Home Blog Page 3106

दोस्तीगिरीचे टायटल ट्रॅक ‘तुझी माझी यारी दोस्ती’ झाले रिलीज !

0

मैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या दोस्तीगिरी सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सूमारास रिलीज झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे.

‘तुझी माझी यारी दोस्ती’ चे संगीत दिग्दर्शन रोहन-रोहन ह्यांनी केले आहे. आणि त्यांनीच गायिका प्राजक्ता शुक्रेसोबत हे गाणे गायले आहे. ह्याविषयी रोहन-रोहन म्हणतात, “आम्हा दोघांची मैत्री आमच्या संगीताविषयीच्या आवडीमूळे झाली. त्यानंतर आम्ही एकत्र काम करू लागलो. त्यामूळे मैत्रीचं नातं आम्हा दोघांसाठी खूप स्पेशल आहे. आणि आमच्या भावनाच ह्या गाण्यातून व्यक्त झाल्यात.”

अभिनेता संकेत पाठक सांगतो, “हे गाणं अक्षय, विजय, पुजा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण ह्या गाण्यानेच चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. ह्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान एकमेकांना अनोळखी असलेल्या आम्हा एक्टर्सची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली. ह्या गाण्याच्या शुटिंगच्यावेळी आम्ही केलेली धमाल तर अविस्मरणीय आहे.”

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमाचे लेखन मनोज वाडकर ह्यांनी केले आहे. रोहन-रोहन ह्यांच्या संगीताने सजलेल्या ह्या सिनेमात संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे, हे मुख्य भूमिकेत दिसतील. ‘अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स’ प्रस्तूत ‘मोरया मुव्हिज क्रिएशन्स’ निर्मित ‘दोस्तीगिरी’ 24 ऑगस्ट 2018ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पुणे गारमेंट फेअरचे आयोजन!

0

पुणे, 1 ऑगस्ट : पुणे डिस्ट्रिक्ट होजिअरी, रेडिमेड अॅण्ड हँडलूम डीलर्स असोसिएशनच्या (पीडीएचआरअॅण्डएच) वतीने येत्या 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान तयार कपड्यांचे पुणे गारमेंट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या गारमेंट फेअरचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट असणार आहेत. आमदार जगदीश मुळीक व आमदार मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पीडीएचआरअॅण्डएच संघटनेचे अध्यक्ष मनोज सारडा आणि गारमेंट फेअर कमिटीचे चेअरमन रितेश कटारिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष निलेश फेरवाणी, खजिनदार धनेश मुथियान आणि सचिव वैभव लोढा उपस्थित होते.

येरवडा येथील डेक्कन कॉलेज मैदानावर 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपर्यंत हे गारमेंट फेअर सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत असणार आहे. हे गारमेंट फेअर फक्त किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असून सुमारे 60 हजार चौरस फुटाच्या हॉलमध्ये ते होत आहे. तयार कपड्यांची विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना दिवाळीच्या सणाच्या दृष्टीकोनातून कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईसह इतर अनेक ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे एकाच छताखाली किरकोळ व्यापाऱ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार कपडे पाहता यावेत आणि त्यांची खरेदी करता यावी या दृष्टीकोनातून हा गारमेंट फेअर आयोजित केला जात असून, त्याचे हे तिसरे वर्ष आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्समधील महिला, पुरुष, लहान मुले, स्पोर्ट्स, लग्नाचे कपडे, इनर वेअर्ससह नवीन ट्रेंड्समधील सर्व प्रकारचे तयार कपडे असणार आहेत.

पुणे होतेय तयार कपड्यांचे हब!

तयार कपड्यांच्या खरेदीसाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील किरकोळ व्यापाऱ्यांना मुंबई, बंगळुरु, इंदोर, कोलकाता, दिल्ली, लुधियाना, जयपूर, अहमदाबाद, सूरत इत्यादी ठिकाणी जावे लागत होते. दरम्यानच्या काळात पुणे हे मध्यवर्ती व वाहतुकीच्या दृष्टीकोनातून रस्ते व रेल्वेने जोडले गेलेले असल्याने पुण्यात तयार कपड्यांची बाजारपेठ निर्माण झाली. या सर्व ठिकाणच्या ब्रँड्स बरोबर आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही पुण्यात थेट उपलब्ध झाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील किरकोळ व्यापारी पुण्यात खरेदी करू लागले. या किरकोळ व्यापाऱ्यांना सर्व ब्रँड्स एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने गारमेंट फेअर सुरु केले आणि त्याचा उपयोग किरकोळ व्यापाऱ्यांना खूप चांगला होत आहे.

पुण्यामध्ये सुमारे 500 होलसेल व्यापारी आहे. येथे खरेदी करणारे सुमारे 25 हजार किरकोळ व्यापारी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, संगमनेर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातून येतात. यातून सुमारे 5000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते.

फेक न्यूज रोखण्यासाठी स्वयंनियमन हाच उपाय– संदीप गादिया

0

पुणे, दि.1 : तंत्रज्ञानामध्ये बदल होत असताना नागरिकांनी जागरुकता जपणे आवश्यक आहे. समाज माध्यमांवर कोणताही संदेश पुढे पाठवताना स्वयंनियमन ही आधुनिक काळाची गरज बनली आहे. यामुळे फेक न्यूजवर निर्बंध येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सायबर क्राईम तपास  विशेषज्ञ संदीप गादिया यांनी आज केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने रानडे इन्स्टीट्यूट कॅम्पस येथील पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात पत्रकारांसाठी आयोजित ‘फेक न्यूज –परिणाम व दक्षता’ या विषयावरील कार्यशाळेत श्री. गादिया बोलत होते. यावेळी सायबर क्राईम तज्ज्ञ विवेक जाधव, माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक प्राध्यापक योगेश बोराटे उपस्थित होते.

श्री. गादिया म्हणाले, इंटरनेटवर अपलोड केलेल्या पोस्टवर आपले नियंत्रण राहत नाही. त्यामुळे इंटरनेट किंवा समाजमाध्यमावर  माहिती देताना प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. आजचे युग समाज माध्यमांचे युग आहे. मात्र समाज माध्यमांचा वापर करत असताना आपण अडचणीत येऊ, अशी कोणतीही कृती करू नये. आज प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये सायबर क्राईमचे प्रमाण हे तिपटीने वाढले आहे.

काही विघ्नसंतोषी व्यक्ती समाज माध्यमांवरील माहितीचा गैरवापर करतात. अनेक आतंकवादी कारवाया, गुन्हेगारी षडयंत्र इंटरनेटच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. सायबर गुन्हेगार कोणाच्याही नावाचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने स्वतःच्या इंटरनेटवरील वागणुकीवर काही बंधने आणणे महत्त्वाचे आहे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू नये, अनोळखी व्यक्तीच्या पोस्टला प्रतिसाद देऊ नये तसेच वैयक्तिक माहिती इंटरनेटवर उघड करू नये, असे आवाहन श्री. गादिया यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सायबर क्राईमची माहिती दिली. तसेच सायबर क्राईमबाबत उपस्थितांचे शंकानिरसन केले.

सायबर क्राईम तज्ज्ञ विवेक जाधव म्हणाले, मागील काही काळात व्हॉट्सअप, फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांचा वापर करून अफवा पसरवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नागरिकांनी इंटरनेटवरील माहितीची पडताळणी न करता ती पुढे पाठवू नये. विश्वासार्ह नसलेला मजकूर समाज माध्यमांतून पुढे पाठविल्यामुळे त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागले आहेत. हे टाळण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

सहायक प्राध्यापक योगेश बोराटे म्हणाले, समाजमाध्यमांवरील मजकूर पाठवण्यामागील उद्देश बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे सर्वांनी स्वतःच शिस्त लावून घ्यावी. विश्वासार्ह पोस्टशिवाय इतर कोणताही मजकूर पुढे पाठवू नये. पत्रकार म्हणूनच नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणून आपली ती जबाबदारी आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फेक न्यूज रोखण्यासाठीचा आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसंचालक मोहन राठोड म्हणाले, फेक न्यूज सध्याचा ज्वलंत व महत्त्वाचा विषय आहे. मोबाईल व इंटरनेटचा वापर जबाबदारीने व काळजीपूर्वक करावा. सायबर क्राईमवर आळा घालण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नेहमी संपर्कात राहावे, अशी सूचना त्यांनी सर्वांनी केली. नागरिकांच्या जागृतीसाठी अशी कार्यशाळा सातत्याने आयोजित करणार असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.

प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन विशाल कार्लेकर यांनी केले तर आभार माहिती सहायक जयंत कर्पे यांनी मानले. कार्यशाळेस पत्रकार तसेच जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

उद्योगजगताने भविष्यातील आव्हाने समजून घेणे गरजेचे – प्रकाश कोडलीकेरी.

0

एनआयपीएम,एमसीसीआयए व आयएसटीडीच्यावतीने ‘उद्योगजगत – भविष्यातील आव्हाने’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न.        

पुणे : उद्योगांनी काळाच्या गरजेनुसार स्वतःच्या कार्यपद्धतींमध्ये बदल करत नवे बदल अंमलात आणले पाहिजेत, असे मत कल्याणी मॅक्सीऑन व्हील्सप्रा.लि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक  प्रकाश कोडलीकेरी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे आयोजित ‘बिझनेस चॅलेंजेस-यस्टरडे, टुडे, टुमारो -प्रिपेअरिंग फॉर द फ्युचर’ अर्थात ‘उद्योगजगत -काल,आज,उद्या -भविष्यासाठी तयार होताना’ या  विषयावर बोलत होते.

मराठा  चेंबर्स ऑफ कॉमर्स (एमसीसीसीआयए), नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) व इंडियन  सोसायटी फॉरट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट (आयएसटीडी) एच.आर.फोरम  च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते.

यावेळी पुढे बोलताना  प्रकाश कोडलीकेरी   म्हणाले कि,  धोरणात्मक निर्णयांमध्ये सुद्धा वेळप्रसंगी बदल करण्याची मानसिकता व्हायला हवी. ज्या वेगाने विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती होत आहे ते लक्षात घेता   येणाऱ्या काळात उद्योगजगताचे चित्र सुद्धा प्रचंड प्रमाणात बदललेले असेल अशावेळी उद्योगजगतातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मनुष्यबळ व्यवस्थापक अशा व्यवस्थापनातील अधिकारी वर्गाने त्यांचा दृष्टिकोन खूप व्यापक ठेवणे आवश्यक आहे.

तर यावेळी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात पॉलिकॅब वायर्स प्रा.लि.  कंपनीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक मिश्रा यांनी  सांगितले की, सध्या सर्वच उद्योगजगतात अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत व अस्पष्टता या चार बाबी कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. तसंच इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती मागणी, आर्टिफिशल इंटेलिजन्स अशा बाबी लक्षात घेता उद्योगजगताच्या आकृतिबंधातच उलथापालथ होताना दिसत आहे. ठराविक एक अशाच साच्यातून आता उद्योगजगताचे स्वरूप तयार होताना दिसत नाही, तर उलटपक्षी नवनवीन कल्पनांच्या वापरातून आपण याआधी विचारसुद्धा न केलेले व्यवसाय सुरु होताना तसेच वाढताना सुद्धा दिसत आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व प्रचंड वेगाने घडत आहे असे असताना निश्चितच आपण या बदलाला  टाळू शकत नाही म्हणून या भविष्यातील आवाहनांना सामोरे जाण्यासाठी जुन्या अनुभवातून आलेले शहाणपण  गाठीशी ठेवून भविष्याचा  वेध घेत असतानाच आपले अस्तित्व वर्तमानातही भक्कम उभे राहील अशा  पद्धतीने वाटचाल करणे गरजेचे आहे   असे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी एनआयपीएमच्यावतीने येत्या २८ व २९ सप्टेंबर२०१८ रोजी पुण्यात होणाऱ्या ‘नॅटकॉन’ या राष्ट्रीय परिषदेविषयी कुमाऊ इंडिया प्रा. लिचे  मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक झाकीर शेख  यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली.

तरयावेळी भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे यांनी  एनआयपीएम २४ नवीन सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  इमर्सन  ऑटोमेशन  सोल्युशन कंपनीच्या एक्च्युएशन टेक्नॉलॉजीजच्या  वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका  हेमांगी धोकटे  यांनी केले. तर आभारप्रदर्शन कल्याणी मॅक्सीऑन  व्हील्स कंपनीचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक  नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय कुलकर्णी यांनी केले.   यावेळी कार्यक्रमाला आयएसटीडीच्या अध्यक्ष रश्मी हेबळकर यांनीही  मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमासाठी  पुणे जिल्ह्यातील  पिंपरी- चिंचवड, चाकण, हिंजवडी आदी भागातील विविध कंपन्यांचे  सुमारे शंभरहुन अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ व सीओओ)उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी अनुजा देशपांडे,  स्पार्क मींड ग्रुपचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष  कल्याण पवार, भारत फोर्ज औद्योगिक संबंध विभागाचे उपाध्यक्ष अभिजीत शहा  आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.

उद्योग क्षेञातील तज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली आयआयएमएस द्वारे २०१८-१९ एमबीएच्‍या तुकडीचा प्रवेशारंभ सोहळा उत्‍साहात संपन्‍न

0

पुणे   : दि. ०१ ऑगस्‍ट २०१८ : शैक्षणिक वर्ष २०१८ साठी एमबीए अभ्‍यासक्रमाकरिता नव्‍यानं प्रवेशित विद्यार्थ्‍यांचं स्‍वागत आणि समावेश करण्‍यासाठी यशस्‍वी एज्‍युकेशन सोसायटीच्‍या चिंचवड इथल्‍या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्‍स मध्‍ये आज  ‘यशोप्रवेश’ या  स्वागत सोहळ्याचं म्हणजेच इंडक्शन कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.

कार्यक्रमाच्या  पहिल्या सत्रात येस बँकेचे कार्यकारी समूह उपाध्यक्ष व प्रादेशिक  व्यापार प्रमुख नीरज माढेकर  यांचे व्याख्यान झाले. आपल्या मनोगतात त्यांनी आत्मविश्वासाचे महत्व व संभाषण कौशल्य कला याविषयी मार्गदर्शन केले.

तर हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स कंपनीच्या  विक्री आणि ऑपरेशन विकास  विभागाचे महाव्यवस्थापक जयदीप संत यांनी आपल्या मनोगतात  प्रत्येकाला स्वतःमध्येच कशाप्रकारे गुणवृद्धी करता येऊ शकते याबाबत  मार्गदर्शन केले तसेच चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर द्यायला हवा असे  सांगितले.

कार्यक्रमाच्या व्दितीय  सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सिनेट सदस्य डॉ. महेश आबाळे यांनी मार्गदर्शन करताना एमबीए अभ्यासक्रमाचे महत्व सविस्तररीत्या सांगून विद्यार्थ्यानी पहिल्या दिवसापासूनच स्वतःच्या व्यक्तिमत्वात कॉर्पोरेट क्षेत्रात जाण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल आत्मसात करण्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. इंडक्शन सोहळ्याच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात बोलताना  संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी प्रवेश सोहळ्याचे महत्व विषद केले.  दरम्यान या प्रवेश सोहळ्यात विद्यार्थ्यानी विविध मॅनेजमेंट खेळांमध्येही  भाग घेतला.

यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, अभिषेक  यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग, अन्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची खासदार काकडेंची मागणी

0

मातंग समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु
खासदार संजय काकडे यांचे आश्वासन

पुणे, दि. 1 ऑगस्ट : मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले. तसेच, शाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आयोजित अभिवादन सभेत खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक व युक्रांदचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,नगरसेवक अविनाश बागवे,सुनील कांबळे, हनुमंत साठे,  तुषार पाटील, भगवान वैराट,  महेश सकट आदी मान्यवर उपस्थित होते.

..त्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही -रामदास आठवले

पुणे –राज्यभरात धनगर,मराठा समाजातील तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन सरकारकडे आपल्या मागण्या मांडाव्यात .हिंसक पध्दतीने आंदोलन करुन काही मिळणार नसुन जनतेचे नुकसान होणार आहे केंद्रात कायदा सर्वपक्षीय आता करून घेणार आहेत ..त्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही अस मत केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यकत केले

 पुण्यात आझम कँम्प येथे रिपब्लिकन पार्टीच्या मुस्लिम विभागाच्यावतीने मुस्लिम बांधवाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास आठवले, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे,रसिद शेख आदि मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम समाज हा जरी अल्पसंख्याक समाज असला तरी तो आपला आहे. या समाजातील तरुणांना रोजगार,शिक्षण हे मिळालेच पाहिजे या करता जे पाच टक्क्याचे आरक्षण आहे.त्यासाठी माझा प्रयत्न सुरु राहणार असुन त्याला संविधानिक महत्व दिले तर त्या आरक्षणाला महत्व आहे. पुणे जिल्ह्यासोबत इतरही सहा जिल्ह्यातुन हज यात्रेसाठी मुस्लिम बांधव मोठया संख्येने जात असतात.तर त्यांना पुण्यातुन रात्रीच्या सुमारात जर पुणे ते हज विमानसेवा देण्यासाठी मी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्याशी बोलुन ही सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने केंद्राकडे मसुदा पाठवु दयावा त्यानतंर केंद्रात त्याचा कायदा झाला तरच याला कोणीही न्यायालयात आव्हान देऊ शकणार आहे. यासाठी मी स्वता पंतप्रधान यांच्याशी बोलणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले दरम्यान लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रामदास आठवले यांनी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठेच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

गोळवलकर विद्यालयात सीडबॉल कृती-कार्यशाळा संपन्न

0

पुणे- येथील टिळक पथावरील मा स गोळवलकर विद्यालयात गत २६ जुलै रोजी सीडबॉल कृती- कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका सौ. लिना तलाठी यांनी सांगितले. जागतिक तापमानाच्या वाढीच्या अनुषंगाने नैसर्गिक गोष्टींची जोपासना केली जावी आणि पुढील पिढीला चांगल्या गोष्टी मिळाव्यात या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी आणि प्रत्यक्ष सहभाग वाढावा यासाठी कार्यशाळेत प्रयत्न करण्यात आले यावेळी माती, गांडूळखत, शेणखत, वेगवेगळ्या बिया यांच्या सहाय्याने सीडबॉल तयार करण्यात आले. शाळेमध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सहाशे सीडबॉल्स बनवले. पुढील महिन्यात शाळेची एकदिवसीय वर्षासहल जाणार असून त्यावेळी हे सीडबॉल्स विविध ठिकाणी रोवले जाणार आहेत.
महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेच्या सुजाता भावे, श्रीया नाचरे, प्रिया भिडे आणि माणिक फाटक या सर्वांनी या कामी पुढाकार घेतला होता. शाळेतील सर्व शिक्षकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले

अंगारकीचतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वराभिषेक(व्हिडीओ)

पुणे-अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटे 3 वाजेपासून भक्तांनि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. फुलांची नयनरम्य अशी मंदिरात सजावट करण्यात आली आहे या सजावटीत सर्व मंगल कलश वापरण्यात आले आहे गणरायाचा अशीर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावं या कल्पनेतून या सजावटीचा संकल्प करण्यात आला आहे. अंगारकीचतुर्थीनिमित्त मंदिरात गायक प्रथमेश लगाटे याने स्वराभिषेक  सादर केलाय.अतिशय सुंदर अशी स्वरपूजा प्रथमेश लगाटे यांनी बाप्पाच्या चरणी सादर केलीय.अंगारकीचतुर्थीनिमित्त पहाटे 3 वाजल्यापासून भक्तांनी आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी  मोठ्या प्रमाणत रांग लावली होती  यावेळी मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली तसेच अभिषेक, याग यांसह विविध धार्मिक विधी देखील मंदिरात पार पडली

‘महिंद्र’च्या यू-321 कारचे नामकरण ‘मॅराझो’

    

    शार्क माशासारख्या आकाराचे मॅराझोचे डिझाईन

·        महिंद्र नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटर आणि महिंद्र रिसर्च व्हॅली यांनी चेन्नईमध्ये तयार केली मॅरोझो

·        पिनिनफिना आणि महिंद्र डिझाईन सेंटर यांचे डिझाईनसाठी संयुक्त प्रयत्न

·        या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये दाखल होणार बाजारात

 मुंबई, 31 जुलै, 2018 ः महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या यू-321 या कारच्या आगामी नव्या मॉडेलचे नामकरण मॅराझो असे केले आहे. बास्क या स्पॅनिश भाषेच्या उपभाषेतील मॅराझो हा शब्द असून त्याचा अर्थ शार्क असा होतो. यू-321’ या गाडीचे डिझाईन शार्क माशासारखे भासत असल्याने हे नाव या गाडीला देण्यात आले आहे.

 महिंद्र डिझाईन स्टुडिओ आणि इटालीतील डिझाईन कंपनी पिनिनफरिना यांनी संयुक्तरित्या मॅराझोचे डिझाईन बनविले आहे. महिंद्रच्या बोल्ड स्वरुपाच्या आणि नव्या दमाच्या गाड्यांची प्रतिमा या डिझाईनमधून प्रतीत व्हावी, हा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. मॅराझोचा आकार, ठेवण ही शार्क माशासारखी असून पुढील भागातील ग्रिल हे शार्कच्या दातांची आठवण करून देतात. गाडीचा टेल लॅम्पची ढबदेखील शार्कच्या शेपटीसारखी आहे. यातून ही गाडी अतिशय आक्रमक असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे.

 मॅराझो हे जागतिक स्तरावर विकसीत करण्यात आलेले उत्पादन आहे. महिंद्र नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटर (एमएनएटीसी) व चेन्नई येथील महिंद्र रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) येथे मॅराझो हे वाहन घडविण्यात आले. या मॉडेलमध्ये अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नवीन  स्वरुपाची कलात्मकता आणण्यासाठी, ‘एमएनएटीसीमधील अभियंत्यांची जागतिक स्वरुपाची क्षमता तसेच एमआरव्हीमधील तज्ज्ञ पथकाचे कौशल्य हे महत्वपूर्ण ठरले आहे. अतिशय आरामशीर प्रवास, चपळपणा, भरपूर जागा आणि शांत केबिन अशी वैशिष्ट्ये असलेल्या मॅराझोच्या या बांधणीचे पेटंट घेण्यात आले आहे.

 मॅराझोच्या नामकरण प्रसंगी महिंद्र अॅन्ड महिंद्र लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका म्हणाले, ”  शार्क ही प्रेरणा असलेल्या मॅराझोमुळे महिंद्रच्या आगामी उत्पादनांची दिशा निश्चित होत आहे. पिनिनफरीना, महिंद्र डिझाईन स्टुडिओ, एमएनएटीसी आणि महिंद्र रिसर्च व्हॅली या सर्वांनी परिश्रम घेतले आणि ग्राहकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन त्यांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन देण्याच्या दृष्टीकोनातून मॅराझो तयार करण्यात आली.

 महिंद्र अॅन्ड महिंद्रच्या वाहन निर्मिती विभागाचे प्रमुख राजन वधेरा म्हणाले, की मॅराझोची बांधणी व तिचा विकास यांची प्रक्रिया लक्षात घेता, जागतिक श्रेणीतील इतर कोणत्याही वाहनाची मॅराझोशी तुलना करता येईल. गाडीतील प्रशस्त जागा, आरामदायीपणा, शांत केबिन, उत्कृष्ट प्रतीची कूलिंग यंत्रणा, उत्कॉष्ट सुरक्षा आणि दणकट बॉडी ही मॅराझोची वैशिष्ट्ये आहेत. व्हीलबेस आणि फ्रंट ट्रॅक यांची रचना महिंद्रच्या अन्य मॉडेल्सपेक्षा मोठी आहे. त्यामुळेच मॅराझो ही एक बेंचमार्क तयार करील आणि तिच्या श्रेणीत ती एक गेम-चेंजर बनेल, असा विश्वास वाटतो.

 गुणवत्ता, तंत्रज्ञान, चाचणी आणि वैधता मानदंड, सुरक्षितता, विनियम आणि वायूंचे उत्सर्जन या जागतिक मानकांनुसार महिंद्रा मॅराझो ही एक बेंचमार्क बनलेली आहे. मॅराझोच्या अत्यंत कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील नाशिक येथील कंपनीच्या कारखान्यात मॅराझोचे उत्पादन करण्यात येईल. आर्थिक वर्ष –2019 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये हे वाहन बाजारात आणण्यात येणार आहे.

मकरंद-क्रांतीच्या ‘ट्रकभर स्वप्नां’चा प्रवास

0

सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन सिनेमांच्या शोधात असणारे मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकारही ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत.

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या प्रमोद पवार यांनी ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. मकरंद-क्रांती यांनी या जोडप्याची भूमिका साकारली आहे. मकरंद देशपांडे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून थेट हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला प्रयोगशील अभिनेता… अॅक्टर-डिरेक्टर अशी प्रतिमा असलेल्या मकरंदने मराठी-हिंदीसह तेलुगूकन्नडमल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. कयामत से कमायत तकपासून मकरंदचा हिंदी सिनेसृष्टीत सुरू झालेला प्रवास प्रहार’, ‘सर’, ‘सत्या’, ‘फरेब’, ‘मकडी’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सिनेमांनी सजलेला आहे. यात आता ट्रकभर स्वप्न’ या मराठी सिनेमाचाही समावेश झाला आहे. पण या सिनेमातील मकरंदची भूमिका आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी विरुध्द आहे. मकरंदने या सिनेमात सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे.

या सिनेमात मकरंदच्या जोडीला क्रांती रेडकर ही मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. सून असावी अशी’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झालेल्या क्रांतीने जत्रा, ‘लाडी-गोडी’, ‘नो एन्ट्री’यांसारख्या सुपरहिट मराठी सिनेमांसोबतच प्रकाश झा यांच्या गंगाजल मध्येही अभिनय केला आहे. क्रांतीबाबत बोलायचं तर नृत्यात पारंगत असलेलीतसंच कोणत्याही भूमिकेला अचूक न्याय देण्यास सक्षम असलेली अभिनेत्री… असं असलं तरी अद्याप तिने कधीही सर्वसामान्य गृहिणीची भूमिका साकारलेली नव्हती. त्यामुळेच ट्रकभर स्वप्न’ या सिनेमाने एक अनपेक्षित जोडी सादर करीत सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे.

मकरंदने या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. दोन मुलं आणि पती-पत्नी अशा चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची ही कथा आहे. सर्वसामान्यांची स्वप्न फार मोठी नसतात. आपलं एक घर असावंमुलं आणि पत्नीसोबत सुखाचे चार क्षण घालवावेआठवड्याच्या एखाद्या संध्याकाळी चौपाटीवर फेरफटका मारावा आणि सुखाने जीवन जगावं ही सर्वसामान्यांचं स्वप्न. याच स्वप्नांच्या दुनियेत मकरंद आणि क्रांती रमल्याचे ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

ट्रकभर स्वप्न मध्ये मकरंद आणि क्रांती सोबत मुकेश ऋषीमनोज जोशीस्मिता तांबेआदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. २४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. या सिनेमाची प्रस्तुती आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा. लि यांनी केली आहे. मीना चंद्रकांत देसाईनयना देसाई या ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. ‘पुष्पक फिल्म’ ट्रकभर स्वप्न हा  चित्रपट २४ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित करणार आहे.

‘एनडी फिल्म वर्ल्ड’ला भेट

0
पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ ‘वेदा’च्या वतीने आयोजन 
 
पुणे : ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अ‍ॅण्ड आर्ट्स’, आझम कॅम्पसच्या वतीने ‘एनडी फिल्म वर्ल्ड’ भेट दौऱ्याचे आयोजन केले होते.
‘बीएससी मीडिया ग्राफिक आणि ऍनिमेशन’च्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम होता. 
‘एनडी फिल्म वर्ल्ड’ हे एक उत्तम वास्तुशिल्पकाराचे अतिशय सुंदर उदाहरण आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासासंदर्भात माहिती देणे आणि त्याची प्रक्रिया जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता’, असे ‘वेदा’ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी सांगितले. 
भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिग्दर्शक नीतीन देसाई यांच्याकडून ‘टाऊन स्क्वेअर सेट’,  अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित हॉरर मूव्ही, हॉरर सीरियल, शूटिंगसाठी बनविलेले एक अनोखे घर, संत विठ्ठलाची विशाल संरचना याविषयी माहिती घेतली. तसेच हिंदी सिनेमाचे मूल्य समजून घेतले, असे या उपक्रमाचे आयोजक स्वतंत्र जैन यांनी सांगितले. 
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्टोरी बोर्ड, आर्ट आणि डिझाईन्स, ठिकाणाची निवड, पटकथा, रिअल टाइम नाटक आणि अभिनय, ध्वनी प्रणाली, प्रकाशाची परिणामकारकता, स्टेज व्यवस्था या बाबतचे ज्ञान आत्मसाद केले. 

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत रोअरिंग लायन्स्, स्पीडिंग चिताज् संघांची आगेकुच

0

पुणे, 31 जुलै 2018-पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना  (पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत  रोअरिंग लायन्स् संघाने पीसीटीए  रेजिंग्ज् बुल्स संघाचा  39-38 असा तर  स्पीडिंग चिताज् संघाने पुणे ओपन  स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाचा 48-33 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अतितटीच्या झालेल्या लढतीत   रोअरिंग लायन्स् संघाने पीसीटीए  रेजिंग्ज् बुल्स संघाचा  पराभव केला.  आर्यन सुतार,  जैश्णव शिंदे,  आर्या पाटील,  रुमा गायकैवारी व अनन्मय उपाध्याय यांच्या विजयी कामगिरीच्या बळावर रोअरिंग लायन्स् संघाने पीसीटीए  रेजिंग्ज् बुल्स संघाचा 39-38 असा केवळ एका गुणाने पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

दुस-या लढतीत  स्पीडिंग चिताज् संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत पुणे ओपन  स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाचा 48-33 असा पराभव केला.  देवांशी प्रभुदेसाई,  सुजय देशमुख,  अदिती लाखे,  वैष्णवी अडकर,  यशराज दळवी  यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत करत संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:   

रोअरिंग लायन्स् वि.वि पीसीटीए  रेजिंग्ज् बुल्स – 39-38(एकेरी: 10 वर्षाखालील मुली: काव्या देशमुख पराभूत वि प्रिशा शिंदे 1-4, 10वर्षाखालील मुले: अमन शहा पराभुत वि शार्दुल खवळे 3(3)-4,  12वर्षाखालील मुली: श्रावणी देशमुख पराभुत वि कौशिकी समंथा 4-6, 12वर्षाखालील मुले:आर्यन सुतार वि.वि अभिराम निलाखे 6-2,  14वर्षाखालील मुले: सोनल पाटील पराभूत वि समिक्षा श्रॉफ 2-6,  14वर्षाखालील मुले: जैश्णव शिंदे वि.वि शौर्य राडे 6-2,  16वर्षाखालील मुली: आर्या पाटील वि.वि हृदया शहा 6-2,  16वर्षाखालील मुले: सिध्दार्थ जाडली पराभूत वि अर्जुन गोहड 0-6,  मिश्र दुहेरी:  रुमा गायकैवारी/अनन्मय उपाध्याय वि.वि आर्यन शहा/ हरिता संकरमण 6-0,  मिश्र दुहेरी:  अथर्व अंमृले/आर्या पाटील पराभूत वि सेश्वर झंझोटे/हृदया शहा 5-6(5))

स्पीडिंग चिताज् वि.वि पुणे ओपन  स्ट्राईकिंग जॅगवार्स- 48-33(एकेरी: 10वर्षाखालील मुली: देवांशी प्रभुदेसाई वि.वि धृवी अद्यंथाया 4-2, 10वर्षाखालील मुले: सुजय देशमुख  वि.वि विरेन चौधरी 4-2, 12वर्षाखालील मुली: अदिती लाखे वि.वि पुर्वा भुजबळ 6-4,  12वर्षाखालील मुले:  पियुष जाधव पराभूत वि अमोद सबनीस 1-6,  14वर्षाखालील मुली: श्रावणी खवले पराभूत वि मधुरीमा सावंत 5-6(10-12),  14वर्षाखालील मुले: सुधांशू सावंत पराभूत वि अनर्घ गांगुली 4-6,  16वर्षाखालील मुली: वैष्णवी अडकर वि.वि मृण्मयी बागवे 6-2,  16वर्षाखालील मुले: यशराज दळवी वि.वि इंद्रजीत बोराडे 6-3, मिश्र दुहेरी- पार्थ देवरूखकर/आशी छाजेड वि.वि अन्या जेकब/सोहम सदावर्ते 6-2, मिश्र दुहेरी- प्रसाद इंगळे/वैष्णवी अडकर वि.वि नमित मिश्रा/मृण्मयी बागवे 6-0)

समाविष्ट २३ गावांच्या रस्ता रुंदीकरणाचा पोरखेळ !

0
पुणेकरांचा जीव  नव्हे बिल्डर्स लॉबीचे हित महत्वाचे ?
 माजी उपमहापौर आबा बागुल यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल 
 
पुणे : खाससभेची कायद्यात तरतूद नसतानाही समाविष्ट २३ गावांमधील रस्ता रुंदीसंदर्भात  पालिका प्रशासनाच्या सकारात्मक प्रस्तावावर निर्णय घेण्याऐवजी तो खासभेकडे वर्ग करून सत्ताधारी भाजपने पोरखेळ करून अकार्यक्षम कारभाराची कबुली दिली आहे शिवाय पुणेकरांच्या जीवाला नव्हे तर बांधकाम व्यावसायिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे त्यामुळे या २३ गावांच्या रस्ता रुंदीबाबत पुन्हा फेरप्रस्ताव देणार असल्याची भूमिका माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी मांडली आहे. 

यासंदर्भांत पालकमंत्री, महापौर आणि सभागृहनेत्यांना पत्र देऊन या निर्णयाबद्दल  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी खेद व्यक्त केला आहे.आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,   समाविष्ट २३ गावांमध्ये पुणे महानगरपालिकेकडून जुन्या विकास आराखड्याप्रमाणे बांधकामांना परवानगी दिली जात आहे,वास्तविक हा प्रकार चुकीचा आहे . ज्यावेळी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली त्यावेळी या गावांमधील रस्ते दीडपट रुंद करण्याची मागणी भविष्यातील वाढत्या लोकसंख्या आणि नियोजनाच्यादृष्टीने करण्यात आली होती. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकही झाली होती. या गावांचा विकास आराखडा करताना रस्तारुंदी कमी दर्शविण्यात आली होती.त्यामुळे नियोजित रस्ता रुंदीसंदर्भांत  विषय  मांडण्यात आला होता मात्र स्थायी समितीने तो खाससभेकडे वर्ग केला होता. मात्र तीन महिने निर्णय न झाल्यास तो विषय आपोआप मंजूर होतो,अशी कायद्यात तरतुद आहे. हे लक्षात न घेता सत्ताधारी भाजपने  पालिका प्रशासनाने २३ गावांच्या रस्ता रुंदीकरणाबाबत ठेवलेल्या सकारात्मक विषयपत्रावर निर्णय न घेता तो खाससभेकडे वर्ग करून निर्णय क्षमता नसल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.  पुणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने आगेकूच करीत आहे. साहजिकच नियोजनपूर्वक कामे होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत शहर आणि परिसरात वाहतुकीचा ताण वाढत आहे आणि अपघातांचा आलेखही गंभीर बनत आहे. भविष्यकाळात हा प्रश्न आणखी बिकट होणार तर आहे शिवाय अपघातांमध्ये नाहक बळींची  संख्याही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच नियोजन होणे आवश्यक असताना दुर्दैवाने त्यादृष्टीने विचारच होत नाही,हे समाविष्ट २३ गावांमधील रस्ते रुंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने खासभेकडे वर्ग केल्याने अधोरेखित झाले आहे. परिणामी पुणेकरांचा जीव महत्वाचा कि बांधकाम व्यावसायिकांचे हित ?हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता भविष्याच्यादृष्टीने नियोजन करण्याची संधी यानिमित्ताने मिळत असतानाही ती आपण गमावत आहोत आणि  पुणेकरांच्या जिवाशीही खेळ करीत आहोत, हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी  विचारात घेण्याची गरज आहे. गेले दहा वर्षे हा प्रस्ताव रखडलेला आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा ही भूमिका घेऊन मी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहे. २०११ मध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,आणि आताही  या प्रस्तावाबाबत खाससभेची भूमिका अयोग्य वाटते. विशेष म्हणजे  खाससभेची कायद्यात तरतूद नाही असे असताना   केवळ बांधकाम व्यावसायिकांचे हित  हे लोकप्रतिनिधींचे धोरण असू शकत नाही. त्यामुळे या विषयपत्रासाठी पुन्हा फेरविचार दिला जाईल आणि एमआरटीपी कायदा ४६ नुसार कार्यवाही व्हावी यासाठी पाठपुरावा केला जाईल असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे. 

अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गिरिजात्मज क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी

0
ओतुर – दि. ३१
अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायकातील   श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गिरिजात्मजचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. जवळपास ८०  ते ९० हजार भाविक भक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, काशीनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.  श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी ६ वाजता व दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले.
      रात्री ९.४० वाजता चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती होणार असुन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर व जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर , मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक  श्रीं च्या दर्शनासाठी येत होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.