत्य आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले आहेत. त्यासोबत
लाखो वारकरी पुण्यनगरीत आलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन एका
रांगेत वारकरी मनोभावे घेत आहेत. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशालेत लावलेले चित्रप्रदर्शन सगळयांचे आकर्षण
ठरत आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनायच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून 'संवादवारी' हा नावीन्यपूर्ण
उपक्रम सुरु केला आहे. लाखो भाविक या वारीत सहभागी होतात. संपूर्ण राज्यातून वारकरी पंढरपूरात विठ्ठलाच्या
दर्शनसाठी येतात.
माहिती व जनसंपर्क या विभागाला शासनाचे कान, नाक, डोळे म्हटले जाते, जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत
पोहचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. शासकीय संदेशाचे प्रसारण आणि कल्याणकारी योजनांबाबत
जनजागृती हे ब्रीद घेऊन ‘संवादवारी’ सहभागी झाली आहे.
‘संवादवारी’संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना ज्ञानेश्वर महाराजांच्या रथापुढील दिंडी क्रमांक एकचे
प्रमुख श्री. राणोजी वासकर महाराज म्हणाले, विसाव्यासाठी दरवर्षी आम्ही या ठिकाणी थांबतो. या शाळेच्या
प्रवेशद्वारावर लावलेले चित्ररथही सर्वांना आकर्षून घेत आहे, खरोखरच हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमास माझ्या
शुभेच्छा.

‘बा विठ्ठला, सर्वधर्मसमभावचा एकोपा कायम राहू दे’

विश्वशांती यज्ञाद्वारे  वैष्णवांचे साकडे!  
पुणे 
सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या हजारो  वैष्णवांनी पुणे मुक्कामी  बा विठ्ठला … बळीराजाचे अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभावचा एकोपा कायम राहू दे!  अशी आळवणी विश्वशांती यज्ञाद्वारे करून श्री विठ्ठलाला  साकडे घातले.
निमित्त होते,माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी श्री. आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या विश्वशांती यज्ञाचे. यंदा २१ व्या वर्षीही सहकारनगर येथील प्रसिद्ध श्रीलक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात वारकऱ्यांची निवास – भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. यावेळी दरवर्षीप्रमाणे हजारो वारकऱ्यांनी  विश्वशांती यज्ञ करून वर्षेनुवर्षे पायी वारी करणाऱ्या बळीराजाला निसर्गाचा प्रकोप, सरकारी अनास्था या दुष्ट चक्रातून सोडविण्यासाठी,समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट होऊ दे आणि जगात शांतता नांदू दे असे साकडे विठ्ठलाला  घातले. माजी उपमहापौर श्री. आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल, नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत, सागर बागुल, रमेश भंडारी, हेमंत बागुल, नंदकुमार कोंढाळकर, अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी,सागर आरोळे,किरण कांबळे,अल्ताफ सौदागर धनंजय कांबळे ,अशोक शिंदे,संतोष पवार  आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचाही  वारकऱ्यांनी लाभ घेतला. त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. नित्यनेमाने यंदाही पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या या वैष्णवांच्या पायाची काळजी घेण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल ,अमित बागुल आणि सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या  पायाला तेलाने मालिश करून त्यांची सेवा केली. 

स्थायी समिती, रिलायन्स जिओ चा १८ कोटीचा कर रद्द करणार काय ?

पुणे-चुकीच्या पद्धतीने करआकारणी झाल्याचा दावा करत महापालिकेच्या प्रशासनानेच रिलायन्स जिओ चा सुमारे १८ कोटी चा कर रद्द करावा असा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समिती पुढे ठेवला आहे . हा प्रस्ताव प्रशासनाने स्वेच्छेने ठेवला आहे कि कोणाच्या दबावाला बळी पडून ठेवला आहे हे स्पष्ट नसले तरी,’ मोबाईल टॉवर बरोबरच निवासी मिळकतींच्या प्रकरणांमधील कर निर्लेखित केला जाणार आहे. रिलायन्स जीओ कंपनीच्या मोबाईल टॉवरना चुकीच्या पद्धतीने करआकारणी झाल्याचे निदर्शनास आले होते. कागदपत्रांची तपासणी करूनच हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. असा दावा कर आकारणी आणि करसंकलन, विभागप्रमुख विलास कानडे यांनी केला आहे .

महापालिकेच्या बांधकाम विभागाने रिलायन्स जीओचे ४३ टॉवर अनधिकृत ठरविले होते. त्यापोटी तिप्पट दराने मिळकत कराची आणि दंडाची आकारणी होत होती. मात्र आता बांधकाम विभागाने या टॉवरना मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर आकारण्याचा प्रश्न येत नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.तसेच १९ टॉवरना दुबार कर आकारणी झाली होती आणि १५ टॉवर अस्तित्वातच नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर वेळेत न भरल्यास त्यांच्याकडून चक्रवाढ व्याजाने दंड वसूल करणाऱ्या आणि थकबाकीदारांच्या घरापुढे बॅण्ड वाजविणाऱ्या पुणे महापालिकेने रिलायन्स जीओ कंपनीवर मात्र मिळकत कराच्या बाबतीत मेहेरनजर केल्याचा आरोप होतो  आहे. मोबाइल टॉवरची बेकायदा उभारणी आणि टॉवरच्या मिळकत कराची थकबाकी अशा स्वरूपात असलेला कोटय़वधी रुपयांचा कर रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून रिलायन्स जीओचे अशा ७७ प्रकरणात अठरा कोटी रुपये या प्रस्तावानुसार रद्द होणार आहेत.महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून स्थायी समितीला करमाफी संबंधीचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून हा कर वसूल न होण्याजोगा असल्यामुळे तो निर्लेखित (रद्द) करावा, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या ८४ प्रकरणात २० कोटी १३ लाख ८ हजार ७९९ रुपये माफ करावेत, असा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ७७ प्रकरणे एकटय़ा रिलायन्स जीओ कंपनीच्या टॉवरची असून थकबाकीची जवळपास ९० टक्के रक्कम रिलायन्स जीओची आहे. अनधिकृतरीत्या टॉवर उभारल्याप्रकरणी रिलायन्स जीओला तीन पट दंड आकारण्यात आला होता. तो दर रद्द करावा, असेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.स्थायी समिती यावर काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागून आहे.

 खासगी मोबाइल कंपन्यांकडून शहराच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणावर टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या मोबाइल कंपन्यांकडे महापालिकेची कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. मात्र महापालिका ती वसूल करीत नाही. थकबाकी संदर्भात मोबाईल कंपन्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर  एकटय़ा रिलायन्स जीओ कंपनीचा कोटय़वधींचा कर माफ करण्याचा प्रशासनाचा हा प्रस्ताव वादग्रस्त ठरणार आहे. कर माफ करण्यासाठी प्रशासनाकडून दिलेली कारणेही संशयास्पद असल्याचा आरोप केला जातो आहे.