पुणे, 1 ऑगस्ट : पुणे डिस्ट्रिक्ट होजिअरी, रेडिमेड अॅण्ड हँडलूम डीलर्स असोसिएशनच्या (पीडीएचआरअॅण्डएच) वतीने येत्या 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान तयार कपड्यांचे पुणे गारमेंट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या गारमेंट फेअरचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट असणार आहेत. आमदार जगदीश मुळीक व आमदार मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पीडीएचआरअॅण्डएच संघटनेचे अध्यक्ष मनोज सारडा आणि गारमेंट फेअर कमिटीचे चेअरमन रितेश कटारिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष निलेश फेरवाणी, खजिनदार धनेश मुथियान आणि सचिव वैभव लोढा उपस्थित होते.
येरवडा येथील डेक्कन कॉलेज मैदानावर 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपर्यंत हे गारमेंट फेअर सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत असणार आहे. हे गारमेंट फेअर फक्त किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असून सुमारे 60 हजार चौरस फुटाच्या हॉलमध्ये ते होत आहे. तयार कपड्यांची विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना दिवाळीच्या सणाच्या दृष्टीकोनातून कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईसह इतर अनेक ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे एकाच छताखाली किरकोळ व्यापाऱ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार कपडे पाहता यावेत आणि त्यांची खरेदी करता यावी या दृष्टीकोनातून हा गारमेंट फेअर आयोजित केला जात असून, त्याचे हे तिसरे वर्ष आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्समधील महिला, पुरुष, लहान मुले, स्पोर्ट्स, लग्नाचे कपडे, इनर वेअर्ससह नवीन ट्रेंड्समधील सर्व प्रकारचे तयार कपडे असणार आहेत.
पुणे होतेय तयार कपड्यांचे हब!
तयार कपड्यांच्या खरेदीसाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील किरकोळ व्यापाऱ्यांना मुंबई, बंगळुरु, इंदोर, कोलकाता, दिल्ली, लुधियाना, जयपूर, अहमदाबाद, सूरत इत्यादी ठिकाणी जावे लागत होते. दरम्यानच्या काळात पुणे हे मध्यवर्ती व वाहतुकीच्या दृष्टीकोनातून रस्ते व रेल्वेने जोडले गेलेले असल्याने पुण्यात तयार कपड्यांची बाजारपेठ निर्माण झाली. या सर्व ठिकाणच्या ब्रँड्स बरोबर आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही पुण्यात थेट उपलब्ध झाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील किरकोळ व्यापारी पुण्यात खरेदी करू लागले. या किरकोळ व्यापाऱ्यांना सर्व ब्रँड्स एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने गारमेंट फेअर सुरु केले आणि त्याचा उपयोग किरकोळ व्यापाऱ्यांना खूप चांगला होत आहे.
पुण्यामध्ये सुमारे 500 होलसेल व्यापारी आहे. येथे खरेदी करणारे सुमारे 25 हजार किरकोळ व्यापारी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, संगमनेर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातून येतात. यातून सुमारे 5000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते.